Saturday, 15 August 2015

मखमली शुद्ध कल्याण

संध्याकाळ उलटत असताना, रात्रीचे रंग आकाशात पसरत असताना, कानावर "रसिक बलमा" ही काळीज चिरून टाकणारे शब्द येतात आणि डोळ्यातील उरलेली झोप पूर्णपणे उडून जाते!! गाण्याचा पहिल्याच आलापित अवघे स्वरशिल्प उभे करणारा तो अविस्मरणीय आवाज, पहिल्याच झटक्यात आपल्या मनात रुतून बसतो. "रसिक बालमा हाये, दिल क्युं लगाया, तोसे दिल क्युं लगाया" या ओळीतील पहिल्या "लगाया" वर जी भावनांची थरथर दाखवली आहे, ती शास्त्राच्या पलीकडची आहे!! बहुदा श्रुती शास्त्र त्याचे स्वरांचे थोडेफार विश्लेषण करू शकेल तरीदेखील तो नेमका झालेला परिणाम, शब्दापलीकडचा आहे आणि तो ऐकून "भोगावा" लागतो. त्याशिवाय, त्याची विखारी खुमारी जाणवणार नाही!!  


या गाण्यात एक आणखी खास बात आहे. पहिला अंतरा सुरु व्हायच्या आधी जो वाद्यमेळ आहे, तो सतारीच्या सुरांनी सुरु होतो आणि त्याच्या पाठीमागे सारंगीच्या सुरांचे "अस्तर" आहे. सतारीचे सूर वरच्या सुरांत वाजत आहेत आणि सारंगीचे सूर किंचित ठाय लयीत तसेच मंद्र सप्तकात वाजत आहेत आणि ही स्वरांचा खेळ, काही क्षणांपुरता(च) आहे. लगेच व्हायोलिनचे सूर अवतरतात, ते वेगळ्या पट्टीवर!! अखेर मात्र, सुरवातीच्या सुरावर सतार येउन थांबते!! हा खेळ फार विलक्षण आहे. संगीतकार म्हणून शंकर/जयकिशन यांना या सांगीतिक वाक्यांशाचे संपूर्ण श्रेय द्यावेच लागेल. यात आणखी मजा म्हणजे हा जो वाद्यमेळ आहे, तिथे हा राग दूर सारलेला आढळतो पण तरीही परत चाल मुखड्याला अप्रतिमरीत्या येउन मिळते. सुगम संगीतात प्रयोग कसे करता येतात, याचे हे गाणे म्हणजे उत्तम उदाहरण ठरेल. 
शुद्ध कल्याण रागाची ओळख करून घेण्यासाठी या गाण्याकडे नि:संशयरीत्या बघता येईल. "भूप" रागाचा "तोंडावळा" दिसत असताना, "मध्यम" आणि "निषाद" स्वर किंचित अस्तित्व दाखवतात आणि हा राग पूर्ण वेगळा म्हणून अवतरतो. यात आणखी गंमत म्हणजे "भूप" राग सकाळचा मानला जातो तर "शुद्ध कल्याण" मात्र रात्रीचा पहिला प्रहर घेतला जातो. याचे मुख्य कारण हा राग पूर्वांगात भूप रागाशी नाते सांगतो तर उत्तरांगात यमन रागाशी. त्यामुळे, "औडव-संपूर्ण" या प्रकारात, हा राग येतो. "सा","रे","ग","प" हे स्वर आणि याचे संगती, यामुळे या रागाची वेगळी ओळख मनात ठसते. 
या रागावर भूप रागाची सावली इतकी आहे की पूर्वीच्या ग्रंथात,या रागाची ओळख "भूप कल्याण" या नावाने केलेली वाचायला मिळते. खरेतर या रागाचे आरोही स्वर आणि भूप रागाचे आरोही स्वर, यात सत्कृत्दर्शनी काहीही फरक नाही पण खरी गंमत इथेच आहे. स्वर लावण्याची पद्धत आणि कुठल्या स्वराला प्राधान्य द्यायचे, याचे नियम, यामुळे भारतीय रागदारी संगीत अतिशय गुंतागुंतीचे आणि त्याचबरोबर विलोभनीय झाले आहे. 
भारतीय रागदारी संगीतात, "धृपद-धमार" गायकी वगळल्यास, दोन भाऊ एकत्रितपणे गायन करताना फारसे आढळत नाही. राजन-साजन मिश्रा (कदाचित वडाली बंधू) याला अपवाद असावेत. दोन तंबोरे एकत्रित सुरात रुणझुणत असावेत त्याप्रमाणे या व्दयीचे गाणे जमते. एकाने हरकत घ्यावी आणि दुसऱ्याने त्या हरकतीचे दीर्घ तानेत रुपांतर करावे, हा खेळ तर हे दोघेजण फारच बहारीने करतात. गाण्यातील लय किती वेगवेगळ्या पद्धतीने घेता येते तसेच "वाकवता" येते, यासाठी तर यांचे गायन उद्मेखूनपणे ऐकावे. 


प्रस्तुत रचना ही जवळपास ५० मिनिटांची आहे म्हणजे या रागाचे सगळे वैभव आपल्याला या रचनेत बघता तसेच अनुभवता येईल. आलापीत लागलेला खर्जातील स्वर इतका विलक्षण आहे की आपण, त्या स्वराकडे एकटक "बघत" बसतो!! वर मी जी स्वरावली मांडली आहे, त्याचे नेमके प्रत्यंतर या रचनेत ऐकता येईल. प्रत्येक स्वर आणि त्या स्वराला जोडलेली हरकत, काही ठिकाणी अतिशय लोभसवाणी आहे. तसेच रचना अगदी, द्रुत लयीत सुरु होते तेंव्हा मध्येच एके ठिकाणी जो असामान्य "खर्ज" लावलेला आहे, तो खास ऐकण्यासारखा आहे.
प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांनी अनेक अप्रतिम भजने गायली आहेत त्यातील एक रचना - "ओमकार प्रधान रूप गणेशाचे" ही रचना ऐकुया. संगीतकार कमलाकर भागवत यांची चाल आहे. लेखाचे नाव "मखमली शुद्ध कल्याण" असे जे मला द्यावेसे वाटले, ते या गाण्याच्या संदर्भात. गमतीचा भाग असा आहे, या गाण्याचे सूर बघितले तर यात, थोडा "भूप" आहे, थोडा "देसकार" आहे पण तरीही "शुद्ध कल्याण" राग या गाण्यात प्रकर्षाने आढळतो. खरतर चित्रपट गीते काय किंवा भावगीते काय, त्या गाण्याची चाल म्हणजे रागाची प्रतिकृती किंवा आराखडा नव्हे. अर्थात, याला अपवाद अशी काही गाणी असतातच. 


पारंपारिक भजनाचा ताल न वापरता वेगळ्याच ढंगाचा ताल वापरला आहे. "आकार तो ब्रह्म, ऊकार तो ब्रह्म" इथे मात्र राग दूर गेला आहे पण परत अंतरा संपताना, सूर मात्र नेमके जुळवून घेतले आहेत. सुमन कल्याणपूर इतकी सुरेल आवाजाची गायिका पण त्यामानाने तिच्या गायकीची "परीक्षा" घेणारी फारशी गाणी वाट्याला आली नाही, इतकेच नव्हे बहुतेकवेळा तिच्या आवाजाची तुलना लताबाईंच्या गायाकीशी होत गेली आणि बहुदा याच तुलनेच्या आग्रहापायी या गायिकेला मराठी चार भावगीते वगळता,  फारशी संधी मिळाली नाही आणि गायनाचे तसे "चीज" झाले नाही. 
असेच एक गाणे इथे देण्यासारखे आहे. देशभक्तीवर आधारित गाण्यात "शुद्ध कल्याण" राग किती अप्रतिमरीत्या मिसळला आहे, हे बघण्यासारखे आहे. "जहां डाल डाल पर सोने की चिडिया" हेच ते गाणे. जवळपास, ७ मिनिटांचे गाणे पण ऐकताना, गायन, कविता आणि रचना, या सगळ्या बाबतीत गाणे कुठेही जरादेखील रेंगाळत नाही. केरवा तालात जरी गाणे सुरवातीला बांधले असले तरी पुढे त्यात अनेक ताल वापरले आहेत. गाण्यातील शब्दानुसार, गाण्याची चाल आणि ताल, बदलले आहेत आणि हे सगळे करत असताना, संगीतकार म्हणून हंसराज बहेल यांनी, गाणी फार खुबीने रंगतदार ठेवले आहे. 


मोहमद रफीचा मुळातला जोरकस, अतिशय सुरेल आवाज अशा गाण्यात फार विलक्षण खुलतो. सुरवातीचा संस्कृत श्लोक इतक्या वरच्या सुरात आहे की, तिथे गायकाचा "गळा" पोहोचणे, हीच मुळातली एक परीक्षा आहे. देशभक्तिपर गाण्यात नेहमी आवाजात एक जोरकस स्वर आवश्यक असतो, जेणेकरून शब्दातील भावना तितक्याच ओतप्रोतपणे रसिकांच्या मनात ठाण मांडून बसतील. अर्थात असे करताना, गाणे जरादेखील प्रचारकी वाटता कामा नये, ही काळजी जरुरीची असते अन्यथा सगळी रचना, एखाद्या पक्षाच्या जाहिरात वाटण्याची शक्यता असते. इथे, या गाण्यात ही सगळी व्यवधाने, संगीतकार म्हणून हंसराज बहेल यांनी फारच समर्थपणे सांभाळली आहे. हिंदी चित्रपट गीतांत अशी बटबटीत गाणी भरपूर सापडतात. त्यादृष्टीने बघता, हे गाणे इतके मोठे असून देखील अतिशय श्रवणीय झाले आहे. हिंदी चित्रपट संगीतात, हा प्रश्न मला बरेचवेळा पडलेला आहे. हंसराज बहेल सारखा प्रतिभावंत संगीतकार हाताशी असून, याला त्यामानाने फारशी संधी कधीच मिळाली नाहीत. हंसराज बहेलच्या मानाने निकृष्ट दर्जाच्या संगीतकारांना, इथे कितीतरी संधी मिळाल्या आहेत आणि संधी मिळून देखील त्याला वाया घालवलेल्या आढळतात. केवळ दैवगती, असेच फडतूस नाव द्यावे लागते.

आता आपण याच शुद्ध कल्याण रागावर आधारित काही गाण्याच्या लिंक्स इथे देत आहे, ज्यायोगे, हा राग आपल्या अधिक परिचयाचा होईल आणि हा राग आपल्या मैत्रीचा होऊन जाईल . 

१] ये शाम की तनहाइयां 

२] चांद फिर निकाला मगर तुम ना आये 

३] मेरी मुहब्बत जवां रहेगी 

Monday, 10 August 2015

गौड सारंग

एकाच कुटुंबातील  असून देखील, स्वभाव वेगळा असणे, हे सहज असते. तोंडावळा सारखा असतो पण तरीही स्वभाव मात्र भिन्न असतो. किंबहुना, वेगळेपण असताना देखील, इतर चेहऱ्यांशी साम्य दिसते. भारतीय रागदारी संगीताचा सम्यक विचार करताना, मला बऱ्याच रागांच्या बाबतीत हे म्हणावेसे वाटते. सूर तेच असतात पण तोच स्वर कसा "घ्यायचा" म्हणजेच त्या स्वराची "जागा" कशी मांडायची, त्यामुळे तेच स्वर आणि तो राग भिन्न होत जातो आणि रागांमधील व्यामिश्रता अधिक खोलवर डोकावते. "गौड सारंग" रागाच्या बाबतीत हे साम्य बघताना, इतर अनेक रागांच्या आठवणी मनात येतात. 
खरतर हेच साम्य, रागदारी संगीताचे व्यवच्छेदक लक्षण मानावे लागेल. एखादा राग सादर करणे म्हणजे केवळ सुरांची बेरीज-वजाबाकी असा गणिती कारभार नसून, त्या स्वराचा (जे स्वर सामायिक असतात )  नेमका "स्वभाव" जाणून घेऊन, त्याचे सादरीकरण गरजेचे असते. स्वराला "पैलू" असतात, ही इथे लक्षात येते. 
या रागात दोन्ही मध्यम लागतात (तीव्र आणि शुध्द) आणि बाकीचे स्वर शुध्द आहेत.  अर्थात,हा राग ऐकताना, "बिहाग","छायानट" या रागांच्या आठवणी मनात तरळतात पण तरीही हा राग, आपले "वेगळेपण" सिद्ध करीत असतो. "सा" "रे" "ग" "म" या स्वरांच्या साहचर्याने स्वत:ची ओळख निर्माण  करता येते. 
भारतीय संगीतात, बांसुरी वाद्याचा नेमका उगम कधी झाला, याबाबत संदेह बराच आहे. परंपरागत संकेतानुसार, कृष्णाकडे या वाद्याचा मान जातो. आधुनिक भारतीय संगीतात, या वाद्याची प्रतिष्ठापना खऱ्याअर्थी कुणी केली असेल तर, ती पंडित पन्नालाल घोष यांनी. वाद्याचा स्वभाव ओळखून, त्यात सुरांचा असामान्य मुलायमपणा पंडितजींनी ज्या प्रकारे ओळखला आणि त्याचे सादरीकरण केले, त्याला आजही तोड नाही. राग सादर करताना, त्याचे शुद्धत्व राखून, लयकारी आणि ताना इतक्या सुंदरपणे सादर केली आहे की ऐकणारा मंत्रमुग्ध व्हावा. अत्यंत ठाय लयीत सुरवात करायची, हळूहळू स्वरांचा "भरणा" करीत, रागाची बढत करायची, असा त्यांच्या वादनाचा सर्वसाधारण असा ढाचा  ओळखता येतो. याचा दृश्य परिणाम असा होतो, रसिकाला प्रत्येक स्वराचा आनंद घेता येतो. वास्तविक, या वाद्याचा थोडा विचार केला तर हे वाद्य सतारीप्रमाणे "पूर्णत्व" मिळणारे वाद्य नाही पण तरीही पन्नालाल घोष यांनी, या वाद्यावर प्रभुत्व मिळवताना, वाद्याचा नेमका गुणधर्म ओळखून, ठाय आणि मध्य लयीत वादनाची गत राखली.  


या लिंकवरील वादन ऐकताना, आपल्याला याच गुणांचा आढळ येतो. अतिशय ठाय लयीत वादन करताना, प्रत्येक स्वर नेमका लावणे, स्वरांची बढत करीत असताना, कपड्यावर कशिदाकाम करावे त्याप्रमाणे स्वरांची रेखीव आकृती निर्माण करायची आणि लयकारी सादर करायची, याकडे वादनाचा कल दिसतो आणि तो कल, वाद्याचा गुणधर्म ओळखून सौंदर्यनिर्मिती करतो. वाजवताना, शक्यतो दीर्घ ताना न घेता, छोट्या स्वरावलींतून लय प्रगट करायचा आग्रह दिसतो. त्यामुळे, ऐकताना देखील रागाचे सौंदर्य सहजपणे न्याहाळता येतो. रचना द्रुत लयीत वाजवताना देखील, शक्यतो सुरांचा अवकाश हा शक्यतो मंद्र सप्तकात राखायचा, हा विचार स्पष्ट दिसतो. 
लताबाईंनी, त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत असंख्य भजने गायली आहेत तरीही या रचनेची अवीट गोडी काही निराळीच आहे. विशेषत: हिंदी चित्रपट संगीतात तर या रचनेचे स्थान अतुलनीय असे आहे. अत्यंत सशक्त शब्दकळा, त्यालाच जोडून निर्माण केलेली अप्रतिम संगीत रचना आणि त्याचे अतिशय परिणामकारक सादरीकरण, ही या रचनेची खास वैशिष्ट्ये सांगता येतील. खरतर, या रचनेत, फक्त "गौड सारंग" राग नसून, काही ठिकाणी "भूप" रागाची संगती लागते तरीही गौड सारंग रागाची दाट छाया, या गाण्यावर निश्चित आहे. आणखी विशेष सांगायचा म्हणजे, गाण्याचे बांधणी "दीपचंदी" या काहीशा अनवट तालात बांधली आहे. या तालावर आधारित फारशी गाणी ऐकायला मिळत नाहीत. एकतर हा ताल लयीला फार अवघड आहे. चौदा मात्रांचा ताल असून, "टाळी" च्या मात्रा वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने, वाजवताना,फार कौशल्य लागते. 


या गाण्यात, सुरवातीपासून जरा बारकाईने ऐकले तर तालाच्या मात्रांचा हिशेब मिळतो. संगीतकार जयदेव यांची या गाण्यात बांधलेली लय तर केवळ अपूर्व आहे. गाणे फार वर-खाली चालत आहे म्हणजे मध्येच वरच्या सुरांत जाते तर क्षणात खालच्या सुरांत जाते. चाल अतिशय श्रवणीय आहे तसेच कविता म्हणून देखील, हे गाणे असामान्य आहे. साहीरचे शब्द प्रत्ययकारी आहेत आणि त्या शब्दांचा आशय, चालीतून नेमका दृग्गोचर होईल, याची काळजी घेऊन, गाणे बांधले आहे. लताबाईंनी गाताना देखील, याच वैशिष्ट्याचा विकास होईल, या भूमिकेतून गायले आहे.                                                 उर्दू साहित्यात, गझल साहित्याचे स्थान फार वरच्या स्तरावर आहे. बरेचवेळा, "गझल" हे कवितेचे वृत्त आहे, असे न मानता, "गझल" हा गायकीचा एक प्रकार आहे, असे मानले जाते. एका दृष्टीने हा विचार योग्य आहे पण, तरीही, गझल, ही एक कविता आहे, हे मान्यच करावे लागेल. अर्थात, गझल आणि गझल गायकी, हे दोन्ही भिन्न प्रकार आहेत. ज्या हिशेबात ठुमरी गायनाचे मोजमाप केले जाते त्याच प्रमाणे गझल गायनाचे देखील मापदंड आहेत आणि त्यात जगजीत सिंग यांचे नाव अग्रभागी आहे. अत्यंत मुलायम आवाज, शक्यतो गायन करताना, शब्दांना कुठेही "जखम" करायची नाही, हा विचार ठामपणे दिसतो!! कालांतराने त्यांची गायकी थोडीशी "एकांतिक" झाली तरी देखील, गझल गायनात त्यांनी आपले नाव प्रस्थापित केले, यात शंकाच नाही. "दैर ओ हरम मे  बसने वालो" ही रचना,केरवा तालात गायली आहे.                                                                
https://www.youtube.com/watch?v=OLFYYj8aQRo                                                                                                                                        
रचनेच्या सुरवातीलाच सरगमचा उपयोग केला आहे आणि पुढे देखील बऱ्याच ठिकाणी सरगम ऐकायला मिळते. ऐकताना रचना जरा द्रुत लयीत आहे, असे वाटते पण केवळ तालाच्या आघातामुळे, लय थोडी द्रुत वाटते. गायन ऐकताना, जगजीत सिंग यांच्या सगळ्या गायकीची वैशिष्ट्ये ऐकायला मिळतात. एखाद्या शब्दावर "खटका" घेताना देखील, त्या शब्दाचे पावित्र्य राखले जाईल, याकडे लक्ष दिलेले सहज समजून घेता येते. गौड सारंग रागाची ओळख करून घेण्यासाठी, ही रचना दर्शविता येईल. 
आता आपण, मराठीतील असेच एक "समृध्द" भावगीत ऐकुया. "काल पाहिले मी स्वप्न गडे" हेच ते गाणे. आशा भोसले यांनी आपल्या असामान्य गायकीने हे गाणे फारच अवीट गोडीचे करून ठेवले आहे. योगेश्वर अभ्यंकर, या काहीशा अप्रसिद्ध कवीने लिहिलेले हे गाणे, आपल्याला गौड सारंग रागाची आठवण करून देतात. संगीतकार श्रीनिवास खळे, यांनी ही चाल बांधली आहे. हा संगीतकार म्हणजे मराठी भावगीतातील अद्भुत रसायन होते. यांच्या बहुतेक चाली अतिशय संथ, तरीही गळ्याची परीक्षा घेणाऱ्या असतात. "गायकी" ढंगाकडे चाल बांधण्याची विशेष प्रवृत्ती दिसते. गमतीचा भाग असा असतो, गाणे ऐकताना, गाणे सुश्राव्य वाटत असते परंतु तेच गाणे गायला घेतले म्हणजे त्यातील "खाचखळगे" दिसायला लागतात आणि गाण्याची चाल भलतीच अवघड वाटायला लागते!! 


सुरवातीच्या आलापीमध्येच आपल्याला गौड सारंग दिसतो. हा आलाप ऐकायला सहज, सोपा वाटतो पण गाताना घेतले तर आपल्याला समजेल की, आलापीत किती "अवघडले" पण आहे. तसेच प्रत्येक ओळ संपविताना, जे "खटके" घेतले आहेत त्याचबरोबर पहिला अंतरा सुरु करताना, एकदम वरच्या सुरांत रचनेला सुरवात करून, चालीतील "काठीण्य" दर्शवून द्यायचे, हा सगळाच भाग अतिशय विलोभनीय आहे.

आता आपण आणखी काही गाण्याच्या लिंक्स ऐकुया म्हणजे या रागाची ओळख अधिक खोलवर होईल. 
१] कुछ और जमाना कहेता है 

२] रितू आये रितू जाये सखी रे 

३] लहेरो मे झुलू, तारो को छुलू 

Sunday, 2 August 2015

ब्रिंदाबनी सारंग

वातावरणात उन्हाच्या प्रचंड झळा लागून, मनाची तलखी होत असावी. थंड पाणी पिऊन देखील घशाला शोष पडावी. घराबाहेर नावाला देखील वाऱ्याची झुळूक नसावी आणि त्यामुळे झाडांची पाने देखील शुष्क आणि अम्लान झाली असावीत. सगळीकडे रखरखाटाचे वातावरण पसरले असावे. डोक्यावरील पंख्यातून देखील गरम हवेचे(च) झोत पडत असावे आणि त्यामुळे चिडचीड वाढत असावी. बाहेर नजर ठरत नसावी कारण, डोळ्यांना उन्हाची तिरीप त्रस्त करीत असावी. अगदी डोळे मिटले तरी ग्लानी यायच्या ऐवजी लालसर पिवळे रंग फेर धरत असावेत. आणि अशा अस्वस्थ क्षणी दूरवरून, "मध्यम","पंचम" स्वरांच्या जोडीने "कोमल निषाद" कानावर येऊन, मनाची अवस्था किंचित मनोरम व्हावी. हीच किमया, ब्रिंदाबनी सारंग या रागाच्या, सुरांनी होते. रागदारी सुरांची ही किमया केवळ अलौकिक म्हणावी अशीच आहे. वातावरणात क्षणात बदल घडवून आणण्याची ताकद, सुरांच्या अवगाहनातून सहजगत्या होते आणि आपल्याला देखील, या किमयेचे नेमके विश्लेषण अवघड होऊन बसते. अर्थात, यामागे  मनावर झालेले पारंपारिक संस्कार देखील कारणीभूत असतात. 
वास्तविक, हा राग म्हणजे दुपारच्या काहीलीवर "उतारा" असा उल्लेख, बऱ्याच ग्रंथातून वाचायला मिळतो. "औडव/औडव" जातीचा हा राग, फार विलक्षण किमया करतो. "गंधार" आणि "धैवत" वर्जित सूर असले तरी, अवरोही स्वरांतील "कोमल निषाद" इथे भलतीच करामत करून जातो. "मध्यम" आणि "पंचम" हे या रागाचे वादी - संवादी स्वर असले तरी, या रागात काही वेळा "तीव्र निषाद" आणि "कोमल निषाद" अशा दोन्ही स्वरांचा वापर केला जातो, पण खरी ओळख होते ती, "मध्यम" आणि "कोमल निषाद" या स्वरांनी. वर उल्लेखलेली दुपारची दाहकता, जणू या दोन स्वरांच्या सहाय्याने शीतल करण्याची जादू करतात. काफी थाटातील या रागाची "मींड" ही मध्यम, पंचम आणि कोमल निषाद स्वरांतून सिद्ध होते. या रागाची आणखी एक गंमत सांगता येते. या रागाचे स्वर जर का नेमकेपणी घेतले नाही तर, हा राग नकळत "मेघ" रागात मिसळून जाऊ शकतो, इतके या दोन रागांत साम्य आहे. या रागात काहीवेळा दोन्ही निषाद घेतले जात म्हणजे कोमल आणि तीव्र निषाद घेतले जातात पण अर्थात, याला एक प्रयोग, इतपतच अर्थ घेता येईल. कोमल निषाद, हेच खरे या रागाचे स्थान!! 
उस्ताद रशीद खान, हे नाव आता शास्त्रीय संगीताच्या रसिकांना परिचित झालेले आहे. अत्यंत मुलायम आवाज, ताना घेताना देखील शक्यतो खंडित स्वरूपाच्या घ्यायच्या, ज्या योगे प्रत्येक सुराची "ओळख" रसिकांना घेता यावी. मंद्र आणि शुद्ध स्वरी सप्तकात शक्यतो गायन सादर करण्याची प्रवृत्ती. सरगमचा अतिशय सुंदर उपयोग करणे, इत्यादी अनेक वैशिष्ट्ये, या गायकाची सांगता येतील. गायन ऐकताना काहीवेळा उस्ताद अमीर खान साहेबांच्या गायनाचा प्रभाव जाणवतो, विशेषत: लयकारी ऐकताना, हा प्रभाव जाणवतो. "रामपूर साहसवान" घराण्याचा जरी गायक असला तरी इतर सगळ्या घराणेदार गायकीतून, चांगले उचलून, स्वत:च्या गायकीत मिसळून, स्वत:ची अशी वेगळीच गायकी प्रस्थापित केली. काहीवेळा खर्जातील सूर लावताना, पंडित भीमसेन जोशींचा देखील ठसा दिसतो. याचा अर्थ इतकाच घ्यायचा, उस्ताद रशीद खान यांनी, सगळ्या घराण्यांची वैशिष्ट्ये आपल्या गायनात सामावून घेतली आहेत. 


या रचनेत, विशेषत: आलापी ऐकताना, आपण वरती जी "मिंड" मांडली आहे, तिचा अनुभव घेता येतो. खरतर, मला बरेचवेळा " रागदारी गायनातील भावगीत" असे म्हणायचा मोह होतो इतके भावपूर्ण गायन असते. कुठेही स्वर लावण्याचा खटाटोप नाही की कुठे अडखळणे नाही. ज्या सहजतेने, कोमल स्वर लावले जातात त्याच सहजतेने, शुध्द स्वर आणि तीव्र स्वर घेतले जातात आणि वरच्या पट्टीत गाताना, कुठेही स्वर "ताणला" आहे, असे न होता, स्वरांचे "मुलायमपण" कायम राखले जाते. 
संगीतकार हेमंत कुमार, यांना हिंदी चित्रपट सृष्टीत खऱ्याअर्थाने स्थिरावायची संधी प्राप्त झाली, ती "नागिन" चित्रपटाच्या अभूतपूर्व लोकप्रियतेने. या चित्रपटातील सगळी गाणी अप्रतिम आहेत.  याच चित्रपटात, या रागावर आधारित अतिशय सुश्राव्य असे गाणे आहे - "जादुगार सैय्या" आणि हे गाणे आपण इथे ऐकुया. 


मेंडोलीनच्या सुराने सुरु होणारे गाणे, झटक्यात जलद लयीत जाते. ताल, पारंपारिक केरवा आहे. यात लय जलद असली तरी इतक्या अप्रतिम हरकती आहेत की, प्रत्येक हरकत अत्यंत बारकाईने न्याहाळावी. तालाच्या प्रत्येक मात्रेगणिक हरकत आहे आणि त्यामुळे चालीला एक सुंदर निमुळते "टोक" येते. प्रणयी गाणे आहे आणि चाल तशी साधी असली असली तरी मनाची लगेच पकड घेते. अर्थात, उडत्या तालामुळे हे शक्य होते. साधी चाल असून देखील, त्यात "गायकीला" कसा वाव मिळतो, याचे हे गाणे म्हणजे नमुना आहे. या गाण्यावर तालाचा इतका प्रभाव आहे की, ताल बाजूला ठेऊन, केवळ हरकती ऐकायच्या तर त्याला फार प्रयास पडतो.  
मघाशी मी लिहिताना, एक वाक्य लिहिले आहे, या रागाचे "मेघ" रागाशी फार जवळचे नाते आहे आणि जर का स्वरांची ठेवण नेमकी ठेवली नाही तर रागांची "गल्लत" होऊ शकते. खालील गाणे, माझ्या या म्हणण्याला "दाखला" म्हणून देता येईल. "सावन आये, या ना आये" हे, "दिला दिया दर्द लिया" या चित्रपटातील गाणे, आपण ऐकुया. गाण्याचे शब्द तर स्पष्टपणे, " मेघ" रागाशी जवळीक दाखवतात पण तरीही, पहिला अंतरा जिथे संपतो तिथे सतारीचे सूर आहेत, तिथे "ब्रिंदाबनी सारंग" दिसतो. खरतर, या रागाची उत्तम ओळख या गाण्यातून आपल्याला होते.


या गाण्यात चक्क दोन ताल आहेत. १] केरवा आणि २] त्रिताल. गाण्याची सुरवात त्रितालाने होते पण पुढे त्याच लयीत केरवा ताल मिसळतो. फारच सुंदर प्रकार आहे. या गाण्यात पहिला अंतर संपत असताना, "नि सा रे म प" ही जी सरगम आहे, तिथे हा राग सिद्ध होतो. रागदारी संगीताची आवड आणि ओळख करून घेण्यासाठी हे गाणे एक अप्रतिम उदाहरण म्हणून सांगता येईल. 

मंगेश पाडगावकरांनी अनेक चिरस्मरणीय भावगीते लिहिली आहेत. प्रस्तुत गीत हे त्यातील अजरामर स्वरूपाचे गीत आहे. वास्तविक, या कवितेचा ढाचा थोडासा "कथात्म" स्वरूपाचा आहे, क्वचित गद्याकडे झुकणारा आहे परंतु तरीही संगीतकार यशवंत देवांनी चाल लावताना, चाल कुठेही रेंगाळणार नाही आणि प्रवाहित्व कायम राहील, इकडे नेमके लक्ष दिले आहे. सुगम संगीतात, चाल कुठेही रेंगाळणार नाही, याकडे बारकाईने भान ठेवावे लागते. "भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी" या गीतातून, समर्थपणे, हा राग दिसून येतो. 


अरुण दाते यांनी, हे इतके मोठे गाणे असून देखील, अतिशय सुंदर गायले आहे. गाण्याच्या सुरवातीला वाजलेल्या सनईमधून, "ब्रिंदाबनी सारंग" रागाची झलक मिळते. खरतर, हे गाणे म्हणजे आत्ममग्न कथासूत्र आहे. अर्थात, याचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे शब्दानुरूप बदलेली चाल. लय तशीच कायम ठेऊन, सुरांत किंचित बदल करून, आवश्यक तो "भाव" सुरांतून व्यक्त करायचा. हा खेळ इथे फारच बहारीने साधला आहे. त्यादृष्टीने या गाण्यात वाद्यमेळाचे फारसे प्रयोग नाहीत आणि प्रत्येक अंतऱ्यात जवळपास तशीच " धून"कायम ठेवली आहे. 

आता आपण आणखी काही गाण्याच्या लिंक्स इथे बघू आणि या रागाची ओळख अधिक खोलवर समजून घेऊ. 

झुठी मुठी मितवा  - चित्रपट रुदाली 

साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वतांची 

संथ वाहते कृष्णामाई 

तिलक कामोद

कुठलीही कला, ही किती "अमूर्त" स्वरूपात असते हे जर जाणून घ्यायचे असेल तर त्या कलेचे शास्त्र अवगत करून घेणे अत्यावश्यक ठरते. संगीत आणि रागदारी संगीत याबाबतीत हा विचार फारच आवश्यक ठरतो. पूर्वीच्या काही संस्कृत ग्रंथात, स्वरांबद्दलची बरीच वर्णने वाचायला मिळतात आणि त्यानुसार, स्वरांचे रंग, देवता इत्यादी बाबी वाचायला मिळतात परंतु या वर्णनांना तसा "शास्त्राधार" सापडत नाही. बहुतेक वर्णने ही पारंपारिक संकेतावार आधारलेली आढळतात. याचाच वेगळा अर्थ, स्वरांचे सौंदर्य बघताना, स्वरांतून जाणवणारा "आशय" आणि त्याची व्याप्ती, हेच महत्वाचे असते. याच स्वरांतून, पुढे होणाऱ्या रागदारी संगीताबाबत हाच विचार प्रबळ ठरतो.  
इथे बरेचवेळा, मी रागांविषयी लिहिताना, अनेक भावछटांचा उपयोग करतो पण, ते केवळ, त्या रागाबाबत एक विशिष्ट चित्र मनासमोर उभे राहावे, इतपतच. अन्यथा, एकाच रागातून, एकापेक्षा अनेक भावनांचा आढळ अशक्य. यामागे नेमके म्हणायचे झाल्यास, आपल्याला परत त्या रागांच्या सुरांकडेच वळावे लागते. त्यामुळेच, रागदारी संगीतात, कुठलाही सूर हा "उगीच" म्हणून किंवा "चूष" म्हणून येत नाही. प्रत्येक सुरांमागे काहीना काहीतरी कार्यकारणभाव नक्की असतो आणि तो भाव जाणून घेणे, म्हणजे रागसंगीताचा अननुभूत आनंद घेणे!! 
"देस" राग आणि "तिलक कामोद" राग याबाबत हेच अतिशय महत्वाचे आहे. दोन्ही रागांत स्वर तेच आहेत पण, तरीही दोन्ही राग वेगवेगळे आहेत. हे नेमके कसे घडते? यामागे मुख्य कारण हेच आहे, दोन्ही रागांतील स्वरांचे "ठेहराव" वेगळे आहेत आणि स्वरांची खरी गंमत इथे दिसून येते. कुठला स्वर कशाप्रकारे घेतला की, त्या रचनेचे सगळे स्वरूप पालटून जाते, याचा प्रत्यक्षानुभव, हे दोन राग आलटून, पालटून ऐकले तर सहज ध्यानात येऊ शकते. गुरु-शिष्य परंपरा भारतीय संगीतात का आवश्यक आहे, यासाठी या दोन रागांचे उदाहरण चपखल होऊ शकते. 
आपल्या भारतीय संगीतात, "षडज-पंचम" भावाला निरातिशय महत्व आहे आणि या रागाचे वादी/संवादी स्वर तर "षडज/पंचम" हेच आहेत!!  

पंडिता केसरबाई केरकर हे नाव फार आदराने घेतले जाते. मला काही त्यांची मैफिल प्रत्यक्ष ऐकायचे भाग्य लाभले नाही परंतु त्यांच्या गायनाच्या अनेक रेकॉर्ड्स, सीडी ऐकायला मिळाल्या. अर्थात, प्रत्यक्ष मैफिलीतला आनंद जरी रेकॉर्ड ऐकण्यात तितका येत नसला तरी, आवाजाची जात, गोडवा, शैली इत्यादींचा आपल्याला आनंद घेता येऊ शकतो. आवाजाची जात थोडी "मर्दानी" भासते पण तरीही गायनाची पट्टी "काळी चार" च्या आसपास आहे. विस्ताराची लय, सप्तकाचा धुंडाळलेला जाणारा अर्थ तसेच निकोप, स्वच्छ आणि ताकदवान असा स्वर अशी काही खास वैशिष्ट्ये सांगता येतात. त्यात, आ-कार तर खासच म्हणावा लागेल. जयपूर घराण्याची खास वैशिष्ट्ये ऐकायला मिळतात म्हणजे गुंतागुंतीची तानक्रिया हे खास ऐकायला मिळते. 
  

या रचनेत आपल्याला ही सगळी वैशिष्ट्ये ऐकायला मिळतात. तान दुहेरी विणीची करून, तान बांधणे तसेच तानांचे व्यापक आकृतिबंध जाणीवपूर्वक योजणे, हा विचार अगदी स्पष्ट दिसतो. आणखी एक बारकावा इथे नोंदता येईल. ताना अति दीर्घ नसून, त्याचे छोटे छोटे आकृतिबंध त्यांनी स्वीकारले आहेत. त्यामुळे बरेचवेळा ताना द्रुतगती असल्याचा भास होतो. दुसरे युक्ती अशी दिसते, ठेक्याची लय फार विलंबित न ठेवता, त्याच्या दुप्पट गतीने ताना घ्यायच्या. याचा परिणाम असा होतो, श्रोत्यांचे चित्त जरादेखील विचलित होत नाही आणि गाण्याचा संपूर्ण आनंद मिळतो. 

 आता आपण, रागाच्या ललित स्वरूपाकडे वळूया. १९७७ साली आलेल्या "भूमिका" या चित्रपट या रागावर आधारित एक सुंदर गाणे आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री हंसा वाडकर, यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाला, संगीतकार वनराज भाटीया यांनी नितांत रमणीय गाणी दिली आहेत. प्रस्तुत गाणे, प्रीती सागर या गायिकेने गायले आहे. "My heart is beating" सारख्या पाश्चात्य संगीतावर आधारित गाण्याने प्रकाशात आलेली ही गायिका. हे गाणे गाउन, मात्र तिने रसिकांना चांगलाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. "तुम्हारे बिना जी ना लगे" हेच ते गाणे इथे ऐकणार आहोत. 


काहीशी लाडिक वळणाची चाल, ठुमरीच्या अंगाने गेलेल्या ताना इत्यादी खास बाबी या गाण्यात उठून दिसतात. पारंपारिक पंजाबी ठेक्यावर हे गाणे उचलून धरले आहे. तशी चाल  साधी आहे पण गोड आहे. प्रीती सागरने देखील तितक्याच गोडव्याने गायली आहे. 

"ये नीर कहा से बरसे" हे गाणे देखील याच रागावर आधारित आहे, "प्रेमपर्बत" चित्रपटातील अतिशय सुश्राव्य आणि गायकी ढंगाचे गाणे आहे. जयदेव आणि लताबाई, या जोडगोळीने खूपच अप्रतिम गाणी दिली आहेत आणि बहुतेक गाणी, चालीच्या दृष्टीने अवघड आणि लयीला कठीण अशी(च) आहेत. जेंव्हा हिंदी चित्रपट सृष्टीत, पाश्चात्य चाली, पाश्चात्य वाद्ये हाच संगीताचा "ढाचा" बनत चालला होता, त्यावेळी जयदेवने मात्र, अपवाद वगळता, आपली बहुतेक गाणी, ही भारतीय संगीतावर आणि त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे, कुठलेही गाणे केले तरी त्याला कुठेतरी रागदारी संगीताचा "स्पर्श" द्यायचा, याच हेतूने बनवली आणि तिथे मात्र कसलीही तडजोड केली नाही. याचा परिपाक असा झाला, त्यांची गाणी ही नेहमीच गायनाच्या दृष्टीने आव्हानात्मक झाली. 


या गाण्यातील पहिल्याच वाद्यमेळ्याच्या रचनेतून, आपल्याला तिलक कामोद रागाची झलक ऐकायला मिळते. पहिल्याच ओळीत, "ये बदरी कहा से आयी रे" ऐकताना, आपल्याला ही ओळख अधिक "घट्ट" झालेली आढळेल. या गाण्यात आणखी एक मजा आहे. पहिला अंतरा सुरु होतो तेंव्हाचे शब्द - "गहरे गहरे नाले, गहरा पानी रे" या ओळीत, हा राग बाजूला सारला जातो आणि तिथे "पानी रे" या शब्दावरील हरकत तर, या रागाशी संपूर्ण फारकत घेते. असे होऊन देखील, दुसऱ्या ओळीत चाल, परत "मूळ" रुपाकडे वळवून घेतली आहे. हे जे "वळवून" घेणे आहे, इथे संगीतकाराची दृष्टी समजून घेता येते. 

१९८२ मध्ये मराठीत आलेल्या "उंबरठा" चित्रपटात असेच एक अप्रतिम गाणे आपल्याला ऐकायला मिळते. हृदयनाथ मंगेशकरांच्या रचना देखील अशाच "गायकी" ढंगाच्या असतात, किंबहुना काहीवेळेस तर अति अवघड असतात. कवी वसंत बापटांची सघन शब्दकळा आणि मंगेशकरांची चाल, या गाण्यात अतिशय सुंदरपणे जुळून आली आहे. अर्थात, ही चाल मंगेशकरांनी आपल्याच बाबांच्या "वितरी प्रखर" या गाण्यावरून बेतलेली आहे, हे कबूल केले आहे पण तरीही नाट्यगीताचे स्वरूप लक्षात घेऊन, चित्रपटगीत करताना, आवश्यक ते फेरफार करावेच लागतात आणि त्या दृष्टीने, ही रचना ऐकण्यासारखी आहे. 


चालीवर खास मंगेशकरी ठसा तर आहेच पण तरीही बऱ्याच ठिकाणी, शब्दाप्रमाणे चालीला "वळण" दिल्याचे दिसून येईल.  वास्तविक तिलक कामोद राग तसा सरळ, गोड, फारशा अति वक्र ताना नाहीत,अशा प्रकारे बरेचवेळा सादर होतो पण तरीही अशा रागात अशा प्रकारचे अति अवघड तर्ज बनविणे, हे केवळ हृदयनाथ मंगेशकर(च) करू जाणे. या गाण्याच्या सुरवातीला, रचना मंद्र सप्तकात सुरु होते पण, एकदम "दे प्रकाश, देई अभय" इथे रचना जे काही अकल्पित वळण घेते, ते केवळ आणि केवळ, लताबाई(च) घेऊ जाणे, इतके अवघड आहे.  

रवी मी चंद्र कसा - वसंतराव देशपांडे

दिसलीस तू, फुलले ऋतू - सुधीर फडके 

हिया जरत रहत दिन रैन - मुकेश 

Saturday, 25 July 2015

अवर्णनीय देस



भारतीय रागसंगीतात असे बरेच राग सापडतात, जे "ख्याल" म्हणून अधिक प्रचलित न होता, उपशास्त्रीय किंवा सुगम संगीतात बरेच लोकप्रिय असतात. पूर्वी आपण, असे काही राग बघितले आहेत, जसे पिलू या रागाचे असेच नाव अग्रभागी येते. याचे मुख्य कारण, बहुदा या रागाचा उगम लोकसंगीतातून झाला असावा. याबाबत असे देखील विधान करता येईल, "ख्याल" म्हणून या रागात "भरणा" करणे जरा अधिक अवघड होत असणार. तसे बघितले तर, शास्त्रीय वादकांत, हे राग बरेच प्रसिद्ध आहेत आणि वादनातून, अशा रागांच्या भरपूर रचना आणि त्या देखील विविध भावनांशी संलग्न अशा, रचना ऐकायला मिळतात. असे असले तरी देखील, ज्या हिशेबात सुगम संगीतात आणि उपशास्त्रीय संगीतात, अशा रागांचे जे दर्शन घडते, ते केवळ अपूर्व असते.
देस रागाबाबत असेच काहीसे म्हणता येईल. थोडे खोलात शिरलो तर, देस रागाच्या अनेक छटा, भारतातील विविध राज्यांच्या लोकसंगीतातून आढळतात. उदाहरण द्यायचे झाल्यास, देस रागाच्या, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब इथल्या लोकसंगीतात या रागाच्या प्रसंगानुरूप छटा ऐकायला मिळतात. अर्थात, प्रसिद्ध गायक कुमार गंधर्वांनी याबाबत भरपूर संशोधन करून, चक्क नवीन रागांची निर्मिती केली आहे. 
देस रागाबाबत म्हणायचे झाल्यास, या रागावर लोकसंगीताचा बराच पगडा दिसतो तरीही, शास्त्रीय संगीताच्या कलाकारांनी त्याला "संपूर्ण" रागाचे स्वरूप देण्यात यश मिळवले आहे. आरोही सप्तकात "गंधार" आणि "धैवत" स्वर वर्जित तर अवरोही सप्तकात सगळे स्वर उपयोगात आणले जातात, म्हणजे औडव-संपूर्ण जातीचा हा राग आहे. स्वरावलीत, दोन्ही निषाद आणि त्यातल्या त्यात कोमल निषाद स्वराला या रागात अतिशय महत्व आहे. दोन्ही निषाद सांभाळून, या रागाची बढत करायची, यातच या रागाचे खरे कौशल्य आहे. या रागाची "मींड" बघायला गेलो तर मात्र, रिषभ स्वर आणि त्याच्या जोडीने मध्यम आणि गंधार स्वर घेऊन, जे स्वरमाला तयार होते, ती अपूर्व अशी असते.

आता आपण, उस्ताद अमजद अली खानसाहेबांनी वाजवलेला राग देस ऐकू. उस्ताद अली अकबर खान साहेबांनी सरोदवर प्रस्थापित केलेले "गायकी" अंग आणखी वेगळ्या पायरीवर नेण्याचे काम, उस्ताद अमजद अली खान, यांनी फार समर्थपणे केले आहे. विशेषत: वाजत्या तारेवर, बोटातील नखीच्या  सहाय्याने, मींड काढण्याची करामत तर विशेष ऐकण्यासारखी असते. तसेच तान घेताना, एखादा स्वर लांबवत, त्यातून "गमक" या अलंकाराचे यथार्थ दर्शन, त्यांच्या वादनातून आपल्याला ऐकायला मिळते. 


इथल्या या वादनात, आलापीपासून सुरवात करीत, हळूहळू रागाची "बढत" घेत, राग सर्वांगाने खुलवला आहे. गत वाजवताना, एखादी जीवघेणी हरकत घेऊन, ऐकणाऱ्याला चकित करण्याची खासियत तर खासच आहे. 

वास्तविक, मेहदी हसन हे नाव गझल गायकीतील अत्यंत आदराने घ्यायचे नाव, परंतु त्यांनी देस रागात गायलेली ठुमरी देखील अप्रतिम आहे. या ठुमरी गायनाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, खान साहेबांनी "गझल" गाताना ज्याप्रकारे "गायकी" पेश करतात, त्यापेक्षा इथे संपूर्ण वेगळा आविष्कार, त्यांच्या गायकीत दिसतो आणि मजेचा भाग म्हणजे, ठुमरी गायनाची सगळी वैशिष्ट्ये ऐकायला मिळतात. हे तर खरेच आहे, गझल गायकी आणि ठुमरी गायकी, यांचा गायकी "अंदाज" हा वेगळा असतो आणि तसा तो आविष्कृत होणे गरजेचे असते. 


शब्दार्थाने ही ठुमरी वाचल्यास, या ठुमरीमध्ये ढग, पाउस, याचेच वर्णन आहे पण तरीही, देस रागात "तर्ज" बांधली आहे. अर्थात, रचनेत, पुढे "बदरा" हा शब्द येतो, तिथे उस्तादांनी काही क्षणात "मल्हार" रागाची झलक दाखवली आहे!! हा भाग खरच असामान्य वकुबाचा आहे. रचनेत, निषाद स्वरावर केलेली "आंदोलीत" कामगत तर थक्क करणारी आहे. अर्थात, इथे परत मध्यम स्वरातून, गंधार स्वराचा आधार घेऊन, निषाद स्वरावरील ठेहराव जो, मिंडेद्वारे घेतला आहे, ते देखील खास अनुभवण्यासारखे आहे. 

आशा भोसल्यांनी हिंदीत गायलेल्या अजरामर गाण्यांच्यात या गाण्याचा समावेश नक्की करता येईल. "बेकसी हद पे" हेच ते अप्रतिम गाणे. आवाजाचा विस्तृत पल्ला, तारता मर्यादा सहज,वेगाने आणि अगदी गीताच्या प्रारंभी देखील घेणे, यात कुणाही गायिकेला बरोबरी करणे अशक्य!! या गाण्यात देखील याच विशेषाचा विशेषत्वाने प्रत्यय येतो. अर्थात, केवळ स्वरांच्या फेकीचा पल्ला, हेच भूषण नसून, प्रसंगी वाद्यांचा स्वनगुण तंतोतंतपणे गळ्यातून काढून, चकित करण्याचे अलौकिक सामर्थ्य या गळ्यात आहे. 


या गाण्याच्या दुसऱ्या ओळीत, ज्या प्रकाराने लय आणि स्वरांची उंची, आशाबाईंनी गाठली आहे, ती खास ऐकण्यासारखी आहे. देस रागाचे ओळख म्हणून हे गाणे घेता येईल पण तरीही, गाण्यात अनेक ठिकाणी, इतर रागांचे स्वर देखील आढळतात!! खरतर, सुगम संगीतात ज्या सर्जनशीलतेच्या शक्यता असतात, त्या सगळ्या शक्यता, आशा भोसल्यांच्या गळ्यातून शक्य होतात.आवाजावरील नियंत्रण आणि ध्वनीवैशिष्ट्ये याचा अचूक वापर,यामुळे ऐकणाऱ्याला एक समृद्ध गायन ऐकल्याचा आनंद मिळतो.या आवाजाचे थोडक्यात मूल्यमापन करायचे झाल्यास, कंठ्संगीतातील ध्वनीपरिणामांच्या शब्दावलीत भर टाकून, सांगीत शक्यतांची नवी परिमाणे सादर केली. जागतिकीकरण झालेल्या संगीतात सुखाने वावरणाऱ्या एका मोकळ्या, गात्या आवाजाचा त्यांनी आदिनमुना पेश केला आहे. 

वसंत देसाई, हे बहुदा एकमेव संगीतकार असावेत, ज्यांनी हिंदी चित्रपट, मराठी चित्रपट आणि मराठी रंगभूमी इथे लीलया वावर केला आणि तसे करताना, त्या ठिकाणी, स्वत:ची स्वतंत्र मुद्रा उमटवली. शास्त्रीय संगीताचा गाढा अभ्यास, चाल निर्माण करताना त्यात पुरेशी लवचिकता ठेवणे, जेणेकरून गाताना विस्तारशक्यता सहज निर्माण करता येणे शक्य. गायकी ढंगाच्या चाली करण्यात वाकबगार परंतु त्याचबरोबर, आपण कुठल्या माध्यमासाठी संगीत रचना करीत आहोत, याचे नेमके भान राखून, चाली निर्माण करण्याचा असामान्य ताकदीचा वकूब. मराठी रंगभूमीवर, संगीतकार म्हणून त्यांचा वावर प्रामुख्याने "ललित कलादर्श" या संस्थेपुरता अधिक करून होता. वसंतरावांनी तयार केलेली अशीच एक मनोरम रचना इथे ऐकुया. "देह देवाचे मंदिर" ही, उदयराज गोडबोले यांनी गायलेली रचना, देस रागाशी नाते सांगणारी आहे.  


उदयराज गोडबोले यांचा थोडा "खडा" आवाज म्हणजे तार सप्तकात अधिक रमणारा आणि हे ध्यानात ठेऊन, वसंतरावांनी या गाण्याचे "तर्ज" बांधली आहे. "प्रीतीसंगम" नाटकातील हे गाणे, देस रागाची ओळख करून देते. पहिल्या सुरांपासून तार स्वरांत गाणे सुरु होते. गाण्याची चाल मात्र, ज्याला "उडती छक्कड" म्हणता येईल अशा धर्तीची आहे आणि त्याला ढोलकीची साथ देखील अतिशय सुरेख आहे. अर्थात, पारंपारिक नाट्यगीताचा बाज नसून, थोडा भावगीताचा बाज वापरलेला आहे. 

आता आपण, सरदारी बेगम चित्रपटातील ठुमरी सदृश, चित्रपट गीत ऐकुया. "सांवरिया देख जरा इस ओर" हेच ते गाणे आहे. आरती अंकलीकर आणि शुभा जोशी यांनी एकत्रितपणे ही रचना गायलेली आहे. देस रागाशी या रचनेचे खूप जवळचे नाते सांगता येते. वनराज भाटीया, या संगीतकाराने ही रचना बांधली आहे. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा हा संगीतकार परंतु व्यावसायिकदृष्ट्या काहीसा मागे पडलेला. 


वास्तविक या दोघी शास्त्रीय संगीतातील गायिका पण तरीही ठुमरीसदृश रचना असूनही सादरीकरण अतिशय सुंदर झाले आहे. गाण्याच्या पहिल्या सुरापासून देस रागाची आठवण येते. एखाद्या उपशास्त्रीय रचनेचे, चित्रपट गीतात रुपांतर करताना, बरेचवेळा अनावश्यक काटछाट केली जाते आणि मूळ सौंदर्याला बाधा आणली जाते. तासाला कुठलाच प्रकार इथे नाही. अत्यंत सुंदर लयीत गाणे पुढे सरकत जाते आणि गाताना, हरकती, अर्धताना वगैरे अलंकार सहज येतात. यात, सहज येतात, हे फार महत्वाचे!!  

आता आपण अशीच काही गाणी बघू, ज्यायोगे देस राग आपल्या आठवणीत कायमचा राहील. 

गोरी तोरे नैन कजर बिना कारे 

आपको प्यार छुपाने की बुरी आदत है 

Monday, 20 July 2015

अंतर्मुख शिवरंजनी



क्षितिजावर संध्याकाळची रंगांची उधळण चालू असताना, अचानक एखादा प्रचंड ढग येउन, त्या रंगांची नक्षी पुसून, फिकट राखाडी रंग दिसावा आणि मनात कुठल्यातरी आर्त, हळव्या आठवणींच्या सुट्या आठवणी याव्यात, त्याप्रमाणे शिवरंजनी रागाचे स्वरूप मला वाटते. खरतर याचा पाच स्वरांचा कारभार. भूप रागातील शुध्द गंधार, कोमल केला की लगेच शिवरंजनी राग मिळतो. गमतीचा भाग म्हणजे याही रागात, "मध्यम" आणि "निषाद" स्वर वर्ज्य आहेत, म्हणजे रागाचे स्वरूप "औडव-औडव" असे आहे. 
गमतीचा भाग म्हणजे हा राग मैफिलीत फारसा गायला जात नाही परंतु अनेक वादकांनी मात्र या रागाची अनंत रूपे दर्शवलेली आहेत, पण हे तर रागदारी संगीताचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. थोडे तांत्रिक भागात शिरायचे झाल्यास, या रागातील, "रिषभ","गंधार", "धैवत" हे स्वर द्विश्रुतिक आहेत आणि या चलनातुनच या रागाची खरी ओळख होते. वास्तविक, "श्रुती" विषय फार किचकट आणि थोडा दुर्बोध आहे परंतु भारतीय संगीतात त्यांचे महत्व अपरिमित आहे. 
आपल्याला बरेचवेळा असे आढळते, अनेक रागांतील स्वर सारखेच आहेत पण तरीही ते राग, स्वत:ची ओळख स्वतंत्रपणे राखून असतात आणि हे असे घडते, यामागे, स्वरांतर्गत असणारी श्रुतीव्यवस्था कारणीभूत असते.  
पूर्वीच्या ग्रंथात या रागाचे वर्णन करताना, "शिवरंजनी" या शब्दाची फोड केलेली आढळते. "शिव" + "रंजनी" - वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, रुद्र शिवाला प्रसन्न करणारा राग म्हणजे "शिवरंजनी" असे केले आहे. एका दृष्टीने हे वर्णन चपखल बसणारे आहे परंतु कुठलाही राग, असा एकाच साच्यात बसवणे, अवघड व्हावे, अशा रचना ऐकायला मिळतात आणि आपले रागसंगीत किती श्रीमंत आहे, याची प्रचीती देतात.
कवी अनिलांची एक अतिशय सुंदर कविता आहे. मुक्तछंदात आहे. 
"सारेच दीप कसे मंदावले आता 
ज्योती विझू विझू झाल्या 
की झड घालून प्राण द्यावा पतंगाने 
असें कुठेच तेज नाही!! 
थिजले कसें आवाज सारे? 
खडबडून करील पडसाद जागे 
अशी कुणाची साद नाही?" 
खरेतर या ओळी, या रागाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून सांगता येईल.
या रागात तसे बघितले तर वादकांचे प्राबल्य अधिक दिसते आणि सुगम संगीतात तर हा राग प्रचंड प्रमाणात पसरलेला आहे. 
 आता इथे आपण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची बांसुरी ऐकू. मुळात या रागाची गंभीर बैठक, स्वभाव अत्यंत "ठाय" लयीतला, यामुळे, या रागातील पंडितजींचे वादन खुलले नाही तर नवल!! 


ही रचना थोडी काळजीपूर्वक ऐकली तर सहज समजून घेता येईल, पंडितजींनी इथे "कोमल गंधार" च्या जोडीने "शुद्ध गंधार" देखील वापरलेला आहे पण, त्याचा वापर इतका अल्प आणि बेमालूमपणे लयीत मिसळलेला आहे की, प्रथमत: या प्रयोगाची नेमकी जाणीव होत देखील नाही आणि हे या कलाकाराचे वैशिष्ट्य. 
बाबूजी उर्फ सुधीर फडके म्हणजे मराठी संगीतातील सन्मान्यजनक नाव. स्पष्ट तरीही अत्यंत भावपूर्ण उच्चार, कवितेतील आशय नेमका जाणून घेऊन, आशयाची अभिवृद्धी सुरांच्या माध्यमातून तितक्याच समर्थपणे मांडणारे रचनाकार, म्हणून अपरिमित ख्याती मिळवणारे. खरतर चित्रपट गीतांत भावपूर्ण चालींना जन्म देऊन, त्यांनी आपले नाव अजरामर केले आहे. इथे आपण, अशाच एका अप्रतिम गाण्याचा आस्वाद घेणार आहोत. "जगाच्या पाठीवर" या नितांतसुंदर चित्रपटातील - "एक धागा सुखाचा" हे गाणे, शिवरंजनी रागाची आठवण करून देते.  


माडगूळकरांच्या चित्रदर्शी शैलीचा, स्वरांच्या माध्यमातून, इथे जो काही आविष्कार केला आहे, त्यातून, "अंतर्मुख" भावावस्था नेमकेपणी जाणून घेता येते. 
"या वस्त्राचे विणतो कोण? एक सारखी नसती दोन; 
कुणा न दिसले त्रिखंडात या, हात विणकऱ्याचे." 
अशी प्रश्नार्थक सुरवात करून, तरीही असामान्य गेयतापूर्ण आणि प्रासादिक रचना करणारे माडगुळकर आणि त्याला चिरंजीवित्व देणारे बाबूजी!! 

हिंदी चित्रपट संगीतात, गूढ गाण्यांना तशी भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे. अगदी "महल" या चित्रपटापासून सुरु झालेली अशा प्रकारची गाणी, रसिकांच्या मनात ठाण मांडून बसलेली आहेत. याच परंपरेतील एक गाणे इथे ऐकुया. "कही दीप जले कही दिल" हे लताबाईंच्या आवाजात प्रसिद्ध पावलेले गाणे, शिवरंजनी रागाची ओळख करून देतात. खरतर गाण्याची सुरवात वेगळ्या सुरांतून होते, गूढ वातावरण तयार होते परंतु गाण्याचा सुरवातीचा दीर्घ आलाप आणि शाब्दिक चाल यात सत्कृतदर्शनी फरक वाटला नसला नसला तरी तो फरक आहे आणि या शब्दांच्या सुरावटीत हा राग लपलेला आहे. 
अर्थात, अखेर हे चित्रपटातील गाणे आहे आणि इथे गाण्याची पार्श्वभूमी महत्वाची. या दृष्टीकोनातून, पुढील आलाप आणि चाल, इथे हा राग आढळत नाही. संगीतकार हेमंतकुमार यांची खुबी अशी की कालस्तरावरील लय तशीच कायम ठेऊन, स्वरिक लय किंचित बदलेली आहे आणि गाण्याचा परिणाम साधलेला आहे. 
गाणे केरवा तालात आहे पण, मात्रांचे वजन इतके वेगळ्या प्रमाणात ठेवलेले आहे की प्रथमत: हा केरवा ताल वाटतच नाही. खरतर गाण्यात रूढार्थाने ताल वाद्य नाही. बेस गिटारचा वापर केलेला आहे आणि याचा परिणाम गाण्यातील गूढत्व वाढण्याकडे होतो आणि हेच या गाण्याचे खरे यश. 


संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडगोळीने बरीच अप्रतिम गाणी आहेत. अगदी मोजके सांगायचे झाल्यास, या जोडीने जी गाणी दिली आहेत, त्या गाण्याचा "मुखडा" नेहमी ऐकण्यासारखा असतो. किंबहुना, संगीतक्षेत्रात एक पक्का समज आहे, गाण्याचा मुखडा सुंदर बनविणे, म्हणजे गाण्याचे खरे यश असते आणि हे जर खरे मानले तर या जोडीची गाणी यशस्वी मानता येतील. प्रस्तुत गाणे असेच अत्यंत श्रवणीय गाणे आहे आणि गाण्यचा "मुखडा" तर खास आहे. 

"बहुत दिन बीते" हेच ते गाणे आहे. गाण्याच्या सुरवातीला व्हायोलीनचा अत्यंत "ठाय" लयीत तुकडा आहे आणि हे व्हायोलिनचे सूर(च) शिवरंजनी राग दर्शवतात. या गाण्याची "गायकी" हा तर खास अभ्यासाचा विषय ठरावा. शब्दोच्चार कसे असावेत आणि ते करताना, सुरावटीतून, त्याच शब्दांचा अर्थ अधिक खोलवर दाखवून द्यावा, ही खासियत असते आणि प्रत्येकाला ती जमत नाही. अतिशय धीमा केरवा ताल आहे पण, खरी गंमत आहे ती, गाण्यातील असंख्य हरकती आणि तानांची. प्रसंगी रागाला बाजूला सारून, त्याच लयीत वेगळे सूर वापरणे, हा व्यामिश्र सांगीतिक प्रकार आहे. लताबाईंच्या आवाजातील "तारता" पल्ला किती विस्तृत आहे, या गाणे ऐकताना समजून घेता येते.  

वास्तविक किशोर कुमारने संगीताचे कधी पद्धतशीर शिक्षण घेतलेले नव्हते पण तरीही भारतीय संगीतातील हा एक अद्भुत चमत्कार मानला जातो. या गायकाच्या गळ्याची "रेंज" केवळ अतुलनीय अशीच होती. अतिशय मोकळा आवाज, अत्यंत सुरेल तसेच लवचिक आवाज, ही त्याची काही खास वैशिष्ट्ये सांगता येतील. अर्थात, या बाबींचा चुकीचा संदेश आपल्याकडे पसरला. किशोर कुमारने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले नाही म्हणून आपल्याला देखील त्याची गरज नाही, असला अत्यंत खुळचट समज पसरला!! याच मोकळ्या आवाजाचा, संगीतकार राहुल देव बर्मनने, या गाण्यात अतिशय सुरेख वापर करून घेतलेला आहे. रूढार्थाने, हे गाणे रागदारी संगीतावार आधारित आहे, असे अजिबात म्हणता येणार नाही परंतु गाण्याची रचना, त्यातील हरकती, आलाप इत्यादी अलंकार इतक्या खुबीने वापरले आहेत की आपण, मनोमन संगीतकाराला दाद देतो. 


"मेरे नैना सावन भादो" हे ते गाणे आहे. खरेतर. हे गाणे शिवरंजनी रागावर आधारित आहे का? असा माझ्या देखील मनात संशय आहे कारण, सुरवातीचे स्वर आणि नंतरची चाल, याचा सत्कृतदर्शनी काहीही नाते लावता येत नाही पण, अखेर संगीतकार राहुल देव बर्मनची हीच तर खासियत आहे. आणखी एक गंमत. गाण्याचा ताल केरवा आहे पण, हा संगीतकार, कुठलाच भारतीय ताल, पारंपारिक पद्धतीने वापरत नसून, तालाच्या बाबतीत, या संगीतकाराने इतके प्रयोग केले आहेत की तो सगळा खास अभ्यासाचा विषय आहे. 
या गाण्यातील गिटार वाद्याच्या झंकारातून, तालाची जाणीव होते. पुढे गाण्यात तबल्याच्या मात्रा आहेत पण त्या सरळ, स्पष्टपणे ऐकायला येत नाहीत. 

आता मी रागाशी नाते सांगणाऱ्या गाण्याच्या लिंक्स देऊन, हा लेख इथेच संपवतो. 

बहारो फुल बरसाओ मेरा महेबूब आया है 

सावळाच रंग तुझा 

ओ मेरे शाहे खुबां 


अवखळ आनंदी खमाज



सर्वसाधारणपणे उर्दू शायरीत एकतर कमालीचे दु:ख किंवा प्रणयी छेडछाड तसेच काही प्रमणात उदात्त विचार भरपूर वाचायला/ऐकायला मिळतात. बरेचवेळा या भावनांचे थोडे अतिरंजित उदात्तीकरण देखील वाचायला मिळते. आता इथे हाफिज होशियारपुरी या शायरने अशाच प्रकारची भावना व्यक्त केली आहे.
"जमानेभर का गम या इक तेरा गम, 
ये गम होगा तो कितने गम ना होंगे" 
असे लिहून त्याने प्रणयी तडफड व्यक्त केली आहे. वास्तविक, एक कविता किंवा गझल म्हणून या रचनेत तसे फारसे नाविन्य नाही, वेगळा विचार नाही तसेच असामान्य असा आशय व्यक्त होत नाही पण, याच शब्दांना संगीताची जोड मिळाली की लगेच हेच शब्द आपल्या मनात रुतून बसतात. 
उस्ताद मेहदी हसन साहेबांनी हीच कमाल, खमाज रागाच्या सहाय्याने अप्रतिमरीत्या सादर केली आहे. मी इथे मुद्दामून गझलेच्या पहिल्या ओळी दिल्या नाहीत पण, आता देतो. 
"मुहब्बत करनेवाले कम ना होंगे,
तेरी महफ़िल मे लेकिन हम ना होंगे" 
मेहदी हसन यांची ही अतिशय प्रसिद्ध रचना खमाज रागावर आधारित आहे. 


  शब्दांचे अचूक उच्चारण, खमाज रागावर आधारित असले तरी गझल गायकीचे स्वत:चा असा खास "खुशबू" असतो, त्याची यथार्थ जाणीव करून देणारी गायकी आणि आपण, राग सादर करत नसून, त्या रागाच्या सावलीत राहून, शायरीमधील आशय अधिक अंतर्मुख करीत आहोत, हा विचार, हे सगळे गुण या रचनेत अप्रतिमरीत्या ऐकायला मिळतात. रागाच्या सुरांची मदत तर घ्यायची पण, शायरीला प्राधान्य द्यायचे, अशी दुहेरी कसरत मेहदी हसन खरोखरच अप्रतिमरीत्या सादर करतात. कुठेही शब्दांना म्हणून दुखवायचे नाही, ही आग्रह तर प्रत्येक ओळीच्या गायकीतून दिसून येतो. 
"अगर तू इत्तफाकन मिल भी जाये, 
तेरी फुरकत से सदमे कम ना होंगे" 
या ओळी, माझे वरील म्हणणे तुम्हाला पटवतील. वास्तविक, पहिली ओळ खमाज रागापासून थोडी दूर गेली आहे पण, लगेच दुसऱ्या ओळीत, गायकाने चालीचे वळण, योग्य प्रकारे आणून, आपल्या बुद्धिमत्तेचा अफलातून प्रत्यय दिला आहे. 
इथे मी थोडी गंमत केली आहे. लेखाचे शीर्षक "अवखळ आनंदी खमाज" असे दिले आहे पण, वरील रचना तर या भावनेपासून फार दूर आहे. हेच तर भारतीय संगीताचे वैशिष्ट्य आहे. एखाद्या रागाचे नेहमी एकाच भावनेत वर्णन करणे, सर्वथैव अशक्य!! रिषभ वर्जित आरोही सप्तकात दोन्ही निषाद  बाकीचे सगळे स्वर शुध्द लागतात तर अवरोही सप्तकात सगळे स्वर लागतात पण, निषाद फक्त कोमल वापरला जातो. वादी स्वर गंधार तर संवादी स्वर निषाद असलेल्या या रागाची खरी ओळख तुम्ही (कोमल) निषाद कसा लावता आणि तो लावताना पुढच्या षडजाला किंचित स्पर्श करून अवरोही सप्तकाकडे कसे वळता, या कौशल्यावर आहे. खरे तर या रागात संपूर्ण "ख्याल" फारसे आढळत नाहीत. 
वेगळ्या भाषेत, ख्याल गायक, या रागाकडे तसे फार बघत नाहीत असे दिसते. परंतु वादकांचे मात्र अलोट प्रेम या रागाला लाभले आहे तसेच सुगम संगीतात, या रागावर आधारित भरपूर रचना आढळतात. हे थोडेसे पिलू रागासारखे झाले.

आता आपण, उस्ताद विलायत खानसाहेबांचा अप्रतिम खमाज ऐकू या. उस्ताद विलायत खान म्हणजे सतार वादनात स्वत:चे "घराणे" निर्माण करणारे कलाकार. वास्तविक सतार म्हणजे तंतुवाद्य, म्हणजेच वाद्यावर "मिंड" काढणे तसे अवघड काम पण तरीही, सतारीच्या तारेवरील "खेंच" आणि मोकळी सोडलेली तार, यातून ते असा काही असमान्य सांगीतिक वाक्यांश "पेश" करतात की ऐकताना रसिक अवाक होतो. विशेषत: द्रुत लयीत, गत संपूर्ण सप्तकाचा आवाका घेत  असताना,मध्येच "अर्धतान" घेऊन, सम, ते ज्याप्रकारे  गाठतात, तो प्रकार तर अविस्मरणीय असाच म्हणायला हवा. 


या वादनात उस्तादांच्या कौशल्याची पुरेपूर प्रचीती येते. जरा बारकाईने ऐकले तर सहज ध्यानात येईल, वादन "जोड" आणि "झाला" यांच्या मध्ये किंचित गुंतलेले असताना, एके ठिकाणी ठुमरी अंगाची तान घेतली आहे पण तिचे अस्तित्व किती अल्प आहे. आणखी विशेष म्हणजे "जोड" वाजवताना, एके ठिकाणी, तारेवर किंचित दाब देऊन, स्वर रेंगाळत ठेवला आहे, म्हणजे बघा, लय मध्य लयीत चाललेली आहे पण, इथे तान सगळी न घेता मध्येच किंचित खंडित करून त्या रेंगाळलेल्या स्वरावर संपवलेली आहे. फार, फार अवघड कामगत आहे. 
कवी अनिलांच्या बऱ्याच कविता, गीत म्हणून रसिकांच्या समोर आल्या आहेत. त्यातलीच ही एक रचना, खमाज रागाशी मिळती जुळती आहे. अर्थात, हे गाणे, गीत म्हणून लिहिले नसल्याने, कविता म्हणून देखील फार सुरेख रचना आहे. संगीतकार यशवंत देवांनी चाल देखील फार सुरेख लावली आहे. मुळात यशवंत देव हे कवी प्रकृतीचे संगीतकार असल्याने, ते कवीच्या भावना फार नेमक्या दृष्टीने अभ्यासतात आणि शब्दांना सुरांचा साज चढवतात. देवांच्या चालीत, कवितेचे मोल, त्यांनी जाणलेले सहज दिसून येते आणि चाल लावताना, ओळीतील कुठल्या शब्दाने, कवितेचा आशय अधिक गहिरा होईल, याकडे लक्ष दिलेले आपल्या देखील लक्षात आणून देतात. त्यांची बहुतेक गाणी तपासली तर असे दिसून येईल, गाण्याच्या पहिल्याच ओळीत, कवितेतील नेमका शब्द पकडून, त्यावर नेमका "जोर" देऊन, कवितेतील आशय व्यक्त करतात. इथे देखील, त्याचा हाच आग्रह दिसून येतो. 


"वेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर जळते उन, 
नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फुला" 

प्रणयी ढंगाची कविता आहे. या ओळीतील, "माध्यान्ह" हा शब्द आणि पुढे "जळते उन" हे शब्द ऐका. दुपारचा रखरखाट आहे, डोके उन्हाने तापले आहे आणि असे असून देखील, माझ्या प्रिये, तू कोमेजून जाऊ नकोस. या संदर्भात वरील शब्द ऐकावेत म्हणजे, "शब्दप्रधान गायकी" म्हणजे क्काय याचे आपल्याला उत्तर मिळेल.  

हिंदी चित्रपट गीतांत देखील खमाज राग भरपूर पसरलेला आहे. दिलीप कुमारच्या "देवदास" चित्रपटात अशीच अत्यंत मनोरम अशी रचना ऐकायला मिळते. मुबारक बेगमच्या खणखणीत आवाजात ही चीज ऐकायला फारच बहारीचे वाटते. 


"वो ना आयेंगे पलट कर,उन्हें लाख हम बुलाये" हीच ती साहीरची अफलातून रचना. खरतर गाणे फार थोडा वेळ, चित्रपटात ऐकायला मिळते पण तरीही सुरांची, स्वत:ची अशी खासियत असते, ज्यायोगे एखादा सूर देखील आपल्या मनावर परिणाम करून जातो. इथे तसेच घडते. मुबारक बेगमचा स्पष्ट, खणखणीत आवाजाने, खमाज रागाची झलक देखील मनाला मोहवून जाते. 

मराठी भावगीतात असेच एक मानाचे पान राखून असलेली रचना ऐकायला मिळते. मानील वर्मांच्या आवाजात "त्या चित्तचोरट्याला का आपुले मी" ही रचना, खमाज रागाशी फार जवळचे नाते सांगून जाते. कविता म्हणून, गझल सदृश रचना आहे. मधुकर गोलवळकरांनी अतिशय सुंदर चाल लावून, या कवितेला अप्रतिमरीत्या सादर केले आहे. 


माणिकबाईंचा किंचित "नक्की" स्वरांतला आवाज परंतु शास्त्रीय संगीताच्या रियाजाने, आवाजाला घोटीवपणा प्राप्त झालेला. सहजता आणि संयमितपणा हे त्यांच्या गायकीचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागते. तसेच त्यांनी मराठी भावगीत गायनात उत्तरेचा रंग आणि ढंग व्यवस्थितपणे रुजवला आणि हे वैशिष्ट्य, ही रचना ऐकताना आपल्याला सहज दिसून येईल. गायकी ढंगाची चाल आहे, त्यामुळे गाण्यात, "ताना","हरकती" भरपूर आहेत तसेच तालाच्या गमती जमती देखील आहेत. शास्त्रीय संगीताचा रियाज असल्याने, गायनात नेहमी विस्ताराच्या जागा, त्या निर्माण करतात. याचा परिणाम, गाणे ऐकायला अतिशय वेधक झाले आहे. 

आता आपण या रागावरील आणखी रचना ऐकुया. त्या गाण्याच्या खालील प्रमाणे लिंक्स आहेत. 

नजर लागी राजा तोरे बंगले पर

तोरा मन बडा पापी