Tuesday 26 June 2018

कलाकार आणि आत्मसन्मान

आजच पंतप्रधान मोदींनी १९७५ च्या आणीबाणीची उजळणी केली आणि त्यानिमित्ताने काँग्रेसवर जहरी टीका केली. आता राजकारण म्हटल्यावर एकमेकांवर टीका करणे, प्रसंगी चिखलफेक करणे इत्यादी उद्योग नेहमीच चालू असतात. १९७५ सालाची आणीबाणी, हा विषय इतक्या सहजपणे पुसला जाणारा नाही, जसे १९८४ सालचे दिल्लीतील शीखहत्याकांड आणि २००२ सालचे गोध्रा प्रकरण!! प्रत्येक राजकारणी, स्वतः:च्या फायद्यासाठी या घटनांचा कायम उपयोग करून घेणारच - प्रश्न इतकाच असतो, वेळ कशी साधून घ्यायची? आजच्या भाषणात, इतकी वर्षे फारसा कुणाच्या लक्षात न आलेला मुद्दा पंतप्रधान मोदींनी उचलून धरला - सुप्रसिद्ध गायक, किशोर कुमारवर घातली गेलेली बंदी. 
वास्तविक, किशोर कुमारवरील बंदी त्याकाळात उचलून धरणे अशक्यच होते पण नंतर देखील या बातमीची फारशी वाच्यता झाली नव्हती. किशोर कुमार सारख्या देशविख्यात कलाकारावरील बंदी, हा राजकारण करायला सुंदर मुद्दा होता. तसे बघितले मोदींनी निव्वळ शिळ्या कढीला ऊत आणला - अर्थात किशोर कुमारवरील बंदी हाच मुद्दा इथे लक्षात घेतला आहे. 
आपल्या समाजात आजही अशा प्रकारची बंदी वगैरे घातली तरी काही दिवस वगळता, फारशे टीका केली जात नाही. त्यावेळेस नक्की काय झाले होते? दडपशाही तर नक्कीच होती आणि सरकार विरुद्ध "ब्र" काढण्याची इच्छा आणि कुवत देखील कुणाही नेत्याकडे नव्हती - ज्यांची कुवत होती ते सगळे नेते बंदीबावं झाले होते. त्यामुळे सरकारकडे अभूतपूर्व अशी सत्ता प्राप्त झाली होती. तेंव्हा काँग्रेस म्हणेल तीच पूर्व दिशा, असं सगळा प्रकार होता. अशा काळात, एका सरकारी कार्यक्रमासाठी काँग्रेसने किशोर कुमारच्या गायनाचा कार्यक्रम योजण्याची ठरवले होते. त्याआधी देखील हिंदी चित्रपट सृष्टीतील काही प्रतिथयश गायक/गायिकाचे जाहीर जलसे झाले होते आणि त्यांनी विना खळखळ कार्यक्रम केले होते. 
या परिस्थितीत काँग्रेस पक्षाला, किशोर कुमार यांचा होकार निश्चित अपेक्षित होता पण तिथेच किशोर कुमार यांनी स्पष्ट नकार दिला!! 
सत्ताधाऱ्यांना अशा प्रकारचा विरोध सहन करण्याची वृत्ती नसते. होयबा वृत्तीची माणसेच आजूबाजूला अपेक्षित असतात, हुजरेपणा अपेक्षित असतो. तेंव्हा किशोर कुमार यांचा नकार म्हणजे चक्क सत्तेला आव्हान!! आणीबाणीच्या काळात कसे सहन केले जाणार? लगोलग किशोर कुमारच्या गाण्यांवर बंदी आणली, त्यांचे कार्यक्रम कुठेही होणार नाहीत, याची तजवीज केली गेली. आणीबाणीच्या काळात या बातमीचा फारसा गाजावाजा, निदान सुरवातीला तरी नक्कीच झाला नव्हता पण हळूहळू बातमी बाहेर आली. परंतु परिस्थितीच अशी होती, कुणीही या बंदीविरुद्ध आवाज उठवला नव्हता. किशोर कुमार यांची गाणी रेडियोवरून प्रसारित होण्याचे थांबले. त्याकाळात, रेडियो हे सर्वात प्रभावी मनोरंजनाचे साधन होते आणि तिथेच या गायकाची गाणी वाजवणे बंद झाली!! 
पुढे यथावकाश आणीबाणी उठली आणि लवकरच किशोर कुमार दूरदर्शनवर झळकले. आता इथे एक मुद्दा प्रकर्षाने उभा राहतो. कलाकाराने प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध उभे रहावे की नाही? कलाकार झाला तरी त्याला स्वतः:ची राजकीय, सामाजिक मते असणे सहज शक्य आहे आणि त्याप्रमाणे कुठलाही कलाकार व्यक्त होऊ शकतो. पाश्चात्य संस्कृतीत अशी उदाहरणे पूर्वी देखील झाली आहेत आणि आजही सापडत आहेत. अर्थात भारतात परिस्थिती फार वेगळी आहे. 
बरेच काय होते, कलाकार इतके अगतिक होतात की तेच स्वत: सरकारचे पाय धरतात आणि आपल्या गरजा भागवून घेतात.  कलाकाराने सरकारचे मिंधे व्हावे का? हा एक सनातन काळापासून चालत आलेला प्रश्न आहे आणि याचे उत्तर नक्कीच सहज, सोपे नाही कारण वैय्यक्तिक गरज ही फार व्यक्तिगत असते आणि तिथे सगळीच मते, ताठरपणा वगैरे बाबी कोलमडून पडतात. कलाकार स्वतंत्र असतो, हे एका मर्यादेपर्यंत योग्य आहे पण भौतिक आयुष्यासमोर हा "स्वतंत्र"पणा टिकणारा नसतो. मनाचा पीळ कायम राहात नसतो आणि अशी असंख्य उदाहरणे दाखवता येतील. 
आपल्याकडे एक विचित्र समज फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. विशेषतः: मराठी कलाकाराला आर्थिक स्वातंत्र्य, भौतिक सुखे अप्राप्यच असावीत!! यात कुणालाही काहीही खंत नसते आणि कुणी जास्त पैसा मिळवला की लगेच अनेक तर्क-वितर्कांना उधाण येते!! यामुळे कलाकार अधिकच अगतिक होऊन बसतात, आता या परिस्थितीत थोडाफार फरक पडला आहे. परंतु कलाकाराने आत्मसन्मानाने जगावे, ही संकल्पना समाजाच्या फारशी पचनी पडलेली नाही. त्यातून माणसाच्या गरजा, कधीच संपणाऱ्या नसतात तेंव्हा एका विविक्षित क्षणी सरकारकडे किंवा सत्ताधाऱ्यांकडे वळणे क्रमप्राप्तच ठरते. अशावेळी मग आत्मसन्मान या शब्दाला काय किंमत उरणार? बरेचवेळा असेच घडते. अर्थात किशोर कुमार सारखी उदाहरणे एकूणच विरळाच असतात. 
 आज एका सभेत पंतप्रधान मोदींनी आणीबाणीच्या काळातील किशोर कुमारांच्या बंदीचा विषय नव्याने उघडला आणि त्यातून हे सगळे आठवले.पंतप्रधान  मोदींनी हा विषय काढताना राजकारण साधण्याचाच प्रयत्न केला. तसा प्रयत्न सगळेच राजकारणी नेते सदासर्वकाळ करताच असतात आणि त्यासाठी अनेकवेळा अनेक कलाकार स्वतः:हुन विषय पुरवत असतात.

No comments:

Post a Comment