Saturday 6 February 2021

नैना नैना नीर बहाये

कलाकृती निर्माण झाली की तिची निर्मात्याशी असलेली *नाळ* तुटलेली असते. त्यामुळे तिचा शोध घेणे हे नेहमीच व्यर्थ असते. एक तर, या बाबतीतील सगळी विधाने अंदाजवजा असतात. जिथे स्वतःची स्वतःला ओळख फार अवघड असते तिथे दुसऱ्यासंबंधी अशी विधाने करीत कलाकृतीच्या जन्माचा मागोवा घेणे धार्ष्ट्याचे ठरते. वास्तविक हा भाग मानसशास्त्रीय अधिक असतो आणि त्याचा कलाकृतीच्या समीक्षेशी काहीही संबंध नसतो. तो रसास्वाद कधीच नसतो. रसास्वादाचा गाभा हा कलाकृतीच्या सौंदर्यरूपाचा आस्वाद घेणे हाच असतो. आणि इथेच कलाकृती आणि रसिक, याचे नाते नेमकेपणाने पुढे येते. रसिक जितका अधिक संवेदनक्षम, अधिक जाणकार तितका त्याचा कुठल्याही नवीन कलाकृतीचा अनुभव अधिक संपन्न आणि रसरशीत असतो. त्यात मग निर्मितीप्रक्रियेची जाण असणे अंतर्भूत असते. आजची आपली कलाकृती अशीच रसरशीत, आधुनिक तरीही परंपरेकडे वळून बघणारी आहे. सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांनी प्रस्तुत कविता लिहिली आहे. कवितेतील प्रतिमा या नेहमीच्या पारंपरिक आहेत म्हणजे मीरा हे प्रतीक घेतल्यावर तिचे विषाचा प्याला घेणे किंवा पुढील अंतऱ्यात कृष्ण, राधा आणि बासरी हे चिरंतन प्रतीक किंवा त्याच्या शेवटाला - *ये हैं सात सुरो का दरिया, झर झर बहता जाये* ही ओळ पारंपरिक संकल्पना ठसठशीत मांडते. कवितेतील शब्दरचना वाचताना, एक सलगता आढळते. गेयता तर आहेच आहे, पहिल्याच ओळीत *नैना नीर बहाये* म्हटल्यावर पुढे याच ओळीचा विस्तार केला आहे अर्थात, हे क्रमप्राप्तच असते म्हणा. गाण्याचे *मीटर* लक्षात घेऊनच सुरवातीला *नैना* शब्द २ वेळा घेतला आहे, अन्यथा दुसरे कुठलेच प्रयोजन आढळत नाही. त्यामुळेच मग मुखडा संपवताना *झूम झूम* या शब्दाची द्विरुक्ती झाली आहे. गाण्यासाठी शब्दरचना करताना, चालीचे वजन तर ध्यानात घेणे जरुरीचे असते परंतु ते लक्षात घेताना, शब्द असे घेतले जावेत की ते उच्चारताना *खटके* आपसूक गळ्यातून यावेत. कवितेतील *कारागिरी* ही अशी असते. *मुझ बिरहन का* इथे *मुझे* लिहिले असते तरी फारसे खटकले नसते परंतु स्वररचना बघता, ओळीचा शब्द *आकारांत* किंवा *अकारान्त* असणे साजून दिसते आणि गायनाच्या दृष्टीने अधिक सोयीचे पडते. अर्थात हा नियम नव्हे कारण दुसऱ्या आणि शेवटच्या अंतऱ्यात - *प्रेम* हा शब्द चक्क जोडाक्षर आहे पण त्याचा विचारे आपण स्वररचना आणि गायन, या संदर्भात स्वतंत्रपणे करूया. या गाण्याची स्वररचना ही सुप्रसिद्ध संगीतकार ए.आर.रेहमान यांची आहे. गाण्याच्या पहिल्या सुरापासून आपल्याला *भटियार* रागाची ओळख होते. अर्थात रहमान या संगीतकाराची जी शैली आहे - स्वररचना करताना कर्नाटकी संगीत आणि पाश्चात्य वाद्यमेळ (प्रसंगीत संगीत धाटणी देखील) यांचा मनोरम मेळ घातला जातो. अर्थात नियमाला अपवाद हे असतातच म्हणा. गाण्याची सुरवात पियानो वादनातून होते आणि संपूर्ण गाण्यात या वाद्याचे सूर ऐकायला येतात. वास्तविक हे संपूर्णपणे पाश्चात्य धाटणीचे वाद्य तरीही त्यातून काढलेले सूर जराही *अभारतीय* वाटत नाहीत आणि ही संगीतकाराची दृष्टी. आणखी एक मजेचा भाग. गाण्यातील ताल हा जर का, मात्रेचे आघात हातावर घेतलेत, तरच हिंदी चित्रपटात वारंवार वाजला जाणारा *केरवा* ताल आहे, हे समजून घेता येते. गाणे तालाने निबद्ध झाले आहे पण अस्तित्व किंवा ताल वाद्याचे वजन जितके म्हणून हलके ठेवता येईल तितके ठेवले आहे. अंतऱ्यामधील बासरीचे सूर देखील याच धर्तीवर घेतले आहेत. *भाटियार* राग पहाटेचा आहे तेंव्हा इतक्या पहाटकाळी वाद्यमेळ अतिशय नाममात्र आणि गायनालाच उठाव देणारा असावा, हे स्वररचनाला संयुक्तिक म्हणायला हवे. गाण्यात जरी *भाटियार* रागाचे सूर आधाराला घेतले तरी कुठेही राग समोर ठेवत आहे, असा आग्रह दिसत नाही. चालीची संस्कृती लक्षात घेता ते साहजिक म्हणायला पाहिजे. अंतरे समान बांधणीचे बांधले आहेत असे वाटत असताना दुसरा अंतरा एकदम वेगळ्याच सुरावर ऐकायला मिळतो. अर्थात फार वरचे सूर नाहीत परंतु *प्रेम है गिरधर की बांसुरीया, प्रेम हैं राधा का सांवरिया* या ओळी मुद्दामून ऐकायला हव्यात आणि तसेच पुढील ओळ पुन्हा मुखड्याच्या अंगाने कशी घेतली आहे, हे देखील ऐकण्यासारखे आहे. गाणे एका विरहिणीच्या मनोवस्थेचे आहे पण टी मनोवस्था अतिशय संयतपणे स्वरांतून मांडली आहे. किंबहुना *संयत सादरीकरण* हेच या गाण्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल. बरेचवेळा रेहमान आपल्या गाण्यात तालवाद्याला बरेच महत्व देतो पण हे गाणे निरपवाद म्हणायला लागेल. विरहिणीने स्वतः:शीच केलेला हा संवाद आहे. आता रेहमान यांचे थोडे मूल्यमापन. एक वेधक तपशील असा, हा संगीतकार आपले संगीत नेहमी पाश्चात्य वाद्यांवर वाजवून बघतो. स्वनरंगाचे आभारतीयत्व, (कधीकधी अनेकस्वरी) सुरावटींचे वातावरण निर्माण करण्याची शक्यता, ध्वनिगुंजनाने भोवताल भरून टाकू शकणार समावेशक आणि अखंडित ध्वनी - हे सारे गुण इथे पियानो वाद्यातून आपल्याला ऐकायला मिळतात. रेहमानला एकंदरीत विरोधातत्व प्रिय आहे, असे म्हणता येईल. चित्रपट संगीताच्या रूढ आणि मान्य शैलीपासून अनेक बाबतींत दूर सरकणारी अर्थपूर्ण रचनापद्धती रेहमान याने वापरली आहे. अधिक महत्वाची बाब म्हणजे भारतीय तालाच्या वर्तुळात्मते ऐवजी तो अखंड कालविभाजनाने लयावतार घडवण्याच्या मार्गाचा अवलंब केला जातो. त्याचे लयबंध अधिक आधुनिक वाटतात, याचे हे एक कारण असू शकते. इथे त्याने *केरवा* सारखा *द्विभाजक* ताल वापरला, हा योगायोग नव्हे. रेहमानच्या संगीतात ध्वनी आणि संगीतकाराची चल गती यांनाही समोर ठेवले जाते. एका दृष्टीने रेहमान याच्या कामाची पूर्वावृत्ती राहुल देव बर्मनच्या संगीतात होती असे म्हटले पाहिजे. भारतीय कलासंगीतापासून दूर जातात पण पुन्हा, पुन्हा त्या परंपरेकडे वळून बघतात. गायिका साधना सरगम यांनी हे गाणे अतिशय मनापासून गायले आहे. शब्दांवर कुठेही अनावश्यक वजन नाही. स्वररचनेचे वजन नेमकेपणाने गळ्यावर पेलले आहे. गायन ऐकताना, भारतीय कलासंगीताचा अभ्यास केल्याचे जाणवते. वास्तविक हे स्त्री गीत आहे आणि त्यात सूक्ष्मपणे लोकसंगीतशैली संस्कारित केली गेली आहे. त्यामुळे एकूणच गायन मधुर, तीव्रपणे भावपूर्ण आणि लोक तसेच शिष्ट गायनशैली यांचा समतोल राखून त्यांना एकसंध करणारे आहे. गायिकेचा तारता पल्ला विस्तृत आहे तसेच आवाज पातळ आहे. प्रसंगी काहीसा निमुळता होत जाणारा आहे. पण त्यात वजनदारपणा नाही. *प्रेम है गिरधर की बांसुरीया* ही ओळ या विधानाच्या पुष्ट्यर्थ ऐकावी. हे गाणे चित्रपटात आहे परंतु दुर्दैवाने हा चित्रपट (Water चित्रपट) इथे काही प्रसिद्ध झाला नाही त्यामुळे गाण्याच्या परीक्षणात काहीसा विक्षेप निर्माण होतो. लताबाईंनी सादरीकरणात *लालित्य* बाबत जो मानदंड निर्माण केला त्याच्या जवळपास हा आवाज जाऊ शकतो अर्थात त्याला आणखी वेळ द्यायला हवा. रेहमान यांची अनेक गाणी प्रचंड लोकप्रिय झाली परंतु या इतक्या अप्रतिम गाण्याच्या वाटेल हे भाग्य आले नाही आणि याचे प्रमुख कारण चित्रपट इथे प्रदर्शित होऊ शकला नाही, हे असू शकते तरीही चोखंदळ रसिकांची नाळ या गाण्याशी सहज जुळते अंडी हेच या गाण्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणता येईल. नैना नैना नीर बहाये मुझ बिरहन का दिल सजन संग झुम झुम के गाये नैना नैना नीर बहाये विष का प्याला काम ना आया मीरा ने पी के दिखाया प्रेम तो है गंगा जल इसमें विष अमृत बन जाये नैना नैना नीर बहाये प्रेम है गिरधर की बांसुरीया प्रेम हैं राधा का सांवरिया ये हैं सात सुरो का दरिया झर झर बहता जाये नैना नैना नीर बहाये Naina Neer Baha - YouTube

1 comment: