Wednesday, 18 June 2014

रात्र काळी… घागर काळी..




मराठी साहित्यात, खानोलकर यांचे नाव ज्या हिशेबात असामान्य कवी म्हणून घेतले जाते त्याच प्रमाणात कादंबरीकार म्हणून घ्यायला हवे, असे मला प्रामाणिकपणे वाटते. तसे पहिले गेल्यास, खानोलकरांच्या कादंबऱ्या ह्या, त्यांच्या कवितेचाच विस्तारित भाग आहे, असे कादंबरी वाचीत असताना, वारंवार जाणवत असते. प्रस्तुत कादंबरी किंवा कोंडुरा, अजगर सारख्या इतर कादंबऱ्या, ह्यात काही विलक्षण साम्य देखील आहे.एकतर, खानोलकरांच्या लिखाणात नेहमीच उदास सूर भरलेला असतो. वातावरण निर्मिती ही संघ्याकाळ आणि रात्र याच सान्निध्यात होत असते. सगळीकडे काजळलेले, अर्धुकलेले असे संभ्रमचित्त वातावरण असते. अजगर कादंबरी वगळली, तर इतर बहुतेक कथांमध्ये आणि कादंबऱ्यामध्ये जुने, जीर्ण कोकण, तिथली जुनाट संस्कृती, यंत्रसंस्कृतीचा जराही स्पर्श न झालेली आणि जुन्याच चाली-रीतींमध्ये कवटाळून बसलेली समाजव्यवस्था ह्याचेच चित्रण दिसते.
“रात्र काळी-घागर काळी”, या कादंबरीत हेच वाचायला मिळते आणि नियतीच्या फेऱ्यात अडकून घेतलेल्या माणसांची फरफट, हेच कादंबरीचे मध्यवर्ती सूत्र असे सांगता येईल. बहुतेक सगळे पुरुष हे बिनकण्याचे, फारसा तौलनिक विचार करण्याची कुवत नसणारे आणि एकरेषीय आयुष्य जगणारे असेच आहेत. किंबहुना, त्याच्या बहुतेक कादंबऱ्यामधील पुरुष व्यक्तिरेखा ह्या दुबळ्या, परिस्थितीने गांजलेल्या आणि नियतीपुढे शरण गेलेल्या आहेत. बायकांची चित्रणे मात्र अतिशय ठाशीव, परिस्थितीशी सामना करण्याची जिद्द आणि संसाराचा गाडा आहे त्या परिस्थितीत समर्थपणे ओढण्याची कुवत, अशी आहेत. कोकणातील जुन्या चालीरीती मनापासून सांभाळीत आणि त्यावर मनापासून विश्वास ठेवणाऱ्या असंख्य व्यक्तिरेखा वाचायला मिळतात, किंबहुना प्रत्येक व्यक्तिरेखा ही कमी-जास्त प्रमाणात ह्याच मुशीतून तयार झालेली आहे. इथे रवळनाथाचे देऊळ आहे, त्या देवावर संपूर्ण भिस्त ठेऊन जगणारा समाज आहे आणि त्यालाच अनुलक्षून सगळे व्यवहार चालत आहेत. भूताखेतांचे समज-अपसमज, अत्यंत क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींबद्दल अकारण वितंडवाद आणि अति भाबडेपणा ह्या भोवती सगळे कथानक फिरत आहे.
या कादंबरीत, लक्ष्मी हे मध्यवर्ती पत्र आहे आणि सगळी कादंबरी तिच्याच आयुष्याच्या भोवती फिरते. यज्ञेश्वरबाबा तिचे लग्न दिगंबर भटांशी लावून देतात आणि स्वत: चक्क देवधर्मात गुंतवून ठेवतात. सुरवातीलाच लक्ष्मीला आपल्या “अतिशय” तारुण्याची जाणीव होते आणि ती जाणीव आणि तिचे ते उफाड्याचे शरीर, तिच्या आयुष्याच्या होरपळीस कारणीभूत होते. त्या काळाच्या मानाने असे “दैवदुर्लभ” सौंदर्य सगळ्यांनाच अप्रूप आणि अप्राप्य होते. त्यामुळेच दिगंबर तिच्यावर विश्वास न ठेवता, केवळ एकदाच तिच्याशी “संग” करून पळून जातो आणि लक्ष्मीच्या हताशतेची कहाणी सुरु होते. आयुष्यात प्रथम केमळेकर गुरुजी येतात आणि लक्ष्मी त्यांच्या घरी राहायला जाते. एकाच गावातील अशी घटना, तेंव्हा त्याकाळात तर तिला ज्वलंत स्वरूप येणे उघडच!! वास्तविक केमळेकर विवाहित असूनदेखील लक्ष्मीला घरात केवळ थाराच देत नाहीत तर तिला नवीन घर बांधून देतात!! इतके त्यांचे प्रेम असूनही लक्ष्मीला “शारीर” सुख अप्राप्यच असते कारण तिची “मृण्मय देहाची चैत्रगौर”!! शरीराची दाहकताच इतकी भाजणारी असते की कुणीही पुरुष जवळ जाणे, त्या पुरुषाला भीतीदायक वाटावे!! शेवटी तिच्या पोटी “सदू” जन्माला येतो आणि परत तिच्या वातःतीला प्रारंभ होतो. गावातील, प्रस्थ “दाजी” तिच्या घरापर्यंत येतात पण उंबरठा ओलांडण्याचे धैर्य करू शकत नाहीत, लक्ष्मीला याची जाणीव होत असते. म्हणूनच “घागर नदीच्या पाण्यावर उपडी तरंगत राहूनदेखील ओलाव्याचा स्पर्श होत नाही”!! अखेर, गावातील भाविणीची मुलगी, जाई तिच्या आसऱ्याला येते आणि अखेरपर्यंत तिच्याच जवळ राहात असते. दास्याचा मुलगा वामन, सदूच्याच वयाचा पण तरीही लक्ष्मीवर “नजर” ठेऊन!! सदूला गावातील लोकांकडून समजते की, जरी लक्ष्मी त्याची आई असली तरी बापाचा पत्ता नाही आणि तो आईचा भयानक तिरस्कार करायला लागतो, वेगळा राहायला लागतो. लक्ष्मी परत “एकटे”पणाचे सुख “भोगायला” लागते!! गावात अच्युत फक्त सगळ्या गोष्टी जाणून असतो पण त्याचे ओठ शिवल्याप्रमाणे बंद असतात, तो कधीच मोकळेपणी बोलू शकत नाही, धाडसच होत नाही. आतल्याआत जळत राहणे, हेच त्याचे प्राक्तन!! त्यातून मुंबईत तो दिगंबरला भेटतो पण तिथेच एक अपघातात पाय गमावून, गावात येतो आणि त्याचे परावलंबित्व वाढतच जाते. किंबहुना, गावातील पुरुष बरेचसे “नेभळट” प्रवृत्तीचेच असतात. मूक पणाने भोगत बसण्याशिवाय काहीच करू न शकणारे. ह्या सगळ्या निरालम्बित्वाच्या कात्रीत सगळे भिरभिरत असताना, एकेकच मृत्यू वयानुरूप अटळ होतो. अखेर जेंव्हा सदू जातो, तिथेच लक्ष्मी खऱ्याअर्थाने मोडून पडते. आपल्या पोटाच्या गोळ्याला आपण कधीच समजावू शकलो नाही, याची तिला खंत खात राहते. अशा प्रकारची सगळी कथा आहे आणि मी ती थोडक्यात इथे मंडळी आहे. वास्तविक या मांडण्यात, कादंबरीतील दाहकता अजिबात दिसून येत नाही कारण ती दाहकता खानोलकरांनी ज्या शब्दात उभी केली आहे, ती वातावरण निर्मिती, ही त्या कादंबरीची खरी शक्ती. ते पडीक गाव, विसाव्या शतकाचा स्पर्श देखील झाला नसल्याने, तेच जुने, पुराणे विचार कवटाळून बसलेला समाज आणि त्यातून होणारी गतानुगतीकतेची विकलता, हे लेखकाच्या शब्दातून अनुभवणे, केवळ अपूर्व आहे. निवेदन शैली आणि पात्रांचे स्वभाव विशेष ही खरी कादंबरीची शक्तिस्थाने आहेत.
वाचताना, आपण दि:डमुढ होतो. नियती म्हणजे काय? ती वास्तवात कशी असते? खरच नियती म्हणून काही वस्तू असते का? नियतीच्या फेऱ्यात नेहमीच आयुष्याची फरफट अंतर्भूत असते का? असे आणि कितीतरी प्रश्न आपल्याला पडतात. अलौकिक सौंदर्य लाभणे हा “शाप” ठरावा, याला कुठली नियती म्हणायची? ”लक्ष्मीने भलतच विचारलं होत.आणि दाजीने या विचारण्यालाही नकार दिला होता. त्याची डोळ्यांची बुबुळ आतून ताणल्यासारखी वाटत होती. लक्ष्मीने थोडेही हळू नये, काहीच बोलू नये. अंगावरचा काटा उलटा फिरेल,सगळ अंग ओरबाडून काढील. शहाऱ्यांच्या टाचण्या होतील. दाजी तरंगत्या फळ्यांवर बसल्यासारखा गप्प होता.लक्ष्मी आपल्याला काही विचारीत होती एवढच त्याला कळल होत, आणि काय विचारीत होती हे न कळल्यामुळे त्याने नकार  दिला होता.लक्ष्मी आत जाऊ लागली. तिचा एकेक पदक्षेप दाजींच्या डोळ्यांतल्या बाहुल्यांवर पडत होता. दाजी उठूही शकत नव्हता आणि बसूही शकत नव्हता. तो नुसता डोळे ताणून बसला होता आणि ते बसणे म्हणजे शरीराची एक  अपंग शरणागती होती” हे सगळे मी इथे मुद्दामून लिहिले कारण यातून कादंबरी कशी उभार घेते आणि निवेदन कसे प्रभावी होते, याची थोडी झलक दाखविण्यासाठी. कादंबरीच्या सुरवातीसच “कोपऱ्यातला बारीक वातीचा कंदील काळ्या काचेतून काळोख टाकीत होता.छपराच्या हळदूस काचेतून दोनचार चांदण्या दिसत होत्या. पुढच दारही बंद होत. समोरच्या स्वयंपाकघराची खिडकी उघडी होती. त्यातून वाऱ्याच्या गार झुळका अधूनमधून येत. लक्ष्मी बाजूच्या दाराकडे मधूनमधून पाही. हातांतला हिरवा चुडा चाचपून पाही तो किणकिण वाजला की लक्ष्मी स्वत:शीच क्षीणपणे हसे. लग्न झाले ते तडकाफडकी, उपरण्याने डोळे टिपून बाबा मोकळे झाले.लखलख लखलख चमकणाऱ्या डोळ्यांनी ती एकटीच काळ्या पडत जाणाऱ्या कंदिलाच्या काचेकडे पहात बसून होती. विझलेल्या गाभाऱ्यातल्या उजळ समईसारखी. रात्र चढत होती.हवेत गारठा वाढत चालला होता.”उद्या सूर्योदय होईल का”" एक पुसट शंका लक्ष्मीच्या मनाला चाटून गेली. भिंती, खोल्या दार- सारे काही नावापुरतेच होते. भिंतीवरचा काळोख वाळत घातलेल्या कातड्यासारखा होता. सगळ्या घरातच एक चमत्कारिक, पोटात खळी पडणारी भीती पसरून असल्यासारखी वाटून ती शहारल्यासारखी झाली. दूर वाहत गेलेली
घागर तिला आठवली.” 
वरील परिच्छेद म्हणजे कादंबरीच्या सुरवातीला आलेल्या निवेदनशैलीचा अर्क आहे, असे म्हणता येईल. सगळी कादंबरी अशाच अत्यंत भकास वातावरणात फिरत असते आणि वाचकाला भिरभिरवत असते. इथे कोण चूक आणि कोण बरोबर, हा ठरविताच येत नाही. सगळे बेगुमानपणे, आलेल्या परिस्थितीला शरण जात असतात.या निवेदनातून आपल्या हेदेखील लक्षात येईल की, कवितेच्या मुक्त छंदाच्या अंगाने सगळे वर्णन होत आहे. मी, सुरवातीला म्हटले तसे, खानोलकर हे हाडाचे कवी, नंतर ते कादंबरी, नाटके इथे वळले. स्त्रियांच्या मनाचे इतके खोलवर चित्रण मराठीत फार अपवादाने वाचायला मिळते. त्यामुळेच की काय, पण त्यांच्या कादंबरीत पुरुष तोकडे असतात. कादंबरीतील सगळ्याच स्त्रिया मनाने कोमल पण अतिशय ताकद असलेल्या व निश्चयी आहेत. आपल्याला काय हवे, कुठे जायचे आहे, ते त्यांना नेमकेपणाने माहित असते. त्यांच्या पिंडातच काही मूल्यांनी, निष्ठानी व श्रद्धांनी खोलवर मुळे रोवलेली असतात. आणि त्यातून त्यांची पावले ठाम पडत असतात. त्यांची प्रेम करण्याची, माया करण्याची, सर्वस्व देण्याची आणि त्याकरता आयुष्यही इरेला घालण्याची शक्ती प्रचंड आहे. नियती ही दु:खरूप असते, आणि दु:ख सहन करण्याची शक्ती हीच खरी शक्ती, म्हणून? आपल्या प्रकृतीसंचितातील “प्रकृती” ही चंचल, उत्साही, समर्थ तर पुरुष हा उदास, विरक्त प्रकृतीच्या संयोगाने जगणारा अशाच प्रतिमा शातानुशतके आपल्या नेणीवातच खोलवर रुजलेल्या आहेत, त्याचा परिणाम म्हणून? सतत दु:खभार सोसल्याने ह्या स्त्रियांच्या पिंडातच कुठेतरी आंतरिक शक्तीचा न आटणारा झरा लपलेला असतो आणि तो जरूर पडल्यावर प्रकट होतो!! की नियती स्वेच्छेने माणसांची जीवने, हवी तशी फिरवते तेंव्हा तीही जाणते की पुरुष हा फक्त निमित्तमात्र असतो; खरा प्रवाह वाहायचा, त्याचे सातत्य राहायचे ते स्त्रीजीवनातूनच!!
नियतीच्या खेळाची जन्म आणि मृत्यू हिऊ दोन टोके आहेत. ह्या खेळाचे स्वरूप जाणणे, हेच खानोलकरांच्या निर्मितेचे सूत्र आहे.त्यादृष्टीने  खरोखर जन्म आणि मृत्यू यांच्या रहस्यमयतेने इतका पछाडलेला दुसरा मराठी लेखक आढळत नाही. गर्भ, गर्भ तहाने आणि गर्भ कुस्करला जाणे हेच जणू वेगळे कादंबरीचे सूत्र असावे, इतक्या वेळा ह्यांचे अस्तित्व आपल्याला दिसते. दिगंबरशी एकदाच झालेल्या संगातून सदाशिव जन्माला येतो पण आयुष्यभर “मी कुणाचा” याच प्रश्नाने त्याला पछाडलेले असते. त्याला ते सगळे शाप्वत वाटत राहते. जाईला गर्भ राहिलासे वाटते पण तो अखेर जिरून जातो!! जन्म-मृत्यूंच्या रहस्याशी निगडीत असलेल्या या साऱ्या  घटना-प्रसंगातून त्या, त्या व्यक्तीच्या भावजीवनात जे प्रचंड भोवरे उठतात, त्यांनी त्यांची अवघी जीवने घुसळून निघतात. याच संदर्भात दुसरा भाग म्हणजे, ज्या संभोगातून निर्मिती होते, ती कृती देखील दु:खातूनच!! लक्ष्मी आयुष्यभर अतृप्त राहते, जाई आयुष्यभर झुरत राहते,इथे खानोलकरांची दु:खमय नियतीची जाणीव जन्माच्या पाजीकडे, त्या जन्माला कारणीभूत होणाऱ्या संभोग या क्रीयेशीच जाऊन भिडते. जन्म आणि मृत्यू!! जन्म हे नियतीने पूर्ण स्वेच्छेने, सर्वस्वी आपल्या अधिकारात घडविलेले कृत्य, “आत्मस्वातंत्र” इथे उद्भवतच नाही. “आत्मा” अस्तित्वात येण्याचा तो क्षण म्हणून तो, “स्वातंत्र्याच्या” कक्षेबाहेरचा. स्वातंत्र्य काय हवे ते ठरवू शकेल, करू शकेल फक्त जन्म कसा, कोठे, कुणाच्या पोटी घ्यावा, हे मात्र ठरविता येत नाही. जन्म हे नियतीचे आत्मस्वातंत्र्य!! या स्वातंत्र्याचे अंतिम टोक कुठले तर तेच स्वातंत्र्य नाकारण्याचेही स्वातंत्र्य असणे – आत्महत्या!!
खानोलकरांची माणसे जगत असतात; नियतीची लोखंडी चौकात तोडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात पण त्यांची नियती कुठेतरी आयुष्याच्या मध्यावरच त्यांना भेटते. त्यांना तिची ओळख पटते आणि तिथेच त्यांचा सगळा प्रयत्न संपतो!! तिथेच नियती त्यांना आपल्या ताब्यात घेते, ती मृत्युच्या अटळ वाटेकडे घेऊन जाण्यासाठी!! वास्तवील नियती ही नियती म्हणूनच पूर्णपणे नियोजित, पुर्वासिद्ध, बंदिस्त तर आत्मस्वातंत्र्य हे स्वातंत्र म्हणूनच पूर्णपणे मुक्त!!
खानोलकर हेच फार समर्थपणे करतात. वाचताना नेहमी असे वाटते की यांच्या विश्वात पुढल्या क्षणी काहीही घडेल, घडलेले मोडेल किंवा निराळेच काहीतरी घडेल.त्यांची दिशा आणि गती सारखी बदलणारी!! एखादा गंध, अचानक कानावर पडलेला नाद, कुठला तरी स्पर्श, झाडाचे वाऱ्याबरोबर घरंगळलेले पान!! काहीही घडते आणि त्यांची आयुष्ये पूर्णपणे बदलून जातात, मागे कुठलाही सांधा न सोडता!! अशा प्रकारे, ही कादंबरी आपल्याला असा अतिभयाण, आपली जाणीव खोलवर ढवळून टाकणाऱ्या अनुभवाचा प्रत्यय देतात.

No comments:

Post a Comment