Monday 4 August 2014

श्रवणक्रिया - अथक प्रक्रिया!!

वास्तविक संगीत हे भारतीय समाजाचे एक अविभाज्य अंग असे मानले जाते आणि त्यात बरेच तथ्य आहे. काहीजण विरंगुळा म्हणून गाणी ऐकतात, काही गाण्याचे नादिष्ट असतात तर कुणी अधिक छांदिष्ट असतात. अर्थात, व्यक्तिपरत्वे आस्वादाच्या शक्यता बदलत असतात. त्यानुसार आवडीनिवडी निर्माण होतात. प्रत्येक प्रकारच्या आस्वादात, "गाणे ऐकणे" ही क्रिया नेमकेपणी अंतर्भूत असते.
आपल्याकडे अजूनही, सुगम संगीताला तितकीशी मान्यता मिळालेली नाही!! का? याचे समर्पक उत्तर मिळत नाही. रागदारी संगीताचे "अभिजातत्व" नाकारण्यात काहीच हशील नाही पण तसा थोडा बारकाईने विचार केला तर रागदारी संगीताचे रसिक हे तसे एकूण समाजात कमीच असतात.एकतर रागदारी संगीत समजण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी, तुमच्याकडे "धीर" धरण्याची वृत्ती हवी, त्यात रंगून जाण्याची आवड हवी आणि मुख्य म्हणजे "लयीच्या" अंगाने ऐकण्याची प्रवृत्ती हवी. बहुतेकजण, इथेच गळफाटतात!! अर्थात, या वृत्तीचे दुसरा परिपाक म्हणजे सुगम संगीताची आवड निर्माण होणे. एकतर, सगळा कारभार काही मिनिटांपुरता असतो आणि सहज, जाता-येता, तुम्ही गाण्याचा आस्वाद घेऊ शकता. 
याचा परिणाम असा झाला, सुगम संगीत म्हणजे एक खुशालखेळी असा "अपसमज" पसरला!! वास्तविक पहाता, सुगम संगीताने जे गारुड, समाजावर पसरलेले आहे, त्यावरून, सुगम संगीत म्हणजे हलके फुलके संगीत असा समज का पसरला, हे थोडे कोडेच आहे. वास्तविक पहाता, सुगम संगीताच्या आवडीने, रागदारी संगीताची ओळख सहज होऊ शकते, असा अनुभव आहे. माझ्यासारखे कितीतरी रसिक तर सुगम संगीतातून रागदारी संगीताकडे वळले आणि ही वस्तुस्थिती असताना, सुगम संगीताकडे थोडे उपेक्षित नजरेने बघणे कितपत योग्य आहे? याच विचाराचा दुसरा भाग म्हणजे, मी जे वर म्हटले आहे, त्याप्रमाणे, सहज जाता-येता ऐकत येण्यासारखे संगीत म्हणजे सुगम संगीत!! 
आता, याकडे थोडे बारकाईने बघूया. सुगम संगीत म्हणजे, संगीताचा अत्यंत अटकर बांध्याचा लोभस आविष्कार, असे म्हणता येईल. आपल्याकडे तीन मिनिटांच्या गाण्याकडे बघण्याचे दोन प्रमुख प्रवाह दिसतात. १] गाणे ऐकताना, त्यातील शास्त्रीय संगीताचा भाग शोधणारे, २] गाणे वरवर ऐकणारे. अर्थात माझ्या मते, दोन्ही वृत्ती चुकीच्या आहेत. सुगम संगीतासाठी आणि ते ऐकण्यासाठी शास्त्रीय संगीताची बैठक पक्की हवी, याची अजिबात गरज नाही. एखादे गाणे, एखाद्या रागावर आहे किंवा त्यातील हरकती कुठल्या स्वरांवर आधारित आहेत, असे मत व्यक्त करणे आणि त्यानुसार गाण्याची प्रतवारी ठरविणे, हा प्रगाढ व्यासंगतेचा परिपाक आहे. रागदारी संगीत हे संपूर्ण वेगळ्या प्रतीचे संगीत आहे आणि त्याची सुगम संगीताशी वाजवीपेक्षा अधिक जोड लावणे म्हणजे स्वत:च्या ज्ञानाचे (????) प्रदर्शन मांडणे होय. 
तसेच सुगम संगीत देखील सर्जकतेची विशिष्ट पातळी गाठू शकतात आणि त्याकडे वरवर बघून नजरेआड करणे, हे देखील तितकेच चुकीचे. सुगम संगीतात किती प्रयोग करता येऊ शकतात, हा जरी व्यामिश्रतेचा भाग झाला जरी सर्जनशीलता निश्चित दाखवता येते आणि त्यासाठी या सांगीतिक आविष्काराकडे थोड्या गंभीरपणे बघणे अत्यावश्यक ठरते. 
सुगम संगीताचा आता, थोड्या टप्प्याटप्प्याने विचार करूया. यासाठी, गाण्याची बांधणी कशी असते, तिचा विस्तार कसा होतो इत्यादी भाग विचारात घ्यावे लागतील. बहुतांश गाण्याच्या सुरवातीला वाद्यमेळ सुरु होतो आणि त्यातून, मुखड्याची कल्पना पुढे ठेवली जाते. गाणे कसे असेल किंवा गाण्याची चाल कशी असेल, याचे हा सुरवातीचा वाद्यमेळ कल्पना देतो आणि आपल्यासारखे बरेचजण इथे दुर्लक्ष करतात. सुगम संगीतात सर्जकतेच्या ज्या महत्वाच्या "जागा" असतात, त्यातील ही जागा फार महत्वाची आणि तिथेच फारसे लक्ष दिले जात नाही. 
पुढे, गाण्यात शब्द अवतरतात आणि गाण्याची खरी ओळख सुरु होते. मुळात, सुगम संगीताचा आविष्कार काही मिनिटांपुरता असतो आणि त्यामुळे इथे गाण्यातील प्रत्येक सेकंदाला महत्व असते. जेंव्हा आपण, "अप्रतिम" गाणे असे म्हणतो, तेंव्हा त्या गाण्याची रचना तशी बंदिस्त असते। म्हणजेच, गाण्यातील प्रत्येक क्षण हा अर्थपूर्ण असावाच लागतो. मग तो स्वररचनेचा असेल किंवा वाद्यमेळाचा असेल, शब्दांचा असेल किंवा गायनाचा असेल. सुगम संगीत ऐकताना, आपल्याला संपूर्ण एकाग्रचित्त होऊन गाणे ऐकणे, ही गाणे ओळखण्याची पहिली कसोटी असते आणि तिथेच बहुतेक सगळे रसिक कमी पडतात. 
आपण, आपल्या आवडीनुसार गाणे ऐकतो. कुणी, वाद्यमेळासाठी ऐकतो तर कुणी गायकीसाठी ऐकतो तर कुणी शब्दरचनेसाठी. पण, हे सगळे गाण्याचे "पोटविभाग" आहेत, संपूर्ण गाणे नव्हे. मी वर म्हटले तसे, गाण्यात प्रत्येक क्षणाला महत्व असल्याने, कुशाग्र संगीतकार हा नेहमीच त्या प्रत्येक क्षणाचा अत्यंत हुशारीने वापर करून, गाणे सजवीत असतो. वाद्यमेळावरून एक टीकेचा मुद्दा आठवला. मराठी गाण्यात वाद्यमेळाचा अभाव असतो आणि त्यामुळे हिंदी चित्रपट गाण्यांच्या समोर विविधता कमी पडते अशी टीका बरेचवेळा केली जाते. विविधतेचा मुद्दा ग्राह्य धरला तरी माझ्या माहितीनुसार, हिंदीत आर्थिक पाठबळ भरपूर असल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर वादक तसेच अत्याधुनिक ध्वनिमुद्रण व्यवस्था परवडू शकते. माझ्या माहितीत मराठीतील अनेक संगीतकारांना, केवळ आर्थिक पाठबळ नसल्याने, रचनेला मुरड घालावी लागली आहे. साधी सारंगीतून Contra Melody तयार करायची झाल्यास, हाताशी कमीतकमी ४ वादक असणे गरजेचे असते आणि तितके वादक आणण्याची कुवत नसल्याने,  रचनेवर मर्यादा येणे क्रमप्राप्त ठरते आणि त्यामुळे मराठीवर टीका करताना, हा मुद्दा ध्यानात घेणे आवश्यक आहे. 
गाण्याच्या सुरवातीची सुरावट तसेच पहिला अंतरा आणि दुसरा अंतरा, इथे संगीतकाराला वाद्यमेळ आणि त्याची रचना, याला वाव असतो आणि बरेचवेळा आपण इथे लक्षच देत नाही. गायकाच्या आवाजाचे गारुड असामान्य खरेच पण, सुरेल वाद्ये हा गाण्याच्या बांधणीतील तितकाच महत्वाचा घटक आहे. कधीकधी गाण्याची लय बदलली जाते आणि त्याचे अर्थपूर्ण सूचन वाद्यमेळातून अतिशय सूक्ष्मपणे समोर येते. बाब तशी लहान आहे पण फार महत्वाची आहे. 
वेगवेगळी वाद्ये तसेच त्याचा पारंपारिक घाट नाकारून, वेगळ्या धर्तीने वाद्यमेळ सजवणे, ही गोष्ट संगीतकाराच्या प्रतिभेची साक्ष देणारी असते. अर्थात, हे सगळे करताना, हाताशी जी शब्दकळा आहे, तिला साजणारी रचना, हे भान कायम राखणे गरजेचे असते. 
सुगम संगीतात, गायन कला निश्चित अंतर्भूत असते आणि त्यानुसार विचार करायचा झाल्यास, आणखी एका प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. गायन म्हटले की लगेच आपला विचार रागदारी संगीताकडे वळतो आणि त्या अनुषंगाने गायनाचे विश्लेषण केले जाते. सुगम संगीतात, शास्त्रीय संगीताचे पायाभूत प्रशिक्षण असण्याची अजिबात गरज नसते, शास्त्रीय गायनाने गळा "जड" होतो आणि सुगम संगीतात, जिथे "संपूर्ण सप्तक" किंवा "मुर्घ्नी स्वर" अशा अलंकाराची काहीही जरुरी नसते. शब्दांच्या आशयानुसार जितका सांगीतिक आविष्कार आवश्यक असेल तितकीच गायकी दाखविणे, गरजेचे असते पण समजा गाण्यात, भरपूर तानांचा "पाऊस" असला की लगेच गाणे प्रभावित होते!! हा अर्थात चुकीचा विचार आहे. 
गाणे ऐकताना, आपण इतक्या सगळ्या गोष्टींचे भान राखतो का? माझा तर अनुभव असा आहे, एखादे गाणे ऐकायला घेतले की मनात त्या अनुषंगाने अनेक विचार (गाणे सोडून) येतात आणि त्या विचारांच्या भोवऱ्यात, गाण्यातील कित्येक अलंकार ऐकायचे राहून जातात!!  अशावेळी, मी गाणे ऐकतो, हा "दावा" किती पोकळ ठरतो. वास्तविक, सुगम संगीताचा आवाका बघता, संपूर्ण गाणे समजून घेण्यास फारसा त्रास होऊ नये परंतु तसे आपल्याकडून घडत नाही. त्यातून, गाण्यात, जे महत्वाचे घटक असतात - स्वररचना, शब्दकळा आणि गायन, या तिन्ही घटकांवर एकाचवेळी मन एकाग्र करणे, ही बाब वाटते तितकी सहजशक्य नसते. शब्दावर लक्ष द्यावे तर गायनातील करामती नजरेआड होतात किंवा स्वररचना ऐकावी तर वाद्यमेळाकडे दुर्लक्ष होते!! 
या सगळ्या गोष्टी "एकसमयावेच्छेदे"  ध्यानात ठेवल्या तरी गाणे आवाक्यात आले असे घडत नाही. यात आणखी एक गंमत आहे. अर्थात, हे माझे अनुमान आहे. कुठलेही गाणे कितीही अप्रतिम आहे, असे वाटले तरी "सुगम संगीत" ही अभिजात कला नाही!! याचे मुख्य कारण, या संगीत आविष्कारात दोन माध्यमे अंतर्भूत आहेत आणि दोन्ही माध्यमे, एकमेकांच्या विरोधात आहेत. १] स्वर, २ ] शब्द. स्वरांच्या राज्यात, कितीही जवळीक साधायचा प्रयत्न केला तरी शब्द माध्यम परकेच असते. आणि याचा प्रभाव अखेरीस गाण्यांवर नेहमी पडतो. गाणे जर का बारकाईने ऐकले तर सहज समजेल, गाण्यात, लयीच्या सोयीसाठी शब्द किंवा अक्षरे, यांची मोडतोड होत असते किंवा करावी लागते. गाणे हे संगीताभिमुख असल्याने, स्वराला प्राधान्य मिळणे आवश्यक परंतु गाण्याच्या आराखाड्यात शब्दांचा अंतर्भाव आवश्यक असल्याने, शब्द आणि आशय,याचा विचार क्रमप्राप्तच ठरतो. सुगम संगीत तोकडे पडते ते इथे. इथे स्वराविष्कारावर मर्यादा कारण शब्दांची मर्यादा आणि एकूणच बांधणीचा अटकर आवाका. स्वररचना ही अत्यंत थोड्या काळासाठी तरीही हाताशी असलेल्या शब्दांशी नाते राखून असणारी, त्यामुळे कुठेतरी, कुठल्यातरी एका घटकाला "गौणत्व" तर नेहमीच मिळत राहणार. याचाच परिपाक असा झाला, मला अजूनही, संपूर्ण "निर्दोष" गाणे ऐकायला मिळालेले नाही!! म्हणूनच मला मनापासून वाटते, गाणे ऐकणे, ही सतत चालू राहणारी प्रक्रिया आहे.  

No comments:

Post a Comment