Tuesday 16 April 2019

रॉबेन आयलंड

१९९८ मधील केप टाऊन सफरीत, रॉबेन आयलंडला भेट देणे, हा कार्यक्रम नक्की केला होता. हा तुरुंग, विशेषतः नेल्सन मंडेलांच्या दीर्घ कारावासाच्या पार्श्वभूमीवर या तुरुंगाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. केप टाऊनला पोहोचलो आणि लगोलग रॉबेन आयलंडला जाण्याच्या मरीन बोटीची चौकशी केली. सुदैवाने हवामान चांगले असल्याने मला तिकिटे लगेच मिळाली. खराब हवामानामुळे रॉबेन आयलंड आणि केप किनारा मधील समुद्र प्रचंड खवळलेला असतो आणि मग फेरी बोट बंद ठेवतात. रॉबेन आयलंडला जाण्यासाठी साधारणपणे बोटीला अर्धा ते पाऊण तास लागतो. बोटीतून जाताना लक्षात येते, इथे तुरुंग बांधण्यात, त्यावेळच्या गोऱ्या राजवटीने किती धूर्त विचार केला असणार. दोन्ही प्रदेशांमधील समुद्र अतिशय धोकादाय असा असतो. तुरुंगातून पळून जाऊन, समुद्रात उडी टाकून नसण्याचा प्रयत्न करणे, महा भयंकर धाडस आहे आणि ही आजची अवस्था!! 
रॉबेन आयलंड हे मोठे बेट आहे, चारी बाजूने समुद्राने वेढलेले. या बेटावर राहायचे म्हणजे तुम्हाला पाण्यापासून सगळ्या गोष्टी केप टाऊनमधूनच आणाव्या लागतात. सध्या इथे थोडे अधिकारी राहतात परंतु आता त्याचे स्वरूप म्युझियमसारखे ठेवले आहे. जातानाच तुरुंग किती भयाण असणार, याचा अंदाज येतो.  जेंव्हा  या देशात १९९४ साली आलो तेंव्हा या देशाची जी काही तुटपुंजी माहिती होती, त्यात नेल्सन मंडेला आणि त्यांचा तुरुंगवास, या माहितीला अधिक महत्व होते. हा देश किती पुढारलेला आहे, वगैरे माहिती, मी इथे आलो, अनुभवले तेंव्हा झाली. तेंव्हा याच पार्श्वभूमीवर मी आणि माझा  मित्र,रॉबेन आयलँडच्या सफरीवर निघालो होतो. 
आकाश निरभ्र होते, दुपारचे ऊन टळटळीत होते. जवळपास अर्ध्या, पाऊण तासाने आमची फेरी बोट या बेटाच्या धक्क्याला लागली. फेरी बोटीच्या सफरीत, हा समुद्र किती धोकादायक आहे, याची कल्पना आली. 
आता रॉबेन आयलंड हे म्युझियम स्वरूपात असले तरी तुरुंग त्याच काळातील ठेवले आहेत. थोडीफार डागडुजी केल्याचे कळत होते परंतु इथे उतरल्यावर पहिली जाणीव हीच होते, आपला बाहेरच्या जगाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. कुठेही मानवी वस्ती असल्याचे जाणवत नव्हते. अर्थात सर्वात आधी, नेल्सन मंडेलांना जिथे ठेवले होते, त्या खोलीकडे आलो. बघताना, मला आपल्या अंदमान इथल्या तुरुंगाची फार आठवण येत होती. अंदमान तुरुंग देखील असाच असणार, जगापासून तुटलेला!! आज अंदमान बऱ्यापैकी सुधारलेले आहे. रॉबेन आयलंड आजही त्याच अवस्थेत ठेवलेले आहे आणि त्यामुळे भयाणता अधिक भावते. आसमंतात कुठेही (पक्षी वगळल्यास) कसलाच आवाज नाही, सुनसान शांतता असते. गाईड बरोबर असतो आणि त्याच्याकडून बरीचशी माहिती कळते. 
Mbeki, Zuma किंवा सध्याचे Ramaphosa हे अध्यक्ष देखील मंडेलांसोबत इथेच आयुष्य कंठत होते. इतकेच नव्हे तर असंख्य मुस्लिम लोकांना देखील इथेच डांबून ठेवले होते. काहींची इतिश्री इथेच झाली होती!! सगळा इतिहास फोटोंच्या रूपाने तसेच तिथे काही पुस्तिका मिळतात, त्यावरून लक्षात येतो. या देशाने काय आणि किती भोगले होते, किती अपमानास्पद जिणे जगावे लागले होते, याची कल्पना (आपण कल्पनाच करू शकतो) येते. इथे तुरुंगात आयुष्य सडत असताना, कित्येकांचे संसार कायमचे उध्वस्त झाले, कित्येकांच्या कायमच्या ताटातुटी झाल्या, हे सगळे कळते. आपल्याला फक्त नेल्सन मंडेलांनी किती भोगले, इतकेच सांगितले जाते - निदान त्यावेळेपर्यंत तरी माझी तितकीच कल्पना होती. वास्तविक मी या देशात १९९४ साली आलो त्याच वर्षी इथे पहिल्या लोकशाही राजवटीची पुनर्स्थापना झाली होती आणि मला देखील वांशिक भेदाभेदीचे अनुभव आले होते परंतु वर्षानुवर्षे नकारात्मक आयुष्य जगणे म्हणजे काय अनुभव असतो, हे समजून घेण्यासाठी तरी इथे यायला हवे. 
इथे कृष्णवर्णीयांबरोबर हजारोंच्या संख्येने आशियायी वंशीय लोकांनीही लढ्यात भाग घेऊन, आपली आयुष्ये उधळली आहेत, त्यात मुस्लिम आहेत, हिंदू आहेत, दाक्षिणात्य आहेत. सगळ्यांचे फोटो आणि माहिती इथल्या म्युझियममध्ये बघायला मिळते. एकदा या बेटावर प्रवेश केला म्हणजे सगळे संपले कारण पळून जायचे तरी कुठे? बेटाच्या टोकावरून खवळत्या समुद्रात उडी मारणे, हाच एकमेव मार्ग आणि समुद्रात काय आहे, याचा कसा थांग लागणार? या बेटावर आणलेल्या बंदींना अमानुष पद्धतीने कामाला जुंपायचे, जेवणाचा पत्ता नाही, आपल्या माणसांशी संपर्क नाही. मनाची किती कुतरओढ झाली  असेल,कल्पनाच येत नाही. १९८५ नंतर जेंव्हा मंडेलांच्या हालाचे वर्णन जगात पसरायला लागले आणि आंतर राष्ट्रीय दबाव वाढायला लागला, त्यावेळेस इथे थोड्याफार सुधारणा झाल्या. अर्थात सुधारणा झालेले आयुष्य, सध्या  बघताना,पूर्वी काय प्रकारचे आयुष्य असेल, याची साधी कल्पना देखील अवघड. 
या देशाने अपरिमित हाल भोगले आहेत आणि निव्वळ सत्तेचा वरवंटा गौरवर्णियांनी आपल्या हातात ठेवायच्या अपरिमित लालसेपोटी, इथली आयुष्ये उजाड झालेली आहेत. 
इथे हिंडताना, मनाची फार विचित्र अवस्था होते आणि त्याच अवस्थेत आम्ही परतीची बोट पकडली. 

No comments:

Post a Comment