Thursday 21 October 2021

शाम शेठ!!

वास्तविक शाम शेठ हा काही हेमराज वाडीत रहाणारा नव्हता. मोहन बिल्डिंग मध्ये रहात होता. बरे त्याचे वय आमचे वय, यात महदंतर होते. वास्तविक पाहता माझी, त्याच्याशी ओळख त्यामानाने उशिरा झाली. माझ्या अंदाजाने प्रदीपची ओळख आधीची आणि नंतर मग, मी,सुरेश, उदय इत्यादींची ओळख झाली पण ओळख झाली ती मात्र अतिशय घट्ट. त्याकाळात रोजच्या रोज आमच्या त्याच्याशी भेटीगाठी व्हायच्या. अंगाने गलेलठ्ठ, वर्णाने काळा, डोळ्यांवर जाड काचांचा चष्मा उंची साधारणपणे साडे पाच फुटाच्या आसपास!! आम्ही तरी त्याला, त्याच्या हॉटेलच्या गल्ल्यावरच बसलेला बघितला, इतका की तो कुठल्या रंगाची पॅन्ट घालायचा, हे देखिल बघितले नाही. आवाज बराचसा खर्जातला होता पण आमच्याशी बोलताना मात्र अत्यंत खट्याळ असायचा. वास्तविक ती केरळीय हिंदू - मातृभाषा अर्थात मल्याळम परंतु सगळे आयुष्य मुंबईत गेल्याने (त्यातून मोहन बिल्डिंग सारख्या मध्यम वर्गीय लोकांच्यात गेल्याने) मराठी भाषा चांगलीच अवगत होती, विशेषतः "जहाल" मराठी शब्द इतके अस्खलित बोलायचं की आमची हसून पुरेवाट व्हायची. वास्तविक त्याचे उडपी हॉटेल होते पण त्या हॉटेलमध्ये आमचा ग्रुप तासंतास गप्पा मारीत बसायचा - क्वचित काही खायला मागवले तर, अन्यथा आम्ही निव्वळ चकाट्या पिटीत बसत असू. तेंव्हा आम्ही सगळे विशीच्या आसपास होतो त्यामुळे अंगावर फारशा जबाबदाऱ्या नव्हत्या. संध्याकाळी, तेंव्हा आम्ही सगळे खाडिलकर रोडवरील एका मठात जात असू. तेंव्हा मी थोडासा आस्तिक होतो, असे म्हणता येईल. आता त्या मठात कुणी जाते का? काही कल्पना नाही. एका महाराजांचा मठ आहे (आता तर मला त्या महाराजांचे नाव देखील आठवत नाही, इतका मी परका झालो) मठात जाऊन दर्शन घ्यायचे आणि शामशेठच्या हॉटेलात ठिय्या मांडायचा. अर्थातच, सुरवातीचे बोलणे, साधारणपणे दिवसभराचा ताळा मांडणे असाच असायचा. पुढे गप्पांची गाडी वर्गातील मुलींवर यायची किंवा नुकत्याच बघितलेल्या चित्रपटातील अभिनेत्रीवर यायची. गिरगावकर म्हटल्यावर भाषा रासवट असणे क्रमप्राप्तच होते. त्यातून कुणातरी जरा एखाद्या मुलीबद्दल सलगीने बोलायला लागला कि लगेच त्याची मनसोक्त टर नेहमीच व्हायचे. अर्थात सलगी दाखवायची म्हणजे त्या मुलीच्या शारीर सौंदर्याबद्दल शाब्दिक उधळण व्हायची!! अभिनेत्री असेल तर भाषा अधिक चेकाळली जात असे. शामशेठ शांतपणे ऐकत बसलेला असे. कधी कधी आमच्यात भांडणे व्हायची,अगदी आय, माय काढली जायची!! परंतु सगळी पेल्यातील वादळे असायची. शामशेठ हसत असे आणि त्याची मजा घेत असे. अर्थात काहीतरी टवाळी अति वाह्यात व्हायला लागली (तशी वाह्यात भाषा रोजच्यारोज आमच्या तोंडून बाहेर पडायची. गिरगावकर म्हटल्यावर अशी भाषा अध्याहृतच असते म्हणा) की मग शामशेठ त्याच भाषेत आमच्याशी संवाद साधायचा परंतु जरा हलक्या आवाजात कारण काही झाले तरी तो, त्याच्या धंद्याच्या गल्ल्यावर बसलेला असायचा आणि त्या हॉटेल मध्ये इतर बरेचजण खायला येत असत. त्याला तशा शिवराळ भाषेत बोलायला कसलाच किंतु वाटत नसे आणि याचे आम्हा सगळ्यांना कौतुक होते. वास्तविक शामशेठ तेंव्हाच पन्नाशीच्या आसपास होता पण आमच्यातील एक मित्र, असाच वागायचा. त्याने, त्याच्या हॉटेलमध्ये स्पष्ट सांगितले होते, ही मुले हॉटेल मध्ये की एखादे रिकामे टेबल त्यांना द्यायचे आणि तिथे कुणीही "ऑर्डर" घ्यायला जायचे नाही. शामशेठ खरंतर प्रदीपच्या अधिक जवळ असायचा. अक्षरश: कित्येक दिवस, कितीतरी तास आमच्या गृपने त्या हॉटेलात आणि तद्नुषंगाने, शामशेठ बरोबर घालवले. आमची ती मानसिक गरज झाली होती. पुढे मी हळूहळू नास्तिक झालो आणि मठात जाणे बंद झाले तरी देखील मी दर संध्याकाळी इथेच आमच्या गृपला भेटायला येत असे. मला आज नवल वाटते कारण व्यावहारिक दृष्टीने बघितल्यास, आम्ही काही त्याच्या हॉटेलचे रोजचे गिऱ्हाईक नव्हतो तेंव्हा आमच्याकडून त्याला कपर्दिक फायदा होण्याची शक्यता नव्हती तरीही त्याला आमच्या गृपचा लळा लागला होता. कधीकधी कुणीतरी काही दिवस त्या "अड्ड्यावर" यायचा नाही पण जेंव्हा तो परतायचा, तेंव्हा शामशेठ न चुकता त्याची चौकशी करायचा!! असा हा आमचा अत्यंत लोभस मित्र होता. आम्ही तिथे त्या हॉटेलात फार तर चहा मागवायचो कारण आम्हाला सिगारेट फुंकायची असायची. माझ्या आठवणीत, ३,४ वेळाच आम्ही तिथे "वडा सांबार" मागवल्याचे अंधुकसे आठवत आहे. अर्थात प्रत्येकाची आपले पंख पसरून आकाशात झेप घ्यायची वेळ येणारच असते आणि तशी वेळ आली. माझे संबंध हळूहळू दुरावले. एकदा अचानक प्रदीपचा फोन आला - शामशेठ अत्यवस्थ आहे. मी आणि सुरेश त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला जात आहे. करणे देण्यात आता काहीच अर्थ नाही पण मी जाऊ शकलो नाही आणि काही दिवसातच शामशेठ गेल्याची बातमी, प्रदीपनेच मला दिली. तारुण्याचा एक तुकडा घेऊन शामशेठ पुढे निघून गेला. पुढे आम्ही सगळेच आपापल्या आयुष्यात इतके रममाण झालो की त्याची आठवण विस्मृतीत गेली. मध्यंतरी, फोनवर बोलताना सुरेशने एकदम आठवण काढली आणि सगळ्या आठवणी रांगोळीप्रमाणे स्वच्छ दिसायला लागल्या. मन कुठेतरी कातर झाले. शामशेटच्या अखेरच्या दिवसात, त्याला भेटायला हवे होते, ही रुखरुख मनात जागी झाली आणि त्यातूनच असा लेख लिहावा, मनात आले.

No comments:

Post a Comment