Wednesday 20 January 2016

अल्ला तेरो नाम



हिंदी चित्रपट संगीतात, धार्मिक गीतांची फार जुनी परंपरा आहे. तसे बघितले तर आपल्या संस्कृतीमध्ये, प्रार्थना गीत, ईश्वराची आळवणी किंवा भगवंतासमोर लीन होऊन शरणभाव दर्शविणारी गाणी, यांची रेलचेल आढळते. त्याचे प्रतिबिंब, सिनेमासारख्या लोकाभिमुख कलेत पडणे अनिवार्य ठरते. धार्मिक गीतांची सुरवात, घरापासून किंवा धार्मिक स्थळांपासून चालत आलेली आहे. 
खरतर भारतीय संस्कृतीचे एक वैशिष्ट्य म्हणून ज्या सहा संगीतकोटी अस्तित्वात आहेत, त्यात, "आदिम","लोक","धर्म","कला","संगम" आणि "जनसंगीत", अशा आहेत. भक्तीसंगीताचा विचार वेगळा व्हावा कारण, भक्तीसंगीताची तपासणी एका अधिक व्यापक अभ्यासाचा भाग ठरते. "धर्मपरता, साक्षात्कारयुक्तता आणि भक्तीपरता" संगीत आणि धर्म, यांची अपार विविधता, भारतात आढळत असल्याने आणि त्यातून भारतात अस्तित्वात असलेल्या अनेकविध भाषा हाताशी असल्याने, प्रत्येकवेळेस, हाती येणारा आविष्कार हा नेहमीच भिन्न आणि म्हणून अधिक रुचीरपूर्ण असतो. इथे आणखी एक साम्य लक्षणीयरीत्या ध्यानात येते. लोकसंगीताचे भक्तीसंगीताशी किती जवळचे नाते असते. गुजरात मधील "धोळ" गीत किंवा महाराष्ट्रातील "वारकरी" संगीत, याला प्रमाण म्हणून मांडता येईल. 
भक्तीसंगीताचे मंचीय सादरीकरण होते पण त्यासाठी त्याच्यावर अनेक संस्कार करावे लागतात. या विचाराच्या अनुरोधाने, आपण आजची रचना "अल्ला तेरो नाम" ही रचना ऐकणार आहोत. वास्तविक, चित्रपटात ही रचना म्हणजे देवळातील भजन, इतकेच म्हणता येईल पण सांगीतिक दृष्टीकोनातून ही रचना फारच लक्षवेधी ठरते. संगीतकार जयदेव यांची चाल असून, लताबाई आणि कोरस, यास्वरुपात गाणे सादर होते. चित्रपट गीत म्हटल्यावर, गाणे प्रसंगानुरूप असणे क्रमप्राप्तच ठरते. चित्रपटात हे गाणे दुहेरी पार्श्वभूमीवर सादर होते. दोन्ही नायिकांचे "हिरो" युद्धात गुंतलेले असताताना, एकाच्या मृत्यूची बातमी, दुसऱ्या कडून कळविणे आणि त्यातून निर्माण होणारी विलक्षण मानसिक घालमेल आणि ताणतणाव, या पार्श्वभूमीवर हे भजन आहे. तसे बघितले तर रचनेचा "घाट" परंपरेपासून फटकून बांधला गेला आहे. रचनेत गायकी "अंग" तर आहेच पण विस्ताराच्या अनेक शक्यता दिसत आहेत. 
आता, भारतीय भजन रचना म्हटल्यावर, रचनेत सात्विक भाव अनुस्यूत असणे, ओघाने येतेच. तसे चित्रपटाच्या कथेच्या संदर्भात आणि चित्रीकरणात दिसून येते. देवळात बसलेली नंदा आणि तिच्या चेहऱ्यावरील भाव, हा पारंपारिक सोशिक बायकोचा आहे, हे सहज समजून घेता येते. तेंव्हा, खरे तर सांगीतिक रचना ही सहजं गुणगुणण्यासारखी असावी, पण तसे रचना केली तर जयदेव कसला!! जयदेव यांच्या बहुतेक सगळ्याच रचना या कधीही, नाकासमोर समोर सरळ चालत असल्यासारख्या येत नाहीत. रचनेत, गुंतागुंत असल्याशिवाय, या संगीतकाराचे कधीही समाधान झाले नाही. मग ती गुंतागुंत वाद्यमेळातील रचनेत असेल किंवा बव्हंशी गायकीतून आढळेल. 
साधारणपणे, गाणे सुरु व्हायच्या आधी, वाद्यमेळातून, चालीचे सूचन होते आणि मग, गायक/गायिका गायला सुरवात करतात. पण इथे तसे काहीही घडत नाही. अत्यंत संथ आवाजात, आपल्याला "अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम" ही ओळ ऐकायला मिळते. गाण्याच्या मुखड्यावरून "गौड सारंग" राग डोळ्यासमोर येतो पण त्याचे थोडे तिरोभाव म्हणजे त्यापासून दूर जाणाऱ्या सुरावटी ऐकायला मिळतात. एका वेगळ्या आणि चांगल्या अर्थाने, जयदेव हे अप्रतिम कारागीर होते. या गीताचे ध्रुवपद फक्त पाच सुरांच्या गुंतागुंतीच्या बांधणीतून सिद्ध होते. 
या गाण्यातील कोरस म्हणजे समूहगान देखील फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. जरा बारकाईने ऐकले तर आपल्या सहज ध्यानात येईल, संपूर्ण गाण्यात कुठेही समूहगान मध्य सप्तकाच्या पलीकडे जात नाही आणि तसे गायन चालू असताना, लताबाईंचा आवाज  मात्र आपला "करिष्मा" दाखवित असतो. समूह्गायनात, स्वरांची तसेच लयीची अनेक वळणे दाखवणे, संगीतकाराच्या व्यामिश्र दृष्टीची खासियत म्हणायला हवी पण, इथे ही रचना, देवळात गायली जात आहे तिथे सगळेच आवाज, अलौकिक करामत दाखविणे अशक्य!! त्यामुळे समूहगायन हे एकाच पातळीवर चालू असते आणि लताबाईंची गायकी मात्र अव्याहतपणे असामान्यरीत्या आसमंतात दरवळत असते. अगदी "अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम" या ओळीच्या गायनातून याची प्रचीती यावी. 
कवी साहिर यांची गीतरचना आहे. तशी सहज, साधी सोपी शब्दकळा आहे पण तरीही अत्यंत सोप्या शब्दातून अर्थवाही आशयाची किमया घडवणारी रचना आहे. 
अल्ला तेरो नाम , ईश्वर तेरो नाम 
सब को सन्मति दे भगवान"
या ओळींमध्ये एकाच देवाची आळवणी न करता, खरतर, कितीही रूपे किंवा नावे असली तरी अखेर "सर्वशक्तिमान" एकच आहे, हेच सुचवले आहे. भक्तीसंगीतातील समर्पण वृत्तीच इथे केवळ शब्दातूनच नसून सुरांच्या मांडणीतून देखील आपल्याला जाणवते. गाण्याची सुरवात अगदी सरळ आहे पण नंतर मात्र रचनेतील "वक्रता" ऐकायला मिळते.  ध्रुवपद संपते आणि एक सुंदर, दीर्घ आलाप ऐकायला मिळतो. या इथे देखील मघाशी मी जो विचार मांडला,त्याचे प्रत्यंतर घेता येते. लताबाईंनी घेतलेला आल्प आणि त्यातच मिसळलेला समुहगायनाचा आलाप यात फरक आहे. लय तशीच आहे, स्वरिक वाक्यांश देखील तसाच आहे पण, सादर करताना, लताबाईंची "गायकी" दिसते तर समुहगायन, त्या गायकीला पूरक अशी स्वरावली पुरवते. आलापानंतर सरोद वाद्याचे सूर, गाण्याची गंभीरता आणखी वाढवते. 
"मांगो का सिंदूर ना छुटे 
मां बहेनो की आंस ना टुटे 
देह बिना भटके ना प्राण" 
स्वररचनेबाबत म्हणायचे झाल्यास, चालीची समान बांधणी इथे ऐकायला मिळते पण तरीही "उठावणी"ची जागा खास आहे. सरोद वाद्याचा सूर जिथे थांबतो, त्याक्षणी लताबाई, "मांगो" हा शब्द कसा उच्चारतात, ही नीट ऐकण्यासारखे आहे. चित्रपटात Camera नंदाच्या चेहेऱ्यावर आहे. अतिशय शांत, सोज्वळ भाव आहेत. आपल्या संस्कृतीत "मांग का सिंदूर" याला फार महत्व आहे, निदान त्याकाळात नक्कीच होते. तेंव्हा असा तो "सिंदूर", "ना छुटे", यात एक आर्त विनवणी आहे आणि हा शाब्दिक आशय, लताबाईंनी किती अप्रतिमरीत्या स्वरांवर तोललेला आहे. 
तीन मिनिटांच्या गाण्यात अशीच फार छोटी, छोटी सौंदर्यस्थळे असतात, ज्यामुळे ते गाणे भरीव बांधणीचे आणि भावपूर्ण होते. पुढे आणखी एक गंमत आहे. मां बहेनो की आंस ना टुटे" ही ओळ आधी लताबाईंच्या स्वरांत आहे पण, ती परत घेताना, समूहगायनातून समोर आला आहे. गंमत अशी आहे, समुहगायन सगळी ओळ घेतच नाही तर "मां बहेनो की" इथेच लताबाईंनी ती सुरावट त्याच स्वरांत कशी "उचलली" आहे, हे खास अनुभवण्यासारखे आहे. कलाकाराची "नजर" म्हणतात ती अशी. इथे "क्षणमात्र " या शब्दाची प्रचीती यावी. हे सहज जमण्यासारखे नव्हे. याचा परिणाम असा होतो, कडव्याची समान बांधणी असून  देखील, कुठेही "पुनरावृत्ती" जाणवत नाही. 
"ओ सारे जग के रखवाले 
निर्बल को बल देनेवाले 
बलवानो को दे दे ज्ञान" 
या ओळीत सगळा आशावाद मांडलेला आहे. हा आशावाद खरच पण प्राप्त परिस्थिती तशी(च) आहे का? चित्रपटात युद्धाचा प्रसंग भरात आलेला असताना, हे सगळे युध्द व्हायलाच हवे का युद्धाने किती आणि कुठले प्रश्न सुटू शकतात? इत्यादी अनेक प्रश्नांची भेंडोळी निर्माण होतात आणि मनात हतबलता साचायला लागते. खरेतर अशाच वेळेस, असा आशावाद आपल्याला जगण्याची उर्मी देतो. हे सगळे, संगीतकार जयदेव, कवी साहिर आणि अर्थात लताबाई, यांनी या गाण्याद्वारे आपल्या समोर ठेवलेले आहे. इथे देखील चालीच्या आकृतीबंधात काहीही फरक नाही पण तरीही, ही चाल आपल्याला जखडवून ठेवते. कुठेही आपल्याला तेच सूर ऐकत आहोत, असे जाणवून देत नाही. याचे प्रमुख कारण, सादरीकरणाचे नवनवीन आखाडे आपल्या समोर येत राहतात आणि आपण तिथेच स्वत:ला करवून बसतो, जसे शेवटची ओळ - "बलवानो को दे दे ज्ञान" म्हणताना, स्वरांत आलेला आशावाद, आपल्याला हीच उमेद देतो.
गाण्याचा शेवट तर अत्यंत खास आहे. "ईश्वर तेरो नाम" म्हणताना, "ई" या अक्षरावरील स्वराक्षरी मुद्दामून ऐकण्यासारखी आहे. हा "ई" कार किंचित उंचावून घेतलेला आहे आणि परत दुसऱ्यांदा घेताना, त्यात किंचित बदल काताराना, तोच "ई"कार आणखी वरच्या स्तरावर घेतलेला आहे आणि तिथेच ईश्वराची आळवणी नेमकी सिद्ध होते. हिंदी चित्रपट संगीतात या आधी आणि नंतर अशा प्रकारे भजनाची रचना कधीच ऐकायला मिळाली नाही. जयदेव यांच्या थोरवीचे आणखी सुरेख उदाहरण ते कुठले? 

No comments:

Post a Comment