Thursday 18 June 2020

सांज ढले गगन तले

राज्यातील निरव शांतता .आसमंत काहीसा गहिरा आणि मंद्र सप्तकात हळुवार वावर असलेला. नायक आपल्या घराच्या सौंधात अस्वस्थपणे फेऱ्या मारीत असलेला. आपल्याला ही उदासीनता कुठून प्राप्त झाली? या प्रश्नाच्या गर्तेत सापडलेला. दरबारातील राजनर्तिका वसंतसेना बघून त्याचे मन हलले का? या प्रश्नावर काहीसा थबकलेला. वसंतसेना म्हणजे  मूर्तिमंत मादक सौंदर्य हे तर खरेच पण आपल्याला अप्राप्यआहे का ? हा एक प्रश्न चारुदत्ताला छळत असतो आणि या प्रश्नानेच त्याच्या मनातील द्वंद्वाचे उत्तर मिळते. अर्थात आपण ब्राह्मण म्हणजे आर्थिक बाजू काहीशी लंगडी पण तरीही "अचपळ मन माझे, ना आवरीता" अशी अवस्था झालेली. आपल्या आजच्या गाण्याची ही पार्श्वभूमी. १९८४ साली आलेल्या "उत्सव" चित्रपटातील "सांज ढले गगन तले" या गाण्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चित्रपट हा प्रसिद्ध संस्कृत नाटककार शुद्रक यांच्या "मृच्छकटिक" नाटकावर आधारित आहे. आता इ.स.पूर्व २०० या काळात लिहिलेले नाटक म्हणजे राजे,संस्थानिक यांची विलासी राजवट आणि हे तर ओघानेच आले. त्या काळात "उज्जयिनी" नगरी  ही जगात मान्यताप्राप्त नगरी, ऐश्वर्याने आणि कलाविष्काराने नटलेली. आता तो काळ लक्षात घेता, त्यावेळचे शांत, विलासी तरीही संयत वातावरण संपूर्ण चित्रपटात आढळते. आपल्या प्रेमाची कबुली कशी द्यायची? या विवंचनेतून आजचे गाणे आपल्या पुढे येते. 
प्रसिद्ध हिंदी कवी वसंत देव यांनी चित्रपटाची सगळी गाणी लिहिली आहेत. वसंत देव हे रूढार्थाने  महाजन चित्रपटांसाठी लिहिणारे कवी नव्हते परंतु एकूणच चित्रपटाचा सगळा बाज बघता, इथे नेहमीच्या चटपटीत शब्दकळेची आवश्यकता नसून ज्यांना "कविता" म्हणता येईल आणि संस्कृतोद्भव बाजाची गीते गरजेची होती आणि ती गरज वसंत देवांनी सार्थपणे पूर्ण केली असे म्हणता येईल. गीतातील कविता वाचताना याचा अनुभव येईल. "किरणों के पाखी" किंवा "मगन हुयी थी कलियां" किंवा "निशिगंधा के सूर में" हे शब्द वाचतानाच डोळ्यासमोर सगळे वातावरण उभे राहते. "किरणों के पाखी" म्हणजे "किरणांचे किरण, "निशिगंधा के सूर में" इथे "निशिगंध" हेच फुल योग्य आहे कारण या फुलाच्या सुगंधाचे प्रणयी वातावरणाशी जुळलेली सायुज्यता!! कवितेत कुठेही उर्दू शब्द नाही कारण त्याची आवश्यकताच नाही. कविता ही कविता म्हणून सुंदर आहे. आशय राजस आहे पण संयत आहे. कुठेही उठवळपणा नाही किंवा घीसेपीटे शब्द नाहीत. "इतने में तिमिर धसां सपनीले नैनों में" या ओळीत चक्क "तिमिर" हा शब्द आला आहे तर ओळ संपवताना "सपनीले नैन" इतका अप्रतिम काव्यात्मक शब्द योजला आहे. 
संगीतकार लक्ष्मीकांत/प्यारेलाल या गाजलेल्या जोडीचे आहे. या संगीतकारांनी इथे आपल्या संगीताचा बाजच संपूर्णपणे वेगळा ठेवला आहे .किंबहुना संपूर्ण संगीत पारंपरिक भारतीय वाद्यांवर आधारलेले आहे. अर्थात याचाच परिणाम चित्रपटात वेगवेगळ्या रागरागिण्यांचा अंतर्भाव असणे होय. चित्रपटीय सौंदर्यशास्त्रानुसार जी अधिकार परंपरा अपरिहार्य असते , तिची हुकूमत मान्य करून रचनाकारांनी आपल्या कामगिरीवर स्वतःच मर्यादा घालण्याचा सुज्ञपणा दाखवला आहे. प्रस्तुत गाण्याची थोडी तपासणी केल्यास काही बाबी ठळकपणे लक्षात येतात. खरतर या जोडगोळीची बहुतेक गाणी म्हणजे गीताचा पहिला चरण सप्तक मर्यादेतील मधल्या स्वरावर म्हणजे मध्यम स्वरावर आणि दुसरी ओळ खाली आणून आधारस्वरावर म्हणजेच षडजावर ठेवणे. आपल्या भारतीय संगीतात "समेची पूर्तता" ही नेहमी "सा" या स्वरावर आणण्यात होते आणि हा निकष लक्षात ठेवला म्हणजे वरील विधानाच्या महत्वाच्या अंगाची जाणीव होऊ शकेल. अनेक सामाजिक-सांस्कृतिक कारणांनी सुरावट "सा" या स्वरावर संपली की एक प्रकारची पूर्णता आणि स्थैर्याची भावना दृढ होते आणि विधानाची प्रचिती या गाण्याच्या बाबतीत स्पष्टपणे दिसते. यामुळेच ही रचना एक सुंदर गीत म्हणून आपल्या समोर येते. दुसरा बारकावा असा दिसतो, या गीतात हिंदुस्थानी कला संगीतातील मारवा आणि बिभास रंगांच्या अवतीभवती फिरत राहते आणि हेच राग योजायच्या मागील हेतू समजून घेता येतात. या दोन्ही रागांच्या चौकटीचे वा बांधणीचे स्वरूप असे आहे, त्यात "सा" या आधारेश्वराचे महत्व या ना त्या प्रकारे कमी होते. परिणामतः सुरावटींच्या चलनांतून उत्पन्न होणाऱ्या तणावाचे विसर्जन होत नाही. चित्रपटाच्या कथेच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास, जे प्रेम सर्वसाधारण शिष्टसंमत मानले जात नाही - तेंव्हा सांगीत ताण विसर्जित न होणे हा सांगीतिक लाभ नव्हे का!! इथे या गाण्यात रचनाकारांनी वाद्यवृंदाचा उपयोग हात राखून केलेला आहे.खऱ्या अर्थाने वाद्यवृंद इथे मवाळ आणि साहाय्यकारी भूमिका बजावतो. वीणा या वाद्याचा नाजूक झंकार यात लक्षणीय भर टाकतो. 
या रचनाकारांची संपूर्ण कारकीर्द लक्षात घेता, यांनीही भारतीय कलासंगीतातील राग,ताल आणि रूढ प्रकारांपासून दूर सरकण्याचा कल दाखवला. मुद्दा असा आहे की असे दूर सरकण्यातून त्यांनी निश्चितच गुणवत्तापूर्ण रचना करण्यात यश मिळवले असे म्हणता येईल. मुख्य म्हणजे जी शंकर/जयकिशन यांनी चित्रपटीय भाषा निर्माण केली, त्याचीच पुढील पायरी या जोडीने गाठली. ध्वनीच्या वापरातील प्रगत अवस्था त्यांनी निर्माण केली असे विधान सहज करता येईल आणि तसे करताना त्यांनी नेहमीच चित्रपटाचा रसिक ध्यानात ठेवला. अर्थात त्यांची दीर्घ कारकीर्द लक्षात घेता त्यात बरेच उणे सापडते पण त्याला इलाज नाही. आणखी गमतीचा विशेष असा दिसतो, कुठलीही रचना करताना त्यांनी गीताच्या मुखड्यावर नेहमीच विशेष मेहनत घेतली आहे परंतु पुढील अंतरे बांधताना त्यांनी तितके वैविध्य दाखवले नाही. 
आता गायक म्हणून सुरेश वाडकर यांनी या गाण्याला यथोचित न्याय दिला आहे असे म्हणावेच लागेल. कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात असे टिकाऊ स्वरुपाचे गाणे मिळाले. भारतीय रागसंगीताचा पायाभूत अभ्यास असल्याचे, हे गायन ऐकताना समजून घेता येते. जरी स्वररचना संपूर्णपणे रागाधारित नसली तरी "गायकी" अंगाकडे झुकणारी आहे. रचनेत अनेक हरकती, अर्धाताना इत्यादी अलंकार सढळपणे ऐकायला मिळतात. खरतर आवाजाचा पल्ला चांगला आहे परंतु काहीवेळा अकारण लाडिकपणा डोकावतो. त्यामुळे त्यांच्या गायनावर काहीशी मर्यादा आल्याचे दिसते. आता या गाण्याबाबत बोलायचे झाल्यास. एकूणच गाण्याचा "स्वभाव" अचूक ओळखून गायन केले आहे.नेमके शब्दोच्चार तसेच गाताना हलक्या अंदाजाने घेतलेल्या हरकती, यामुळे गायन मनात रुजत जाते आणि ही चांगल्या गायनाची फलश्रुती मानवीच लागेल.

सांज ढले गगन तले,हम कितने एकाकी 
छोड चले नैनों को किरणों के पाखी 

पाती की जाली से झांक रही थी कलियां 
गंध भरी गुनगुन में मगन हुयी थी कलियां 
इतने में तिमिर धसां सपनीले नैनों में 
कलियों के आंसू का कोई नहीं साथी 

जुगनू का पट ओढे आएगी रात अभि 
निशिगंधा के सूर में कह देगी बात अभी 
कंपता है मन जैसे डाली अंबुवा की 



1 comment:

  1. सुधांशु19 June 2020 at 05:06

    खूप छान लिहिलंय ! कानसेन च्या निमित्ताने आपले लेख वाचायला मिळतच असतात.. आज प्रत्यक्ष ब्लॉग वर वाचायची संधी मिळाली. सांज ढले चं लता चं ही एक बिभास मधलं चं काउंटरपार्ट आहे.. नीलम के नभ छायी, पुखराजी झाँकी... मेरे तो नैनो में किरणो के पाखी
    एल पी नी बरंच संगीत ( विशेषतः नंतरच्या कालखंडातील )उडाऊ दिलं असलं तरी लता ला त्यांनी काही अप्रतिम गाणी दिली.. वानगी दाखल, मोम की गुडिया मधलं, पुरिया धनश्रीतलं,बंधन टूटे ना सावरिया पण थोडं बदलून म्हणजे कोमल रिषभाच्या ऐवजी शुद्ध रिषभ वापरून वेगळी ट्रीटमेम्ट दिल्याने एकदम वेगळा फील येतो.. तसंच, पलकोकी छाव में मधलं, पिलू मधलं अतिशय अनवट असं घुंगटा गिरा हैं जरा घुंगटा उठा दे रे.. कोई मेरे माथे की बिंदिया सजा दे रे.. यात पुढे नुसतं पिलू अंगाने जात नाही गाणं तर अचानक चारुकेशी (? ) चे स्वर ही ऍड होतात.. तसंच आपल्याला टिपिकल एल पी केहरवा ऐकायची सवय असताना अचानक झपताल ऐकल्यावर अवर्णनीय आनंद होतो.. बदलते रिश्ते मधलं मेरी सासों को जो महका रही हैं हे पुरिया धनश्री / पुरिया कल्याण मधलं गाणं कसं विसरता येईल.. सती सावित्री मधल जीवन डोर तुम संग बांधी आणि कभी तो मिलोगे ही कलावती/ जनसंमोहिनी, संत ज्ञानेश्वर मधलं खबर मोरी ना लिनी हा शिवरंजनी, शेवटी शेवटी आलेल्या राम लखन मधलं लताच बडा दुःख दिना.. हा मारुबिहाग
    अशी असंख्य निघतील..
    सुधांशु अंबिये

    ReplyDelete