Sunday 19 July 2020

बगळ्यांची माळफुले


Anil Govilkar govilkaranil@gmail.com

10:48 AM (0 minutes ago)
to AvinashMahendra
"अंधार असा घनभारी, चंद्रातून चंद्र बुडाले;
स्मरणाचा उत्सव जागून, जणू दु:ख घराला आले. 
नाहींच कुणी अपुले रे, प्राणांवर नभ धरणारे;
दिक्काल धुक्याच्या वेळी, हृदयाला स्पंदविणारे......."
कवी ग्रेस यांच्या "संध्याकाळच्या कविता" या कवितासंग्रहातील एका कवितेतील काही ओळी. आपल्याकडे काही संदर्भ नक्की झालेत आणि त्यापैकी एक म्हणजे कवी ग्रेसांची कविता अति दुर्बोध असते. वरील ओळीत तरी दुर्बोध म्हणावे असे काही नाही परंतु ग्रेस यांनी कविता मराठीत लिहिली आणि मराठी आपली मातृभाषा. तेंव्हा शब्द अनाकलनीय आहेत असे घडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.फरक पडतो तो, शब्दांच्या association मधून नेमका आशय साधण्यात येणारे अपयश!! माझे असे म्हणणे नाही, कवी ग्रेस यांच्या सगळ्या कविता "सुबोध" आहेत!! आजच्या आपल्या "बगळ्यांची माळफुले" या गाण्यातील कवितेच्या संदर्भात बघायचे झाल्यास, "सलते ती तडफड का कधी तुझ्या उरात" किंवा "रिमझिमते अमृत ते विकल अंतरात" या ओळींशी कुठेतरी ग्रेस यांच्या या ओळींचे नाते जाणवले,इतकेच. यावेळेस मात्र या गाण्याचा आस्वाद जरा वेगळ्या विचाराने करणार आहे. प्रस्तुत गाणे अतिशय लोकप्रिय आहे यात शंकाच नाही परंतु प्रस्तुत गाण्यातील "काव्य" हे "भावगीताच्या" जवळ जाणारे आहे का? असे तर नव्हे हे काव्य म्हणजे एक सुंदर "भावकविता" आहे? ललित संगीतातील कविता विसविशीत असू नये,  निकष योग्यच आहे परंतु ललित संगीत हे समीक्षक आणि सामान्य रसिक यांमधील एक दुवा आहे आहे आणि हे जर ध्यानात ठेवले तर या काव्याची तपासणी वेगळ्या पद्धतीने करावी लागेल. कवी वा.रा. कांत यांची ही कविता आहे. आता कवितेचे ध्रुवपद वाचायला घेतल्यास वरील मुद्दा अधिक स्पष्ट होईल. 
"बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात 
भेट आपुली स्मरशी काय तू मनात?" 
इथे "बगळे" आणि "त्यांची माळफुले" म्हणजेच एकत्रित आकाशात विहार करणारी रांग. आणि या पार्श्वभूमीवर घडलेली आपली भेट आणि त्या भेटीचे स्मरण!! कवितेचा तिसरा अंतरा वाचायला घेऊया. 
"हातांसह सोन्याची सांज गुंफताना 
बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनी मोजताना 
कमळापरी मिटती दिवस उमलुनी तळ्यात"
इथे "सोन्याची सांज" हे प्रतीक घेऊन त्या जोडीने "कमळाचे कळे" याची जोड लावली आहे जी मुखड्याच्या आशयाशी जोडली आहे. आता भावगीत ऐकताना, हे सगळे एकत्रितपणे समजून घेणे तसे अवघडच जाते आणि रसिकांचे कवितेकडे लक्ष जाण्याचा संभव कठीण होऊन बसतो. त्यामुळे असे म्हणावे लागते, प्रस्तुत गीत ही समृद्ध "भावकविता" आहे. कवी वा. रा.कांत  हे कधीही त्यादृष्टीने "गीतकार" नव्हते. स्वान्तसुखाय पद्धतीने कविता करणारे कलाकार होते आणि याच दृष्टीने त्यांनी ही कविता लिहीली असणार. इथे मी फक्त सामान्य रसिकांच्या दृष्टीने लिहीत आहे. 
संगीतकार श्रीनिवास खळ्यांनी या कवितेला चाल लावण्यासाठी "पहाडी" रागाचे सूर आधाराला घेतले आहेत. "आधी शब्द मग चाल" या पंथाचे संगीतकार असल्याने त्यांनी या कवितेचा, त्यांच्या दृष्टीने अन्वयार्थ लावलाच असणार. मुखड्याची चाल ऐकताना आपल्याला "पहाडी" रागच समोर येतो. अर्थात पुढे प्रत्येक अंतरा त्यांच्या नेहमीच्या शैलीनुसार "स्वतंत्र" बांधला असल्याने, रागाचे अस्तित्व पुसट होणे क्रमप्राप्तच ठरते. इथे एक प्रश्न मनात येतो, खळे काकांना मुखड्याची चाल सुचल्यावर डोळ्यासमोर वसंतराव देशपांडे आले की संपूर्ण चाल आधी मनात योजून मगच गायकाला समोर आणले? याचे उत्तर आता मिळणे अशक्य. संपूर्णपणे "गायकी" अंगानेच स्वररचना केली आहे. वाद्यमेळ म्हणजे भरीव स्वरांचा ऑर्गन आणि तबला इतकाच आहे. याचा वेगळा अर्थ असा लावता येईल, मराठी रंगभूमीवरील संगीताची पार्श्वभूमी मनात ठेऊनच सगळे गाणे रचले असावे. जर का तसे असेल तर मग सगळ्या स्वररचनेचा अन्वयार्थ त्याच अंगाने लावता येतो. चालीत जरी स्वर विस्ताराच्या "जागा" भरपूर असल्यातरी खळे काकांनी गायन हे भावगीताच्याच साच्यात बसवले आहे. मुळात या संगीतकाराने कधीही भरमसाट वाद्यमेळाची संस्कृती अंगिकारली नव्हती आणि इथे तर  "निम्न शास्त्रोक्त" अंगाची चाल म्हटल्यावर मग इतर वाद्यांची गरजच उरली नाही. 
गायक वसंतराव देशपांडे यांनी ही कविता गायली आहे. मुळात वसंतराव देशपांडे हे रागदारी संगीत पचवले गायक, त्यातून गळ्यावर मराठी रंगभूमीवरील गायकीचा प्रभाव पडलेला!! या गायकाची "मूळ" शैली ही "स्वरांवर आरूढ" होण्याची किंवा "स्वरांना आपल्या काबूत" ठेवण्याची आहे. मुखडा सुरु होतो तोच मुळी जोरकस स्वरांनी!! मुखड्याची पहिली ओळ ठीकठाक वाटते परंतु "भेट आपुली स्मरशी काय तू मनात" या वाक्यातील हळवेपणा गाताना कुठेही आढळत नाही!! प्रेयसी जवळ नाही त्यामुळे कातर झालेले मन अशा स्वरांनी व्यक्त होईल का? किंबहुना सगळे गाणे याच शैलीत गायले गेले आहे. ऐकायला छानच वाटते कारण हे गाणे अतिशय लोकप्रिय झाले आहे परंतु "शब्दप्रधान गायकी"चा आकृतिबंध ध्यानात घेतला तर अशा प्रकारचे गायन कितपत योग्य आहे? गायन ऐकताना ठुमरी गायनाचा भास होतो आणि तसा होतो कारण गायकाच्या गळ्याची ठेवण. तिसऱ्या अंतऱ्यात "फडफडणे पंखांचे" हे शब्द या नजरेतून ऐकावेत. शब्दांत विव्हळता आहे पण गायकीत त्याचा तसूभरही अंश आढळत नाही. 
त्यानिमित्ताने एक विचार मनात माझ्या नेहमी येतो. शास्त्रोक्त गायकांनी भावगीत करणे काही नवीन नाही, आजही काही गायक भावगीते गातात. याचा अर्थ "तयारी" असते परंतु ललित संगीताची जातकुळी ही कलासंगीतापेक्षा संपूर्ण वेगळ्या धाटणीची असते. स्वररचनेत एक हलकी,मंजुळ अशी स्वरलय असते, कधी कधी तर स्वरांतर्गत अशी वेगळीच लय असते जिथे "भाव" यालाच अतिशय महत्व असते. इथेच सगळे शास्त्रोक्त गायक कमी पडतात. संगीताचा अभ्यास किंवा व्यासंगाबाबत शंकेला जागा नसते परंतु "शब्द" कसे उच्चारावेत आणि ते शब्द उच्चारताना "हरकती","ताना" इत्यादी स्वरालंकार कसे उपयोगात आणावे, याचे स्वतंत्र शास्त्र असते. रागदारी गायकीमुळे गायकाचा गळा "जड" होतो तसेच तंबोऱ्याच्याच साथीने गायची सवय झाल्याने इतर वाद्यांच्या कल्लोळात, शब्दांचे औचित्य सांभाळून गायन करायचे, त्यांना महत्प्रयासाने देखील तितकेसे जमत नाही. हा निव्वळ कलाविष्काराचा प्रभाव आहे. इथे हिणकस किंवा कमअस्सल ठरवण्याचा अजिबात उद्देश नाही. 
त्यामुळे गाणे कमालीचे लोकप्रिय झाले तरी "शब्दप्रधान" गायकीच्या संदर्भात बरेच उणे पडते. श्रीनिवास खळ्यांच्या काही गीतांबाबत असे झाले आहे. वास्तविक शब्दोच्चाराबाबत अतिशय जागरूक असलेला हा संगीतकार. असे असून देखील हे गाणे आणि असे आणखी एक गाणे आहे, त्या  गाण्याबाबत अशी तडजोड का स्वीकारली असावी? 

बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात 
भेट आपुली स्मरशी काय तू मनात?

छेडिति पानात बीन थेंब पावसाचे 
ओले रानात खुले ऊन अभ्रकाचे 
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात 

त्या गाठी, त्या गोष्टी, नारळीच्या खाली 
पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली 
रिमझिमते अमृत ते विकल अंतरात 

हातांसह सोन्याची सांज गुंफताना 
बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनी मोजताना 
कमळापरी मिटती दिवस उमलुनी तळ्यात 

तू गेलीस तोडुनी ती माळ, सर्व घागे 
फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे 
सलते ती तडफड का कधी तुझ्या उरात 


2 comments:

  1. वा. रा. कांत यांचे च असेच अजून एक गित आहे , आज राणी पुर्वी ची ती प्रित तू मागू नको
    खुपच तरल हळवी संवेदनशील कविता आहे, काय एक एक शब्द आहेत कांतांचे
    बोल हलके बोल श्वासे चांदणे डहुळेल ना
    अहाहा काय शब्द काय कल्पना
    पण जेव्हा गाणं ऐकलं अरेरे अत्यंत भ्रम निरास.

    यापेक्षा आणखी एका गोष्टीचे वाईट वाटते वेगवेगळ्या गाण्यांवर अनेक रिमीक्स येतात बहुतांश टुकार , पण अश्या चुकलेल्या गाण्यावर चांगले रिमीक्स का बनत नाहीत.

    बाळासाहेब पाटील , पुणे

    ReplyDelete