Friday 19 August 2022

करेलवाडीतील पारशी

माझे सगळे बालपण रूढार्थाने जरी मराठी लोकांच्यात गेले असले तरी बालपणाची माझी वाडी ही प्रामुख्याने पारशी आणि मराठी लोकांच्या वस्तीची होती. जवळपास अर्धी वाडी तरी पारशी लोकांची नक्कीच होती. माझे शेजारी तसेच आमच्या जुन्या घराच्या इमारतीत राहणारे (आमच्या व्यतिरिक्त) सगळे पारशीच होते. माझी शाळा चिकित्सक समूह, परिणामी शाळेतील सगळेच मित्र मराठी बोलणारे होते आणि ते क्रमप्राप्तच होते. त्यावेळचे माझे मित्र सुदैवाने आजही संपर्कात आहेत. मात्र शेजारी रहाणारे पारशी मात्र आता कुठे गेले? काहीच पत्ता नाही. मजेचा भाग म्हणजे आम्ही ज्या घरात रहात होतो, तिथे एका खोलीत पारशी लोकांची विहीर होती. अर्थात ती विहीर बुजवून टाकली होती आणि तिथे मोठे चौथरा बांधला होता. त्यामुळे, ती खोली फक्त कपाटे ठेवण्यासाठीच उपयोगी होती. माझ्या वडिलांचा छोटा कारखाना बाहेरच्या लांब, अरुंद खोलीत होता आणि आम्ही सगळे आतल्या ३ छोट्या खोलीत रहात होतो. त्या ३ खोल्या म्हणजे आमची १BHK स्वरूपाची जागा होती. अर्थात आम्ही तेंव्हा शाळकरी वयाचे होतो त्यामुळे कसलीच अडचण व्हायची नाही. माझ्या मते १९५६ किंवा १९५७ मध्ये या जागेत माझे आई,नाना रहायला आले. पुढे १९६९ साली नानांनी समोरच्या इमारतीत थोडी प्रशस्त जागा चौथ्या मजल्यावर घेतली आणि आम्ही तिकडे रहायला गेलो. म्हणजे वयाच्या सुरवातीची १० वर्षे तरी मी या जागेत काढली. अर्थात इतकी वर्षे या जागेत काढल्यावर आजूबाजूचे काही पारशी माझ्या चांगल्या ओळखीचे झाले होते. माझ्या शेजारी एक वयस्कर वयाची आजी रहात होती. इतकी प्रेमळ आजी, आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. सतत गाउन वेशात असायची. तिचा नवरा, मला वाटतं, मी थोडा जाणता व्हायच्या आधीच गेला असावा. तिची एक मुलगी तिथे रहात असल्याचे आठवत आहे पण माझी ओळख झाली, त्याच सुमारास तिचे लग्न झाले आणि त्या घरी ती आजी एकटी रहायची. एका व्यक्तीसाठी ते घर खूपच मोठे होते. तिने घराच्या प्रवेश दरवाज्यात लाकडाची रुंद अशी फळी टाकली होती आणि त्या फळीवर. ती रोज संध्याकाळी बसून असायची. दिवसभर ती काय करायची? हा प्रश्न पडण्याइतका मी नक्कीच मोठा नव्हतो. मात्र तिच्या घराच्या बाजूला, पारशांची विहीर होती. अर्थात ती विहीर सिमेंटच्या चौथऱ्याने लिंपून टाकली होती. रोज संध्याकाळी ती त्या विहिरीची मनोभावे पूजा करायची. खरंतर आमच्या घरातील विहिरींची देखील अधून मधून पूजा करायला, इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर राहणारे पारशी यायचे. यायच्या आधी २,३ दिवस, ते नानांची परवानगी घ्यायचे. त्यामुळे हा पारशी सोहळा मला आजही लख्खपणे आठवत आहे. संबंध विहीर पाण्याने पुसून काढायची, नंतर मग विहिरीला भला मोठा हार घालायचा. हार घालताना, ते ओठातल्या ओठात काहीतरी मंत्र पुटपुटायचे.मात्र ते कधीच धडपणे ऐकायला मिळाले नाहीत. हार घालायच्या आधी, आपल्याप्रमाणे गंध वगैरे लावायचे. हार घालून झाला की मग काचेच्या ग्लासात तेल आणि वात असायची. तसे ४,५ ग्लासेस विहिरीवर ठेवायचे आणि वात पेटवायची. वात पेटवली की आपल्यासारखा डोळे मिटून मनोभावे नमस्कार (नमस्कार देखील आपल्यासारखाच, जराही फरक नाही) करायचा. ती विहीर म्हणजे त्यांचा "देव"! आमच्या वाडीलाच जोडून हेमराज वाडी आणि तिथे तर माझे शाळेतील सगळे मित्र. या दोन वाड्यांच्या मध्ये एक भिंत आहे आणि ती भिंत चढून हेमराज वाडीत जायचा माझा परिपाठ!! त्या भिंतीवर चढण्याचे २ मार्ग होते. एक म्हणजे भिंतीलगत गटार आहे, त्या गटाराच्या पाइपवरून गटाराच्या छोट्या भिंतीवर चढायचे आणि हेमराजवाडीत उडी मारायची किंवा त्या विहिरीवरून उडी मारायची. माझ्यासारखे बरेचजण विहिरीच्या आधाराने एकमेकांच्या वाडीत जात असत. आता विहिरीच्या बाजूची भिंत पडून जायला रस्ता केला आहे पण फार नंतर झाले. सुरवातीला सगळेच बिनदिक्कतपणे विहीरीवर पाय ठेऊन जात होते. काही दिवसांनी ही आजी भडकली. आज तिचे भडकणे न्याय्य वाटते तेंव्हा इतकी अक्कल होतो कुठे?विशेषतः दुपारच्या वेळेस, ती झोपलेली असताना, आम्ही सगळेच त्या विहिरीचा असा उपयोग करीत होतो. तेंव्हा अंगात मस्ती होती. साधी विहीर आणि तिचे इतके लाड? हाच प्रश्न मनात असायचा. तिचा डोळा चुकवून विहिरीवरून हेमराज वाडीत जायचे किंवा आमच्या वाडीत यायचे, यात सगळ्यांना आनंद वाटायचा. असो, एकूणच पारशी शेजारी असणे भाग्याचेच, पण आजची भावना आहे. कधीही कुणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ नाही. त्यांचा एकूणच सगळा आब वेगळाच असायचा. इस्त्रीचे कपडे, गोरेपान चेहरेपट्टी, काहीशी संथ हालचाल, गुजराती सदृश भाषा याचे थोडे मनात आकर्षण होते. जेंव्हा जवळून जायचे तेंव्हा अंगावर शिंपडलेला परफ्युम, आमच्या नाकात दरवळायचा. त्या काळात परफ्युम लावणे, कल्पनेत देखील बसले नव्हते. त्यातून बहुतेक प्रत्येक पारशाकडे बजाजची स्कुटर असायची. पारशांचे एक वैशिष्ट्य तेंव्हाही नवलाचे वाटायचे. सकाळ सकाळी ६,६.३० वाजता, पारशी कुटुंब प्रमुख लेंगा आणि बनियन (त्यांची बनियन देखील विशिष्ट प्रकारचीच असायची) घालून, हातात पाण्याने भरलेली बादली घेऊन, स्कुटर धुवायला सुरवात करीत. स्कुटर ते इतक्या आत्मीयतेने साफ करीत की आपल्या बायकोवर इतकी आत्मीयता दाखवत असतील का? साधारणपणे अर्धा, पाऊण तास हा स्वच्छतेचा चालू असायचा. पुढे साऊथ आफ्रिकेत रहाताना, जेंव्हा मी गाडी घेतली आणि जेंव्हा गॅरेज मध्ये धुवायला नेत असे, तेंव्हा हटकून या पारशांचे दृश्य डोळ्यांसमोर तरळायचे. पारशांचे एकूण आयुष्य अतिशय आखीव रेखीव असायचे. आमच्यात ते कधीही खेळायला आल्याचे आठवत नाही . काही मुलांशी ओळख, मैत्री झाली झाली परंतु त्यांचे आयुष्य आणि आमचे आयुष्य यात सतत एक अदृश्य पडदा असायचा. मी तर त्यांच्याशी बहुतेकवेळा इंग्रजीत बोलत असे. त्यांना ते फार सोयीस्कर पडायचे. आमच्या शेजारच्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर "केटी" नावाची बाई राहायची. अतिशय सुडौल बांधा, केसाचा अप्रतिम बॉब केलेला!! वास्तविक ती दुसऱ्या कुणाची तरी "बायको" होती तरीही केवळ आम्हा मित्रांचाच नव्हे तर सगळ्या वाडीचा Crush होती. एकतर मिडी-मॅक्सि मध्ये वावरायची. उंच टाचांची पादत्राणे घालायची. गोरापान रंग आणि त्यावर लाल चुटुक लिपस्टिक!! आम्ही तर तिच्याकडे बघतच बसायचो. तिच्याशी बोलायचे धाडस केवळ स्वप्नात!! वाडीत चालताना, कधीकधी ती केस उडवून सारखे करायची. तसे केल्यावर, त्यावेळी फार कळले नाही पण हृदयाची धडकन, वगैरे वाढायची!! पुढे काही कामानिमित्त मी तिच्या घरी गेलो होतो पण जाताना मीच अधिक नर्व्हस होतो!! खरे तर हे सगळे त्या पौगंडावस्थेतील चाळे होते कारण नंतरच्या आयुष्यात तिची फार आठवण मनात राहिली नाही. अर्थात त्यांच्या घरातील समारंभांना मात्र जरूर आमंत्रण मिळायचे. काही पारशी लग्नांना गेल्याचे आठवत आहे. इंग्रजी चित्रपटातील विवाह सोहळे बघितलेले असायचे आणि त्या सोहळ्यात आणि पारशांच्या लग्न सोहळ्यात काहीतरी साम्य आढळायचे. त्यांचा "पटेटी" हा सण मात्र खूप लक्षात राहिला. त्या निमित्ताने तूप, दुधात साखरेसह मिसळलेल्या शेवया आणि वरती चारोळ्यांची पखरण, असा "साज" आमच्या घरी यायचा. एक, दोनदा "धनसाक" खाल्याचे तुरळक आठवत आहे. अर्थात दिवाळीत माझी आई देखील फराळाचे ताट पाठवीत असे. माझी विशेषतः "येझदी" नावाच्या मुलाशी बऱ्यापैकी मैत्री होती. आम्ही बरेचवेळा वाडीतच गप्पा मारीत बसायचो. त्यांची शाळा, त्यांचे रीतिरिवाज वगैरे मला त्याच्याकडूनच समजले. वास्तविक, आमच्या इमारतीत "बर्जेस" नावाचा गोरापान मुलगा, माझ्या वयाच्या जवळपास होता पण त्याच्याशी कधी २ शब्द बोलल्याचे आठवत नाही. एकूणच पारशी तसे एकलकोंडे वृत्तीचे. माझ्या आई,नानांशी काही पारशी लोकांशी ओळख होती पण त्या ओळखीचे मैत्रीत कधी रूपांतर झाले नाही. माझ्या इमारतीत आमचे कुटुंब वगळता चारी मजल्यावर पारशी रहायचे. अर्थात कधी कधी वादावादी व्हायची. गिरगावात आजही पाण्याची बोंब असते, पहाटेला तास, दीड तास पाणी येणार आणि त्यावेळातच घरातले पाणी भरून घ्यायचे. आम्ही तळमजल्याला रहात होतो, परिणामी आमच्याकडे पाण्याचा "फोर्स" जास्त! बरेचवेळा असे व्हायचे, आम्हाला कधीतरी जास्तीचे पाणी लागायचे आणि मग पाण्याचा नळ आमचा चालू असायचा. जरा विलंब झाला की मात्र वरील पारशी ओरडायला लागायचे - _ए तल माला पानी बंद करो! काही वेळ आरडाओरडा चालायचा. आम्ही भाऊ सगळेच अर्ध्या चड्डीतले, काय बोलणार? कधी कधी वरच्या मजल्यावरून मासे धुतलेले पाणी खाली गटारात फेकले जायचे! मग आईचा वितंडवाद सुरु व्हायचा. क्वचित बाचाबाची झाल्याचे आठवत आहे पण असे काही तुरळक प्रसंग वगळता, एकूणच कधीही त्रास झाला नाही. आणखी एक आठवण मनात रुंजी घालत आहे. जवळपास रोज, संध्याकाळी दिवेलागण झाल्यावर प्रत्येक पारशाच्या घरातून मंद असा धुपाचा वास यायचा आणि सगळ्या वाडीभर दरवळत असायचा. अर्थात माझ्या घराच्या आजूबाजूला सगळेच पारशी असल्याने, माझ्या घरात तर तो वास कोंदलेला असायचा. प्रत्येक पारशाच्या घरात धातूचे भांडे (आपल्या वाटीपेक्षा मोठे) असायचे आणि त्यात पेटलेले कोळसे आणि त्याच्यावर चंदनाच्या तुकड्यांची पावडर आणि तुकडे टाकले जायचे आणि ते भांडे, संपूर्ण घरात फिरवले जायचे. बरेच वर्षे हा सुगंध नाकात आणि मनात भरून राहिलेला होता. या पारशांनीच सकाळी भेटल्यावर "Good Morning" करायचे शिकवले. तेंव्हा आम्हा सगळ्या मुलांना याचे नवलच वाटायचे. आम्ही मित्र सकाळी शाळेत जायला एकत्र निघत असू पण कधी असले आमच्या तोंडून चुकूनही आले नाही!! एक नक्की, हे पारशी सगळे आर्थिक दृष्ट्या बऱ्यापैकी सधन होते. माझ्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील मुलगी South African Airways मध्ये नोकरीला होती. ती तिथे नोकरीला आहे, याचा मला पत्ताच नव्हता. पुढे, मी एकदा तिथे तिकिटासाठी गेलो असता, तिनेच मला ओळख दाखवली. अनिल अवाक!! पण बहुतेक पारशी हे, गोदरेज,टाटा किंवा वाडिया सारख्या प्रचंड मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीला होते. काहींची मुले परदेशात गेली आणि स्थिरावली, असेही पुढे समजले. हळूहळू पारशी आमची वाडी सोडून दुसरीकडे रहायला गेले आणि वाडीतील शांतता भंगली. आता तर वाडीत ५०% पेक्षा जास्त मारवाडी आहेत आणि त्यांचा कलकलाट आहे.

No comments:

Post a Comment