Monday 20 March 2023
साहिर - अवलिया कवी
ख़ुदा-ए-बऱतर तेरी जमी पर
जमीं के खातिर ये जंग क्यूँ हैं
हर एक फ़तह-ओ-जफ़र के दामन पे
खून-ए-इन्सान का रंग क्यूँ हैं
जमीं भी तेरी,है हम भी तेरे
ये मिल्कियत का सवाल क्या हैं
ये क़त्ल-ओ-ख़ून का रिवाज क्यूँ हैं
ये रस्म-ए-जंग-ओ-जदाल क्या हैं
जिन्हें तलब है जहान भर की
उन्ही का दिल इतना तंग क्यूँ है
गरीब माओ शरीफ़ बेहनों को
अम्न-ओ-इज्जत की जिंदगी दे
जिन्हे अता के है तूने ताक़त
इन्हे हिदायत की रोशनी दे
सरों में किब्र-ओ-गरूर क्यूँ है
दिलो के शीशे पे जंग क्यूँ है
खजा के रस्ते पे जानेवालो को
बच के आने की राह देना
दिलों के गुलशन उजड़ ना जाये
मुहब्बतों को पनाह देना
जहाँ में जश्न-ए-वफ़ा के बदले
ये जश्न-ए-तिर-ओ-तफ़ंग क्यूँ हैं
साहिरच्या काही सुंदर कवितांपैकी चित्रपटात गेलेली ही कविता. असे म्हणता येईल मानवतावादी दृष्टिकोनातून कविता लिहिली आहे तरी देखील कवितेतील डावी विचारसरणी लपत नाही आणि खरंतर साहिरने अंगिकारलेली ही विचारसरणी, चित्रपटातील गाणी लिहिताना देखील लपवली नाही. खरतर मानवी आयुष्यातून युद्ध ही कल्पना कायमची बाजूला सारता येईल का? आज तर नक्कीच नाही परंतु आशावाद कायम असतो आणि त्या आशावादातूनच अशी कविता जन्माला येते. प्रस्तुत कवितेत बरेच उर्दू भाषिक शब्द आहेत जे मराठी भाषिक वाचकांना अगम्य वाटू शकतात परंतु इथे एक बाब ध्यानात घेण्यासारखी आहे, साहिर हा हाडाचा उर्दू भाषिक कवी होता आणि आजही उर्दू साहित्यात त्याला मान आहे. किंबहुना असे देखील म्हणता येईल, चित्रपटातील गाण्यात साहिरने कविता मिसळली आणि गाण्याचा दर्जा उंचावला. अर्थात टीका करणारे उलट बाजूने टीका करतच असतात. चित्रपटातील गाण्यात काव्य मिसळायला हवे का? एक काळ असा होता, चित्रपट क्षेत्रात उर्दू भाषिक कवींचे प्राबल्य होते आणि बहुतेक गीते उर्दू भाषेत लिहिली जायची. गमतीचा भाग म्हणजे, त्याच काळातील जान निसार अख्तर, शकील बदायुनी इन्वा कैफी आझमी, हे सगळेच डाव्या विचारसरणीचे कवी होते आणि कम्युनिझम विचारसरणीचा प्रचंड पगडा त्यांच्यावर होता.
तेंव्हा साहिर यांच्यावरील कम्युनिझम पगडा काही जगावेगळा नक्कीच नव्हता. साहिरची पार्श्वभूमी बघितल्यावर, या विचारसरणीचे महत्व पटते. १९४७ सालचा नृशंस नरसंहार, पुढे आई वडिलांचे विभक्त होणे, या सगळ्याचा साहिरवर परिणाम घडणे अटळ होते. आई वडिलांचे विभक्त होते, याचा त्याच्या मनावर कायमचा चरा पडल्याचे, त्याच्या सुरवातीच्या काही कविता वाचताना दिसून येते.
मेरे सरकश तराने सुनके दुनिया ये समझती है,
की शायद मेरे दिल को इश्क़ के नग्मों से नफ़रत है
मुझे हंगामा-ए-जंगो-जदल में कैफ़ मिलता है
मेरी फ़ितरत को खूरेंजी के अफ़सानों से रग़बत है
मेरी दुनिया में कुछ वक़अत नहीं है रक़्सो-नग़्मे की
मेरा महबूब नग़्मा शोरे-आहंगे-बग़ावत है
याओळीतून सहज दिसणारी वैफल्याची भावना, पुढे सरसकट वेगवेगळ्या कवितांमधून अधिक दृढ होत गेली. साहिरच्या कवितेत निखळ आनंद फारसा वाचायला मिळत नाही. अगदी प्रणयी थाटाची कविता असली तरी कुठेतरी निराशेचा सूर घुमत असतो.
मेरा जुनूने - वफ़ा है ज़वाल - आमादा,
शिकस्त हो गया तेरा फ़ुसने-जेबाई!
उन आरजुओं पी छाई है गर्दे - मायूसी,
जिन्होंने तेरे तबस्सुम में परवरिश पाई!
प्रेमाचा उन्माद असताना, तो कमी होत आहे, श्रृंगार मनात असताना देखील मनात निराशा दाटलेली आहे. त्यामुळे त्याच्या कविता वाचताना, आपल्या मनात देखील बराच काळ काळोखी दाटते आणि कवितेचा निखळ आस्वाद घेणे अवघड होते. सतत कवितेत "मायूसी" सारखे विरही शब्द वाचायला मिळतात. कलाकाराचा त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंध जोडू नये, हे खरेच आहे पण साहिरचे आयुष्य पहिले की असेच वाटते, याच्या वाट्याला निखळ आनंद कधी आलाच नसावा. संस्कारक्षम वयातील देशाची फाळणी, पुढे वडिलांचे ऐय्याशी जीवन आणि आईची झालेली फरफट, पुढे अमृता प्रीतमशी तुटलेले नाते, या सगळ्यांचा परिपाक त्याच्या कवितेतून वारंवार दिसून येतो. साहिर डाव्या विचारसरणीकडे का वळला, याचा तर्क आपल्याला लढवता येऊ शकतो.
विचार करणे ही मनुष्याची प्रकृती आहे आणि म्हणूनच त्याच्या अनुभवत विचारांचा अंश अपरिहार्यपणे असतो. ललित साहित्यातून आणि विशेषकरून कविता लेखनातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांच्या बाबतीत तर हे विशेषत्वाने खरे आहे. कारण भाषा हे ललित साहित्याचे माध्यम आहे. भाषेचाच द्वारे त्यात व्यक्त होणारा हा अनुभव होतो, म्हणजेच त्याला अर्थ प्राप्त होतो. आणि भाषेचं घडणच अशी आहे की, तिच्या द्वारे घेतलेल्या अनुभवत विचार अपरिहार्यपणे यावा लागतो.
आपण ललित साहित्याची एकंदर घडण बघितली तर एक गोष्ट नेहमी स्पष्ट होते. प्रतिमा,पत्रे आणि घटक हे ललित साहित्याचे महत्वाचे घटक असतात. आणि या तिन्ही घटकांचा एक समान गुणधर्म असा की ते संवेदना,भावना आणि विचार यांना एकत्र बांधून ठेवतात. वेगळ्या शब्दात प्रतिमा जे कार्य मूलभूत स्तरावर करते, तेच कार्य घटना आणि पात्रे अधिक विस्तारित स्वरूपावर करतात. आणि म्हणूनच कदाचित ललित साहित्यात विश्वात्मकता असू शकते.
साहिरच्या कवितांचा विचार करताना, वरील विचार फार महत्वाचा ठरतो. याचे महत्वाचे कारण, त्याच्यावरील संस्कार आणि त्याचा कार्यकारणभाव, हेच त्याच्या कवितांचे मुलतत्व कायम राहिले. आपल्याला आलेले अनुभव, हा त्याच्या कवितांचा कच्चा माल आहे आणि ही जाणीव कायम त्याच्या सोबत आहे.अगदी चित्रपटातील गीतांचा स्वतंत्र विचार केला तरी हेच दिसून येते.
तुम मुझे भूल ही जाओ तो ये हक़ है तुमको
मेरी बात और है मैंने तो मोहब्बत की है
याच कवितेत पुढे साहिर स्पष्टपणे लिहितो,
ज़िन्दगी सिर्फ मोहब्बत नहीं कुछ और भी है
जुल्फ़ - ओ - रुख़सार की जन्नत नहीं कुछ और भी है
भूख और प्यास की मारी हुई इस दुनियामें
इश्क़ ही एक हक़ीक़त नहीं कुछ और भी है
इथे साहिरवरील डाव्या विचारसरणीचा पगडा स्पष्ट दिसतो. खरे तर चित्रपटातील साधे प्रणयी थाटाचे गाणे आहे परंतु साहिर तसा विचार करत नाही. प्रेमात कितीही आकंठ बुडायचे म्हटले तरी सामाजिक वास्तव आणि त्याची जळजळीत विखारी जाणीव त्याच्या केंद्रस्थानी येते. मी वरती संस्कार आणि त्याचा कार्यकारणभाव संबंधी विधान केले, त्याला या ओळी पूरक ठरतील. पुढे त्यांने अगदी भांडवलशाही वातावरणात गीते लिहिली तरी त्याच्यातील मूळ धागा कधीच लोपला नाही आणि ती वेगवेगळ्या स्तरावर दृग्गोचर होत राहिला.
इथे एक मुद्दा सुचला. कलाकारांच्या बाबतीत असे म्हणता येईल, निरनिराळ्या व्यक्तींच्या प्रकृती भिन्न असतात. कुणी आवेगाने अनुभव घेतो तर कुणी संयमाने अनुभव घेतो; दुसरा अलिप्तपणे अनुभव घेतो आणि आणखी कुणी तिरक्या नजरेतून अनुभव घेत असतो. परिणामी होणारी अभिव्यक्ती ही नेहमीच वेगवेगळी असते. आता साहिरच्या कवितेत बरेचवेळा उत्कटता हा भाव दिसतो. परंतु साहित्यात जी उत्कटता असावी लागते ती आता उत्कटता म्हणजे काय?उत्कटता अनुभवाची नसून अभिव्यक्तीची असते. ललितकृतीतून व्यक्त होणार अनुभव जर जिवंत नसेल तर तो वाचकांपर्यंत नेमका पोहोचणे अवघड असते. तेंव्हा हा जिवंतपणा म्हणजे उत्कटता कलाकृतीत असलीच पाहिजे. अर्थात निव्वळ उत्कटता असणे कलाकृतीच्या जिवंततेला आशय प्रदान देते का? उत्कट अभिव्यक्ती ही पूर्णपणे कलात्मक पातळीवर गेलेली असते. साहिरच्या पुढील ओळीत ही उत्कटता अभिव्यक्तीच्या पातळीवर गेली आहे, हे बघता येते.
मेरे जहाँ में समनजार ढूंढ़ने वाले,
यहाँ बहार नहीं आतशी बगूले हैं
धनुक के रंग नहीं, सुरमई फ़िज़ाओं में
उफ़क़ से ता-ब-उफ़क़ फांसियों के झूलें हैं
माझ्या आयुष्यात उपवन शोधणाऱ्यांनो, इथे फक्त अग्निलोळ मिळेल. मी फक्त पहिल्या २ ओळींचा मतितार्थ लिहिला आहे. परंतु उत्कटता अभिव्यक्तीच्या पातळीवर कशी जाते, हे आपल्याला समजून घेता येते. कविता बरीच मोठी आहे आणि आपण इथे आस्वादाच्या पातळीवरून साहिर यांचे काव्य बघत आहोत.
आता थोडे मूल्यमापन करायचे झाल्यास, काही मुद्दे विचारात घ्यावे लागतील. जीवनाचे सत्य स्वरूप दाखवणे आणि जीवनविषयक ऊच्च आदर्श वाचकांपुढे मांडणे,ह्या दोन्ही गोष्टी साहित्यिक करत असतो. वास्तविक या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. जीवनाचे सत्य स्वरूप दाखवले की त्यातून आपोआप जीवनाचे आदर्श सूचित होतात अशी बरेचवेळा एक भूमिका असते. काही वेळा तर सत्य, शिव आणि सौंदर्य ही सारी एकच आहेत, अशी भूमिका अद्वैतवादी घेतात. पुढे जाऊन असे देखील मांडले जाते, सौंदर्य हे केवळ घाटात नसून आशयात देखील असू शकते. एकंदरीत आपण भूमिकेवर आलो की तर्कशास्त्र दूर जाते. त्या दृष्टीने नीतिमूल्ये बदलत असतात, तेंव्हा त्यानुसार साहित्याच्या प्रतवारीत देखील फरक पडतो परंतु मूलभूत नीतिमूल्ये शाश्वत असतात, बदलतात ती आनुषंगिक आणि तात्कालिक मूल्ये. साहित्याचा संबंध मूलभूत मूल्यांशी असतो तेंव्हा तात्कालिक मूल्ये बदलली तरी फारसा फरक पडत नाही. कुठलाही साहित्यिक हा भाषेचं उपयोग प्रत्यक्षाचे किंवा सामाजिक परिस्थितीचे चित्रण करण्याकरता करतो, असे मार्क्सवादी ठामपणे मांडतात आणि इथे साहिरच्या कवितेची कुंडली जुळते.
साहिरचे सामाजिक भान कधीही विरळ होत नाही, अगदी निसर्गचित्र मांडताना देखील हा दृष्टिकोन प्रकर्षाने दिसून येतो. साहिरची अतिशय लोकप्रिय कविता ध्यानात घेतल्यास, हा मुद्दा थोड्या वेगळ्या पद्धतीने स्पष्ट करता येईल.
ताज़ तेरे लिए इक मज़ार - ए - उल्फत ही सही
तुझको इस वादी - इ - रंगीन से अक़ीदात ही सही
मेरी महबूब कहीं और मिला कर मुझ से
बज़्म - ए - शाही में गरीबों का गुज़र क्या मानी
सब्त जिस राह में हों सतवत - ए - शाही के निशाँ
उस पे उल्फत भरी रूहों का सफर क्या मानी
आता मान्य करायला हवे, एकेकाळी या कवितेने मला वेड लावले होते पण पुढे एकूणच ही सगळीच कविता बटबटीत वाटायला लागली. वास्तविक ताजमहाल सारखी अलौकिक सुंदर वास्तू आणि ती बघून साहिरला, ती बांधतानाची झालेली पिळवणूक आठवते. सगळे चित्रण याच पार्श्वभूमीवर आहे. एका दृष्टीने हा स्वतंत्र दृष्टिकोन म्हणता येईल पण तो दृष्टिकोन मांडताना, कुठेतरी साहिरची सौंदर्यदृष्टी एकांगी झाली, असे आज वाटते.
अर्थात इथे एक मुद्दा आणखी मांडता येईल. कुठल्याही कलाकाराच्या सगळ्याच साहित्यकृती या असामान्य दर्जावर ठेवता येत नसतात, त्यात डावे - उजवे हे नेहमीच असते. आपण आपली दृष्टी किती सम्यक पातळीवर ठेवतो, त्याप्रमाणे मूल्यमापन होऊ शकते. दुर्दैवाने मूल्यमापनाचे ठाम आणि ठराविक असे निकष अजुन तरी उपलब्ध नाहीत.
अर्थात साहिरने निसर्गचित्रे लिहीलीच नाहीत का? उत्तर सोपे आहे. नक्कीच लिहिली आहेत परंतु दुर्दैवाने त्याची जी प्रतिमा निर्माण झाली, त्याच्यापुढे झाकोळून गेली.
तसव्वुरात की परछाइयाँ उभरती हैं
कभी गुमान की सूरत कभी यकीं की तरह
वो पेड़ जिनके तले हम पनाह लेते थे
खड़े है आज भी साकित किसी अमी की तरह
आता या ओळी वाचताना, त्याची ठराविक ओळख "खड़े है आज भी साकित किसी अमी की तरह" या ओळीतून प्रकट होते "साकित" म्हणजे "चुपचाप"! निसर्गचित्र निर्माण करताना देखील त्याचा व्याकुळ स्वर लपत नाही. साहिरच्या बहुतांशी कवितेत निराशा कायमची ठाण मांडून बसलेली असते आणि त्याचे मूळ, मी वर निर्देश केलेल्या संस्कारात दडलेले आहे.
खरेतर सौंदर्यवाद्यांची भूमिका अशी असते की, साहित्याचा एकमेव विशेष आणि निकष हा सौंदर्य असतो. साहित्यकृती ही तिच्या घटकांची लयबद्ध रचना करून घडवलेली असते आणि म्हणून ती सुंदर असते. साहित्यकृतींचे सौंदर्य अशा रीतीने तिच्या रचनेत अथवा घाटात साठवलेले असते. परंतु ह्या गोष्टी काहीशा आनुषंगिक असतात. अर्थातच साहित्य श्रेष्ठ की कनिष्ठ हे तिच्या ठिकाणी असलेल्या सौंदर्यावरून ठरवायचे असते. सौंदर्य हाच साहित्याचा महत्वाचा निकष असू शकतो आणि हाच दृष्टिकोन महत्वाचा ठरवला तर साहिर यांच्या कविता एकूणच भाषेच्या दृष्टीने फारच समृद्ध ठरतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
So intresting and beautiful
ReplyDelete