Thursday, 19 June 2014

साउथ आफ्रिका-भाग ४



एकूणच इथला भारतीय समाज, हा गतानुगतिकतेत अडकलेला आहे. प्रचंड अंधानुकरण आणि “बाबा वाक्यं प्रमाणम!!: हे इथल्या जीवनाचे प्रमुख सूत्र मांडता येईल. ज्या प्रमाणे मुली नको तितक्या पुढारलेल्या आहेत, त्याच प्रमाणे मुले देखील, अमेरिकन संस्कृतीचे तसेच अनुकरण करीत आहेत,  न्यूयॉर्क मधली fashion हा इथल्या जीवनाचा मूलमंत्र आहे. केसांचे वळण(जीवनाला कसलेच “वळण” नाही!!), कपडे त्याच प्रमाणे घालायचे इत्यादी.  एक गंमत सांगतो, इथे, युरोप प्रमाणे, संध्याकाळी “अंघोळ” करायची पद्धत आहे आणि या पद्धतीतून, कुणीही सुटलेले नाही! सकाळी, फक्त तोंड धुवायचे आणि मेकअप करून, ऑफिसला धावायचे, हा दैनंदिन आचार आहे. युरोपमध्ये ठीक आहे, तिथे वर्षातील आठ महिने, थंडी असते, पण तसा इथे प्रकार नाही पण, तिथे तशी पद्धत आहे ना, मग आपण ती इथे तशीच उचलायची!! यांचे दुपारचे जेवण म्हणजे, बहुतांशी एखादे sandwith इतपतच असते. सगळा जोर, संध्याकाळवर!! त्यामुळे, इथे संध्याकाळी, सातच्या सुमारास जेवण घेण्याची पद्धत आहे, अगदी युरोप, अमेरिकेप्रमाणे!! जेवण झाले की, मग “अंघोळ” करायची!! समजा, शुक्रवार, शनिवार असला तर मग बहुदा बाहेरच जेवण करायचे!! नंतर, मग नाईट क्लब आहेतच!! नाईट क्लब संस्कृतीतून कुठलाही वयोगट सुटलेला नाही. मुलगा/मुलगी वय वर्षे दहा ते अकरा झाले की त्यांना बाहेर उंडारायला परवानगी मिळते. त्यातून,अनोळखी जोडप्यांची  शय्यासोबत, कधीतरी मजा म्हणून, जोडप्यात अदलाबदल!! इथे, सेक्स याला कसलाही प्रतिबंध नाही. वयाची साठी उलटली तरी देखील विवाहबाह्य संबंध उत्साहात चालू असतात. एक, माझ्याच ओळखीचे उदाहरण देतो. मी, महिन्द्रमध्ये असताना, माझ्या घरी एक भारतीय वंशाचा, साठी गाठायला आलेला माझा मित्र राहायला होता. तो, मुळचा डर्बनचा पण, सेन्चुरियन येथे त्याला नोकरी मिळाल्याने आणि मी तिथेच राहत असल्याने, त्याने माझी परवानगी घेऊन, रीतसर मुक्काम, जवळपास सहा महिने तरी होता. पूर्वी, आम्ही, UB group मध्ये एकाच कंपनीत असल्याने, आमची चांगली ओळख होती. मला पण, एक चांगली कंपनी मिळाली होती. त्यामुळे, त्याच्या घरात माझे नाव चांगलेच परिचित होते, अगदी, मुलगा/मुलगी पर्यंत. नंतर, तो परत डर्बनला परतला आणि, काही महिन्यांनी, मला डर्बनला नोकरी मिळाल्याने, मी देखील त्याच शहरात परतलो. एकदा, त्याच्या मुलाचा मला फोन आला की, येत्या रविवारी, आम्ही, आमच्या बाबांचा साठावा वाढदिवस साजरा करणार आहोत. आम्ही एक हॉल बुक केलेला आहे आणि तिथे रीतसर पार्टी आणि समारंभ आहे पण आम्ही बाबांच्या पासून हा समारंभ लपविलेला आहे वगैरे, वगैरे!!” मी, रविवार त्याप्रमाणे, त्या समारंभाला गेलो. सुरवातीला, अनेक लोकांची भाषणे झाली. इथला हा अत्यंत कंटाळवाण प्रकार. कुणाचा वाढदिवस असेल किंवा लग्न असेल किंवा काही पार्टी असली तर, इथे जवळच्या लोकांच्यात व्हाशाने करण्याची जणू चढाओढ लागलेली असते आणि मग, असलेली आणि नसलेली भरमसाट विशेषणे लावून, कौतुक केले जाते. तशी भाषणे झाली, केक कापला, आणि लगेच शाम्पेन वाटली. नंतर मग, भात वस्तू देण्याचा कार्यक्रम सुरु झाला आणि तो आणि त्याची बायको, यांना भेटायला गेलो. मी जसा दोघांना भेटलो, तशी त्याच्या बायकोने, ” माझी जोहानसबर्गची मीटिंग कशी झाली आणि विमान उशिरा आल्याने, कंटाळा तर आला नाही ना?” असे दोन प्रश्न विचारले. वस्तुत: मी डर्बन इथेच होतो पण, या, माझ्या मित्राचे असेच एका सुंदर युवतीशी लैंगिक संबंध होते आणि त्या कामानिमित्त त्याने, माझे नाव पुढे करून, घरातून सुटका करून घेतली आणि मजा करून आला!! इथे, मी अंधारातच!! सुदैवाने, क्षणात, मी स्वत:ला सावरले आणि, गुळमुळीत उत्तर देऊन, सुटका करून घेतली!! नंतर, तो मित्र माझ्या पायाच पडायचा बाकी होता!! पण, हे एक मला माहित असलेले एकमेव उदाहरण नव्हे. मी इथे हे सांगितले कारण यात माझे नाव गुंतले होते इतकेच. जोहानसबर्गसारख्या अति प्रचंड शहरात, रात्री कंपनीचे काम आहे, या सबबीखाली, हॉटेलमध्ये प्रेयसीबरोबर रंगढंग करायची नेहमीच पद्धत आहे!!
अशी अफेयर्स सगळ्या समाजात(भारतीय, गोरा, काळा आणि कलर्ड!!) मुसलमान मुली एरव्ही, पडदानशीन असतात पण, गंमत म्हणजे अशा बाबतीत, त्या फार पुढारलेल्या आहेत!! अगदी, नाईट क्लब पासून ते दुसऱ्याच्या घरात लाज सोडून, बंधने न पाळता, शरीराचे सगळे भोग घेण्यात, फारच पुढे आहेत.
फक्त, सगळा कारभार, छुपेपणाने!! इथे, व्हाईट समाज आणि भारतीय समाज, यात फरक आहे. गोरी मुलगी बिनदिक्कतपणे, शरीर संबंध ठेवते, त्यात तिला काही गैर वाटत नाही. किंबहुना, मी जेव्हा रस्टनबर्ग इथे नोकरी करत होतो, तिथे माझ्याच Department मध्ये दोन व्हाईट मुली काम करीत होत्या, आता त्यांनी देखील नोकरी सोडली. पण, त्यानिमित्ताने, मी व्हाईट लोकांचे समाज जीवन फार जवळून बघितले. व्हाईट मुली, बिनधास्तपणे कबूल करतात, “मी गर्भनिरोधक गोळ्या खाते!!” एव्हढेच कशाला, तिची आई देखील त्याबाबत तिला बिनदिक्कतपणे सल्ला देते. shake hand वगैरे सोपस्कार तर अगदी, common असतात पण, व्हाईट मुली, त्याच्याही पुढली मजल गाठतात, म्हणजे, मिठी मारणे, गालाचे/ओठांचे चुंबन घेणे आणि हे सगळे विधी, कुठेही बिनदिक्कतपणे चालू असतात. ना त्यांना कुणाची भीती ना, त्या मुली कुणाची क्षिती बाळगतात!! लग्नाआधी मुल होणे, हे आता, स्त्री/पुरुष यांच्या खूपच common झाले आहे. विशेषत: काळ्या समाजात तर, अशा गोष्टी सर्रास चालतात. इथे डेटिंग म्हणजे जवळपास शरीर संबंध हेच समीकरण झाले आहे. त्यामुळेच, या देशात, एड्स चे प्रमाण जवळपास चाळीस टक्के इतके आहे!!
पण, भारतीय लोक आणि व्हाईट लोक, यांच्यात एका गोष्टीचा फार महत्वाचा फरक आढळतो. आपले भारतीय लोक, आपल्या भारताची परंपरा, ऑफिसचे काम करताना व्यवस्थित पाळतात तर, गोरे लोक, अजूनतरी, फार सचोटीने आणि मन लावून काम करतात. हा फरक, विशेषत: शुक्रवार संध्याकाळ आणि सोमवार सकाळी ठळकपणे दिसतो. शुक्रवार दुपार झाली की, आपले भारतीय लोक, काम-धाम बंद करून, weekend चे कार्यक्रम ठरविण्यात मश्गुल होतात आणि सोमवारी सकाळी, weekend कसा celebrate केला, याच्या गप्पामारण्यात, वेळ घालवतात. गोरे लोक, मात्र, ऑफिसच्या वेळात, सपाटून काम आणि एकदा का, ऑफिसची वेळ संपली की मात्र, फक्त enjoyment. हा महत्त्वाचा फरक आहे. मी, काही व्हाईट लोकांच्या घरी, खूप वेळा गेलो आहे. अगदी, ख्रिसमस नसून इतर वेळी देखील हे लोक, किती धमालपणे आपले आयुष्य एन्जॉय करतात, हे अनुभवण्यासारखे आहे. शरीर संबंध वगैरे लैंगिक गोष्टी जरा बाजूला ठेवल्या तरी, त्यांची राहण्याची पद्धत, पार्ट्या एन्जॉय करायची पद्धत, स्मार्ट कसे राहावे याचे आपण धडे घेऊ शकतो. मी तर आतापर्यंत खूप व्हाईट लोकांच्या पार्ट्या अटेंड केलेल्या आहेत. साधारणपणे, व्हाईट लोक, बीफ, पोर्क, Ham वगैरे खातात. मी देखील पूर्वी नेहमी हेच खात असे आता मी सोडून दिले आहे. विशेषत:, BRAAI पार्टी तर व्हाईट लोकांचीच बघावी. अर्थात, अवगुणदेखील बऱ्याच प्रमाणात आढळतात. तो भाग, मी पुढील लेखामध्ये लिहीन.


साउथ आफ्रिका-भाग 3




मागील भागात, मी इथल्या भारतीय वंशाच्या समाजातील पुरुषाबद्दल थोडे लिहिले. खर तर, इथल्या भारतीय लोकांच्यात “न्यूनगंड” प्रचंड प्रमाणात आहे. तो त्याच्याशी बोलताना सतत जाणवत असतो. कुठल्याही विषयात, आपल्याला प्रचंड माहित अथवा ज्ञान आहे, असा ते फार चलाखीने भास निर्माण करू शकतात. प्रत्यक्षात, ते चक्क खोटे बोलत असतात. त्यांना त्यात काय आनंद मिळतो, याचा मला अजूनही पत्ता लागलेला नाही. कारण, त्यांचे खोटे बोलणे, मी इतरांशी बोलताना उघडकीस आणलेले आहे पण, तरीदेखील वृत्तीत काही फरक नाही. स्वत;चा प्रचंड बडेजाव मारायचा, असे त्याच्या स्वभावाचे व्यवच्छेदक लक्षण सांगता येईल आणि आपण बोलताना किती वाहवत जात आहोत, याची तमा न बाळगता, इथले भारतीय बोलत असतात. आतापर्यंत, मी कितीतरी भारतीयांच्या घरी पार्ट्यांना गेलेलो आहे. ड्रिंक्स अर्थात, हा पार्टीचा प्रमुख कार्यक्रम. खर तर, ड्रिंक्स शिवाय, इथे कसलाच समारंभ साजरा होत नाही!! त्यात, जर का पार्टी असेल तर, तो कार्यक्रम प्रथम, मग वाढदिवस, बारसे, लग्न समारंभ इत्यादी गोष्टीना प्राधान्य!! अशा वेळी, अनेक अगदी वयस्कर माणसे जरी घेतली तरी, त्यांचे बोलणे याच वळणावर जाते. मी, कितीतरी वयस्कर माणसाना चक्क “थापा” मारताना ऐकलेले आहे. मलाच, मुंबई कशी कळलेली नाही, हे समजावून सांगतात. आता, काय बोलणार!! आणि, हे सगळे अतिशय गंभीरपणे, बोलणे चाललेले असते. अरे, प्रत्यक्ष “कोलाबा” परिसर कसा आहे, हेच मी आतापर्यंत कमीतकमी चाळीस वेळा तरी ऐकलेले असेन!! प्रत्यक्षात, हीं माणसे, त्या परिसरात केवळ पाच, सहा दिवसच राहिलेली असतात!! तुम्हाला एक गंम्मत सांगतो. १९९७ च्या सुमारास, मी अशाच एका पार्टीला गेलो होतो. अर्थात, भारतीय लोकांचीच पार्टी होती. तिथे मला काही मुले/मुली भ्तल्या आणि त्यांना, मी भारतातून आलो आहे, असे समजले. त्यातील एका मुलीने, भारतीय चित्रपट संगीताचा विषय काढला. मी खुश!! तिने, अर्थात, त्यावेळची गाजत असलेली गाणी, मला आवडल्याचे सांगितले. मी तसा गप्पच होतो. थोड्यावेळाने, मी तिला, “लताची कुठली गाणी आवडतात?” हा प्रश्न केला. यावर, तिचा प्रश्न “कोण लता!!”. आता सांग, मी काय बोलणार!! पण, अशा अर्धवट माहितीवरच, तिथे फुशारकी मारली जाते आणि स्वत;ची पाठ थोपटून घेतली जाते.
मागे, मी "निखारयावरून चालणे” यावर लिहिले होते. अशाच एका, पार्टीत एक भारतीय मला भेटला होता आणि तो मला अभिमानाने सांगत होता.”मी निखाऱ्यावरून अनवाणी आणि अत्यंत संथपणे चालतो!! बाकीच्यांना माझ्यासारखे अजिबात चालता येत नाही!!” प्रत्यक्षात, ती व्यक्ती, गेले दोन वर्षे नोकरी नाही(वय वर्षे ३०-हीं गोष्ट १९९८ मधली!!) आणि भावाच्या घरी अक्षरश: चरत होता आणि घमेंड कसली बाळगतो तर, निखारयावरून संथ चालण्याची!! नंतरही, तो पुढील ४ वर्षे तरी भावाकडेच राहत होता. आता, तो कुठे आहे, काहीच कल्पना नाही. पण, असा भारतीय लोकांचा स्वभाव!! माझा असा अंदाज आहे, की १९८८ पर्यंत, सतत व्हाईट लोकांच्या जोखडाखाली वावरल्याने, मनाची प्रचंड कुचंबणा  झाली असाणार आणि स्वातंत्र्य मिळाले पण,.आता इथे Black Empowerment कायदा लागू झाला आणि भारतीय समाजाची कोंडी तशी कायमच राहिली!! त्या मानसिक कोंडीतून, हताशता आणि विफलता, याचे मिश्रण त्याच्या मनात झालेले आहे. त्यातूनच असा वैफल्यग्रस्त अहंगंड निर्माण झाला असणार. त्यातून, इथे शिक्षण प्रचंड महाग असल्याने आणि आर्थिक परिस्थती तशी सामान्य असल्याने, त्या कुचंबणेत  सतत भर पडत राहिली. शिक्षण म्हणजे, Matric हेच बहुतांशी भारतीयांच्या नशिबात लिहिलेले आहे. आता, त्या पदवीनुसारच त्यांना नोकऱ्या मिळणार आणि मग अशा अवस्थेत त्यांचा आर्थिक स्तर उंचावायचा कसा? कोणी तसे फारसे बोलून दाखवत नाही, पण एखाद्या बेसावध क्षणी आपल्याला असे कळून जाते. इथे, Appartheid काळात, किती अत्याचार झाले, याबद्दल तसे अजूनही फारसे बोलले जात नाही. अर्थात, तुम्ही जसे जवळकीचे संबंध जोडाल, तशी ती माहिती आपल्याला कळू शकते. मी इथे १९९४ साली आलो, म्हणजे वंश-भेद संपून नुकतीच दोनच वर्षे झाली होती. तरीदेखील मला याची स्पष्टपणे जाणीव झाली होती. व्हाईट लोकांच्या हॉटेलमध्ये जर का तुम्ही गेलात, तर तुम्हाला कुणी आधी विचारात नाही आणि तुमची ऑर्डर घ्यायला कुणी गोरी मुलगी आली, तर चेहऱ्यावर तुसडा भाव स्पष्टपणे दिसायचा. तुमची ऑर्डर वेळेवर आणली जात नसे आणि हीं गोष्ट १९९४ च्या अखेरची!! आजही, इथे व्हाईट लोकांच्या वस्तीत तुम्हाला लगेच घर मिळत नाही, मिळाले तर, व्हाईट लोक तुमच्याशी संबंध ठेवायला संपूर्णपणे नाखुशच असतात. मी, २००७ साली इथे महिंद्र कंपनीत नोकरी स्वीकारली होती, बहुतेक भाग हा आजही व्हाईट लोकांनी व्यापलेला, तेंव्हा मला घर देखील त्यांच्याच परिसरात घ्यावे लागले. तुम्हाला सांगतो, पहिले दोन महिने, माझ्या शेजारी एक व्हाईट कुटुंब राहत होते पण कधीही “hi” किंवा “Hello” देखील झाले नाही!! अर्थात, नंतर जेंव्हा, माझ्या घरात ऑफिसमधील व्हाईट लोक यायला लागल्याचे बघितल्यावर, त्यांनी माझ्याशी आपणहून बोलायला सुरवात केली!! हीं परिस्थिती २००७ मधील तर मग जेंव्हा प्रत्यक्ष वंश-भेद अगदी भर वस्तीत स्थिरावला होता, तेंव्हा काय हाल झाले असतील याची कल्पना करता येते.
सुदैवाने, माझे आता काही भारतीय कुटुंबात चांगले संबंध निर्माण झाले आहेत आणि ती माणसे मात्र माझ्याशी खूप जवळकीने वागतात. अगदी, जर का दोन,तीन दिवसात फोन झाला नाही तर, स्वता:हून ते माझी विचारपूस करतात. पण, एकूणच भारतीय समाज हा मी वर म्हटल्याप्रमाणे दुभंगलेला आहे. भारताबद्दल खूप आस्था दाखवतात, पण त्यात दिखावूपणा फार दिसून येतो.आपण भारतीय संस्कृतीशी किती जवळीक राखून आहोत, याचे अत्यंत केविलवाणे प्रदर्शन करीत असतात. प्रत्यक्षात, त्यांना भारताची काडीमात्र माहिती नसते, अर्थात, अपवाद म्हणून काही भारतीयांचा निर्देश करता येईल पण, माझे मत, हे एक प्रातिनिधिक मत म्हणून मानायला काहीच हरकत नाही.
एकीकडे, भारतीयत्वाचा प्रंचंड अभिमान बाळगायचा आणि दुसरीकडे, व्हाईट लोकांच्या चाली-रिती आंधळ्या वृत्तीने स्वीकारायच्या, अशा अवस्थेत भारतीय समाज अडकलेला आहे. आतापर्यंत, मी इथला समाज भारतीय ऐकीव माहितीवर कसे अंधानुकरण करीत आहे, हे थोडक्यात सांगितले. आता, याचा दुसरा भाग!!
इथली लग्नसंस्था जवळपास, मोडकळीस आलेली आहे, असे म्हटले तर आश्चर्य वाटायला नको. वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत जर का मुलाला मैत्रीण किंवा मुलीला मित्र मिळाला नाही तर, त्या मुलीत/मुळात काहीतरी विकार आहे की काय, असला विचित्र समंज इथे पसरलेला आहे. प्रत्यक्ष आई किंवा वडीलच त्या चितेत पडतात, म्हणजे बघ!! त्यातूनच, लग्नाशिवाय एकत्र राहायचे(त्याला काही बंधन नाही!! माझी एक मैत्रीण गेले ८ वर्षे तिच्या मित्राबरोबर राहत आहे पण लग्नाचा अजून पत्ता नाही!!), शरीराचे सगळे भोग घ्यायचे, आणि जर का त्यानंतरही पटले तर लग्न करायचे, असा इथल्या सगळ्या( भारतीय, व्हाईट, काळा समंज) समजत पायंडा पडलेल्वा आहे. आपल्या भारतात, हल्लीच “live and let relation” पद्धतीबद्दल बरेच काही वाद चालू आहेत पण इथे हीं पद्धत कितीतरी वर्षे आधीपासून चालत आहे. अर्थात, इतकी वर्षे एकत्र राहूनदेखील, प्रत्यक्ष लग्न होईलच याची शाश्वती शून्य!! मी तर, कितीतरी, अशा भारतीय मुली पाहिलेल्या आहेत की, ७,८ वर्षे आपल्या प्रियकरासमवेत राहिल्यानंतर, त्यांना हा प्रियकर आपल्या मनासारखा नाही अशी “उपरती” होते!! तोपर्यंत, तिला एखादे मुल देखील झालेले असते आणि मग त्या मुलाचे घोंगडे ती स्वीकारून, आपले आयुष्य भरकटवीत असते, त्याबरोबर त्या मुलाचे देखील!! अगदी, माझ्या जवळच्या मित्राच्या कुटुंबात देखील अशा घटना घडलेल्या आहेत!! काही मुली, तर त्याहून पुढारलेल्या असतात, स्मोकिंग आणि ड्रिंक्स तर इतक्या प्रमाणात करतात, की पुरुष देखील चकित व्हावेत!! आणि, ह्या मुली काही श्रीमंत घरातील नसतात तर आपल्या सारख्याच मध्यम वर्गीय घरातील असतात. माझी एक मैत्रीण तर फारच पुढारलेली होती. आता मी होती असे म्हणतो कारण आता ती लग्न होऊन स्थिरावलेली आहे. ती तर, एकाच वेळी ४ प्रियकरासमवेत प्रणयाचे रंग उधळत होती आणि पाचव्याबरोबर एंगेजमेंट झाली असताना. त्याचे तिला काहीच वाटत नव्हते. मी तर, तिच्या आई/वडिलांना प्रत्यक्ष ओळखत होतो आणि हीं माझ्याच कंपनीत कामाला होती!! एकदा, मी तिला याबाबत विचारले असता, तिचे उत्तर, “I just want to enjoy my life before marriage!!” आता, या उत्तरावर मी काय बोलणार!! अर्थात, पुढील भागात, आणखी रंगतदार गोष्टी लिहीन.

साउथ आफ्रिका – भाग २



साधारणपणे महिन्या दोन महिन्यात मी बराचसा रुळलो, असे म्हणायला हरकत नाही. पीटरमेरीत्झबर्ग गाव हे तसे एकदम टुमदार असे गाव आहे. जवळपास, सात, आठ टेकड्यांवर वसलेले आहे आणि समुद्र सपाटीपासून बरेच उंच असल्याने, हवा थंडगार असते, अर्थात, डिसेंबर, जानेवारी हे महिने वगळता. मी, मुंबईचा आल्हाददायक उन्हाळा अनुभवून या शहरात आलो असल्याने, इथला उन्हाळा देखील मला चांगलाच भावला. शहरात तशी औद्योगिक वसाहत अशी फार मोठी नाही(आज देखील तेच प्रमाण आहे- फारसे नवे प्रचंड उद्योग-धंदे फारसे या शहरात नाहीत!!) अर्थात, खाद्य तेलाच्या प्रचंड रीफायनरिज इथे खूप आहेत आणि मी सुद्धा त्यातील एका कंपनीत होतो. इथे, सगळ्या प्रकारच्या वस्त्या आहेत, भारतीय, काळे, गोरे तसेच कलर्ड!! अर्थात, प्रत्येक समाज हा बहुतांशी स्वत:च्या वेगळ्या वस्तीत राहतो. हा वंशभेदाचा अनिवार्य परिणाम. पूर्वी, व्हाईट लोकांनी, प्रत्येक समाजाला एक ठराविक एरिया वाटून दिला होता आणि त्याप्रमाणे, तो समाज तिथे स्थिरावला. व्हाईट लोकांची वस्ती अर्थात, अधिक देखणी, सुरक्षित, हवेशीर आणि प्रशस्त!! असा प्रकार, अजूनही, साउथ आफ्रिकेतील प्रत्येक शहरात दिसून येतो. एकूणच हवा हीं थंड असल्याने, गोल्फ क्लब, पब्स, देखणी हॉटेल्स, या गोष्टीनी हे शहर वेढलेले आहे. आता, भारतीय वंशाचे लोक या शहरात आणि डर्बन येथे प्रचंड प्रमाणात राहतात आणि त्यामुळे, माझा या लोकांशी अधिक संबंध आला आणि हा समाज मला अधिक जवळून अनुभवता आला. मागे मी जे म्हणालो की, इथला भारतीय वंशाचा समाज हा अजूनही बराचसा मानसिकदृष्ट्या दुभंगलेला आहे, याचे तंतोतंत प्रत्यंतर मला हर घडी आणि हर क्षणी घेता आले.
मी ज्या कंपनीत होतो, त्या कंपनीत, हिंदू( इथे एक विचित्र प्रथा आहे. इथला हिंदू समाज दोन गोष्टीत विभागाला गेला आहे.१- हिंदू आणि २- तमिळ!!) पुरुष/ मुली होत्या तसेच, मुसलमान, व्हाईट, कलर्ड असे एकूण वेगवेगळ्या समाजातील एक संमेलनच होते. आणि त्यावेळची माझी झालेली मते, आजही तितकीच ठाम आहेत. विशेषत: तरुणांबद्दलची मते!! इथाल्स भारतीय समाज हा एक बाजूने पाश्चात्य संस्कृतीने आकर्षित झालेला आहे तर दुसऱ्या बाजूने प्रचंड प्रमाणात बुवाबाजीत अडकलेला आहे. सत्य साईबाबा हे इथले परम आदराचे स्थान!! एकूणच भारतातील स्वामी, गुरु याबद्दल इथे आजही प्रचंड आकर्षण आहे. इथे, हिंदूंचे सण वेगळे आणि तमिळ लोकांचे सण वेगळे, देवळे वेगळी, रिती रिवाज देखील वेगळे. पण, एकूण मानसिक घडण बघितली तर काही फारसा फरक आढळत नाही. तसेच व्हाईट लोकांचे अंधानुकरण(वाईट अर्थाने!!) आणि भारतातील बुरसटलेल्या चालींचे उदात्तीकरण, असा थोडक्यात सारांश सांगता येईल. एक उदाहरण देतो. GOOD Friday हा मुळातला ख्रिश्चन लोकांचा उत्सव आहे पण इथे भारतीय समाज अत्यंत भाविकतेने हा सण साजरा करतात. त्या दिवशी, काही लोकांच्या “अंगात” येते, दिवसभर असे अंगात आलेले लोक, एका धुंद अवस्थेत वावरत असतात. संध्याकाळी, मग हे लोक, जिभेत तारेचा आकडा अडकवतात, पाठीवर तार खोचून त्यात मग फळे, फुले गुंफतात, अगदी डोळ्याच्या पापण्यात देखील तार खुपसून त्यात फळे अडकवतात आणि अशा पुरुष/स्त्रिया यांची संध्याकाळी मिरवणूक निघते ती जवळपास, संपूर्ण भारतीय लोकांच्या वस्तीभर!! वाटेत, काही भाविक(काही नव्हे- बरेच भाविक!!) या माणसांच्या पाया पडतात!! इथल्या भाविक लोकांच्या मते, असे अंगात आलेले लोक, हीं देवाचीच मानवी रूपे आहेत!! त्यांच्या पाया पडल्यावर, मग हीं देवाची रूपे, त्या भाविकांच्या कपाळावर, उदी/भस्म लावतात आणि त्याने कृपाप्रसादाने, भाविक लोक गहिवरून जातात. नंतर, मिरवणूक संपली की, हिंदू मंदिरात खरा पुढचा समारंभ असतो.
मिरवणूक देवळात येईपर्यंत देवळाच्या प्रसादात, कोळसे/ लाकडे पेटवलेली असतात. ती पुरेशी पेटली(अगदी ज्वलंत निखारे!!) की मग हीं देवाची रूपे आणि इतर काही भाविक लोक त्यावरून अनवाणी पायाने हळूहळू किंवा भराभर(ज्याच्या-त्याच्या कुवतीप्रमाणे!!) चालतात. मला, पाहिल्यावर एक वयस्कर गृहस्थाने,’ आम्ही(म्हणजे भारतीय लोक!!) किती आस्थेवाइकपणे भारतीय परंपरांचे पालन करीत आहोत” असे ऐकवले!! त्यावेळी, मी न राहवून त्याला विरोध दर्शविला पण माझे बोलणे त्याला अजिबात आवडले नसल्याचे, मला जाणवले. नंतर, हा विषय मी माझ्या ऑफिस मधील भारतीय लोकांशी काढला, तेंव्हा तरं त्यांनी मला वेड्यातच काढले!! इथले भारतीय लोक कमालीचे भारतीय परंपरांचे अंधानुकरण करण्यात पुढे आहेत, त्यात काही वैचारिक भाग नाही की साधे तत्व देखील आढळत नाही. त्यांची या सर्व कर्म कान्डावर कमालीची श्रद्धा आहे. आज भारतात देखील कितपत, अशा मागासलेल्या परंपरांचे जतन केले जाते, मला शंका आहे, इथे मी शहरी भागाबद्दल बोलत आहे. जगन्नाथाचा रथ प्रसंगी, भारतातील गावात असे प्रकार चालतात, याची कल्पना आहे पण तो समाजच गतानुगतिकतेच्या गाळात रुतलेला आहे. इथला भारतीय समाज, स्वत:ला उच्च शिक्षित(म्हणजे काय!! हा एक वेगळा प्रश्नच आहे!! पण, त्याचे उल्लेख पुढे होईलच!!) समजतो, आधुनिक जगाच्या बरोबरीने वावरतो, असे मानतात आणि अशा ठिकाणी, अशा अंध श्रद्धा कमालीच्या भाविकतेने पाळल्या जातात!!
भारतातील स्वामीबद्दल तरं, काही बोलायचीच सोय नाही!! त्याच्या चरणी, आपली अक्कल किती गहाण टाकायची, याची जणू स्पर्धाच लागलेली असते!! इथे आपल्यासारखी उपासाची पद्धत आहे, म्हणजे आपण जसे, उपासाचे खास वेगळे पदार्थ करतो, तसा काही प्रकार नसून, या महिन्यात( साधारणपणे दिवाळीपूर्वी महिनाभर हा महिना येतो) या दिवसात फक्त नॉन-वेज पदार्थ करायचे नाहीत की खायचे नाहीत. ड्रिंक्स मात्र चालतात!! ड्रिंक्स पिण्यात मात्र हे भारतीय, कमालीचे तरबेज आहेत. अगदी, स्पर्धाच लागल्यासारखी, ड्रिंक्स ढोसत असतात आणि त्याचा अभिमान बाळगत असतात!! मग, काकुळतपणे आडवे होणे, नशेत बरळत राहणे इत्यादी अश्लाघ्य प्रकार होतच राहतात.  हे एक प्रातिनिधिक दृश्य म्हणून मानायला हरकत नाही.

साउथ आफ्रिका – भाग १



खरतर, साउथ आफ्रिकेसंबंधी लिहायचे म्हणजे थोडक्यात माझेच वर्णन करायचे, असा थोडाफार प्रकार होण्याची शक्यता आहे. अर्थात, मी थोडीफार तठस्थ वृत्ती ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे पण, काही ठिकाणी, माझा आणि माझ्या मतांचा उल्लेख अनिवार्य ठरावा. तेंव्हा, तेव्हढी सवलत,तुमच्याकडून  अपेक्षित आहे.
१९९४ च्या मध्यापर्यंततरी, माझा या देशात जाण्याचा संबंधच नव्हता कारण, मी नुकताच नायजेरिया मधून परत आलो होतो आणि दुसरीकडे नोकरीचे प्रयत्न चालूच होते. साउथ आफ्रिकेची संधी तशी मला फार अचानकच मिळाली. तेंव्हा, एक संधी, इतपतच या गोष्टीकडे महत्व होते पण, एकदम, मुलाखतीचे बोलावणे आले आणि मी चक्क निवडला गेलो!! मग, visa, तिकीट,सामानाची बांधाबांध वगैरेची नेहमीची धावपळ सुरु झाली आणि अक्षरश: धडपड करीतच विमानात बसलो-एयर इंडिया पकडून, डर्बनला निघालो. साउथ आफ्रिका पोहोचेपर्यंत, हा देश कसा आहे, याची अंधुकशी देखील कल्पना नव्हती!! फक्त, माझ्या मित्राचा भाऊ, मकरंद फडके, याचा फोन नंबर जवळ होता आणि तो जोहानसबर्ग येथे राहतो, एव्हढीच माहिती, माझ्याकडे होती. किंबहुना, मी ज्या शहरात राहणार आहे-पीटरमेरीत्झबर्ग या शहराचे नाव  मी प्रथमच ऐकत होतो. जोहानसबर्ग, डर्बन, केप टाऊन आणि पोर्ट एलिझाबेथ या शहरांची नावे वगळता, काही माहिती नव्हती. डर्बन विमानतळावर उतरल्यावर, देशाची थोडी फार कल्पना यायला लागली. डर्बनपासून जवळपास ९० किलोमीटर अंतरावर, पीटरमेरीत्झबर्ग शहर आहे आणि हरूनच्या (माझा बॉस!!) गाडीतून या शहरात येताना, जे अप्रतिम दर्शन या देशाचे झाले, ते आजतागायत कायम आहे. प्रचंड हमरस्ते, हवा थंडगार, सगळीकडे स्वच्छता आणि अति शांतता. सबंध प्रवासात, कुठे हॉर्नचा आवाज नाही की माणसांची वर्दळ नाही!! आजही, माझ्या मनात, या देशाचे हेच चित्र ठसलेले आहे. वास्तविक, सरत्या थंडीचे दिवस होते, तरीही हवा चांगल्यापैकी थंड होती.
पीटरमेरीत्झबर्ग शहर हे टेकड्यांवर वसलेले आहे. आपल्या पुण्यासारखेच शहर आहे-निवृत्त लोकांसाठी अप्रतिम!! एकूणच सुरवातीचे दिवस जरा अवघडच गेले कारण, लोकांचे इंग्लिश!! मी, नायजेरियात राहून आलेलो, तिथले इंग्लिश तर, खुद्द शेक्सपियरने नव्याने शिकावे!! तर, इथले इंग्लिश सगळे तोंडातल्या तोंडात पुटपुटणारे!! त्यामुळे, सुरवातीचे दिवस फारच अवघड गेले. काय बोलताहेत, याचे नेमका अर्थच लागायचा नाही. मग, मी एक शक्कल लढवली, तेंव्हा मी स्मोकिंग करायचो, व त्याचा आधार घेऊन, मग बोलणाऱ्याला, परत बोलायला लावायचे आणि अर्थ मनाशी जुळवायचा!! विशेषत; गोरे लोक बोलायला लागले तर माझी भंबेरी उडवायचे! अर्थात, महिन्या-दोन महिन्यात सगळा अंदाज यायला लागला. आता तर, मी त्यांचे “पाणी” व्यवस्थित जोखलेले आहे आणि आता प्रत्येकाला व्यवस्थित हाताळतो!!
ऑफिसमध्ये बऱ्याच मुली होत्या. काही, लोकल भारतीय(यात, मुसलमान, हिंदू, तामिळ, गुजराती असे सगळे येतात!!), एक कलर्ड आणि दोन व्हाईट तर, बरेचसे, पुरुष हे भारतीय वंशाचे होते. त्यामुळे, पहिल्या नोकरीतच इथल्या समाजाची फार जवळून ओळख झाली. आता, इथे मी लिहिताना, प्रथम सामाजिक परीस्थितीवर प्रथम लिहीन. आज जवळपास, पंधराहून अधिक वर्षे, या देशात मी काढली, तरीही माझ्या सुरवातीच्या मतांमध्ये फारसा फरक पडला नाही.
तेंव्हा, अर्थात, प्रथम, भारतीय वंशाचे लोक!! अगदी, स्पष्टपणे मत मांडायचे झाल्यास, इथले भारतीय वंशाच्या लोकांची मानसिक स्थिती पूर्णपणे दुभंगलेली आहे. ना धड भारतीय ना धड पाश्चात्य!! अशा त्रिशंकू मनोवस्थेत इथले भारतीय वंशाचे लोक राहत आहेत. पुढे मी अशी बरीच उदाहरणे देईन की ती माझ्या या मताला बळकटी मिळेल. तेंव्हा, पहिला भाग मी इथेच संपवितो.

साउथ आफ्रिका – भाग ६




जसे मी मागील लेखामध्ये  व्हाईट समाजाविषयी चांगल आणि वाईट, अशा दोन्ही गोष्टी मांडायचा प्रयत्न केला. तसाच प्रकार भारतीय वंशीय लोकांच्या बाबतीत लिहिला. अर्थात असे नव्हे की, या सामाजात अनेक वाईट गोष्टी आहेत. त्याचे थोडक्यात असे आहे की, इथला भारतीय समाज सतत वर्षानुवर्षे एका प्रचंड मानसिक कुचंबणेखाली वावरत असल्याने, त्यांची अशी अत्यंत स्वाभाविक प्रतिक्रिया घडत असते. मी जसा या लोकांच्या सान्निध्यात अधिक गेलो तशी त्यांची ती मानसिक प्रक्रिया अधिक डोळसपणे पाहता आली. अर्थात, हीं प्रक्रिया कुणाही माणसांच्या बाबतीत घडू शकते. आजही, इथल्या भारतीय समाजाला त्यांचे हक्काचे असे स्थान मिळू शकलेले नाही. इथले लोक, स्वत:ला साउथ आफ्रिकन मानतात आणि ते योग्य देखील आहे पण त्याच बरोबर, त्या राष्ट्रीयत्वाच्या अनुषंगाने येणाऱ्या अधिकारापासून मात्र हा समाज जरा वंचितच झालेला आहे. गोरे लोक, मागे मी म्हणालो त्याप्रमाणे, स्वत:च्या गोऱ्या कातडीची किंमत व्यवस्थितपणे वसूल करतात. आजही, जरा का फोनवर किंवा प्रत्यक्षात देखील, जर का गोरा मानून बोलायला लागला की, लगेच इथले बाकीचे लोक, आपला बोलण्याचा स्वर जरा खालचाच लावतात. गोऱ्या लोकांना प्रतिष्ठेच्या, भरपूर पगाराच्या नोकऱ्या सहज मिळतात. जर का त्यांना, आजच्या या स्वतंत्र समाजातदेखील तशीच उच्च वर्णीय वर्गाप्रमाणे सवलत आपणहून मिळत असेल तर कोण शहाणा ते नाकारील!! आजही, या समाजाची मानसिक प्रतिक्रिया आणि चलनवलन हे व्हाईट लोकांना सांभाळून, त्यांना महत्व देऊनच चाललेले असते. असे नव्हे की. गोरे लोक नेहमीच अत्यंत हुशार, कामात वाकबगार असतात, पण एकूणच त्यांची मानसिक ठेवणच अशी झालेली आहे की, त्यांना दुसऱ्यावर सतत हुकमत गाजविण्याची सवय जडलेली आहे. सुरवातीच्या काळात, मला देखील या सवयीशी जुळवून घ्यायला लागले.
पण, नंतर जसा मी इथे स्थिरावायला लागलो, तशी या गोऱ्या लोकांचे पाणी जोखायला सुरवात केली. आजही, जर का आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपन्या आणि त्यांचे Directors बघितले तरी याची कल्पना येऊ शकते. इथे देखील, मी गोरा माणूस भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेला पाहिलेला आहे. अर्थात, शेवटी “पैसा” हीं गोष्टच अशी आहे की ती कधीही कातडीचा रंग बघत नाही!!
काळे लोक तर भ्रष्टाचारात खूपच गुंतलेले आहेत. काळा समाज तर, वर्षानुवर्षे गुलामगिरीतच अडकलेला होता. एकतर, शिक्षणाच्या नावाने सगळीच वानवा. आजही, बहुसंख्य काळे लोक हे शिक्षण म्हटले की पाठ फिरवतात. इथे शिक्षण फार महाग आहे, हे कबूल पण मग, इतर समाजातील लोक शिकत आहेतच की. ते कसे आपले शिक्षण पुरे करतात? पण, बहुसंख्य काळ्याना “पैसा” हा हवा असतो पण त्या साठी आवश्यक ते कष्ट, मेहनत करायची इच्छा नसते. त्यामुळेच मग, इथली बरीचशी गुन्हेगारी हीं काळे लोकच करीत असतात. विशेषत: ड्रग्स, दरोडे, मारहाण, खून वगैरे गुन्ह्यात काळे लोक सापडतात. इथली कायदा आणि सुव्यस्था, जर का कुणी धोक्यात आणली असेल तर, ती प्रामुख्याने काळ्या लोकांनी. आज, जोहानसबर्ग सारख्या महाकाय शहरात, संध्याकाळी रस्त्यावरून पायी फिरायची सोय राहिलेली नाही. कोण, कधी आपला पाठलाग करील, आणि पैसे मागेल, याची अजिबात शाश्वती नाही. आणि जर का पैसे मिळाले नाहीत तर मग त्याच खून करायला देखील मागे-पुढे पाहत नाहीत!! शहराचा मध्यवर्ती भाग तर अति धोकादायक झालेला आहे. हीच परिस्थिती, केप टाऊन, डर्बन, प्रिटोरिया या शहरांची आहे. एकतर, मध्यवर्ती शहरात, बहुसंख्य काळ्या लोकांचीच वस्ती आहे किंवा कलर्ड लोकांची वस्ती आहे. कलर्ड समाज तर त्याही पुढे गेलेला आहे. कलर्ड समाजात तर, नितीमत्ता म्हणून काही शिल्लक आहे का, असा ठाम प्रश्न उभा राहतो!! मी बघितले बहुसंख्या कलर्ड समाजातील लोक, हे प्रचंड स्मोकर्स तरी आहेत किंवा ड्रगच्या अधीन झालेले आहेत!! ड्रिंक्सचा तर प्रश्नच उद्भवत नाही कारण ती तर इथली आचार संहिता आहे!! जोहानसबर्ग शहरातील, काही पंचतारांकित हॉटेल्स, लोकाश्रयाविना बंद पडली आहेत कारण संध्याकाळी शहरात जाणार कोण!! इथे, जवळपास रोज, पेपरमध्ये एक तरी बातमी अशी असते की जी, एकतर लैंगिक शोषणाला बळी पडलेली असते, किंवा अमानुष खून झालेला असतो किंवा प्रचंड भ्रष्टाचाराचे प्रकरण नुकतेच उघडकीस आलेले असते!! जोहानसबर्ग शहरात, मध्यवर्ती भागात, कितीतरी खास भेट देण्यासारख्या जागा आहेत पण मनाचा धीरच होत नाही. आपल्या पाठीमागून, कधी, कोण काळा, कलर्ड किंवा गोरा देखील आपल्या पाठीला रिव्होल्वर लावील, काही सांगता येत नाही. बरे नुसते पैसे मागितले तरी हरकत नाही, पण जर का त्याच्या मनाइतकी रक्कम मिळाली नाही तर, प्रचंड मारहाण किवा प्रत्यक्ष खुनदेखील अस्तित्वात येतो!! मध्यंतरी अशीच एक घटना, माझ्या माहितीत घडली. माझ्या एका मित्राने(इथे मी कुणाचेही नाव लिहित नाही, कारण उगाच जखमेवरची खपली उघडी पडायला नको!!) त्याच्या व्यवसायाच्या कामानिमित्त एका भारतीय माणसाला भारतातून बोलाविले होते. केवळ काही दिवसासाठीच!! त्याचे काम संपले त्या दिवशी संध्याकाळी, तो सहज फिरायला म्हणून बाहेर पडला आणि चार दिवसांनी, त्याचे मृत प्रेत, रस्त्यावर बेवारस पडलेले सापडले!! अजूनही, माझा मित्र, त्या कोर्ट-कचेरी यांच्या त्रांगड्यात अडकलेला आहे. हीं गोष्ट, मागील वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील. पण, इथे असेच आहे. शहरात अति पैसा आहे, सगळ्या प्रकारच्या सुविधा  आहेत, भारतात काय आयुष्य जगू, अशा प्रकारचे विलासी जीवन जगण्याच्या भरपूर संधी आहेत पण, सगळे कसे कोंडवाड्यात अडकलेले!!
मी, आजही, जेंव्हा रात्री जेवण झाल्यावर, माझ्याच घराच्या कॉम्प्लेक्समध्ये फेऱ्या मारीत हिंडतो, तर कितीतरी लोकांना याचे नवलच वाटते!! इथे, अशी जेवणानंतर फेऱ्या मारायची पद्धतच नाही. अर्थात, इथल्या सामाजिक जीवनाविषयी आणखी बरेच लिहिता येईल, पण ते मी पुढील लेखासाठी राखून ठेवतो.

साउथ आफ्रिका – भाग ७



इथले समाज जीवन, हे प्रामुख्याने, मॉल आणि मॉल संकृतीशी जखडलेले आहे. अर्थात, हे मॉल्स मात्र असतात अतिशय सुंदर, प्रशस्त नि विविध गोष्टीनी सामावलेले!! अशा मॉल्स मध्ये, माणसाला लागणाऱ्या सगळ्या गरजा, पुरवणारे दुकानदार असतात. इथे, नुसते जोहानसबर्ग जरी लक्ष्यात घेतले तरी, या शहरातील प्रत्येक उपनगरात, फार प्रशस्त मॉल्स आहेत. अगदी, नावेच घ्यायची झाल्यास, Sandton, Fourways, Bedfordview, Eastgate, Midrand इत्यादी. प्रत्येक मॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची हॉटेल्स, शॉप्स यांची नुसती रेलचेल असते. काही अति सुंदर पुस्तकालये असतात, उदाहरणार्थ, Exclusive Books. मी तर, कितीतरी वेळा या पुस्तकालयात जाऊन, एखादे पुस्तक हाताळायला घेऊन, अनेक तास वाचीत बसलेलो आहे. त्याच लायब्ररीत एक छोटेसे कॉफी शॉप असते. तीत्थे फार अप्रतिम कॉफी मिळते. एक ग्लास भरून कॉफी घ्यायची आणि शांतपणे पुस्तक वाचीत बसायचे, या सारखा दुसरा विरंगुळा नाही. मला तर, अशाच ठिकाणी काही अप्रतिम पुस्तके मिळाली आहेत की जी आज माझ्या भारतातील संग्रहात जमा झाली आहेत. Exclusive Books हे माझे मंदिर!! इथला एक सर्वात चांगला गुण, आपण भारतीयांनी जरूर आत्मसात केला पाहिजे, व तो म्हणजे “शांतता” राखण्याचा. वास्तविक मॉल्समध्ये हजारोनी लोक जमलेले असतात पण कुठेही गडबड-गोंधळ नाही. जोहानसबर्गमध्ये, Monte Casino आणि Emperor’s Palace सारखे अवाढव्य कॅसिनोस आहेत, तिथे तर, देवाला सतत फुले वाहावीत त्याप्रमाणे मशीनसमोर बसून, शेकड्यांनी लोक पैशांचा आहेर देत असतात. अशा ठिकाणी देखील, कधीही आरडा-ओरडा होत नाही की गडबड, गोंधळ माजत नाही. सगळे कसे अति शिस्तवार!! नुसता पायी फिरायचे म्हटले तरी तुमचे तास-दोन तास सहज निघून जातात. मी तर, Monte Casino मध्ये कितीतरी वेळा गेलो आहे, बहुतेक वेळा, आपले हिंदी चित्रपट पाहण्यासाठी. इथे, भारतासारखी चित्रपटासाठी प्रचंड रांग लावावी लागत नाही. तुम्ही, Compu Ticket वरून, आपली तिकिटे आधीच आरक्षित करू शकता. मी तर, काही चित्रपट अगदी, First Day show, असे पहिले आहेत. अशा कॅसिनो जागी देखील, Exclusive Books सारखे अप्रतिम पुस्तकालय असते आणि तुम्ही तिथे आपला वेळ सत्कारणी लावू शकता. मला वाटत, आता मुंबईत देखील अशा प्रकारची शॉप्स निघाली आहेत. उदाहरणार्थ, Oxford Book इत्यादी. इथे मराठी पुस्तके मात्र मिळत नाहीत!! तस पहिला गेल्यास, इथे भारतातील बातम्यांपैकी, राजकीय आणि चित्रपट विषयक बातम्यांना प्रचंड आकर्षण आहे. विशेषत: हिंदी चित्रपट आणि अभिनेते यांना इथे फार मागणी आहे. सध्या शाहरुख हा इथल्या भारतीयांचा “देव” आहे. मागे, काही वर्षापूर्वी, इथे शाहरुख, सैफ, रानी मुखर्जी, आणि प्रीती झिंटा इथे आले होते. त्यांनी, जोहानसबर्ग, सन सिटी आणि डर्बन इथे कार्यक्रम केले होते. मी, अर्थातच सन सिटी इथल्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि त्यावेळी, जेंव्हा शाहरुख रंगमंचावर आला, त्यावेळचा टाळ्यांचा कडकडाट अजूनही लक्ष्यात राहिलेला आहे.
सन सिटी, हा इथल्या विलासाचे सर्वोच्च ठिकाण!! विशेषत: Palace Hotel!! इथे ऐषारामाची परमावधी गाठलेली आहे. अर्थात, कॅसिनो आहेतच. पण, तरीही मानव निर्मित अनेक अनुभवण्यासारख्या गोष्टी आहेत. जोहानसबर्ग काय किंवा सन सिटी काय, इथे निसर्ग निर्मित सौंदर्य फारसे नाही पण, इथल्या लोकांनी त्याची कसर, अशा अप्रतिम मॉल्स, शॉप्स, कॅसिनो अशा गोष्टीनी भरून काढली आहे. निसर्ग सौंदर्य पाहायचे असेल तर, मात्र केप टाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही. डर्बन सुंदर आहे, अप्रतिम समुद्र किनारे आहेत पण, तरी देखील केप टाऊनची गोष्टच वेगळी. तिथले समुद्र किनारे, जगप्रसिद्ध Table Mountain, Cape of Good Hope, Robin Island हीं सगळी ठिकाणे खरोखरच फार सुंदर आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे, समुद्र किनारे अति विशाल आणि पसरलेले जरी असले तरी घाणीचा जराही मागमूस नसलेले!! जरा आपल्या इथले किनारे(काही अपवाद वगळता!!) नजरेसमोर आणल्यास, इथल्या किनाऱ्यांची स्वच्छता खरोखरच वाखाणण्यासारखीच आहे. अर्थात, आता काही ठिकाणी थोडी अस्वच्छता दिसते आणि ती प्रामुख्याने, काळे आणि भारतीय लोकांनी फेकलेल्या शीतपेय व बियरच्या डब्यांमुळे!! त्याबाबतीत आजही, गोरा माणूस, स्वच्छतेचा अति आग्रही माणूस आहे. मला तर, याचा अनुभव कितीतरी वेळा आलेला आहे.
सुरवातीला, मीदेखील, भारतीय सवयीप्रमाणे, हातातील सिगारेटचे थोटूक(पूर्वी मी स्मोकिंग करायचो!!) रस्त्यावर टाकायचे, कोक संपला की तो पत्र्याचा टिन तसाच फेकून द्यायचा, KFC, SPAR अशा दुकानातून घेतले खाद्य पदार्थ संपले की, तो कागदाचा टिन, तसाच रस्त्यावर टाकायचा, अगदी बाजूला Dust Bin असले तरीदेखील!! पण, नंतर जेंव्हा या गोऱ्या लोकांचे वागणे लक्षात येऊ लागले तशी मी, माझ्या सवयींना मोडता घातला. एवढेच कशाला, अगदी इथली मंदिरे,(यात चर्च, मशीद व आपली देवळे, सगळी आली!!) देखील अशीच झाडून पुसून ठेवल्यासारखी स्वच्छ आणि सुंदर असतात. कितीही गर्दी झाली तरी घाण म्हणून काही होत नाही. मला वाटत, हा मुळातल्या संस्काराचा भाग झाला. आपल्या लोकांवर असे संस्कार फारसे झालेच नाहीत. इथली हवा थंड असते, भारतासारखा लोकसंख्येचा बुजबुजाट नाही, असेही आणखी मुद्दे असतील तरीही जर का घाणच करायची असेल तर, ती कशीही आणि कधीही करता येते. सुदैवाने, अजूनतरी इथली स्वच्छता खरोखरच वाखाणण्यासारखीच आहे. अर्थात, अपवाद म्हणून, गलिच्छ बोळ, वस्त्या आहेतच.
डर्बनला Chatsworth येथे ESKON या संस्थेचे फार मोठे मंदिर आहे, तसेच इतर ठिकाणीही, लहान, मोठी बरीच मंदिरे आहेत. पण, प्रत्येक ठिकाणी, स्वच्छता हा पहिला भाग आणि नंतर शिस्त हीं नेहमीच अनुभवायला मिळाली आहे. हे आपले मंदिर आहे आणि हे आपणच स्वच्छ ठेवले पाहिजे, हीं जाणीव या लोकांच्यात मुरलेली आहे. याच पार्श्वभूमीवर, आपल्या इथली मंदिरे डोळ्यासमोर आणावीत.
वास्तविक, मी पक्का “नास्तिक” आहे, म्हणजे अगदी कर्मठ नास्तिक नव्हे, प्रसंगपरत्वे, मी देखील देवळात जाऊन मूर्तीला नमस्कार करतो. पण, मुळात देवळात जावे आणि शांतपणे चार क्षण घालवावेत, अशी इथली मंदिरे, आपली मनोकामना नेमकेपणाने पूर्ण करतात.
इथे गलिच्छ वस्त्या तर जरूर आहेत. अशा वस्त्यांना इथे Location असे म्हणतात. अशा वस्त्या, साधारणपणे, शहराबाहेर, आडरस्त्यावर असतात. बहुतांशी काळ्या लोकांच्याच अशा वस्त्या असतात. एखाद्या सडलेल्या अवयवाप्रमाणे या वस्त्या शहराचे रूप, कुरूप आणि दुर्गंधी करतात. असो, त्याबद्दल मी पुढील लेखात जरा विस्ताराने लिहीन.

साउथ आफ्रिका – भाग ८



साउथ आफ्रिका हा देश, तसे पहिले गेल्यास, आफ्रिका खंडातील युरोप!! हवा बरीचशी युरोपप्रमाणे थंडगार असते. अगदी, उन्हाळी दिवस(सध्या इथे उन्हाळा सुरु आहे!!) आले तरी देखील, मुंबईप्रमाणे, घामाने अंग उकडून गेले आहे, असा प्रकार फारसा किंवा अजिबात होत नाही. इथली हवामानाची एक फार सुंदर मजा आहे. समजा, सतत २ ते ३ दिवस कडक(इथल्या मानाने!!) उन पडले की साधारणपणे, चौथ्या दिवशी हमखास पाऊस हा पडतोच. पाऊस जरा जरी शिंपडला तरी सगळे हवामान लगेच बदलून जाते. पण, इथे मुंबईसारखा सतत ३,४ दिवस पाऊस कोसळत आहे, असे घडत नाही. अगदी, एखादे दिवशी दणकून पाऊस पडला, तरी त्याचा जोर फार तर दिवसभर किंवा थोडा जास्त!! त्यामुळे, एकूणच धूळ आणि धुळीचा त्रास, जवळपास नसतोच. एकतर, इथे धुळीचे प्रमाण तसे कमीच असते. अगदी, साधे रस्ते जरी बघितले तरी, रस्त्याच्या बाजूने, सिमेंटने बांधलेले पदपाथ असतात, त्यामुळे, धुळीचा संसर्ग होण्याची शक्यताच मावळते. Highways तर केवळ अप्रतिम!! अर्थात, हीं सगळी development गोऱ्या लोकांनी केलेली. मुळात, इथले हवामान, युरोप सदृश असल्याने, युरोपमधून गोरे लोक इथे काही शतकांपूर्वी स्थाईक व्हायला आले. सोन्याच्या खाणींचा शोध हा नंतरचा!! त्यांनीच हा देश अक्षरश: घडवलेला आहे. शहरे वसवलेली आहेत. विशेषत: जर्मनी, ब्रिटीश आणि डच लोक इथे फार भेटतात. आता, तसा त्यांचा मूळ  देशाशी फारसा संपर्क राहिलेला नाही, पण अजूनही त्यांनी स्वत:ची भाषा मात्र टिकवून ठेवलेली आहे. इथली म्हणून, आफ्रिकान्स नावाची राष्ट्रीय भाषा आहे पण तिच्यावर, डच भाषेचा जबरदस्त प्रभाव आहे. साधारणपणे, तुम्हाला जर इंग्रजी चांगल्यापैकी बोलता येत असेल तर, या देशात तुमचे काही अडू नये. आफ्रिकान्स भाषा देखील सर्वत्र बोलली जात नाही. भारतीय वंशाचे लोक, आजही इंग्रजी भाषाच बोलणे पसंत करतात. आफ्रिकान्स भाषा हीं साधारणपणे, गोरे आणि काळे लोक, यांच्यात प्रसिद्ध आहे. त्यातून, डर्बन आणि आजूबाजूच्या परिसरात ZULU भाषेचा प्रभाव आहे. ती मात्र शिकणे फार अवघड आहे. मला थोडे फार, आफ्रिकान्स शब्द आता बोलता येतात.
समजा इथे स्थायिक व्हायचे असेल तर मात्र या भाषा शिकणे, जास्त सोयीस्कर पडते. इथे अजूनही, “स्थायिक होणे” हीं गोष्ट जमण्यासारखी आहे. मी, स्वत: इथला “Permanant Resident” आहे आणि माझ्याकडे, इथले तसे परमिट आहे. त्यामुळे, या देशात, आता मी मनात येईल तितके दिवस राहू शकतो, कधीही भारतात परतू शकतो आणि परत या देशात येऊ शकतो. मला व्हिसाची गरज नाही. त्याचे असे झाले, मी जेंव्हा इथे १९९९ साली पाच वर्षे पूर्ण केली, तेंव्हा मला Home Affairs कडून पत्र आले की, जर का या देशात राहायचे असेल तर, ID (Identity Document) साठी apply कर, अन्यथा देश सोडावा लागेल. मग, काय लगेच निर्णय घेतला आणि इथली Permanant Residency मिळवली. इथले ID म्हणजे, अमेरिकेच्या भाषेतील Green Card!!
आता मात्र, मला या देशाची चांगलीच सवय लागलेली आहे. इथे जर का तुम्ही, तुमच्या आयुष्याचा सूर जरा खालच्या पट्टीत ठेऊन राहिलात, तर मात्र फारसा त्रास होत नाही. या देशात, भारताच्या मानाने राहण्याच्या सुविधा खरोखरच अप्रतिम आहेत. इथे, कार घेणे जरी अत्यावश्यक असले तरी सहज जमू शकते. अगदी, ज्या गाड्या भारतात, Luxury म्हणून गणल्या जातात, त्या गाड्या इथला सर्व सामान्य माणूस सहज वापरतो. इथे Volks Wagon, BMW किंवा Mercedes सारख्या भारतात महाग म्हणून गणल्या जाणाऱ्या गाड्या, इथला मध्यमवर्गीय माणूस वापरत असतो!! घरे देखील अति प्रशस्त असतात. एकूणच, इथे भारताप्रमाणे गगनचुंबी इमारती, ऑफिसेसच्या वगळता फारच तुरळक आढळतात. बहुतेकजण इथल्या भाषेत, House मध्ये राहत असतात. आपल्या सारखी Flat व्यवस्था इथे फार थोड्याप्रमाणात आढळते. बहुतेकजण, आपले स्वतंत्र घर घेऊनच राहत असतो. अर्थात, प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे, घर असते, तो भाग वेगळा. पण, साधारणपणे, मध्यमवर्गीय माणूस, २ ते ३ बेडरूम अशा घरात राहत असतो. मुळात, भारताच्या मानाने लोकसंख्या फारच कमी आणि त्यामानाने प्रचंड जागा उपलब्ध असल्याने, घराच्या किमती, भारताच्या मानाने फारच नगण्य असतात. त्यातून, इथे लोन सिस्टीम फारच सोपी आणि सहज आहे. त्यामुळे, तुम्हाला एकदा का नोकरीचे हमीपत्र मिळाले की, लगेच बहुतेकजण, गाडी आणि घर, याची सोय आधी करतात आणि आयुष्यात स्थिरावायला सुरवात करतात. सध्या तर इथे, Real Estate Business फारच घसरला असल्याने, घराच्या किमती अगदी वाजवी दरात उपलब्ध आहेत. पेट्रोलदेखील भारताच्या मानाने स्वस्त असल्याने, कुठेही जायचे झाल्यास, गाडीने जाणे सहज परवडते. त्यातून रस्ते अप्रतीम्म असल्याने, गाड्यांची झीज देखील फार होत नाही आणि गाड्या १०० ते १२० या स्पीडने धावू शकतात. मी तर कितीतरी वेळा, जोहानसबर्ग ते डर्बन हे ६०० कि.मी अंतर फक्त ६ तासात संपविलेले आहे.
इथे, इंडियन स्टोर्स प्रत्येक शहरात आहेत आणि तिथे, तुम्ही म्हणाल ते भारतीय जिन्नस हवे तेवढे उपलब्ध असतात. आता, अतिशयोक्ती करायची नाही, असे ठरविले तरी देखील, मी जो बासमती तांदूळ घेतो, तो मी भारतात बघितलेला देखील नाही. तसेच, खाण्याचे इतके पदार्थ मार्केटमध्ये मिळत असतात कि, कुठला घेऊ नि कुठला टाळू, असा संभ्रम मला आजही पडतो!! विशेषत: ब्रेड, बटर आणि चीज यांचे अगणित प्रकार मिळतात. तोच प्रकार दुध आणि तत्सम जिन्नस. तसेच, इथली अप्रतिम हॉटेल्स आणि पब्स!! माझा इथला एक ग्रुप, आम्ही, अगदी महिन्यातून एकदा तरी एकत्र जमतो आणि ती संध्याकाळ एखाद्या हॉटेलमध्ये किंवा पबमध्ये घालवतो. मग ते हॉटेल रस्त्याच्या कडेला देखील असते किंवा एखाद्या मॉलमध्ये!! इथल्या पबला गुत्ता म्हणणे अशासारखा दुसरा अपमान नसावा!! अतिशय शांत आणि अत्यंत व्यवस्थित जागा असते. नुसता बियरचा एक ग्लास घेऊन जरी बसलो तरी वेळ कसा निघून जातो, ते लक्षात देखील येत नाही. गप्पा मारायला अतिशय योग्य जागा!! इथे KEG या नावाने, पबची एक चेन आहे आणि त्याचा दर्जा खरोखरच अनुभवण्यासारखं असतो. साधारणपणे, चित्रपटात(इंग्लिश!!) ज्याप्रमाणे Irish पब दाखवला जातो, त्याच धर्तीवर हे पब्स असतात. मी, सेंच्युरीयन इथे राहत असताना, माझ्या कॉम्प्लेक्स समोरच KEG चा एक पब होता(तो पब अजूनही आहे!!) आणि, मी कितीतरी संध्याकाळ त्या पबमध्ये अविस्मरणीय अशा घालवल्या आहेत.
साउथ आफ्रिकेत आयुष्य कसे जगावे, हे चांगल्याप्रकारे शिकता येते, अर्थात, जर का युरोपियन किंवा अमेरिकन पद्धतीने आयुष्य काढायचे असेल तर. पण, जर का चाळसंस्कृती प्रमाणेच आयुष्य काढायचे असेल तर, साउथ आफ्रिका हीं जागा नव्हे!! इथे भौतिक सुखाच्या सगळ्या सोयी उपलब्ध आहेत, फक्त मानसिक शांती मात्र फार तुरळकरित्या लाभते. सतत, पैसा आणि पैसा, याच्याच मागे लागावे लागते. सतत, घड्याळाप्रमाणे आयुष्य बांधावे लागते, एकदा का त्या गतीशी जुळवून घेतले, कि मग काही फारसा त्रास होत नाही, अन्यथा तुमची फरफट होणारच!! गतीच्या आयुष्याचा अधिक अनुभव हा जोहानसबर्ग इथे जास्त जाणवतो. डर्बन, केप टाऊन आणि इतर शहरे इतकी वेगवान नाहीत पण, जोहानसबर्ग मात्र खूपच वेगवान आहे.