Saturday 12 January 2013

पुरिया धनाश्री-संधिप्रकाश!!

भारतीय संगीतात, "रागसंगीत' हि एक अपूर्व चीज आहे कि ज्या स्वररचनेला जागतिक संगीतात तोड नाही. पाश्चात्य शास्त्रीय संगीतात, आपल्यासारखेच ७ स्वर असतात. पण, "सिम्फोनी" हीं अत्यंत बांधीव स्वर रचना असते, त्यात, वैय्यक्तिक विचारला फारसे स्थान नसते. "बीथोवन, मोझार्ट" यांच्या रचना असामान्य खर्याच आणि सादर करणे, हे अति कौशल्याचे काम आहे. पण, आपल्या रागदारीत जसा, वैय्यक्तिक विचार, याला, जास्त प्राधान्य साते आणि ती "मिंड", "गमक" या अलंकारांनी अवगुंठीत असते. त्यामुळेच, आपले रागसंगीत, संपूर्णपणे, स्वरलेखनाच्या परिभाषेत ठामपणे लिहिता येत नाही. प्रत्येक कलाकाराची  प्रतिभा, त्या रागाचे तेच स्वर, अत्यंत वेगळ्या मांडणीतून सादर करीत असतो आणि आपण, ऐकणारे स्तिमित होत असतो. याचे संपूर्ण श्रेय, आपल्या पूर्वीच्या ऋषी-मुनींकडे जाते. इ.स.च्या हजारो वर्षे मागे जाताना, आज उपलब्ध असलेल्या ग्रंथांचा मागोवा घेतला असता, भरत मुनिना या शोधाच्या अग्रपूजेचा मान  जातो, कि ज्या वेळेस ग्रीक संगीत जन्माला देखील आले नव्हते!! भारत मुनींनी, जे स्वर संशोधन आणि स्वरांतील श्रुती मांडणी केली आहे, तिला आज देखील तोड नाही. आज, आपल्याकडे शास्त्रीय उपकरणांद्वारे या स्वरांच्या रचनेचाप्रत्यय घेता येतो, तोच प्रत्यय, त्य काळी, हीं उपकरणे उपलब्ध  नसताना देखील केवळ कानाद्वारे स्वर संशोधन, केले याचा आपल्याला निश्चितच अभिमान वाटला पाहिजे. श्रुती व्यवस्था समजून घेणे फार अवघड आणि किचकट काम आहे आणि त्यातून संस्कृत भाषेचा तितकाच व्यासंग असायला हवा. आज, पहिले गेल्यास, त्यानंतर, शेकडो ग्रंथ या विषयावर लिहिले गेले, अगदी, एकोणिसाव्या शतकात, भातखंडे, आचरेकर आणि, अशोक रानडे, यांच्यापर्यंत, लिखाण अतिशय विस्तृतपणे झाले असले तरी, श्रुतीव्यवस्था हा विषय पूर्णपणे, आत्मसात झाला आहे, असे म्हणवत नाही. असो, हा विषय ४,५ वाक्यात संपणारा नसून, त्याचा आवाका फार प्रदीर्घ आहे.
तेंव्हा, आता आपला, "पुरिया धनश्री"!! वास्तविक पाहता, भारतीय संगीतातील संकेताप्रमाणे हा राग संध्याकाळचा मानला जातो. वास्तविक, या रागाचे वर्णन "रागिणी" असे करावे लागेल. आपल्याकडे, असे बरेच संकेत प्रचलित आहेत आणि त्यानुरूप राग सादर केले जातात. दिवसभराच्या उन्हाच्या झळा शांताविल्यानंतरच्या  काळात, हीं रागिणी फार प्रभावी वाटते. तसे पहिले गेल्यास, संध्यासमयी, अनेक राग-रागिण्या प्रचलित आहेत. उदाहरणार्थ "यमन कल्याण, श्री, मारवा, पुरिया" इत्यादी. शास्त्रानुसार, यमन कल्याण, श्री, मारवा आणि पुरिया धनाश्री हे राग एकाच कुटुंबातले आहेत.पसन, ज्सरी एकाच कुटुंबातले असले तरी, प्रत्येकाचा स्वभाव फार वेगळा आहे. यमन कल्याणात, ईश्वर समर्पण वृत्ती जास्त आढळते तर, श्री, मारवा ह्या रागात, आर्त विरही वृत्ती आढळते. गंमत म्हणजे, या तिन्ही रागांतील, हाही अंश, पुरिया धनाश्रीत आढळतात. मला तर, नेहमीच मारवा ऐकताना, एखादी जिवंत ठसठसलेली जखम वाहत असल्याचा भास होतो. इतका, वेदनेचा उग्र अनुभव पुरिया धनाश्रीत येत नसला तरी, संध्यासमयीची आर्त हुरहूर आणि त्याचबरोबर, प्रणयोत्सुक विरहिणीची व्यथा नेमकेपणाने व्यक्त केली जाते. संध्याकाळी, एखादी नवथर तरुणी, आपल्या प्रियकराला संकेतस्थळी भेटण्यास आतुर होत असताना, आपल्याला, तसाच प्रतिसाद मिळेल न, या विवंचनेतून आकाराला आलेली भावना, या रागिणीत फार समर्थपणे दिसून येते. पुरिया राग हा तसा या रागीनीच्या जवळ जात असला तरी, पुरिया हा जास्त करून भैरवी जवळ फार जातो, कि त्यात, "आता सारे संपत येत आहे," अशी एकतर साफल्याची किंवा हताशतेची  भावना अधिक दृग्गोचर होते. पुरिया धनाश्रीत, इतकी विवशता आढळत नाही. 
सूर्यास्त होत असताना, गाभाऱ्यावर वस्त्र पडत जावे त्याप्रमाणे, अवकाशात तिमिराचे राज्य हळूहळू सुरु होत असताना, दूर क्षितिजावर, रंगांची उधळण होत असते. फक्त गुलाबी रंगात, निळ्या रंगाचा गडदपणा मिसळत असतो. अशा वेळेस, जाणवणारी, कालिदासाच्या भाषेत सांगायचे झाल्यास, "पर्युत्सुक" अवस्थेत, एखादी नवथर तरुणी, आपल्या प्रियकराची आतुरतेने वात पाहत असताना, होणारी धडधड, पुरिया धनाश्रीमध्ये फार अप्रतिमरीत्या उमटते. थोड्या, काव्यात्मक भाषेत बोलायचे झाल्यास, बालकवींच्या, "औदुंबर" कवितेतील, येणारा, "गोड काळिमा" या रागीणीशी फार जवळचे नाते दर्शवून जातो.
ज्ञानेश्वरांनी निर्मिलेला  "दु;ख कालिंदी" या जाणिवेशी अधिक तरलतेने, हीं रागिणी आपले नाते सांगते. आणि इतके लिहूनही, पाडगावकरांच्या ओळीत म्हटल्याप्रमाणे, "शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले" हीं तर भावना  मुळाशी सतत वास करताच असते. खर तर, कुठलाही राग/रागिणी हीं नेहमीच आपल्याला कैवल्यात्मक दर्शनातून, शब्दांच्या पलीकडल्या भावनेशी आपले नाते जोडीत असते, आणि हीं गोष्ट अधिक चांगल्याप्रकारे, पुरिया धनाश्रीमध्ये दृग्गोचर होते.
वास्तविक पहिले तर, यमन रागाशी, या रागीनीचे फार जवलेचे नाते सांगता येते पण, यमन रागाचा विस्तार हा, आपल्या हातांच्या कवेत न मावता येणाऱ्या अवाढव्य झाडाच्या बुन्ध्याप्रमाणे आहे. त्यामाणे, या रागिणीचा विस्तार अतिशय अटकर अंड सुडौल आहे. इथे, या रागिणीचे स्वरलेखन करून, पांडित्याचा आव आणण्याची काहीच गरज नाही तरी देखील, "कोमल निषाद" हा, या रागिणीचा एक अलौकिक नजराणा आहे. खरतर, कुठलीही स्वरलिपी, हीं त्या कलाकृतीचा एक आराखडाच असतो. कलाकार, त्यात अंतर्भूत असलेला अनाहत नादाचे आपल्याला दर्शन घडवीत असतो. कुठलाही राग, हा मला नेहमीच अलापिमध्ये अधिक भावतो. काय होते कि, एकदा लय हीं मध्य अनिल द्रुत लयीत शिरली कि मग त्याचे तळाशी गणित जुळते आणि, मग लयीचे वेगवेगळे बंध ऐकणे, इतकेच आपल्या हाती राहते. द्रुत लयीत तर, प्रत्येक स्वर, अनुभवायला वेळच मिळत नाही. सतत, तळाशी जुळलेल्या लय बंधाकडेच आपले लक्ष्य वेढलेले असते. अलापिमध्ये, असे काही घडत नाही. मागील तंबोरा आणि त्यातून उमटणार्या शुद्ध षडज आणि पंचमाच्या शर्करावगुंठीत स्वरातून, जेंव्हा स्वयंभू "सा" आपल्या समोर सदर होतो. तिथे रागाची खरी खूण आपल्याला जाणवते. गाणे खरेतर, त्या क्षणी सिद्ध होते. संथ लयीत, तुम्ही प्रत्येक सुराचा आपल्या कुवतीप्रमाणे आनंद उपभोगू शकता. एखादा हिरा, जसा प्रत्येक कोनातून वेगवेगळी किरणे फाकीत असतो, तसा रागात प्रत्येक सूर हा वेगवेगळ्या अंदाजाने आपले अस्तित्व दर्शवित असतो.
आणि, अशा शांत समयी, अशाच हुरहुरत्या क्षणी, आसमंतात, "जिवलगा" अशी आर्त हक माझ्या कानावर येते आणि मग माझ्या पापण्यांच्या हालचालीला वाचा फुटू लागते!!

No comments:

Post a Comment