Monday 16 December 2019

भारतीय लोकशाही

भारतात लोकशाही पद्धत १९४७ पासून अस्तित्वात आली असे म्हणता येईल. कित्येक शतके राजेशाही, सरंजामशाही पुढे परकीय राज्य इत्यादी अनेक कारणांनी इथे लोकशाही नाममात्र होती किंवा अजिबात नव्हती, असे म्हणता येईल. त्याचा परिणाम असा झाला, भारतीय लोकांना "लोकशाही" या शब्दाचा खरा अर्थ कळलंच नाही आणि आजही दुर्दैवाने तशीच परिस्थिती आहे. "लोकांनी चालवलेले, लोकांसाठी चालवलेले" वगैरे घोषणा भरपूर झाल्या आणि तशाच हवेत विरल्या. अर्थात घोषणा या हवेतच करायच्या असतात, याचे धडे भारतीयांना देश स्वतंत्र झाला आणि लगोलग प्रचिती यायला लागली. इथल्या राजकारणी नेत्यांना, सामान्य जनतेला कसे फसवायचे याचे मूलभूत धडे फार पूर्वीपासूनच मिळाले. आज फक्त त्याची री ओढली जात आहे. 
"नेहरूंनंतर कोण?" हा प्रश्न जेंव्हा उपस्थित केला त्या दिवशीच राजकारणातील व्यक्तिपूजेची प्रतिष्ठापना झाली. पुढे, Indira is India या घोषणेने त्या वृत्तीला खतपाणी मिळाले. आज जेंव्हा व्यक्तिकेंद्रित शासनव्यवस्था हाच भारतीय राजकारणाचा पाय बनला आहे. त्याबद्दल नकारात्मक सूर काढला जातो तेंव्हा आपण इतिहासाकडे जाणूनबुजून काणाडोळा करत असतो. आज जेंव्हा भाजपविरुद्ध टीका केली जाते तेंव्हा जर का इतिहासात डोकावले तर काँग्रेसने जे ७० वर्षांत केले, तेच भाजप आज करीत आहे, हे स्पष्टपणे दिसते. आज फरक इतकाच पडला आहे, कालापरत्वे संपर्कसाधने आधुनिक झाली आणि टीका सर्वव्यापी होत गेली. 
आपल्याकडे लोकशाही कधीही रुजली नाही किंबहुना लोकशाही रुजावी अशी व्यवस्थाच कधी निर्माण केली नाही. तशी होऊ शकणार नाही, याची फार पूर्वीपासून काळजी घेण्यात आली. ज्या इंग्लंडच्या लोकशाहीचे आपण गुणगान करतो आणि त्याच धर्तीवर भारतीय लोकशाहीचा डोलारा उभारला आहे तिथे विरोधक आणि सत्ताधारी जरी वेगळे असले तरी व्यक्तिकेंद्रित मत असते. चर्चिलने तर आपल्या आत्मचरित्रात, "मी बरेचवेळा विरोधी पक्षात असून सुद्धा सरकारच्या बाजूने मत दिले आहे कित्येक वेळा सरकारात सामील असतात विरोधात मत दिले आहे आणि मला याबाबत कधीही खेद वाटला नाही". असे चित्र दुर्दैवाने भारतात कधीही दिसले नाही. विरोधक म्हणजे देशबुडवे अशीच संस्कृती, विशेषतः इंदिरा गांधींपासून जन्माला आली आणि पुढे त्या संस्कृतीत भर पडत राहिली. अशा परिस्थितीत भारतात लोकशाहीचा पाया मजबूत होणारच नाही आणि यापुढे ती शक्यता फार अंधुक झाली आहे. त्यातूनच मागचे ते मूर्ख आणि फक्त मीच शहाणा, हा विचार बळावत गेला. अर्थात हा विचार व्यक्तिपूजेचाच एक भाग आहे म्हणा. ७० वर्षे काँग्रेसचा एकछत्री अंमल होता त्यामुळे त्या पक्षाला हे वाक्य बोलायची सुविधा नव्हती परंतु एकूणच, विरोधक म्हटल्यावर त्याने फक्त विरोध करणे अपेक्षित असते आणि सत्ताधारी म्हटल्यावर त्याने सतत भलावण करायची आणि हीच खरी लोकशाही म्हणून आरडाओरडा करायचा. यातून फक्त गोंधळ निर्माण होतो. टीव्हीवरील चर्चा याच संस्कृतीचे फलित आहे. शांतपणा आपल्याला भावतच नाही कारण मृत्यू हीच शांततेची एकमेव कसोटी असे आपले मत आहे. मृत्यूनंतर शांतता भंग करता येत नाही, हे भारतीयांचे भाग्यच म्हणायला हवे. 
एका बाबतीत आपण जगासमोर अग्रेसर आहोत. सदैव घोषणा करून सामान्य माणसाला विचार करायची संधीच मिळवून द्यायची नाही. त्याच्या डोक्यात सतत चिखल भरून ठेवायचा आणि भ्रमिष्ट करून टाकायचे. एकप्रकारची ही स्टालिनशाही (च) म्हणायची. गुलामगिरी आपल्या रक्तातच भिनली आहे. त्यातूनच निष्ठा एकाच व्यक्तीपाशी केंद्रित करण्याची प्रवृत्ती वाढायला लागली. स्वतंत्र विचारशक्तीच गमावून बसलो आहोत. दर ५ वर्षांनी मतदानाचा भोंगळ उत्सव आणि निवडणुकीचे गुऱ्हाळ घालून, लोकशाहीचे सुंदर थडगे बांधले जाते. खरतर भारतीय समाजाला लोकशाही म्हणजे काय, याचेच धडे देण्याची गरज आहे. नुसत्या संसद इमारती बांधून काहीच साधले जात नाही. आपण फक्त लोकशाहीचा वृथा आणि अत्यंत खोटा अभिमान बाळगत आहोत. आपण सगळेच खोटारडे आहोत आणि आता असे म्हटल्यावर "मी सत्याचा पुजारी आहे" सारखी भ्रामक  उत्तरे वाचायला मिळतील सुद्धा. 
लोकांना गृहीतच धरायचे नाही, सामान्य जनतेच्या डोक्यावरून वरवंटा फिरवायचा. याच कृतीने आपण लोकशाही सिद्ध करीत आहोत. अजूनही स्वातंत्र्य लढ्याची वर्णने चवीने वाचली जातात, त्या लढ्याच्या भोगातून असंख्य आर्थिक फायदे उपटले जातात. आपली बुद्धी अजूनही ७० वर्षे मागासलेलीच आहे. आजही "मी इतके महिने/वर्षे तुरुंगात राहून देशसेवा केली" असली उबवलेली वाक्ये म्हणण्यातच धन्यता मानीत आहोत आणि गमतीचा भाग असा आहे, सर्वसामान्य जनता याच वाक्यांना फशी पडत आहे.  आणखी एक बाब, आपण घृणास्पदरीत्या बुद्धीचा टेम्भा मिरवीत असतो. 
गेली ७० वर्षे हेच चालले आहे. या गोष्टी मात्र भारतीय जनता सहन करण्यायोग्य झाली आहे, हेच निर्विवाद सत्य होय. यालाच "भारतीय लोकशाही" म्हणतात जी जगाच्या इतिहासात अद्वितीय आणि अजोड आहे. 

No comments:

Post a Comment