Thursday 4 September 2014

श्रीनिवास खळे-चिरंजीव संगीतकार!!

तसे पहिले गेल्यास, संगीतकार बरेच झाले आणि पुढे होताच राहतील. पण, आयुष्यभर आपल्या तत्वांशी जराही तडजोड न करता, आपल्याशीच प्रामाणिक राहणारे आणि आपल्या मतांशी घट्ट चिकटून राहणारे संगीतकार फारच थोडे आढळतात. प्रत्येक संगीतकाराची स्वत:ची अशी एक शैली असते. आयुष्याची  सुरवात करताना, ती शैली दृग्गोचर होते पण पुढील वाटचालीत त्याच्या शैलीत, रचनेत बदल होत जातो - कधी चांगला तर कधी रूढ लोकप्रिय रस्त्याच्या वाटेने जाणारा. त्यामुळे, बरेच वेळा, जेंव्हा त्या संगीतकाराची रचना बघायला गेलो तर, बरेच वेळा निराशाच पदरी पडते. वास्तविक पाहता, तीन मिनिटांच्या गाण्यात, प्रयोगशीलता तशी फार अवघड बाब असते. चालीचा आकृतीबंध आणि त्या अनुरोधाने केलेली वाद्यमेळाची रचना ,इथेच संगीतकाराची खरी चमक दिसून येते. तीन मिनिटांच्या गाण्यात, प्रत्येक सेकंद हा फार मौल्यवान असतो आणि तो त्या रचनेशी सतत गुंतलेला असतो.
अशा सगळ्या वैशिष्ठ्यांचा समन्वय श्रीनिवास खळे यांच्या रचनेत वारंवार आढळून येतो. अगदी, १९४० सालापासून सुरवात केली, जी.एन. जोश्यांपासून, मराठीत भावगीत हा सुगम संगीताचा प्रवास सुरु झाला आणि तेंव्हाच्या रचना बघितल्यातर आपल्या लगेच लक्षात येईल की, तेंव्हा पासूनच्या रचनांवर, मास्तर कृष्णराव यांचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो तसेच मराठी नाट्यसंगीताचा प्रभाव देखील. आणि हा प्रभाव, जवळपास वीस वर्षे तरी सतत दृश्यपणे किंवा अदृश्यपणे आढळत होता.
या प्रभावापासून दूर पण स्वत:ची स्वतंत्र शैली तयार करण्यात ज्या संगीतकारांना यश मिळाले, त्यात श्रीनिवास खळे यांचा फार वरचा नंबर लागेल. या माणसाने, आयुष्यात स्वत:च्या शैलीशी तर कधीच तडजोड केली नाही पण, नेहमीच स्वत:च्या मर्जीनुसार चाली बांधल्या. खळ्यांच्या चाली या अतिशय गोड असतात, असे म्हणणे फार अर्धवट ठरेल. "शुक्रतारा तारा" हे गाणे नि:संशय गोड आहे पण जर का आपण हे गाणे जरा बारकाईने ऐकले तर असे सहजपणे लक्षात येईल की, या गाण्यात गायला गेलेला प्रत्येक शब्द हा त्या आशयाशी अतिशय तलमपणे सुसंवाद राखत आहे. याच गाण्यातील, "लाजऱ्या माझ्या फुला रे" हीं ओळ ऐकावी. किती संथपणे आणि लयीशी एकरूप झालेली दिसेल. प्रणयाचे अत्यंत मुग्ध चित्र या कवितेत आहे आणि तोच भाव अतिशय संयतपणे संगीतकाराने साकारलेला आहे. अर्थात, "शुक्रतारा" हीं केवळ एक रचना झाली, अशा कितीतरी रचना वानगीदाखल दाखवता येतील की ज्या माझ्या वरील विधानाला पुरावा म्हणून दाखवता येतील.
खर तर, खळ्यांच्या चाली या गायकी ढंगाच्या असतात, जिथे गायकाच्या गळ्याची खऱ्या अर्थाने सत्वपरीक्षा असते. त्यांचे गाणे ऐकताना फार सुंदर आणि सहज वाटते पण जर का प्रत्यक्षात गायला घेतले की त्यातील खाचखळगे दिसायला लागतात. मुळात, या संगीतकाराने कधीही, वाचली कविता-लावली चाल, असा सरधोपट रस्ता कधीही अंगिकारला नाही. प्रत्येक कविता हीं काव्य म्हणून दर्जेदार असणे , हीं आवश्यक अट मानली. त्यामुळे, त्यांची गाणी ऐकताना, ती एक कविता म्हणूनदेखील वेगळ्या पद्धतीने आकलन करता येते. अर्थात, याचे श्रेय, तुकाराम, मंगेश पाडगावकर इत्यादी कवींकडे जाते पण या कवींनी लिहिलेली प्रतिभासंपन्न रचना तितक्याच आर्तपणे सादर करण्याची ताकद खळे यांची!! अर्थात, सगळीच गाणी, कविता म्हणून चांगली, असे नव्हे. काही, काही गाणी डागाळलेली देखील आहेत तसेच काही चाली देखील. "कंठातच रुतल्या ताना" सारखे गाणे खळ्यांनी द्यावे, याचे थोडे नवल वाटते. अन्यथा "सहज सख्या एकदाच येई सांजवेळी" सारखे नितांत रमणीय आणि संयत शृंगाराचे गाणे, हेच या संगीतकाराची खरी शैली, असे म्हणावेसे वाटते. 

खळ्यांच्या चाली फार संथ असतात हे खरेच आहे पण त्या लयीला अतिशय अवघड असतात. गायकाची खरी परीक्षा पाहणाऱ्या असतात. काही काही ठिकाणी तर, लय इतकी अवघड असते की ती साध्यासुध्या गळ्याला अजिबात पेलणारी नसते. "भेटीलागी जीवा" हा अभंग तर, पहिल्या स्वरापासून अवघड लयीत सुरु होतो त्यामुळे ऐकतानाच आपल्याला कळून चुकते की, हे गाणे आपल्या गळ्याच्या कुवतीच्या बाहेरचे आहे. पण, "नीज माझ्या नंदलाला" हे गाणे, सुरवातीला अति ठाय लयीत सुरु होते आणि मध्येच पहिल्या अंत-यानंतर लय फार वरच्या पट्टीत जाते आणि परत दुसऱ्या ओळीला, मूळ लय मिळते!! त्यामुळे ही रचना गायला फार अवघड होऊन जाते.
तसेच "या चिमण्यांनो" या प्रसिद्ध गाण्याचे उदाहरण घेता येईल. "पुरिया धनाश्री" रागात पहिली ओळ आहे तर दुसरी ओळ, "मारवा" रागात बांधलेली आहे. ज्यांना, रागदारी संगीताचे "अंग" आहे, त्यांना लगेच यातील नेमका फरक कळून चुकेल. खळ्यांची चाल अवघड असते म्हणजे काय, या साठी या गाण्याचे थोडे विश्लेषण करूया. 
"या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या; 
जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या " 
आता जरा बारकाईने ऐकले तर, पहिली ओळ पुरिया धनाश्री रागात आहे तर दुसरी ओळ मारवा रागात. परंतु जर का दोन्ही रागांचे चलन पाहिले तर असे दिसेल, या चालीत, दोन्ही रागांच्या "सावल्या" तरळत आहेत. आता लयीचा भाग बघूया. पहिल्या ओळीतील "फिरा" शब्दातील "रा" शब्दावरून "रे" शब्दावर येताना, मध्ये किंचितसा "विराम" आहे आणि मग तिथे अति हळवा असा "कोमल निषाद" आहे!! "फिरा" या शब्दावरून, "रे" शब्दावर येताना जी लय आहे, ती फार गुंतागुंतीची आहे आणि तिथे गाण्याचे "अवघडलेपण" सिद्ध होते. तो जो विराम आहे, तो इतका जीवघेणा आहे की शब्दात मांडणे अजिबात जमत नाही आणि आपण मनोमन श्रीनिवास खळ्यांना दाद देण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नाही.  
खळे हे कधीही भरमसाट वाद्यांचा वापर करीत नाहीत, बहुतेकवेळा व्हायोलीन सारख्या वाद्यावरच रचना पेलली जाते. कधी बासरीचा अवघड तुकडा आणि अति संथ अशी तबल्याची साथ, यातूनच गाणे सुरु होते. त्यांनी कधी वाद्यातून नवीन प्रयोग करण्याचा हव्यास धरला नाही तर, वेगवेगळे लयीचे बंध शोधून, त्यानुरूप रचना तयार केल्या. कवितेला नेहमीच अग्रक्रम देण्याचा त्यांचा आग्रह असतो व त्याचे महत्वाचे कारण म्हणजे, काव्यावर असलेली अव्याभिचारी निष्ठा!! त्यामुळेच त्यांची गाणी, कविता म्हणूनदेखील फार अर्थपूर्ण असतात.
मागे एकदा, संगीतकार यशवंत देव यांनी, गाण्याचे त्यांचे स्वत:चे असे एक मर्म सांगितले होते. ते म्हणतात, "गाण्याची चाल हीं कवितेतच दडलेली असते. आम्ही, फक्त ती शोधून काढतो!!" पण, यावरूनच काव्य हा गाण्याचा किती महत्वाचा घटक असतो, हेच अधोरेखित होते. खळे यांच्या चालीत हाच अर्थ अमूर्तपणे आढळत असतो.
खळ्यांनी फक्त भावगीते दिली हीं अर्धवट माहिती झाली. "जय जय महाराष्ट्र माझा" सारखे वीरश्रीयुक्त गाणे खळ्यांनी दिले आहे, हे मुद्दामून सांगावे लागते तर, "कळीदार कर्पुरी पान" सारखी खानदानी बैठकीची लावणी सादर केली आहे. बैठकीची लावणीवरून एक किस्सा लिहितो. साधारपणे, बावीस वर्षांपूर्वी, एन.सी.पी.ए. मध्ये, आपले पु.ल.देशपांडे आणि अशोक रानडे यांनी "बैठकीची लावणी" म्हणून एक दृष्ट लागण्यासारखा कार्यक्रम सादर केला होता. एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसे करावे, याचा अत्यंत आदर्श वस्तुपाठ होता. रंजकतेच्या दृष्टीकोनातून, पु,लं,चे संचालन आणि अभ्यासक दृष्टीकोनातून अशोक रानड्यांचे संचालन, हा सगळा, दोन तंबोरे जुळून यावेत, त्याप्रमाणे जुळून आले होते. तेंव्हा, अशोक रानड्यांनी एक सूत्रबद्ध विवेचन केले होते. ते म्हणाले," बैठकीची लावणी, हीं उत्तर भारताच्या ठुमरीला महाराष्ट्राने दिलेले उत्तर आहे". सुरवातीला, मला याचा फारसा अदमास आला नाही पण नंतर जेंव्हा या वाक्याचा मी स्वतंत्रपणे विचार करू लागलो तेंव्हा त्या वाक्यातील अर्थ ध्यानात यायला लागला. "कळीदार कर्पुरी पान" हीं लावणी ऐकताना याचे नेमके प्रत्यंतर येते. ठुमरीतील लाडिक आणि आव्हानात्मक शृंगार आणि त्याचबरोबर जाणवणारी संयत भाववृत्ती याचे नेमके फार विलोभनीय दर्शन, या लावणीतून दिसून येते.
खळे नेहमी म्हणतात, "माझी गाणी, कमीत कमी पन्नास वर्षे तरी टिकली पाहिजेत" आणि याच जिद्दीने ते गाणी तयार करतात. आज, १९६५ साली, त्यांचे "शुक्रतारा मंदवारा" हे गाणे सादर झाले आणि आता या गाण्याला पन्नास वर्षे होत आली आणि आजही हे गाणे रसिकांच्या स्मरणात आहे. खळ्यांनी या संदर्भात, कधीही आपल्या मतांशी तडजोड केली नाही. त्यामुळेच त्यांना लायकीपेक्षा फार कमी चित्रपट मिळाले. त्यांच्या बाबतीत एक मत नेहमी ऐकायला मिळते व ते म्हणजे,"खळ्यांच्या चाली या कवितेसारख्या असतात"!! आता हे दूषण आहे का कौतुक आहे, याची मला कल्पना नाही, मुळात हे वाक्यच अति खुळचट आहे. चाली कवितेसारख्या असतात म्हणजे काय? वास्तविक प्रत्येक गाणे हे शब्दांवरच आधारलेले असते आणि हीं वस्तुस्थिती असताना, कविता हीं काही अशी गोष्ट आहे का की जी गाण्यापेक्षा फार वेगळी असते!! कविता हीं कविताच असते. काही कविता गाण्यायोग्य असतात, त्याच्यात अंगभूत लय दडलेली असते. उदाहरणार्थ, भा रा, तांबे, बा.भ. बोरकर, मंगेश पाडगावकर किंवा सुरेश भट, यांच्या कविता या बहुश: अत्यंत लयबद्ध असतात की ज्या संगीतकाराला चाल बांधण्यास उद्युक्त करतात तर काही कविता या सुरांपासून फार वेगळ्या असतात. अर्थात, त्या कवितेतदेखील एक आंतरिक लय हीं असतेच, उदाहरणार्थ, पु.शि.रेगे, इंदिरा संत, विं.दा.करंदीकर किंवा मर्ढेकर इत्यादी. यांच्या कवितेत वाचताना, एक लय जाणवत असते की जी त्या कवितेच्या आशयाशी सुसंवाद साधणारी असते. फक्त त्यांना सुरांचा भार सहन होण्यासारखा नसतो, इतकेच. तेंव्हा, चाल कवितेसारखी असते, या वाक्याला तसा काही अर्थ नाही.
खळ्यांच्या चाली गायला अवघड असतात, हे मान्य व्हायला काहीच हरकत नाही. प्रत्येक संगीतकाराचा स्वत:चा असा एक पिंड असतो व त्यानुरुपच त्याची कला सादर होत असते. वसंत प्रभू, वसंत देसाई, सुधीर फडके किंवा वसंत पवार याच्या चाली, अपवाद वगळता, सहज गुणगुणता येतात तर, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर यांच्या चाली लयीला अवघड असतात. गाण्यात अशी प्रतवारी करणे खरे तर फार चुकीचेच ठरेल.गाणे हे मुळात गाणेच असते आणि संगीतकाराने लावलेली चाल, शब्दाच्या आशयाशी किती संवादी आहे, ती चाल उठून दिसावी म्हणून, वापरलेला वाद्यमेळ किती सुसंवादित्व राखणारा आहे, इत्यादी बाबी लक्षात ठेऊन, प्रतवारी ठरविणे महत्वाचे आहे. 
संध्याकाळ होत असते, घरात दिवा लागलेला असतो आणि बाहेर अंधाराचे साम्राज्य पसरत असते. घरातली वयस्कर मंडळी विक्लान्तपणे परतलेली असता. फक्त, घरातील चिमण्या मुलांचा पत्ता नसतो आणि, मग लताच्या दिव्य आवाजात, "या चिमण्यांनो परत फिरा" या गाण्याचे सूर कानावर येतात आणि तीच संध्याकाळ फार विषण्ण वाटायला लागते.

No comments:

Post a Comment