Sunday 6 December 2015

लोकसंगीताचा अर्क - मांड



डिसेंबर मधील राजस्थानातील गारठवणारी रात्र. अवकाशात फक्त चांदण्यांचा प्रकाश, दूर कुठेतरी, कुणीतरी शेकोटी पेटवलेली दिसते परंतु आसमंत सगळाच काळा/निळा. कुठेच कसल्याच हालचालीची जाणीव नाही की आवाज देखील नाही. वाऱ्याने देखील आपले अस्तित्व लपवून ठेवलेले!! एखाद्या निर्वात पोकळीत फक्त स्वत:चेच अस्तित्व असावे, तरीही आजूबाजूला पसरलेल्या मूक वाळूची तितकीच मूक साथ. अशा वेळी वाळवंट देखील आपल्याशी संवाद साधू पहात असते, तसाच मूक संवाद!!  
"अजून नाही जागी राधा,
     अजून नाही जागें गोकुळ;
अशा अवेळी पैलतिरावर 
     आज घुमे कां पावा मंजुळ. 
मावळतीवर चंद्र केशरी;
     पहाटवारा भवती भणभण;
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती 
     तिथेच टाकून अपुले तनमन. 
मराठीतील "कुब्जा" कविता म्हणजे अप्रतिम लेणे आहे. पुराणातील व्यक्तिरेखा घेऊन, त्यांची संपूर्ण ओळख नव्याने करून देण्याची असामान्य ताकद या कैतेने दाखवून दिली. भावकवितेचे सगळे निकष पूर्ण करणारी ही कविता. ही कविता वाचताना, मला "मांड" रागाची आठवण येते. विशेषत: " मावळतीवर चंद्र केशरी, पहाटवारा भवती भणभण;" या ओळीवर तर सारखे थबकायला लावणारी ही कविता आणि तो केशरी चंद्र आणि पहाटवारा, सगळे कसे आपल्याला पुन्हा, पुन्हा वाळवंटाची आठवण करून देणारी. 
"मांड" रागाची मांडणी बघताना, रागात सगळे स्वर शुद्ध लागतात आणि रागाची जाती, ही "संपूर्ण/संपूर्ण" अशी आहे. वेगळ्या शब्दात, या रागात कुठलेच स्वर वर्ज्य नाहीत आणि सगळे स्वर शुद्ध स्वरुपात लागतात. "बिलावल" थाटातील या रागात, वादी/संवादी स्वर - षडज/पंचम आहेत. आपल्या भारतीय संगीतात, "षडज - पंचम" भावाला निरतिशय महत्व आहे. रागाचे समय हा ग्रंथांनुसार रात्रीचा दुसरा प्रहर आहे. परत, परत मला वरील कवितेतील त्याच ओळी इथे आठवतात." मावळतीवर चंद्र केशरी, पहाटवारा भवती भणभण." रागातील प्रमुख स्वरसंहती बघायला गेल्यास, "ग म प ध सा","म प म म ग","सा रे ग सा रे सा". 

प्रथम शास्त्रीय रागदारी गायन आणि नंतर बांसुरी वादन असा अफलातून प्रवास घडला, तो पंडित रोणू मजुमदार, या असामान्य कलाकाराचा. पंडित लक्ष्मण प्रसाद जयपुरवाले यांच्या कडे रागदारी गायनाची दीक्षा आणि नंतर पंडित विजय राघव राव, यांच्याकडे शागिर्दी, याचच  परिणाम,वादनातील विचक्षण दृष्टी आणि सतत अनोखे प्रयोग करण्याची उर्मी. पंडित रोणू मजुमदार यांची कारकीर्द जवळून बघताना, वादनात केवळ पारंपारिक आविष्कार न दिसता, संगीतातील अनेक आविष्कारांचा प्रवास दिसतो. त्यामुळे, त्यांचे वादन अधिक विविधरंगी आणि आकर्षक होते. अर्थात, ही दृष्टी त्यांना, त्यांचेच गुरु, पंडित विजय राघव राव, यांच्याकडून मिळाली, असे म्हणायला वाव आहे.   


प्रस्तुत वादनात, आपल्याला वरील विवेचनाची प्रचीती यायला हरकत नाही. एका बाजूला "गायकी" अंग तर दुसऱ्या बाजूने, प्रयोगशीलता, असे दोन बंध ऐकायला मिळतील. याचा अर्थ असा नव्हे, "गायकी" अंगात प्रयोगशीलता नसते पण, इथे पारंपारिक गायकी अंग ऐकायला मिळते. वादन थोडे "धून" या सदरात घेता येईल. सगळे सूर अगदी स्वच्छ ऐकायला येतात. खरतर, राजस्थानी लोकसंगीतातील धून आहे पण तिला रागदारी स्वरूप दिले आहे. आपल्याकडे, अशा अनेक रागांची "निर्मिती" किंवा त्यांचे "मूळ" हे लोकसंगीतात सापडते आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणून या वादनाचा निर्देश करता येईल. 

वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर वाजणारे संतूर वाद्याचे सुरवातीचे सूर, आपल्याला सांगतात, हा "मांड" राग आहे. वास्तविक आपण वरती या रागाची स्वरावली बघितली तर या रागात सगळे स्वर शुद्ध स्वरूपात लागतात पण, इथे गाण्याच्या सुरवातीलाच "तीव्र मध्यम" आणि "कोमल गंधार" लागलेला दिसतो. याचा वेगळा अर्थ इतकाच घेता येतो, राग तोच आहे पण, त्याला राजस्थानी लोकसंगीताची जोड दिली आहे. राजस्थानी लोकसंगीत जर का थोडे बारकाईने ऐकले तर लगेच ध्यानात येईल, या लोकसंगीतात, सारंगी वाद्याचा उपयोग प्रामुख्याने केलेला असतो. वास्तविक गाण्याच्या चित्रीकरणात वाळवंट आहे पण, रात्रीचा समय, प्रियकराला भेटण्याची अनिवार ओढ, या भावनेचा परिपोष करण्यासाठी, जयदेव यांनी संतूर वाद्याचा फारच परिणामकारक उपयोग केलेला आहे आणि ते करताना, त्या सुरांच्या लयीत, सारंगी देखील किती अप्रतिमरीत्या मिसळली आहे. गाण्याचा ताल, साधा, सरळ असा दादरा आहे पण, गाण्यात घेतलेली प्रत्येक मात्रा आणि त्या मात्रेशी जोडलेली वाद्ये आणि अर्थात लताबाईंचा असामान्य आवाज, या त्रयींनी, ही गाणे अजरामर झाले आहे.  वास्तविक कुठलेही गीत हे १००% परिपूर्णतेच्या कसोटीवर उतरणे, अत्यंत अवघड किंवा जवळपास नाही, असेच म्हणावे लागते. विधान जरा धाडसी आहे पण पूर्ण विचारांती केले आहे. त्याच्या जवळपास, हे गाणे नक्की जाते. गाण्यात, जरा नीट बघितले तर काही "टप्पे" आहेत आणि त्यानुसार गाण्यातली लय बदलते. संगीतकार किती कुशाग्र बुद्धिमत्तेचा असू शकतो, हे समजून घेण्यासाठी, हे गाणे ऐकावे आणि गाण्याची लय जरी बदलली असली तरी समेच्या मात्रेवर येताना,तोच "मूळ" स्वर घेतला जातो. गाणे बुद्धीगामी होते, ते असे. 


गाण्याची चाल, रसिकांच्या मनाची "नाळ" जोडणारी हवी, असा एक मतप्रवाह अनेक वर्षे प्रचलित आहे, विशेषत: गाण्याचा "मुखडा" जितका आकर्षक असेल तितके ते गाणे, रसिकांच्या पसंतीला उतरते. गाण्याचा "मुखडा" आकर्षक असणे, आवश्यक आहे पण त्याच बरोबर त्याच्या नंतरची "बांधणी" देखील तितकीच आकर्षक असणे, अत्यावश्यक असते अन्यथा, सुरवातीला मनावर घडलेला असर, हळूहळू पिछाडीला पडतो आणि गाणे निरस होण्याची शक्यता बळावते. जयदेव यांच्या बहुतेक सगळ्या रचना अनुभवताना, याचे प्रत्यंतर नेहमी येते. प्रस्तुत गाण्यात देखील, सुरवातीला संतूर वाद्याच्या सुरावटीच्या नादात, आपण गुंगून जातो आणि त्या लयीत गुंतलेले असताना, एक क्षण सगळेच थांबते आणि लताबाईंचा तार सप्तकातला आवाज कानावर येतो. इथे बघा, संतूर वाद्याचे स्वर आणि त्यानंतर येणारा, मानवी गळा. थोडी तुलना केली म्हणजे माझे म्हणणे ध्यानात येईल.  
"केसरिया बालमा" ही रचना देखील तशी पारंपारिक रचना आणि असे देखील मांडता येइल. ही रचना म्हणजे राजस्थानी लोकसंगीताचे अर्क किंवा व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल. एकतर, राजस्थानी संस्कृतीत. "केसरिया" आणि त्याच्या जोडीने येणारा "कुसुंबी" रंग, याचे अनन्यसाधारण महत्व आहे. "लेकिन" चित्रपटात, हीच रचना, अधिक पातळ करून घेतली आहे, अर्थात रचनाकार हृदयनाथ मंगेशकर असल्याने, त्यात देखील बऱ्याच ठिकाणी, खास मंगेशकरी "छटा" दिसतात आणि तसे "दिसणे" अत्यावश्यक असते. अन्यथा रचनाकार म्हणून, तुमची सिद्धता, कशी सिद्ध होणार? दादरा तालात, ही रचना आहे. या रचनेबाबत असे देखील म्हणता येईल, "मांड" रागाची ओळख करून घ्यायची झाल्यास, ही रचना अभ्यासायला हरकत, इतकी ही रचना, या रागाशी जुळलेली आहे.   


अशा सारखी रचना गायला, केवळ लताबाईंचाच गळा हवा. गाण्याची सुरवातच, अगदी टिपेच्या सुराने होते. सर्वसाधारणपणे, असे दिसते, कुठलेही गाणे गायचे असेल तर, मंद्र किंवा शुद्ध स्वरी सप्तकातून सुरवात होते आणि आणि हळूहळू स्वर उंचावला जातो. मानवी गळ्याची तशी ठेवण आहे पण गाण्याच्या सुरवातीलाच, तार स्वर लावणे, ही एक प्रकारची सिद्धता आहे आणि ती सगळ्या गायकांना जमतेच असे नाही. गाण्यातील शब्द आणि एकूणच गाण्यातील लय, या दृष्टीने हे गाणे लक्षणीय आहे. 

आता आपण या रागावरील आणखी काही गाणी ऐकुया. 

अब तो है तुम से हर ख़ुशी - अभिमान - एस.डी. बर्मन - लता 

जो मै जानती बिसरत है सैय्या - शबाब - नौशाद - लता 

No comments:

Post a Comment