Monday 22 April 2019

मनगटी जादूगार - इरापल्ली प्रसन्ना

मला वाटतं १९७०/७१ चा रणजी सामन्यांचा मोसम असावा, मुंबईच्या ब्रेबर्न स्टेडियमवर मुंबई विरुद्ध कर्नाटक, हा सामना होता. मी तर हाडाचा मुंबईकर म्हटल्यावर मुंबईला पाठिंबा, हे ओघानेच आले. नुकतीच शाळेच्या संघातून खेळायला सुरवात झाली होती. त्यावेळी मुंबई संघातून, सुनील, रामनाथ (याच्यासारखा क्षेत्ररक्षक फार विरळा बघायला मिळाला!!) दिलीप सरदेसाई, वाडेकर, अशोक मंकड, शिवलकर, सोलकर, बाळू गुप्ते सारखे खेळाडू तर कर्नाटक संघातून विश्वनाथ, ब्रिजेश पटेल (हे नाव नव्यानेच प्रकाशात आले होते) चंद्रशेखर आणि प्रसन्ना. या सामन्यात प्रथमच मी प्रसन्नाला प्रत्यक्ष खेळताना बघितले. 
काहीशी जाडसर शरीरयष्टी, काहीसा बुजरा परंतु हसरा चेहरा हीच या गोलंदाजांची पहिली आठवण. १९६७/६८ च्या ऑस्ट्रेलिया/न्यूझीलंड दौऱ्यात प्रसन्नाचे नाव मी प्रथम ऐकले/वाचले होते. प्रत्यक्ष आयन चॅपलने तोंडभरून कौतुक केल्याचे मुलाखतीत वाचले होते. त्यावेळचा ऑस्ट्रेलियन संघ खरोखरच असामान्य असाच होता आणि त्यांच्या घरी जाऊन २५ विकेट्स घेणे, ही काही सहज जमण्यासारखी कामगिरी नव्हती. पुढे त्याच मालिकेला जोडून, न्यूझीलंड मालिकेत २४ विकेट्स पदरी पाडल्या होत्या. आयन चॅपेलने तर गिब्सपेक्षा मोठा स्पिनर, अशी वाखाणणी केली होती. या पार्श्वभूमीवर मी त्याला मैदानावर बघताना काहीसा हरखूनच गेलो होतो - माझे ते वयच असे होते, एक शाळकरी मुलगा, मनावर तसे काही फार संस्कार झालेले नव्हते आणि त्यावेळी कसोटी क्रिकेटपटू बघणे, हाच दुर्लभ आनंद असायचा. ब्रेबर्न स्टेडियमवर बहुदा मी प्रथमच गेलो होतो. इतका विस्तीर्ण परिसर, आजूबाजूला चकचकीत वातावरण, काहीशी ब्रिटिश छाप आणि संपूर्ण मैदान हिरवळीने भरलेले. एकूणच भारून गेलो होतो. आता सामन्याचा तपशील फारसा आठवत नाही पण मनावर बिंबले टी प्रसन्नाच्या गोलंदाजीची शैली. किती सहज सुंदर अशी शैली होती. 
चार, पाच पावलांचा स्टार्ट आणि त्याच सहजतेने, हाताची ऍक्शन. कुठेही आकांडतांडव नाही की चेहऱ्यावर कसलेही भाव नाहीत. सध्या लयीत धाव घ्यायची आणि पुढे चेंडूची जी काही करामत करायची, ती सगळी त्याची बोटे करीत असत. वास्तविक ब्रेबर्नची खेळपट्टी फलंदाज धर्जिणी होती आणि स्पिनर्सना खेळण्यासाठी मुंबईकडे वाडेकर, सरदेसाई, मंकड सारखी अफलातून फौज होती पण तरीही यामधील प्रत्येक फलंदाज, प्रसन्नाला जपूनच खेळत होता. त्यावेळी मी प्रसन्ना आणि बेदी, असे दोनच मंदगती गोलंदाज पाहिले ज्यांची चेंडू टाकायची शैली अतिशय साधी असायची पण निव्वळ मनगटावर ते फलंदाजांना नाचवायचे. त्यासाठी, प्रसन्ना, वेगवेगळ्या प्रकारे चेंडूला उंची द्यायचा - चेंडूला वेगवेगळी उंची देण्यात तर प्रसन्ना निव्वळ जादूगार असायचा. एकाच शैलीत चेंडू टाकताना, चेंडूचा फ्लाईट कमी-जास्त करून, समोरील फलंदाजाला आव्हान द्यायचा. चेंडू "ओव्हरपीच" पडेल असे वाटायचे आणि म्हणून फलंदाज पाय पुढे टाकून ड्राइव्ह मारण्याच्या पवित्र्यात यायचा आणि अंदाज चुकायचा - परिणाम, फलंदाजांची यष्टी उखडली जायची किंवा जर का फटका मारायचे ठरवलेच तर बॅटीची कड लागून थेट प्रसन्नाच्या हातात झेल!! हे दृश्य अविस्मरणीय. 
फलंदाजाला गंडवणे, हा प्रसन्नाच्या डाव्या हाताचा मळ होता. आपण कुठे चुकलो, याचा शेवटपर्यंत पत्ता लागायचा नाही. एकतर चेंडूला वळवणे (प्रसन्ना आपल्या मर्जीनुसार चेंडू वळवत असे, त्यासाठी खेळपट्टीचा साथ हवीच असला आग्रह नसायचा) या कलेवर त्याचे कमालीचे प्रभुत्व होते. ऑफ स्टम्पच्या बाहेर - किती बाहेर तर पाचव्या किंवा सहाव्या यष्टीवर चेंडू टाकायचा आणि अखेरीस लेग स्टंपपर्यंत आता वळायचा!! एखाद्या जहरी कोब्राने १८० अंशाच्या कोनात डंख द्यावा तसा त्याचा चेंडू फलंदाजाला डंख द्यायचा. त्याच्या भात्यात अनेक शास्त्रे होती. चेंडूच्या फ्लाईटमधील अगम्य बदल करणे, मध्येच "फ्लोटर" टाकणे, चेंडू किती "स्पिन" करायचा हे नेमके मनात ठरवून तसा चेंडू टाकणे. अखेरच्या क्षणी चेंडू स्पिन करण्याच्या पद्धतीत अकल्पित बदल केल्याने, समोरील फलंदाज बावचळून जायचा. आधीचा  चेंडू संपूर्णपणे १८० कोनात वळलेला असायचा, त्याच शैलीत पुढील चेंडू चक्क फ्लोटर असायचा किंवा स्पिन थोडा कमी असायचा. त्यामुळे व्हायचे असे, येणार चेंडू पुन्हा त्याचा अंशात वळणार या भ्रमात असलेला फलंदाज, कमी वळलेल्या चेंडूला तितका तयार नसायचा आणि त्याची फसगत व्हायची. प्रसन्ना या कलेतील जादूगार होता, तो इथे. 
मी वर म्हटल्याप्रमाणे, त्याचे फ्लाईटवर पूर्ण नियंत्रण असायचे. फसवा फ्लाइटेड चेंडू टाकणे, ही प्रसन्नाची खासियत होती. वास्तविक "ओव्हरपीच" चेंडू म्हणजे फलंदाजाला कव्हर ड्राइव्ह मारायला निमंत्रण आणि तसा फटका खेळावा असे प्रसन्ना आमंत्रण देत असे परंतु आयत्यावेळी फलंदाजाला समजायचे, जरी चेंडूला उंची दिली असली तरी त्याचा टप्पा थोडा अलीकडे पडलेला आहे. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असायची. ही करामत मैदानावर बघणे, हा नयनरम्य सोहळा असायचा. वेगवान गोलंदाजीत सगळा खेळ निमिषात संपणारा असतो परंतु इथे पुंगी वाजवून नागाला खेळवीत मारणे, ही स्पिनर्सची खरी खासियत असते आणि इथे प्रसन्ना अतुलनीय होता. 
आणखी एक गंमत. आपल्या मनाप्रमाणे फलंदाजाला खेळवून त्याची विकेट घेतल्यावर, त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद पसरायचा, ते स्मित, बघण्यासारखे असायचे. मी या फलंदाजाला, माझ्या मर्जीप्रमाणे खेळवले आणि त्याला बाद केले, याचा आनंद असायचा. त्यावेळी भारतीय संघात, स्पिनर्स गोलंदाजीत तगडी स्पर्धा होती. एकाचवेळी, प्रसन्ना, चंद्रशेखर, बेदी, वेंकट तसेच संघाबाहेर, शिवलकर, राजिंदर गोयल सारखे असामान्य मंदगती गोलंदाज उपलब्ध होते. या सहा गोलंदाजांपैकी गोयल आणि  शिवलकर,यांना निव्वळ दुर्दैवी म्हणावे लागेल. चुकीच्या काळात जन्माला आले. त्यामुळे भारतीय संघात नेहमी स्पर्धा ही प्रसन्ना आणि वेंकट, या दोघांच्यात असायची आणि प्रसन्नाच्या तुलनेत वेंकट, क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत बराच उजवा होता आणि त्याचा वेंकटला बराच फायदा मिळाला. अन्यथा फक्त, चेंडू वळवणे आणि मंदगती गोलंदाज म्हणून प्रसन्ना नेहमीच उजवा होता. 
प्रसन्ना एक क्षेत्ररक्षक म्हणून कामचलाऊच होता. खरतर त्या काळात क्षेत्ररक्षण म्हणून काही खास बाब असते, इकडे दुर्लक्षच असायचे. बेदी, चन्द्रशेखर, प्रसन्ना कधीही क्षेत्ररक्षक म्हणून मान्यता पावले नाहीत जे आज रवींद्र जडेजा बाबत म्हणता येईल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा संघाला नेहमीच फायदेशीर असतो परंतु त्याकाळात ही कल्पना तितकीशी स्वीकारली गेली नव्हती. (वाडेकर, सोलकर, वेंकट सारखे अपवाद) अर्थात याची भरपाई हे गोलंदाज आपल्या कलेतून पुरेपूर दाखवून देत असत. 
प्रसन्नाने हिरवळीवरून ३, ४ पावलांच्या स्टार्टमध्ये हातातील बोटांच्या साहाय्याने भल्याभल्या फलंदाजांवर दहशत गाजवली होती. याचा अर्थ असा  नव्हे,प्रसन्नाने नेहमीच आपले वर्चस्व गाजवले. ऐन भरात असताना, एका रणजी सामन्यात मुंबईच्या संघातील वाडेकर/सरदेसाई जोडगोळीने ३०० धावांची भागीदारी करून प्रसन्ना/ चंद्रशेखर जोडीला कसे आपल्या तालावर नाचवायचे, याचा आदिनमुना पेश केला होता पण असे फार क्वचित घडायचे. अर्थात कारकिर्दीच्या अखेरीला मात्र प्रसन्नाची जादू लयाला जायला लागली आणि जे घडायचे तेच घडले. १९७७/७८ च्या सुमारास प्रसन्नाने आपली कारकीर्द आटोपती घेतली. त्यानंतर आता ४० वर्षे झाली पण भारताला अजून दुसरा प्रसन्ना सापडू शकला नाही. 

No comments:

Post a Comment