पुस्तकाच्या नावावरूनच कल्पना यावी की पुस्तकाचा विषय काय आहे. हिटलर हे व्यक्तिमत्वच असे होते की, अजूनही त्याचा शोध(व्यक्तिमत्वाआधारे!) संपलेला नाही. मानवी इतिहासात अशी फार थोडी माणसे होऊन गेली असतील की ज्यांनी, जगाचा इतहास आणि त्याची भाषाच बदलून टाकली. इथे बदल हा चांगला आणि वाईट अशा दोन्ही अर्थाने घेतलेला आहे. आजही, जगभर या व्यक्तिमत्वाचे आकर्षण रतिभरही कमी झालेले नाही. केवळ इंग्रजी भाषेतच नव्हे तर इतर भाषेत देखील याचा शोध चालूच आहे. अर्थात, बहुतेकवेळा मते ही फार टोकाची व्यक्त केलेली आढळतात. हिटलर हा खुनशी व्यक्तिमत्वाचा होता, यात एकमत व्हावे पण हा झाला एक भाग. त्याच्या स्वभावाला अनेक कंगोरे आढळून येतात. त्याने केलेल्या ज्यू हत्याकांडाचे समर्थन कधीही करणे अशक्यच आहे पण तो भाग जमेस धरून देखील हिटलर वेगळ्या मुशीतून जन्माला आला होता, हे नक्की. त्याने केलेले हत्याकांड हा मानवी इतिहासातील कधीही न पुसला जाणारा कलंक आहे, हे जरी सत्य असले तरी ह्या हत्याकांडाला सुरावट झाली ती १९४२ च्या सुमारास. त्याआधीची कहाणी देखील तितकीच विलोभनीय आहे आणि एखादा अति देशप्रेमी माणूस, देशासाठी काय करू शकतो, याचा वस्तुपाठ आहे. त्याच्या आत्महत्येनंतर, त्याने आरंभलेल्या छळवादाच्या असंख्य कहाण्या लिहिल्या गेल्याआणि त्या सगळ्या जरी संय्युक्तिक असल्या तरी त्या पलीकडला हिटलर देखील अभ्यासनीय नक्कीच होता. ज्या हिशेबाने, त्याने एकट्याच्या जीवावर, जगातील ३ समर्थ लष्करी सत्तेच्या तोंडाला फेस आणला होता, विशेषत: इंग्लंड आणि रशिया यांच्या नाका-तोंडात पाणी आणले होते, हा भाग निश्चितच वाचण्यासारखा आहे. इंग्रज आणि रशियन इतिहासकारांनी, जर्मनीच्या पराभवानंतर हिटलर वर टीका करायची एकही संधी सोडली नाही तरी आता या युद्धाला उणीपुरी २१ वर्षे झाली (प्रस्तुत पुस्तकाची पहिली आवृत्ती १९६६ सालची आहे!!) आणि आता त्यावेळच्या जखमांवर थोडी खपली धरली असल्याने, आपण थोडा वेगळा दृष्टीकोन घेऊ शकतो आणि हीच बाब, या ग्रंथात प्रामुख्याने मांडलेली आहे.
या ग्रंथात, अगदी हिटलरचे व्हिएन्नामधील बालपण, त्यावेळची समाजस्थिती, त्याचे दुभंगलेल्या कुटुंबातील वावरणे, या सगळ्या गोष्टींचा अगदी साकल्याने विचार केलेला आहे. मुळात चित्रकार व्हायची मनीषा असताना, आजूबाजूचे वातावरण त्याच्या मनावर कसे परिणाम करते – यात त्यावेळच्या ज्यू लोकांनी जर्मन लोकांना दिलेली वागणूक, त्यांच्या बायकांना वेश्यागृहात भरती करण्याची सक्ती इत्यादी बाबींनी त्याच्या मनात उतरलेला ज्यू द्वेष, याचे चित्रण फारच सुरेख झालेले आहे आणि पुढील हिटलर समजण्याच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. अर्हत, नंतरच्या काळातील ज्यू हत्याकांड समर्थनीय अजिबात नव्हे पण माणूस आणि त्याची मानसिक प्रक्रिया समजून घेण्याच्या दृष्टीने हा भाग महत्वाचा ठरतो. याच वेळेस, पहिले महायुद्ध सुरु झाले आणि हिटलर जर्मन मिलिटरीत सामील झाला. हिटलरला पहिल्यापासून युद्ध या गोष्टीचे प्रचंड आकर्षण होते आणि ते आयुष्याच्या शेवटपर्यंत कायम होते. हिटलरने युद्धात सोसाव्या लागणाऱ्या हालाचे कधीही उदात्तीकरण केले नाही तर, ते हाल, हा आपला शैक्षणिक भाग आहे, हे सतत मनात बाळगले. हिटलरची पुढील वागणूक समजून घेण्यासाठी, या भागाचा विशेष अभ्यास करणे जरुरीचे आहे, असे मला वाटते.
त्यानंतर आला तो जर्मनीचा पराभव आणि त्याच्या आयुष्याला झालेली कायमची जखम!! जर्मनीने शरणागती पत्करली, हे त्याला कधीच सहन झाले नाही आणि हे शल्य त्याने आयुष्यभर मनात बाळगले. त्यापुढे, झालेला “व्हर्सायचा तह” म्हणजे पुढील १९३९ च्या युद्धाची नांदीच होती, असे म्हणायला प्रत्यवाय नाही. व्हर्सायचा तह, ही जर्मन लोकांची संपूर्ण नामुष्की होती, हेच त्याचे पुढील राजकारणाचे प्रमुख सूत्र होते.मुळातला अतिशय तडफदार, महत्वाकांक्षी माणूस, त्यातून व्हर्साय तहाने, जर्मनीची झालेली नाचक्की आणि सगळा कोसळलेला आर्थिक डोलारा, आजूबाजूचे भौगोलिक आकाराने लहान असलेल्या देशांचे जगभर पसरलेले साम्राज्य, ह्या गोष्टी त्याच्या महत्वाकांक्षेला खतपाणी घालीत होत्या. तेंव्हाच विचार करता, शेजारील फ्रांस, हॉलंड, बेल्जियम या त्यामाणे छोटेखानी देशांनी जे आपले साम्राज्य इत:स्तत: पसरलेले, त्याच्या नजरेत आलेले होतेच. इंग्लंड बाबत तर शेवटपर्यंत त्याच्या मनात आदराची भावना होती.
तसे पहिले तर, हिटलरला साम्राज्य उभारायचे होते ते, प्रामुख्याने पूर्व युरपमध्ये. पोलंड त्याच्या नेहमीच नजरेत सलत होता. किंबहुना, व्हर्साय तहाची परिणीती म्हणून पोलंड राष्ट्र, हे दोस्त राष्ट्रांनी आपली डोक्यावर आणून ठेवलेले आहे,हीच त्याची मूळ भावना होती.
त्याचा राजकीय प्रवास बघितला तर त्याची कमाल वाटते. १९२९ च्या सुमारास त्याच्या उदयाला सुरवात झाली आणि त्याने हळूहळू, आपला कंपू राष्ट्रीय स्तरावर प्रकाशात आणला. गोबेल्स, गोअरींग सारखे मोहरे त्याने आपल्या जवळ केले आणि राष्ट्रीय स्तरावर पक्ष स्थापन केला. या साऱ्याला पाठबळ मिळाले ते १९३३ साली राईशस्टाग जाळली, या कृत्याने. गोअरींगच्या साथीने आग लावली असा प्रचार जर्मन कम्युनिस्ट लोकांनी केला पण तिथेच हिटलरने आपले नेतृत्व कौशल्य दाखवून पुढे सप्रमाण हाच आरोप जर्मन कम्युनिस्टांवर सिद्ध केला. या प्रकरणाने हिटलर राष्ट्रीय नेता म्हणून प्रस्थापित झाला. लगेच त्याने निवडणूक घेऊन, प्रचंड मताधिक्याने सरकार स्थापन केले. त्यावेळेस, त्याच्याबरोबर गोबेल्स, गोअरींग, papen हे सहकारी होते, यांच्यासह त्याने राईशस्टागची परत उभारणी केली आणि सर्वसाक्षीने उद्घाटन केले.त्यावेळी, जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष हिंडेनबर्ग यांच्यासह सरकार स्थापिले. अ९३४ साली, न्युरेनबर्ग इथे प्रथम सर्वव्यापी अशी घोषणा केली,” जर इतर राष्ट्रे शस्त्रसज्ज राहणार असतील तर जर्मनी शस्त्रसज्जच राहील”. ही पुढील यादवी युद्धाची नांदी म्हणायला हरकत नाही. हळूहळू, त्याने हिंडेननर्ग यांचा काटा काढला आणि सर्वाधिकारी झाला. त्यानंतर, त्याने, ज्याप्रकारे, ब्रिटनचे पंतप्रधान चेम्बरलेन आणि फ्रांसचे अध्यक्ष दलांदिया यांच्याशी राजकारणी हालचालींनी गुंगारा देत “Sutedanland” आणि “Czeckoslovakia” , ऑस्ट्रिया सकट जर्मनीच्या घशात घातले, त्याला आधुनिक राजकारणात तोड नाही. त्यावेळेस, ब्रिटन आणि फ्रांस यांचे जगभर साम्राज्य पसरलेले असताना, त्यांना झुलवत ठेवत आणि स्वत:च्या मागण्यांप्रमाणे सर्व पदरात घेतले. इथेच, ब्रिटनमध्ये हिटलरचा धोका चर्चिलने पूर्णपणे ओळखला होता पण, त्यावेळेस, चर्चिल ही “निर्जीव” राजकीय व्यक्ती असल्याने, त्यांचे इशारे वाऱ्यावर उडाले!! जर्मनीला शस्त्रसज्ज करताना, त्याने ज्या प्रकारे आर्थिक घाडी वसवली, तो तर आधुनिक इकोनोमिक्स मधील चमत्कारच मानला जातो.
साधारणपणे, हिटलरने १९३८ च्या सुमारास आपले हेतू निदर्शनास आणून ठेवले पण त्यावेळेस जर्नीची सिद्धता इतकी प्रचंड होती की, जगभर त्याची दहशत पसरली होती आणि त्याचे प्रत्यंतर १९३९ साली पोलंड युद्ध सुरु झाले, त्यावेळेस आले. त्याआधीची एक घटना मोठी उद्बोधक ठरावी. पोलंडवर स्वारी होणार हे नक्की केल्यावर, लगेच हिटलरने, रशियाशी मैत्री करार केला आणि ती इतक्या झपाट्याने केला की, जगातील सगळे राजकारणी अवाक झाले होते. वास्तविक कम्युनिझमवर हिटलरचा किती रोष आहे, हे सगळ्यांना माहिती असताना, देखील असा करार अस्तित्वात आला, याचेच सगळ्या राष्ट्रांना आश्चर्य वाटले. पण, हिटलर नेमेकेपणे जाणून होता की, पोलंडच्या वरील सीमा रशियाच्या जवळ येतात आणि वरून जर रशियाने अनाक्रमण केले किंवा जरी आक्रमण केले तर पोलंडची लढाई, हा काही दिवसांचाच प्रश्न उरेल आणि हा हिशेब हिटलरने इतक्या तंतोतंतपणे अमलात आणला की, खुद्द स्टालिनची दातखीळ बसायची वेळ आली. या लढाईत, जगाला, युद्धाचा वेग म्हणजे काय, याचे अचूक प्रत्यंतर आले. किंबहुना, जर्मनीने लढाईचे नावे तंत्र जगाला दाखवून दिले आणि ते इतके अद्भुत होते की, पुढे फ्रांसचा पाडाव होईपर्यंत कुणालाच याची पुर्न्कल्पना आली नाही. हिटलरला, रोमेल्स, Mannstein, सारखे सेनापती मिळाले, हे खरे आहे पण हिटलरने त्यांचा वकूब ओळखून, पुढे अनेक युद्धाच्न्हे नेतृत्व दिले आणि त्यांना जगासमोर येण्याची संधी दिली. तोच प्रकार गोअरींगबाबत म्हणता येईल. एखाद्याने काही विलक्षण कल्पना सांगितली की लगेच कसलाही मुलाहिजा न ठेवता, हिटलर त्यांना बढती देत असे. अर्थात, त्याच्याकडे हुकुमशाही पद्धत असल्यानेच शक्य होते, हा भाग वेगळा. १९४२ पर्यंत, इंग्लंड वगळता, सगळा युरप हिटलरच्या पायाशी लाळागोळा झालेला होता. इतका की, प्रत्यक्ष आपल्या महात्मा गांधींना देखील याचे आकर्षण वाटले होते!! हॉलंड, बेल्जियम आणि फ्रांस हे देश केवळ सहा महिन्यात काबीज करणे, ही कामगिरी अजिबात साधीसुधी नव्हती. पण, इथेच हिटलरला हे यश पचविणे अवघड झाले आणि सगळ्या जबाबदाऱ्या स्वत:वर घेतल्या.
आता, हिटलरची भूक आसुरी झाली होती. पुढे, एकदा एक भेटीत साधारणपणे, १९४५ च्या सुमारास, स्टालिन आणि चर्चिल यांनी एकमुखाने हिटलरचे कर्तृत्व मान्य केले पण त्याचबरोबर हिटलरला कुठे थांबायचे याचा विवेक उरला नाही, हीच त्याच्या अपयशाची पाहिली पायरी!! त्यानंतर, इंग्लंडची स्वारी फसली आणि रशियात पुढे जबरदस्त दणके मिळून शरणागती पत्करावी लागली. आता, या ग्रंथात, एक अतिशय छान विवेचन केले आहे आणि ते म्हणजे, हिटलरला नव्या जगाची काय घडी किंवा व्यवस्था अपेक्षित होती, या मुद्द्याचे. हिटलर क्रूरकर्मा ठरतो तो इथेच. संपूर्ण ज्यू जमात जगातून नष्ट करायची, या विचारानेच त्याने “नाझी” संस्था स्थापन केली आणि पुढे, ऑस्वीच इथे यमतळ उभे केले आणि अक्षरश: मृत्यूचे तांडव घडविले. असा एखादा समाज पूर्णपणे उखडून देण्याच्या प्रतिज्ञेवर कधीही राज्य स्थापन करता येत नाही, हीच गोष्ट हिटलर विसरला आणि हिमलरसारख्या कर्दनकाळी व्यक्तीकडे ज्यू समाजाचे निर्दालन करण्याचे अघोरी काम सोपविले. हिटलरला अशी घडी अपेक्षित होती आणि हे नेमके चित्र चर्चिल यांनी प्रथमपासून ओळखले होते. हिटलरचे दुर्दैव म्हणू किंवा इंग्लंडचे सुदैव म्हणूया, याच काळात, हिटलरला, चर्चिलसारख्या अत्यंत खमक्या आणि विजीगिषु वृत्तीशी गाठ पडली आणि तिथे मात्र त्याचे काहीही चालले नाही. पुढे, अमेरिका, आपल्या प्रचंड शस्त्रसामर्थ्याने युद्धात उतरल्यावर हिटलरचा शेवट निश्चित झाला. नाझी सेना, हे हिटलरच्या मानसिकतेचे प्रतिक होते आणि तीच घडी, त्याला जगात अभिप्रेत होती.
समजा, हिटलर जिंकला असता तर काय झाले असते, हा विचार देखील यातनामय ठरतो. कारण, त्याला कधीच इतर जमातींबद्दल प्रेम नव्हते, किंबहुना प्रचंड तिटकारा होता आणि त्याचा जबरदस्त फटका जगाला सहन करावा लागला असता. हिटलरची ही कथा वाचताना, एक गोष्ट मनात कायम ठसते आणि ती म्हणजे, प्रचंड कुवतीचा माणूस पण अत्यंत घटक विचारसरणीने पछाडला गेला असल्याने, स्वत:बरोबर जर्मन राष्ट्राचा देखील करुणामय शेवट करवून घेतला. नवल, या गोष्टीचे वाटते की, हिटलरवर अगदी शेवटपर्यंत निष्ठा ठेवणारे जर्मन कसे काय उरले होते आणि याची चिकित्सा करणे अतिशय अवघड आहे. अगदी मेंढ्यांच्या घोळक्याने सगळी जर्मन जनता, एकदिलाने हिटलरच्या पाठीशी उभी होती, अगदी त्याने आत्महत्या करेपर्यंत!! याचे उत्तर शोधणे आजही कठीण जात आहे. बहुदा असे असावे, १९३० च्या आर्थिक खाईतून त्याने राष्ट्राला ज्या गतीने सर्वोच्च पदावर नेले, तो वेग आणि ती समृद्धता, याचे जर्मन लोकांना आकर्षण वाटले असावे. त्यातून, हिटलरने आपले राष्ट्रप्रेम कधीच लपविले नाही. त्याचे आकर्षण बहुदा जर्मन जनतेला वाटले असावे. ते काहीही असो, या ग्रंथाच्या निमित्ताने, हिटलर एक व्यक्ती आणि प्रवृत्ती याचे यथार्थ दर्शन घडते. श्री. वि.ग.कानिटकर यांनी, अतिशय परिश्रम घेऊन हा ग्रंथ लिहिल्याचे प्रत्येक पानापानातून जाणवते. मराठीत अशा प्रकारची ग्रंथरचना वाचायला मिळणे विरळाच. इतिहासाच्या या कालखंडाचे असे तठस्थ वृत्तीने आणि तौलनिक विचाराने केलेले लिखाण आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवते, हे तर नक्कीच मान्य करायला लागते.
No comments:
Post a Comment