Saturday 20 May 2017

बडी धीरे जली

"संधिप्रकाशांतुनी जाणारा संधिप्रकाशापरी:
संदिग्धाच्या सन्निध लागे चाहूल ही शेंदरी;
पक्षी परतल्यानंतर आलें वळण हवेस हिवाळी,
दिवे गारव्यापारी जाहले शोकगीतांच्या ओळी;"
फार पूर्वी सुप्रसिद्ध कवी आरतीप्रभूंच्या या ओळी वाचताना वातावरणातील विदग्धता, शांतता आणि आत्ममग्नता प्रत्ययाला आली होती. मुळातच आरतीप्रभुंची कविता ही कुठल्याही विषयाच्या गाभ्याशी जाऊन आरपार प्रत्यय देणारी, त्यात इथे संध्याकाळची वेळ असल्याने, भावना अधिक टोकदार झालेली. 
नंतर पुढे, इश्किया चित्रपटातील, पहाटेच्या वातावरणातील "बडी धीरे जली" हे  ऐकताना या ओळी वारंवार मनात येत राहिल्या. वास्तविक, गाण्याची वेळ पहाटेची आहे आणि कवितेत तर संध्याकाळचा उल्लेख स्पष्ट आहे पण तरीही मनात याच ओळी यायचे कारण, बहुदा त्यावेळी जाणवणारी अंतर्मुख विदग्धता, हेच असणार.   
झमझमणाऱ्या तंबोऱ्याच्या तारांच्या झणत्काराने गाण्याला सुरवात होते आणि त्या सुरांतूनच ललत रागाची खूण आपल्या मनाला पटते. त्याच सुरांत, गायिका रेखा भारद्वाज यांनी आलाप घेतला आहे. जरा बारकाईने ऐकले तर या आलापावर सुप्रसिद्ध ख्याल गायिका किशोरी आमोणकरांच्या गायकीचा प्रभाव दिसतो.विशेषतः सुरवातीला घेतलेला "एकार" आणि लगेच खालच्या  सुरांत व्यक्त झालेला "कोमल धैवत" किशोरी आमोणकरांची  पुसटशी आठवण करून देतो. अर्थात, हा प्रभाव सुरवातीच्या काही सुरांपुरताच आहे. पुढील गायन मात्र स्वतंत्र अभिव्यक्तीने व्यक्त होते. रेखा भारद्वाज या प्रशिक्षित गायिका असल्याचे लगेच समजते. खऱ्या गायकाची ओळख होण्यासाठी काही सुरांचीच गरज असते आणि त्या सुरांतूनच, तो कलाकार आपली ओळख दाखवून देत असतो. हा आलापच इतका सुरेल, स्वच्छ आहे की पुढील रचना कशाप्रकारे वळणे घेत जाणार आहे, याची चुणूक दाखवतो. " रे ग नि रे ग म" या स्वरावलीत खरे तर चालीचा चेहरा लपलेला आहे. तंबोऱ्याचे स्वर या आलापीला भरीव साथ देत आहेत. जिथे गायिका "म" स्वर घेते तिथेच संगीतकार विशाल भारद्वाज यांनी समेची मात्रा ठेवली आहे. तशी मात्रा घेताना, पार्श्वभागी हलक्या सुरांत, गिटारचे स्वर घेतले आहेत आणि पारंपरिक तालवाद्य न घेता पाश्चात्य Octapad वाद्यावर समेची मात्रा घेतली आहे. तबल्यापेक्षा काहीसा दबका पण ड्रमपेक्षा अधिक उठावदार वाद्य. सकाळच्या मंद, शांत वातावरणातील रचनेला हलक्या आघाती तालवाद्याने साथ करणे, एकूणच सुसंगत होते. या सुसंगतेतच आपल्याला "बडी धीरे जली रैना" ही धीरगंभीर सुरांतली ओळ ऐकायला मिळते. तालाच्या मात्रा समजून घेतल्या तर केरवा ताल, संगीतकाराने योजल्याचे कळून घेता येते. पुढे "धुआ धुआ नैना" ओळ घेताना, वरील तालवाद्यासहित काहीशा दबक्या आवाजात ड्रम या तालवाद्याच्या मात्रा ऐकायला मिळतात. संगीतकाराचे कौशल्य हेच आहे, वास्तविक ही तालवाद्ये बरेचवेळा घणाघाती आवाजात सादर केली जातात पण इथे गाण्याचा मूड बघूनच ताल वाद्ये खालच्या सुरांत ठेवली आहेत. परिणाम गाण्यातील गंभीर भाव अधिक खोलवर जाणवावा. तालाची योजना करताना, संगीतकार विशाल भारद्वाजने एक मात्रा गिटारवर, पुढील मात्रा ड्रम आणि Octapad वाद्यावर घेतलेल्या आहेत - हा राहुल देव बर्मन शैलीचा प्रभाव!! जरी ललत रागाच्या सुरांचा आधार घेतला असला तरी रचनेची "घडण" बांधताना, संगीतकाराने रचनेचे गीत कसे होईल, याकडे लक्ष दिले आहे. बरेचवेळा असे घडते, रागाच्या चौकटीत स्वररचना तयार करताना फक्त रागाचे नियम पाळून, त्यानुसार गीताची रचना केली जाते. यामध्ये संगीतकाराचा रागदारी संगीताचा जरूर तो व्यासंग दिसतो पण त्याची खरंच जरुरी असते का? हा प्रश्न इथे उपस्थित करावासा वाटतो. 
रागाची चौकट आधाराला घेऊन, त्यात स्वतः:ची भर टाकून, प्रसंगी रागालाच बाजूला सारून, गीताची बांधणी करणे, हा व्यासंगीवृत्तीचा एक निकष जरूर मानला जावा.

रातोंसे होले होले, खाली है किनारी 
अखियों ने तागा तागा, भोर उतारी
खारी अखियों से, धुआ जाये ना
बडी धीरे जली रैना
धुआ धुआ नैना

शब्दरचना वाचताना, एखादे लोकगीत वाचत आहोत असाच भास होतो. चित्रपट गीताच्या संदर्भात विचार करताना, एक बाब अवश्य पाळावी लागते - पडद्यावर जे पात्र गाणे सादर करीत आहे, जो प्रसंग आहे, या सगळ्याची जाण ठेऊनच पद्यरचना करावी लागते. त्यामुळे बरेचवेळा जरी कवी प्रतिभावान असला तरी त्याला, आपल्या प्रतिभेला काहीशी मुरड घालून, सरळ, साध्या परंतु अर्थवाही शब्दातून व्यक्त होणे, आवश्यक ठरते. कवी गुलजार यांनी, इथे हाच विचार केलेला आढळतो. चित्रपटाची कथा सगळी उत्तर प्रदेश/बिहार भागातली असल्याने, तिथल्या बोली भाषेचा अवलंब करणे योग्यच ठरते. चित्रपटाची कथा ही गावरान भागातली, काहीशा दहशतवादी संस्काराची असल्याने, गीताचे शब्द त्याच संस्कृतीचे असणे क्रमप्राप्तच ठरते. "खारी अखियों से, धुआ जाये ना" ही ओळ किंवा "रातोंसे होले होले, खाली है किनारी" ही ओळ तिथल्या अंतर्भागातल्या बोली भाषेची ओळख करून देते. अर्थात असे   देखील,गुलजार कुठेही शब्दकळेतील कवितेचा प्रमाणित दर्जा खालावू देत नाहीत आणि हे यश स्पृहणीय असेच म्हटले पाहिजे. 
पहिला अंतरा सुरु होण्यापूर्वीचा वाद्यमेळ बांधताना, संगीतकाराने "मोहन वीणा" या नावाने प्रसिद्ध असलेल्या गिटारच्या सुरावटीचा सुरेख उपयोग करून घेतलेला आहे. रागदारी संगीतातील हरकती, संगीतकाराने इथे योजल्या आहेत, जेणेकरून गाण्याची एकसंधता भरीव होईल पण तसे करताना एकसुरीपणा टाळलेला आहे. खरतर ही रचना बंदिशींकडे सहज झुकू शकली असती परंतु संगीतकाराने तो मोह टाळलेला आहे. मी हे वाक्य मुद्दामून लिहिले आहे कारण, मुखडा संपवताना, "धुआ धुआ नैना" गाताना, "नैना" शब्दावरील घेतलेली हरकत, सहजपणे अवघड करता आली असती किंवा दीर्घ तानेत परावर्तित करता आली असती पण संगीतकार आणि गायिका, दोघांनीही तो मोह टाळला आहे आणि गीताचे "गीतत्व" राखले आहे. 

पलको के सपनों की, अग्नी उठाये
हमने तो अखियों के, अलने जलाये
दर्द ने कभी लोरिया सुनाई तो
दर्द ने कभी निंद से जगाया रे
बैरी अखियों से ना जाये धुआ जाये ना
बडी धीरे जली रैना
धुआ धुआ नैना

हा अंतरा अगदी वेगळ्या सुरावर सुरु केला आहे. चाल ललत रागावरच आहे पण स्वरांची "उठावण" वेगळी केली आहे, जेणेकरून स्वररचनेत वैविध्य येईल. हाताशी प्रशिक्षित गायिका असल्यावर, संगीतकाराला देखील काही नवीन जागा सुचू शकतात, नवे स्वरबंध जाणवतात आणि त्यायोगे गाण्याची सौंदर्यावृद्धी होऊ शकते. पहिल्या अंतऱ्यापेक्षा किंचित वेगळा सूर लावलेला आहे पण जर का शब्द बघितले तर त्यामागील विचार समजून घेता येतो. " पलको के सपनों की, अग्नी उठाये" ही ओळ जरा नीट, बारकाईने वाचली तर वेगळ्या सुरावटीची गरज का? या प्रश्नाचे उत्तर मिळते. तसे गाताना "अग्नी" असे न घेता "अगनी" असा काहीशा गावरान ढंगाने घेतल्याने, गायनाची खुमारी आणखी वाढते. " दर्द ने कभी लोरिया सुनाई तो, दर्द ने कभी निंद से जगाया रे" शब्दांमधून सहजपणे विरोधाभास कसा सुरेख दाखवला आहे. एका बाजूने "लोरिया सुनाई" तर लगेच पुढील ओळीत "निंद से जगाया" असा खेळ गुलजार नेहमीच आपल्या शब्दरचनेत करीत असतात. बरेचवेळा आपल्या मनावर सुरांचीच मोहिनी इतकी प्रचंड असते की गाण्यातील शब्दांबद्दल आपण वेगळी जाणीव ठेवावी, हेच बहुतांशी विसरले जाते!!  

जलते चिरागो में, नींद ना आये
फुंकोसे हमने सब तारे बुझाये
जाने क्या खोली, रात की पिटारी से
सुजी अखियों से, ना जाये धुआ जाये ना,
बडी धीरे जली रैना
धुआ धुआ नैना

हा शेवटचा अंतरा आणि त्या आधीचा वाद्यमेळ, यात तसा फारसा फरक नाही. तीच मोहन वीणा आणि त्यावर तशाच प्रकारचे स्वर छेडले आहेत. किंबहुना, "जलते चिरागो में, नींद ना आये" ही ओळ देखील आधीच्या अंतऱ्याच्या स्वररचनेशी साद्ध्यर्म्य दाखवते. फरक ठेवला आहे तो शब्दोच्चारात. अर्थात, कुठल्याही गाण्यात कुठल्या शब्दावर किती "वजन" द्यायचे आणि कुठला शब्द "मोकळा" ठेवायचा, हे स्वातंत्र्य संगीतकार घेतच असतो. या गोष्टींचा गाण्याच्या परिणामकारकतेवर फार फरक घडवून आणत असतो. 
गाण्याचा शेवट घेताना मात्र, एखादी बंदिश संपवावी त्याप्रमाणे "बडी धीरे जली रैना, धुआ धुआ नैना" या ओळी आळवून संपविल्या आहेत. याचा परिणाम, सगळीच रचना आपल्या मनात रेंगाळत रहाते. गाण्याची लय पहिल्यापासून कायम मध्य सप्तकात, क्वचित मंद्र सप्तकात ठेवली असल्याने, ऐकताना आपल्याला प्रत्येक सूर "अवलोकिता" येतो आणि त्याचा योग्य तो आनंद देखील घेता येतो. 

संगीतकार म्हणून विशाल भारद्वाज यांचा विचार करायचा झाल्यास, काही रचनांवर राहुल देव बर्मन यांचा ठसा उमटलेला दिसतो. असे असू देखील, त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे आणि आधुनिक चित्रपट संगीतात, आधुनिकतेकडे लक्ष ठेवत असताना देखील परत, परत परंपरेकडे वळून बघण्याची सवय दिसून येते. अर्थात, ही शैली देखील राहुल देव बर्मन त्यांच्यासारखीच आहे. अर्थात, गाण्याचा मुखडा बांधणे, स्वरविस्तार करणे आणि आपण चित्रपट गीत तयार करीत आहोत, ही जाणीव सतत जागृत ठेवणे, इत्यादी बाबींकडे त्यांचे वेगळेपण दिसून येते. लोकसंगीताचा बाज उचलताना, त्याचा तोंडवळा कायम ठेऊन, त्यात स्वतःची भर टाकण्याचे कौशल्य वाखाणण्यासारखेच आहे. तसेच निरनिराळ्या वाद्यांमधून निरनिराळे स्वनरंग पैदा करण्याचे कौशल्य निश्चितच कौतुकास्पद आहे. कारकिर्दीची सुरवात जरी एका संगीतकाराच्या प्रभावाखाली झाली असली तरी तो प्रभाव संपूर्णपणे पासून, स्वतःची नव्याने ओळख रुजवावी, यातच या संगीतकाराचे मोठेपण दृष्टीस पडते. 


1 comment: