Saturday 13 June 2020

शब्दावाचून कळले सारे

गाण्यामध्ये कविता कशी मिसळावी,याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मंगेश पाडगांवकरांची भावगीते. एका बाजूने सुबोध शब्दकळा तर दुसऱ्या बाजूने आशयाची श्रीमंत अभिव्यक्ती!! फार पूर्वी आकाशवाणीवर अनेक संगीतिका सादर व्हायच्या आणि त्यातील एक गाजलेली संगीतिका म्हणजे "बिल्हण". मंगेश पाडगावकरांनी नेहमीच भावगीत लिहिताना कविता आणि गाणे यामधील सीमारेषा अस्पष्ट केल्या. पाडगावकरांची कितीतरी गाणी ही, सर्वात आधी सक्षम आणि आशयपूर्ण अशी कविता आहे. बरेचवेळा हा मुद्दा पाडगावकरांच्या गीतांच्या संदर्भात विसरला जातो. याचे मुख्य कारण, आपण निष्कारण केलेला पंक्तिप्रपंच. वास्तविक कुठलेही अप्रतिम गीत ही त्या प्रसंगाची एक शाब्दिक अशी उत्कट अभिव्यक्ती असते. परंतु रसिकांना आधी भूल पडते ती गायनाची आणि तद्नुषंगाने ऐकायला मिळणाऱ्या सुरांची. यात फार चूक काही नाही परंतु आस्वादाच्या परिघाचा विचार करताना, सुरांसह कवितेचा आस्वाद घेणे म्हणजे गीताला संपूर्ण न्याय  देणे होय. 
पाडगावकरांची बरीचशी गीते अशी "गेयता" म्हणजे काय? या प्रश्नाची उदाहरणे म्हणून सांगता येतील.गीत लिहिताना एक ठराविक प्रसंग डोळ्यासमोर असतो परंतु त्या प्रसंगाला अनुरूप अशी सुयोग्य शब्दकळा देण्यात पाडगावकर निश्चितच प्रतिभाशाली होते. गीत शक्यतो गूढ असू नये जेणेकरून कवितेचा अर्थ लावण्यातच रसिकांची शक्ती खर्च होईल परंतु कवितेत सपकपणा,विसविशीतपणा आणि भोंगळपणा नावालाही असू नये,ही दक्षता पाडगावकरच्या गीतांतून आढळते.परिणामी त्यांची गीते अर्थपूर्ण होण्यात मदत होते आणि मुख्य म्हणजे संगीतकाराला प्रेरित करण्यास महत्वाचा हातभार लावते. आता या कवितेत, व्याकुळ प्रियकर  आपल्या प्रणयाच्या भावना दर्शवित आहे. खरा प्रणय हा नजरेतून आणि स्पर्शातून साकार होतो,हे झाले जुने वचन परंतु कवीने इथे अधिक रंगेलपणातून धीट वृत्तीतून आशय व्यक्त केला आहे. 
"प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले" या ओळीतून हीच काहीशी धीटपणाची भावना व्यक्त होते. प्रियकर आधुनिक काळातला आहे तेंव्हा त्याची अभिव्यक्ती नेहमीच कालसुसंगत असणार. तसेच दुसऱ्या अंतऱ्याची शेवटची ओळ - "मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले". प्रियकर - प्रेयसी संबंधात अंगस्पर्श तर ओघाने होणारच म्हणजेच "मिठी" या कृतीत त्याची सांगता होणार. अर्थात इथे "या विश्वाचे रहस्य"  कसलाही गूढार्थ नसून, जोडप्याचे जे अवघे प्रणयी विश्व आहे, त्याचा नेमका अर्थ कळला,असाच अन्वयार्थ लावणे सुसंगत ठरेल. 

पु.लं.च्या स्वररचनेवर त्यावेळच्या नाट्यगीतांचा प्रभाव जाणवत आहे. विशेषतः: मास्तर कृष्णराव यांचा जाणवण्याइतका प्रभाव दिसतो. मास्तरांच्या रचनेतील प्रासादिकता, कल्पक छोट्या अशा ताना, आवाजाला तरलपणे फिरवण्याची हातोटी, एकाच अक्षराच्या पुनरावृत्तीत दोन वेगळ्या सुरांचा वापर करून चमत्कृती घडवायची आणि रचनेत रमणीयता आणायची इत्यादी खुब्यांचा आढळ पु.लं.च्या बहुतेक रचनांमधून ऐकायला मिळतो. आता या गाण्यातून देखील हाच विचार स्पष्ट होतो. "काफी" रागावर आधारित स्वररचना आहे परंतु रागाला बाजूला सारून शब्दांना महत्व देत चालीचे चलन ठेवायचे,हाच विचार प्रमुख दिसतो. मी वर म्हटल्याप्रमाणे शैलीवर मास्तर कृष्णराव यांचा गडद रंग आहे तसेच बालगंधर्व शैलीचे अनुकरण अजाणता का होईना पण आढळते. विशेषतः "बोलताना" ऐकताना हा प्रभाव दिसतो. खाजगी भावगीत असेल किंवा आणि काही कारणे असू शकतील पण वाद्यमेळात फार नावीन्य ऐकायला मिळत नाही तसेच काही खास प्रयोग केलेत असे आढळत नाहीत. आपण निर्माण केलेली चाल, आपली सर्जनशीलता दर्शवायला पुरेशी आहे, असा विचार जाणवतो. 
गायक म्हणून जितेंद्र अभिषेकी बुवांनी आपली छाप स्वच्छपणे या गायनावर सोडली आहे आणि ती इतकी लोकप्रिय आहे की बहुतेकांना या गाण्याची स्वररचना अभिषेकी बुवांनीच केली आहे, असे मानून घेतले आहे. अर्थात याला कारण अभिषेकी बुवांचे संगीतकार म्हणून असलेली प्रचंड लोकप्रियता आणि पु.लं. नी संगीतकार म्हणून दाखवलेली उदासीनता. अत्यंत स्वच्छ आणि भावपूर्ण शब्दोच्चार तसेच "रियाझी गळा" असल्याने सहज व उस्फुर्त वाटाव्यात अशा हरकती, हे वैशिष्ट्य सांगता येईल. अर्थात गायन करताना रागदारी संगीताचा ठसा पुसता येत नाही पण हे तर सगळ्याच शास्त्रोक्त गायकांबाबत म्हणता येईल. काही शब्दोच्चार मात्र अधिक "ठळक" गायले गेले आहेत - उदाहरणार्थ मुखड्याच्या ओळीतील "घडू" हा शब्द नव्याने घडवल्यासारखा उच्चारला आहे कारण गळ्यावरील रागदारी संगीताची तालीम. परंतु असे २,३ उच्चार वगळता गायन अतिशय परिणामकारक झाले आहे. मुळात अभिषेकीबुवांना कवितेचे भान अतिशय सजग असल्याने कवितेतील आशयाबाबत सुसंवादी गायन ठेवावे, हे सूत्र त्यांनी उद्मेखूनपणे पाळले आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या कविता, या विधानाची साक्ष देतील. 
शब्दावाचून कळले सारे,शब्दांच्या पलीकडले 
प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले 

अर्थ नवा गीतास मिळाला  
छंद नवा अन ताल निराळा 
त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले 

आठवते पुनवेच्या रात्री 
लक्ष दीप विरघळले गात्री 
मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले 


No comments:

Post a Comment