Saturday, 28 November 2015

अलौकिक अडाणा



असेच काही द्यावे….  घ्यावे…. 
         दिला एकदा ताजा मरवा;
देता घेता त्यात मिसळला 
         गंध मनातील त्याहून हिरवा. 
कवियत्री इंदिरा संत यांच्या "मरवा" कवितेतील या ओळी, "अडाणा" राग ऐकताना, बरेचवेळा माझ्या मनात येतात. वास्तविक पाहता, दरबारी रागाच्या कुटुंबातील, हा महत्वाचा सदस्य पण जातकुळी मात्र फार वेगळी आहे. एकाच कुटुंबातील भिन्न स्वभावाची व्यक्तिमत्वे असावीत आणि तरीही रक्ताचे नाते असावे, त्यातला हा प्रकार आहे. दरबारी गंभीरतेकडे झुकणारा तर अडाणा थोडा अवखळता दर्शविणारा!! राग अडाणा शक्यतो मध्य आणि तार सप्तकात रमत असल्याने, रागातील भावना देखील काहीशा तीव्र असतात. 
रागाच्या तांत्रिक भागाकडे वळल्यास, आरोही सप्तकात "गंधार" स्वराला प्रवेश नाही तर अवरोही सप्तक, सगळ्या सुरांना सामावून घेते. त्यामुळे रागाची जाती ही "षाडव/संपूर्ण" अशी होते. त्यापुढे बघायचे झाल्यास, "गंधार","धैवत"आणि "रिषभ" स्वर कोमल आहेत आणि बाकीचे सगळे स्वर शुद्ध. असे असले तरी "कोमल निषाद" स्वर या रागात फार महत्वाची भूमिका बजावतो. अर्थात, नेहमीप्रमाणे, "षडज-पंचम" वादी - संवादी असल्याने, कोमल निषाद स्वराचे नाते, या स्वरांबरोबर जुळून येते. रागच समय, रात्रीचा दुसरा प्रहर दिला असल्याने, आपसूक कोमल स्वरांना प्राधान्य मिळणे क्रमप्राप्त होते.   

आता आपण, या रागाची बंदिश ऐकायला घेऊ. "माता कालिका" ही अत्यंत सुप्रसिद्ध चीज म्हणजे, पंडित जसराज यांच्या गायनाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणावे, इतक्या जवळची आहे. ही बंदिश ऐकताना, आपल्याला रागदारी गायन, लालित्यपूर्ण पद्धतीने कसे मांडता येऊ शकते, याचा अप्रतिम अंदाज घेत येतो.  किंचित अनुनासिक स्वर, तिन्ही सप्तकात सहज विहार, तारता पल्ला अतिशय विस्तृत असल्याने, ताना, बोल ताना तसेच मुर्घ्नी स्वर, इत्यादी अलंकार सहजपणे गळ्यातून दृष्टीस पडतात. वास्तविक, नेमका मुर्घ्नी स्वर, ही फार कौशल्याची बाब मानली जाते पण, पंडितजी, अतिशय सहजपणे, हा अलंकार गळ्यातून साकार करतात. 


 प्रस्तुत रचनेत, या सगळ्या गुणांचा आढळ तर दिसतोच पण, त्यापेक्षा वेगळी बाब म्हणजे शब्दोच्चार. बंदिशीत स्पष्टपणे, काली मातेची पूजा आहे तेंव्हा स्वरांत समर्पण वृत्ती आढळणे, सहज शक्य आहे. भावनेच्या अंगाने सादरीकरण,हे पंडित जसराज यांच्या गायकीचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. 

"ऐ दिल मुझे ऐसी जगह" हे "आरझू" चित्रपटातील,अनिल बिस्वास यांनी संगीतबद्ध केलेले गाणे, म्हटले तर "अडाणा" रागावर आहे. याचे मुख्य कारण, गाण्याची सुरवात, "दरबारी" रागाच्या काठाने होते पण, अस्ताईच्या दुसऱ्या ओळीत आपल्याला "अडाणा" रागाची खूण सापडते. मी वरती म्हटल्याप्रमाणे, दरबारी आणि अडाणा, हे दोन राग एकाच कुटुंबातले पण, वेगळ्या स्वभावाचे. त्यामुळे एखादा सूर जरा वेगळ्या प्रकारे लागला की लगेच रागाची अदलाबदल होते आणि हेच भारतीय रागदारी संगीताचे फार मोठे वैशिष्ट्य मानावेच लागेल. केरवा तालात, ही रचना बांधली आहे. अनिल दा, आपली रचना कधी "आक्रोशी", "अनघड" स्वरुपाची करीत नाहीत परंतु रचना गाताना, त्यातील गायकी अंग आपल्याला दिसून येते. खरतर असे म्हणता येईल, "अनिल दा" म्हणजे हिंदी चित्रपट गीतातील एक असामान्य "स्कूल" होते आणि त्यांच्या रचनेचा प्रभाव, अगदी राहुल देव बर्मन पर्यंत अव्याहतपणे पडलेला होता. शास्त्रीय संगीताचा सांगोपांग व्यासंग आणि चित्रपटासाठी गाणे कसे बांधायचे, याची नेमकी जाण असलेला हा संगीतकार. तलत मेहमूद आणि मुकेश, या गायकांना प्रकाशात आणणारा संगीतकार, म्हणून या रचनाकाराची ओळख दीर्घकाळ स्मरणात राहील. 

लखनौ सारख्या संगीताने प्रभावित असलेल्या शहरात वावरल्याने, आवाजात खास "लखनवी तहजीब" बाळगून असलेला गायक म्हणजे तलत मेहमूद. तसे बघितले तर तलतच्या आवाजाला काही प्रमाणात मर्यादा होत्या, चित्रपटात अनेक प्रसंग असतात आणि त्यानुरूप गायन करणे, ही गायकाची गरज असते. तलतने आपल्या गळ्याची "जात" ओळखली होती आणि त्यानुरूप गाणी स्वीकारली. परिणाम असा झाला, संख्येच्या दृष्टीने, तलतची गाणी फारच तुरळक झाली.वरील गाणे जे आपण ऐकले, तोच या गायकाचा खरा पिंड!! लखनौच्या संपन्न, शिष्ट,सुसंस्कृत आणि संयमित वातावरणाचा हा अपरिहार्य परिणाम म्हणावा लागेल. थोडक्यात, बेगम अख्तर यांनी गझल गायनात जो आदर्श निर्माण केला, त्याच्या जवळपास फक्त तलत जाऊ शकतात. १९६० नंतर या गायकाची पीछेहाट झाली कारण, नंतरच्या संगीत शैलीत, सुरावट, संथ गती व नाजूक प्रक्षेपणास जागा नव्हती. आपण कुठली गीते गायची त्यांच्या संहितेबाबत ते चोखंदळ होते. अर्थात लखनौचा वारसा म्हटल्यावर, उर्दूचे स्वच्छ, शुद्ध उच्चारण आणि कोणत्या रचनेस गाण्याच्या योग्यतेचे काव्य समजायचे याबाबतची उच्च अभिरुची!! शक्यतो, मंद्र आणि शुद्ध स्वरी सप्तकात, गायनाची पातळी ठेवायची. गाताना, शायरीचे नितांत महत्व जाणून, गायकी दाखवायची तसेच ताना घेताना देखील कधीही आशयाच्या अभिव्यक्तीला धक्का पोहोचणार नाही, हीच वृत्ती ठेवायची. परिणाम असा झाला, गायनात, कधीही संपूर्ण सप्तक आवाक्यात घेतले आहे, असे ऐकायला मिळत नाही. अर्थात, हा मुद्दा सुगम संगीताच्या बाबतीत गैरलागू आहे.    

"मन मोहन मन मे हो तुम्ही" हे "कैसे कहू" चित्रपटातील असेच एक अतिशय सुश्राव्य चालीचे गाणे, या रागाच्या सावलीत वाढते. संगीतकार  एस.डी.बर्मन,याच्या चतुरस्त्र प्रतिभेचे आणखी अप्रतिम उदाहरण, म्हणून या गाण्याचा निर्देश करता येईल. गाण्याच्या सुरवातीच्या आलापीपासून, आपल्याला "अडाणा" रागाची ओळख करून घेता येते पण, हा संगीतकार, नेहमीप्रमाणे, रागाच्या आधार स्वरांना हाताशी घेतो आणि पुढील वाटचाल, स्वतंत्र करतो, जणू या संगीतकाराचा हा स्वभाव असावा, असेच वाटते. त्रिताल वापरलेला आहे आणि तो देखील सरळ, स्पष्ट वापरला आहे. रफी/सुमन कल्याणपूर/एस.डी. बातीश, या त्रयींनी हे गाणे गायले आहे. गाणे जरा बारकाईने ऐकले तर आपल्याला सहज समजून घेता येईल, या रागाचे जे वादी/संवादी स्वर आहेत, (षडज/पंचम) ते ज्या वजनाने, या रागात वावरतात, त्याच वजनाने, या रचनेत वावरत आहेत. "मन मोहन मन मे" ही ओळ ऐकताना(च) आपल्याला या रागाची ओळख होते. असे असून देखील, आपण, पुढील अंतरा ऐकला तर, रागाच्या सावलीतून ही रचना बाहेर पडते आणि आपले "स्वतंत्र" अस्तित्व प्रगट करते. अशा खेळात, हा संगीतकार फार वाकबगार होता.  


आवाजाचा पल्ला, भरीवपणा, समान ताकदीची फेक, मर्दानी जोमदारपणा, सुरेल आणि लहान स्वरांशांचे सफाईदार द्रुतगती गायन, हे गुण, रफी यांच्या बाबतीत मांडता येतील. सुरवातीच्या काळात, ढाल्या स्वरात आणि नंतर अवतरलेल्या नाटकी प्रत्ययाशिवाय गायलेली आढळतात. आवाज आणि गायनशैली या बाबतीतल्या, नव्या युगाच्या मागण्या त्यांनी विनासायास पूर्ण केल्या. आपल्या आवाजात "गोलाई" आहे, याची त्यांना यथार्थ जाणीव होती आणि प्रसंगी त्या विशेषाचा त्यांनी वापर केल्याचे आढळून येते. अर्थात इथे एक प्रश्न उपस्थित होतो. प्रचलित म्युझिक व्हिडियोसाठी गायन करणे, त्यांना कितपत भावले असते? खरतर चित्रपटीय आविष्कारांच्या गतीमानतेस लवचिक प्रतिसाद देण्याचे रफी यांचे कौशल्य अतुलनीय होते पण, कलाविचारांत अशा "जर-तर" या बाबींना तसा फारच कमी वाव असतो. 
सुमन कल्याणपूर हे असेच काहीसे दुर्लक्षित गेलेले नाव. सुरेल आवाज, हलका पल्लेदार आणि पारदर्शक आवाज, भडक नसलेले स्वनरंग आणि त्यांच्या छत विपुलतेने ऐकायला मिळतात. परिणाम असा, त्यांच्या गायनातून विस्तीर्ण भावपट धुंडाळता येतो. गायीकेस रागदारी संगीत अवगत होते का नव्हते, याची प्रचीती देणाऱ्या रचना फारशा मिळाल्या नाहीत पण, जिथे शक्यता होती, तिथे त्या रचनेनुरुप पडताळा घेता येतो. लताबाईंनी आवाज आणि लगाव, याबाबत जे कौशल्य ज्या प्रकारे आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत दाखवले त्याच्या जवळपास, केवळ हीच गायिका पोहोचू शकली असती, असे ठामपणे मांडता येते. तितकी या गायिकेच्या गळ्याची क्षमता आणि ताकद नक्कीच होती. अर्थात, त्यांना जर का संधी लीलाल्या असत्या, अधिक टिकाऊ चित्रपट मिळाले असते तर लताबाईंच्या कर्तृत्वास पर्यायी केंद्र म्हणून उभी राहण्याची क्षमता, त्यांच्या गायकीत निश्चित आढळत होती पण दुर्दैवाने तसे घडले नाही!!    
आता आपण, या रागावरील आणखी आधारित काही गाणी ऐकुया आणि रागाची ओळख पूर्णपणे घेऊया. 
आपकी नजरो ने समझा प्यार के काबील मुझे - मदन - अनपढ - लता मंगेशकर

झनक झनक पायल बाजे - वसंत देसाई -झनक झनक पायल बाजे -उस्ताद अमीर खान

Sunday, 22 November 2015

झुळझुळणारा छायानट

"ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे 
कोणती पुण्ये अशी येती फळाला 
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे"
ना. धों. महानोरांच्या प्रसिद्ध कवितेतील या ओळी राग "छायानट" रागाशी काहीसे साद्धर्म्य दाखवतात. रात्रीच्या पूर्वांगात गायला जाणारा हा राग, "षाडव/संपूर्ण" अशा जातीच्या या रागात, आरोही स्वरसप्तकात "निषाद" स्वराला स्थान नाही. "पंचम/रिषभ" हे या रागाचे वादी/संवादी स्वर असून, "षडज" आणि "मध्यम" स्वरांना या रागात भावदर्शनासाठी महत्वाचे स्थान आहे. "जोंधळ्याला चांदणे लखडून जावे" अशी असामान्य ओळ वाचताना, नजरेसमोर रात्रीच्या शांत समयी, शेतातील डुलणारी जोंधळ्याची रोपे येतात आणि या रागाच्या समयाला भाविक स्वरूप देतात. 

खालील रचना, ही छायानट रागातील अप्रतिम बंदिश आहे. पंडित ओंकारनाथ ठाकुरांच्या असामान्य गायकीने नटलेला, छायानट. पंडितजींच्या गायनाची सगळी वैशिष्ट्ये यथार्थपणे दाखवणारी, ही रचना आहे. सुरवातीची मंद्र सप्तकातील घुमारेदार गायकी आणि त्या आलापीतून, पुढे विस्तारीत होणारी ही रचना म्हणजे या रागाचा "अर्क" आहे. 


ओंकारनाथ ठाकुरांच्या आवाजाची काही वैशिष्ट्ये बघायला गेल्यास, आवाजाचा केलेला आवाहक उपयोग. तसे बघितले तर ग्वाल्हेर घराण्यातील गायकांच्या आवाजात एक प्रकारे एकाच स्वन डोकावत राहतो. मग, स्वरमर्यादा, गायनप्रकार, विस्तारासाठी कुठलाही राग निवडलेला असो. कारणे अनेक देता येतील पण आवाजात स्वनभेद फार क्वचित अनुभवायला मिळतो. ओंकारनाथ ठाकूर इथे स्वत:चे वेगळेपण ठसठशीतपणे जाणवून देतात. मग, तो कधीतरी हळुवार, आर्त असेल किंवा काहीवेळा विलक्षण बोचरा वाटणारा पण प्रचंड ताकदवान आवाज जोरदार तानांनी भारून टाकतो. आपण नेमके काय करीत आहोत, याची यथार्थ जाणीव गायनातून आढळते. आपल्या मांडणीत विविधता यावी म्हणून त्यांनी किराणा सारख्या वेगळ्या घराण्याच्या गायकीचा अवलंब आपल्या गायनात केल्याचे आढळते. तसेच शब्दांच्या उच्चारांवर अधिक भर दिसतो. वास्तविक, रागदारी गायनात, शब्दोच्चाराला फारसे महत्व दिले जात नाही, ओंकारनाथ अपवाद. गायनातील कारागिरी, हा भाग फार महत्वाचा आहे. सुरवातीला, गायनात, क्षमता तसेच कौशल्य, याचा आढळ दिसतो पण पुढे त्याला मात्र दुर्दैवाने, त्याला प्रदर्शनाचे स्वरूप आले. विशेषत: द्रुत लयीत, गुंतागुंतीच्या ताना घेणे तसेच तार ते खालचे स्वर व उलट अशी झेप घेणे, अवाक करणारे होते. गायनात, "नाट्यात्म" आणणे आणि रसिकांना भारून टाकणे, हा विशेष खास म्हणावा लागेल.   
हिंदी चित्रपट गीतांत, शास्त्रीय नृत्य आणि त्यावर आधारित गीते, याना अपरिमित लोकप्रियता मिळाली आहे. एकात नृत्यावर आधारित गाणे म्हणजे रचना बहुतांशी द्रुत लयीत आणि अधिक आवाहक असल्याने, रसिकांचे लक्ष वेधून घेण्याचे काम, ही गाणी यथास्थित पार पाडतात. वास्तविक, शास्त्रीय नृत्यावर आधारित अशी गाणी असतात, त्यामुळे नृत्यातील जरी संपूर्ण शास्त्र जरी मांडता येत नसले तरी नृत्याबद्दल रुची निर्माण होण्यास नि:संशय मदत होते, हे निश्चित. "तलाश" चित्रपटातील "तेरे नैना तलाश कर जिसे" हे गाणे या पठडीतले आहे. या गाण्यात, "छायानट" राग जरी अस्पष्ट दिसत असला तरी जेंव्हा रचना त्या रागातील स्वरांवर "ठेहराव" घेते, ती जागा विलक्षणरीत्या झगमगून उठते. मन्नाडे यांचे गायन, अतिशय वेधक आहे. सतारीच्या द्रुत लयीतील गत आहेत आणि त्या लयीशी, गायन अप्रतिमरीत्या जुळून आलेले आहे. 

मन्नाडे  यांचा आवाज खुला आणि मर्दानी आहे. त्याचा पल्ला चांगला, अतिशय विस्तृत आहे. याचा परिणाम असा होतो, गाण्यात सर्वत्र, खुलेपणा आणि ताकद राखणे, त्यांना जमू शकत होते. त्यांचा आवाज हलका (सुगम संगीताला अतिशय पूरक) असल्याने, सर्व प्रकारच्या ताना, सहजतेने घेता येतात. भारतीय शास्त्रीय गायनात स्वच्छ "आ"करणे गायन करण्यावर भर असतो आणि हे देखील मन्नाडे, सहज करू शकतात. (खरे सांगायचे तर अनेकदा व्यावसायिक शास्त्रीय गायकांना देखील हे जमत नाही, हे लक्षात ठेवणे आवश्यक) आकाराने शक्य होणारा विशेष गुण म्हणजे सहकंपन वा गुंजन हा परिणामत: त्यांच्या गायनात ओतप्रोत भरला आहे. दुसरा भाग असा, प्रत्येक रचनेनुरूप जी एक भावस्थिती ढोबळमानाने निश्चित झालेली असते, ती दाखवणारा आवाजाचा लगाव, ते देऊ शकतात. वास्तविक चित्रपट गीतास, सांगीत कल्पनांची बढत करायची नसून, एक संबंधित मूड निर्माण करून, बाकीची कार्ये साधायची असतात. म्हणून, सुरेलपणा, भरीवपणा आणि यथायोग्य उच्चार या बाबी अत्यावश्यक ठरतात आणि हे करताना, आवाजातून, चित्रपटीय व्यक्तिमत्व मिळावे लागते. मुख्य बाब, म्हणजे हे सगळे करताना, त्यांचा आवाज कुठेही नाटकी होत नाही भावनिक संतुलन करून, चित्रपट संगीत अधिक परिणाम करते, हे वैशिष्ट्य, त्यांनी सतत कायम राखले. 

आता आपण, लताबाईंच्या सुरवातीच्या काळातील एक अतिशय सुश्राव्य गाणे ऐकुया. गाण्याची चाल खरोखरच अतिशय गोड, ओघवती आहे. प्रसंगी रचना द्रुत लयीत जाते परंतु शब्दकळेच्या आस्वादाला कुठेही बाधा पोहोचत नाही. गाण्याच्या सुरवातीपासून, रागाची ओळख होते, म्हणजे  बघा,"चंदा रे जा रे" ही ओळ गाताना, स्वरांच्या हेलाकाव्यातून, आपल्याला छायानट भेटतो आणि पुढे, अंतरा आणि मधले संगीत ऐकताना, याच रागाचे सूर ऐकायला मिळतात पण तरीही, हे गाणे म्हणजे या रागाचे लक्षणगीत नव्हे!! या गाण्यात, बहुतेक हिंदी गाण्यात सहजपणे वावरणारा केरवा ताल आहे. प्रेमाची कबुली देणारे गाणे आहे पण, तेंव्हाच्या संस्कृती नुसार गाण्याची हाताळणी अतिशय संयत रीतीने झाली आहे.  आता, गाण्यात कुठे छायानट बाजूला पडतो? हे बघायला गेल्यास, गाण्याचा पहिल्या अंतरा सुरु होताना, स्वरांची जी "उठावण" आहे, ती बारकाईने ऐकायला हवी. तिथे, रचनेने, हलक्या हाताने, रागाला बाजूला सारले आहे. अर्थात, ही कारागिरी, संगीतकार म्हणून नि:संशय, खेमचंद प्रकाश यांची. 


एकूण कारकीर्द ध्यानात घेत, या संगीतकाराला, "पियानो","सेक्साफोन" ,"क्लेरीनेट " इत्यादी पाश्चात्य वाद्यांची आवड लक्षात येते. एक तांत्रिक विशेष इथे मांडणे जरुरीचे ठरते. तसे बघितले तर ही तिन्ही वाद्ये एका वेधक सीमारेषेवर उभी आहेत. एक तर अखंड व सलग ध्वनी पुरवायचा किंवा सुटेसुटे, तुटक पण ठोस ध्वनी पुरवायचे, या दोन टोकांच्या दरम्यानची जागा या वाद्यांनी व्यापली आहे. "सतार","जलतरंग" इत्यादी वाद्ये वापरली नाहीत, असे नाही (वरील गाणे या संदर्भात ऐकावे) पण त्यांची वाद्ययोजना आधी उल्लेखलेल्या अभारतीय वाद्यांनी निर्माण केलेल्या ध्वनीप्रतिमांशी अंतरंग नाते जोडून आहे. आणखी एक बाब बघता येते. खेमचंद प्रकाश, यांना नाट्यात्म क्षण उभा करण्यासाठी ताल व ठेका आणि वाद्ये न वापरण्याचे तंत्र मनपसंत आहे, असे ठामपणे म्हणावे लागते. अशा वेळेस, गाता आवाज जेंव्हा सुरावट रेखायला लागतो, तेंव्हा ही वाद्ये, त्या सुरावटीला पाठींबा देतात, पण ध्यानात येईल इतक्या नरमाईने. गाणारा आवाज तार स्वरांत जाईल किंवा खालच्या पट्टीवर पोहोचेल पण, त्याचे परिणामकारक कार्य अतिशय नियंत्रित गतीने होत राहील. वरील गाण्याचाच आधार घ्यायचा झाल्यास, सुरवातीचे शब्द किंवा "मुखडा" कानावर पडेपर्यंत सुरावट खालच्या स्वरांवर रुंजी घालत असते आणि जेंव्हा ठाशीव किंवा वरच्या स्वरावर झेप घेणारा मुखडा येतो, तेंव्हा गीताचा रोख(च) बदलतो. आणि हे सगळे करताना, गाण्याची लय देखील, मंद्र सप्तकात वावरत असते. 

आता आपण या रागावरील आणखी काही गाणी ऐकायला घेऊ आणि या रागाची ओळख, आपल्या मनात कायमची ठसवून घेऊ. 

मुझ से नाराज हो तो - पापा कहते है - राजेश रोशन - सोनू निगम 

बाद ए मुद्दत ये घडी - जहांआरा - मदन मोहन - रफी/सुमन 

Attachments area

तू चंदा मै चांदनी



हिंदी चित्रपट गीतांत फारच कमी गाणी अशी सापडतात, जी खऱ्या अर्थी असामान्य असतात परंतु त्यांना लोकाश्रय लाभत नाही आणि हळूहळू विस्मरणात जातात. तसे बघितले तर ज्या गाण्यांना, लोकसंगीताचा आधार लाभला आहे, ती गीते देखील वर्षानुवर्षे लोकांच्या स्मरणात रहातात. थोडक्यात, असे अनुमान आपल्याला सहज काढता येईल, कुठल्याही गाण्याची "कुंडली" मांडणे, जवळपास अशक्य कोटीतली बाब आहे.
गाण्याची चाल, रसिकांच्या मनाची "नाळ" जोडणारी हवी, असा एक मतप्रवाह अनेक वर्षे प्रचलित आहे, विशेषत: गाण्याचा "मुखडा" जितका आकर्षक असेल तितके ते गाणे, रसिकांच्या पसंतीला उतरते. गाण्याचा "मुखडा" आकर्षक असणे, आवश्यक आहे पण त्याच बरोबर त्याच्या नंतरची "बांधणी" देखील तितकीच आकर्षक असणे, अत्यावश्यक असते अन्यथा, सुरवातीला मनावर घडलेला असर, हळूहळू पिछाडीला पडतो आणि गाणे निरस होण्याची शक्यता बळावते. 
काही गाण्यांच्या बाबतीत असे घडते, गाण्याची चाल पहिल्या प्रयत्नात, लक्षात(च) येत नाही आणि ते गाणे आवडीच्या बाबतीत, मागे पडते. गाण्याची चाल "अनवट" असणे, हा विचार देखील बरेचवेळा पुढे येतो. "अनवट" म्हणजे काय? चाल अवघड असणे, म्हणजे अनवट, असा एक मतप्रवाह आढळतो, त्यात थोडेफार तथ्य आहे पण पूर्णांशाने सत्य नाही. या सगळ्या मतांतून, आपल्याला एक गोष्ट ठरवावीच लागेल. गाण्याची चाल कशी असावी, याबाबत कुठेही ठाम अशी "थियरी" नाही आणि गाण्याचे आयुष्य किती आहे, याचा अंदाज करणे तर केवळ अशक्यप्राय. प्रत्येक संगीतकार, आपापल्या कुवतीनुसार उत्तरे शोधीत असतो पण काही काळाने, त्या उत्तरातील वैय्यर्थ्य जाणवायला लागते. 
"तू चंदा मै चांदनी" या गाण्याबाबत काही ठाम विषाने करताना, माझी थोड्याफार प्रमाणात द्विधावस्था होते. गाण्याची चाल सुंदर आहे, त्यात अनेक लयीचे बंध आहेत, इत्यादी सौंदर्यस्थळे शोधता येतात पण, या गाण्यात असे काय आहे, ज्यामुळे हे गाणे, माझ्या मनात ठाण मांडून आहे? या प्रश्नाचाच शोध, या निमित्ताने घेण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. 
आपण, या गाण्याचा आस्वाद घेताना, कवितेचा आस्वाद घेणे देखील, मला अत्यावश्यक वाटते कारण, गाण्यात शब्द आहेत म्हणून ते "गाणे" आहे!! तेंव्हा, गाण्याचा आस्वादाला सुरवात करण्याआधी, आपण, हे गाणे, "कविता" म्हणून काय दर्जाचे आहे? या प्रश्नाचा पडताळा घेऊया. 
कवी बालकवी बैरागी यांची शब्दरचना आहे. इथे हे ध्यानात ठेवावे लागेल, हा कवी, कधीही चित्रपटासाठी गाणी लिहिणारा कवी नव्हता आणि ही रचना देखील, कविता म्हणून प्रसिद्ध झाली होती. 
" तू चंदा मै चांदनी, तू तरुवर मै शाख रे,
तू बादल मै बिजुरी, तू पंछी मै पात रे. 

ना सरवर ना बावडी, ना कोई ठंडी छांव,
ना कोयल ना पपीहरा, ऐसा मेरा गांव रे,
कहा बुझे तन की तपन, ओ सैय्या सिरमोर,
चंद्रकिरण तो छोड कर, जाये कहा चकोर, 
जाग उठी है सांवरे, मेरी कुंवारी प्यास रे,
अंगारे भी लगने लगे पिया अंगारे भी लगने लगे,
आज मुझे मधुमास रे 

तुझे आंचल मे रखुंगी ओ सावरे 
काळी अलको से बांधुंगी ये पांव रे
गल बैय्या वो डालू की छुटे नही 
मेरा सपना सजन अब टुटे नही 
मेहंदी रची हथेलिया, मेरे काजलवारे नैन रे,
पल पल तुझे पुकारते पिया पल पल तुझे पुकारते
हो हो कर बेचैन रे 

ओ मेरे सावन सजन, ओ मेरे सिंदूर,
साजन संग सजनी बनी मौसम संग मयुर,
चार पहर की चांदनी मोहे लाल चुनर ओढा,
केसरिया धरती लगे, अंबर लालम-लाल रे,
अंग लगाकर सायबा अंग लगाकर सायबा,
कर दे मुझे निहाल रे" 

ही कविता म्हणून वाचताना आपल्या सहज ध्यानात येऊ शकते, राजस्थानच्या वाळवंटाच्या पार्श्वभूमीवरील प्रणयकथा आहे.  "बिजुरी","बावडी","केसरिया" हे खास राजस्थानच्या संस्कृतीतले शब्द. खरे तर या कवितेचा घाट बघितला तर, चित्रपट गीताच्या पारंपारिक रचनेत अजिबात बसणारा नाही. किंबहुना, गाण्याचा "मीटर" ठरवण्याच्या प्रक्रियेत तर ही शब्दकळा फार अवघड आहे. असे असून देखील संगीतकार जयदेव, यांनी गाणे करताना, ज्या कुशलतेने, रचनेला वेगवेगळी वळणे दिली आहेत, तोच खरा अभ्यासाचा भाग आहे.   
 मी सुरवातीला जे म्हटले त्याप्रमाणे विचार करता, गाण्याचा "मुखडा" हा काही इतका आकर्षक नाही. किंबहुना, गाण्याच्या आधी, जवळपास, १ मिनिट फक्त वाद्यमेळ आहे. संतूरच्या सुरांनी या गाण्याची पार्श्वभूमी तयार होते आणि ते सूर जिथे थांबतात, तिथे लताबाईंचा टिपेचा सूर लागतो - तू चंदा मै चांदनी, तू तरुवर मै शाख रे!! गाण्याच्या सुरवातीला तार स्वर लावणे आणि त्याच सुरांत गाण्याचा विस्तार करायला घेणे, हीच खरे म्हणजे गळ्याची असामान्य परीक्षा आहे. गाण्याची चाल "मांड" रागावर आहे पण हा "मांड" राग, तसाच्या तसा वापरलेला नसून, त्यात, राजस्थानी लोकसंगीताची फोडणी दिलेली आहे. वास्तविक पहाता पारंपारिक मांड रागात, सगळे स्वर शुद्ध स्वरूपात लागतात पण, तसे इथे घडत नाही. इथे "कोमल गंधार" आणि "कोमल धैवत" तसेच "तीव्र मध्यम" स्वरांचा उपयोग केलेला आहे आणि हे लोकसंगीताचे contribution!! अर्थात, असे म्हटले जाते, मांड रागाची उपपत्ती ही राजस्थानी लोकसंगीतातून झालेली आहे आणि एकूणच सगळी स्वरावली बघता, या म्हणण्यात बरेच तथ्य आढळते. 
पुढे "तू बादल मै बिजुरी" हे शब्द कसे घेतले आहेत, ते खास ऐकण्यासारखे आहे. "बिजुरी" शब्दावरील जी हरकत आहे, ती इतके अवघड आहे की, केवळ लताबाई(च) अशी हरकत घेऊ शकतात!! जयदेव, गाण्याच्या पार्श्वभागी जो वाद्यमेळ वापरतात, तिथे अत्यंत मिजाकी वाद्ये पण प्रत्येक वाद्याचा "कस" लागेल, अशी योजना करतात. मग,  वापरताना,५ ६ वाद्येच असली तरी, त्यांचे काम भागते, किंबहुना त्यामुळे इतर वाद्यांची गरजच भासत नाही. इथे बघा, संतूर, स्वरमंडळ, बासुरी, सारंगी, तार सनई अशीच मोजकी वाद्ये संपूर्ण गाण्यात आहेत पण, प्रत्येक वाद्याचे "जिवंत" अस्तित्व आहे. राजस्थानच्या वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर, ज्याप्रकारे सारंगी वाजली आहे, ती फार बारकाईने ऐकायला हवी. सगळे वाळवंट आपल्या समोर उभे रहाते. संगीतकार म्हणून जयदेव, इथे इतरांपेक्षा वेगळा ठरतो. गाणे ऐकताना, पार्श्वसंगीत आणि गाण्यातील शब्द, याचे बांधलेले नाते देखील वेगळेपणी ऐकावे लागेल. 
ना सरवर ना बावडी, ना कोई ठंडी छांव,
ना कोयल ना पपीहरा, ऐसा मेरा गांव रे,
कहा बुझे तन की तपन, ओ सैय्या सिरमोर,
या ओळी ऐकताना, आपल्याला "गायकी"चा आनंद तर मिळतोच पण त्याच बरोबर शब्दातून उभे केलेले वातावरण देखील अनुभवता येते. ओळीची सुरवात, मंद्र सप्तकात होते पण क्षणात वरच्या सुरांत चाल जाते आणि लय अवघड होते. हा सांगीत वाक्यांश अति गुंतागुंतीचा तर नक्कीच आहे पण त्याच बरोबर, कवितेच्या आशयाचा आनंद देखील, घेणे जरुरीचे भासते. 
लताबाईंच्या गायनातील आणखी वैशिष्ट्य इथे आपल्याला जाणवते आणि ते म्हणजे, गाण्याची चाल, राजस्थानी मांड रागावर आहे तेंव्हा शब्दोच्चार देखील त्याच धर्तीवर केले आहेत. हा आणखी कठीण भाग. गाण्यात हरकत घेताना, शब्दातील दडलेला आशय तर स्वरांनी अधिक अंतर्मुख करायचा पण, कुठेही शब्दांना दुखवायचे नाही!! ही कसरत, संगीतकार म्हणून जयदेव आणि गायिका म्हणून लताबाई ज्या प्रकारे करता, ते केवळ अतुलनीय आहे. गाण्यात, हिंदी चित्रपट गाण्यात वारंवार वापरलेला "दादरा" ताल आहे पण, तालाच्या प्रत्येक मात्रेचे "वजन" ध्यानात घेऊन, तिथे केवळ शब्द(च) नव्हे तर अक्षराचा शेवट करण्याइतकी तल्लख बुद्धीमत्ता, जयदेव यांनी, या गाण्यात दाखवली आहे. आपण, एका सक्षम कवितेला चाल लावत आहोत, याचे भान, जयदेव यांनी, या रचनेत कायम राखले आहे. 
गाण्यात तीन अंतरे आहेत आणि प्रत्येक अंतरा सुरु करताना, पार्श्वसंगीत जवळपास अजिबात नाही, म्हणजे संपूर्ण स्तब्धता राखून, केवळ लताबाईंच्या सुरात अंतरा सुरु करायचा आणि मग त्या सुरांचा मागोवा घेत, वाद्यांनी आपली मार्गक्रमणा करायची, अशी या गाण्याची बांधणी आहे. 
ओ मेरे सावन सजन, ओ मेरे सिंदूर,
साजन संग सजनी बनी मौसम संग मयुर,
चार पहर की चांदनी मोहे लाल चुनर ओढा,
केसरिया धरती लगे, अंबर लालम-लाल रे,

या ओळी गाताना, "चार पहर की चांदनी" इथे "चार" शब्द उच्चारताना, स्वरांत जो काही "हेलकावा" दिला आहे, त्यातून वाळवंटातील रात्रीच्या थंडीचा "शहारा" जणू व्यक्त केला आहे!! अशी सांगीतिक सौंदर्यस्थळे, या गाण्यात भरपूर आढळतात. तसेच पुढे "केसरिया" म्हणताना, "टिपिकल" राजस्थानी ढंग, स्वरांत आणला आहे. जयदेव काय ताकदीचे संगीतकार होते, याचे हे उत्तम उदाहरण ठरेल. 
गाणी सगळेच संगीतकार बांधत असतात पण, अशा प्रकारे लोकसंगीताची डूब देऊन, गाण्यात अनेक लयींना अवघड पद्धतीने खेळवत गाण्याची रचना  बांधायची,हे तल्लख आणि व्यासंगी बुद्धीमत्तेचे(च) काम आहे. जवळपास ९ मिनिटांची रचना आहे पण गाण्यातील प्रत्येक सेकंद, हा अतिशय अर्थपूर्ण रीतीने भरून काढला आहे. 
जयदेव, यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक असामान्य गाणी दिली आहेत तरी, या गाण्यासारखी रचना, खुद्द त्यांना देखील अपवादानेच करता आली. This is the creation of par excellence. 

डर्बन भाग २

डर्बन शहर तसे समुद्र किनारी वसलेले असले तरी उपनगरे मात्र डोंगराळ भागात आहेत. याचा परिणाम असा होतो, मुख्य शहरात डिसेंबर/जानेवारी मध्ये कडाक्याचे उन असले तरी उपनगरी भागात तितका कडाका जाणवत नाही. इथे आणखी एक गन्मात वारंवार बघायला मिळते. उन्हाळ्याच्या महिन्यात समजा सलग ३ दिवस उन्हाची काहिली (मुंबईच्या तुलनेत) झाली तरी ४ थ्या दिवशी हमखास पावसाची सर येते किंवा जोरदार पाउस पडतो आणि वातावरण पुन्हा सुस्नात होते. हवामान कोरडे असल्याने, पावसाची साधी सर देखील, इथले वातावरण थंड करते. 
जोहान्सबर्गच्या मानाने, इथली जीवनशैली शांत आहे. अर्थात इथे देखील मॉल संस्कृती रुजली आहे. इथले मॉल्स मात्र अतिशय प्रशस्त आहेत. Pavilion, Gateway सारखे मॉल्स म्हणजे प्रचंड संस्थाने आहेत. एकाच ठिकाणी, जगातील कुठलीही वस्तू इथे प्राप्य असते, भौतिक सुखाच्या परिसीमा इथे गाठलेल्या आहेत. जवळपास ३,४ मजली इमारतीमधून नुसते चालत हिंडणे, हाच पायांना व्यायाम आणि सुखाचे आनंदनिधान असते. डर्बन नॉर्थ भागात तर Pick n Pay Hypermarket म्हणून अवाढव्य मार्केट आहे. जगातील अति महागडे कपडे इथे बघायला मिळतात. इथल्या वस्तू महाग असतात, हे तर खरेच पण, थोडी माहिती काढली की इथे तशी स्वस्त किमतीची दुकाने देखील आहेत. अर्थात दर्जाच्या बाबतीत कुठेही तडजोड नसते आणि किराणा माल, खाण्याच्या वस्तूबाबत हेच बघायला मिळते. पहिल्यांदा मला नवल वाटायचे, इथे मॉल्समध्ये असंख्य हॉटेल्स असतात पण तिथे कोण खायला/जेवायला येत असेल? नंतर समजले, शिनिवार सकाळ, रविवार सकाळ इथल्या हॉटेल्समध्ये येउन नाश्ता करायची पद्धत आहे. अगदी सकाळ, सकाळी ८ वाजता देखील, शनिवार/रविवारी हॉटेल्स तुडुंब भरलेली असतात. केवळ, तरुण/तरुणी नसून, कुटुंबाचा सगळा जथ्था इथे हॉटेलमध्ये हजर असतो!! 
मला तर नेहमी असेच वाटते, इथला सगळा समाज, हा हॉटेल्स मध्ये खाणे आणि सदैव काहीना काही तरी शॉपिंग करणे, यातच गुंग असतो. त्यातून, इथली खरेदी म्हणजे सदैव क्रेडीट कार्डचा वापर. नगदी चलनाचा वापर फारसा इथे आढळत नाही. तुमच्या पाकिटात, किती क्रेडीट कार्डस आहेत, यावर तुमची पत ठरत असते. सुरवातीला मला देखील नवल वाटायचे पण नंतर मी देखील याच मार्गाने जायला सुरवात केली!! बरे यांचे हॉटेल्स मधील खाणे म्हणजे एक सोहळा असतो. प्रथम ड्रिंक्स ऑर्डर करायचे, नंतर "स्टार्टर्स" मागवायचे. यात जवळपास, एक, दोन तास निघून जातात. त्यानंतर मग, "मेन मेन्यु" ठरवायचा!! यात, ड्रिंक्सचे आचमन चालूच. इथे मी कितीतरी गोरे लोकं सज्जड पिणारे बघितले आणि त्यांना पिताना बघून, "अजून यांची शरीर यष्टी कशी काय सडपातळ राहू शकते?" याचे नवल वाटायचे!! काळ्यांच्या बाबतीत तर पिण्याबाबत तोड नाही. मी तर कधीच पासंगादेखील पुरू शकलो नाही, शकणारच नाही. 
पुढे, या समाजात जसा रुळायला लागलो तशी ध्यानात आले, इथले लोकं - यात स्त्रिया/मुली देखील आल्या, रोज पहाटे व्यायामशाळेत तरी जातात किंवा मैलो न मैल, धावण्याचा जबरदस्त व्यायाम करतात. आदल्या दिवशीचे सगळे खाणे, दुसऱ्या दिवसाच्या व्यायामात रिचवून टाकतात!! इथे सायकलिंग करणे, हा देखील आनंदाचा खेळ असतो. वातावरणात कितीही गारवा असला तरी, विशेषत: डोंगराळ भागात राहणारे, कितीतरी गोरे युवक/युवती, आपल्या सायकल घेऊन, रपेट करीत असताना, नित्याच्या दिसत असतात. अर्थात, यांच्या सायकली देखील देखण्या तर असतातच पण अतिशय दणकट असतात. एकूणच इथल्या समाजात, स्वच्छता, व्यायाम, कायदे पाळणे या बाबतीत जागरूकता आहे आणि मला वाटते, ती लहानपणापासून मनावर बिंबवली जाते. 
अर्थात, "गाव तिथे महारवाडा" या उक्तीप्रमाणे उकिरडा प्रत्येक ठिकाणी आढळतो. आपण, साउथ आफ्रिका टीव्हीवर बघतो, त्यामुळे या देशाची चांगली(च) बाजू नेहमी प्रकाशात येते. इथे काही वर्षे काढली म्हणजे अस्तरामागील ठिगळे दिसायला लागतात!! डर्बन इथे देखील गुन्हेगारीचे प्रमाण जरी भयानक नसले तरी नगण्य अजिबात नाही. १९९७/९८ साली, मी रात्री, बेरात्री रस्त्यावरून हिंडत असे, मध्यरात्री समुद्राकाठी जाउन बसत असे पण, जेंव्हा २००९ मध्ये परत इथे राहायला आलो आणि बदलत्या परिस्थितीचे वास्तव भान आले. हळूहळू, इथले जीवन देखील काहीसे बकाल व्हायच्या मार्गावर लागले आहे. भ्रष्टाचार अगदी आचारसंहिता झाली नसली तरी बऱ्याच प्रमाणात वाढ होत आहे. त्यातून, इथल्या चलनाचे आंतरराष्ट्रीय पतमापन घसरायला लागले आहे आणि महागाईचे चटके बसायला लागले आहेत. आर्थिक विषयी बोलायचे झाल्यास, या देशात प्रचंड प्रमाणात आयात केली जाते आणि चलन विनिमयाच्या दरातील घसरण, प्रामुख्याने महागाईला कारणीभूत ठरत आहे. अजूनही, इथे गोऱ्या लोकांचा प्रभाव असेल किंवा कायद्याविषयी आदर असेल म्हणा, भारताच्या मानाने, इथे निश्चितपणे, सुस्थित जीवन जगण्याच्या विपुल संधी आहेत. आजही, Tax Evasion संस्कृती भारताइतकी बोकाळलेली नाही. अर्थात, इथे Tax चे प्रमाण बरेच आहे पण त्याचबरोबर ज्या प्रकारच्या सुविधा मिळतात, त्याची तुलना केली तर, युरप किंवा अमेरिकेपेक्षा इथे जीवनमान स्वस्त आहे. 
एक अनुभव सांगण्यासारखा आहे. N3 या राष्ट्रीय महामार्गावर, मी गाडी चालवत होतो, महामार्गावर गाडी चालवणे म्हणजे गाडीचा वेग, कमीत कमी ८० कि.मी.!! अशा भरघाव वेगात गाडी धावत असताना, समजा अपघात झाला तर मृत्यूचे प्रमाण हमखास. बराच वेळ गाडी चालवत असताना, माझ्या मागून, एक मर्सिडीज गाडी पुढे गेली. त्यावेळी मी १०० कि.मी. वेगाने गाडी चालवत होतो, तेंव्हा मर्सिडीजचा वेग माझ्यापेक्षा अधिक, हे ओघाने आलेच. त्यापाठोपाठ दुसरी मर्सिडीज, माझ्या गाडीला pass on करून गेली आणि काही क्षणात, माझ्या समोर दोन्ही गाड्या, एकमेकांवर आदळल्या!! सुदैवाने, माझ्या गाडीपासून, अपघाताचे अंतर तसे सुरक्षित असल्याने, मी गाडीचा वेग कमी केला . एकात गौर वर्णीय तर दुसऱ्यात कृष्ण वर्णीय लोक होते, माझ्या डोळ्यासमोर गाड्यांच्या पुढील भागाचा चकणाचूर होत होता. सुदैवाने, गाडीतील लोकं सुरक्षित होते. त्यातील एकाने, Help नंबर लावला आणि अक्षरश: दहाव्या मिनिटाला, तिथे ३ Ambulance, ४ पोलिस गाड्या आणि वरून helicopter (टेहळणीसाठी) हजर!! लगेच पुढील कारवाईला सुरवात झाली आणि अर्ध्या तासात, तिथे अपघाताची साधी निशाणी देखील उरली नव्हती!! आपण, इथे infrastructure म्हणून धोशा लावतो आणि तसे बघितले त्याची आवश्यकता आहे, कारण आता आपल्याकडे देखील अशाच प्रकारचे प्रचंड महामार्ग अस्तित्वात येत आहेत. पण, त्याचबरोबर अशा सुविधा मिळणे देखील अत्यंत गरजेचे आहे. असे अपघात जरी झाले, तरी रस्ता कमीत कमी वेळात मोकळा करणे, अत्यावश्यक असते. 
इथे लोकांच्या गरजेची किती काळजी घेतली जाते, याचे दुसरे उदाहरण देतो. एकतर इथे "वीज" जाणे, असे प्रकार जवळपास नाहीच!! डर्बन इथे राहताना, एकदा, इथे काही दुरुस्ती करण्याची आवश्यकता भासली. अर्थात, इथे वीज नाही म्हणजे आयुष्य ठप्प!! अशा वेळी, डर्बन महापालिकेने, आमच्या भागातील प्रत्येक घरात, एक छापील पत्र पाठवले होते. त्या पत्रात, कुठल्या दिवशी वीज पुरवठा खंडित होणार आहे आणि किती वेळ खंडित होणार आहे, याची सगळी माहिती दिली होती. प्रत्यक्षात काम सुरु होणार होते, ते २ आठवड्यांनी!! तरी देखील कुणालाही गैरसोय होऊ नये, याची इथे नित्यनेमाने काळजी घेतली जाते आणि पत्रात दिलेली वेळ, अत्यंत कसोशीने पाळली जाते. प्रकार, रस्ता दुरुस्तीबाबत चालतो. हे केवळ महामार्गाबाबत घडते असे नसून, शहरातील आडमार्ग जरी दुरुस्तीला काढायचा असेल तरी हीच पद्धत पाळली जाते.
डर्बन शहर माझ्या डोळ्यादेखत विस्तारले पण, प्रत्येक ठिकाणी अत्यंत कसोशीने आणि काटेकोरपणे Planning केले जाते. आहे रिकामी जागा म्हणून बांधली बिल्डींग, असा प्रकार इथे अजिबात चालत नाही. काहीवेळा याचा त्रास होतो म्हणजे समजा, तुम्ही रस्ता चुकलात तर तुम्हाला कमीत कमी, १,२ कि.मी. चा फटका बसतो!! महामार्गावर तर अधिक लांबचा फटका बसतो. महामार्ग आखतानाच, लोकांच्या सोयींचा तसेच commercial complexes ध्यानात घेऊनच बांधले जातात. तसेच अशा नवीन मार्गांवर वृक्षांची लागवड, अत्यंत आग्रहाने केली जाते. डर्बन इथे तुम्हाला खऱ्या अर्थाने हिरव्या रंगाचा सोहळा अनुभवता येतो. रिकामी जागा आहे आणि तिथे काही बांधकाम करायचे झाल्यास, तिथल्या वृक्षांची निगराणी कशी राखली जाइल, याचा विचार प्रथम केला जातो. उचलली कुऱ्हाड आणि तोडले झाड, हा इथे अक्षम्य गुन्हा आहे. मी जिथे रहात होतो, तिथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी होती आणि संध्याकाळी, रस्त्याच्या कडेने, फिरत रहाणे, हा एक आनंदसोहळा असायचा. 
आता, कधीकधी मनात असा विचार येतो, हे इथले सौंदर्य, सोयी, सवलती आणखी किती वर्षे शाबूत राहणार आहेत? डर्बन तसे टुमदार शहर आहे. जोहान्सबर्गप्रमाणे अंगावर येत नाही. जोहान्सबर्ग शहराचा विस्तार बघून, तुमची छाती दबून जाते. डर्बन आकाराने छोटे आहे, म्हणूनच तुम्ही त्याच्या लगेच प्रेमात पडू शकता. हे शहर तुम्हाला प्रेमात पडायला भाग पाडते आणि प्रेमात पडावे, अशा इथे असंख्य जागा आहेत, उद्याने आहेत, लायब्ररी आहे, समुद्र किनारे आहेत. प्रश्न परत, परत मनात येतो, हे शहर किती काळ, आपल्याला असे ओढून घेईल?

Friday, 30 October 2015

डर्बन भाग १

मुंबई वगळल्यास, डर्बन असे शहर आहे, जिथे मी जवळपास ४ वर्षे राहिलो. भारतात, अनेक शहरांना भेटी दिल्या, काही दिवस राहिलो पण, शहराची "ओळख" काही झाली नाही. अगदी आजही, पुण्याबाबत माझे हेच म्हणणे आहे. पुण्याला आजमितीस भरपूर भेटी झाल्या, पण अजूनही पुणे शहर "ओळखले" असे म्हणवत नाही!! ही बाब पुण्याबाबत, मग दिल्ली, चंडीगड, बंगलोर, चेन्नई बाबत तर काही बोलायलाच नको. 
मी डर्बन शहरात नोकरीसाठी आलो, त्या आधी, इथे ९० कि.मी. दूर असलेल्या, पीटरमेरीत्झबर्ग शहरात, सलग ३ वर्षे काढली. अर्थात,पीटरमेरीत्झबर्ग ही जरी "नाताळ" राज्याची राजधानी असली तरी शहर म्हणून तितकेसे विकसित झालेले नाही. अर्थात, त्याला भौगोलिक कारणे देखील आहेत,  पीटरमेरीत्झबर्ग शहर, हे ५,६ डोंगरावर वसलेले शहर, त्यामुळे औद्योगिक विकासाला, नैसर्गिक मर्यादा पडतात. डर्बन हे, अरेबियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले शहर. त्यामुळे, इथे व्यापार, उद्योग, इत्यादींना भरपूर वाव. अर्थात, केवळ डोंगरावर शहर आहे, म्हणून मर्यादा, याला तसा फार अर्थ नाही कारण, जोहान्सबर्ग शहर देखील समुद्रसपाटी पासून जवळपास ६००० फुट उंचावर आणि असेच डोंगराळ भागात वसलेले आहे आणि साऊथ आफ्रिकेतील जवळपास ५०% औद्योगिक वाढ ही, हे शहर आणि आजूबाजूचा परिसर, इथेच झाली आहे. 
साऊथ आफ्रिकेतील, एक अतिशय महत्वाचे, औद्योगिकदृष्ट्या गजबलेले तसेच "Tourist Attraction" म्हणून जागतिक स्तरावर मान्यता पावलेले शहर. आपल्या सारख्या भारतीयांच्या दृष्टीने तर या शहराला फार महत्व आहे. २०११ साली, इथे एक फार मोठा समारंभ झाला होता. भारतातून, इथे निर्यात केलेले मजूर, या घटनेला १५० वर्षे झाली म्हणून मोठ्या प्रमाणावर सोहळा साजरा केला होता. त्यावेळी आणि आजही, भारताच्या दृष्टीने, साऊथ आफ्रिकेचे "प्रवेशद्वार" म्हणजे डर्बन!! एकतर मुंबईहून इथे जहाजाने यायचे झाल्यास, डर्बन बंदर हेच सर्वात जवळचे. याचा परिणाम असा झाला, या शहरात आणि बाजूच्या  पीटरमेरीत्झबर्ग शहरात, आपल्याला लाखोंच्या संख्येने, भारतीय वंशाची लोकवस्ती आढळते. पूर्वी, इथल्या गोऱ्या लोकांना, इथे उसाची लागवड आणि एकूणच शेतीची अवजड कामे करायला, कुणीतरी "मजूर" म्हणून हवेच होते आणि त्यादृष्टीने "भारत" आणि तिथली लोकसंख्या, त्यांना फारच सोयीचे पडले आणि तेंव्हापासून, भारतातून, इथे मनुष्यबळ आयात करण्याची प्रक्रिया सुरु झाली. 
आता, इथे भारतीय वंश चांगलाच स्थिरावला आहे. आताची पिढी म्हणजे कमीत कमी पाचवी, सहावी पिढी आहे. त्यामुळे, इथले भारतीय वंशाचे लोक म्हणजे केवळ नावाने भारतीय, इतकेच म्हणायला हवे. या लोकांना भारताविषयी आकर्षण आहे, आपले जुने गाव कुठले, हे बघण्याची उत्सुकता आहे पण, ती उत्सुकता तात्पुरती.परत भारतात येउन, नव्याने आयुष्य काढायची अजिबात तयारी नाही आणि थोडा विचार केला तर त्यांनी तरी असे का करावे? त्यांना ज्या प्रकारे इथे सुख-सोयी मिळतात, त्याच्या ५०% देखील सोयी भारतात मिळू शकणार नाहीत आणि हे निखळ वास्तव आहे. 
भारतीयांना, डर्बन अधिक पसंत पडले याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे या शहराचे हवामान आणि भारतातील हवामान, यात सत्कृतदर्शनी फारसा फरक नाही. इथे हाडे गोठवणारी थंडी अजिबात नसते. तशी हवा कोरडी आणि थंड असते पण आपल्या भारतीय लोकांनी आल्हाददायक म्हणावी, अशीच असते. आजही, साऊथ आफ्रिकेतील Import Business, जवळपास ७०% व्यापार, याच बंदरातून होतो. त्यामुळे, इथे आंतरराष्ट्रीय कंपन्यांची ऑफिसेस भरपूर आहेत. अजूनही, साऊथ आफ्रिकन चलनाला, जागतिक स्तरावर महत्वपूर्ण मान्यता आहे. मी ज्या कंपनीत काम करीत होतो (१९९८ ते २००१) त्या कंपनीचा बराचसा व्यापार हा सिंगापूर देशाशी असल्याने, आम्हाला तर डर्बन फारच सोयीचे पडत होते. 
भारतीयांच्या दृष्टीने बघायला गेल्यास आणि अचंबा करण्यासारखी बाब म्हणजे इथले समुद्र किनारे. अरेबियन महासागराच्या किनाऱ्यावर वसलेले शहर तेंव्हा या शहराला प्रचंड लांबीचे समुद्र किनारे लाभले आहेत. मी तिथे रहात असताना, एखादा आठवडा देखील असा गेला नसे, मी समुद्रावर गेलो नाही. आधुनिकता म्हणावी तर उत्तर डर्बन भागातले किनारे खरोखरच अप्रतिम आहेत. पाण्यावर किती प्रकारचे खेळ खेळता येऊ शकतात, याचे इथे प्रात्यक्षिक बघता येईल. केवळ खेळापुरते नसून, ज्या प्रकारच्या सोयी पुरवल्या जातात, ज्या प्रकारे स्वच्छता राखली जाते, आपण भारतीयांनी धडे घेण्यासारखे आहे. शनिवार/रविवारी तर हजारोंच्या संख्येने इथे माणसे जमतात, पण कुठेही गडबड, गोंधळ नसतो. शिस्त तर वाखाणण्यासारखी असते. अर्थात, याला "काळी" बाजू देखील आहे. रात्रीच्या वेळी, एकटे, दुकट्याने हिंडणे, भयानक धोक्याचे ठरत आहे. जीवाला धोका उद्भवू शकतो. काही वर्षांपूर्वी, इथल्या "मरीन परेड " - सेन्ट्रल डर्बन भागातील समुद्र किनारी, लंडन वरून एक जोडपे, रात्रीच्या सुमारास गप्पा मारीत बसले होते आणि कुठूनतरी काही कृष्ण वर्णीय लोक आले आणि त्यांच्याकडे बहुदा पैशाची मागणी केली असावी. त्यातून बाचाबाची झाली असणार पण, त्याचे पर्यवसान, त्या जोडप्याचा खून होण्यात झाले. प्रकरण फार वरच्या स्तरावर पोहोचले होते आणि तेंव्हा पासून, इथे गस्तीचे प्रमाण फार वाढले आहे. अर्थात, समुद्रावर येउन, शांतपणे बसणे, यासारखा आनंदाचा भाग नाही आणि हे मी कितीतरी वेळा प्रत्यक्ष अनुभवले आहे. मी आणि माझे काही मित्र, बरेच वेळा इथे येउन बसायचो, किनाऱ्यावरील एखाद्या उघड्या हॉटेलमध्ये, हातात बियरचा ग्लास घेऊन, अगदी ब्रम्हानंदी टाळी लावलेली आहे!! 
इथेच, अगदी समुद्र किनाऱ्यावर, एका रविवारी सकाळी/दुपारी, fashion show बघितला होता!! सगळ्या तरुण सुंदरी, अगदी तोकड्या कपड्यात येउन, आपल्या कपड्यांची जाहिरात करीत होत्या!! आता, असा सोहळा अनिल कसा सोडणार!! मजेचा भाग म्हणजे, सगळा कार्यक्रम, ज्या प्रकारे, बंद सभागृहात चालतो, त्याच प्रकारे इथे चालत होता. कार्यक्रम उघड्यावर होता, म्हणून आजूबाजूची माणसे चेकाळली होती, शिट्या मारीत होती, असे अश्लाघ्य प्रकार अजिबात घडत नव्हते. जवळपास तीन तास कार्यक्रम चालला होता. अर्थात त्या दिवशीची बियरची चव वेगळी लागली, हा भाग वेगळा!! 
केवळ इथेच नव्हे पुढे मी साऊथ आफ्रिकेत अनेक शहरात राहिलो, अगदी गावसदृश ठिकाणी राहिलो पण, "हा देश आपला आहे आणि याची स्वच्छता आपण राखली पाहिजे" असा एकही फलक, बोर्ड पहिला नाही आणि तरीही गाव देखील अतिशय स्वच्छ असायचे. मला वाटते, हा त्या समाजावरील संस्काराचा भाग आहे. "आपला देश" असे न सांगता, त्याबद्दल ममत्व वाटणे, ही मानसिक गरज निर्माण होणे महत्वाचे!! घाण होतच नाही, हे म्हणणे खोटे आहे पण, झालेला कचरा त्वरित साफ करून परत जागा स्वच्छ ठेवणे, या वृत्तीचे मला कौतुक वाटले. 
नाताळ राज्य आणि इतर राज्यात आणखी एक फरक जाणवण्यासारखा आहे. नाताळ राज्यात आणि विशेषत: डर्बन शहरात, जितकी घनदाट झाडी, हिरवीगार हिरवळ दिसते तितकी इतर भागात दिसत नाही, अगदी केप टाऊन सारखे निसर्ग रमणीय शहर घेतले तरी!! डर्बन इथे वृक्षांची सोबत कधीच सुटत नाही त्यामुळे, डिसेंबर/जानेवारीतील कडक उन्हाळा देखील खूप प्रमाणार सुसह्य होतो. जागोजाग अप्रतिम रस्ते आहेत, महामार्ग आहेत पण कुठेही झाडांची सोबत सतत तुमच्यावर सावली धरून असते. शहरातील आडमार्ग तर भरभक्कम वृक्षांच्या साथीने नटलेले आहेत. अगदी, जून/जुलै मधील हिंवाळा (वर म्हटल्या प्रमाणे कडाक्याचा हिंवाळा इथे नसतो तरीदेखील) घेतला तरी थोडीफार पानगळ होते पण, जसे जोहान्सबर्ग/प्रिटोरिया शहरात, वृक्ष उघडे/बोडके होतात, तसे इथे फार क्वचित आढळते. 
मी इथे "मॉर्निंगसाईड" भागात रहात होतो, जो एकेकाळचा गौरवर्णीय भाग. अर्थात, इथे नीटनेटकेपणा, शिस्तशीर वृत्ती अंगी बाणवावीच लागते. मनात येईल तिथे थुंकणे, हातातील कोक किंवा बियरचा टीन, संपल्यावर रस्त्यावर(च) फेकून देणे, सिगारेटचे थोटूक पायाखाली चिरडणे, असले प्रकार मनात आले तरी करायला शक्यतो मन तयार होत नाही. आजूबाजूची माणसे ज्या शिस्तीने वावरत असतात, ते बघून, आपण देखील तसेच वागायला सुरवात करतो. मी इतकी वर्षे या देशात काढली पण, इतक्या वर्षांत (काही अपवाद वगळता) रस्त्यात, कुणीही लघवी करीत आहे, असे चुकूनही आढळले नाही आणि जे आढळले, ते सगळे कृष्णवर्णीय लोकांच्या भागात. तिथे मात्र उकिरडा!! 
याच शहरात, पुढे २०१० मध्ये, आंद्रे रुई, या जगप्रसिद्ध कलावंताचा सिंफनी ऑर्केस्ट्रा बघितला. खरे सांगायचे झाल्यास, इथेच मला पाश्चात्य संगीताची आवड असणारे काही गोरे मित्र भेटले आणि त्यांनी, मला खूपच आनंदाने, त्यांच्या घरी नेले आणि त्यांच्याकडील संगीताचा संग्रह दाखवला आणि अगदी रात्रभर, मला थांबवून, तो संग्रह ऐकवला. इथेच, मला एका आणखी गोऱ्या मित्राने, माझा क्रिकेटमधील रस बघून, १९६०/७० च्या दशकातील, असामान्य साऊथ आफ्रिकन खेळाडूंच्या DVD दाखवल्या. तसे बघितले तर डर्बन शहर शांत स्वभावाचे आहे. जोहान्सबर्ग शहरात जसे, सगळे घड्याळाला जुंपून, धावत असतात, तसा प्रकार इथे फारसा आढळत नाही. सकाळी ८ वाजता(च) ऑफिसेस उघडता आणि संध्याकाळी ५ वाजता बंद होतात, संध्याकाळी सहा वाजता, रस्त्यावर (ऑफिस भागातील रस्त्यावर) चिटपाखरू देखील नसते. 
आधुनिक शहरांप्रमाणे, या शहरात देखील प्रचंड मॉल्स आहेत आणि इथे देखील "मॉल" संस्कृती वाढलेली आहे. भारताच्या जवळ असलेले शहर असल्याने, इथे आपले भारतीय कलाकार आणि त्यांचे "शूटिंग" हा आता नेहमीचा कार्यक्रम होत आहे. अर्थात केप टाऊन इथे त्याचे प्रमाण अधिक!! अर्थात, इथे असलेली प्रचंड भारतीय वंशाची लोकवस्ती असल्याने, इथे नवीन येणाऱ्याला तसे हायसे वाटते आणि इथल्या भारतीयांना देखील, भारतातून आलेल्या "पाहुण्यांचे" आगत-स्वागत करायला फार आवडते. तदनुषंगाने बघायला गेल्यास, इथे नवरात्र अगदी पारंपारिक पद्धतीने चालते. फरक इतकाच, इथे एक मोठे सभागृह भाड्याने घेतले जाते आणि त्या सभागृहापुरताच सगळा सोहळा मर्यादित असतो आणि त्याला जोडून आवाजाची मर्यादा!! इथेच मी, आवाजाचे प्रदूषण म्हणजे काय असते, याचा जबरदस्त अनुभव घेतला होता. 
नुकताच डर्बन इथे आलो होतो, दोनच दिवस झाले होते, घर व्यवस्थित लावले आणि नेहमीच्या इच्छेप्रमाणे, घरात गाणे ऐकायचे म्हणून सिस्टीम सुरु केली. सुरु करून, १५,२० मिनिटे झाली असतील तोच घराचा दरवाजा ठोठवला गेला. दारात चक्क पोलिस उभा!! नाही म्हटले तरी तंतरलीच. पोलिसाने, लगेच सिस्टीमचा आवाज कमी करण्याची विनंती केली आणि माझ्या शेजाऱ्याने, पोलिस ठाण्यावर तक्रार केली म्हणून मला यावे लागले, अशी तंबी दिली. मला नवल वाटले, शेजारी राहणारा, मला लगेच सांगू शकला असता पण नाही!! त्याने पोलिसाकडे तक्रार केली!! इथे एकूणच Pollution बाबत फार कडक कायदे आहेत आणि मुख्य म्हणजे लोकांच्यात जागरुकता आहे.

Thursday, 29 October 2015

हुरहुरणारा किरवाणी

"झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर".
मराठीतील काही अजरामर कवितांमधील ही एक कविता!! आज जवळपास शतक उलटून गेले तरी देखील या ओळीचा मोह, वाचकांना अनेकवेळा होतो आणि त्यानिमित्ताने अर्थाचे अनेक पदर विशद केले जातात. उत्तम कवितेचे हे एक लक्षण मानावेच लागेल. राग "किरवाणी" ऐकताना, मला बरेचवेळा या ओळी आठवतात. रागाचा समय, प्राचीन ग्रंथांनुसार मध्यरात्र दिलेला आहे. या रागात, "गंधार" आणि "धैवत" स्वर कोमल लागतात आणि त्या कोमल स्वरांचे प्राबल्य अधिक जाणवते. त्यातून, रागाचे सादरीकरण "पिलू" रागाच्या अंगाने जात असल्याने, रागाच्या ठेवणीतच लालित्य अमुर्तपणे सापडते.एकूण स्वररचना आणि त्याची मांडणी बघितली तर मध्यरात्रीच्या घनगर्द अंधारात, तळ्याकाठाची आत्ममग्न शांतता आणि त्याची अनुभूती घेताना, कवितेतील "गोड काळिमा" आणि तळ्यातील झाकोळलेले कृष्ण वर्णीय जल, याचे कुठेतरी आंतरिक नाते जाणवते आणि आपण, रागाचे स्वर ऐकताना, त्या अजरामर वृक्षाच्या संगतीत वावरत असतो.

काहीकाही वाद्ये ही त्या कलाकाराच्या नावाशी इतकी निगडीत असतात की ती वाद्येच जणू, त्या व्यक्तित्वाचा अभेद्य अंश बनून जातात. उस्ताद अली अकबर खान साहेब आणि सरोद, यांचे नाते असेच मांडता येईल. वडिलांकडून खडतर तालीम घेऊन, या वाद्यावर जे अभूतपूर्व प्रभुत्व मिळवले आहे, त्याला तोड नाही. साधारणपणे, तंतू वाद्य म्हटले की त्यातून स्वरांची "सलगता" निर्माण करणे, नेहमीच अवघड बाब असते कारण, स्वर नेहमीच तुटक स्वरूपात सादर होतात. असे असून देखील, वाद्यातून "गायकी" अंग अति तलमपणे मांडून दाखवणे, याला वेगळेच कौशल्य लागते.

https://www.youtube.com/watch?v=om3qC-T3a3U

प्रस्तुत रचनेत, सुरवातीची जी आलापी आहे, त्यातून रागाची जी "मूर्ती" उभी केली आहे, ती खास ऐकण्यासारखी आहे. प्रत्येक स्वर नितळ, स्वच्छ आणि सुरेल लावलेला आहे. एका स्वराहून दुसऱ्या स्वरावर जो "प्रवास" घडतो, तो देखील जीवघेणा आहे. खरेतर श्रुती तत्वानुसार याचे समग्र विवरण करता येणे शक्य आहे पण तरीही स्वरांचा म्हणून एक स्वभाव आणि त्या स्वभावानुसार निर्माण केलेले भावविश्व केवळ अपूर्व असे आहे. रचना, द्रुत लयीत जाताना देखील, स्वर कुठेही विस्कळीत होत नाही, किंबहुना द्रुत लयीत निर्माण केलेली "मिंड" ऐकणे, हा तर रागाच्या सौंदर्याचा विलोभनीय भाग आहे.

हिंदी चित्रपट गीतांना जर कुणी आधुनिक पेहराव दिला असेल तर तो राहुल देव बर्मन, या संगीतकाराने!! तालाच्या बाबतीत तर या संगीतकाराने इतके प्रयोग केले आहेत की ते प्रयोग ऐकताना, केवळ चकित होणे, इतकेच आपल्या हाती राहते. "अनामिका" चित्रपटातील "मेरी भिगी भिगी सी" हे किशोर कुमारने गायलेले गाणे, आपल्याला किरवाणी रागाची सुंदर झलक दाखवते. गाण्यात केरवा ताल आहे पण इथे संगीतकाराने मजा केली आहे. ८ मात्रांचा हा ताल आहे आणि याची पहिली मात्रा "धा" या बोलाने सुरु होते आणि इथे संगीतकाराने, ही मात्रा गिटारवर घेतली आहे!! सर्वसाधारण प्रघात असा, मात्रा या आघाती वाद्यांवर घेतल्या जातात पण, इथे पारंपारिक पद्धतीला बगल देऊन, गिटार वाद्याचा सूर, हीच समेची मात्रा ठेवली आहे आणि पुढील मात्रा Actopad वाद्यावर घेतल्या आहेत. परिणाम, गाण्याला संपूर्ण आधुनिक पेहराव!! याचा अर्थ, तालाचे नियम पाळले आहेत पण सादरीकरणात वैविध्य आणले आहे. सुगम संगीतात प्रयोग कसे करता येतात, याचे हे उत्तम उदाहरण मानता येईल. तालासाठी या संगीतकाराने अनेक वैश्विक वाद्यांचा उपयोग केला आहे, जसे "मादल","क्लेव्ज",'ब्लासको" किंवा प्रसंगी ज्याला "न-स्वरी" वाद्ये म्हणता येतील, उदाहरणार्थ झांजेसारखी घन वाद्ये, झायालोफोन, केस्टानेट, खुळखुळे सारख्या वाद्यांचा परिणामकारक उपयोग, हे प्रयोगात्वाचे निर्देशक म्हणता येईल.मुळात, परिणाम साधणे, हे प्राथमिक उद्दिष्ट.

https://www.youtube.com/watch?v=K0THyu8oNlw

स्वरसंहतीतत्वावर आधारलेल्या भारतीय संगीतासारख्या पद्धतीत एका वेळेस एक स्वर आणि पुढे दुसरा, असे पायाभूत वळण असते. या लक्षणालाच बाजूला सारण्याची धमक दाखवली. आवाजांचे लगाव, तुटक गायन फेक, घसीट किंवा खालच्या स्वरावरून वरच्या स्वरावर जाताना दबाव निर्माण करणे, छोटेखानी ध्वनी विलक्षण चमकदारपणे योजणे, यामुळे संबंधित सांगीत घटना गुंतागुंतीची होते. यातून आपण ठामपणे एक निष्कर्ष सहज काढू शकतो. याचे संगीत, रचनाकाराच्या संभवनीय सर्जनशीलतेच्या दर्जाविषयी खात्री पटविणारे संगीत आहे. त्याने संगीत आकारले ते चित्रपटीय सादरीकरणासाठी. परस्परविरोध, विरोधाभास आणि विसर्जित न केलेले सांगीत तणाव यांचे आकर्षण म्हणजे आधुनिक सांगीत संवेदनशीलता. या संगीतकाराकडे, विशिष्ट रागापासून दूर सरकून देखील रागाचे एकसंधपण आपल्या चाळीस देण्याची प्रशंसनीय क्षमता होती. हे गाणे वास्राविक काहीसे अंतर्मुख करणारे गीत आहे पण ती अंतर्मुखता मांडताना, संयमित भावनावेग आविष्कृत शास्त्रोक्त बाज, किंचित पातळ करून, अतिशय चांगल्या कामी लावला आहे, असे आपल्याला सहज म्हणता येईल. वाद्यांच्या वापरातून आणि रूढ सुरावटीच्या सूचनेतून, ही रचना आपले स्वतंत्र स्वरूपच व्यक्त करीत आहे.तसे बघितले सुरावट सरळ जात आहे पण लयबंध तिरकस जातो आणि आपल्याला ही रचना काहीशी अस्वस्थ करते. गाण्यातील कवितेच्या भावाशयाशी नाते राखून केलेली ही रचना, आपण सहज गुणगुणू शकतो.
आधुनिक गझल गायनात आमुलाग्र बदल करून आणि त्याचा प्रभाव पुढील पिढ्यांवर अव्याहतपणे रुजवण्याचे अलौकिक काम, उस्ताद मेहदी हसन यांच्या गायनाने केले आहे. "शोला था जल बुझाने" ही रचना ऐकताना या वाक्याचे पुरेपूर प्रत्यंतर आपल्याला येते. "किरवाणी" रागावर ही रचना निश्चित आधारलेली आहे. सुगम संगीतात, अत्यंत विपुलपणे जे ताल वापरले जातात, त्यातील "दादरा" तालात ही रचना बांधलेली आहे. शक्यतो अति ठाय लय, खर्जातील स्वरांनी सुरवात करायची आणि मंद्र सप्तक ते शुद्ध स्वरी सप्तक, इतपतच गायनाचा बराचसा आवाका ठेवायचा, अशी काही खास वैशिष्ट्ये सांगता येतील.   अर्थ असा नव्हे, तार सप्तकात गायचेच नाही पण, गाताना, आपण ज्या शायरची रचना गात आहोत, त्याच्या शब्दांवर आणि पर्यायाने आशयाच्या अभिव्यक्तीवर परिणाम होऊ द्यायचा नाही, अशी जणू प्रतिज्ञा केल्याप्रमाणे, गायन केले असल्याने, तार सप्तकात फार काळ गायन होत नाही.

https://www.youtube.com/watch?v=cDqTxSPuylk

या रचनेत, मेहदी हसन नेहमीप्रमाणे, रागाच्या शुद्धतेचे नियम पाळतात पण, तसे करताना, राग संगीतातील अलंकाराचे तंतोतंतपणे सादरीकरण करत नाहीत. वेगळ्या शब्दात, ताना घेताना, शक्यतो पूर्ण सप्तकाचा धांडोळा न घेता, ३,४ स्वरांच्या हरकती घेणे आणि घेताना, हातात असलेल्या शायरीचे सौंदर्य वाढविणे, हा उद्देश अगदी स्पष्ट दिसतो. बरेचवेळा, काही शब्द लयीच्या "मीटर" मध्ये बसणे अवघड जाते, तेंव्हा चालीला मुरड घालायला, त्यांनी कधी मागेपुढे पाहिले नाही आणि हे वैशिष्ट्य जाणीवपूर्वक, त्यांनी आयुष्यभर जपल्याचे दिसून येते.

हिंदी चित्रपट गीतांत "रवींद्र" संगीताचा वापर, ही पूर्वापार चालत आलेली घटना आहे. एकूणच, हिंदी चित्रपट गीतांत, ज्या बंगाली संगीतकारांनी बहुमोल भर टाकली, त्यात संगीतकार हेमंत कुमार, यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मुळातले गायक पण पुढे अनेक रचना करून, व्यामिश्र रचनाकार म्हणून मान्यताप्राप्त झाले. वास्तविक पहाता, त्यांनी शास्त्रीय संगीताचे पायाभूत शिक्षण घेतले नव्हते तरीदेखील, अतिशय मधुर, स्वरेल आणि मन:स्पर्शी गायन, ते सहज करीत असत. त्यांचे तर नेहमी असेच म्हणणे असायचे, कुठलाही रचनाकार, "रवींद्र" संगीत टाळून, रचना करणे शक्य नाही. यातील थोडा अहंकारी भाव सोडला तरी तथ्य काही प्रमाणात आहे आणि ते त्यांनी, आपल्या कारकिर्दीत दाखवून दिले. "नागीन" चित्रपटातील गाण्यांनी, त्यांची, रचनाकार म्हणून ओळख मुंबईला आणि पर्यायाने देशाला झाली. याच चित्रपटातील, "मेरा दिल ये पुकारे आजा" हे गाणे, किरवाणी रागाची दाट छाया दाखवते. केरवा तालात बांधलेल्या या रचनेत, एक अश्रूत गोडवा आहे. चाल तशी साधी, सरळ आहे पण सहज गुणगुणता येत असल्याने, ही रचना कमालीची लोकप्रिय झाली.

https://www.youtube.com/watch?v=mr_n9R3E_w4

एकूणच त्यांच्या कारकिर्दीकडे जरा बारकाईने बघितले तर काही वैशिष्ट्ये लगेच आपल्या ध्यानात येतील. हेमंतकुमारांना पाश्चात्य संगीत किंवा आगळे वेगळे स्वनरंग, यांचे फार आकर्षण दिसत नाही. त्याचप्रमाणे, अतिद्रुत आणि हिसकेबाज हालचालीस पूरक असे नृत्यासंगीत देखील फारसे आवडत नव्हते. नागीन मधील नृत्यगीते, याला प्रमाण म्हणून दाखवता येतील. तरी देखील, गाण्यात "हुंकार" इत्यादी ध्वनीद्रव्यांचा वापर करण्याची आवड, अनेक रचनांमधून आपल्याला दिसून येईल. "नागीन" चित्रपटाचे संगीत इतके गाजले की ती लोकप्रियता, त्यांना चक्क अडचणीची वाटावी, अशी परिस्थिती निर्माण झाली.  एक प्रकारचा हळवेपणा आणि अ-दृश्याची ओढ, हे भाव, त्यांच्यातील रचनाकाराला नेहमी आव्हानात्मक वाटावेत, इतक्या मुबलक प्रमाणावर त्यांनी रचना केल्या आहेत. अर्थात, अशा रचनांवर देखील कुठेतरी "रवींद्र" संगीताची पडछाया दिसून येते. 'रवींद्र" संगीत(च) नव्हे तर बंगाली लोकसंगीतातील "बाउल""कीर्तन" या शैलींचा देखील अतिशय परिणामकारक वापर केलेला आढळतो. मघाशी मी ज्या "अ-दृश्य" गीतांचा उल्लेख केला, त्यात परत, लयहीन अंतलक्षी कुजबुज, मग्न पठण, यांचा मुख्य हेतू म्हणून हळूहळू गायनापर्यंत पोहोचणारी संगीतस्पंदने, यातून गीत उभे करण्याचे त्यांचे कौशल्य खास वाखाणण्यासारखेच होते. अशी गाणी जणू, आपल्याला ते संगीतमय धुक्यात गुरफटून टाकण्याची अलौकिक किमया करतात. जरी पाश्चात्य संगीताकडे ओढा नसला तरी देखील, काही रचनेतून, त्याचा अंधुकसा प्रत्यय नक्कीच येतो.

आता आपण, "किरवाणी" रागावरील काही गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी, खालील रचनांच्या लिंक्स ऐकुया.
सूरसुखखनी तू विमला - वसंतराव देशपांडे
https://www.youtube.com/watch?v=Nug2yKgi0iw

आंखो से जो उतरी है दिल मे - ओ.पी.नैय्यर
https://www.youtube.com/watch?v=qitBaM3Ly8s

Wednesday, 28 October 2015

हिंदी चित्रपट गीत - एक व्यापक दृष्टीकोन!!

हिंदी चित्रपट संगीत हे सर्वसामान्य लोकांना इतकी वर्षे आकर्षित करीत आहे, यात शंकाच नाही आणि दिवसेगणिक त्याची लोकप्रियता वाढत आहे. कालानुरूप प्रतवारी बदलत असते आणि गाण्याचा कार्यकारणभाव तसेच निर्मिती देखील बदल स्वीकारत असते. याचा परिणाम असा झाला, चित्रपट संगीताच्या लोकप्रियतेत कधीही खंड पडला नाही. हे संगीत साधे आहे, सर्वसमावेशक आहे, त्यात फार गुंतागुंत नाही (रागदारी संगीताच्या संदर्भात) ही आणि अशी आणखी अनेक कारणे, लोकप्रियतेची निदर्शक म्हणून मांडता येतील. परंतु, याचाच दुसरा भाग असा झाला, चित्रपट संगीताचा कधीही अभ्यासपूर्ण व्यासंग झाला नाही आणि ही एकूणच भारतीय संगीताच्या वाटचालीच्या मार्गातील उल्लेखनीय कमकुवत दुवा ठरू शकतो. आपल्याकडे पहिल्या पासून, हिंदी चित्रपट संगीता विषयी विलक्षण उदासीनता आढळते आणि ती अशी की, हे संगीत अजिबात अभ्यास करण्याच्या लायकीचे नाही किंवा तोंडात सुपारी चघळत ठेवावी इतपतच, या संगीताचा आस्वाद. त्यामुळे, या संगीताकडे कधीही गंभीरपणे लक्ष दिले गेले नाही. वास्तविक, ज्या संगीताने अखंड भारत बांधला गेला आहे, ते संगीत इतके दुर्लक्षित करण्याच्या लायकीचे आहे का? आणि लोकप्रियता हा फक्त "उथळ" निकष आहे, असे मानणे कितपत संय्युक्तिक ठरते? संगीताच्या ज्या ६ महत्वाच्या कोटी मानल्या जातात, त्यापैकी जनसंगीत ही कोटी नेहमीच दुर्लक्षित केली गेली आहे. कलेला जनाधार आवश्यक असतो आणि जिथे व्यापक प्रमाणावर जनाधार आहे, तिथेच अभ्यासाची वानवा आहे!! यात काही विसंगती आहे असे वाटत नाही का? या इथे, या संदर्भात दोन प्रश्न उपस्थित करणे आवश्यक ठरते. हिंदी चित्रपट संगीताचे स्वरूप काय? आणि कशा तऱ्हेचा अभ्यास फलदायी ठरेल? पहिल्या प्रश्नाचे उत्तर सरळ आहे. जे संगीत हिंदी चित्रपटासाठी रचले जाते, ते हिंदी चित्रपट संगीत!! आता, आपली अधिकृत भाषा हिंदी असल्याने आणि या भाषेला बऱ्यापैकी दीर्घ इतिहास असल्याने, या भाषेला अनेक उपभाषांनी समृद्ध केले आहे. उदाहरणार्थ, "मगधी","अवधी","ब्रज","राजस्थानी","पंजाबी","पहाडी" इत्यादी अनेक प्रादेशिक भाषांनी, या हिंदी भाषेत लक्षणीय भर टाकली आहे. त्यामुळे, हिंदी चित्रपट संगीत, देशाच्या अंतर्गत भागात देखील व्यापक प्रमाणावर पोहोचले आणि लोकप्रियतेला हातभार लागला. आता, हिंदी चित्रपट संगीताकडे गांभीर्याने बघणे अभ्यासकांना जमले नाही किंवा त्यांनी उत्साह दाखवला नाही याचे आणखी एक कारण बघणे योग्य ठरेल. इथे आणखी एक मुद्दा विचारार्थ घ्यावा लागेल. हिंदी चित्रपट संगीताच्या स्वरूपातील काही अंगभूत गुणधर्मामुळे त्यास बाजूला ठेवले जात आहे का? विविधता, लोकप्रियता इत्यादी कारणांखेरीज हिंदी चित्रपट संगीताचा विचार इतक्या कसोशीने करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे सांगीत कल्पनांच्या अभिसरणातील त्यांची भूमिका. इथे दोन विचार गृहीत धरावे लागतील. या संगीतामुळे पसंत वा मान्य ध्वनी, आवाज, सादरीकरणाच्या लयी तसेच संगीताची योजना करण्याचे प्रसंग यांविषयी सार्वत्रिक प्रथा रूढ होऊ लागल्या आहेत. अर्थात हा भाग दोषी नाही पण याला दुसरी बाजू अशी आहे, अत्यंत बहुविध आणि पुष्कळ बाबतींत विचक्षण नसलेल्या श्रोते-प्रेक्षकांमुळे हिंदी चित्रपट संगीताचे स्वरूप ठरत असल्याने काही समान सांगीत बाबींचे व त्याच्या प्रभावांचे सर्वत्र वितरण होणे हा खरे निकृष्टाचा प्रसार अभावितपणे होतो. हा मुद्दा देखील विचारात घेणे जरुरीचे आहे. खरे म्हणजे भारतीय संगीत,, भारतीय जनसंगीत आणि चित्रपट संगीत, या तिघांनी पुरवलेल्या परिप्रेक्षांमधून हिंदी चित्रपट संगीताचा अर्थ लावला पाहिजे. म्हणजेच भारतीय संगीत -- भारतीय जनसंगीत -- भारतीय चित्रपटसंगीत -- हिंदी चित्रपटसंगीत -- हिंदी चित्रपटगीत अशी ती साखळी आहे. चित्रपटगीत - संगीताची तपासणी अधिक सहेतुक करणे जरुरीचे आहे आणि त्यासाठी आणखी काही पायाभूत आणि सांकल्पनिक कारणे आहेत. आपल्याला से आढळून येईल, विवश कारणामुळे चित्रपटीय संज्ञापन भाषिक संज्ञापनाप्रमाणेच राहणे अपरिहार्य आहे आणि हा विचार निश्चितपणे विचार करण्यायोग्य आहे. एक बाब इथे ध्यानात घ्यावीच लागेल. अनेकदा हिंदी चित्रातगीत आपली चित्रपट बाह्य मार्गक्रमणा इतक्या जोमदारपणे करतात की, चित्रपटाचे आवाहन म्हणजे चरित्ररेखांबरोबरचे प्रेक्षकांचे तादात्म्य वगैरे उपपट्टी खूप ताणून धरल्या तरच गीताच्या आकर्षणाचे काही प्रमणात स्पष्टीकरण देऊ शकतील. अजूनही चित्रपटसंगीताचे कार्य वेळ/जागा भरून काढण्याचे म्हणजे काहीसे दुय्यम स्वरूपाचे आहे असे मानण्याचा मोह अनेकांना होतो. दृश्य अवधान नॆहमी खंडित असते आणि म्हणून संगीत हवे असे प्रतिपादन केले जाते. पण त्याचबरोबर श्रव्य अवधानाची कालमर्यादा किती, हा प्रश्न विचारणे अनुचित ठरेल का? अवधानमर्यादा म्हणून ज्या २२ सेकंदाचा उल्लेख केला जातो तेवढ्या मर्यादेत किती श्रव्य अनुभूती आणि संगीत घेता येते" याला नेमके उत्तर काय? चित्रपटीय सांगीत आविष्कारात, भारतात काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे जरुरीचे आहे. [१] गाण्याची चाल ही काही तालांच्या मात्रांपर्यंत जवळीक साधणारी असते. सबब ठराविक ताल जसे, दादरा,केरवा किंवा तीनताल सारखे ताल विपुल प्रमाणात उपयोगात आणले जातात. [२] गाण्याची चाल बांधताना अचानक नवीनच ध्वनी उपयोगात आणून गाण्याची खुमारी वाढवण्याची कलात्मकता ऐकण्यासारखी असते. काहीवेळा ज्याला "न-स्वरी" म्हणता येतील, अशा ध्वनीचा वापर करून चमत्कृती साधलेली दिसते. [३] गाण्यातील शब्दांचे अर्थ, आशयाला केंद्रित मानून मांडले जातात आणि त्यानुसार स्वररचनेचा भाव आणि पोत बदलला जातो. [४] चित्रपट गीत हे प्रामुख्याने सामान्य माणसांसाठी रचलेले असते आणि हा मुद्दा लक्षात ठेऊन, बऱ्याच वेळा स्वररचना ही सगळ्यांना गुणगुणता येईल अशी सहज, साधी बांधलेली असते, जेणेकरून पायाभूत प्रशिक्षण न घेणारे देखील गाणी मनातल्या मनात गुणगुणू शकतात आणि स्वरानंद घेऊ शकतात. [५] बऱ्याच वेळा चित्रपटात नृत्यगीतांचा समावेश असतो. अर्थात नृत्य म्हटले की त्याचे शास्त्र अवगत असणे क्रमप्राप्तच ठरते परंतु चित्रपट माध्य हे सर्वसामान्य लोकांसाठी देखील उपलब्ध असते, हे ध्यानात घेऊन, चित्रपटातील नृत्यगीते ही साधी असतात. त्यासाठी खास शिक्षण घ्यायची गरज नसते आणि अशा स्वररचना प्रामुख्याने तालाला केंद्रीभूत ठेऊन गीतांची बांधणी केली जाते. [६] चित्रपट गीते प्रामुख्याने मनोरंजनात्मक असतात जेणेकरून दैनंदिन विवंचनांपासून दूर जाता येईल. त्याचबरोबर, इथे बौद्धिक परिश्रम घेण्याची गरज भासू शकते. म्हणजेच चित्रपट गीत हे सर्वसामावेशक असते. ज्यांना ज्या प्रकारचे मनोरंजन हवे, त्याप्रकारे संगीताविष्कार मिळू शकतो. चित्रपट संगीताचे स्वरूप, कार्यपद्धती आणि मूल्यमापन नीटपणे करायचे झाल्यास, या ६ मुद्द्यांची जाण आवश्यक. हिंदी चित्रपटसंगीत विषयक आजच्या लिखाणात हा विवेक फारसा नसतो!! ही आजच्या काळाची गरज आहे कारण मूल्यमापन केल्याशिवाय, निर्मितीचा दर्जा ठरवणे अशक्य आणि मग सरधोपट वृत्ती बोकाळते. हिंदी चित्रपटसंगीत अशा वेगवेगळ्या पातळींवर उलगडून समजून घेणे आवश्यक आहे. वास्तविक बघता, चित्रपट कलेला "अभ्यासशाखा" म्हणून मान्यता मिळाली पण तरीदेखील ज्या चित्रपटात संगीत हा घटक अत्यावश्यक असतो, तो घटक "अभ्यासशाखा" म्हणून होत नाही, हे दुर्दैव म्हणायला लागेल.