Thursday 24 September 2015

महिंद्र साउथ आफ्रिका

UB group मधील नोकरीचे "बारा" वाजायला लागल्यावर, नवी नोकरी शोधणे क्रमप्राप्त होते. वास्तविक, या नोकरीत स्थिरस्थावर व्हायची इच्छा होती पण प्रारब्ध वेगळेच होते. Standerton हे गाव, म्हणावे अशा अटकर बांध्याचे आहे. आजूबाजूला कुठलेच शहर नजरेच्या टप्प्यात नाही. जुन, जुलै महिन्यात हाडे गारठवणारी थंडी असल्याने, लोकवस्ती तशी विरळ!! सुदैवाने, माझ्याच ओळखीत, जोहान्सबर्ग इथे एका कंपनीत, नोकरी संदर्भात मुलाखत झाली आणि तिथे नोकरी पक्की झाली.  तेंव्हा,मनात विचार केला, जर का ही नोकरी स्वीकारली तर आपले भारतात जाणे आणखी एक वर्ष तरी पुढे जाईल. म्हणून मग लगेच मुंबईचे तिकीट काढले आणि मुंबईत महिना काढावा, म्हणून निघालो. नव्या नोकरीला होकार दिला होता पण त्यांना, जानेवारीत join करण्याचा वायदा केला आणि मुंबईच्या विमानात पाउल ठेवले. हातात नोकरी असली म्हणजे, तुमच्या वागण्या,बोलण्यात आत्मविश्वास येतो आणि एकूणच सगळे व्यवस्थित होत आहे, असे वाटत रहाते. एव्हाना, विमान प्रवासात वेळ कसा घालवायचा, याचे पक्के गणित मनाशी केलेले असल्याने, विमानात बसलो आणि वाचायला पुस्तक काढले. अचानक मनात विचार आला, मुंबईत जात आहोत तर महिंद्र कंपनीत, आपला खुंटा हलवून बघायचा!! महिंद्र कंपनीने, साऊथ आफ्रिकेत, नव्यानेच व्यवसाय सुरु केला होता आणि तिथे काही संधी मिळते का? अशी चाचपणी करायचे ठरविले. 
सुदैवाने, एक, दोन मित्रांच्या ओळखी निघाल्या आणि त्या जोरावर, वरळी इथल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये, P.N.Shah, या माणसाला भेटायला गेलो. सुदैवाने, लगेच भेट मिळाली आणि वेगळे सुदैव म्हणजे, त्याच सुमारास, साऊथ आफ्रिकेतील, १]विजय नाक्रा, २] हेतल शाह, मुंबईला येणार आहेत, तेंव्हा त्यांच्याशीच पुढील मीटिंग ठरवली. आणि पुढील आठवड्यात, भेट होऊन, नोकरीचे पक्के केले. इतक्या झटापट सगळे झाले की मलाच आश्चर्य वाटले. प्रिटोरिया इथे कंपनीचे मुख्य ऑफिस असल्याने, परत शहरात येण्याचा आनंद काही वेगळाच!! सेंच्युरीयन भागात, कंपनीचे ऑफिस - इथे क्रिकेटचे जगप्रसिद्ध स्टेडीयम आहे. हेतलने, मला भारतात फोन करून, कंपनीत कशी रुजू होणार आहेस, हे विचारले आणि माझी, पुन्हा परत जाण्याची लगबग सुरु झाली. 
पोहोचलो, त्याच दिवशी हेतलने ऑफिसला येण्याचे सुचवले. वास्तविक रात्रभराचा प्रवास अंगावर होता पण, नवी नोकरी आणि तो देखील सेंच्युरीयन भागात, हे आकर्षण असल्याने, तशीच गाडी कंपनीच्या ऑफिसमध्ये नेली. इथे एक बरे असते, तुम्ही जर का नेमका पत्ता हातात ठेवला असेल तर या देशात कुठेही जायला प्रश्न उद्भवत नाही. जर का एखादा Off Ram चुकला तर मात्र जबरदस्त हेलपाटा पडतो, कमीतकमी १५, २० कि.मी.चा फटका बसतो!!  अतिशय सुंदर ऑफिस, त्यामुळे मनाला देखील उल्हसित झाल्यासारखे वाटले. पहिल्या प्रथम, एक बाब आढळली, ऑफिसमध्ये गोऱ्या लोकांचे प्रमाण लक्षणीय होते आणि सगळीकडे लगबग चालू होती. मी पोहोचलो आणि तिथे श्रीधर नावाच्या माणसाने, माझी ओळख करून घेतली. हा, मुंबईतून, हेड ऑफिसमधून बदलून इथे आला होता. अर्थात, इथे येणाऱ्या सगळ्याच भारतीय कंपन्या, आपल्या ओळखीची माणसे, भारतातून, बोलावून घेतात. Inter Company Transfer, या नावाने, त्यांना व्हिसा देखील लगेच मिळतो. त्यावेळी, आमच्या ऑफिसमध्ये, विजय नाक्रा, हेतल शाह, विजय देसाई, महेंद्र भामरे आणि श्रीधर, हे भारतातून इथे आले होते. (आता यापैकी एकही नाही!!) 
आता इथे ऑफिस म्हटल्यावर आसपास घर शोधणे गरजेचे (तोपर्यंत, मी "लोडीयम" इथे एका मित्राच्या घरात रहात होतो)  आणि सुदैवाने लगेच "एको पार्क" या अत्यंत प्रशस्त आणि अवाढव्य संकुलात, मला एक जागा मिळाली. हे संकुल मात्र खरोखरच अवाढव्य आहे. इतकी वर्षे मी देशात काढली पण, मला इतके सुंदर घर आणि जागा, यापूर्वी आणि नंतर देखील मिळाली नाही!! संकुलात, ४ क्लब्ज, ५ स्विमिंग पूल, २ गोल्फ मैदाने आणि अनेक गोष्टी होत्या, जेणेकरून, संकुलाच्या बाहेर जायची फारशी गरज भासू नये. 

पहिल्याच दिवशी, नेहमीप्रमाणे ओळख परेड झाली. ऑफिसमध्ये गोऱ्या लोकांचे लक्षणीय प्रमाण होते. अर्थात, एव्हाना, गोऱ्या लोकांच्या कामाची मला सवय झाली होती. बरेचवेळा तर त्यांच्या बोलण्याच्या धर्तीवर माझे इंग्रजी बोलणे व्हायला लागले होते. हे तर कधी ना कधीतरी होणारच होते म्हणा. सतत, त्या लोकांच्या सहवासात राहिल्यावर कुठला न कुठला तरी गुण, नकळत आत्मसात केला जातो, इतकेच नव्हे तर आफ्रिकान्स भाषा देखील काही प्रमाणात समजायला आणि काहीवेळा बोलण्याच्या ओघात, तोंडातून बाहेर पडायला लागली. आफ्रिकान्स भाषा म्हणजे जुनी डच भाषा!! इथे फार पूर्वीपासून, डच आणि ब्रिटीश लोकांचे वर्चस्व होते. पुढे ब्रिटिशांनी युद्धात, डचांचा पराभव करून, सगळ्या देशावर स्वामित्व मिळवले. तरी देखील, आजही इथे इंग्रजी भाषेच्या जोडीने, आफ्रिकान्स भाषा बोलली जाते. आता तर राष्ट्राची अधिकृत भाषा म्हणून मान्य केली आहे. भाषेचा टोन बघता, जर का बारकाईने ऐकली नाही तर इंग्रजी आणि आफ्रिकान्स भाषेच्या उच्चारात फारसा फरक नाही - "ख" या व्यंजनाचा आफ्रिकान्स भाषेत भरपूर वापर केला जातो. असो!! 
जेम्स,वेंडी, सुझन, लिझा, वेडबर्न इत्यादी अनेक माणसे, दीर्घ काळ माझ्या संपर्कात होती, जेम्स आणि वेंडी, तर अजूनही आहेत. गोऱ्या लोकांचे प्राबल्य म्हटल्यावर, एक बाब अधोरेखित झाली, इथे कामाच्या बाबतीत टंगळ मंगळ नसणार आणि तो विश्वास इथे नेहमीच सार्थ ठरला. अर्थात, एक बाब अजूनही अदृश्य स्वरूपात वावरत असते. गोऱ्या लोकांना, आपल्या कातडीचा प्रचंड, अगदी घमेंड म्हणावी इतका पराकोटीचा अभिमान असतो. मला एकूणच बहुतांशी गोरे लोकं भेटली, त्यांनी अगदी न चुकता, माझा विश्वास सार्थ ठरवला!! एका दृष्टीने विचार केला तर, कामाच्या बाबतीत, चोख काम करण्यात, गोरा समाज, अगदी डोळे मिटून विश्वास ठेवण्या लायकीचा म्हणावा लागेल तर काळा समाज, अपवाद वगळता, अत्यंत कामचुकार!! वास्तविक, आता साऊथ आफ्रिकेत, कायद्याने, वर्णभेद नाहीसा केला आहे पण, तरीही समाजात एक अदृष्य रेघ आहे, तिथे हा फरक जाणवतो. किंबहुना असे देखील म्हणता येईल, अजूनही काळ्या लोकांचा समाज, वर्णभेदाच्या जोखडाखालून मोकळा झालेला नाही!! अर्थात, ही मानसिक गुलामगिरी आहे आणि याचे कारण, वर्षानुवर्षाचे झालेले संस्कार!!   
खरतर,राष्ट्रीय मंत्रिमंडळात, काळ्या लोकांचे प्रमाण लक्षणीय आहे आणि त्यांना आता पुरेसे अधिकार देखील प्राप्त झालेत. पण, ही सुधारणा फार वरवरची आहे. अजूनही इथे मानसिक गुलामगिरी चालूच आहे आणि गंमतीचा भाग म्हणजे, याला बहुतांशी, काळा समाज(च) कारणीभूत आहे. मी, पूर्वी लागोस - नायजेरिया मध्ये दोन वर्षे काढली आणि ऑफिस कामासाठी, काळा माणूस किती "उपयुक्त" आहे, याचा पुरेपूर अनुभव घेतला आहे. अर्थात, नायजेरिया देशातील काळा माणूस आणि साऊथ आफ्रिकेतील काळा माणूस, यात सुतभर देखील फरक नाही. कामाबाबत तसाच उदासवाणा दृष्टीकोन, फटाफट पैसे आणि ते देखील शक्यतो विनासायास पैसे कमावण्याची जबरदस्त इच्छा आणि त्या इच्छेपोटी, कुठल्याही थराला जायची तयारी!! शारीरिक काम जबरदस्त ताकदीने रेटून नेतील पण, बौद्धिक कामाचा प्रश्न आला, की शक्यतो पाय मागे!! 
वास्तविक, आता इथे काळ्या समाजातील लोकांसाठी असंख्य सुविधा आहेत, आर्थिक, सामाजिक इत्यादी सुविधा भरपूर आहेत पण मुळात बौद्धिक कष्ट घेण्याचीच वृत्ती कमी असल्याने, हा समाज, जितका पुढे यायला हवा त्याप्रमाणात, आजही मागासलेला आहे. मी हे मत अतिशय विचारपूर्वक मांडत आहे. आज, इथल्या बँकेत वरिष्ठ पदावर बरेच काळे अधिकारी दिसतात तसेच प्रचंड मोठ्या कंपन्यांच्या वरिष्ठ पदावर देखील काळ्या वर्णाची माणसे दिसतात पण, एकूण समाजाच्या आकारमानाने, हे प्रमाण आजही नगण्य आहे, हे जळजळीत वास्तव आहे. आता, याबाबतीत असे देखील म्हणता येईल, यांना स्वातंत्र्य मिळून, उणीपुरी २२, २३ वर्षेच झाली आहेत (इथली पहिली लोकशाही निवडणूक १९९२ साली झाली) आणि गुलामगिरीचे जिणे, त्यांनी शतकानुशतके झेललेले आहे.ते मानसिक जोखड इतक्या सहजपणे, भिरकावून देणे अवघड आहे. हा मुद्दा जरी मान्य केला तरी, आता स्वातंत्र्यानंतरची दुसरी पिढी इथे आली आहे आणि हे ध्यानात घेता, सुधारणांचा वेग केवळ नगण्य आहे. किंबहुना, काळ्या धंद्यात, हा समाज नको तितका गुंतलेला आहे आणि हा मुद्दा निश्चित चिंताजनक आहे. 
एक सुंदर प्रसंग - माझ्याच बाजूला रेमंड नावाचा एक काळा तरुण कामाला होता. इतर काळ्यांच्या मानाने शिकलेला आणि कामाची आवड असलेला. आता, बाजूला बसत होता, म्हटल्यावर गप्पा मारणे साहजिक होते आणि तशा आमच्या वेगवेगळ्या विषयावर गप्पा व्हायच्या. एकदा, कामाच्या निमित्ताने तो ऑफिसमध्ये फिरत असताना, आमचा C.O.O. वेडबर्नच्या खांद्याला किंचितसा धक्का लागला!! आता असे धक्के, ऑफिसमध्ये लागणे, सहज शक्य असते. इथे एक गोची झाली, वेडबर्नने, धक्का लागल्याबद्दल, रेमंडची माफी मागितली नाही!! झाले!! रेमंडला हा अपमान वाटला आणि "मी केवळ काळा आहे, म्हणून मला अशी वागणूक मिळते" असे अधिकृत पत्र लिहिले आणि जर का "न्याय" मिअल नाही तर पोलिस तक्रार करण्यात येईल, अशी धमकी देखील मांडली होती. या प्रसंगाला, साक्षीदार म्हणून हेतल आणि माझे नाव, त्यात घेतले होते!! वास्तविक, प्रसंग किती किरकोळ होता पण, रेमंडच्या डोक्यात काय भूत शिरले, समजले नाही. अखेर, त्याच्या "बाबा पुता" करून, प्रकरणावर पडदा पाडला. परिणाम एकच, दुसऱ्या दिवसापासून, त्याला जवळपास, "वाळीत" टाकण्यात आले!! कुणीही त्याच्याशी बोलायला देखील तयार नाही!!  
असो, इथे मला "सेटल" होणे अजिबात अवघड गेले नाही. दुसरा भाग म्हणजे, इतकी वर्षे, मी इथल्या मित्रांशी शक्यतो, फोनवरून संपर्क साधित असे आणि आता, प्रत्यक्ष भेटीगाठी सहज शक्य झाल्या. यात, मकरंद, विनय हे माझे जुने मित्र, माझ्या नेहमीच्या भेटीगाठीच्या संपर्कात आले. मकरंद इथे १९९२ पासून असल्याने, त्याचे मित्रवर्तुळ मोठे आणि त्याचा मला बराच फायदा झाला. दर वीक एंड एकत्र घालवायचा असे ठरले आणि त्याप्रमाणे, आम्हाच्या भेटी सुरु झाल्या. प्रिटोरिया आणि जोहान्सबर्ग, यात केवळ ६० कि.मी. इतकेच अंतर,त्यामुळे जोहान्सबर्ग मधील मित्रांशी संपर्क ठेवणे खूपच सुलभ झाले. याच सुमारास, मी दुसरी गाडी घेण्याचे ठरवले आणि परत डेव्हिडच्या जावयाशी संपर्क साधला. यावेळेस, त्याने मला VW कंपनीची "पोलो १.६" ही गाडी मिळवून दिली. एव्हाना, या देशात बऱ्याच गाड्या फिरवून झाल्या, पण या गाडीला तोड नाही!! जर्मन टेक्नोलॉजी म्हणजे काय, याचे ही गाडी म्हणजे मूर्तिमंत उदाहरण. लाल रंगाची गाडी म्हणजे कुणीही प्रेमात पडावे, इतकी सुरेख गाडी होती. पुढे, मी देखील,ही गाडी मनसोक्त फिरवली. 
याच वास्तव्यात, इथे T20 विश्वकप स्पर्धा सुरु झाली आणि आमच्या मित्रांच्या चमूने, ही स्पर्धा मनसोक्त उपभोगली. मकरंदची, त्यावेळच्या लालचंद राजपूत बरोबर मैत्रीपूर्ण संबंध होते आणि त्यामुळे, त्याच्याकडून आम्हाला, free passes मिळायचे. इथल्या स्टेडीयम मध्ये जावे आणि भारताने, अजिंक्यपद मिळवावे, असली वेडी आशा इथे पूर्ण झाली. अंतिम सामना - भारत/पाकिस्तान यांच्यात झाला आणि अति अतितटीची झुंज, अखेर भारताने जिंकली!! त्यावेळचा स्टेडीयम मधील आरडा-ओरडा, बक्षीस समारंभ, हातात असलेल्या बियरची अवर्णनीय चव, या आठवणी मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. विश्वविजयाची चव, आम्हा मित्रांच्या चमूने, स्टेडीयम शेजारील पब मध्ये, रात्रभर जागून साजरा केला. केवळ अविश्वसनीय विजय.
ऑफिसमध्ये त्यामानाने लवकर स्थिरस्थावर झालो. आमच्या कंपनीचा व्यवसाय, भारतातून "रेडीमेड" गाड्या मागवणे - सोबत स्पेअर पार्टस देखील आणि त्यांचे देशभर वितरण करणे. खरेतर इथे इतक्या प्रकारच्या गाड्या उपलब्ध आहेत, तेंव्हा महिंद्र कंपनीने म्हटले तर धाडस केले. अर्थात, गाड्यांची किंमत, हा वाजवी मुद्दा असल्याने, आमचा भर त्यावरच अधिक. या ऑफिसची स्वत:ची अशी कार्यशैली होती आणि ती मी लगेच अंगवळणी करून घेतली. आमच्या ऑफिसमध्ये दर महिन्याला, शेवटच्या शुक्रवारी, पार्टी असायची आणि ती शक्यतो ऑफिसमध्येच असायची. त्या दिवशी ऑफिस दुपारी ४. वाजता बंद. गोरा माणूस, काय सज्जड ड्रिंक्स घेतो, याचा अप्रतिम नमुना या पार्टीत सतत मिळत गेला. ऑफिसमधील मुली देखील ड्रिंक्स घेत असत. अर्थात, प्रमाण हात राखून. 
त्यावर्षी, कंपनीने, राष्ट्रीय पातळीवर, सगळ्या एजंट्सची वार्षिक बैठक, दोन दिवसांची ठरवली. फायनान्स मधून, मी आणि हेतल हजार राहणार होतो. बैठकीचा इतका तपशीलवार विचार आणि नोंदी बघून, आपल्याला "प्रोफेशनल" व्हायला किती अवकाश आहे, याची नव्याने जाणीव झाली. बैठकीच्या प्रत्येक मिनिटांचा चोख हिशेब, आणि त्याबर सगळे नेमकेपणी घडवून आणण्याची तोशीस. चहापान, दुपारचे जेवण, संध्याकाळी, सत्रे कधी आणि कशी संपतील, याचा अचूक आराखडा, बैठक व्हायच्या आधी, आठवडाभर आमच्या हातात. कुठेही कसलाही हलगर्जीपणा नाही की गोंधळ नाही. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील अत्यंत मुद्देसूद मिळायची. कणभर देखील फापट पसारा नाही. एकदा का संध्याकाळ झाली, म्हणजे गोरा माणूस रंगायला लागतो. त्यावेळचा गोरा माणूस, हा दिवसभराच्या कार्यक्रमात दिसणाऱ्या माणसापेक्षा संपूर्ण वेगळा. 
एक गंमत. फेब्रुवारी महिना (इथे फायनांशियल वर्ष फेब्रुवारी महिना असतो)  जवळ आला की, अकाउंटस विभागात, वार्षिक गडबड सुरु होणे, क्रमप्राप्त असते. आपल्या भारतीय पद्धतीप्रमाणे, आता रोज, ऑफिसमध्ये उशिरा बसणे, नेहमीचे असते. एका शुक्रवारी, मी जेम्सला, उशिरा बसण्याची विनंती केली आणि त्याची खरच जरुरी होती. माझे बोलणे ऐकून घेतल्यावर, अत्यंत थंड आवाजात," Anil, I got family at home and it's my family time!! I can't work after office hours!!". ऐकल्यावर, अनिल थंड!! इथे अशी बळजबरी कुणावरही करता येत नाही. ऑफिस वेळेत, काहीही काम सांगा, तिथे कुचराई नाही पण, एकदा का, संध्याकाळचे ४.३० वाजले, म्हणजे मग तिथला गोरा हा स्वतंत्र असतो, कंपनीशी काहीही देणेघेणे नसते!! समजा, उशिरा बसला तर कंपनीवर जणू उपकार केले, याच भावनेने (हे क्वचित घडते) काम करणार आणि त्याचा मोबदला, नेमका वसूल करणार आणि त्याहून महत्वाचे म्हणजे, "मी त्यावेळी उशिरा बसलो होतो", याची तुम्हाला सतत जाणीव करून देणार!! 
समजा, कंपनीचे बाहेरचे काही काम असेल तर, गोरा माणूस, आपली गाडी चुकूनही काढणार नाही. त्यामुळे प्रत्येक कंपनीला, स्वत:च्या अशा वेगळ्या गाड्या ठेवणे भाग असते. उं उलट, काही बँकेची कामे असतील आणि त्या साठी काळा माणूस पाठवला तर, तो काहीही करून, ते काम करून देईल. हा फार मोठा फरक, या दोन समाज प्रवृत्तीत आहे. गोरा माणूस अतिशय materialistic असतो आणि तिथे "माझी कंपनी" असली भावनिक गुंतवणूक अजिबात नसते. कंपनीचे काम, मनापासून करतील पण ती गुंतवणूक, केवळ कंपनी वेळेपुरती. पुढे, माझ्या घरी काय किंवा, इतर गोऱ्या लोकांच्या घरी जाण्याचा प्रसंग आला, प्रत्येकवेळी हाच अनुभव आला.  
याच सुमारास, इथल्या मराठी मंडळ आणि तिथल्या लोकांची ओळख झाली. खरेतर, इथले मराठी मंडळ, हे प्रामुख्याने, जोहान्सबर्ग आणि प्रिटोरिया, या दोन शहरांपुरते आहे. इतर शहरांत, त्यामानाने फारशी भारतीय माणसे आढळत नाहीत. याचे मुख्य कारण, जी माणसे भारतातून इथे येतात, ती प्रामुख्याने, Inter Company Transfer व्हिसावर येतात आणि त्यांची कार्यालये, ही बहुतांशी याच दोन शहरात असतात. मुळात, इथे भारतातून येण्याचे प्रमाण, अगदी  २००० सालापर्यंत, जवळपास नगण्य होते. हळूहळू, भारतीय कंपन्यांनी इथे व्यवसाय केंद्रे उघडली, निरनिराळ्या बँकांची ऑफिसेस उघडली आणि इथे भारतीय माणसे यायला लागली. त्यामुळे, तसे म्हटले तर इथले मराठी मंडळ हे तसे नाममात्र(च) आहे (आजही यात फारसा फरक नाही). त्यातही, बहुतेक मराठी माणसांना, इथे आलो म्हणजे आपण युरोप/अमेरिकेत आलो, असेच वाटायला लागते!! याचा परिणाम असा झाला, त्यांना मराठी बोलण्याची "लाज" वाटायला लागली!! आपलीच भाषा पण, बोलायला देखील अवघड!! कारण विचारले तर, आमचे इंग्रजी भाषेत शिक्षण झाले, त्यामुळे मराठीशी संपर्क कमी राहिला!! अशीच काहीशी थातूर मातुर कारणे द्यायची. त्यामुळे, मंडळाचे जी काही तुरळक कार्यक्रम व्हायचे, त्यात मंडळाची कार्यकारिणी मंडळी वगळता, इतर लोकांची उपस्थिती नेहमीच तुरळक राहिली!! मी ही तुलना, विशेषत: नायजेरिया - लागोस इथल्या मराठी मंडळाशी केली आहे. मला आजही  आश्चर्य वाटत आले आहे, मराठी आपली मातृभाषा आहे,  असे असून देखील ती भाषा बोलायला "जड" जाते!! आपल्या भाषेचे संवर्धन आपण  करायचे नाही तर कुणी करायचे?  इथे, ना कुणाला खेद, ना कुणाला खंत!! मी इथे दोन वर्षे होतो आणि दोन वर्षात इथे काही ठराविक कार्यक्रम झाले आणि एकही कार्यक्रम, अपवाद म्हणून भरपूर गर्दीचा झाला!! 
तसे प्रिटोरिया शहर हे राजधानीचे शहर. इथे पार्लमेंट इमारत आणि सभागृह आहे. वर्णभेदाची चळवळ इथे फोफावली आणि इथेच नेल्सन मंडेलाचा शपथविधी झाला. याच शहरात, मी आयुष्यातील पहिला "सिंफनी ऑर्केस्ट्रा" अनुभवला आणि तो थरार आजही मनावर कोरलेला  आहे. इथले म्युझियम बघण्यासारखे आहे, वर्णभेद किती भयानक होता, याची साक्ष इथे बघायला मिळते. परंतु ते प्रसंग अंगावर येतात, ते केप टाऊन इथल्या रॉबेन आयलंड इथल्या तुरुंगात!! तो भाग तर फारच विलक्षण आहे. इतर शहरांप्रमाणे इथे देखील प्रचंड मॉल्स आहेत, ऐषारामी हॉटेल्स आहेत, ऐय्याशी क्लब्ज आहेत. अर्थात हे सगळे पैशाचे खेळ आणि याचबरोबर येणारी असुरक्षितता देखील विपुल आहे. जोहान्सबर्ग आणि प्रिटोरिया, ही दोन्ही शहरे, सुरक्षिततेच्या दृष्टीने भयानक आहेत. केवळ संध्याकाळ उजाडल्यावर नव्हे तर  दिवसाढवळ्या देखील,पायी हिंडणे अवघड झाले आहे. एकेकाळी, अमेरिकन कादंबऱ्या मधून,"मगिंग"ची वर्णने वाचली  होती,त्याचे तंतोतंत प्रत्यंतर इथे अनुभवायला मिळते.  
 आताच अनेक भारतीय वंशाची माणसे बोलायला लागली आहेत, " Racism was okay, just because crime rate was minimal". हे तिथल्या सामाजिक परिस्थितीचे द्योतक आहे. हळूहळू आर्थिक संकटे कोसळायला लागली आहेत आणि सर्वात भयानक म्हणजे आर्थिक विषमतेची दरी वाढत चाललेली आहे. आजही हा देश अप्रतिम सुबत्तेचा आहे, इथे भौतिक सुखाच्या अपरिमित संधी आहेत आणि आयुष्य कसे उपभोगावे, हे इथे समजून घेता येते. प्रश्न असा आहे, हे ऐश्वर्य आणखी किती वर्षे अबाधित राहील?

No comments:

Post a Comment