Saturday 1 April 2023

तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार है

मनोरुग्णांचे हॉस्पिटल. इथे प्रत्येकाचे मानसिक आजार वेगळे आणि त्यासाठी वेगवेगळ्या उपचारांची आवश्यकता. खरतर, डॉक्टर्स तसेच त्यांच्याबरोबरीने काम करणाऱ्या नर्सेस यांची देखील क्षणोक्षणी मानसिक तडफड चालू असते. आजाराचे स्वरूप कधीच सहजपणे दृष्टीक्षेपात येत नसल्याने, नेमके उपचार आणि त्याचे स्वरूप निश्चित करणे, ही देखील तारेवरील कसरत. मनोव्यापार किती गूढ असतात आणि त्याचे चलनवलन किती गुंतागुंतीचे असू शकते, हे न्याहाळण्यासाठी ही जागा सर्वोत्तम. मुळातला बंगाली चित्रपट, "दीप जेले जाई" याचा हिंदीत बनवलेला "खामोशी" चित्रपट. दोन्ही चित्रपट असित सेन यांनी दिग्दर्शित केले आहेत (विनोदी अभिनेता वेगळा). बंगाली चित्रपटात सुचित्रा सेन यांनी जी भूमिका केली आहे तीच हिंदी चित्रपटात वहिदा रेहमान यांनी केली आहे. अर्थात, आपल्याला इथे हिंदी चित्रपट गीताच्या संदर्भात विचार करायचा आहे. हे गाणे जेंव्हा चित्रपटात येते तेंव्हा नायिकेच्या समोर तिचा भूतकाळ जागा झालेला असतो आणि अशाच एका विदीर्ण संध्याकाळी, त्यावेळी नायिका एका रुग्णाची सेवा करता, करता त्याच्या प्रेमात पडते, जे प्रत्यक्षात कधीही वास्तववादी ठरणारे नसते. अशा विकल क्षणाची अनुभूती "तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार है" या गाण्यातून पडद्यावर सादर होत असते. "शिल्पांत खंड स्मरणाचा नि:संग जोडिशी क्षितीज कशाला भगवे हें जरी मिटे प्राणाने सांतातून अवघें अस्त घेऊनी उगवे…." कवी ग्रेसच्या या ओळींतून आपल्याला काहीशी कल्पना करता येऊ शकेल. हे गाणे जेंव्हा चित्रपटात सादर होते तेंव्हा आयुष्यात आणखी एक असाच मानसिक दृष्ट्या आजारी असलेला रुग्ण आलेला असतो आणि तिची मन:स्थिती दोलायमान झालेली असते. मागील आयुष्य कितीही विसरायचे ठरवले तरी त्याच्या सावल्या आयुष्यावर कधी ना कधीतरी पडतातच!! अशा गाण्याच्या बाबतीत विश्लेषण करताना बरेचवेळा मनाची संत्रस्त अवस्था होत असते. गाण्यातील तिन्हीही घटक तुल्यबळ असतात आणि लिहिताना कुठल्या घटकावर नेमके लिहायचे आणि किती लिहायचे, अशी संभ्रमावस्था होते. चित्रपट गीतांत "काव्य" असावे की नसावे, हा सनातन वाद आहे आणि त्याचे एकाच एक असे उत्तर मिळणे कठीण आहे. हिंदी चित्रपट गीतांत "कविता" असणे ही काही आधुनिक कल्पना नाही. पूर्वापार गाणी बघितली तर असेच आढळेल, उर्दूतील अनेक प्रथितयश शायरांनी चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत. कवी गुलजार याच परंपरेतील एक अविस्मरणीय नाव. गुलजार यांनी हिंदी चित्रपटांत अनेक भूमिका, निर्माता, दिग्दर्शक, लेखक, संवाद लेखक अशा अनेक भूमिका वठवल्या परंतु या सगळ्यांत, त्यांच्यातील "कवी" हा नेहमीच पुढाकार घेणारा ठरला आणि तीच त्यांची खरी ओळख. शब्दांशी खेळावे तर याच कवीने आणि याची प्रचीती या कवीने आपल्याला वारंवार दिली आहे आणि या गाण्यात देखील तीच ओळख अधिक गडद होते. आता या गाण्यातील "बेकरार" शब्द बघा. ध्रुवपदात - "ख्वाब चून रही है रात 'बेकरार' है" आणि गाण्याच्या शेवटी - "रात ये करार की 'बेकरार' है". इथे बेकरार हा शब्द दोन वेळा आलेला आहे तरीही केवळ शब्दाची पुनरावृत्ती नसून आशयाची सुंदर अभिव्यक्ती आहे आणि असे खेळ गुलजार यांच्या कवितेत वारंवार आढळतात. (असे असून देखील चित्रपटात गाणे लिहिणारे हे "गीतकार" या शेलक्या शब्दात येतात!! उदाहरणार्थ माडगुळकर. चित्रपट गीते लिहिताना बरेचवेळा ज्याला "टुकार" म्हणतात अशी शब्दकळा आढळते पण मग जे स्वत:ला "कवी" म्हणवतात, त्यांची निर्मिती सदासर्वकाळ उत्तमच असते का?) कुठल्याही भावकवितेंत, शब्दांची "अपरिहार्यता" असणे आवश्यक असते. तिथे दुसरा कुठलाही शब्द हा "उपरा" ठरतो. या गाण्यांत तो भाग आढळतो. गाण्यात दोनच कडवी आहेत पण तरीही गाण्यातील प्रत्येक शब्द, "हाच" हवा असे वाटते. तिथे दुसरा कुठलाच शब्द ही अभिव्यक्ती निर्माण करणे अशक्य. "मुख्तसर" सारखा एखादा(च) उर्दू शब्द वगळता, गाण्यात कुठलाच शब्द आकाळायला अवघड नाही. अर्थात मुख्तसर म्हणजे संक्षिप्त. पहिल्या कडव्याच्या शेवटच्या ओळीत - "मुख्तसर की बात है तुम से प्यार है". इथे आता सगळ्या ओळीचा नेमका अर्थ कळतो. असे असून देखील, कविता म्हणून हे गाणे फार वरच्या दर्जाचे ठरते. गाण्याची स्वररचना "पहाडी" रागावर आहे परंतु राग म्हणून विचार केल्यास, रागाची छाया स्वररचनेवर आहे. वास्तविक हा राग उत्तर भारतातील काश्मीरसारख्या पर्वतमय भागातील लोकसंगीतातून आला आहे. गमतीचा भाग असा, या रागात "ख्याल" गायकी फारशी ऐकायला मिळत नाही परंतु "उपशास्त्रीय" तसेच "ललित संगीतात" या रागावर आधारित अमाप रचना ऐकायला मिळतात तसेच कलासंगीतातील वादक कलाकारांचा हा राग खास आवडीचा दिसतो.आता थोडा तांत्रिक भागाचा विचार केल्यास, साधारणपणे हा राग "मध्यसप्तक" तसेच "मंद्रसप्तक" या सप्तकात सादर केला जातो. अर्थात अपवाद हा नेहमीच असतो आणि तो अध्याहृत धरला आहे. आता पुढील भाग - तुम / पुकार लो / तुम्हारा /इंतजार है सा ध प म ग(को)/ सा म ----/ म नि(को)- ध- / पम म प अशी सुरावट मुखड्याची ऐकायला मिळते. अर्थात या गाण्याचा लालित्यपूर्ण भाग आता बघूया. गाण्याची सुरवात, अति गंभीर हुंकाराने होते आणि त्या सोबत एका वाद्यावर छोटीशी धून आहे. ही धून जरा बारकाईने ऐकली तर हेमंतकुमारांनी हीच धून, त्यांच्या पूर्वीच्या एका गाण्यात वापरलेली आढळेल - प्रसिद्ध गाणे "कही दीप जले कही दिल" या गाण्याच्या सुरवातीला हीच धून वापरली आहे पण अर्थात पुढील विस्तार मात्र संपूर्ण वेगळा. हा जो "हुंकार" आहे तो देखील किती अप्रतिम आहे. पडद्यावर विस्तीर्ण असे आवार आणि प्रशस्त जिना. एवढ्या मोठ्या प्रांगणात एकटीच नायिका खिन्नपणे तो जिना चढत आहे. हा खिन्नपणा, या हुंकारातून सुरेखपणे दर्शवला जातो. "तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार है " अशी कवितेची ओळ आहे पण, हुंकारला योग्य म्हणून गायन करताना "पुकार लो" याच शब्दाने केला आहे आणि ते फारच अन्वर्थक आहे. "ख्वाब चून रही है रात 'बेकरार' है" किती तरल अभिव्यक्ती आहे आणि हीच अभिव्यक्ती संगीतकार हेमंतकुमारांनी त्याच असोशीने मांडली आहे. पहिला अंतरा सुरु होण्याआधीचा वाद्यमेळ दुपदरी आहे म्हणजे एका स्तरावर व्हायोलिन्स वाजत आहेत तसेच दुसऱ्या स्तरावर देखील तीच वाद्ये वाजत आहेत पण स्वरावलीत फरक आहे. याचा परिणाम, चित्रपटातील प्रसंग अधिक बांधीव होणे होय. गाणे शोकात्म तर नक्कीच आहे पण चालीची प्रकृती ओळखून तशाच चालीची निर्मिती करणे, हे तर रचनाकाराचे महत्वाचे कार्य. संगीतकार म्हणून, पुढील कडव्यांची चाल जवळपास तशीच ठेवली आहे. "जवळपास" म्हणजे चाल किंचित वरच्या सुरांत जाते पण तरीही लय कुठेही बदलत नाही तसेच चालीचा आकृतिबंध तसाच कायम राहतो. चालीच्या पुनरावृत्तीचा एक फायदा चित्रपटीय गाण्यांना नेहमी मिळतो आणि तो म्हणजे, सुरवातीची चाल रसिकांच्या मनात उतरते. "होंठ पे लिये हुए दिल की बात हम जागते रहेंगे और कितनी रात हम मुख्तसर की बात है तुम से प्यार है तुम्हारा इंतजार है …. " ध्रुवपदातील आशय कायम ठेवला आहे पण तरीही "मुख्तसर" शब्दाने किमया केली आहे. "होंठ पे लिये हुए दिल की बात हम" हे तर खरेच आहे पण ते देखील "मुख्तसर" असल्याने मनाची तडफड आतल्या आत चालू आहे आणि चालीतून हीच भावना दृग्गोचर होते. हे गारुड विलक्षण आहे. इथे एकाच चित्रीकरणात चूक आढळते. नायिकेच्या हातात ग्रंथ - मेघदूत पण तद्दन बाष्कळपणा दिसतो. जर का मेघदूत(च) ठेवायचे होते तर मूळ पुस्तक ठेवावे!! ग्रंथाचे नाव हाताने लिहिलेले समजते!! कशासाठी इतका बालीशपणा. चित्रपट निर्मितीसाठी लाखो रुपये खर्च होतात तिथे काही शेकडा रुपये जड व्हावेत!! "दिल बहल तो जायेगा इस खयाल से हाल मिल गया तुम्हारा अपने हाल से रात ये करार की बेकरार है तुम्हारा इंतजार है …. " गाण्यात वाद्यमेळ अगदी कमीत कमी असावा इतकाच आहे, गानाय्त तालवाद्य अजिबात नसून "बेस गिटार" चे सूर हाच ताल आहे. खरेतर "गिटार" हे केवळ सुरांचे वाद्य नसून असामान्य तालवाद्य देखील आहे. तालवाद्य आहे खरे पण वाद्याचा ध्वनी अतिशय खालच्या सुरांत ठेवलेला आहे आणि अपवादात्मक ठिकाणी (च) याचा ध्वनी ऐकायला येतो. सुगम संगीतात हीच आणखी एक गंमत असते. इथे वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक वाद्याला, स्वत:ची अशी एक भूमिका असते आणि त्या भूमिकेनुसार (च) ते वाद्य आपले अस्तित्व दाखवत असते आणि इथेच संगीतकाराचे स्वामित्व दिसून येते. आता गायक म्हणून विचार करता हेमंतकुमार यांच्या आवाजाला निश्चित काही मर्यादा आहेत पण त्या मर्यादा ध्यानात घेऊन, हा गायक आपल्या विलक्षण खर्ज आवाजात परिणाम साधतो. या गाण्यातच बघा, गायन हे मंद्र सप्तकात बहुतांशी चाललेले आहे पण आवाजात निसर्गत: "घुमारा" असल्याने, गाण्यात सुरेख गंभीर वातावरण तयार होते. गाण्यातील कविता अप्रतिम नक्कीच आहे पण चाल देखील अशी बांधली आहे जेणेकरून चांगली शब्दकळा चालीला अवजड होत नसून, कवितेतील आशय अधिक समृद्धपणे रसिकांच्या समोर येतो आणि आपले भावविश्व अधिक विस्तारून टाकतो. गायनात "गायकी" जरा देखील नसून निव्वळ चालीच्या आधाराने आपल्या मनात रुजणारे असे हे गाणे आहे. दिग्दर्शक असित सेन यांनी हे गाणे देखील अतिशय संयमित पद्धतीने पडद्यावर दाखवले आहे. "दिल बहल तो जायेगा इस खयाल से हाल मिल गया तुम्हारा अपने हाल से" या ओळीच्या वेळेस, नायिका खोलीचा दरवाजा परत ओढून घेते आणि नायकाकडे पाठ दाखवून परत आलेल्या वाटेवर चालायला लागते. कवितेतील भावनेशी विरोध दर्शविण्यासाठी हे सुरेख प्रकारे मांडले आहे. गाण्याचा शेवट देखील विलक्षण रितेपणा दाखवते. ज्या जिन्याने नायिका वर चढलेली असते, त्याच जिन्याने ती परत खाली उतरत येते. पार्श्वभागी किंचित हळुवार अशा शिटीचा वापर केला आहे. पडद्यावर परत तेच प्रशस्त आवार आणि तो आलिशान जिना आणि नायिका अत्यंत विषण्णपणे पायऱ्या उतरते. नायिकेची पावले जड होतात आणि आपल्या मनावर मात्र त्याचा अनोखा गडद परिणाम होतो.सुगम संगीताने असा अविस्मरणीय परिणाम घडवावा, हेच तर त्याचे प्राथमिक उद्दिष्ट असते.

No comments:

Post a Comment