Thursday 27 August 2015

आधुनिक हिंदी गाण्यातील रागदारी

हिंदी चित्रपट गीतात रागदारी संगीताचा वापर सुरवातीच्या काळापासून चालू आहे. एकतर भारतीय संगीताच्या अणुरेणूत रागदारी संगीत भिनलेले आहे, त्यामुळे सगळ्या समाजाला व्यापून टाकणारे, हिंदी चित्रपट संगीत यापासून कसे वेगळे राहील? आपण थोडे इतिहासात डोकावून पाहायचे ठरवले तर, आपल्याला काही बाबी सहज समजून घेता येतील. हिंदी चित्रपट बोलायला लागला तेंव्हा काय परिस्थिती होती? इथे एक बाब ध्यानात घ्यायला हवी. चित्रपट उद्योगाचा उगम आणि वाढ ही प्रामुख्याने मुंबई आणि नंतर कोलकत्ता इथे झाली. त्या दृष्टीने बघता, मुंबईत त्यावेळी १] मराठी संगीत रंगभूमी,२] पारशी रंगभूमी, यांचा जबरदस्त पगडा जनमानसावर पडलेला होता, अधिक तर मराठी संगीत रंगभूमीचा. त्यावेळचे रंगभूमीवरील संगीत म्हणजे रागदारी संगीताचे थोडे "ललित" स्वरूप म्हणजे रंगभूमीवरील संगीत असे करता येईल. त्यावेळची बहुसंख्य गाणे म्हणजे एखाद्या रागातील प्रसिध्द (अप्रसिद्ध देखील) चीज घ्यायची आणि त्यावर शब्द डकवायचे!! उदाहरण द्यायचे झाल्यास, भूप रागातील - स्वयंवर नाटकातले "सुजन कसा मन चोरी" हे अतिशय प्रसिद्ध गाणे, त्याच रागातील "फुलवन की सेज" या तितक्याच प्रसिद्ध चीजेवर तंतोतंत आधारलेले आहे. बालगंधर्वांनी गायलेले ही गाणे इथे उदाहरण म्हणून घेऊया 


हे गाणे ऐकताना, मी वर जे विधान केले आहे, त्याला पूरक असे हे गाणे म्हणता येईल. 
अगदी १९४०/४१ पर्यंत बहुश: अशीच पद्धत असायची. या सगळ्याचा असर, त्या वेळच्या हिंदी चित्रपटातील गाण्यांवर पडणे साहजिक होते. पुढे, बंगालमध्ये चित्रपट निर्मिती सुरु झाली आणि संगीतात तिथल्या संस्कृतीचे प्रतिबिंब पडायला लागले. 
जसजसा हिंदी चित्रपटाचा व्याप आणि लोकप्रियता वाढायला लागली, त्या हिशेबात, देशातील इतर अनेक प्रतिभावंत संगीतकारांची नजर मुंबईकडे वळायला लागली आणि हिंदी चित्रपट संगीत बहुरंगी, बहुढंगी व्हायला लागले. तेंव्हा पासून आजतागायत मुंबई हेच हिंदी चित्रपट क्षेत्राचे महत्वाचे स्थान झाले आहे. संगीताच्या ज्या सहा "कोटी" आहेत, त्यातील जन संगीत आणि त्याचा प्रभाव मात्र दिवसेंदिवस वाढत गेला आणि त्याने अवघा भारतीय समाज व्यापून टाकला. तेंव्हा, हिंदी चित्रपटगीतांत, रागदारी संगीताचा वापर आणि प्रतिबिंब, हे सर्वमान्य आणि ठळक होते. सुरवातीच्या काळात, आपल्याकडे "ऑर्केस्ट्रा" पद्धत फारशी रुळली नव्हती आणि त्यावेळी पारंपारिक वाद्यांवर आधारित संगीत रचना तयार होत असत. १९४५ च्या सुमारास, हिंदी चित्रपट गीतांनी कात टाकायला सुरवात झाली आणि अनेक परदेशी वाद्यांचा समावेश वाद्यमेळ्यात व्हायला लागला. असे मन्वंतर होत असताना देखील, रचनेचा गाभा, हा शक्यतोवर पारंपारिक घाट स्वीकारण्याकडेच होता. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, वाद्यमेळ्यात जरी "गिटार","डबल बास","चेलो" इत्यादी परदेशी वाद्ये सामावून घेतली तरी रचनेचा ढाचा हा, त्या वाद्यातून शक्यतो रागदारी संगीत काढून घेण्यावर अधिक असायचा. 
या सगळ्या परंपरेला खऱ्याअर्थाने धक्का दिला तो, सी. रामचंद्र यांनी. १९४५च्या दशकात, "आना मेरी जान संडे के संडे" असे गाणे रचून, या संगीतकाराने नवा पायंडा पाडला. खालील लिंक मध्ये याचे प्रत्यंतर येईल. 


असे असले तरी देखील, या गाण्याचे रचना थोडी बारकाईने तपासली तर असे सहज दिसून येईल, जरी पाश्चिमात्य धाटणीवर गाणे असले तरी गाण्यातील भारतीय रंग अजिबात पुसून टाकता येत नाही. तरी देखील गाण्याचा "घाट" बदलण्याचे श्रेय हे द्यायलाच लागेल. आता या गाण्यावर, पोर्तुगीज - गोवन शैलीची छाप अगदी स्पष्ट दिसते. परंतु गायनाचा एकूण थाट हा, भारतीय संगीताच्या तोंडवळ्याचा आहे. 
पुढे ओ.पी. नैय्यर यांनी पंजाबी ढंग इथे रुजवला, तिथले लोकसंगीत हिंदी गाण्यात प्रचलित केले आणि गाण्यांना नवा ढंग प्रदान केला. " उडे जब जब झुल्फे तेरी" हे पंजाबी भांगडा ढंगाचे गाणे इथे प्रस्तुत करणे योग्य ठरेल. 


असे असले तरी त्यातून रागदारी वळण काही पुसले गेले नव्हते. या गाण्याची चाल, पंजाबी लोकसंगीतावर आहे परंतु हे चित्रपटातील गाणे आहे, हे ध्यानात ठेऊन, संगीतकाराने रचना बांधली आहे. आता रागदारी वळण म्हणजे काय? असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. चित्रपट गीतात, रागदारी संगीत जसेच्या तसे मांडणे अशक्य परंतु रागाचे चलन, त्या रागातील प्रमुख हरकती  रागाचा तोंडावळा इत्यादी,त्या गाण्यातून दिसणे. इतपत रागदारी संगीताचा प्रभाव गाण्यावर दिसतो. मुख्य म्हणजे भारतीय धाटणीची छाप गाण्यावर असणे, हे देखील तितकेच महत्वाचे आणि ओ.पी.नैय्यर यांनी वेगळा ढंग जरी रुजवला तरी गाण्यावरील रागदारी संगीताची छाप संपूर्णपणे पुसून टाकणे,कठीण होते. इथे एक मुद्दा मांडतो. पूर्वीच्या संगीतकारांच्या रचनांचा "पंचनामा" इथे करायचा नसून, तोपर्यंत, हिंदी चित्रपट गीतांवर रागदारी संगीत, कुठे ना कुठे तरी आपली छाप सोडत होते, हेच निर्देशनास आणायचे आहे. 
पाश्चात्य वाद्यांचा भरभक्कम वापर आणि ज्याला नेमक्या अर्थाने "ऑर्केस्ट्रा" म्हणता येईल, याची सुरवात मात्र शंकर/जयकिशन या जोडीने केली आणि हिंदी चित्रपट संगीताचे पाणी अधिक गतिमान झाले. "संगम" चित्रपटातील "ओ मेरे सनम, ओ मेरे सनम" हे खरे तर शिवरंजनी रागावर आधारित गाणे आहे पण, तरी या गाण्यात, त्यांनी वापरलेला "ऑर्केस्ट्रा" फारच लक्षणीय ठरतो. खरतर हिंदी चित्रपट संगीतात, "ऑर्केस्ट्रा" पद्धत ठामपणे रुजवण्यात, शंकर-जयकिशन, या संगीतकार जोडीचा फार वाटा आहे. 


या गाण्यात अगदी सुरवातीलाच, मी वर म्हटल्याप्रमाणे "शिवरंजनी" रागाचे सूर ऐकायला मिळतात परंतु पुढे हे गाणे,"गीत" म्हणून आकाराला येत असताना, त्यात अनेक प्रकारचे "ढंग" मिसळले आहेत. विशेषत: "व्हायोलीन" या वाद्याचा फार लक्षणीय उपयोग या संगीतकार जोडीने करून घेतला. 
अर्थात या सगळ्या घालमेलीत, रागदारी संगीतावरील गाण्यांबाबत बहुतांशी पारंपारिक ढाचा स्वीकारलेला दिसतो, म्हणजे पारंपारिक वाद्ये, ताना, हरकती वगैरे अलंकार, याबाबत फारसे प्रयोग केले गेले नाहीत. अर्थात, इथे गाण्याची गुणवत्ता, हा मुद्दा बाजूला ठेवायचा आहे. तसेच इथे मी फक्त चालीची रचना आणि वाद्ये, इतपतच विचार करीत आहे. 
या सगळ्याला, हिंदी चित्रपटात खऱ्याअर्थाने संपूर्ण नवीन धाटणी दिली, ती राहुल देव बर्मन, या संगीतकाराने. अगदी सुरेख उदाहरण देतो - "रैना बीती जाये" हे गाणे जरा बारकाईने तपासले तर, असे आढळेल, गाण्याची चाल सुरवातीला "गुजरी तोडी" रागावर आहे पण, गाण्यात मधेच हळूच, "खमाज" राग मिसळला आहे. तसेच गाणे, गायनाच्या दृष्टीने ऐकले तर, गाण्याचा ताल देखील अत्यंत वेगळ्या धाटणीने ऐकायला मिळतो. त्याचबरोबर, गाण्यातील "ताना","हरकती" देखील ठाशीव प्रकारे घेतलेल्या नाहीत.


 रागाचे स्वर आधाराला घेऊन, गाण्याची चाल तयार करणेआणि हळूहळू रागालाच बाजूला सारून, चालीचे "स्वतंत्र" अस्तित्व निर्माण करायचे, ही पद्धत पूर्वीपासून चालू होती. या गाण्यात देखील हाच प्रकार आढळतो. परंतु दोन्ही राग इतक्या बेमालूमपणे मिसळायचे की कुठला राग, कुठे सुरु होतो आणि कुठे संपतो, या बाबत रसिकांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण करण्याची क्लुप्ती, राहुल देव बर्मनने अप्रतिमरीत्या विकसित केली.
तसे बघितले तर भारतीय चित्रपटात, भारतीय संगीत हे अविभाज्य अंग आहे आणि ते कितीही प्रयत्न केला तरी दूर ढकलता येत नाही. तेंव्हा चित्रपटात कुठलेही गाणे असले तरी त्याची पाळेमुळे कुठल्या ना कुठल्यातरी रागाशी नाते सांगतात. त्यातून, "मेलडी" ही आपल्या रक्तात मिसळली असल्याने, अगदी पाश्चात्य धाटणीचे गाणे असले तरी देखील त्यात, एखादी सुरावट आपल्याला रागाशी संबंधित सापडू शकते. 
१९९२ मध्ये "रोजा" चित्रपट आला आणि परत एकदा हिंदी चित्रपट गाण्याने नवीन वळण घेतले. तोपर्यंत, हिंदी गाण्यांत दाक्षिणात्य संगीताचे सूर जरी अस्तित्वात असले तरी त्याचे इतका "जाड" ठसा उमटण्याइतके नव्हते. या चित्रपटाच्या निमित्ताने, रेहमान प्रकाशात आला आणि त्याने हिंदी चित्रपटात स्वत:ची शैली निर्माण केली, विकसित केली आणि रुजवली. अर्थात, त्याने देखील तालाचे बरेच प्रयोग केले परंतु तसे बघितले तर राहुल देव बर्मनने त्याचे पूर्वतयारी केली असल्याने, रेहमानला त्याबाबतीत फारसे वेगळे प्रयास पडले नाहीत. रेहमानने, राहुल देव बर्मनची प्रयोगशीलता व्यवस्थित आत्मसात केली आणि, गाण्यात दक्षिणी ढंग मिसळताना, गाण्याचा नवीन ढाचा तयार केला. याच सुमारास आलेला, रंगीला" चित्रपटातील एक गाणे आपण बघूया. "हाय रामा" हे गाणे ऐकताना, सुरवातीला, तंबोऱ्याच्या ध्वनीमधून तसेच हरिहरनच्या आलापीतून, "पुरिया धनाश्री" रागाचे सूर ऐकायला येतात आणि लगोलग, स्वर्णलता या गायिकेच्या गळ्यातून, त्या सुरांना समांतर असे दाक्षीणात्य सूर ऐकायला येतात. अतिशय सुंदर मेळ, संगीतकाराने घातला आहे. चाल जशी  पुढे सरकते, तशी, पुरिया धनाश्री अस्पष्ट होतो आणि ती चाल स्वतंत्र होते आणि तरीही लय मात्र चालीशी सुसंगत असते. हा करिष्मा, रेहमानच्या व्यामिश्रतेचा. वास्तविक उत्तर भारतीय संगीताचे सूर आणि कर्नाटकी संगीताचे सूर, यांचे सादरीकरण संपूर्ण भिन्न असून देखील, ही किमया साधली आहे. खालील लिंक मध्ये हे गाणे आपल्याला ऐकता येईल. 


गमतीचा भाग असा आहे, या काळापर्यंत, चित्रपटातील रागदारी संगीताचे स्वरूप खूपच बदलून गेले होते, इतके की सुरवातीला तरी त्याच्यावर टीका झाली होती. परंतु या टीकेला न जुमानता, रेहमान,विशाल भारद्वाज, किंवा शंकर/एहसान/लॉय, या संगीतकारांनी चित्रपटीय चालींचा नवीन ढाचा तयार केला जो आजतागायत चालू आहे. पाश्चिमात्य वाद्ये, एव्हाना, हिंदी चित्रपट संगीताने मनापासून स्वीकारली होती पण, त्यात आता नव्याने आलेली इलेक्ट्रोनिक्स वाद्ये आपल्या ताफ्यात आणून, त्यांचा जाणीवपूर्वक वेगळा वापर करण्याचे धोरण स्वीकारले गेले. हा बदल घडत असताना, अर्थात गाण्यातील "मेलडी" हा घटक अविभाज्य होता आणि आजही आहे. 
तरीही पूर्वीच्या मानाने, आता मेलडी ही हार्मनीबरोबर, आपले नाते अधिक ठळकपणे सांगायला लागली होती आणि हा संकर अधिक जोमदारपणे अस्तित्व दाखवायला लागला होता. इथे मी परत एकदा, एक मुद्दा ठामपणे मांडत आहे - या लेखात, कुठेही मला जुनी गाणी आणि नवीन गाणी असा पंक्तिप्रपंच मांडायचा नाही आणि तुलना तर अजिबात करायची नाही. हिंदी चित्रपट गीतांत काळानुसार जे बदल होत गेले आणि त्याचा आपल्या आवडीनिवडीवर परिणाम होत गेला, त्याबाबत सगळे विवरण करायचे आहे. चित्रपट संगीतावर पाश्चात्य संगीताचा प्रभाव फार पूर्वीपासून आढळत होता. आता फक्त त्याचे अस्तित्व अधिक ठळक दिसायला लागले. अर्थात याची सुरवात १९६० पासून अधिक जाणीवपूर्वक झाली होती. 
१९९० च्या दशकात, हिंदी चित्रपटांचे विषय देखील बदलायला लागले. पूर्वी, केवळ संगीतासाठी निघालेले चित्रपट, ही संकल्पना जवळपास मोडीत निघाली होती आणि अर्थात कालानुरूप चित्रपट कालाभिमुख व्हायला लागल्याने, संगीताचे महत्व आणि विशेषत: प्रत्यक्ष रागाधारीत गाण्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घसरले. आपण जर का संगीताच्या ६ कोटी बघितल्या तर त्यात, चित्रपट संगीत हे जनसंगीत म्हणून गणले जाते आणि त्यानुसार, चित्रपटावर बदलत्या समाज मनाचे प्रतिबिंब पडणे साहजिकच होते. वेगवान आयुष्य, वाढता चंगळवाद यात, कितीही नाही म्हटले तरी गेयतापूर्ण गीत लेखनावर बऱ्याच मर्यादा पडायला लागल्या, पूर्वी, चित्रपटांवर उर्दू संस्कृतीचा प्रभाव  होता,तो आता जवळपास नाहीसा झाला. 
असे असून देखील, आज रागाधारित रचना होत नाहीत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. फरक पडला आहे, तो सादरीकरणात आणि तो बदल, बदलत्या काळानुसार क्रमप्राप्त(च) आहे. मागील शतकात, राहुल देव बर्मनने पारंपारिक वाद्ये नाकारून, तालाची नवी परिमाणे शोधून, हिंदी चित्रपट संगीतात वैविध्य आणले आणि हे आपण वर बघितले आहे. तोच मुद्दा, २१व्या शतकातील चित्रपट संगीतात दिसून येतो. तालाची मात्रा, केवळ ताल वाद्यातून निर्माण न करता, निरनिराळ्या धातूंची वाद्ये, प्रसंगी काचसामान किंवा पियानोचे सूर, हेच प्रमाण मानायला लागले आणि अर्थात, संगीताच्या  दृष्टीने, हे नवे पाउल आहे, हे निश्चित. इलेक्ट्रोनिक्स वाद्यांचा सढळ वापर, हे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणून मान्यता पावले. याचा परिणाम असा झाला, हिंदी गीतांत नवनवीन ध्वनींचा प्रवेश झाला. नवे ताल रुजू व्हायला लागले. याचबरोबर, "गीतांतील मेलडी संपायला लागली" असा प्रवाद पसरायला लागला. अर्थात एका बाजूने विचार केला तर तयार होणारे चित्रपट, कमीत कमी संगीताभिमुख व्हायला लागले आणि त्यासरशी, चित्रपटातील संगीताची भूमिका कमी व्हायला लागली. पूर्वी चित्रपटात कमीत कमी ७ ते १० गाणी असायची, हे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले. 
असे असून देखील, जेंव्हा केंव्हा संधी मिळेल तेंव्हा श्रवणीय गाणी तयार होत आहेत. फरक इतकाच आहे, गाण्यांचे स्वरूप पालटले. थोडा विचार केला तर आपल्याला असे आढळेल, संगीताची शैली, ही दर १०, १२ वर्षांनी बदलत आली आहे. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. संगीत हा संस्कृतीचा अविभाज्य भाग मानला तर संस्कृती बदल होताना, संगीत हे नेहमीच शेवटच्या टप्प्यावर येते, म्हणजेच संगीतातील बदल हा, जेंव्हा बदल अनिवार्य ठरतो, त्या पायरीवर होतो. असे असून देखील, हिंदी चित्रपट संगीताने परिवर्तनशीलता बऱ्याच प्रमाणात काळाशी सुसंगत रहात केली.
आता आपण एक उदाहरण बघू. "देव डी" चित्रपटातील "ढोल यारा ढोल" हे गाणे बघूया. अमित  त्रिवेदी या तरुण संगीतकाराने चाल दिलेले हे गाणे, आपल्या वरील विवेचनाच्या दृष्टीने ऐकल्यास, काही गोष्टी प्रकर्षाने  ऐकायला मिळतात. गाण्याची चाल, सरळ सरळ लोकसंगीतावर आधारित आहे. पंजाबी लोकसंगीताचा वापर केला आहे. गाण्यात वापरलेली वाद्ये तर पारंपारिक आहेत पण तरीही, त्याचे सादरीकरण मात्र वेगळे आहे. तालवाद्यावरील मात्रांचे आघात देखील वेगळ्या "वजनाचे" आहेत. खाली, मी या गाण्याची लिंक दिली आहे. प्रत्यक्ष ऐकून, अनुभव घ्यावा.


गंमत अशी आहे, पारंपारिक वाद्ये वापरताना, त्या वाद्यांतून अतिशय वेगळ्या प्रकारच्या सुरांची निर्मिती करून, गाण्याला अतिशय वेगळे परिमाण दिले आहे. फरक आहे तो इथेच. आपल्याला, रागदारी संगीतावर आधारित गाणी म्हटल्यावर, एक विशिष्ट प्रकारच्या धाटणीची रचना डोळ्यासमोर येते परंतु आधुनिक चित्रपट संगीतात, तो "ढाचा" नाकारून, नव्या धर्तीच्या रचना सादर केल्या आहेत. एकतर,शिल्पा राव आणि क्षितीज असे नवीन आवाज, या गाण्यात  आल्याने, गाण्याच्या चालीत, एक प्रकारची "ताजगी" आली आहे.

असेच एक गाणे आपण इथे बघूया. Gangs of Wasseypur - 2 या चित्रपटातील " काला रे काला रे, तन काला रे मन काला रे". 

स्नेहा खानविलकर, या तरुण स्त्री संगीतकाराने हे  स्वरबद्ध  केले आहे. तसे या गाण्यात काय आहे? असा प्रश्न केला तर काहीच नाही, असे गुळमुळीत उत्तर मिळते पण जरा बारकाईने गाणे  काही बाबी ठसठशीतपणे समोर येतात. गाणे स्पष्टपणे बिहारच्या लोकसंगीतावर आधारलेले आहे आणि लोकसंगीताचे खास वैशिष्ट्य बघितले तर, रचनेत ताल वाद्याला बराच वाव असतो आणि थोडी "गायकी" देखील असते. या गाण्यात, नेमका तोच ढाचा वापरलेला आहे. अर्थात, गायकी म्हटले की आपल्या समोर लगेच, रागदारी संगीतातले अलंकार येतात पण सुगम संगीतात, अशी अपेक्षा ठेवणे,  संपूर्ण चूक आहे.  एकतर,गाणे चालू असताना, चित्रपटातील अनेक घटना सुरु असतात आणि  त्याने,चित्रपटाची कथा पुढे जाते. 
आधुनिक काळातील गाण्यांबाबत, हा एक विशेष ध्यानात घेण्यासारखा आहे. चित्रपटातील गाणे हे, चित्रित होणाऱ्या प्रसंगाला उठाव देणारे असते. म्हणजे कथावस्तू, हा विशेष ध्यानात ठेऊन, गाण्याची रचना केली जाते. या गाण्याची पार्श्वभूमी लक्षात घेता, इथे पारंपारिक रागदारी संगीत अजिबात उपयोगी  नसून,लोकसंगीताच्या बाजावर आधारित रचना अपेक्षित असल्याने, गाणे तसे बांधले आहे.  
आपण हा मुद्दा अधिक खोलात जाऊन बघूया. "फ़ुकरे" चित्रपटात अशाच प्रकारचे एक गाणे आहे - "अंबरसरीया मुंड्या रे"  हे गाणे ऐकुया. 


राम संपत या तरुण संगीतकाराने, या गाण्याची "तर्ज" बांधली आहे. चित्रपट पंजाबी संस्कृतीवर आधारित आहे आणि गाण्याचे शब्द देखील याच भाषेचा "लहेजा" आहेत. तेंव्हा गाण्याची चाल, पंजाबी लोकसंगीतावर आधारलेली असणे, क्रमप्राप्तच ठरते. गाण्याची चाल तशी सरळ,  साधी आहे पण जर का चित्रपटाचा विषय आणि प्रसंग ध्यानात घेतला तर त्याला अनुरूप अशी चाल आहे. मी, मघाशी वर म्हटल्याप्रमाणे, आधुनिक हिंदी चित्रपटात, गाणी ही, चित्रपटाचे अविभाज्य "अंग" म्हणून सादर होत आहेत आणि चित्रित होणारा प्रसंग महत्वाचा मानून, गाण्याची बांधणी होत आहे. 


या गाण्यांची पार्श्वभूमी बघितली तर एक गोष्ट आपल्या ध्यानात येईल, ही सगळी गाणी लोकसंगीतावर आधारित आहेत आणि चित्रपटातील प्रसंग देखील त्यालाच जुळणारे आहेत. पूर्वी जेंव्हा लोकसंगीतावरील गाणी बांधली जायची तेंव्हा शक्यतो रचनेचे "मूळ" रूप कायम ठेवले जायचे परंतु त्याला चित्रपटीय गाण्यांची डूब दिली जायची. आता, ही गाणी ऐकताना, एक फरक सहज समजून घेता येतो आणि तो म्हणजे, लोकसंगीताच्या रचनेचा केवळ "आराखडा" वापरला जातो आणि चाल बांधताना, संगीतकाराचे काहीतरी वैशिष्ट्य असावे, या जाणीवेतून, त्याला किंचित "वेगळे" वळण दिले आहे. 
आता आपण, थोडे वेगळे गाणे ऐकुया. या गाण्यात, भारतीय आणि पाश्चात्य धाटणीचा विलक्षण सुंदर वापर केला आहे. तसेच गाण्यात, भारतीय आणि पाश्चात्य वाद्यांचा वापर देखील अप्रतिम केलेला आहे. "नमस्ते लंडन" चित्रपटातील "यही होता है प्यार " हे गाणे ऐकताना, आपल्याला समजून घेता येईल. 


सारंगीच्या सुरांनी सुरवात होते आणि ढंग थोडा Waltz धर्तीवरचा आहे. संथ लयीत गाणे पुढे सरकते. वास्तविक हिमेश रेशमिया हा त्याच्या वादग्रस्त विधानांनी गाजला असला तरी, हे गाणे मात्र खरच नितांतरमणीय असे दिले आहे. गाणे अतिशय शांत तरीही चित्रपटातील प्रसंग अधिक खोलवर, मनावर ठसवणारे गाणे आहे. मध्येच काहीशा "अरेबिक" धर्तीवरील हरकती आहेत आणि इतके सगळे असून देखील, गाणे भारतीय संगीताशी फार जवळचे नाते दर्शवणारे आहे. " यही होता है प्यार" हे  शब्द आणि त्याच्या पाठीमागे वाजणारे पार्श्वसंगीत,हे अरेबिक धर्तीवर मांडलेले आहे. अत्यंत आधुनिक तंत्राने ध्वनिमुद्रित केल्याने, त्याचा परिणाम मनावर खोलवर जाणवतो. इथे पाश्चात्य संगीत प्रणाली आणि भारतीय संगीत, याचा सुंदर मिलाफ दिसतो. 
याच प्रकारचे आणखी एक गाणे आपण बघूया. "युवराज" चित्रपटात, "मनमोहिनी मोरे मन" हे गाणे अशाच धर्तीवर आहे. संगीतकार रेहमानने यात, पाश्चात्य सिंफनी आणि उत्तर भारतीय रागदारी संगीत, याचा अतिशय सुंदर उपयोग करून घेतलेला आहे.

आता हे गाणे जरा बारकाईने ऐकले तर आपल्याला समजेल की, यात भीमपलास रागाचा वापर केलेला आहे पण त्याचबरोबर "चेलो" आणि "व्हायोलिन्स" या वाद्यांसह सिम्फनी धर्तीच्या रचनेचा देखील तितकाच सुरेख उपयोग केला आहे. याचाच वेगळा अर्थ असा काढता येईल, आधुनिक चित्रपट गीतांत रागदारी संगीताचा वापर केला जातो पण त्या संगीताची, एकतर लोकसंगीताशी किंवा रागसंगीताशी जोड  लावली जाते किंवा पाश्चात्य सुरावटी बरोबर संगती लावली जाते. अर्थात, हा प्रकार पूर्वीच्या चित्रपट संगीतात होत नव्हता, असे नाही. सलिल चौधरी यांची काही गाणी नमुन्यादाखल घेता येतील तरी देखील आता, ज्याप्रकारे वापर केला जातो, ती पद्धत नाविन्यपूर्ण आहे. 
तालाचे विविध प्रयोग तसेच पाश्चात्य वाद्यांचा सढळ वापर त्याशिवाय पाश्चात्य संगीत आणि पारंपारिक भारतीय संगीत, या मिलाफातून वेगळ्याच धर्तीचे संगीत निर्माण करण्याचा प्रयत्न आधुनिक चित्रपट गीतांत स्पष्टपणे दिसतो. याचा परिणाम असा होतो, गाण्यची चाल जरी एखाद्या रागावर असली तरी तो राग आपल्यासमोर स्पष्टपणे येत नाही. एखादी हरकत किंवा धून, यातून त्या रागाशी नाते सांगता येते. तसेच, Jazz संगीत किंवा Rock, Rap संगीतातील एखादा तुकडा हाताशी घेऊन, त्याची जोड एखाद्या रागाच्या धुनेबरोबर जोडून, त्या गाण्याची रचना तयार करायची. हा प्रकार जवळपास सर्रास आढळत आहे. असे करताना, आपण आणखी एक वैशिष्ट्य बघू शकतो. गाणे तयार करताना, बरेचवेळा एखाद्या वाद्याचा प्रभाव, त्या गाण्यावर अधिक जाणवून द्यायचा जसे मी वरती रेहमानच्या गाण्याच्या बाबतीत "चेलो" या वाद्याचा उल्लेख केला. तसाच प्रकार उपरीनिर्देशीत गाण्यांत देखील आपल्याला आढळून येईल. 
पूर्वी रागदारी संगीतावरील गाणे तयार करताना, गाण्याच्या चालीबरोबर भारतीय वाद्ये वापरली जात असत, जेणेकरून चाली मधील रागाचे "शुद्धत्व" कायम राखण्याचा प्रयत्न होत असे. आता, काय होते, गाण्यात एखादी हरकत चालू असताना, पार्श्वभागी पाश्चात्य धर्तीवर वाद्यमेळ चालू असतो  आणि अखेर गाण्याची चाल "मूळ" मुखड्यावर येउन थांबते. भारतीय संगीतात, "समेची मात्रा" याला अपरिमित महत्व आहे आणि इथे आज देखील काहीही फरक झालेला नाही. गाण्यात जरी दोन्ही संगीताचा "संकर" केलेला असला तरी, भारतीय संगीताप्रमाणे, समेच्या मात्रेवर, गाण्याची लय विसर्जित होणे, ही प्रक्रिया किंवा ढाचा तसाच चालू आहे. 
आता आपण, "इश्किया" चित्रपटातील अतिशय सुंदर रचना बघूया. "बडी धीरे चली" हे ललत रागावर आधारित गाणे ऐकुया. गायिका रेखा भारद्वाज, ही प्रशिक्षित गायिका असून देखील, गायन हे गीताच्या अंगाने झाले आहे. गाण्याच्या सुरवातीला, रुणझुणत्या तंबोऱ्याचे सूर आणि आलापी आहे आणी मग गाणे हळूहळू "उमलायला" लागते. गाण्याच्या तालाकडे जरा बारकाईने बघितले तर चित्रपट संगीतात प्रकर्षाने आढळणारा "केरवा" ताल आहे पण, त्याच्या मात्रा मोजून ध्यानात घेतल्या तरच लक्षात येते. अन्यथा गाण्यात, पारंपारिक पद्धतीने वाजवला जाणारा ताल नाही. 


गाण्यात, पार्श्वभागी तंबोरा आणि तालाच्या मात्रा सोडल्यास, साथीला कसलेच वाद्य नाही आणि असे असून देखील गाणे कमालीचे श्रवणीय होते. 
या गाण्यांवरून एक निष्कर्ष सहज काढता येतो. चित्रपटाचे तंत्र बदलले, त्यानुरूप संगीत देखील बदलेले. पण, तरी देखील मुलभुत निकष तसेच कायम राहिलेत आणि ते तसे कायम राहणार. याचे मुख्य कारण, भारतीय संगीत, जे आपल्या रक्तात मुरले आहे, त्याची "नाळ" अशी सहजासहजी तोडणे शक्य नाही. अर्थात, चित्रपट कथेनुसार, चित्रपटातील  गाण्याच्या "जागा" ठरतात. तिथे मात्र लक्षणीय बदल झाला आहे. 
थोडा विचार केला तर आपल्याला असे आढळून येईल, हिंदी चित्रपट संगीताचा ढाचा, दर १०,१२ वर्षाने बदल घेत असतो/स्वीकारत असतो. चित्रपट गीतांना आजमितीस जवळपास, ८० पेक्षा अधिक वर्षे झाली असे धरून चालले तर, एव्हाना बदलांची संख्या ७ ते ८ व्हायला पाहिजे आणि जर का आपण बारकाईने निरीक्षण केले तर हे बदल हळूहळू  होत गेले आणि आपण सगळ्यांनी ते बदल स्वीकारले आहेत. अर्थात, गाण्याबाबत ,बोलायचे झाल्यास, गाण्याचे मूलभूत घटक आजही तेच आहेत. शब्दानुरूप चाल बांधायची किंवा चालीनुसार शब्दरचना करायची, ही पद्धत देखील जवळपास पूर्वीपासून जशी चालत होती, तशीच आज देखील चालू आहे. गायन आणि चालीचे बंध, यात मात्र कमालीचे बदल होत गेले. वर्षानुवर्षे चालत आलेले राग आजही तसेच आहेत पण फरक पडला तो, त्या रागांच्या अनुरोधाने, त्या स्वरांच्या सादरीकरणामध्ये. अगदी पाश्चात्य संगीताचा आधार घेतला तरी  कुठे ना कुठेतरी रागांचे अस्तित्व असते. यात गमतीचा भाग असा आहे, रसिकांनी अधिक "डोळस" होण्याचा आणि ती प्रक्रिया तर हळूहळू चालू झाली आहे, हे हल्लीच्या गाण्यांच्या लोकप्रियतेवरून जाणून घेता येते.  

No comments:

Post a Comment