Saturday 20 May 2017

रुठ के तुम तो चल दिये

"वर्षेंतिल संध्येपरि, आले मी आवरीत,
रक्ताचा जाळ लाल, दु:खाची गडद लाट;
वर्षेंतिल रात्रीपरी आलें मी सावरीत,
नयनांतील अश्रू निळे, हृदयातील वीज-रक्त;
धगधगते जीवन हे, धरून कसे ओंजळीत
आलें मी कुठून कशी... आलें मी हेंच फक्त."

कवियत्री इंदिरा संत यांच्या "शेला" या काव्यसंग्रहातील या ओळी. मानवी आयुष्यातील एका अटळ, आदिम भावभावनांचे नेमके वर्णन करणाऱ्या ओळी. मला वाटतें, बहुतेकांच्या आयुष्यात अशा ओळींची सांगड घातलेली सापडेल. आजचे प्रस्तुत गीत देखील याच भावनांशी साद्ध्यर्म्य दर्शविणाऱ्या आहेत. आपल्या आयुष्यात दु:ख तर अटळ आहेच पण चिरंजीव देखील आहे, याचीच जाणीव सदैव करून देणाऱ्या अशा ओळी आपल्या आयुष्याचा भाग कधी होतात, याचाच पत्ता लागत नाही.

केवळ हिंदी गाणीच नव्हे तर इतर गाण्यांच्या बाबतीत बरेचवेळा नवल वाटते, गाण्याला आवश्यक असे सगळे घटक अस्तित्वात असतात, तरीही गाणे विस्मृतीत जाते. बहुदा असे होत असावे, चित्रपटच टुकार निघाला आणि परिणामस्वरूप गाणे देखील मागे पडत गेले आणि अखेर विस्मृतीत गेले. याचा परिणाम असा होतो, गाण्याचा दर्जा अप्रतिम असून देखील लोकमान्यतेची मोहोर उमटत नाही. लताबाईंची अशी काही गाणी सापडतात, जी खरोखरच असामान्य आहेत पण लोकप्रियता लाभली नसल्याने धुळीत जाऊन पडतात. खाजगी गाण्यांच्या बाबतीत, मुळातच "बजेट" तुटपुंजे असते, त्यामुळे गाणी कितीही सुंदर असली तरी लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि बहुतेक गाणी अशीच विस्मरणात जातात. त्यामुळे अनेक गुणवंत संगीतकार तसेच त्यांच्या रचना, उपेक्षेच्या खाईत लुप्त झाल्याचे ध्यानात येते. अर्थात, अशी उपेक्षा अनेक लोकोत्तर संगीतकारांच्या वाट्याला देखील येते. अशाच वेळी "तकदीर" आणि "तदबीर" या शब्दांवर विश्वास ठेवणे भाग पडते. गाणे नुसतेच चांगले असून भागात नसून, ते लोकांपर्यंत सशक्तपणे पोहोचणे देखील तितकेच अत्यावश्यक असते. पूर्वीच्या काळात, प्रसिद्धी माध्यमांची सद्दी खूपच मर्यादित होती (आजच्या काळाच्या संदर्भात तर फारच तोकडी होती!!) त्यामुळे विस्मरणात गेलेल्या असामान्य रचनांची परत आठवण करणे, मला गरजेचे वाटते.
खरतर चित्रपटातले गाणे हे जरी चित्रपटाच्या कथेला अनुरोधून असणे, गरजेचे असले तरी देखील, त्याचे "स्वतंत्र" अस्तित्व देखील आवश्यक असते. ललित संगीत ही स्वतंत्र निर्मिती असते आणि त्यात सर्जनशीलता जरूर अनुस्यूत असते. "रुठ के तुम तो चल दिये" या गाण्याच्या बाबतीत वरील विवेचन अतिशय चपखल बसते. चित्रपट "जलती निशानी", काळाच्या ओघात कधीच विस्मृतीत गेला आणि त्या ओघाने हे गाणे देखील उपेक्षित राहिले. वास्तविक अनिल बिस्वास यांच्या सारखा व्यासंगी संगीतकाराची "तर्ज" आहे, लताबाईंनी गायले आहे, प्रत्ययकारी शब्दकळा आहे तरीदेखील या गाण्याला लोकप्रियता कधीही लाभली नाही, हे जळजळीत सत्य मागे उरतेच. 
आता या गाण्याचा मुखडा किती विलक्षण आहे. लताबाईंनी गाण्याची सुरवातच किंचित वरच्या सुरांत केलेली आहे. बहुतेक रचनांत, शब्द येण्याच्या आधी, किंचितकाळ वाद्यमेळाचे सूर वाजतात, जेणेकरून, रचनेची पार्श्वभूमी तयार होते आणि गायक/गायिकेला रचनेचा अंदाज येतो. इथे तसे काहीही घडत नाही. कानावर पडतो, तो लताबाईंचा अविस्मरणीय वरच्या सप्तकातील सूर. हे फार कठीण आहे. गायिका म्हणून लताबाई इतरांपेक्षा किती "वेगळ्या" ठरतात, हेच या पहिल्या आलापीतून सिद्ध होते. 
गाण्याची पार्श्वभूमी, बहुतेक चित्रपटात असलेली सरधोपट विरही भावनेची आहे. खरतर असे म्हणणे योग्य ठरेल, चित्रपटातील असले बेचव प्रसंग, संगीतकारांनी, आपल्या स्वररचनेने प्रचंड श्रीमंत केले आहेत. प्रस्तुत गाण्याबाबत हे विवेचन अगदी चपखल बसेल. आज, "जलती निशानी" नावाचा चित्रपट किती लोकांच्या खिजगणतीत असेल, शंका आहे पण अशाच चित्रपटात अशा प्रकारचे असामान्य गाणे असावे, हे त्या गाण्याचे दुर्दैव म्हणावे की आणखी काही म्हणावे!!
गाण्याची सुरवातच वरच्या सुरांत झालेली आहे. एकदम वरचा सूर घेऊन, गाण्याचा मुखडा सिद्ध करायचा ही सहज जमण्यासारखी बाब नव्हे. खरतर जरा बारकाईने ऐकले तर सगळी रचनाच बहुतांशी तयार सप्तकांत फिरत आहे परंतु, अर्थात, मध्येच काही ठिकाणी मंद्र सप्तकांत गाण्याची चाल येते. अर्थात आपल्या आस्वादात आपण या मुद्द्यांचा स्वतंत्र विचार करूया. जिथे मुखड्याची सुरवातच इतक्या अवघड सुरांतून झालेली असताना, पुढे रचनेचा परीघ कसा विस्तारत जाईल, याबाबत ठाम विचार करणे, जराही कठीण जात नाही. थोड्या विचारपूर्वक या गाण्याच्या चालीकडे बघितले तर असे आढळेल, अनिल बिस्वास यांच्या बहुतेक रचना या मंद्र सप्तकांत किंवा मध्य सप्तकांत चालत असतात. या गाण्यासारखी अपवादभूत रचनाच अशी आढळते, जिथे तार सप्तकांतील सुरांचा आढळ अधिक प्रमाणात आहे. "रुठ के तुम तो चल दिये, अब मैं दुआ तो क्या करूं" या दोन ओळी गाताना, पहिली ओळ वरच्या सुरांत घेतल्यावर, पुढील ओळीतील, "दुआ" शब्द गाताना, लताबाईंनी किंचित छोटीशी हरकत घेतली आहे आणि त्यातूनच दोन्ही ओळींतील "दुआ" या शब्दाचे महत्व अधोरेखित केले आहे. व्यासंगी संगीतकार हा नेहमीच हाताशी असलेल्या कवितेमधील महत्वाच्या शब्दांचे महत्व जाणून घेऊन, त्या शब्दांना सुरांत मांडताना, त्याचा आशय किती खोलवर व्यक्त करता  येईल,याची जाणीव करून देत असतो. याच ओळी परत गाताना मात्र, परत तेच सूर घेण्याची गरज संगीतकाराला भासत नाही आणि याच मुख्य कारण म्हणजे, ललित संगीताच्या स्वररचनेत तुम्हाला त्याच स्वरावली परत परत घेण्याला फारसा अवसर नसतो आणि एकदा एखादी जागा घेतली की मग परत त्याचा शब्दावर येताना, तेच शब्द वेगळ्या सुरांतून अभिव्यक्त करून, वेगळाच आशय व्यक्त करायचा!! अनिल बिस्वास यांच्या बहुतेक सगळ्या यशस्वी संगीतरचेनेबाबत असे विधान करता येईल.
ज्याला आपण खऱ्याअर्थाने "शब्दप्रधान गायकी" असे सार्थपणे म्हणता येईल, तशी गायकी आपल्याला अनिल बिस्वास यांच्या रचनांमधून सातत्याने ऐकायला मिळते. कुठेही शब्दांची ओढाताण नाही, किंबहुना असे देखील म्हणता येईल, अनिल बिस्वास यांच्या रचना ऐकताना, कवितेचा दर्जा देखील तितकाच महत्वाचा आणि सखोल असतो जेणेकरून संगीतकार गाण्याची चाल बांधायला प्रवृत्त होतो. "जिसने हमे जुदा किया, ऐसे खुदा को क्या करूं." या ओळी गाताना देखील, आधीच्याच सांगीतिक आकृतीची पुनरावृत्ती केलेली आहे, म्हणजे सुरवात वरच्या सुरांतून केली आहे आणि शेवट करताना खालचे सूर घेतले आहेत. मुखड्याची चाल रसिकांच्या मनावर बिंबवण्यासाठी चालीची पुनरावृत्ती आवश्यक असते अर्थात हा काही नियम नव्हे. काही रचनांमधून प्रत्येक अंतऱ्यासाठी वेगवेगळी चाल बांधून, आपल्या बौद्धिक कुशाग्रतेची ओळख करून दिली जाते. अर्थात, हा प्रत्येक रचनाकाराचा दृष्टिकोन असतो.
अनिल बिस्वास यांच्या सांगीतिक विचारांबाबत मागोवा घेतल्यास, काही बाबी स्पष्ट होतात. चाल जरी वरच्या सुरांत जाण्याची शक्यता जरी जाणवली तरी तिथेच चालीला रोधून धरायचे आणि शक्यतो मंद्र किंवा मध्य सप्तकात रचना ठेवायची. इथे गाण्याची सुरवात जरी वरच्या सुरांत झालेली असली तरी पहिला अंतरा सुरु होण्याआधीच्या वाद्यमेळात वरील विषयाचे प्रतिबिंब आढळते. मात्रांची लय तशीच कायम ठेऊन, विशेषत: व्हायोलिन वाद्यावरील सूर, मुखड्याच्या स्वरांशी जुळवून घेतले आहेत, जेणेकरून रसिकाचे मन गाण्यावर स्थिर राहील. आणखी एक गंमत ऐकायला मिळते. व्हायोलिनचे सूर वाजत असताना त्यातच बासरीचे सूर मिसळलेले आहेत पण त्याचे अस्तित्व हे पहिला अंतरा सुरु होण्याच्या आधी काही क्षण जाणवते. इथे "जाणवते" हा शब्द मी मुद्दामून वापरला आहे कारण, ललित संगीतात केवळ वाद्यांचे स्वतंत्र अस्तित्व दाखवायला फारसा वाव नसतो तसेच त्याची तशी गरज देखील नसते. याचे मुख्य कारण, रचनेचा बहुतांशी भाग हा चालीचे स्वर, शब्द  आणि गायन यांनीच व्यापलेला असतो.

"जीने की आरझू नहीं, हाल ना पूछ चारागर;
दर्द ही बन गया दवा, अब मैं दवा  तो क्या करूं".

शायर कमर जलालाबादी हे चित्रपटांसाठी म्हणून लिहिणारे असे फारसे प्रसिद्ध शायर नव्हते. जवळपास ३० वर्षे चित्रपट क्षेत्राशी संबंधित राहून, जवळपास तितकेच चित्रपट, गीतांसाठी लिहिणे, हे काही असामान्य योगदान नव्हे (इथे सांख्यिकी दृष्टिकोनातून लिहीत आहे) परंतु आपल्या पिंडाला शोभतील अशाच चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. काव्यात प्रामुख्याने उर्दू भाषेचा वापर परंतु भाषिक फुलोरा टाळून, थेट मांडण्याची प्रवृत्ती अधिक आढळते. या गाण्याच्या संदर्भात विचार केला असता, मुखडा आणि पहिला व दुसरा अंतरा विचारात घेतला तर उर्दू शब्द वाचायला मिळतात परंतु सहज कुणालाही समजतील, अर्थाला प्राप्य होतील, अशाच शब्दकळेकडे ओढा अधिक दिसून येतो. खरतर अशी प्रवृत्ती चित्रपट गीतांसाठी योग्य  पण,एकूण कारकीर्द लक्षात घेता मिळालेले चित्रपट संख्येने फारच कमी आढळतात.
आता या पहिल्या अंतऱ्याच्या बाबतीत लिहायचे झाल्यास, स्वररचनेची मांडणी आणि बांधणी मुखड्याशी जुळणारी आहे. वास्तविक अनिल बिस्वास यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण घेतलेले आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, बोन्गो सारखी काही पाश्चात्य तालवाद्ये वगळता, भारतीय संगीत परंपरेतील सगळी तालवाद्ये त्यांनी वाजवली आहेत आणि त्यावर त्यांचे प्रभुत्व होते. संगीतावर इतका अधिकार असून देखील, अंतऱ्याची स्वररचना  करताना,मुखड्याच्या स्वररचनेभोवतीच अंतऱ्याची बांधणी करायची, असे एकूण सूत्र दिसते. वेगळ्या बांधणीने अंतरा बांधण्यात निश्चित सर्जनशीलता दिसते.  
अर्थात वेगळ्या बाजूने बोलायचे झाल्यास, मुखड्याची चाल सतत डोळ्यासमोर ठेवल्याने, चालीचा आकृतिबंध रसिकाच्या मनात ठसतो. गाण्याची चाल जर का शब्दभोगी असेल तर उगीच आहे तो आकृतिबंध बाजूला सारून, नव्याने स्वररचना करण्यात काय हशील आहे? हा प्रश्न देखील सहज बाजूला सारण्यासारखा नाही. एका दृष्टीने विचार केला तर गाण्याची चाल ही मुखड्यावर आधारित असते आणि सुयोग्य मुखडा बांधणे, हे खरे सर्जनशीलतेची लक्षण असते, असे सगळेच रचनाकार मानतात तेंव्हा मुखड्याला अनुलक्षून पुढील स्वररचना करण्यात काहीही कमीपणा नाही, असेच म्हणायला प्रत्यवाय नसावा. "

"सुनके मेरी सदा-ए- गम, रो दिया आसमान भी,
तुम तक ना जो पहूंच सके, ऐसी सदा को क्या करूं"

एक कविता म्हणून विचार करायला गेल्यास, "रो दिया आसमान भी" ही ओळ काहीशी  सपक वाटते, खटकते देखील!! विशेषतः "सुनके मेरी सदा-ए-गम" सारख्या भरजरी शब्दांसमोर!!  परंतु चालीचा गोडवा आणि लताबाईंची अप्रतिम गायकी, मनावर जे गारुड टाकते, त्यापुढे फारसे जाणवत नाही. लताबाईंनी मात्र गाताना, शब्दातीत व्यक्त केल्या आहेत. गाताना, प्रत्येक शब्दाचे स्वरोच्चारण कसे करावे, याचा आदिनमुना सादर केला आहे. गायनात अनेक छोट्या, छोट्या हरकती आहेत त्यादेखील ऐकताना त्याचा खास अभ्यास  करावा,इतक्या ताकदीच्या आहेत. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, कुठलीही हरकत  घेताना,शब्दांना किती प्रकाराने खेळवता  येते,तसेच शब्दांत दडलेला आशय कशाप्रकारे खुलवता येतो, याबाबत एक मानदंड निर्माण केला आहे. इथे देखील  गाताना,"सदा-ए-गम" वरील अलगद घेतलेली  नाजूक आणि हळुवार हरकत, माझ्या वरील विधानाला पुरावा म्हणून मांडता येईल. चित्रपट गीतांसारखे आविष्करण अशा सारख्या अलंकारांनीच गर्भश्रीमंत झालेले आहे आणि थोड्या तांत्रिक भाषेत लिहायचे झाल्यास, सप्तकातील श्रुतींचा प्रत्यय अशाच गायनातून घेता येतो. ही गायकी फार समृद्ध आहे.  


No comments:

Post a Comment