Wednesday, 18 June 2014

गाण्याची चाल आणि सामाजिक विपर्यास!!




चित्रपट गीतात एक बाब अवश्यमेव मान्य केली जाते आणि ती म्हणजे, गाण्याचा “मुखडा” महत्वाचा, बाकी सगळे बांधकाम असते. अर्थात, हे केवळ चित्रपट गीतांपुरते नसून, भावगीत,गझल इत्यादी सुगम संगीतातील सगळ्या रचनांना लागू पडते. आता, काहीवेळा असे दिसून येते, गाण्याची चाल, दुसऱ्या कुठल्यातरी गाण्यावर आधारित असते परंतु अशा वेळेस, एक “मखलाशी” नेहमी केली जाते. गाण्याची चाल बनवताना, दुसऱ्या चालीवर inspired होऊन, तयार केली आहे, adoption नव्हे!! एखाद्या चालीने प्रभावित होऊन, आपण चाल तयार केली म्हणजे आपण “चोर”ठरत नाही, याउलट, जो मुळचा संगीतकार आहे, त्याला “वंदना” केली आहे, असे म्हटले जाते!! वास्तविक, जरा खोलवर विचार केला तर, असे आढळून येईल, inspiration आणि adoption, यात तत्वत: काहीच फरक नाही. जर का तुम्ही संगीतक्षेत्रात काही वर्षे “मुशाफिरी” केली तर संगीताचे इतपत प्राथमिक “ज्ञान” सहज प्राप्त होऊ शकते!! एखाद्या चालीने, प्रभावित होऊन आपण, आपली रचना केली, यात एक बाब अधोरेखित होते, चाल दुसऱ्याची पण, त्यातील “चांगला” भाग निवडून, त्यावरून आपली “तर्ज” निर्माण केली!! हिंदी चित्रपट संगीतात असला प्रकार फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. काहींनी दुसऱ्याचे “ऋण” मोकळेपणी मान्य केले आहे, जसे, सलील चौधरींचे “इतना ना मुझसे तू प्यार”, हे गाणे मोझार्टच्या ४२ व्या सिंफनीवर आधारलेले आहे पण संगीतकाराने, ते कधीच नाकारलेले नाही. बरेचवेळा असे दिसून येते, गाण्याची चाल तर सरळ,सरळ दुसऱ्या गाण्यावरून घेतल्याचे दिसून येते पणतसाच श्रेय देताना खळखळ केली जाते!!
इथे मी उदाहरणादाखल २ हिंदी गाणी घेणार आहे आणि त्यानिमित्ताने काही विचार मांडायचा प्रयत्न करणार आहे. १] तम्मा तम्मा लोगे, २] चुम्मा चुम्मा लोगे. पहिले गाणे १९९० साली आलेल्या “थानेदार” या चित्रपटातील आहे तर दुसरे गाणे १९९१ साली आलेल्या “हम” चित्रपटातील आहे. वास्तविक, ही दोन्ही गाणी, १९८७ साली आलेल्या Akwaba Beach” या अल्बम मधील “Mory Kante” या आफ्रिकन गाण्यावरून बेतलेली आहेत. त्यावेळी एक मूर्ख वाद जन्माला आला होता. एकाचे संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीने दिले होते तर दुसऱ्याचे संगीत भप्पी लाहिरी यांनी दिले होते. वाद होता, “चोरी” आधी कुणी केली आणि ती आधी केल्याने, माझ्या रचनेवरून दुसऱ्याने माझ्या गाण्याची “कॉपी” केली!! इतके दिवस, परदेशी गाण्यांवरून चाली उचलून घेणे,इतपत चोरी खपून जात होती पण इथे चोरी कुणी आधी केली, यावरून वाद सुरु झाला!!
ही दोन्ही गाणी जरा बारकाईने ऐकली असे सहज कळून येईल, गाण्याचा ताल देखील तसाच ठेवलेला आहे!! अर्थात गाण्याची जर लय तशीच ठेवली असेल तर ताल बदलणे शक्यच नाही!! दुसरी बाब, मूळ गाण्यात, सुरवातीला “तम्मा तम्मा लोगे” हे शब्द आहेत आणि “थानेदार” चित्रपटात तेच शब्द घेतले आहेत!! इथे कुठले inspiration? सगळीच चोरी!! तरीही, या प्रश्नावर बरेच दिवस चक्क “वाद” चालू होता, अर्थात या वादाचा फायदा दोन्ही गाणी प्रसिद्ध होण्यासाठी झाला आणि पर्यायाने, चित्रपटाचा धंदा भरपूर झाला!! गमतीचा भाग म्हणजे, हा वाद किती तद्दन मूर्ख, पोकळ आहे, असे नाही, जणू अशी चोरी करणे, हा आपला हक्कच आहे, असा सगळा अभिनिवेश होता!!
जेंव्हा एखाद्या गाण्यावरून inspiration घेतले जाते, तेंव्हा एक संगीतकार म्हणून, आपल्या संगीत रचनेत, स्वत:चे काहीतरी Contribution आवश्यक असते, जेणेकरून “मूळ” रचना आणि “आजचे” गाणे यात फरक दाखवता येईल. याचे एक उत्तम उदाहरण देतो. लताबाईंचे “ये जिंदगी उसीकी है” हे गाणे, जोपर्यंत खुद्द संगीतकार सी. रामचंद्र यांनी जाहीर करेपर्यंत, कुणालाही माहिती नव्हते की, “शारदा” नाटकातील “मूर्तिमंत भीती उभी” या गाण्यावर आधारित आहे!! वास्तविक, नाटकातील गाणे, स्पष्टपणे “भीमपलास” रागावर आहे परंतु जरी, चित्रपटातील गाणे तयार करताना, संगीतकारासमोर हे गीत असले तरी, आपले काहीतरी वेगळे असावे, या विचाराने, संगीतकाराने, चाल बनवताना, भीमपलास रागातील “मध्यम” स्वराची जी जागा आहे, तीच बदलली आणि हिंदी गाण्याची “उठावण” वेगळी केली!! सत्कृतदर्शनी गाण्याच्या चाली वेगळ्या झाल्या!! इथे, inspiration शब्द योग्य वाटतो!!
वरील जी दोन गाणी दिली आहेत, ही चक्क चोरी आहे परंतु तोपर्यंत असल्या चोऱ्यांना हिंदी चित्रपट संगीतात “स्थान” मिळाले होते. वास्तविक, असे का करावे? लक्ष्मीकांत प्यारेलाल, या जोडीने काही असामान्य म्हणावीत कितीतरी गाणी दिली आहेत, जसे, सुनो सजना पपीहेरे”,”तुम गगन के चंद्रमा”,”ये दिल तुम बिन कही” किंवा “बहुत दिन बिते” सारखी संस्मरणीय गाणी दिली आहेत. म्हणजे संगीतकारांचा संगीताचा गाढा अभ्यास आहे, हे नक्की. भप्पी लाहिरीच्या संगीताबद्दल बरेच विवादास्पद लिहिता येईल परंतु हा माणूस, पंडित सामता प्रसाद यांचा गंडाबंध शिष्य होता आणि याचा देखील तबल्यावर अप्रतिम हात चालतो!!म्हणजे, हे दोन्ही संगीतकार, संगीताबाबत व्यासंगी आहेत, याबद्दल कुणालाही शंका येऊ नये परंतु चित्रपट क्षेत्रात नेहमीच “यश” या शब्दाला किंमत आहे आणि त्यापुढे सगळे गुन्हे,क्षम्य!! वरील दोन्ही गाण्यात, स्वररचना तर तशीच उचललेली आहेच पण, गाण्याचा स्वत:चा असा “तोंडवळा” असतो, तितपत देखील काहीही आढळत नाही. याचा अर्थ, यांनी गाण्याला चाल लावली म्हणजे नक्की काय केले?
मूळ गाण्यात, जशा हरकती आहेत, जिथे रचना बदलते, त्या जागा देखील तशाच ठेवलेल्या आहेत!! चौर्यकर्माची कमाल मर्यादा गाठली आहे!! आधुनिक संगीतात जे “कॉपी – पेस्ट” तत्व वारंवार आढळते, त्याची ही मुहूर्तमेढ म्हणायची का? इतके सगळे होऊन देखील, या दोन्ही संगीतकारांनी “दावा” केला तो Creativity चा!! यात कसली सर्जनशीलता आली? कसले श्रेय द्यायचे?
आता त्या पुढील गंमतीचा विषय. आपल्याकडे सणासुदीला गाणी लावणे, हा सामाजिक आचार आहे!! त्यासाठी, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव आहेत. गाणी लावावीत, त्याला नाही म्हणायचे कारण नाही पण तिथेही तारतम्य काहीही आढळत नाही. माझी एक आठवण स्पष्ट आहे, एके बार्शी माझ्या वाडीत, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटे ६ वाजता, लाउड स्पीकरवर “जवा नवीन पोपट हा” हे गाणे लावले होते!! काही सुज्ञ माणसे पुढे आली आणि त्यांनी तत्काळ हे गाणे बंद केले!! बरे, आवाज किती ठेवावे, याबाबत कुणीच, कसलाच मुलाहिजा ठेवत नाही!! “माझ्या बापाची वाडी आहे, मला जे वाटते ते करणार” या थाटात सगळे करण्याची अरेरावी वृत्ती प्रकर्षाने दिसून येते. मला आजही आठवत आहे, ही वर जी दोन गाणी दिली आहेत, ती त्या वर्षी कमालीची लोकप्रिय झाली होती. मुळात चित्रपटातील नृत्य काही खास प्रशंसनीय नव्हते, अर्थात हा संगीतकाराचा दोष नव्हे!! परंतु त्याचा अत्यंत बेडौल, शिसारी आणणारा प्रकार म्हणजे अशा सणावारी मूर्त्यांच्या समोर सादर होणारे गल्लीतील तथाकथीत “अमिताभ” आणि “संजय दत्त” यांचे नृत्यकौशल्य!! मुळात, जर गाणे, नीट बघितले तर, अमिताभ काय किंवा संजय दत्त काय, कुणाचेच नृत्य कुठेच “खास” वाटत नाही, केवळ तालावर पाय थिरकवलेत, इतपतच!! परंतु त्या “शैलीचा” देखील अत्यंत बेंगरूळ अवतार गल्लीतील “कलाकार” सादर करतात!!
मूळ गाण्यातील जी काही “खुमारी” असते, त्या सगळ्याची पूर्ण वासलात लावून टाकतात आणि जितका “चुथडा” म्हणून करता येईल तितका करतात. इथे काहीजण म्हणतील, समाजात सगळेच काही मध्यमवर्गीय नसतात!! इतरांना वर्षाचे बाराही महिने अत्यंत हलाखीत, विवंचनेत काढावे लागतात!! अगदी, वादासाठी हा मुद्दा मान्य केला तरी निदान सणासुदीच्या दिवशी, ज्या मूर्तीची आपण, प्रतिस्थापना करतो, मनापासून पूजा करतो आणि त्या काही दिवसांपुरते तरी त्या मूर्तीत “देव” पाहतो, त्या देवासमोर आपण किती विटंबना करीत आहोत, याचे साधे भान देखील राखले जात नाही!!
परवाच मुंबईत बऱ्याच ठिकाणी शोभायात्रा निघाल्या आणि परत एकदा कसलेच तारतम्य न बाळगता, उत्सवाचा जितका म्हणून विचका करता येईल, तितका करून झाला!! म्हणजे, मूळ गाण्यात कशाप्रकारचे नृत्य आहे, याचे कसलेच भान न ठेवता, हिडीस पद्धतीने नाचायचे आणि, आम्ही “संस्कृती” रक्षक म्हणून “तोरा” मिरवायचा!! यात कसली आली संस्कृती आणि सभ्यपणा!! असेतर नव्हे, “सभ्यपणा” दाखवणे म्हणजे मध्यमवर्गीय बुर्झ्वापण सिद्ध करणे!! तसे असेल तर मग सगळेच प्रश्न मिटले!!

No comments:

Post a Comment