Thursday 21 June 2018

राहुल देव बर्मन

असे नेहमी म्हटले जाते, मोठ्या वृक्षासमोर लहान झाड वाढत नाही, मोठ्या झाडाची मुळे, ती वाढ रोखून ठेवतात. अर्थात याला काही अपवाद नक्कीच सापडतात आणि जेंव्हा असे अपवाद समोर येतात, तेंव्हा त्यांची झळाळी अलौकिक अशीच असते. राहुल देव बर्मन - यांच्या बाबतीत वरील विवेचन अत्यंत चपखल बसते, किंबहुना असे म्हणता येईल, राहुल देव बर्मन, आपल्या पित्याच्या (सचिन देव बर्मन) दोन पावले पुढेच गेला आणि हिंदी चित्रपट संगीतात अजरामर झाला.
वडिलांच्या हाताखाली कारकिर्दीला सुरवात होणे क्रमप्राप्तच होते - असे बरेचवेळा ऐकायला मिळाले आहे, सचिन देव बर्मन यांच्या काही चाली राहुल देव बर्मन यांनी बांधल्या होत्या. एक उदाहरण म्हणून अनुमान मांडता येईल. "जाने क्या तुने कही" आणि "दिये जलते हैं, फुल खिलते हैं", या रचनांचे लयबंध सारखे आहेत. आणखी अशीच काही उदाहरणे देता येतील. मुद्दा असा, वडिलांच्या संगीतरचनांमध्ये मुलाचा सहभाग विशेष होता आणि हेच वैशिष्ट्य पुढे अधिक विस्ताराने सिद्ध झाले.
राहुल देव बर्मनच्या संगीताविषयी काही विश्लेषणात्मक विधाने पुधिक प्रमाणे करता येतील.
१] ध्वनींद्रव्याचा विस्तारित पट : आपल्या संगीतरचनेसाठी कच्चा माल म्हणून सर्व ध्वनिविश्व उपलब्ध आहे, यावर ठाम विश्वास. याच कारणाने, अनेकदा त्याच्या रचनांतले महत्वाचे घटक म्हणून ध्वनिपरिणामही वावरतात - उदाहरणार्थ " आओ ना, गले लग जाओ ना" (मेरे जीवन साथी) या रचनेतील धातूचा त्रिकोण, हे वाद्य कौशल्याने वापरलेले आहे. तसेच "हरे रामा हरे कृष्णा" या गाण्यातील "मादल" वाद्याचा उपयोग. आणखी एक उदाहरण - "शोले" चित्रपटातील "महेबुबा" या गाण्यातील "क्लेव्हज" या कांड्याच्या वाद्याचा समर्पक उपयोग!!
याचा संकलित परिणाम असा झाला, न-स्वरी म्हणता येणारी वाद्ये वा ध्वनिउगम याला राहुल देव बर्मनची खास पसंती असायची.
दुसरा मुद्दा, सुस्कारे वा दीर्घ नि:श्वास, श्वसनाचा ध्वनी, निरनिराळ्या जोरदारपणे येणार हुंकार, घशातले किंवा घुसमटलेले आवाज, आवाज फाटत फाटत येणाऱ्या आरोळ्या, निरर्थक ध्वनीचा मुबलक वापर या सगळ्यांचे आपल्या सांगीतिक कल्पनांमध्ये तर्कशुद्ध स्वागत असून त्यांचा सढळ वापर केलेला आढळतो. उदाहरणार्थ "सपना मेरा टूट गया" ( खेल खेल में). हे गाणे तर एका अंगाने संवाद तत्वावर आधारलेले आहे पण तरीही गाण्याची गीतात्मकता राखली आहे. असे गाणे हिंदी चित्रपट संगीतात विरळाच आढळते.
अर्थात दुसऱ्या बाजूने बोलायचे झाल्यास, एक महत्वाचा आक्षेप नोंदला पाहिजे - सारे ध्वनी म्हणजे "विश्वची माझे घर" या वृत्तीमुळे - एकतर वडिलांच्या चालीचे नकाशे बिनदिक्कतपणे वापरणे आणि कौशल्यपूर्ण असले तरी अगदी उघडेबागडे संगीतचौर्य. या बाबत जे आक्षेप घेतले जातात ते मात्र साधार आहेत - एक वेबसाईट आहे, ज्यावर राहुल देव बर्मनने कुठल्या पाश्चात्य गाण्यावर आधारित हिंदी गाणे रचले आहे, याचे ढळढळीत पुरावे आहेत.
२] परिणाम साधणे हेच पहिले उद्दिष्ट : तत्काल म्हणजे महत्वाचे वा अर्थपूर्ण सांगीत विधान करण्याआधीच परिणाम साधणे, याला सर्वात पहिले महत्व!! बहुदा याच विचारापायी, त्याने बहुदा तारतेच्या ध्वनिपरिणामावर लक्ष केंद्रित करून संगीत रचना मार्ग थोडा सुकर करून घेतला. अतिउच्चस्वरी गायन आणि आघातपूर्ण ठळक लयबंध यांच्याशी त्याचे संगीत निगडित आहे, हेच प्रथम मान्य करायला हवे. "द ट्रेन","कारवाँ","अपना देश","शालिमार" इत्यादी चित्रपटातील वातावरण अशाच ध्वनींनी भरलेले आहे. परिणाम साधणे - याच वृत्तीत बहुदा मी वर म्हटल्याप्रमाणे "हे विश्वची माझे घर" याचा आढळ सापडतो. याचाच दुसरा भाग म्हणजे, रागदारीत गाणी बांधताना, रागतत्व बाजूला सारणे. चाल महत्वाची आणि त्यासाठी मग काहीही प्रयोग करायला मागे-पुढे न बघणे. 
३] अनेक पातळ्यांवर होणारी संगीतरचना : त्याच्या संगीतशैलीचा आणखी एक बारकावा म्हणजे अनेक वेळा रचनेचे लयबंध समोर न येता गीताच्या गतीतून प्रत्ययाला येतात. उदाहरणार्थ - "चुनरी संभाल गोरी" (बहारो के सपने), "चुरा लिया है तुमने" (यादों की बारात) अशा गीतांत लय प्रत्ययाला येते ती शब्दांच्या घनतेमुळे, चरणाला किंवा छंदाला मिळणारी गती अबाधित राहिल्यामुळे.
स्वरसंहतीतत्वावर आधारलेल्या भारतीय संगीतासारख्या पद्धतीत एका वेळेस एक स्वर व एकानंतर दुसरा, असे पायाभूत वळण असते. या लक्षणास कमी-अधिक प्रमाणात पण निश्चितपणे बाजूला सारण्यात आले. "दैया ये मैं क्या कहू" (कारवा) या गीतामध्ये मोजक्या वाद्यांच्या द्वारा नेमक्या मात्रांचा पण भारतीय न वाटणारा लयबंध समोर ठेवला जातो. मुखडा प्रथम "सा" स्वरावर, नंतर "पंचम" स्वरावर आणि मग "ल,ला" इत्यादी निरर्थक ध्वन्यक्षरांसहित सादर होतो. पुढे काही आरोळ्या ऐकायला मिळतात. जरी कडवे बदलले तरी सुरावट तशीच. परिणाम असा की सुरावटीतील बदल जाणवतो. भारतीय संगीतशास्त्र "षड्ज-पंचम" भावाला फार महत्व देते पण तरीही असा वापर विरळाच ऐकायला मिळतो.
४] साधी, गुणगुणण्यासारखी गाणी : "घर आज घिर आये"(छोटे नवाब), "शर्म आती है मगर" (पडोसन) ही या प्रकारची उत्तम गाणी आहेत. कमालीची नाजूक, मृदुमधुर म्हणता येणारी रचनाशैली देखील त्यानी आत्मसात केली होती. "बिती ना बिताई रैना"(परिचय), "नाम गुम जायेगा"(किनारा) किंवा "दो नैना और" (मासूम) ही आवाहक रचना स्वरधुनीचा भार न होता उभी केली आहेत. अशा प्रकारच्या गाण्यात, राहुल देव बर्मन यांनी कवीच्या कवितेला आणि आशयाला जरा देखील धक्का लावलेला नाही पण तरीही चाल बांधताना, तालाचा वैविध्यपूर्ण उपयोग केलेला आढळतो, जेणेकरून गाण्यात नावीन्य आढळेल. तालाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, हिंदी चित्रपट संगीतात पारंपरिक ताल वापरताना किंवा पाश्चात्य ताल वापरताना, त्यात प्रचंड वेगळेपण आणलेले दिसते आणि तदनुषंगाने बोलायचे झाल्यास, कालस्तरावरील लयीवर इतके प्रभुत्व असलेला संगीतकार, हिंदी चित्रपट संगीतात आढळत नाही (रेहमान जमेस धरून!!)
५] शास्त्रोक्त संगीत : आतापर्यंत आपण जी चर्चा केली त्यावरून हा रचनाकार शास्त्रोक्त राग-ताल पद्धतीला धरून रचना करील, ही कल्पनाच अवघड आहे. मात्र असे लक्षात येते, विशिष्ट रागचौकटीपासून दूर सरकून देखील रंगाचे एकसंधपण आपल्या चालीस देण्याची प्रशंसनीय क्षमता त्याच्याकडे होती. "रैना बिती जाये" (अमर प्रेम) ही रचना या संदर्भात ऐकावी. एकप्रकारे रागाचा वापर म्हणजे राग जणू सारा वेळ पार्श्वभूमीवर तरळत राहतो, पण त्याला राग म्हणून स्वातंत्र्य दिले जात नाही. मुखडा "गुजरी तोडी" रागावर तर अंतरा "खमाज" रागावर आहे पण तरीही गाणे म्हणून त्यात कुठेही बाधा येत नाही. "रोझ रोझ डाली डाली" सारख्या रचनेत राग यमन आणि ताल त्रिताल वापरून शास्त्रोक्त रागसादरीकरणाकडे सादर केली जाते परंतु संयमित भावनावेग आणि फक्त आविष्कृत शास्त्रोक्त बाज थोडासा पातळ करून, चांगला कामी लावला आहे.
६] जनसंगीताच्या प्रकारांना दिलेली नवीन रूपे : जनसंगीतकोटीतील काही प्रकारांची सांगीत रूपे आपल्या रचनांमधून नव्याने निश्चित करत होता का? " आओ ना, गले लग जाओ" हे प्रेमगीत आहे पण यातून नाजूक, मृदू भावना व्यक्त होते असे म्हणणे अवघड आहे. "सपना मेरा टूट गया" हे अश्रू कोंडणारे गीत असेल अशी अपेक्षा निर्माण होते पण प्रत्यक्षात संगीत आणि सांगीत आविष्कार याचे हुषार सूचन करणारे, संवादात्मक, उद्गारवाचक यांनी सजलेले सादरीकरण!! "मेरा कुछ सामान तेरे पास पडा है" (इजाजत) या गाण्यात त्याच्या प्रयोगशीलतेचा एक पैलू अधोरेखित होतो. संबंध कमकुवत होत आहेत आणि स्मृती प्रबळ होत आहेत याचे अंतर्मुख कथन, या गाण्यातून सादर होते. सुरावट सरळ जाते पण लयबंध तिरकस जातो. म्हणूनच ही रचना आपल्याला अस्वस्थ करते. खरतर ही अप्रतिम कविता आहे आणि जर कविता म्हणून वाचन केले तर त्यातील आशय अतिशय संदिग्ध आहे. वास्तविक अशी शब्दरचना गाण्याच्या दृष्टीने अवघड म्हणावी लागेल परंतु तरीही त्यातील "सांगीतिक" शक्यता धुंडाळून, संगीतकाराने सुंदर गीत सादर केले आहे.
एकंदरीत राहुल देव बर्मन याचे संगीत रचनाकाराच्या संभवनीय सर्जनशीलतेच्या दर्जाविषयी खात्री पटवणारे असे संगीत आहे. त्याची सांगीत संवेदनशीलता आधुनिक वाणाची होती. यात आणखी एक गंमत सांगता येते. भारतीय कलासंगीतापासून दूर जात असताना, पुन्हा पुन्हा त्या परंपरेकडे वळून बघतो.

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home