Wednesday 21 September 2016

रागदारी संगीत आणि समय

चित्र १] सकाळची वेळ. अजूनही आसमंतात किरणांची तशी चाहूल नव्हती. त्यामुळे सगळीकडे थंड काळोख पसरलेला होता. हवेत गारवा होता. हाताच्या अंतरावर म्युझिक सिस्टीम होती. सहज चालू केली आणि त्यातून सतारीचे स्वर बाहेर पडायला लागले. डोळ्यांवर तसा झोपेचा अंमल अधिक गडद होता पण सतारीच्या सुरांनी ग्लानीतुन थोडासा बाहेर आलो. अत्यंत संथ लयीत तोडी रागाचे स्वर कानावर पडायला लागले. "कोमल गंधार" आणि "कोमल धैवत" या स्वरांच्या साहचर्याने बनलेला हा राग, मनाशी सकाळची रम्य चित्रे रंगवायला लागलो. चित्र २] संध्याकाळी असाच पलंगावर जरासा लवंडलो होतो आणि परत काही "ऐकण्याची" लहर आली आणि यावेळेस, तोडी रागाचेच स्वर आले पण वाद्य मात्र सरोद होते, वाद्याची प्रकृती जराशी गंभीर - सतारीच्या तुलनेत. तरीही रागाचे स्वर "परके" वाटले नाहीत आणि जवळपास तासभर राग ऐकत, तसाच पलंगावर लोळत पडलो होतो. मनात विचार आला, वास्तविक "तोडी" राग सकाळचा असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत आणि तसाच संस्कार आपल्या मनावर देखील झालेला आहे. असे असून देखील हाच राग आज संध्याकाळी ऐकताना, आपल्या कानांना काहीही खटकले नाही. याचा अर्थ, रागाचे सूर आणि त्याचा समय, याचे नेमके नाते काय आणि जे रागांचे समयानुरूप वर्गीकरण करण्यात आले आहे, त्यामागे नेमका काय हेतू असावा? केवळ काही संकल्पना मनाशी धरून, रागांचे समय निश्चित करण्यात आले आहेत? असे मानले जाते, भारतीय संगीत आणि संगीतशास्त्र यांना जगात तोड नाही. अर्थात असे ठाम विधान करताना आपल्याला काही बाबी निश्चित करणे जरुरीचे आहे. जगातील प्रत्येक सचेतन आणि जड वस्तू गणिताच्या कक्षेत येते. याचा पुढील भाग म्हणजे, संगीत हे स्वर-लयप्रधान मानिले, तर या दोन्ही गोष्टी निश्चितपणे गणितागत, गणिताधारित आहेत. अर्थात हा सगळा विषय, संगीतशास्त्राच्या कक्षेत येतो. याचाच वेगळा अर्थ असा, संगीत हे कितीही "कला" म्हणून मान्य केले तरी त्याचे अधिकृत अधिष्ठान हे शास्त्रानेच सिद्ध होते. प्रस्तुत विषयाला हात घालण्यापूर्वी काही बाबी स्पष्ट होणे, आवश्यक वाटते. भारतीय संगीत आणि रागदारी संगीत, यात फरक आहे. रागदारी संगीत ही भारतीय संगीताची एक शाखा आहे. त्यामुळे या विषयावर लिहिताना, याच शाखेचा विस्तारपूर्वक विचार करणे अत्यावश्यक ठरते. रागविवेचन आणि स्वरशास्त्र याचा आपल्याला इथे मागोवा घेणे जरुरीचे आहे. स्वर, स्वरांची मांडणी आणि पुढे राग, असा हा प्रवास आहे आणि या प्रवासातून आपण, राग आणि त्यांचा समय, याचा धांडोळा घेणार आहोत. फार पूर्वीपासून राग आणि रागाचे समय याबाबत काही लिखित संकेत तर काही मौखिक संकेत आपल्या समाजात प्रचलित झाले आणि पुढे रूढ पावले. एक नाकी, संगीत आधी अस्तित्वात होते, पुढे त्याचे शास्त्र निर्माण करून, त्या कलेचा पाया व्यापक केला गेला. आता कुठलीही कला ही कालमापनेच्या दृष्टीने बदलत राहते आणि तसे बदलणे आवश्यक असते अन्यथा ती कला साचून राहते आणि हळूहळू निस्तेज होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या अनुरोधाने बघायला गेल्यास, प्राचीन काळी अस्तित्वात असलेले "यज्ञसंगीत" अथवा "यातुसंगीत" जे सामवेदाच्या काळी प्रसिद्ध होते. पुढे त्यात कालानुरूप बदल होत, आजचे रागसंगीत आपल्याला ऐकायला मिळते. हे बदल होत गेले म्हणूनच रागदारी संगीत चिरंतन राहिले. आपल्याकडे एक विधान अतिशय सैलपणे केले जाते - आपली संगीताची परंपरा तीन,चार हजार वर्षांची आहे आणि अविच्छिन्नपणे, अविकृतपणे चालत आली आहे. इतके भोंगळ वाक्य दुसरे नसेल आणि यात केवळ अहंकार दिसून येतो. जिथे सर्व सृष्टी बदलली, समाजजीवन बदलले तिथे संगीत मात्र जसेच्या तसे अविचल राहिले, हे कसे शक्य आहे? संगीत ही कला तर पाऱ्याप्रमाणे तरल कला आहे. जिथे एकाच गुरु-शिष्यांमध्ये देखील संगीत बदलताना दिसते तिथे शेकडो वर्षांच्या संगीत परंपरेत बदल घडला नाही, यावर विश्वास कसा ठेवायचा? जरा आपण बारकाईने बघितले गेल्या पन्नास वर्षांतील रागसंगीताचा ढाचा आता थोड्याफार प्रमाणात बदलेला आढळतो. भरतकालीन संगीत तानसेनाच्या काळात राहिले आणि तानसेनच्या वेळचे संगीत आज उरले नाही. एक गंमत म्हणून विचार केला तर, समजा आजच्या एखाद्या मैफिलीत स्वतः:तानसेन जर मुकाट्याने येऊन बसला तर तो आजच्या गाण्याने अस्वस्थ तरी होईल किंवा कदाचित खिन्न देखील होईल. आणि हाच विचार पुढे ताणला तर - समजा खुद्द तानसेन गायला बसला तर ऐकणारे श्रोते मनातल्या मनात चुळबुळ नक्की करतील. कुठल्याही गाण्यात, कानांच्या सवयीचा भाग फार महत्वाचा असतो. अर्थात या घालमेलीत एक निष्कर्ष आपण काढू शकतो, "संगीत" एक कला म्हणून अव्याहतपणे चालूच आहे आणि पुढे चालूच राहणार. फारतर त्याच्या बाह्यांगात बदल संभवतील. असे म्हटले जाते, ख्याल संगीत किंवा रागसंगीताची निर्मिती अमीर खुसरोनेच केली, जिचा उद्भव तेराव्या शतकात झाला. यात मजेचा भाग असा आहे, जर का तेराव्या शतकात रागसंगीत अवतरले असेल तर तीतून पुढे अठराव्या शतकापर्यंत म्हणजेच "सदारंगा"च्या काळापर्यंत कुठेच "रागसंगीत" या संकल्पनेचा आढळ सापडत नाही!! हे कसे काय? मधल्या काळातील तानसेन किंवा स्वामी हरिदासस्वामी हे मुळात "ध्रुपदिये" होते आणि हे सर्वमान्य आहे. असे असताना, याचा काळात रागसंगीताचा साधा उल्लेख देखील सापडत नाही!! अकबराच्या काळातील "मियाँ की तोंडी" "मियाँ मल्हार" आजही अव्याहतपणे सादर होताना दिसतात आणि याला साधारणपणे तीनशे तर साडेतीनशे वर्षे झाली. मग "खुसरो"निर्मित "ख्याला"ची परंपरा कुठे लुप्त झाली? तसेच खुसरो निर्मित, सतार या वाद्याचा कुठेही उल्लेख आढळत नाही!! इथे बरीच गफलत आहे, असा संशय घ्यायला बराच वाव आहे. फारतर असे म्हणता येईल, खुसरोची निर्मिती तितकी सकस नव्हती आणि काळाच्या ओघात म्हणजे त्यानंतर एक, दोनशे वर्षात नाहीशी झाली. वस्तुस्थिती अशी असते, अभिजात कलेचा एखादा अभिनव प्रकार अशा प्रकारे नाहीसा होत नसतो. रागसंगीताच्या अधिक धृपद-धमार संगीत होते, आजही काही कलाकार ते संगीत सादर करतात (उदाहरणार्थ गुंदेचा बंधू) १२०० च्या काळात उदयास आलेल्या, शारंगदेव निर्मित "संगीत रत्नाकर" या ग्रंथात धृपद संगीताचा स्पष्ट उल्लेख वाचायला मिळतो आणि आजही ही परंपरा बघायला मिळते. खुसरो बाबत इथे शंकेला जागा उरते. आपल्या रागदारी संगीतात, प्रथम स्वर आले, पुढे सप्तकांची निर्मिती झाली आणि त्यातून मग स्वरांचे एकमेकांशी नाते जुळवण्यात आले. असे करत असतानाच, "षड्ज - माध्यम" आणि "षड्ज - पंचम" भावाची संगती लावली गेली, जिचे महत्व कायमस्वरूपी चिरंतन झाले. आता ही जी स्वरसंगती मांडली गेली त्यामागे, त्या ध्वनीचे अवगाहन आणि कर्णगोचरता हे विशेष ध्यानात घेऊनच संगती लावली गेली. अर्थात हे करताना, गणिताचा आधार घेतला गेला पण तो भाग नंतरचा. रागसंगीत आणि त्याचा समय, याबाबत विवेचन करताना, आपल्याला हाच मुद्दा विचारात घ्यावा लागेल. रागाची रचना करताना जेंव्हा हाताशी असलेले स्वर आणि त्याची मांडणी करताना, दाखवलेले रचनाकौशल्य, आपण ध्यानात घेऊया. स्वर हे नैसर्गिक आहेत आणि निसर्गातील असंख्य ध्वनींमधून आपल्या रचनाकारांनी, कानाला जे ध्वनी गोड वाटतात, त्यांची निवड करून, सप्तकांची मांडणी केली. त्यामुळे स्वरांच्या जोडीने त्यात भावनांचा आढळ सापडणे साहजिकच ठरते. रागाचा समय निश्चित करताना, याच तत्वाचा विचार प्रामुख्याने केला गेला. भारतीय रसिक हा बालपणापासून संगीताचा जरी भोक्ता होत नसला तरी संगीतानुकूल कान तयार होत असतो. याचा परिणाम असा होता, स्वराकडे तटस्थ वृत्तीने बघण्याची वृत्ती बऱ्याच प्रमाणात क्षीण होत असते. यामागे परंपरेचे संस्कार आणि त्याचा पगडा जबरदस्त असतो. याबाबत पाश्चात्य संगीत विचारवंत Schubert यांचे विवेचन विचारात घेऊया. "We enjoy negative emotions in music by inhibiting displeasure thanks to the "safe" aesthetic context that nullifies the possible dangerous consequences associated with real everyday negative emotions. Therefore we suggest using valence to indicate positive and negative affective character and including pleasure or enjoyment as an extra dimension." या विवेचनाच्या संदर्भात त्यांनी एक सुंदर शब्द वापरला आहे - Aesthetic Emotions. स्वरांच्या जोडीला भावनांची जोड देताना, मानवी स्वभाव हा मुलत: negative म्हणजे दु:खी भावनेचा आधार अधिक घेतो आणि त्यानुरूप आवड निश्चिती होते. जेंव्हा भारतीय रागदारी संगीत हे प्रामुख्याने भक्ती, समर्पण, विरह या भावनांशी जोडलेले आढळते, तेंव्हा या वरील विवेचनाचा नेमका अर्थ लागतो. भारतीय रागसंगीतात जे स्वर सप्तक असते, त्यातील स्वरांचे एकमेकांशी असलेले नाते या संदर्भात समजून घेणे आवश्यक आहे कारण त्यातूनच पुढे स्वरांतून निर्माण होणारे भावदर्शन कितपत संयुक्तिक आहे आणि किती भाबडे आहे, याचा अदमास घेता येईल. आपले स्वर सप्तक जेंव्हा बघितले जाते तेंव्हा एक प्रश्न नक्की मनात येतो. दोन स्वरांच्या मध्ये देखील काही ध्वनी आपल्याला ऐकायला मिळतात आणि त्या ध्वनीच्या साहचर्याने आपल्याला "मींड" या अलंकाराची संगती लागते. आपण नेहमी म्हणतो, आपले संगीत एका स्वरावर स्थिर होते आणि मग पुढे प्रवासाला सुरवात करते पण यात, पुढे सरकताना, आपल्याला अंतर्गत जे नाद आहेत, त्याची मदत घ्यायलाच लागते आणि त्याला "श्रुती" असे म्हणतात. "श्रुती" हा विषय फार किचकट आहे आणि म्हणूनच त्याबद्दलची चर्चा टाळून पुढे गेलो तर असे दिसून येते, प्रत्येक स्वर हा या श्रुतीच्या साहाय्याने जोडलेला आहे आणि त्यामुळे भारतीय संगीत एका स्वरावर स्थिर होते, हे वाक्य एका मर्यादित अर्थानेच घ्यायला लागते. स्वर आणि श्रुती यांच्या बाबत एक श्लोक, भरत मुनींच्या "नाट्यशास्त्र" ग्रंथात सापडतो आणि आजही त्याबाबत फारसा विवाद नाही. "चतुश्चतुश्चतुशचैव षड्जमध्यमपंचमा: ! द्वै द्वै निषादगांधारौ त्रिस्त्री ऋषभधैवतौ !! अर्थात याबाबत गोंधळ असा आहे, याचे नेमके वाटप कसे करायचे आणि हाच श्लोक कितपत ग्राह्य धरायचा? एक बाब नक्की मानायला हवी, या श्रुतीमुळे संगीतात अनेक रस निर्माण होतात आणि त्या रसांच्या साहचर्यानेच पुढे, रागांचे समय वगैरे बाबी उदयाला आल्या. पंडित शारंगदेवांचा "संगीत रत्नाकर" हा ग्रंथ साधारण १२१० ते १२४७ या काळात लिहिलेला, असे मानले जाते आणि आजही हा ग्रंथ प्रमाणभूत आहे, हे सर्वमान्य आहे. या ग्रंथात, त्यांनी स्वरांच्या रसांबद्दल विवरण केले आहे आणि ते खालील प्रमाणे वाचायला मिळते. रस - षड्ज, ऋषभ - वीर, अद्भुत, रौद्र. गंधार, निषाद - करुण. धैवत - बीभत्स. मध्यम, पंचम - हास्य, शृंगार. तसेच त्यांनी स्वरांच्या देवता देखील सांगितल्या आहेत. स्वरांच्या देवता - अग्नी, ब्रह्मा, सरस्वती, विष्णू, इंद्र, गणेश व सहस्रांशू. वरील वर्गीकरण, आजच्या संगीताच्या संदर्भात बघितले असता, फार ढोबळ वाटते. परंतु स्वरांतून काही प्रकारच्या भावना दृग्गोचर होतात, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. आणखी एक मुद्दा लक्षात ठेवावा लागेल, पंडित शारंगदेवांच्या काळात, "ख्याल" संगीताचा उदय झाला नव्हता.रसनिष्पत्ती ही त्यावेळच्या धृपद-धमार संगीताच्या आधारावर केलेली आहे. आपण वर बघितले त्याप्रमाणे कालानुरूप संगीताच्या बाह्यांगात आणि सादरीकरणात फरक पडत गेला आणि त्यावेळचे निकष हे आज काहीसे कालबाह्य ठरत गेले. आता वरील चर्चेच्या अनुरोधाने बघायला गेल्यास, आज "राग भैरव" हा सकाळचा राग मानला जातो. भैरव रागाची स्वरावली बघायला गेल्यास, "रिषभ" आणि "धैवत" स्वर कोमल आहेत तर बाकीचे सगळे स्वर शुद्ध आहेत. आता गमतीचा भाग नघायला गेल्यास, "संगीत रत्नाकर" मध्ये जे स्वरांचे रस वर्णिलेले आहेत, त्यानुरूप "वीर,रौद्र तसेच बीभत्स" रंगाचा आढळ या रागाच्या बाबतीत अनुभवायला हवा, अगदी पारंपरिक नजरेतून बघितले तरी हे रस या रागात कितपत आढळतात? प्रश्नच आहे. मग, संस्कृत ग्रंथात जे रस सांगितले आहेत, ते चुकीचे ठरवायचे का? उत्तर सरळ आहे. त्यावेळी, "ख्याल" संगीत अस्तित्वात नव्हते, होते ते "धृपद-धमार". त्या संगीताच्या आविष्काराकडे बघितले तर या रसाचा परिपोष आढळू शकतो पण त्यानंतर काही शतकांनी आजचे "ख्याल" संगीत अवतरले आणि त्यावेळेपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते!! आता प्रश्न असा उद्भवतो, ग्रंथांच्या नियमानुसार "भैरव" रागाची वेळ पहाटेची दिली आहे आणि त्यानरूप या रागाच्या "षड्ज" स्वराची स्थापना केली गेली आहे. तेंव्हा हा राग पहाटेच्या समयानुसार सादर केला जावा, हे आजही आपल्या मनावर ठसले गेले आहे. अर्थात, भारतीय संगीत हे नेहमीच "गुरु-शिष्य" परंपरेवर आधारित असल्याने, बरेचवेळा गुरूंची मते, ही आपली होतात!! "बाबा वाक्यम प्रमाणम" या उक्तीचा रोकडा अनुभव आपल्याला "गुरु-शिष्य" परंपरेत आढळून येतो. याला काही वेळा छेद देणारे कलावंत भेटतात पण असे प्रमाण तुरळकच असते. याबाबतीत थोडा तटस्थ विचार करायचा झाल्यास ( भारतीय मन, भारतीय संगीताबाबत कितपत असा दृष्टिकोन स्वीकारू शकेल? मला शंका आहे.) परत एकदा पाश्चात्य विचारवंतांकडे वळावे लागेल. Helmholtz once argued that, " Musical enjoyment is linked with patterns of tension and resolution resulting from the confirmation and violation of perceptual expectations of which we are usually unconscious." हा विषय खरे तर Neuroaesthetics या शाखेत मोडतो पण जर का राग, त्या रागात असणारे स्वर आणि त्या स्वरांचा आपल्यावर घडणारा परिणाम, याचा शोधक विचार करायचा झाल्यास, आपल्याला या शाखेकडे वळावे लागते. थोडा विचार केला तर बघा, आपल्या मनात भावना येतात म्हणजे नक्की काय प्रक्रिया घडते? आपल्याला कानाद्वारे काही ध्वनी ऐकायला मिळतात आणि त्या ध्वनींच्या गोडव्याचा आपल्या मेंदूवर काहीतरी परिणाम होतो आणि त्यामुळे आपल्याकडून प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया दिली जाते. आता, आपण "तोडी" आणि "भैरव" या सकाळच्या रागांचा उल्लेख केला आहे तेंव्हा त्यादृष्टीने, "संगीत रत्नाकर" या ग्रंथात एक श्लोक दिला आहे. भिन्न कैशिकमध्यम षड्जमध्यमिकोत्पनो भिन्न कैशिकमध्यम: । षड्जग्रहांशो मन्यासो मंद्रसान्तोsथवा भवेत ।। षड्जादिमूर्च्छन: पूर्ण: संचारिणी सकाकली । प्रसन्नादियुतो दानवीरे रौद्रेsदभुते रसे ।। दिनस्य प्रथमे यामे प्रयोज्य: सोमदैवत: । अर्थ: भिन्नकैशिकमध्यम षड्जमध्यमा जातीपासून उत्पन्न झाला आहे, त्याचा ग्रह आणि अंश षड्ज असून, मी हा न्यास किंवा मंद्र षड्ज हा न्यास असतो. षड्जादि मूर्च्छना असलेला, संपूर्ण, संचारी वर्णातील प्रसन्नादि अलंकाराने युक्त व काकलीसहित असलेला राग दानवीर, रौद्र आणि अदभूत अशा रसात योजावा. याची देवता सोम ही असून तो दिवसाच्या पहिल्या प्रहरात प्रयुक्त करावा. रागाच्या समयानुसार जे वर्गीकरण सध्या अस्तित्वात आहे, त्या जोडून हा श्लोक घेतल्यास, एकूणच वर्गीकरणाची व्याप्ती आणि संबंध आपल्याला ताडून बघता येतो. वरील श्लोकाच्या बाबतीत आणखी एक मजेचा भाग सांगता येतो, "कैशिकमध्यम" म्हणजे आजच्या काळातील तीव्र मध्यम!! षड्ज-मध्यम संवाद भावाचे दर्शन आपल्या ग्रंथातून फार पूर्वीपासून समजून घेता येते. आता मजेचा दुसरा भाग म्हणजे या श्लोकाचा आधार घेतला तर समयाचे अस्तित्व दिसते पण तरीही शारंगदेवांनी "प्रयुक्त करावा" असा शब्दप्रयोग केला आहे. याचा वेगळ्या शब्दात असा अर्थ मांडता येतो, हे विधान म्हणजे नियम नव्हे. इथे अर्थात एक मुद्दा अजूनही स्पष्ट झालेला नाही. तोडी रागात, "कोमल गंधार" आणि "कोमल धैवत" हे दोन स्वर आहेत आणि म्हणून या रागाचा समय पहाटेचा आहे का? याबाबत आणखी एक विधान करता येईल. प्रत्येक रागाचे "षड्ज" स्वराचे स्थान वेगळे असते आणि त्यानुरूप पुढील सप्तक सिद्ध होत असते. हे तर सर्वमान्य विधान झाले. मग प्रश्न येतो, "तोडी" रागाचा जो "षड्ज" आहे, त्यात पहाटेच्या समयाची "बीजे" लपली आहेत का? असे काय त्या स्वरांत आहे, म्हणून हा राग पहाटेचा आहे, हे आजतागायत मान्य झाले आहे. याचा वेगळा अर्थ, आपल्याला परत एकदा, त्या स्वराची "कंपने" आणि "स्पंदने" आपल्याला पहाटेच्या वेळेची जाणीव करून देतात का? पहाटेचे स्वर म्हणून स्वरांची काही वेगळी ओळख करता येऊ शकते का? आधुनिक काळात एक मत प्रसिद्ध झाले आहे, स्वरांना स्वतःची अशी ओळख नसते. आपण त्यांच्यावर ओळख लादतो. स्वर म्हणजे थोडक्यात कर्णगोचर ध्वनी, जे मुळात निसर्गात अस्तित्वात असतात. त्या ध्वनींना आपण नियमावलीत बसवले आणि त्याचे शास्त्र निर्माण केले. वरती आपण एक इंग्रजी भाषेतील उतारा विचारात घेतला होता आणि त्यावरून एक निष्कर्ष आपल्या ध्यानात आला होता. कानातून जे ध्वनी आत शिरतात, त्यांचा आपल्या मेंदूवर काही एक परिणाम घडतो आणि मग त्या स्वराची ओळख आपल्याला होते. मुद्दा असा आहे, जे ध्वनी, स्वररूपात मेंदूवर आघात करतात, त्या ध्वनीच्या कंपनीतून, समयाची जाणीव होते का? असे म्हणता येईल का, ध्वनींच्या कंपनांनी आपल्याला प्रति घड्याळाची अनुभूती होते? इथे याच शास्त्रज्ञाने एके ठिकाणी म्हटले आहे, It is possible to have an aesthetic experience without making an aesthetic decision or judgement about stimulus causing that experience. When we do make an aesthetic judgement (consciously or unconsciously), such as when we decide that an object is beautiful, research in neuroaesthetics suggests that areas in the prefrontal regions of the brain are activated. मी लेखाच्या सुरवातीला श्रुती व्यवस्थेबद्दल थोडेफार विवेचन केला आहे आणि त्याचा रागाच्या प्रकृतीशी फार जवळचा संबंध आहे. भारतीय संगीत हे एका स्वरावर स्थिर होते आणि मग पुढील स्वराकडे वळते परंतु असे वळण घेताना, दोन स्वरांच्या मध्ये अनेक ध्वनी अंतर्भूत असतात आणि त्या ध्वनींना "स्पर्श" करून पुढील स्वराकडे कलाकार वळतो. आज बरेचवेळा श्रुती व्यवस्था टीकेचा विषय बनते परंतु जे नैसर्गिक नियम आहेत, ते कलाकारांकडून नेहमीच अनाहूतपणे का होईना पण पाळले जातात. यामुळे परिणाम असा होतो, अशा "आंतर गोचर" ध्वनींमुळे रागाच्या रचनेला विलोभनीय परीणाम प्राप्त होते आणि त्यातूनच मग, भावनेचा अंतर्भाव होऊन, स्वरांना वेगळी ओळख मिळते. रागाचा समय, ही संकल्पना मांडताना आपल्याकडे श्रुती व्यवस्था डोळ्यासमोर ठेऊन, त्यातून जे भावदर्शन दृग्गोचर होते, त्या अनुषंगाने मांडली आहे. अर्थात, इथे परत एकदा भावदर्शन म्हणताना, त्याचा मेंदूच्या चेतना पेशींशी होणारा संकर ध्यानात घेणे आवश्यक ठरते आणि तिथेच मी वर इंग्रजी भाषेतील दोन परिच्छेद लिहिले आहेत, त्याचा(च) संबंध जोडावा लागतो. आधुनिक काळात रागाच्या समयासंबंधी संकल्पना काहीशा ठिसूळ झालेल्या आढळतात आणि याचे मुख्य कारण म्हणजे आपले बदललेले समाज जीवन. एक साधे उदाहरण बघा. गेली काही वर्षे संगीताच्या मैफिलीचा कालावधी हा रात्री १० वाजेपर्यंत मर्यादित केला आहे आणि पूर्वीप्रमाणे "पहाट मैफिली" या केवळ समयोचित, इतपतच मर्यादित स्तरावर होतात. जर का, रागाच्या समयांचे बंधन पाळायचे ठरवले तर, मध्यरात्रीचे राग कायमचे "बाद" होतील, जसे "दरबारी" "अडाणा" "मालकंस" इत्यादी अतिशय महत्वाचे राग. हाच विचार पुढे आणायचा झाल्यास, केवळ प्रसंगोत्पात सकाळच्या मैफिली झाल्यामुळे, सकाळचे राग ऐकण्याच्या संधी दुर्मिळ होत जाणार. दुपारच्या मैफिली तर फारशा होतच नाहीत म्हणजे "सारंग" सारखे राग ऐकायचे कधी? याबाबत दुसरा मुद्दा अतिशय ठामपणे मांडला जातो. जेंव्हा कलाकार तासंतास रेकॉर्डिंग स्टुडियोमध्ये आपल्या सादरीकरणाचे रेकॉर्डिंग करत असतात, तिथे तर सगळाच अंधार असतो किंवा बाहेरच्या जगाशी संबंध तुटलेला असतो. असे असून देखील, काळाचे बंधन न पाळता राग सादर केले जातात, करावेच लागतात. अशा वेळेस, रागसंगीताचा आनंद घेण्याच्या प्रक्रियेत कुठे बाधा येते का? संगीत ऐकणे ही एक मानसिक प्रक्रिया असते आणि मनाच्या जडणघडणीचा, संगीत आस्वादाच्या प्रक्रियेवर बराच परिणाम घडत असतो. अशा परिस्थिती, जर का परंपरागत मतांचा आधार घेतला तर रागाचा समय, या बाबीवर आपला विश्वास बसतो आणि मग बरेचसे सुलभीकरण होत जाते लं समजा, रागावर सांगायचे कसलेही बंधन नाही, असा विचार करायला लागलो तर मात्र कुठला राग सादर करावा/ऐकावा, याबद्दल सगळ्या कल्पना ठिसूळ होत जातात. याबाबत आणखी एक विचार मांडता येईल. रागांचे प्रतिरूप म्हणून आपण "ललित" संगीताकडे बघितले तर, भारतीय ललित संगीतातील आविष्कार हे बहुतांशी रागावर आधारित किंवा त्याच्याशी संलग्न असतात आणि त्यात फार विशेष काहीही नाही. असे जर आपण मान्य केले तर, ललित संगीताचा आस्वाद घ्यायला आपण वेळेचा चुकूनही विचार करत नाही आणि ती गाणी आपण अष्टौप्रहर ऐकत असतो. अर्थात ललित संगीतात, इतर घटक देखील महत्वाचे असतात, जसा भाषेचा वापर, जो राग संगीताच्या दृष्टीने "कामचलाऊ" असतो. परंतु सर्वसाधारण रसिक, ललित संगीत ऐकताना, गाण्याच्या स्वररचनेवर अधिक लक्ष केंद्रित करतात आणि गाणी आपलीशी करतात. असे करताना आपण, समयाचा कसलाच विचार करत नाही. हाच मुद्दा रागसंगीताला लावला तर, हल्लीच्या काळात रागसमयाचा विचार पिछाडीला का पडला याचे उत्तर मिळू शकेल. एक बाब निश्चितपणे मांडायला हवी, ललित संगीतात रागाच्या नियमांची मोडतोड बरेचवेळा केलेली आढळते आणि त्याबाबत ललित संगीताचे निकष वेगळे असतात परंतु केवळ सूरांचाच विचार केला तर वरील म्हणण्यात थोडेफार तथ्य आढळून येईल. रागांच्या समयाबाबत असा वेगळा विचार करण्याची गरज अधिक तीव्रतेने भासायला लागली कारण, सध्याच्या आयुष्यात घडत असणारे प्रचंड बदल. आधुनिक आयुष्य इतके धकाधकीचे बनत चालले आहे की तिथे पूर्वीचे सगळेच बऱ्याच अंशी ढासळत आहे. रागाचे स्वरूप देखील बदलत आहे, काही अंशी आक्रसत आहे, चटपटीतपणा फार आला आहे. पूर्वी, एखाद्या रागात "वर्ज्य" असलेला स्वर घेणे म्हणजे प्रचंड अपराध मनाला जात असे. थोडक्यात रागसंगीताचे शुद्धत्व अबाधित ठेवण्यासाठी, काटेकोरपणा ठेवण्याचा कल असे. आता, बरेचवेळा, "वर्ज्य" सहजपणे अंतर्भूत करून त्या रागाचे "वेगळे" स्वरूप दाखवण्याचा प्रयोग केला जातो. इथे एक बाब ठामपणे मांडायलाच हवी, असे स्वर सामावण्याचा प्रयत्न असला तरी रागाची "मूळ" आकृती जराही बदलली जात नाही!! इथे समजा असा जर सूर निघत असेल की, रागांच्या समयाचे बंधन आता विरून गेले आहे आणि कालौघात त्याची काहीही जरुरी नाही तर ते निश्चित चूक ठरेल. स्वरांना मानवी भावनांची जोड देताना, पूर्वीच्या पंडितांनी बराच विचार तर नक्कीच केला होता. समयाप्रमाणे वर्गीकरण, हा काही अपघात नव्हता, त्यामागे निश्चित विचारसरणी आहे परंतु त्या वर्गीकरणाला कुठंही शास्त्रीय आधार मिळत नाही, ही बाब देखील विचारात घ्यायला हवी. स्वरांच्या आंदोलनांनी मेंदूवर होणाऱ्या आघातांनी भावनांचा उगम होतो, हे तर रोकडे शास्त्रीय सत्य आहे परंतु संगीताची भाषा ही केवळ शास्त्रावर आणि तर्कावर चालत नसते. मानवी मन आणि त्याचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा असतो आणि मानवी मनाचा थांग अजूनपर्यंत तरी कुणाच्याच आवाक्यात आलेला नाही. त्यामुळे संगीताच्या परिभाषेत भावनांना तितकेच महत्व प्राप्त होते आणि इथेच पारंपरिक वर्गीकरणाला महत्व मिळते. मला वाटते, या प्रश्नाचे उत्तर असे एकाच बाजूने विचार करून मिळण्यासारखे नाही. किंबहुना या प्रश्नाचे उत्तर अजिबात सोपे नाही. दोन्ही बाजूंच्या विचाराला तर्काचा आधार तर नक्कीच आहे आणि भावनेची जोड देखील मिळालेली दिसते.

No comments:

Post a Comment