Friday 28 August 2015

लताबाईंचा प्रभाव ओलांडताना

हिंदी चित्रपट संगीतावर गेली कित्येक दशके लताबाईंचा प्रभाव टिकून आहे आणि हे मान्य करायला प्रत्यवाय नसावा. साधारणपणे, १९४५ पासून सुरु झालेली कारकीर्द जवळपास ५ दशके अव्याहतपणे हिंदी चित्रपट संगीतावर गाजवायची, ही काही लहान सहान कामगिरी नव्हे. त्यांच्या आधी काही सुरेल गायिका नक्कीच होत्या, उदाहरणार्थ नूरजहान. नूरजहानच्या गायकीचा प्रभाव लताबाईंवर स्पष्टपणे जाणवत होता, अगदी महल चित्रपटातील "आयेगा आनेवाला" हे गाणे जरा बारकाईने ऐकले तर ध्यानात येईल. मी हेच गाणे इथे घेतले कारण याच गाण्याने, लताबाईंची कारकीर्द खऱ्याअर्थाने सुरु झाली आणि लोकप्रियता वाढायला लागली. 
लताबाईंच्या गायकीचा इतका जो दीर्घ प्रमाणावर स्त्री गायीकांवर प्रभाव राहिला, त्याची इथे थोडीफार कारणमीमांसा करणे जरुरीचे आहे. लताबाईच्या प्रभावातून बऱ्यापैकी वेगळे स्थान आणि गायकी प्रस्थापित करण्यात, आधी गीता दत्त आणि नंतर आशा भोसले यशस्वी झाल्या, असे म्हणता येईल. परंतु गीता दत्तच्या आवाजाला बऱ्याच मर्यादा होत्या. शास्त्रीय रागदारी संगीतावरील गाणी गाताना, या मर्यादा ठळकपणे दिसून येतात. गीता दत्तने, हॉटेल मधील नृत्यगीते, उदास आणि विरही गाणी गाणी, अशा गाण्यांवर नक्कीच स्वत:च्या शैलीची छाप निर्माण केली परंतु गळ्याच्या अंगभूत मर्यादा असल्याने, मंद्र सप्तकात किंवा अति तार सप्तकात गाताना, तिच्या मर्यादा उघड्या पडायच्या. तिच्या गळ्यातील तारता पल्ला मर्यादित असल्याने, लताबाईंच्या गायकीसमोर तोकडेपण जाणवायचे. दुसरा भाग असा, जरी शैली वेगळी निर्माण केली (बंगाली गायकीची) तरी काही हरकती किंवा काही प्रकारच्या मुरकी ऐकताना, त्यात नि:संशयपणे कुठेतरी लताबाईंची छाप दिसते. लताबाई, गाण्याची ओळ संपविताना, बरेचवेळा छोटीशी हरकत, किंवा हलकासा खटका घेऊन संपवितात आणि त्याचेच थोडेसे अनुकरण काही गाण्यांतून, गीता दत्तकडून झाल्याचे दिसून येते. 
याबाबतीत आशा भोसल्यांनी मात्र, लताबाईंच्या सावलीबाहेर राहून, स्वत:ची गायकी निर्माण केली, हे मान्यच करावे लागेल. लताबाईंच्या बाबतीत, वर एक विधान केले आहे, लताबाईच्या आवाजाचा पल्ला, किंवा तारता मर्यादा, या बाबतीत आशा भोसले यांची गायकी निश्चित असामान्य आहे. श्वासावरील नियंत्रण, हे वैशिष्ट्य लताबाई आणि आशा भोसले, दोघांनाही सारख्या प्रमाणात लागू पडते. तसेच भावूक न होता भावनांचे सूचन करणे, तसेच लिखित शब्दांच्या पलीकडील आशय सुरांतून व्यक्त करण्याची असामान्य ताकद, यात या दोन्ही गायक जवळपास तुल्यबळ म्हणाव्यात, इतक्या अप्रतिम आहेत. गाताना, सुरांतून बरेचवेळा "अतिनाट्य" दिसू शकते आणि त्यामुळे गाण्याचा अकारण रसभंग होऊ शकतो आणि तसा होऊ नये, याची नेमकी जाणीव, या दोघींच्या गायकीत स्पष्ट दिसते. कुठल्याही पट्टीत गाताना, स्वरांचे स्वरत्व टिकवणे आणि ते टिकवताना, शब्दातील आशयाला धका न बसू देणे, ही खासियत लताबाई आणि आशा भोसले, दोघींच्या गायकीत पुरेपूर आढळते. 
मग, प्रश्न आहे, जर का आशा भोसले यांची गायकी इतकी समृद्ध आहे तर, त्यांच्या काळातदेखील लताबाईंच्या गायकीचा प्रभाव कसा टिकून राहिला? इथे मला वाटते, यापलीकडे जाऊन, लताबाईंच्या गायकीची थोडी छाननी करावी लागेल. जर का लताबाईंच्या गायकीचे बारकाईने निरीक्षण केले तर असे  सहज दिसेल, १९४५ सालची गायकी, पुढे १९५५ साली थोडी बदलली, ती १९६५ च्या सुमारास आणखी वेगळे वळण घेऊन प्रकटली. १९७५च्या सुमारास त्यात आणखी वेगळे रंग भरले. याचाच अर्थ, लताबाईंनी काळानुरूप गळ्यावर जे नैसर्गिक परिणाम घडतात, त्या परिमाणांची जाणीव ठेऊन, सतत गायकीत बदल घडवत आणला आणि त्यामुळे आपसूकच त्यांची गायकी नेहमी "उन्मेषशाली" राहिली. अर्थात, हा प्रकार, कमी अधिक प्रमाणात आशा भोसल्यांच्या गायकीत देखील दिसून येतो. तारुण्यातील आवाजातली ताजगी ही सरत्या तारुण्याबरोबर लयाला जात असते आणि तिथेच गायकीचा "बौद्धिक" भाग सुरु होतो आणि याचे भान, या दोन्ही गायिकांनी नेमकेपणी लक्षात ठेवल्याचे समजून येते. 
लताबाईंनी, सुरवातीच्या काळात, गायकीत जी नवीन वैशिष्ट्ये आणली, त्यात "वास्तववाद, प्रयोगशीलता याबाबत सांगीत सौंदर्याचा अनुनय करताना, एक संपूर्ण वेगळी प्रणाली बनवली.". त्यांच्या आवाजातील "प्रसादगुण" केवळ असामान्य आहे. तारता पल्ला अतिशय विस्तृत असल्याने, लयीच्या सर्व दिशांनी त्यांना चपलगती चलन सहज शक्य आहे. याचाच वेगळा अर्थ, सगळ्या सप्तकात गळ्याचे अव्याहत विहरणे, सहज शक्य होते. त्यामुळे गायकीच्या अनेक आविष्काराच्या ज्या शक्यता आहेत, त्या लताबाईंच्या गायकीत मूर्त स्वरूप घेतात. मला वाटते, इथे आशा भोसले आणि लताबाई, यांच्या गायकीतील फरक थोडाफार स्पष्ट व्हावा. असे असून देखील, गाताना, ज्या हरकती घेतल्या जातात तिथे नकळत का होईना, लताबाईंची छाप जाणवते आणि हा जो लताबाईंच्या गायकीचा प्रभाव आहे, त्याने अविरतपणे, ५० वर्षे अधिराज्य गाजवले, असे म्हणावेच लागेल. 
गाताना, शब्द संपविताना, तो शब्द, सुरांच्या सहाय्याने अधिक "टोकदार" कसा होईल, तसेच गाण्यातील ओळ संपविताना, शेवटचे अक्षर उच्चारताना, इथे एखादी "सुरेल" जोड देऊन, रचनेचे मूळ सौंदर्य अधिक खुलवायचे, हे जे विचार आहेत, याचा वेगळ्या अर्थाने आशा भोसल्यांच्या गायकीवर परिणाम काही प्रमाणात जाणवतो. इथे मी "वेगळ्या अर्थाने" हे शब्द मुद्दामून वापरलेत. कुठलीही सांगीतिक कृती जेंव्हा नव्याने निर्माण होते, तेंव्हा त्याचवेळी तिथे त्याच्या आणखी वेगळ्या सांगीतिक वाक्यांशाची अनुभूती होत असते, म्हणजेच, एखादे improvisation जिथे घेतले जाते, तिथे त्याच्याबरोबरीने, त्यापेक्षा अधिक improvisations होण्याच्या शक्यता निर्माण होत असतात आणि तिथे आशा भोसले, यांची गायकी वेगळी होते. 
आता, लताबाईंच्या अशा असामान्य गायकीचा प्रभाव पुढील गायीकांवर पडणे सहज शक्य होते आणि तसा दीर्घकालीन पडला देखील. सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल पासून ते हल्लीच्या श्रेय घोशाल, कविता कृष्णमुर्तीपर्यंत सगळ्या गायिका ध्यानात घेतल्या आणि त्यांची गायकी, जरा बारकाईने ऐकली तर माझे म्हणणे पटू शकेल.  वास्तविक,इथे उल्लेखिलेल्या प्रत्येक गायिकेची स्वत:ची अशी शैली आहे पण तरीही काही अवघड रचना गाताना, लताबाईंनी जे "मानदंड" निर्माण केलेत, त्याची "पडछाया" कुठेतरी पडते. कुणी, १९६५ सालची गायकी अनुसरली तर कुणी १९७५ नंतरची गायकी मान्य केली परंतु यांच्या गायकीत लताबाईंचा विचार अस्पष्ट हा होईना दिसून येतो. 
आता प्रश्न असा आहे, लताबाईंनी जी गायकी निर्माण केली, त्यापलीकडे गायकी आहे का? तर तशी निश्चित आहे. इथे मला चुकूनही लताबाईंच्या प्रभावाला आव्हान द्यायचे नसून, त्या गायकीपलीकडील सांगीतिक शक्यता आणि त्या शक्यतांचे प्रकटीकरण, याचा उहापोह करायचा आहे. गेली काही वर्षे, लताबाईंनी गाणी गाण्याचे सोडून दिले आह. आपण असे म्हणू,साधारणपणे, १९९० नंतर लताबाई फार तुरळक गायल्या आहेत. याचाच वेगळा अर्थ असा काढता येईल, १९९० नंतर ज्या गायिका उदयाला आल्या, त्यांच्यावर लताबाईंच्या गायकीचा प्रत्यक्ष ठसा उमटणे तसे अवघड. अर्थात, १९९० नंतर हिंदी चित्रपट संगीताने देखील बरीच वेगवेगळी वळणे घेतली, Recording ची अनेक अद्ययावत साधने उपलब्ध झाली आणि चित्रपट गीत गाणे, तसे सोयीस्कर व्हायला लागले. याचे फायदे नवीन कलाकारांना निश्चितच होत आहेत. देशाच्या प्रत्येक भागातून गायिका उपलब्ध झाल्याने, गायनातील "टोनल क्वालीटी" बदलली, काहीशी लोकसंगीताकडे झुकली आणि गायकीत थोडे "रांगडेपण" दिसायला लागले. 
पूर्वी कितीही नाकारायचे ठरविले तरी, गायकाला किंवा गायिकेला,थोडेफार शास्त्रोक्त संगीत यावे किंवा किमानपक्षी त्याची माहिती अथवा जाणीव असावी, हा एक विचार प्रबळ होता. आता, सध्या Recording ची अत्याधुनिक साधने उपलब्ध झाल्याने, बरेचवेळा "कणसूर" गायकी देखील "सुरेल" भासवण्याची करामत शक्य झाली आहे. इथे मला "कणसूर" म्हणजे काय आणि "सुरेल" या शब्दापासून त्याची फारकत कशी होते, हे मांडणे जरुरीचे वाटते. एखादा गायक "बेसूर" असतो म्हणजे, तो ज्या स्वराचा निर्देश करीत असतो, त्यापेक्षा वेगळ्या कक्षेतील सूर लावत असतो!! थोडक्यात, "गंधार" स्वर लावताना, त्याच्यावर "रिषभ" किंवा "मध्यम" स्वराची छाया पडणे, म्हणजे "बेसूर" होणे. परंतु, "गंधार" लावताना, "मध्यम" स्वराच्या इतके जवळ जायचे की त्याचे केवळ सूचन व्हावे, याला "कणसूर" म्हणतात.दोन्हीत फरक सूक्ष्म आहे पण आहे, हे नक्की. आता, उदाहरण द्यायचे झाल्यास, मुकेश या गायकाचा आवाज घेऊया. मुकेशचे नाव मुद्दामून लिहिले कारण, एकेकाळी मुकेश प्रचंड लोकप्रिय गायक होता आणि आजही त्याचे रसिक जागोजाग भेटतात. "मतवाली नार ठुमक ठुमक चली जाय" हे गाणे वरील संदर्भात ऐकावे. मुकेश बाबत लिहायचे झाल्यास, संपूर्ण सप्तक, त्याच्या गळ्याच्या आवाक्यातील बाब नव्हती तसेच तार सप्तकात, त्याचे चाचपडणे सुरु व्हायचे. जास्तीजास्त "पंचम" स्वरापर्यंत त्याचा गळा सुरेल व्हायचा पण पुढे मात्र अडखळणे सुरु व्हायचे आणि कधीकधी, अगदी "बेसूर" जरी नसले तरी गायन "कणसूर" व्हायचे. पुढील काळात, "शब्बीरकुमार" सारखे काही गायक नव्याने उदयाला आले परंतु दुर्दैवाने गळ्यावर "मेहनत" घेतली नसल्याने, "बेसुरे गायक" या उदाहरणासाठी त्यांची नावे घ्यायला लागली. तेंव्हा, पूर्वीचे सगळे गायक/गायिका सुरेल होत्या आणि आजच्या नाहीत, हे म्हणणे चुकीचे ठरेल. परंतु पूर्वी साधनांच्या अपुरेपणामुळे, गायनातील अपुरेपण "लपविणे" अवघड असायचे!! पूर्वीच्या कितीतरी आवाजांना "सुरेल" म्हणणे म्हणजे स्वत:च्या हाताने, स्वत:च्या रसिकतेची कबर खणण्यासारखे आहे!! 
मघाशी मी, नवीन आलेल्या गायक/गायिकांत, त्यांच्यावर असलेला लोकसंगीताचा प्रभाव आणि थोडे "रांगडेपण" अधिक आढळायला लागले, असे विधान केले होते आणि त्या संदर्भात थोडा विचार करूया. अगदी, सुरवातीपासून हिंदी चित्रपट संगीताचा विचार केला तर बहुतेक गायक/गायिका या शहरातून आलेल्या दिसून येतात, जरी काही मुस्लिम कलाकारांवर उत्तर भारतीय संगीताचा प्रभाव असला तरी. तसे बघितले तर शमशाद बेगम, मुबारक बेगम यांचे आवाज निश्चितपणे  "रांगडा" आवाज असे म्हणता येईल. परंतु एकूणच त्यावेळचा चित्रपट संगीताचा "ढाचा" आणि संगीत रचना पाहिल्या तर असे आढळून येईल, बहुतेक गाणी ही रागदारी संगीताचा आधार घेऊन बनवली आहेत. शमशाद बेगम, प्रामुख्याने, नौशाद, ओ.पॆ. नैय्यर यांच्याकडे गायली. नौशाद तर उघडपणे शास्त्रोक्त संगीताचा पुरस्कार करणारे संगीतकार. त्यामुळे त्यांच्या रचनेत नेहमी कुठेतरी गाण्यात रागाचे "तरळणे" आढळून यायचे आणि अगदी उत्तर प्रदेशातील लोकसंगीताचा वापर केला तरी शास्त्रोक्त संगीताचा प्रभाव सहज दिसून यायचा. 
ओ.पी. नैय्यर तर अत्यंत मोकळेपणी, लोकसंगीताचा मुबलक वापर करीत असत आणि त्या ढाच्यात शमशाद बेगम चपखल बसली. असे असले तरी एकूणच तिचे गायन फार स्तरावर चित्रपटात वापरले गेले. अन्यथा बहुतेक गायिका, या थोड्याफार "प्रशिक्षित" गायिका असायच्या. १९९० नंतर, एकूणच चित्रपट संगीताचा तोंडावळा बराच बदलत गेला आणि त्यामुळे, नवनवीन आवाजाची गरज भासू लागली आणि त्यातूनच हल्लीच्या अनेक गायिका उदयाला आल्या. या नव्या गायीकांत उषा उथुप (पाश्चात्य ढंग), रेखा भारद्वाज (प्रशिक्षित गायिका) सुनिधी चौहान (प्रशिक्षित तरीही लोकसंगीताची डूब असलेला) हेमा सरदेसाई (पाश्चात्य धाटणीचा गळा) जसपिंदर नरूला (पंजाबी लोकसंगीत) या आणि अशा अनेक गायिका उदयाला आल्या आणि कितीही नाकारायचे म्हटले, गायनातील Tonal Value या संकल्पनेला अपरिमित महत्व आले. 
या गायीकांबाबत सुरु करायच्या आधी एक बाब स्पष्ट करतो. या नवीन गायिका आणि लताबाई, अशी तुलना इथे अजिबात अभिप्रेत नाही. हे नवीन आवाज प्रकाशात आले आणि संगीत रचनांची धाटणी बदलली. अर्थात, इथे अनेक पुरुष गायकांची देखील नावे येऊ शकतील, जसे, सोनू निगम, शान, मोहित चौहान इत्यादी. जोपर्यंत लताबाईंचा आवाज आसमंतात होता, तोपर्यंत अत्यंत वेगळ्या धाटणीची गायकी फारशी अस्तित्वात आली नव्हती. बहुतेक संगीतकार, एकतर लताबाई  किंवा आशाताई, यांनाच नजरेसमोर ठेऊन, रचना तयार करीत असत. 
आता "टोनल क्वालिटी" म्हणजे काय? असा जर प्रश्न उद्भवला तर, त्याबाबत थोडे विवरण करणे आवश्यक ठरते. ध्वनीशास्त्रानुसार प्रत्येक गात्या गळ्याचे काहीना काहीतरी वैशिष्ट्य हे नेहमीच असते. त्यात काहीना काहीतरी असामान्य आणि काहीतरी न्यूनत्व देखील असते. कुठलाही गायक याला नियमाला अपवाद नाही. गायन सुरेल असणे जरुरीचे आहे, हा अत्यंत ढोबळ विचार झाला कारण त्याशिवाय गाणे सिद्धच होऊ शकत नाही. परंतू प्रत्येक सुरेल आवाजाची प्रत किंवा जातकुळी ही वेगळी असते. शास्त्रोक्त भाषेत लिहायचे झाल्यास, प्रत्येक गळ्याचा "षडज" हा वेगळा असतो आणि त्यानुसार पुढील सप्तक तयार होते. आता या पहिल्या स्वराची जी जातकुळी असते, तिथे "टोनल क्वालिटी" सिद्ध होते आणि पुढे ती गायकी विस्तारत जाते. वर मी जी काही नवीन नावे दिली आहेत, त्यांचा या संदर्भात विचार होणे, जरुरीचे आहे. थोडक्यात, जो तुमच्या गळ्याचा पोत असतो, त्याची गोलाई, त्याचा टोकदारपणा तसेच आवाजाची धार, ह्या सगळ्या बाबी "टोनल क्वालिटी" मध्ये येतात आणि इथेच प्रत्येकाचा "गळा" वेगळा असल्याची सिद्ध होते.तेंव्हा आता, या पुढील विवेचनात, हिंदी चित्रपट संगीतात जे नवीन आवाज उदयाला आले, त्या आवाजाचे थोडे विश्लेषण, काही गाण्याच्या संदर्भाने आपल्याला करायचे आहे. 
सपना अवस्थी:-  "चल छैय्या छैय्या" या गाण्याने विशेष प्रसिद्धीला आलेली गायिका. वास्तविक या आधी तिचे, "तुझे याद ना मेरी आये" हे "कुछ कुछ होता है" या चीत्रापातील गाणे गाजले होते पण तरीही खरी प्रसिद्धी मिळाली ती, "चल छैय्या छैय्या" याच गाण्याने. एका दृष्टीने तिला वरच्या श्रेणीची किंवा प्रसिद्ध गायिका म्हणता येणे अवघड आहे पण तरीही आवाजाची जातकुळी बघायला गेल्यास, काळी तीन किंवा त्या वरच्या पट्टीत तिचा आवाज सुंदर लागतो आणि ती पट्टी, लोकसंगीताच्या दृष्टीने योग्य वाटते. सर्वसाधारपणे लोकसंगीत हे जरा जोमदारपणे म्हटले तर त्याचा आवश्यक तो परिणाम साधला जातो आणि तसा सपना अवस्ठीच्या बाबतीत अवश्यमेव घडतो. कारकीर्दीच्या सुरवातीला तिला "परदेसी, परदेसी जाणा नाही" सारखे लोकप्रिय गाणे मिळाले आणि ते देखील लोकसंगीतावर आधारित असल्याने, तिच्या गायकीला शोभून दिसले. लोकसंगीतात जे रांगडेपण असते, तो बाज होच्या गळ्यातून नेमका निघतो. "कुमाऊ" सारख्या डोंगराळ भागात राहिल्याने, गळ्यावर तिथलेच संस्कार चढले. अर्थात, याचा एक तोटा असा होतो, ठराविक बाजातली(च) गाणी गायला मिळाल्याने, पुढे एकसुरी गायन होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. गायनातील नैसर्गिक देणगीला, रियाझाने आवश्यक ते वळण मिळवून देणे, आवश्यक ठरते. बहुदा याच कारणास्तव, सध्याच्या स्पर्धेच्या युगात हा आवाज मागे पडण्याची शक्यता आहे. 
लोकसंगीतावरील गाण्यात, एक गुण अवश्यमेव असतो. गाण्याच्या ठेक्याने, ती गाणी सहज ओठांवर रुळतात परंतु जर का गाण्याला आयुष्य मिळवून द्यायचे झाल्यास, तुम्हाला गळ्यावर, गायनाच्या निरनिराळ्या "परी" चढवून घ्यायलाच लागतात. हिच्या बाबतीत हा दोष निर्माण होऊ शकतो.तसे पाहिले तर प्रत्येक चित्रपटात, लोकसंगीताच्या बाजाची गाणी मिळतीलच असे नाही, किंबहुना हिची कारकीर्द बघितली तर असे दिसेल, १९९४ साली "क्रांतिवीर" चित्रपटात तिने पहिले गाणे गायले, म्हणजे गाण्याच्या क्षेत्रात येउन आता, २० वर्षे झाली परंतु गाण्याची संख्या त्या मानाने अजिबात लक्षणीय नाही. चित्रपटात अनेक प्रसंग असतात आणि त्यानुरूप आवाजात लवचिकता आणणे जरुरीचे असते. अर्थात, जिथे लोकसंगीत आहे, तिथे मात्र, हिचा गळा अप्रतिम खुलतो. वर म्हटल्याप्रमाणे, काळी तीन पासून चार, क्वचित पाच, या पट्टीत गायन होत असल्याने, रसिकांवर त्याचा लगेच परिणाम होतो. तरीदेखील जेंव्हा, लता युग अस्ताला यायला लागले, त्यानंतरच्या काळातील एक लक्षणीय आवाज म्हणून नोंद करावीच लागेल. 
सुनिधी चौहान:- सध्याच्या काळातील आघाडीची गायिका म्हणून नाव घ्यावे लागेल. दिल्लीत जन्म झाल्याने, आणि वडील थियेटर संबंधित असल्याने, कलाविश्वाची ओळख सहज झाली. टीव्हीवर ज्या गाण्याच्या स्पर्धा होतात, त्यातून चित्रपट सृष्टीला मिळालेला आवाज. "मेरी आवाज सुनो" या गाजलेल्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवल्याने, लहानपणीच लोकप्रियतेच्या झोताचा अनुभव मिळाला. "मस्त" चित्रपटातील "रुकी रुकी सी जिंदगी" हे पहिले गाणे, व्यावसायिक गायिका म्हणून गायला मिळाले आणि चित्रपटसृष्टीत गायिका म्हणून प्रवेश झाला. आवाजाची जात अगदी पातळ नसली तरी अत्यंत लवचिक आहे. लहानपणापासून संगीताचे रीतसर शिक्षण घेतल्याने, गायकी अंगाचे संस्कार लगेच दिसून येतात तसेच पाश्चात्य संगीताचा अभ्यास केल्याने, तिथल्या गायकीचे वळण, गळ्यावर चढलेले आहे. याचा फायदा असा झाला, कुठल्याही प्रकारचे गाणे वर्ज नाही. आवाज, तिन्ही सप्तकात सहज फिरणारा त्यामुळे गाताना, येणाऱ्या हरकती, खटके आणि सतत रियाझाने कमावलेले श्वासावरील नियंत्रण, यामुळे गाण्याला एकप्रकारचा भरीवपणा प्राप्त करून देणे सहज शक्य होते. अतिशय सुरेल आवाज, असे वर्णन करता येईल. 
गाताना, काहीवेळेस, आशा भोसल्यांच्या गायकीचा झाक अस्पष्ट अशी दिसते तरीही स्वत:ची शैली निर्माण करण्यात यशस्वी म्हणता येईल. गाण्यावर जागतिक संगीताचे संस्कार झाल्याने, गळ्याला वेगवेगळी "वळणे" देण्यात वाकबगार. "सनई चौघडे" या मराठी चित्रपटातील "कांदे पोहे" हे गाणे या संदर्भात ऐकावे. गाण्यात चढ-उतार फार आहेत, काही ठिकाणी पाश्चात्य संगीताच्या धर्तीवर हरकती आहेत पण तरीही गाणे फारच श्रवणीय झाले आहे. भारतातील बहुतेक भाषेत गाणी गाण्याची किमया, यामुळेच सहज साधली गेली. "बिडी जलइले" सारखे रांगडे गाणे असो किंवा "शीला की जवानी" सारखे उठवळ चालीचे गाणे असो, दोन्ही गाण्यात, तिच्या गळ्याची "रेंज" कळून येते. "मिशन काश्मीर" मधील "भुमरो" सारखे लोकसंगीतावर आधारित गाणे देखील तितक्याच तन्मयतेने गाण्याची हातोटी वाखाणण्यासारखी आहे. चित्रपटात असंख्य प्रसंग असतात आणि प्रत्येक प्रसंगासाठी, रचना वेगळ्या धाटणीच्या असतात. त्या प्रत्येक प्रसंगासाठी, आपला आवाज सहज जुळवता येईल , असा "अष्टपैलू" गळा, असे सार्थ वर्णन करता येईल. 
श्रेया घोषाल:- सुनिधी प्रमाणेच गाण्याच्या (सारेगम स्पर्धेतून) पुढे आलेली गुणवंत गायिका. पश्चिम बंगालमध्ये जन्म, अर्थात गळ्यावर बंगाली गायकीचे संस्कार. तसे पाहिले तर, गीता दत्त देखील मुळची बंगाली आणि तिच्या आवाजावर बंगाली ठसा स्पष्ट दिसायचा परंतु श्रेयाच्या आवाजावर तसा ठसा दिसत नाही, ही मोठी जमेची बाजू. शास्त्रशुद्ध संगीताचे रीतसर शिक्षण झाल्याने, गळा "तयार" आहे. आवाजात "घोटीवपणा" आणि नैसर्गिक गोडवा, याचे मिश्रण आहे. शास्त्रीय संगीताची तालीम असली तरी गळा जड होईपर्यंत नसल्याने, आवाजात लवचिकता आली. अर्थात, अवघड चालींची गाणी, किंवा गाताना, एखादी मुरकी किंवा हरकत, सहजगत्या गल्ल्यातून जाते आणि त्यामुळे गाण्याचे सौंदर्य अधिक खुलते. सुरवातीला, गायनावर लताबाईंच्या शैलीचा प्रभाव जाणवायचा पण लवकरच स्वत:ची शैली निर्माण केली. कारकिर्दीची सुरवात बंगाली गाण्यांनी झाली तरी लवकरच प्रसिद्ध चित्रपट "देवदास" मिळाला आणि अचानक प्रसिद्धीचा झोत अंगावर पडला. या चित्रपटातील गाणी अर्थात, रागदारी अंगाची असल्याने, गाणी श्रवणीय झाली. याच चित्रपटातील गाण्यांनी, तिला प्रादेशिक, तसेच राष्ट्रीय पारितोषिके मिली आणि या क्षेत्रात स्थिर व्हायला मदत झाली. जरी सुरवातीला लताबाईंचा प्रभाव असला तरी, नंतर स्वत:ची वेगळी ओळख करू शकली. आवाज तिन्ही सप्तकात सहज फिरत असल्याने, गळ्याला कसेही "वळण" देता येते. 
रेखा भारद्वाज:- कवी गुलजार लिखित"नमक इश्क है" या गाण्याने प्रसिद्धीस आली. शास्त्रीय संगीताचा पायाभूत अभ्यास. पुढे, "ओंकारा" चित्रपटातून चित्रपट सृष्टीत प्रवेश. आवाजाची जात जरा जाडसर आणि याचे कारण रागदारी संगीताचा रियाझ. बहुतेक गाणी, विशाल भारद्वाज - नवऱ्याच्या संगीत दिग्दर्शनाखाली. आवाज लयीला पक्का परंतु तरीही लोकसंगीताचा जबरदस्त प्रभाव. मघाशी मी म्हटले त्याप्रमाणे, हिंदी चित्रपट संगीताचा ढाचा १९९० नंतर फार वेगळा होत गेला आणि त्याचा परिणाम रचना, गायन या घटकांवर होत गेला. रेखा भारद्वाज यांची गायकी ऐकताना, याचे नेमके प्रत्यंतर येते. आवाजात थोडा "लखनवी" ढंग तसेच उत्तर प्रदेशाचे लोकसंगीत, असा गळ्यावर ठसा स्पष्ट दिसत असल्याने गायकी वेगळ्याच अंगाने खुलून येते, मग त्यात, खटका, मुरकी असे अलंकार लगेच दिसतात. 
हर्षदीप कौर:- शीख कुटुंबात आणि दिल्लीला जन्म, वडिलांचा संगीत वाद्ये विकण्याचा व्यवसाय. अर्थात, संगीताची आवड लहानपणापासून. सुरवातीला शास्त्रोक्त शिक्षण, पुढे पियानोवर पाश्चात्य शास्त्रीय संगीताचा अभ्यास आणि नंतर सुफी संगीताचा गाढा अभ्यास. याचा परिणाम, गायनात स्पष्ट दिसतो. रेहमान, प्रीतम, विशाल भारद्वाज सारख्या वेगवेगळ्या प्रकृतीच्या संगीतकारांकडे गायनाची संधी मिळाल्याने, गळ्यावर जागतिक संगीताचा मनोहर संकर आढळतो. "सानू ते ऐसा माही" आणि "चांद की कटोरी" ही गाणी मुद्दामून ऐकावीत म्हणजे, गाण्याच्या रचनेप्रमाणे गायकीत कसा बदल करता येतो, हे समजू शकेल. 
या लेखाचा प्रमुख उद्देश असा आहे, लताबाईंची गायकी आणि प्रभाव, जवळपास ४ ते ५ पिढ्यांवर टिकून होता आणि या काळात, कुठलीही गायिका, या प्रभावातून स्वत:ला "मुक्त" करू शकली नाही. संगीत हे कधीच एकानुवर्ती किंवा एक केंद्रस्थानी नसते आणि नसावे. या प्रभावातून बाहेर पडणे तसे सहज, सोपे नव्हते परंतु १९९० नंतर, रेहमान, विशाल भारद्वाज, प्रीतम किंवा शंकर/एहसान/लॉय या आणि अशा अनेक संगीतकारांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. अर्थात, या प्रयत्नांना, वरील गायिकां आणि इतर अनेक गायिकांची साथ मिळाली आणि चित्रपट संगीत अधिक रंगतदार, वैविध्यपूर्ण झाले, ही वस्तुस्थिती आहे. आता, यात गुणात्मक बदल किती, दर्जात्मक बदल किती, हा वेगळ्या निबंधाचा विषय आहे. 
जेंव्हा, हिंदी चित्रपट संगीताच्या प्रांगणात लताबाई, आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांची सद्दी होती, तेंव्हा बहुतेक गायिका या शहरातून येत होत्या, बहुतेक सगळ्या प्रशिक्षित होत्या परंतु १९९० नंतर चित्रपट संगीतात जे मन्वंतर होत गेले, त्यात, भारतातील कानाकोपऱ्यातून गायिकांचा शिरकाव झाला, तसेच टीव्हीवरील संगीत स्पर्धेतून नवीन आवाजांना वाव मिळाला आणि संगीताच्या प्रांगणात आवाजाचे वैविध्य अनुभवायला मिळाले. हरदीप कौर सारखी गायिका थेट पंजाबचा गंध घेऊन आली तर हेमा सरदेसाई, उषा उथप सारख्या गायिका पाश्चिमात्य ढंग घेऊन अवतरल्या, रेखा भारद्वाज, उत्तर प्रदेशाचा "नखरा" घेऊन प्रकट झाली. हेमा सरदेसाईचे नाव निघाले आहे, तर "जानम समझा करो" सारखे पाश्चात्य संगीताच्या वळणाचे गाणे आणि "अस्तित्व" चित्रपटातील "कितने किस्से है" सारखे सुश्राव्य गाणे तुलनात्मक दृष्टीने ऐकावे आणि एकाच आवाजातील निरनिराळे "विभ्रम" समजून घ्यावे.  
तसे बघितले तर, यातील बहुसंख्य गायिका, सुरवातीला शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण घेऊनच आल्या परंतु चित्रपट गीत गाताना, याचा किती उपयोग करायचा आणि मुळात, आपल्या प्रदेशातील लोकसंगीताचा रंग आणि अर्क, गाण्यात कसा उतरवायचा, याची नेमकी दृष्टी घेऊन आल्या. याचा परिणाम असा झाला, चित्रपट संगीत वेगवेगळ्या अंगाने विकसित होत गेले. संगीत वेगवेगळ्या अंगाने विकसित होत गेले कसे? असा प्रश्न इथे उद्भवतो. सुफी संगीताचा प्रवेश आणि त्यानुसार संगीतात आलेला अनोखा रंग आणि गायकी खरोखरच अप्रतिम आहे. 
सुफी संगीताचा विषय आला तेंव्हा, प्रसिद्ध गायिका, कविता सेठने गायलेले "वेक अप सिड" चित्रपटातील "एकतारा" हे गाणे ऐकण्यासारखे आहे. यात, लयीचे किती वेगवेगळे बंध ऐकायला मिळतात. याचा संदर्भात इथे सपना अवस्थी या गायिकेचे नाव आठवले. तिने गायलेले "छैय्या छैय्या" किंवा " कुछ कुछ होता है" चित्रपटातील "तुझे याद ना मेरी आये" सारखी अतिशय प्रसिद्ध गाणी ऐकली तर लगेच लक्षात येईल, तिने चित्रपट संगीतात भोजपुरी संगीताचा नवा रंग आणला आणि नव्या पिढीतील गायिकांत, स्वत:ची ओळख ठाम केली.
ही सगळी गाणी आणि गायिका ऐकताना एक गोष्ट ठामपणे जाणवते, या गायिकांनी चित्रपट संगीतात निरनिराळे रंग आणि ढंग आणून, चित्रपट संगीताच्या कक्षा आणखी विस्तारित केल्या आणि त्याचबरोबर गायकी अंग आणि प्रयोगशीलता, याचे नवीन मानदंड निर्माण केले आणि एकूणच संगीताचा आवाका आणि शक्यता विचारात घेता, असे बदल आवश्यकच होते. 
या निमित्ताने, हिंदी चित्रपट संगीत, १९९० नंतर जी वळणे घेत गेले, त्यामागील नवीन गायिकांचा सहभाग किती वैशिष्ट्यपूर्ण आहे, याचाच आढावा घेतला आहे. 

No comments:

Post a Comment