Saturday, 20 February 2016

आईये मेहरबां



संध्याकाळची शांत, मंद, मदिर वेळ. नेहमीचे हॉटेल तसे ओकेबोके वाटत होते, अजूनही हॉटेलमध्ये येणाऱ्या गिऱ्हाइकांची वर्दळ नसल्याने एकूणच आसमंत काहीसा निर्जीव" भासत होता. हळूहळू एकेक करून माणसे येउन, टेबलावर बसायला लागली आणि ते हॉटेल "जिवंत" व्हायला लागले. संध्याकाळी, इथे दर दिवशी गाणी आणि नृत्याचा कार्यक्रम, हे खरे आकर्षण असल्याने बरेचसे "आंबटशौकीन" तसेच खलबते करणारी माणसे आजूबाजूला वावरायला लागली.
गाण्याचा कार्यक्रम असल्याने, स्टेजवर वादक आपली वाद्ये जुळवून, गायिकेच्या प्रतीक्षेत. अचानक, हॉटेलमध्ये गिटार,चेलो आणि clarinet वाद्ये झंकारायला लागली आणि ते वातावरण धुंद व्हायला लागले. नेहमीची माणसे यायला लागली आणि स्टेजवर गायिकेचे आगमन होते!! आगमन होतानाच, तिच्या गळ्यातून धुंद करणारा आलाप येतो आणि वातावरणात खऱ्याअर्थी "नजाकत" निर्माण होते. 
चित्रपट "हावरा ब्रिज" मधील, "आईये मेहरबां" हे अत्यंत लोकप्रिय गाणे आणि त्या गाण्याची ही पार्श्वभूमी. दिग्दर्शक शक्ती सामंता यांनी, हे गाणे चित्रित करताना, खूपच कल्पकता दाखवली आहे. अर्थात, संगीतकार ओ.पी. नैय्यर यांच्या रचनाकौशल्याचा सिंहाचा वाटा. गाण्यात , मधुबाला, अशोक कुमार आणि के.एन.सिंग असे तगडे अभिनेते आहेत. असे असून देखील पडद्यावर छाप पडते, ती मधुबालाचीच.  
"तोंच वाजल्या तुझ्या सपाता सळसळला घोळ 
आलीस मिरवित चालीमधुनी नागिणीचा डौल, 
करांतून तव खिदळत आले स्तनाकार पेले
जळता गंधक पाच उकळती यांही रंगलेले."
कविवर्य बा.भ.बोरकरांच्या अविस्मरणीय ओळींची ग्वाही देत, मधुबाला स्टेजवर येते ती अशाच एखाद्या नागिणीचा डौल घेऊन आणि त्याच्या साथीला आशा भोसल्यांचा अवर्णनीय मादक स्वर. पडद्यासारखी निर्जीव चीज देखील हे सौंदर्य बघून बावचळून जायची तिथे आपल्यासारख्या स्खलनशील मानवाचे काय वर्णावे!! स्टेजवर तिचा जो प्रवेश आहे, तो खास बघण्यासारखा आहे. आपण एका हॉटेलमधील प्रसिद्ध गायिका आहोत आणि आपले काम, हॉटेलमध्ये येणाऱ्या माणसांचे मन रिझवणे, हे आहे आणि या कामाची पूर्तता, तिच्या स्टेजवरील आगमनातून पुरेपूर दिसून येते. खरेतर पुढील सगळे गाणे म्हणजे गाण्यावर अभिनय कसा करावा याचा सुंदर वस्तुपाठ आहे. 
आता आपण गाण्याकडे वळूया. गाण्यातील शब्दकळा काही असामान्य अशी अजिबात नाही, अर्थात हॉटेलमधील नृत्यगीत आहे म्हणजे त्यात अलंकारिक भाषा,प्रतिमा, उपमा यांना फारशी जागा नसते. परंतु तरीही शब्द लिहिताना, चालीचा "मीटर" ध्यानात घेऊन, चित्रपटातील प्रसंग डोळ्यासमोर ठेऊन रचना करावी(च) लागते. चित्रपट गीतकारांना उठसूट नावे ठेवण्याची आपल्याकडे पद्धत आहे पण त्यांनी या बाजूकडे देखील लक्ष दिले तर असला "फिजूल" आरोप करण्याकडे ते वळणार नाहीत.  
गिटारच्या पहिल्या सुरांपासून गाण्याचे "घराणे" ध्यानात येते. आता हॉटेलमधील नृत्यगीत आणि ते हॉटेल देखील संपूर्णपणे पाश्चात्य धाटणीचे म्हटल्यावर गाण्याची चाल देखील त्याच धर्तीवर असणार, हे ओघानेच आले. गाण्याच्या सुरवातीच्या वाद्यमेळात गिटार, चेलो सारखी वाद्ये वाजत असतात आणि त्या वाद्यांनी गाण्याची अप्रतिम पार्श्वभूमी तयार झाली आहे. इथे आणखी एक बाब नजरेसमोर आणावीशी वाटते. आपल्याकडे संगीतकार किंवा रचनाकार म्हटले की त्याला रागदारी संगीताचे प्राथमिक ज्ञान आणि परिपूर्ण अभ्यास असणे गरजेचे आहे, असा प्रवाद प्रसिद्ध आहे. मला स्वत:ला तसे वाटत नाही. या गाण्याचे संगीतकार ओ.पी.नैय्यर यांनी असा कुठलाही अभ्यास केला नव्हता पण तरीही त्यांच्या कितीतरी रचना या रागदारी संगीतावर आधारित आहेत आणि त्या रचना करताना, कुठेही चाचपडलेपण आढळत नाही. चित्रपट गाणे हा एक स्वतंत्र आविष्कार असतो आणि त्यासाठी काव्याची जाणकारी तसेच वाद्यांची परिभाषा माहितीची असली तरी देखील खूप प्रमाणात पुरेसे ठरू शकते. 
"आईये मेहरबान, बैठीये जानेजां 
शौक से लिजिये, इष्क की इम्तेहान."
इथे आशाबाईंनी "आईये" शब्द कसा घेतला आहे, हे ऐकण्यासारखे आहे. स्वरांत जितका म्हणून "मादक"पणा आणता येईल (यात कुठेही उठवळ वृत्ती दिसत नाही आणि हे फार महत्वाचे) तितका आणला आहे गाताना किंचित "आ"कार लांबवला आहे आणि त्यातूनच गाण्याचा पुढील विस्तार कसा असेल, याचे मदभरे सूचन केले आहे. "आईये" शब्दाचा किंचित उच्चार करून त्यालाच जोडून "हुंकारात्मक" स्वरिक आवाहन आणि त्याच्या जोडीला मधुबालाची दिलखेचक हालचाल!! सगळा "माहौल" तयार!! हॉटेलमध्ये पाहुणे आले आहेत आणि त्यांच्यासाठी आजची संध्याकाळ अविस्मरणीय करायची, याच उद्देशाने ही रचना बांधली आहे आणि मग त्यासाठी "ला ला ला" असे निरर्थक शब्दोच्चार देखील अर्थपूर्ण ठरतात. ही किमया आशाबाईंच्या अलौकिक गायनाची. स्वरावली कागदावर असते परंतु गायकाच्या गळ्यातून खऱ्याअर्थाने, त्या स्वरावलीला पुनर्जन्म मिळतो आणि मग ती रचना चिरंजीव होते. 
गाण्याची धाटणी ही सरळ,सरळ पाश्चात्य "waltz" धर्तीवर आहे आणि त्याच थाटात, गाण्याचा नृत्याविष्कार आहे. तालासाठी जरी काही ठिकाणी "चायानील ब्लॉक" हे वाद्य वापरले असले तरी गाणे जेंव्हा सुरु होते तिथे संगीतकाराने, ज्या वाद्याच्या  आधारे सगळी कारकीर्द सजवली त्या ढोलक वाद्याचा आणि जोडीने पारंपारिक तालाचा वापर केला आहे. हॉटेल मधील पाश्चात्य धर्तीवर गाणे आणि तरीही तालाला ढोलक!! अर्थात याचे श्रेय पूर्णपणे संगीतकाराकडे जाते. तालाला ढोलक असूनही गाणे कुठेही "विशोभित" होत नाही!! 
गाणे जरी सर्वस्वी मधुबालाचे असले तरी अशोक कुमारचे अस्तित्व देखील खास आहे. तोंडात रुबाबात सिगारेट पेटवून, धूर काढत असताना, ओंठावर जे हास्य विलसत ठेवले आहे, ते बघत गाणे ऐकणे हा सुंदर अनुभव दार्शनिक अनुभव ठरतो. खरेतर या अभिनेत्याच्या प्रत्येक हालचालीत "ग्रेस" आहे, कुठेही "बेंगरूळ" होत नाही. मधुबाला आपल्यावर "फिदा" आहे, याचा अभिमान तसेच ती गाताना शेजारी(च) बसलेल्या के.एन. सिंगला सतत डिवचत असते (हे डिवचणे देखील अतिशय लाघवी आहे!!) त्यामुळे सुखावलेला अहंकार देखील बघण्यासारखा आहे. गाण्यात शेवटाला. मधुबाला त्याला, आपल्याबरोबर नृत्य करायचे आमंत्रण देते, त्यावेळचा आविर्भाव देखण्यालायक आहे. 
"कैसे हो तुम नौजवान, कितने हसीन मेहमान 
कैसे करू मैं बयां, दिल कि नहीं हैं जुबां."
गाण्यातील आशय ध्यानात ठेऊन, चित्रीकरण केले असल्याने गाणे ऐकण्याबरोबर बघायला देखील मनोरंजक आहे. वरील ओळीतील "नौजवान" शब्दावर Camera अशोक कुमारच्या चेहऱ्यावर क्षणमात्र स्थिर ठेवला असून, या ओळीच्या वेळेस, दोघांनाही असेच वाटत असते मधुबाला "आपलीच" आहे!! गाण्याची चाल तशी प्रत्येक टप्प्यात सारखीच आहे म्हणजे पहिला अंतरा वेगळा, दुसरा वेगळा असले प्रयोग नाहीत पण गाणे इतके वेगात पुढे सरकत असते की त्याची जाणीव देखील आपल्याला होत नाही. दोन्ही अंतऱ्याच्या मध्ये Waltz च्या तालावर twist नृत्याची जोड दिली आहे आणि त्याने गाण्यात वेगळीच खुमारी येते. वास्तविक पाश्चात्य नृत्य म्हणजे म्हणजे दोन शरीरांची भेट, इतपत तोकडा अर्थ नसतो तर शारीरिक हालचालीतून किंवा अंगप्रत्ययांतून तालाचे देखणे सौंदर्य दाखविले जाते फक्त ते ओळखण्याची "नजर" हवी!! 
"देखा मचल के जिधर, बिजली गिरा दी उधर 
किस का जला आशियां, बिजली को ये क्या खबर."
चाल तशीच आहे पण सादरीकरण बहारीचे आहे. या ओळींच्या वेळेस, मधुबाला, के.एन.सिंग यांच्या जवळ जाते पण त्यांना हुलकावणी देत, अशोक कुमारकडे वळते. दोन्ही वेलची देहबोली तर खास आहे. छचोरपणा नक्कीच आहे पण उठवळपणा नाही त्यामुळे ते "झुलवणे" देखील आल्हाददायक होते. 
गाण्याच्या सांगीतिक रचनेबद्दल थोडे दोन शब्द. मोहिनी घालणारे, भुलविणारे संगीत:अशारीर प्रेम किंवा रूढीमान्य, शिष्टसंमत प्रेमाविरुद्ध बंड पुकारणारे भाव, परकीय वाटणाऱ्या आणि चमकदार वाद्यध्वनींचा कौशल्यपूर्ण वापर आणि सर्वसाधारणत: मान्य भाषिक आणि उच्चार संकेतांना तिलांजली अशी यादी करावी लागेल. स्पष्ट बोलायचे झाल्यास, या प्रकारच्या गीतांना सूक्ष्म सुरेलपणापासून दूर सरकायचे असते. संबंधित गायक वा वादक यांना सुरावट दाखवता, दाखवता नियंत्रित पद्धतीने बेसूर होता यावे यासाठी चालीत हेतुपूर्वक काही जागा निर्माण केलेल्या असतात. नैतिक कक्षेच्या बाहेर जाण्याच्या आशयास चालीतही जणू काही समांतर बांधणी असते. या सगळ्या आणि इतर अनेक वैशिष्ट्यांसाठी संगीतकार ओ.पी.नैय्यर निश्चित प्रशंसेस पात्र आहेत. 
हिंदी चित्रपट संगीतात, सी. रामचंद्र यांनी जो पाश्चात्य संगीताचा पायंडा पाडला त्या मार्गाला आणखी वेगळे वळण देण्याचे काम या गाण्याने केले आणि या मार्गावर आणखी अनेक विस्तार सुचविण्याच्या शक्यता भरपूर निर्माण केल्या. त्या दृष्टीने, हे गाणे निश्चितच एक "मैलाचा" दगड म्हणून गणले गेले. 

Saturday, 13 February 2016

नाचे मन मोरा मगन

संध्याकाळची वेळ, रंगमंचावर नृत्य गीताचा अपूर्व कार्यक्रमाची आखणी झालेली असते. रंगमंचाच्या आतल्या बाजूला, काहीशा अंधाऱ्या प्रकाशात गायक आणि साजिंदे  तयारीत असतात आणि अचानक रंगमंचावर प्रकाश उजळतो आणि तरुणी आपल्या नृत्याच्या वेषात, कार्यक्रम सुरु होण्याची वाट बघत असते. वेशभुषेवरून आणि एकूणच नृत्यांगनेच्या आविर्भावावरून कथ्थक नृत्याला सुरवात होणार, याची आपली खातरजमा होते. 
सगळा प्रेक्षकगण काहीशा अधिरतेने कार्यक्रम कधी सुरु होणार याची वाट पहात असतात आणि रंगमंचाच्या आतल्या बाजूने, मर्दानी आवाजात भैरवी रागावर आधारित अशी दीर्घ आलापी येते आणि पाठोपाठ, तबल्याचे खणखणीत बोल ऐकायला येतात. तबल्याचे एक सुंदर वर्तुळ पूर्ण होते आणि पाठोपाठ संतूरचे मधुर सूर आणि तबल्याचे बोल, याची अप्रतिम रचना ऐकायला मिळते. रंगमंचावर पार्श्वभागी काहीशा अंधाऱ्या जागेत, नृत्यांगनेच्या अस्तित्वाची सावली, तबल्याच्या बोलांवर आधारित नृत्याचे तुकडे सादर करायचे निर्देश देत असते. 
जसा रंगमंच प्रकाशाने  उजळून निघतो तशी रंगमंचावर खऱ्याअर्थाने नृत्याला सुरवात होते. गाण्याची लय हळूहळू द्रुत लयीत येते, नृत्यांगनेची पावले तबल्याच्या बोलांवर थिरकत असतात आणि गायकाचा आवाज देखील त्याच्या तोडीस तोड ताना, हरकती घेत असतो. सगळेच वातावरण, मद्याच्या ग्लासात केशरी किरण पडून काच उजळून निघावी त्याप्रमाणे रंगमंच उजळलेला असतो. या सगळ्यात एक गंमत असते. ज्या रंगमंचावर गायकाच्या आवाजाची मोहिनी पडलेली असते, तो गायक मात्र आपले अस्तित्व अंधारात लपवून ठेवत असतो. अर्थात, यात रंगमंचावरील नृत्यांगनेला मात्र गायकाच्या अस्तित्वाची जाणीव असते. 
गाण्याच्या शेवटाला, ती नृत्यांगना अचानक आतल्या बाजूचे दिवे लावते आणि सगळ्यांना त्या गायकाचे दर्शन घडते. तो गायक मात्र पूर्ण भांबावून जातो आणि कसेबसे गाणे पूर्ण करतो. आपल्याला दिसतो, तो गायकाच्या विद्रूप, किळसवाणा चेहरा आणि  चकित होतो. हीच सगळी कहाणी आहे, "नाचे मन मोरा मगन तिक-धा-धीगी धीगी" या सुप्रसिद्ध गाण्याची. अभिनेत्री आशा पारेख यांच्या आयुष्यातील सगळ्यात अप्रतिम भूमिका आणि मुख्य म्हणजे या गाण्यात, तिच्यातील नृत्यकौशल्याचा जितका सुरेख वापर करून घेतला आहे, तितका तिच्या पुढील  विरळा किंवा जवळपास अजिबात करून घेतल्याचे आढळत नाही. तोच प्रकार, अशोक कुमार या अत्यंत देखण्या, रुबाबदार अभिनेत्याबाबत म्हणता येईल.
दिग्दर्शक "आर.के. राखन" यांच्या "मेरी सुरत तेरी आंखे" या चित्रपटातील एका अजरामर गाण्याला सुरवात होते. जन्मापासून विद्रूप म्हणून त्याच्या आई-वडिलांनी एका मुसलमानाला देऊन टाकलेला!! त्यामुळे आयुष्यभर मनात, "आपण जगाला नको आहोत" अशा नकारात्मक भावनेने पछाडलेला नायक, दत्तक बापाने दिलेल्या संगीताच्या शिकवणुकीच्या आधाराने, आयुष्यात उभारी घेण्याचा सतत प्रयत्न पण तरीही जगापासून आपले अस्तित्व लपविल्याने, मनात साचलेली खंत!! अशोक कुमार यांनी आयुष्यात बऱ्याच अजरामर भूमिका केल्या पण अशा प्रकारची भूमिका एकमेव!!
या गाण्याची चाल, "साडे नाल" या पंजाबी टप्प्यावर आधारित चाल बांधलेली आहे. संगीतकार एस.डी.बर्मन यांनी, या गाण्याच्या द्वारे, या मूळ चालीचे अक्षरश: सोने केले आहे. खरतर, "टप्पा" हा शास्त्रीय संगीतातील एक अनोखा आविष्कार आहे. सर्वसाधारणपणे "टप्पा" गायन हे मध्य लयीत सुरु होते आणि हळूहळू रचनेची बढत, द्रुत लयीत होते. हे गाणे देखील याच धर्तीवर बांधलेले आहे. अर्थात, गाण्याला नृत्याचे अंग असल्याने, गाण्यात तबला वादनाला अपरिमित महत्व आलेले आहे. पंडित किशन महाराज यांनी, या गाण्यात आपल्या वादनाची असामान्य चुणूक दाखवली आहे.  हे सगळे झाले तरी, या गाण्याचा खरा नायक आहे - गायक मोहमद रफी. आवाजाचा पल्ला, भरीवपणा, समान ताकदीची फेक, मर्दानी जोमदारपणा, अत्यंत सुरेल आणि लहान स्वरांशाचे सफाईदार द्रुतगती गायन या गुणांचा त्यांच्या आवाजात नेहमी आढळ दिसतो. 
गाण्याच्या सुरवातीला जो आलाप आहे, त्यातून गायकाच्या मर्दानी आवाजाची आपल्याला कल्पना येते आणि खरे म्हणजे त्यातूनच गाण्याच्या पुढील रचनेचे सूचन होते. कविता म्हणून या रचनेत काही फार विशेष हाताला लागत नाही परंतु बंदिशप्रचुर  तेंव्हा उपमा, प्रतिमा या अलंकारांना इथे स्थान नाही जाण ठेऊन शैलेंद्र यांनी गीतरचना केली आहे, मुळात, शैलेंद्र यांच्या बह्य्तेक रचना या गीतसदृश असतत. तिथे गुढार्थ किंवा विचारांना फारसे स्थान नसते आणि जो विचार असतो, तो शक्यतो साध्या सोप्या शब्दातून मांडलेला दिसतो.नायकाची मानसिक तडफड आणि त्याचे गायनातून होणारे सादरीकरण, इतपत मर्यादित हेतूने गाण्याची शब्दकळा बांधली आहे पण तरीही, गाण्यात गेयता असणे तसेच चालीचे बंधन पाळून शब्दरचना करणे, यातूनच आराखडा तयार केलेला आहे. 
"नाचे मन मोरा मगन तिक-धा-धीगी धीगी
बदरा घिर आये, रुत है भिगी भिगी
नाचे मन मोरा मगन तिक-धा-धीगी धीगी. 
या ओळींतच तबल्याचे बोल मिसळून, गाण्याचा विस्तार काय धर्तीवर असेल याचे सूचन मिळते. गाणे पहिल्यापासून द्रुत लयीतच चालते आणि त्याला नृत्याची अप्रतिम जोड आहे. काह्रेतर, गायन, तबला आणि नृत्य या त्रयीवर सगळे गाणे आधारलेले आहे. गाण्याच्या सुरवातीला केरवा ताल आहे. आठ मात्रांच्या या तालातील शेवटचे बोल, विशेषत: "धिन, ना" हे बोल डग्ग्यावर घेऊन गाण्यात खुमारी आणली आहे आणि  त्या बोलांची जोड नृत्याच्या पदन्यासाशी जुळवून घेतल्याने, गाणे अधिक रंगतदार होते. आशा पारेख प्रशिक्षित नर्तिका आहे, हे तिच्या हाताच्या किंवा बोटांच्या हालचालीतून नेमकेपणी जाणवते. 
गाणे पहिल्यापासून द्रुत गतीत आणि नृत्याच्या हालचालीने बांधलेले असल्याने, पडद्यावरील सादरीकरण देखील तितकेच विलोभनीय झालेले आहे. आशा पारेख यांची प्रत्येक हालचाल, ही तालाशी निगडीत आहे आणि त्यामुळे अर्थात तबल्याच्या बोलांना विलक्षण उठाव मिळतो. त्यामुळे, ध्रुवपदानंतरचा वाद्यमेळ हा पारंपारिक भारतीय वाद्यांवर आधारित आहे जसे पहिला अंतर सुरु व्हायच्या आधीचा जो स्वरिक वाक्यांश आहे, त्या वाद्यमेळात, प्रथम बासुरी आणि त्याला जोडून सतारीचे सूर घेतले आहेत पण या वाद्यांची "गत" बांधताना, विशेषत: सतारीच्या प्रत्येक सुराशी तबल्याच्या बोलाचे नाते जोडले आहे आणि त्याच्याच आविष्कार नृत्याच्या पदन्यासातून आपल्याला सुरेख अनुभवता येतो. हे जे सगळे "बोल" आहेत, तेच या गाण्याचे वेगळे सौंदर्य म्हणून सांगता येईल. 
कुहु के कोयलिया, कुहु के कोयलिया कही दूर पपीहा बुलाये 
टुटे ना ये सपना, टुटे ना ये सपना, कोई अब मुझे ना जगाये 
घिर आये, बदरा घिर आये, रुत है भिगी भिगी
नाचे मन मोरा मगन तिक-धा-धीगी धीगी. 
वास्तविक, कडव्याच्या चालीत तसे फार फेरफार नाहीत,शक्यतो स्वररचना तशीच ठेवलेली आहे पण गाताना, रफीने ज्या प्रकारे स्वरांची "उठावण" घेतलेली आहे, त्यावरून गायकाच्या अभ्यासाचा अंदाज घेता येतो. इथे घिर आये, बदरा घिर आये, रुत है भिगी भिगी" ही ओळ घेताना लय "दुगणीत" जाते आणि गाणे विलक्षण वेगात सुरु होते. खरेतर हे सगळे रागदारी संगीतात अनुभवता येते परंतु संगीतकाराचे चातुर्य असे की, हे सगळे अलंकार त्याने मोठ्या खुबीने या गाण्यात घेतले आहेत. हे गाणे ऐकताना, तुम्ही क्षणभर देखील उसंत घेऊ शकत नाही!!
यही रुक जाये, यही रुक जाये, ये शाम आज ढलने ना पाए 
टुटे ना ये सपना, टुटे ना ये सपना, कोई अब मुझे ना जगाए 
घिर आये, बदरा घिर आये, रुत है भिगी भिगी
नाचे मन मोरा मगन तिक-धा-धीगी धीगी. 
हे कडवे सुरु होण्याआधीचा वाद्यमेळ आणि आधीच्या कडव्यातील वाद्यमेळ ऐकण्यासारखा आहे. अशा प्रकारच्या  रचनेत,शक्यतो वाद्यमेळ संगीतात फारसे बदल अपेक्षित नसतात कारण तीन मिनिटांच्या गाण्यात तितका अवकाश प्राप्त नसतो. असे असून देखील या गाण्यातील दुसरा अंतरा सुरु होण्याआधीचा वाद्यमेळाची स्वररचना संपूर्ण भिन्न आहे आणि तरीही परत लयीच्या त्याच अंगाने, गाणे समेवर येते. 
छुप छुप ऐसे मे, छुप छुप ऐसे में, कोई मधुए गीत गाए 
गीतो के बहाने, गीतो के बहाने,छुपी बात होटो पे आए 
घिर आये, बदरा घिर आये, रुत है भिगी भिगी
नाचे मन मोरा मगन तिक-धा-धीगी धीगी. 
इथे परत एकदा संगीतकार एस.डी.बर्मन यांनी अशीच एक मजेशीर रचना बांधली आहे.कडव्याच्या चालीत तोच आकृतिबंध कायम ठेऊन, वाद्यमेळाची रचना काहीशी संथ ठेवली आहे पण लय मात्र तशीच वेगवान आहे. थोड्या वेगळ्या उदाहरणाने हे अधिक स्पष्ट व्हावे. उस्ताद विलायत खांसाहेब, नेहमीच गत द्रुत लयीत चालू असताना, तबल्याच्या एखाद्या मात्रेवर स्वररचना मंद्र सप्तकात ठेवतात आणि रागाचे अपूर्व स्वरूप आपल्याला घडवतात. हा प्रकार निरतिशय कठीण आहे आणि या गाण्यात, त्याच प्रकारची स्वररचना, वाद्यमेळातून ऐकायला मिळते. संगीतकार "दिसतो" तो अशा ठिकाणी. 
गाण्याचा शेवट मात्र नक्कीच अविस्मरणीय होणे क्रमप्राप्तच ठरते. गाण्याची कडवी संपतात आणि गाण्याचा ताल बदलतो. रचना त्रितालात सुरु होते आणि गाण्याची लय विलक्षण द्रुत होत जाते. रफीची आलापी देखील दीर्घ आणि वरच्या स्वरात होते. तबला विलक्षण अवघड लयीत सुरु होतो आणि त्याचबरोबर नृत्याची गती देखील. ही तर अप्रतिम जुगलबंदी आहे आणि पण तरीदेखील त्यात विलक्षण लालित्य आहे, लडिवाळ स्वरावली आहे. केवळ मात्रांचा आणि नृत्याचा गणिती हिशेब नसून त्याला सुरेख भावनिक जोड दिलेली आहे. गाणे चित्रपटातील आहे, याची वाजवी जाणीव संगीतकाराकडे असल्याचे हे लक्षण आणि म्हणूनच, गाणे कुठेही क्षणभर देखील रेंगाळत तर नाहीच पण आपली उत्सुकता ताणली जाते. चित्रपट गीताचे आणखी वेगळे कुठले वैशिष्ट्य सांगायचे? 

Attachments 

Saturday, 6 February 2016

कैसे दिन बीते



फार पूर्वी, प्रसिद्ध गझल गायिका बेगम अख्तर यांना एक प्रश्न विचारला होता. "आयुष्यात खरे गाणे कधी गायलात?" या प्रश्नावर त्यांनी बरेच विस्तारपूर्वक उत्तर दिले होते पण त्याचा गोषवारा घ्यायचा झाल्यास, "मी खूप वर्षांनी प्रथमच लखनौ रेडियो स्टेशनवर गायला गेले असता, त्यावेळी खऱ्याअर्थी पोटभर गायले". त्यामागील पार्श्वभूमी अशी होती, लग्नानंतर बेगम साहिबांनी गायन बंद केले होते परंतु आतल्या आत सुरांची तडफड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
याच पार्श्वभूमीवर, "अनुराधा" चित्रपटातील "कैसे दिन बीते, कैसी बीती रतियां" या गाण्याचा विचार करता येईल. चित्रपटातील नायिका, मुळातली प्रतिभाशाली गायिका परंतु लग्नानंतर तिच्या पतीने, तिच्या या छंदाकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याने, स्वत:चे गाणे बंद करून टाकले आणि आतल्या आत झुरत राहिली. नवरा डॉक्टर असल्याने आणि संपूर्ण वेळ हाच व्यवसाय करीत राहिल्याने, पत्नीकडे दुर्लक्ष झाले आणि पत्नीने देखील हे वास्तव निमुटपणे स्वीकारले असल्याने, मनातल्या मनात गायन करणे, इतपतच सगळी संगीत साधना राहिली. 
एके दिवशी, एक पेशंट यांच्या घरी येतो आणि नायिकेला बघून चमकतो. नायिकेच्या गायनाच्या जुन्या आठवणी निघतात आणि त्यातून, गायनाचा आग्रह होतो. मनात कोडून ठेवलेले आणि भळभळत असलेले सूर गळ्यातून येताना वेदनेचा अप्रतिम आकार घेऊन येतात आणि हे गाणे सादर होते. 
अभिनेत्री लीला नायडू यांनी हिंदी चित्रपटात काही फार भूमिका केल्याचे आठवत नाही पण ही भूमिका मात्र केवळ अप्रतिमरीत्या वठवली आहे.वास्तविक, त्यांची भूमिका अतिशय वाखाणलेली गेली होती पण तरीही त्यांचा, हिंदी चित्रपट सृष्टीत जम बसला नाही, हे निखळ सत्य. बलराज सहानींचा तर प्रश्नच नाही. या माणसाने, आजमितीस "वाईट" अभिनय केला आहे, असे निदान माझ्या तरी पाहण्यात नाही. यालाच जोडून, आणखी म्हणता येईल, या चित्रपटाचे संगीतकार प्रसिद्ध सतारवादक पंडित रविशंकर आहेत आणि त्यांनी देखील, ४,५ हिंदी चित्रपट वगळता, आणखी काही चित्रपटांना संगीत दिल्याचे आठवत नाही. 
हे गाणे मी जेंव्हा ऐकतो तेंव्हा प्रत्येकवेळी माझ्या मनात कवी ग्रेस यांच्या "पाउस" कवितेची आठवण येते. 
"पाउस कधीचा पडतो, वाऱ्याने हलती पाने:
हलकेच जाग मज आली, दु:खाच्या मंद सुरांने". 
हे गाणे असेच आहे. मनाला झालेली जखम एखाद्या संतत चिघळत असलेल्या वेदनेप्रमाणे झुळझुळत असते. या वेदनेला "आक्रोश" नसतो तर केवळ चिरदाह सहन करावा लागतो. चित्रपटातील नायिकेची मनोवस्था नेमकी अशीच आहे आणि तो भाव नेमकेपणाने जाणून घेऊन, या गाण्याची रचना केली आहे. 
गाण्याचे चित्रीकरण देखील तसेच आहे. घरातली घरगुती बाई जसे सहज, उस्फुर्त पण तरीही गायकी ढंगाचे गाणे गाईल, तसेच केले आहे. सगळे चित्रीकरण एका खोलीत केले आहे पण तसे करताना, प्रत्येक व्यक्तीरेखेचा "स्वभाव" नेमकेपणाने टिपलेला आहे.पंडित रविशंकर यांनी "माज खमाज" या काहीशा अनवट रागावर आधारित तर्ज बांधली आहे. गाण्याच्या सुरवातीलाच लताबाईंनी "हाये" शब्द जसा उच्चारला आहे, त्या स्वराला दुसरी तोड नाही. मी, वरती ग्रेस यांच्या कवितेच्या काही ओळी उधृत केल्या आहेत, त्यातील "दु:खाच्या मंद सुरांने" या शब्दांतील जाणीव नेमकी "हाये" शब्दाच्या सुरांत एकवटली आहे. मनातली सगळी वेदना त्या शब्दात, लताबाईंनी आणली आहे.चित्रपट गायकीची ही असामान्य करामत आहे.
पुढे लगेच गाण्याला सुरवात होते. "कैसे दिन बीते, कैसी बीती रतियां, पिया जाने ना" या ओळीतील "पिया" शब्द देखील किती सुरेख घेतला आहे. "दिन बीत गये, रांते भी उड गयी लेकिन "पिया" को कोई पता नाही" ही विखारी आणि व्याकूळ करणारी जाणीव "पिया" या शब्दात सामावली गेली आहे. कवितेतील कुठल्या शब्दाला किती महत्व द्यायचे, हे संगीतकाराचे काम आणि त्याचबरोबर त्या शब्दातून, कवितेचा आशय कसा वृद्धिंगत करायचा, हे गायकाचे काम. गाताना शब्दावर किती "आघात" द्यायचा जेणेकरून भावनांचे प्रकटीकरण रसिकांसमोर सादर होईल. पहिल्यांदा घेतलेला "हाये" आणि इथला "पिया" हे शब्दातून या गाण्याची संस्कृती आपल्या ध्यानात येते आणि गाणे कुठली वळणे घेऊन, विस्तार करणार आहे, याचा अदमास घेता येतो. गाण्याची अचूक बांधणी ही अशाच स्वररचनांमधून सिद्ध होत असते.   
गाण्यावर बंगाली ठसा जाड आहे पण बंगाली भाषेतील "गोलाई" येत नसून स्वरांना टोक येते. गाणे चालू असताना, नायिकेच्या चेहऱ्यावरील निराशा आणि नायकाची दुर्लक्षित वृत्ती देखील बघण्यासारखी आहे. 
"नेहा लगा के मैं पछताई 
सारी सारी रैना निंदिया ना आयी 
जान के देखो, मेरे जी की बतियां 
पिया जाने ना"
इथे रचना किंचित द्रुत लयीत जाते पण इतकीही नव्हे की रचनेचा तोल बिघडेल. "जान के देखो, मेरे जी की बतियां" या ओळीचे, रचनेच्या दृष्टीने दोन खंड पाडले आहेत."जान के देखो" ही ओळ पहिल्या ओळींच्या लयीतच घेतली आहे पण लगेच "मेरे जी की बतियां" इथे "उतरी" स्वर घेऊन, मूळ स्वररचनेला जोड दिली आहे. असामान्य स्वरिक कलाकुसर आहे. लय सगळी बदलते पण आशयाला कुठेही धक्का पोहोचत नाही. या ओळी पडद्यावर सादर होत असताना, नायकाचे वाचनात गर्क होणे आणि घरी आलेल्या पाहुण्याला त्याचे वैषम्य वाटणे, सगळे कसे गाण्यातील भावना भरीव करणारे आहे. 
पुढील ओळी सादर होताना, एक सुंदर दिग्दर्शकीय नमुना दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जींनी पेश केला आहे. गाण्यातील वाद्यमेळाचे सूर चालू असताना, घरातील पाहुण्याचे लक्ष घरातील एका तसबिरीकडे जाते. तिथे नायिकेचा जुना फोटो आहे आणि त्याच बाजूला आताची नायिका गात आहे, असे त्याला भासायला लागते. क्षणभराची अनुभूती आहे पण यथार्थ आहे. 
कडव्यांची बांधणी तशी समान आहे म्हणजे पहिल्या कडव्याची चाल आणि दुसरे कडवे, यात सत्कृत्दर्शनी काहीही फरक नाही आणि त्याच, पूर्वीच्या तालात आणि लयीत गाणे पुढे सरकते.      
"रुत मतवाली आके चली जाए 
मन में ही मेरे मन की रही जाए 
खिलने को तरसे, नन्ही नन्ही कलियां 
पिया जाने ना" 
इथे देखील शब्दांची वाजवी जाणीव ठेवलेली आहे. "आके चली जाए" मधील "जाए" शब्दातून, कवी शैलेंद्र यांनी जी निराशा व्यक्त केली आहे त्याचे निराशेशी गाण्याची चाल तद्रूप होते. "जाए" मधील "जा" अक्षरानंतर किंचित स्वरांत हेलकावा दिला आहे आणि कसे सगळे विरून गेले, याचीच जाणीव करून दिली आहे. सगळे गाणे हे अत्यंत हताश आणि काहीतरी जवळचे पण महत्वाचे संपून गेल्याची आठवण करून देणारे आहे." खिलने को तरसे, नन्ही नन्ही कलियां" या ओळीतून आपल्याला हेच वाचायला मिळते. आयुष्यातील अतिशय छोटे आनंद देखील कसे करपून जातात आणि तरीही आयुष्य तसेच पुढे चालत असते!! 
हे कडवे संपत असताना, नायक गाण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून, खोलीचा दरवाजा उघडून आतल्या खोलीत जायला निघतो. पडद्यावर नायकाची पात दिसते आणि ती पाठ बघून, नायिकेची विषण्णता अधिक गहिरी होते, हा अभिनय बघणे, खरोखरच मनोज्ञ आहे. आपल्या नवऱ्याने, इतकी वर्षे जे केले तेच आता देखील, गाणे चालू असताना केले, हे बघून, मनातली काजळी चेहऱ्यावर उमटली आहे. गाण्यातील वाद्यमेळ देखील त्याच वृत्तीचा आपल्यावर गडद परिणाम होईल, असाच योजलेला आहे.  
"कजरा ना सोहे, गजरा ना सोहे 
बरखा ना भाए, बदरा ना सोहे 
क्या कहू जो पुछे, मोसे मेरी सखियां 
पिया जाने ना"
कवी शैलेंद्र यांनी देखील ही भावना मांडताना, "सोहे" सारखे लोकसंगीतातील शब्द घेतले आहेत तसेच त्याचबरोबर वेदना अधिक मुखरित करण्यासाठी, "कजरा","बरखा" सारख्या शब्दांचा उपमेप्रमाणे उपयोग करून, आशय अधिक अंतर्मुख केला आहे. नवऱ्याने पाठ फिरवली असल्याने, असलेली जाणीव अधिक खोल झाल्याची भावना, या कडव्याची सुरवात करताना किंचित वरच्या सुरांनी व्यक्त केली आहे आणि हे देखील एकूण गाण्याच्या भावनेशी अत्यंत सुसंगत आहे. "बरखा" येउन देखील आपल्या मनावर त्याचा काहीही परिणाम होऊ शकला नाही आणि आयुष्य उजाड झाले. 
गाण्याचा शेवट पूर्णपणे वाद्यमेळ थांबवून, केवळ लताबाईंच्याच सुरात करणे, हे एका दृष्टीने अपरिहार्य होते, एकटेपणाची जळजळीत जाणीव परत आपल्या मनातच दाबून ठेवायची ही खूण!!  एका दृष्टीने एका असामान्य कुवतीच्या कलाकाराची मानसिक परवड कशी होते, याचे अप्रतिम चित्रण केवळ चित्रिकरणातून नसून, सुरांच्या सहाय्याने गाण्यातून कसे व्यक्त करायचे, याचा हे गाणे गाणे म्हणजे समृद्ध अनुभव आहे.  

Saturday, 30 January 2016

शाम-ए-गम की कसम

गाय जशी हंबरते,
तसेंच व्याकूळ व्हावे 
बुडतां बुडतां सांजप्रवाही;
अलगद भरुनी यावे."
कवी ग्रेसच्या या ओळी म्हणजे करुणेचे महिम्न स्तोत्र म्हणावे इतकी हळुवार, तरल अभिव्यक्ती आहे. तसे शब्द सहज समजण्यासारखे आहेत पण, त्यातील आशय अतिशय संपृक्त, भरीव आणि घाटदार असल्याने, या ओळी मनाला लगेच भिडतात. अशाच करुणप्रवाही ओळी बरेचवेळा चित्रपट गीतांत वाचायला मिळतात. 
"फुटपाथ" चित्रपटात असेच एक असामान्य गाणे आहे - शाम-ए-गम की कसम. तलत मेहमूदनी गायलेले आणि खैय्याम यांनी तर्ज बांधली आहे. या गाण्याची गंमत म्हणजे, हे गाणे, मुळात चित्रपटासाठी लिहिले गेलेच नव्हते. मजरुह सुलतानपुरी आणि अली सरदार जाफरी, या दोन प्रतिभाशाली कवींच्या कवितेतून निवडक भाग निवडून, गाण्याची शब्दकळा निर्माण केली गेली. असे निदान चित्रपट क्षेत्रात फारच तुरळक किंवा जवळपास नाहीच घडले. 
चित्रपटात दिलीप कुमार आणि मीना कुमारी, यांच्या भूमिका आहेत. तसे बघितले तर चित्रपट म्हणून खास वेगळ्या वळणाचा चित्रपट नाही परंतु समर्थ अभिनेते अशा चित्रपटात देखील, अभिनयाची कमाल मर्यादा गाठतात. वास्तविक बघता, हे दोघे अभिनेते संयत अभिनयासाठी प्रसिद्ध होते आणि त्याचेच यथार्थ दर्शन या चित्रपटात घडते. संध्याकाळची वेळ, प्रेयसी वियोग पाचवीला पुजलेला आणि अशा संत्रस्थ मनोवस्थेत, एका विकल अंधाऱ्या सांजसमयी, स्वत:शी हितगुज केल्यासारखे हे गाणे आहे. 
खैय्यामच्या चालीत याच भावनेचा परिपोष आढळतो. शब्द आणि सुरांमधील वेदना, दिलीप कुमार अतिशय अप्रतिमरीत्या डोळ्यांतून आपल्यासमोर मांडतो. अक्षरश: दिलीप कुमारच्या डोळ्यांत, शब्दातील वेदना वाचता येते. शास्त्रीय संगीताचा पायाभूत अभ्यास असल्याने, खैय्याम यांच्या रचनेत, नेहमी कुठेतरी शास्त्रोक्त गायकीचा अंतर्भाव नेहमी असतो आणि त्यामुळे रचना बरेचवेळा "गायकी" ढंगाची होते, किंबहुना गायक/गायिकेची परीक्षा घेतली जाते. 
गाणे सुरु होण्याआधीचा वाद्यमेळ खास ऐकण्यासारखा आहे. मंद्र सप्तकात व्हायोलीन आणि त्याच्या पार्श्वभागी पियानोचे सूर आहेत आणि त्यालाच "Spanish गिटार" या वाद्याची जोड दिली आहे. थोडे बारकाईने ऐकले तर समजेल, गाण्यात कुठेच तालवाद्य नसून, केवळ "Spanish गिटार" चे सूर, हेच तालवाद्य आहे. परिणामस्वरूप गाण्याचा मनावर होणारा अत्यंत गहिरा परिणाम. या वाद्यमेळाचे सूर काहीसे संथ होत असताना, आपल्याला तलत मेहमूद यांचा आवाज ऐकायला मिळतो - "शाम-ए-गम की कसम, आज गमगी है हम". इथे पडद्यावर, मेणबत्ती पेटलेली दिसते आणि त्यात देखील, ज्योतीचा भाग अधिक ठळक दिसतो. गाण्याचे शब्द आणि आणि ही जळती मेणबत्ती!! ज्यांना उर्दू संस्कृतीची थोडेफार माहिती असेल त्यांना, "गम" आणि "ज्योत" याचा अन्योन्न संबंध कळून घेता येईल!! खरेतर सुरवातीचे वाद्याचे सूर, बहुतेक सगळ्या रचनेची ओळख करून देतात, म्हणजे गाण्याची लय, गायन पद्धती इत्यादी. 
तलत मेहमूद यांची गायकी ही तशी सुस्पष्ट पण अत्यंत सुरेल, शब्दांना कुठेही न दुखावता गाणारी तसेच भावनांचा योग्य तो परिपोष करणारी. मुळात उर्दू भाषा ही अति नजाकतदार असल्याने, गायन देखील त्याचा अंगाने होणे गरजेचे असते. त्यांच्या गायकीवर "लखनवी" संस्कृतीचा दाट प्रभाव दिसून येतो आणि त्याच अंगाने, त्यांचे शब्दोच्चार होतात. शब्दांची अनुभूती देणारी गायकी. याच गाण्यात याचा अनुभव घेत येतो. पहिला अंतरा गाताना, एका ओळीत "मार डाले ना दर्द-ए-जुदाई कही" असे शब्द आहेत. यात "डाले" मधील "ड" हे अक्षर खरे आघाती अक्षर आहे, उर्दू भाषेत याचीच खरी गंमत बघता  येते. "ड","घ","ख" ही अक्षरे नेहमी आघाताने घेतली जातात पण गाताना, त्यातील "आघाताचा" स्पर्श वगळून, या अक्षरांचा उच्चार करणे, ही खासियत असते आणि ती प्रत्येक गायकाला नेमकेपणी जमते(च) असे नाही. 
मुळात तलत मेहमूद यांचा मुलायम, रेशमी स्वर आणि त्यात साथीला उर्दू भाषा!! त्यामुळे गाणे ऐकताना, आपल्या भाषेचा देखील समृद्ध अनुभव घेता येतो. भारतीय संगीतात, गझल गायनात बेगम अख्तर यांनी जो आदर्श निर्माण केला त्याच्या जवळपास, केवळ तलत मेहमूद पोहोचतात - फरक इतकाच, गझलला गीताचे स्वरूप देऊन आणि याची नेमकी प्रचीती या गायनातून आपल्याला मिळते. 
या गीतांत अनेक विस्तारशक्यता आपल्याला आढळतात परंतु चित्रपट गीत आणि त्यातही विरही गीत, याची जाण ठेऊन या गीताला भावगीताचे स्वरूप, संगीतकार खैय्याम यांनी प्रदान केले आहे. " दिल परेशान है रात विरान है, देख जा किस तरह आज तनहा है हम" या ओळीचे गायन  ऐकताना, शब्दातील व्याकुळता आपल्याला लगेच जाणवते.  गाण्याच्या आस्वादाच्या दृष्टीने बघायला गेल्यास, रचनेत कुठेही शब्दांची ओढाताण नाही, पेळूतून सलग सुत निघावे त्याप्रमाणे, सुरांतून शब्द घोळवून आपल्याला ऐकायला मिळतात. या ओळीतील, "तनहा" हा शब्द देखील किती आर्ततेने उच्चारला गेला आहे. आशयाची अभिव्यक्ती सुरांतून अशीच व्हायला हवी, अशीच अपरिहार्यता या गायनातून जाणवते आणि गाणे तिथेच सिद्ध होते. 
गाण्याचा हाच "स्वभाव"  कायम ठेऊन, पुढील वाद्यमेळाची बांधणी केली आहे. वाद्यमेळ त्याच वाद्यांनी सजलेला आहे आणि त्याच सुरांनी सजावट खुलावलेली आहे. वेगळ्या शब्दात लिहायचे झाल्यास, गाण्याच्या सुरवातीचा वाद्यमेळ आणि पहिला अंतरा सुरु होण्याआधीची सुरावट ऐकताना, आधीच्याच सुरांचा विस्तार आहे. लय तशीच कायम ठेऊन, त्याच अंगाने सुरांचा विस्तार केला आहे. त्यामुळे, चालीचा परिणाम आपल्या मनावर अतिशय गडद होतो. अखेर विचार केला तर, गाण्याचा अंतिम परिणाम परिपूर्ण होणे, यातच सर्जनशीलतेची बीजे आढळतात. 
चांगली शब्दकळा आणि ती देखील, स्वररचना करण्यासाठी योग्य अशी रचना असणे, ही चित्रपट गीतांची प्राथमिक अट असते. योग्य जागी, शब्द संपणे तसेच चालीच्या सुरावटीशी संलग्न राहणे, हे गुण अवश्यमेव मानावेच लागतात. इथे केवळ उस्फूर्तता अजिबात उपयोगाची नसते आणि त्या बाजूने बघायला गेलो तर, पहिला अंतरा खास आहे. 
"रुत हंसी है तो क्या, चांदनी है तो क्या 
चांदनी जुल्म है, और जुदाई सितम" 
या ओळी बघा. आजूबाजूला वातावरण प्रणयासाठी सुयोग्य आहे पण स्वत: नायकाची मन:स्थिती मात्र विमनस्क झालेली आहे. त्यादृष्टीने "रुत" आणि "चांदनी" सारखी प्रतीके योजून त्याच शब्दांचा उलट्या बाजूने उपयोग करून, आशय अधिक वृद्धिंगत केला आहे आणि हे करताना, चालीच्या "मीटर" मध्ये शब्द अतिशय चपखलपणे बसले आहेत. शब्दांच्यात गेयता तर हवीच पण त्याबरोबर आशयाकडे देखील टोकदारपणा आणणे जरुरीचे असते. त्याचबरोबर, गायनात देखील तीच तरलता तलत मेहमूद यांनी आणली आहे. 
संगीतकार म्हणून खैय्याम यांचा विचार करताना, या गाण्यातून, त्यांची काही खास वैशिष्ट्ये दिसून येतात. वाद्यांचा गदारोळ नसणे, तसे करताना संगीत आणि शब्द दोन्ही आपल्या मनात झिरपत जातात आणि त्याचबरोबर शांत भाव देखील. तसेच गाणे तयार करताना, शब्दांबद्दल आदरभाव राखणे आणि रचना करताना शक्यतो शब्दांची ओढाताण होणार नाही, याकडे जाणीवपूर्वक नजर ठेवणे. हाच मुद्दा आपल्याला, शेवटच्या अंतरा ऐकताना मांडता येईल. 
"अब तो आजा के अब रात भी खो गयी 
जिन्दगी गम के सेहराओ में खो गयी 
धुंढती है नजर, तू कहां है मगर 
देखते देखते आया आंखो में गम"
या ओळीच्या चालीत फारसा फरक नाही पण, ओळींतील आशय बघताना, शब्द कुठेही तोडले नाहीत, किंबहुना सुरांच्या सहाय्याने अर्थ अधिक गहिरा केला आहे. "देखते देखते आया आंखो में गम" या ओळीतील "आंखो में गम" सारख्या अप्रतिम प्रतीकाचा अर्थ किती सुंदररीतीने मांडला आहे, हे खरेच वाखाणण्यासारखे आहे. "नजर" आणि "आंखो में गम" याची नेमकी जोड लावण्याची शायराची कमाल आणि खैय्यामने हाच विचार सुरांत गुंफताना टिपलेला आहे. खरतर गाणे इथे संपते पण तरीही आपल्या मनात उरते ते अविस्मरणीय सुरांचे चित्र आणि त्याला मिळालेली, दिलीप कुमारच्या असामान्य भावदर्शनाची जोड. चित्रपटातील गाणे अजोड ठरण्यासाठी आणखी काय वेगळे लागते. 


Sunday, 24 January 2016

पुछो ना कैसे मैने रैन बितायी

"आहे गुणगुण,
      आहे मिणमिण,
खंगतात रंग अस्ताचलांतून;
केवळ धुसर शुन्य नादहीन. 
किटतात पर्णे,
      जिणे जीवघेणे,
जगती मुक्याने फांद्याफांद्यांतून,
काळोखी कवेंत हालतात म्लान."
आरती प्रभूंच्या या ओळींतून, मानवी दु:खाचे अत्यंत गडद रंग अम्लानपणे उमटतात. सगळीकडे केवळ काळोखी, राखाडी रंग पसरला असून, कुठेच आशेचा किरण दिसत नाही पण तरीही आपले आयुष्य आपल्याला अटळपणे भोगावे लागणारच असते. तिथे आपल्या हाती कुठलाच पर्याय शिल्लक नसतो.  केवळ श्वास आहे म्हणून आयुष्य आहे.  
चित्रपट गीतांत अशाच प्रकारच्या भावनेवर असंख्य गाणी निर्माण झाली आहेत. अर्थात, चित्रपट गीतांत, कविता म्हणून विचार करता, इतकी तरल भावना अपवाद परिस्थितीत वाचायला मिळते आणि याचे मुख्य कारण, चित्रपट गीत ही प्रामुख्याने सामान्य रसिकांसाठी लिहिलेले असते आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे शब्दांना दृश्यरूप देणे, ही या माध्यमाची प्राथमिक गरज असते. मानवी भावनांच्या अति तरल छटा पडद्यावर तितक्याच समर्थपणे दाखवणे तसे फार अवघड असते. त्यामुळे, गीत लिहिताना, दृष्यभान ठेवणे आवश्यक असते.
"मेरी सुरत तेरी आंखे" या चित्रपटातील " पूछो ना कैसे मैने रैन बितायी" या गाण्यात, मी वर मांडलेल्या आरतीप्रभूंच्या ओळींचे काहीसे अर्धुकलेले दर्शन वाचायला मिळते. चित्रपटातील गाणे हे नेहमीच चटपटीत तरीही आशयपूर्ण असावे लागते. कवी शैलेंद्र यांनी हे गाणे लिहिताना असा विचार केलेला आढळतो. खरतर शैलेंद्र यांच्या कविता बहुश: अत्यंत साध्या, सोप्या शब्दांत लिहिलेल्या असतात परंतु तशाच शब्दांतून अर्थवाही भावना मांडण्यात, हा कवी बरेचवेळा यशस्वी झालेला दिसतो.आता हे गाणे, केवळ काव्य म्हणून वाचायला घेतले तर,  
"पूछो ना कैसे मैने रैन बितायी
इक पल जैसे, इक युग बिता 
युग बीते मोहे नींद ना आई!!"
या ओळींतूनच आपल्याला, पडद्यावरील पात्राची भावस्थिती समजून घेता येते आणि हेच तर, चित्रपट गीतांत महत्वाचे असते. अत्यंत थोड्या शब्दात, प्रसंगाची जाण व्यक्त होणे महत्वाचे.या चित्रपटात, अशोक कुमारची भूमिका सर्वस्वी वेगळी आहे. प्रतिभाशाली गायक परंतु लहानपणीच कुरूप चेहऱ्याचा म्हणून "टाकून" दिलेला. उपेक्षेचे जिणे जगावे लागल्याने, केवळ खंतावलेले मन नसून मनात एकूणच प्रचंड न्यूनगंड तयार झालेला. त्यामुळे प्रसिद्धीपेक्षा सिद्धीकडे अधिक लक्ष. आयुष्य अंधारी जगात काढण्याची मनीषा आणि तसेच जगायला सुरवात केलेली. अर्थात, कधीतरी मनात दाबून ठेवलेल्या इच्छा उफाळून वर येणे क्रमप्राप्तच आणि याच जाणीवेतून, त्या गायकाच्या मनात ही "विराणी" तयार होते. आता सकाळ उजाडली आहे पण मनातील अंध:कार तसाच साचलेला आहे. त्यातून उद्भवलेली निराशा, हाच या रचनेचा पाया आहे. त्यामुळे गाण्याचे चित्रीकरण हे अंधारी जगात होणे साहजिक.सकाळची वेळ असून देखील, गाण्याची चाल काहीशी दुर्मुखलेली आहे, यामागचे हे महत्वाचे कारण.   
इथे आणखी एक विशेष सांगता येईल. चित्रपटाचा नायक - अशोक कुमार. अत्यंत देखणा,राजबिंडा आणि रुबाबदार अभिनेता. अतिशय संवेदनशील कलाकार म्हणून विख्यात. आता, या चित्रपटातील भूमिका बघितली  तर,संपूर्ण वेगळ्या ढंगाची आहे. विद्रूप चेहरा जन्मत:  लाभल्याने,प्रसिद्धीपासून सतत दूर राहण्याची असोशी. सतत अंधारात वावरण्याची  जडवून घेतली आहे. हे गाणे देखील, अशाच अंधाऱ्या वेळेस  सुरु होते. वास्तविक, गाणे गायकी वळणाचे आहे. बहुतेकवेळा, शास्त्रीय अंगाचे गाणे अभिनित करायची वेळ आली म्हणजे अभिनेता  आक्रस्ताळी अभिनयाकडे वळतात पण इथे आपण बघितले तर, आपल्याला दिसतो तो अशोक कुमार यांचा अतिशय संयत वेदनेचा अविर्भाव. गाणे अवघड चालीचे आहे पण कुठेही अभिनित करताना, अभिनय गाण्याच्या चालीशी जराही विसंगत ठरणार नाही याची योग्य ती काळजी घेणारा. 
आता गाण्याकडे वळायचे झाल्यास, संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या कारकिर्दीतील काही खऱ्या अर्थी अजरामर रचना घेतल्या, तर त्यात या गाण्याचा अंतर्भाव अवश्य करावाच लागेल. "अहिर भैरव" रागाचे स्वर आधाराला घेतले आहेत. वास्तविक, अहिर भैरव हा सकाळचा राग मानला जातो आणि सकाळचे राग, प्रामुख्याने आनंदी, काहीसे अंतर्मुख अशा प्रकारचे असतात पण हीच तर भारतीय संगीताची खासियत आहे. एकाच रागातून अनंत छटा निर्माण करण्याची असामान्य क्षमता रागसंगीतात नेहमीच दडलेली आढळते. 
कवितेतील करुण, आर्त भाव, संगीतकाराने तितक्याच समर्थपणे रचनेतून प्रतीत केला आहे आणि गायक मन्ना डे यांच्या गायकीतून तितक्याच अप्रतिमरीत्या ऐकायला मिळतो. सुरवातीचे सारंगीचे सूर आपल्या समोर गाण्याची पार्श्वभूमी तयार करतात. गाण्याचा "मुखडा" किती सुंदर आहे. सारंगीचे सूर कानात तरळत असताना, आपल्याला मन्ना डेच्या आवाजात आलापीचे सूर ऐकायला मिळतात मुळात, या गायकाचा आवाज म्हणजे ज्याला "अस्सल" गायकी म्हणता येईल असा आहे आणि इथे तर "गायकी" ढंगाची चाल मिळाल्यावर, त्याच आवाजातील घुमारेदार मार्दव अधिकच खुलून येते. या आलापीमधूनच आपल्याला "अहिर भैरव" रागाची ओळख पटते.  
चित्रपट गीतांत, गायकी कशी दाखवता येते हे या गाण्यातून बघता येते."युग बीते मोहे नींद ना आई" ही ओळ गाताना, "बीते" या शब्दावर किंचित "कंप" घेतला आहे आणि तो देखील किती सूक्ष्म आहे!! नीट ऐकला तरच ध्यानात येतो. इथे गाण्याच्या सगळ्या ओळी लक्षात घ्यायला घेणे जरुरीचे आहे. "युग बीते" मध्ये जी विषण्णतेची छटा आहे, त्याला असला "कंप" आवश्यकच आहे, जेणेकरून शब्दातील आशय अधिक भावगर्भ व्हावा. चित्रपट गीतांत गायकी ही अशाच अलंकाराने दिसते आणि सजलेली असते. पुढे "मोहे नींद ना आई" म्हणताना आवाज अधिक हळुवार आणि खालच्या पट्टीत आणला आहे आणि यामागे त्या शब्दातील औचित्य, सुरांच्या सहाय्याने खुलवले आहे, हाच विचार दिसतो. गाणे गाताना, गाण्यातील शब्द आणि त्यातील आशय समजून घेऊन, त्या शब्दांना, तशाच सुरांची जेंव्हा "अपरिहार्यता" मिळते, तिथे ते गाणे नेमक्या अर्थाने जमून जाते आणि ही अपरिहार्यता कशी तर तिथे दुसरा कुठलाच सूर प्रवेश करू शकत नाही. तिथे तोच सूर आणि त्याच "वजनाने" यायला हवा. 
पहिला अंतरा सुरु होण्याआधीचा जो वाद्यमेळ आहे, त्यात सारंगीचे सूर प्रामुख्याने ऐकायला येतात आणि गाण्याच्या आधी जी सारंगीची सुरावट आहे, त्याचाच अधिक खोल विस्तार, या इथे ऐकायला मिळतो आणि याचा परिणाम, रचना अधिक बांधीव होते. गाण्याची चाल इतकी आर्त आहे की तिथे आणखी कुठल्याच वाद्याची गरज भासत नाही. मुळात, सारंगी हे वाद्यच पटकन मनाची तार छेडणारे वाद्य आणि इथे तर फक्त त्याच वाद्याचा वावर!!  
"इक जले दीपक, इक मन मेरा 
फिर भी ना जाये मेरा घर का अंधेरा 
तरपत, तरसत उमर गवायी 
पूछो ना कैसे मैने रैन बितायी"
या ओळी गाताना, गायकाने एके ठिकाणी अतिशय सुंदर हरकत घेतली आहे."इक जले दीपक, इक मन मेरा" ही ओळ वारंवार घेतली आहे पण प्रत्येक वेळेस सुरांचे वळण वेगळे आहे, प्रत्ययकारी आहे. "मेरा" शब्द घेताना, इथे स्वर तर थोडा उंचावला आहेच पण तो इतका देखील वरच्या सुरांत नाही की तिथे "गायकी" प्रस्थापित होईल. शब्दांतील हताषता सुरांतून कशी मांडायची, याचा हा सुंदर वस्तुपाठ आहे. कुठेही विशविशीतपणा नाही तर प्रत्येक सूर हा, प्रत्येकवेळी रचनेच्या पहिल्या सुराशी नाते जडवून घेतो. असे असून देखील, रचना म्हणजे रागाचे "लक्षण गीत" नाही, हे देखील समजून घेता येते. "उमर गवायी" म्हणताना ज्या सुरांत गायले गेले आहे ते ऐकताना, मला नेमके काय म्हणायचे आहे, याचा अंदाज घेता येईल. अर्थात, इथे संगीतकार सचिन देव बर्मन यांचे श्रेय देखील तितकेच महत्वाचे. ही "शब्दप्रधान गायकी" आहे पण "कविता वाचन" नव्हे!!
"फिर भी ना जाये मेरा घर का अंधेरा" ही ओळ म्हणताना, सुरवात मंद्र सप्तकातील सुरांत होते पण लगेच "मेरा घर का अंधेरा" हे शब्द घेताना सूर किंचित उंचावला गेला आहे, विशेषत: "का" अक्षर घेताना स्वरांतून जी व्याकुळता प्रदर्शित होते, ती खास गायकाच्या गायनाची खूण!! "अंधेरा" अधिक गडद होतो. मजेचा भाग असा आहे, हा अंतरा वेगळ्या सुरांवर सुरु होतो आणि तिथे मूळ रागाच्या सुरांपासून फारकत आहे पण, अंतरा संपत असताना, आपण परत मुखड्याच्या सुरांपाशी येउन थांबतो. हे सगळे केवळ अनिर्वचनीय आहे. 
संगीतकार सचिन देव बर्मन यांनी, रचना बांधताना सरळसोट "केरवा" ताल वापरला आहे पण तोच ताल संपूर्ण रचनेत तसाच कायम ठेवला आहे. किंबहुना अतिशय धीम्या लयीत तालाचे बोल चालत आहेत. धीम्या वजनाचा केरवा ताल रचनेत फिरत आहे. 
दुसरा अंतरा सुरु होण्याआधी, परत सारंगीची तशीच "गत" कायम ठेवली आहे आणि त्याच सुरांवर दुसरा अंतरा सुरु होतो. 
"ना कही चंदा, ना कही तारे 
ज्योत के प्यासे मेरे नैन बेचारे 
भोर भी आस कि किरन ना लायी 
पूछो ना कैसे मैने रैन बितायी"
हा अंतरा पहिल्या अंतरयाशी नाते राखून गायला गेला आहे. किंबहुना, स्वरांतील छोटे,छोटे खटके देखील त्याचप्रमाणात घेतले आहे. खरतर बरेच संगीतकार इथे प्रयोगशीलता दाखवतात पण इथे संगीतकाराने, स्वरांचा तोच "आराखडा" कायम ठेवून, आधी जो परिणाम साधलेला आहे, तोच परिणाम अधिक गडद, खोलवर केलेला आहे.वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, संगीतकाराला, आपण जी तर्ज निर्माण केली आहे, त्याच्यावर प्रचंड आत्मविश्वास असल्याचे द्योतक आहे आणि जर का आपण, हाच दृष्टीकोन लक्षात घेतला तर तो विश्वास अनाठायी नाही, याचाच प्रत्यय घेता येतो.
कवी शैलेंद्रने लिहिताना, "भोर भी आस कि किरन ना लायी" या शब्दात जी निराशता मांडली आहे, त्याचेच फलस्वरूप स्वरांतून ऐकायला मिळते आणि मग त्या गाण्याला चिरंजीवित्व मिळते, यात नवल ते कसले!!   

Attachments 

Wednesday, 20 January 2016

अल्ला तेरो नाम



हिंदी चित्रपट संगीतात, धार्मिक गीतांची फार जुनी परंपरा आहे. तसे बघितले तर आपल्या संस्कृतीमध्ये, प्रार्थना गीत, ईश्वराची आळवणी किंवा भगवंतासमोर लीन होऊन शरणभाव दर्शविणारी गाणी, यांची रेलचेल आढळते. त्याचे प्रतिबिंब, सिनेमासारख्या लोकाभिमुख कलेत पडणे अनिवार्य ठरते. धार्मिक गीतांची सुरवात, घरापासून किंवा धार्मिक स्थळांपासून चालत आलेली आहे. 
खरतर भारतीय संस्कृतीचे एक वैशिष्ट्य म्हणून ज्या सहा संगीतकोटी अस्तित्वात आहेत, त्यात, "आदिम","लोक","धर्म","कला","संगम" आणि "जनसंगीत", अशा आहेत. भक्तीसंगीताचा विचार वेगळा व्हावा कारण, भक्तीसंगीताची तपासणी एका अधिक व्यापक अभ्यासाचा भाग ठरते. "धर्मपरता, साक्षात्कारयुक्तता आणि भक्तीपरता" संगीत आणि धर्म, यांची अपार विविधता, भारतात आढळत असल्याने आणि त्यातून भारतात अस्तित्वात असलेल्या अनेकविध भाषा हाताशी असल्याने, प्रत्येकवेळेस, हाती येणारा आविष्कार हा नेहमीच भिन्न आणि म्हणून अधिक रुचीरपूर्ण असतो. इथे आणखी एक साम्य लक्षणीयरीत्या ध्यानात येते. लोकसंगीताचे भक्तीसंगीताशी किती जवळचे नाते असते. गुजरात मधील "धोळ" गीत किंवा महाराष्ट्रातील "वारकरी" संगीत, याला प्रमाण म्हणून मांडता येईल. 
भक्तीसंगीताचे मंचीय सादरीकरण होते पण त्यासाठी त्याच्यावर अनेक संस्कार करावे लागतात. या विचाराच्या अनुरोधाने, आपण आजची रचना "अल्ला तेरो नाम" ही रचना ऐकणार आहोत. वास्तविक, चित्रपटात ही रचना म्हणजे देवळातील भजन, इतकेच म्हणता येईल पण सांगीतिक दृष्टीकोनातून ही रचना फारच लक्षवेधी ठरते. संगीतकार जयदेव यांची चाल असून, लताबाई आणि कोरस, यास्वरुपात गाणे सादर होते. चित्रपट गीत म्हटल्यावर, गाणे प्रसंगानुरूप असणे क्रमप्राप्तच ठरते. चित्रपटात हे गाणे दुहेरी पार्श्वभूमीवर सादर होते. दोन्ही नायिकांचे "हिरो" युद्धात गुंतलेले असताताना, एकाच्या मृत्यूची बातमी, दुसऱ्या कडून कळविणे आणि त्यातून निर्माण होणारी विलक्षण मानसिक घालमेल आणि ताणतणाव, या पार्श्वभूमीवर हे भजन आहे. तसे बघितले तर रचनेचा "घाट" परंपरेपासून फटकून बांधला गेला आहे. रचनेत गायकी "अंग" तर आहेच पण विस्ताराच्या अनेक शक्यता दिसत आहेत. 
आता, भारतीय भजन रचना म्हटल्यावर, रचनेत सात्विक भाव अनुस्यूत असणे, ओघाने येतेच. तसे चित्रपटाच्या कथेच्या संदर्भात आणि चित्रीकरणात दिसून येते. देवळात बसलेली नंदा आणि तिच्या चेहऱ्यावरील भाव, हा पारंपारिक सोशिक बायकोचा आहे, हे सहज समजून घेता येते. तेंव्हा, खरे तर सांगीतिक रचना ही सहजं गुणगुणण्यासारखी असावी, पण तसे रचना केली तर जयदेव कसला!! जयदेव यांच्या बहुतेक सगळ्याच रचना या कधीही, नाकासमोर समोर सरळ चालत असल्यासारख्या येत नाहीत. रचनेत, गुंतागुंत असल्याशिवाय, या संगीतकाराचे कधीही समाधान झाले नाही. मग ती गुंतागुंत वाद्यमेळातील रचनेत असेल किंवा बव्हंशी गायकीतून आढळेल. 
साधारणपणे, गाणे सुरु व्हायच्या आधी, वाद्यमेळातून, चालीचे सूचन होते आणि मग, गायक/गायिका गायला सुरवात करतात. पण इथे तसे काहीही घडत नाही. अत्यंत संथ आवाजात, आपल्याला "अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम" ही ओळ ऐकायला मिळते. गाण्याच्या मुखड्यावरून "गौड सारंग" राग डोळ्यासमोर येतो पण त्याचे थोडे तिरोभाव म्हणजे त्यापासून दूर जाणाऱ्या सुरावटी ऐकायला मिळतात. एका वेगळ्या आणि चांगल्या अर्थाने, जयदेव हे अप्रतिम कारागीर होते. या गीताचे ध्रुवपद फक्त पाच सुरांच्या गुंतागुंतीच्या बांधणीतून सिद्ध होते. 
या गाण्यातील कोरस म्हणजे समूहगान देखील फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. जरा बारकाईने ऐकले तर आपल्या सहज ध्यानात येईल, संपूर्ण गाण्यात कुठेही समूहगान मध्य सप्तकाच्या पलीकडे जात नाही आणि तसे गायन चालू असताना, लताबाईंचा आवाज  मात्र आपला "करिष्मा" दाखवित असतो. समूह्गायनात, स्वरांची तसेच लयीची अनेक वळणे दाखवणे, संगीतकाराच्या व्यामिश्र दृष्टीची खासियत म्हणायला हवी पण, इथे ही रचना, देवळात गायली जात आहे तिथे सगळेच आवाज, अलौकिक करामत दाखविणे अशक्य!! त्यामुळे समूहगायन हे एकाच पातळीवर चालू असते आणि लताबाईंची गायकी मात्र अव्याहतपणे असामान्यरीत्या आसमंतात दरवळत असते. अगदी "अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम" या ओळीच्या गायनातून याची प्रचीती यावी. 
कवी साहिर यांची गीतरचना आहे. तशी सहज, साधी सोपी शब्दकळा आहे पण तरीही अत्यंत सोप्या शब्दातून अर्थवाही आशयाची किमया घडवणारी रचना आहे. 
अल्ला तेरो नाम , ईश्वर तेरो नाम 
सब को सन्मति दे भगवान"
या ओळींमध्ये एकाच देवाची आळवणी न करता, खरतर, कितीही रूपे किंवा नावे असली तरी अखेर "सर्वशक्तिमान" एकच आहे, हेच सुचवले आहे. भक्तीसंगीतातील समर्पण वृत्तीच इथे केवळ शब्दातूनच नसून सुरांच्या मांडणीतून देखील आपल्याला जाणवते. गाण्याची सुरवात अगदी सरळ आहे पण नंतर मात्र रचनेतील "वक्रता" ऐकायला मिळते.  ध्रुवपद संपते आणि एक सुंदर, दीर्घ आलाप ऐकायला मिळतो. या इथे देखील मघाशी मी जो विचार मांडला,त्याचे प्रत्यंतर घेता येते. लताबाईंनी घेतलेला आल्प आणि त्यातच मिसळलेला समुहगायनाचा आलाप यात फरक आहे. लय तशीच आहे, स्वरिक वाक्यांश देखील तसाच आहे पण, सादर करताना, लताबाईंची "गायकी" दिसते तर समुहगायन, त्या गायकीला पूरक अशी स्वरावली पुरवते. आलापानंतर सरोद वाद्याचे सूर, गाण्याची गंभीरता आणखी वाढवते. 
"मांगो का सिंदूर ना छुटे 
मां बहेनो की आंस ना टुटे 
देह बिना भटके ना प्राण" 
स्वररचनेबाबत म्हणायचे झाल्यास, चालीची समान बांधणी इथे ऐकायला मिळते पण तरीही "उठावणी"ची जागा खास आहे. सरोद वाद्याचा सूर जिथे थांबतो, त्याक्षणी लताबाई, "मांगो" हा शब्द कसा उच्चारतात, ही नीट ऐकण्यासारखे आहे. चित्रपटात Camera नंदाच्या चेहेऱ्यावर आहे. अतिशय शांत, सोज्वळ भाव आहेत. आपल्या संस्कृतीत "मांग का सिंदूर" याला फार महत्व आहे, निदान त्याकाळात नक्कीच होते. तेंव्हा असा तो "सिंदूर", "ना छुटे", यात एक आर्त विनवणी आहे आणि हा शाब्दिक आशय, लताबाईंनी किती अप्रतिमरीत्या स्वरांवर तोललेला आहे. 
तीन मिनिटांच्या गाण्यात अशीच फार छोटी, छोटी सौंदर्यस्थळे असतात, ज्यामुळे ते गाणे भरीव बांधणीचे आणि भावपूर्ण होते. पुढे आणखी एक गंमत आहे. मां बहेनो की आंस ना टुटे" ही ओळ आधी लताबाईंच्या स्वरांत आहे पण, ती परत घेताना, समूहगायनातून समोर आला आहे. गंमत अशी आहे, समुहगायन सगळी ओळ घेतच नाही तर "मां बहेनो की" इथेच लताबाईंनी ती सुरावट त्याच स्वरांत कशी "उचलली" आहे, हे खास अनुभवण्यासारखे आहे. कलाकाराची "नजर" म्हणतात ती अशी. इथे "क्षणमात्र " या शब्दाची प्रचीती यावी. हे सहज जमण्यासारखे नव्हे. याचा परिणाम असा होतो, कडव्याची समान बांधणी असून  देखील, कुठेही "पुनरावृत्ती" जाणवत नाही. 
"ओ सारे जग के रखवाले 
निर्बल को बल देनेवाले 
बलवानो को दे दे ज्ञान" 
या ओळीत सगळा आशावाद मांडलेला आहे. हा आशावाद खरच पण प्राप्त परिस्थिती तशी(च) आहे का? चित्रपटात युद्धाचा प्रसंग भरात आलेला असताना, हे सगळे युध्द व्हायलाच हवे का युद्धाने किती आणि कुठले प्रश्न सुटू शकतात? इत्यादी अनेक प्रश्नांची भेंडोळी निर्माण होतात आणि मनात हतबलता साचायला लागते. खरेतर अशाच वेळेस, असा आशावाद आपल्याला जगण्याची उर्मी देतो. हे सगळे, संगीतकार जयदेव, कवी साहिर आणि अर्थात लताबाई, यांनी या गाण्याद्वारे आपल्या समोर ठेवलेले आहे. इथे देखील चालीच्या आकृतीबंधात काहीही फरक नाही पण तरीही, ही चाल आपल्याला जखडवून ठेवते. कुठेही आपल्याला तेच सूर ऐकत आहोत, असे जाणवून देत नाही. याचे प्रमुख कारण, सादरीकरणाचे नवनवीन आखाडे आपल्या समोर येत राहतात आणि आपण तिथेच स्वत:ला करवून बसतो, जसे शेवटची ओळ - "बलवानो को दे दे ज्ञान" म्हणताना, स्वरांत आलेला आशावाद, आपल्याला हीच उमेद देतो.
गाण्याचा शेवट तर अत्यंत खास आहे. "ईश्वर तेरो नाम" म्हणताना, "ई" या अक्षरावरील स्वराक्षरी मुद्दामून ऐकण्यासारखी आहे. हा "ई" कार किंचित उंचावून घेतलेला आहे आणि परत दुसऱ्यांदा घेताना, त्यात किंचित बदल काताराना, तोच "ई"कार आणखी वरच्या स्तरावर घेतलेला आहे आणि तिथेच ईश्वराची आळवणी नेमकी सिद्ध होते. हिंदी चित्रपट संगीतात या आधी आणि नंतर अशा प्रकारे भजनाची रचना कधीच ऐकायला मिळाली नाही. जयदेव यांच्या थोरवीचे आणखी सुरेख उदाहरण ते कुठले? 

Saturday, 9 January 2016

रसिक बलमा



हिंदी चित्रपट गीतांत बरीचशी गाणी खूप गाजतात, कालांतराने त्यात काही त्रुटी निदर्शनास येतात आणि मग एकूणच आवड बदलत जाते. अर्थात, कालानुरूप आवड बदलणे, हे साहजिकच असते. या बाबतीत आणखी एक खुळचट समज भरपूर पसरला आहे. गाणे लोकप्रिय असणे, दर्जाच्या दृष्टीने "कमअस्सल" ठरले जाणे. जितके गाणे "दुर्मिळ", तितकी त्या गाण्याची "किंमत" अधिक. आता हा गैरसमज कुणी, कसा पसरवला, याला कसलाच पुरावा देता येत नाही.दुर्मिळ गाणे उत्तम असते, हा देखील चुकीचा समज आहे म्हणा. ते असो, आजचे गाणे त्या काळी देखील लोकप्रिय होते, आजही आहे आणि कदाचित पुढे त्याच्या लोकप्रियतेत घट होईल, असे संभवत नाही. याचाच दुसरा अर्थ असा देखील काढता येतो, सुगम संगीतात अजूनही ठाम निकष असे तयार झाले नाहीत आणि प्रत्येकाची "आवड" याच कसोटीवर गाण्याचा दर्जा ठरवला जातो. खरतर चित्रपट गीतांचे अचूक असे शास्त्र देखील बनले नाही आणि मग त्यात, बरेचवेळा ज्याला निव्वळ बाष्कळ म्हणावे असे विचार प्रचलित होतात. यामागे, असे देखील म्हणता येईल, चित्रपट गीतांना अजूनही, संगीताच्या प्रांगणात सन्माननीय स्थान मिळालेले नाही. 
"चोरी चोरी" चित्रपटातील "रसिक बलमा" हे गाणे आजही अनेक रसिकांच्या आवडीचे आणि म्हणून स्मृतीत ठाण मांडून बसलेले गीत.चित्रपटात हे गाणे, मुख्यत्वेकरून नर्गिसवर चित्रित झाले आहे. नर्गिस, अभिनेत्री या दृष्टीने अत्युत्तम म्हणून कधीच गणली गेली नाही तसेच भारतीय सौंदर्याच्या मापनातून रूपवती देखील मान्य पावली नाही. तरीही, काळाच्या दृष्टीने अत्याधुनिक विचारांची, अभिनयात धिटाई दाखवणारी आणि "ग्रेसफुल" अभिनेत्री म्हणून नक्कीच गणली जाते. बहुतेक चित्रपटात, चावून चोथा झालेला प्रसंग - नायक, नायिकेचा बेबनाव आणि त्यातून निर्माण होणारी मानसिक तडफड. या पार्श्वभूमीवर हे गाणे चित्रित झाले आहे. 
संगीतकार शंकर/जयकिशन यांची, या गाण्याला चाल आहे. गाण्याची चाल शुद्ध कल्याण रागावर आधारित आहे. या जोडींचे खास वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, त्यांची गाण्याबाबत असलेली चित्रपटीय भाषा. वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास, आपण चित्रपटातील गाणे तयार करीत आहोत, ही जाणीव त्यांच्या सगळ्या रचनांमधून आपल्याला आढळेल आणि याच दृष्टीने पुढे मांडायचे झाल्यास, या गाण्यातील राग हा केवळ आधार स्वर इतपतच वापरलेला आहे. चाल बांधताना, राग-चौकटीपासून दूर सरकून त्यांनी  इथे काहीतरी आवाहक आणि नवे निर्माण करण्याचा सुजाण प्रयत्न केला आहे आणि त्या दृष्टीने, इथे केलेल्या रागाचा वापर अधिक कलात्मक म्हणायला हवा.       
 शायर हसरत जयपुरी यांची शब्दकळा आहे आणि तशी रचना केवळ दोन कडव्यांचीच आहे पण तरीही कविता म्हणून, गाणे कुठेही घसरत नाही. आपण या ठीन्कानी एक बाब लक्षात घ्यायला हवी. चित्रपटातील प्रसंग हे बहुतांशी एकसाची असतात. असे असून देखील, प्रसंगानुरूप रचना करताना, कवीला प्रत्येकवेळा सृजनात्मक रचना करणे केवळ अशक्य असते, तरी देखील संख्येने बघता, रचनेतील गेयता आणि सृजनता वाखाणण्याइतपत कौतुकास्पद असते.
सारंगीच्या आर्त सुरांतून गाण्याची सुरवात होते आणि आपल्याला शुद्ध कल्याण रागाचे सूर ऐकायला मिळतात. सारंगीचे सूर संपतात, तिथे लता बाईंचा वरच्या सुरांत आवाज लागतो - "रसिक बलमा". गाण्याच्या सुरवातीलाच तार स्वरांत गळा न्यायाचा, ही कधीही सोपी गोष्ट नसते. एकतर या गाणे थोडे बारकाईने ऐकले तर समजेल, "बलमा" या शब्दावरील सुरांनी, पुढील सगळी रचना तोलून धरली आहे. प्रत्येक गाण्यात, अशी एखादी "खास" जागा असते, ती जागा म्हणजे त्या गाण्याची ओळख!! "रसिक बलमा' म्हणताना, स्वर कसा उंचावत जातो, ते न्याहाळणे खरच सुंदर अनुभव आहे. 
त्यानंतरचा " हाये" शब्द देखील असाच अप्रतिम आहे. तडफडत्या ह्रुदयाची भावना, त्या "हाये" शब्दात गुंतलेली आहे. तसेच पुढे "दिल क्यो लगाया" इथे ओळ संपत असताना जीवघेणी हरकत आहे - "लगाया" मधील "या" अक्षरावर. ही खास लताबाईंची गायकी!! शाब्दिक आशय सुरांतून किती प्रत्ययकारी पद्धतीने मांडता येतो, हे सुरेख उदाहरण. पुढील ओळ - तोसे दिल क्यो लागाया, जैसे रोग लगाया. इथे परत रचना मंद्र सप्तकात घेतली आहे आणि गमतीचा भाग म्हणजे, ओळ ज्या स्वरांवर संपते तो स्वर परत, "रसिक" शब्दाच्या सुराशी नेमका जोडला गेलेला आहे. तीन मिनिटांच्या गाण्यात, तुम्हाला कुठेही "ठेहराव" घ्यायला फारशी फुरसत मिळत नसते. 
पहिल्या अंतरा सुरु व्हायच्या आधीचा वाद्यमेळ खास लक्षवेधी आहे. सतारीचे स्वर मध्य लयीत सुरु आहेत पण पार्श्वभागी, सारंगीचे सूर मंद स्वरात त्या सांगीत वाक्यांशाला अप्रतिम स्वरिक आशय देत आहेत. संगीतकाराची व्यामिश्र कलाकुसर इथे ऐकायला मिळते. काही क्षणांचाच वाद्यमेळ आहे पण त्याने गाण्याची रचना किती भरीव केली आहे. नीट ऐकले तर कळेल, सतार आणि सारंगीच्या सुरांत, व्हायलीनचे सूर किती अप्रतिमरीत्या मिसळले आहेत आणि पहिला अंतरा सुरु व्हायची जणू पूर्वतयारी करीत आहेत. 
जब याद आये तिहारी, सूरत वो प्यारी प्यारी
नेहा लगा के हारी, तडपू मैं गम की मारी. 
या ओळी सुरु व्हायचा आधी, सतारीचे सूर त्या ओळींची गत मांडून ठेवतात आणि त्याच सुरात, "जब याद आये तिहारी, सूरत वो प्यारी प्यारी" ही ओळ ऐकायला मिळते. गाण्यात, कुठली ओळ किती वेळा आळवायची, याचे देखील "गणित"असते आणि ते संगीतकाराने नेमकेपणाने ठरवायचे असते. हीच ओळ परत घेताना, सूर बदलतात आणि रचना परत तार सप्तकात जाणार, याचे सूचन करतात. "नेहा लगा के हारी, तडपू मैं गम की मारी." ही ओळ ऐकताना, आपल्याला एक बाब निश्चित समजते, ही ओळ परत "रसिक" शब्दाच्या ओळीशी नाते जोडणार. गाण्यचे शब्द देखील किती सुंदर आहेत - नेहा लगा के हारी, तडपू मै गम की मारी. सगळी तडफड, प्रसंगी वांझोटी वाटणारी हैराणी मनात साचली आहे पण, निरुपायाने सहन करण्यावाचून कुठलाच पर्याय शिल्लक नाही. इथे तार स्वरच ती भावना दर्शवू शकतात. गाण्यातील शब्दांचे महत्व जाणून, रचना तयार करणे किती अवघड असते, हेच दाखवण्याचा हा एक प्रयत्न. 
इथे आणखी एक बाब मांडण्यासारखी आहे. पडद्यावर हे गाणे नर्गिसवर चित्रित केले आहे. गाणे विरही आहे, यात वादच नाही पण ती वेदना दाखवताना, बरेचवेळा हिंदी चित्रपटात ओक्साबोक्शी रडणे, हातातील बांगड्या फोडणे आणि हात रक्ताळून घेणे इत्यादी बटबटीत अभिनय केला जातो पण नर्गिस पडद्यावर असले काहीही करत नाही. डोळ्यातील अश्रू बघताना, आपल्याला सगळी वेदना वाचता येते. 
दुसरा अंतरा यायच्या आधीचा वाद्यमेळ जवळपास तसाच ठेवलेला आहे. अर्थात याचा दोन्ही प्रकारे अर्थ लावता येतो. एकतर, आधीचा वाद्यमेळ तसाच ठेऊन, संगीतकाराने झालेला परिणाम अधिक गडद करण्याची संधी साधून घेतली. अर्थात टीकाच करायची झाली तर, इथे नवीन प्रकारे रचना करायची संधी गमावली!! अखेर संगीतकाराचा अधिकार शेवटचा आणि महत्वाचा, इतकेच आपण इथे बोलू शकतो.  
ढूढे ये पागल नैना, पाये ना एक पैल चैना 
डसती है उजली रैना, का से कहू मैं बैना. 
हा गाण्यातील शेवटचा चरण. "ढूढे ये पागल नैना, पाये ना एक पैल चैना' ही देखील आधीच्याच कडव्यातील पहिल्या ओळीची चालीची पुनरावृत्ती आहे. पण पुढे फार वेगळी गंमत आहे. डसती है उजली रैना - "रैना" शब्दानंतर लताबाईंनी आकारात्मक जो आलाप घेतला आहे, तो केवळ अवर्णनीय आहे लयीची गती बघा आणि त्या आलापीचे सौंदर्य अनुभवा. ओळी वरच्या सुरांत आहे आणि तोच स्वर कायम ठेऊन, आलाप थोडा दीर्घ घेतला आहे आणि घेताना तो आलाप किंचित कंपायमान केला आहे. केवळ अफाट गायकी. लिहायला फार सोपे आहे पण गळ्यावर ते मांडणे निरतिशय कठीण आहे.स्वर तसाच पुढे चालत आहे आणि " का से कहू मैं बैना" म्हणताना, पायरी पायरीने स्वर उतरता होतो. काही क्षणांचा(च) हा आविष्कार आहे. गाणे केवढ्या उंचीवर जाउन पोहोचते. ही शेवटची ओळ परत तशीच त्याच स्वरांवर येते, जिथे पहिल्यांदा "रसिक बलमा" घेतले होते. गाणे संपताना, पुन्हा "रसिक बलमा" याच शब्दांवर संपते पण संपताना देखील लताबाईंच्या गायकीची कमाल ऐकायला मिळते. "बलमा" झाल्यावर, तोच सूर किंचित आणखी वरच्या पातळीवर नेला आणि गाणे आलापास्थित अवस्थेत संपते. ऐकणारा दि:डमूढ होतो.