गाणे पहिल्याच सुरात मनाची पकड घेणारे हवे. त्यात काय चांगले आहे, हे बघायची “वेळ” आली, म्हणजे गाण्याची “वेळ” चुकली, असे म्हणाला हवे. सुगम संगीत/चित्रपट संगीत, याचा जीव मुळात ३/४ मिनिटांचा, त्यामुळे रचनेतील प्रत्येक क्षण अर्थपूर्ण असावाच लागतो. अतिशय घट्ट विणीची,बांधीव रचना, प्रत्येक सुराला विशिष्ट अर्थ तसेच जिथून रचनेला सुरवात झाली आहे, त्याच्याशी पुढील सुरांचे “तादात्म्य” आणि स्वरविस्तारीकरण आवश्यक,अशा उतरंडीवर गाणे सादर व्हावे लागते. अर्थात, कवीच्या शब्दातील आशय सर्वात महत्वाचा!! सुगम संगीताला “नावे” ठेवण्याआधी या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. इथे एकाही क्षणाच्या चुकीला मान्यता नाही आणि प्रत्येक क्षण हा “सुरीला” असावाच लागतो, अगदी “भुक्कड” चाल म्हटली तरी!!
या गाण्याची सुरवातच मुळी, सारंगीच्या आर्त सुरांनी, जिथे कोमल रिषभ दिसतो, त्याने सुरु होते. वास्तविक, अहिर भैरव रागावर आधारित चाल आहे, परंतु जर का जरा बारकाईने ऐकले तर ध्यानात येईल, चालीला आधार म्हणून अहिर भैरवाचे सूर आहेत, म्हणजे, या रागातील, कोमल रिषभ आणि कोमल निषाद जरूर या चालीला व्याकूळता प्रदान करतात , केवळ रागाच्या मूळ सुरांचा “आधार” इतपतच इथे या रागाचे अस्तित्व आहे. सारंगीच्या पहिल्या आवर्तनातच रागस्वरूप लक्षात येते आणि “पुछो ना कैसे” या ओळीच्या आधीच्या आलापीच्या स्वरांतून, ती “ओळख” सिद्धीस जाते. अर्थात, हा झाला शास्त्रोक्त भाग.
आता, कविता म्हणून शब्द बघायले घेतले तर लगेच लक्षात येते, “पुछो ना कैसे मैने रैन बितायी, एक पल जैसे एक युग बिता, युग भी चैन, मोहे निंद ना आये” या ध्रुवपदातूनच नायकाच्या मनाची अवस्था ध्यानात येते. एक गंमत बघण्यासारखी आहे, या ओळीत, “पुछो” या शब्दावर अधिक जोर आहे, म्हणजे, “मैने रैन कैसे बितायी”, ये मत “पुछो”!! इथे संगीतकाराची शाब्दिक जाण दिसते. शब्द तुमच्यासमोर जेंव्हा येतात, तेंव्हा कुठल्या शब्दाला किती महत्व द्यायचे आणि ते महत्व सुरांतून कसे दृग्गोचर करायचे, हे रचनाकाराला प्रथम ठरवावे लागते आणि त्यानुसार रचनेची बांधणी करावी लागते. इथे “पुछो” या शब्दाला महत्व दिल्यावर, मग पुढील स्वररचना या शब्दाच्या सुरांबरोबर विस्तारत जाते, जसे, दुसरी ओळ ऐकताना समजून येते. “युग भी चैन मोहे निंद ना आये, या ओळीत, “चैन” शब्दावर जे स्वरांचे वळण आहे, ते सुरवातीच्या “पुछो” या शब्दाचे जे सूर आहेत, त्याच्याशी जवळीक साधतात आणि इथे चाल सिध्द होते!!
भारतीय संगीताचे एक वैशिष्ट्य म्हणता येईल, स्वरांचे कितीही विस्तारीकरण केले तरी त्या आवर्तनाचा शेवट, अखेर पहिल्या सुरांशी येउन पोहोचतो!! या पार्श्वभूमीवर वरील विवेचन बघावे. गाणे, सरळ सरळ संयत आणि व्याकूळ भावनेशी जोडलेले असल्याने, पार्श्वसंगीत देखील तसेच रचलेले आहे म्हणजे, ध्रुवपदानंतर लगेच बासरीचे संथ सूर आधीच्या रचनेला भरीवपणा देतात. मघाशी, मी म्हटल्याप्रमाणे, इथे प्रत्येक क्षण महत्वाचा असतो, तो या दृष्टीने, पहिल्या कडव्यानंतर बासरीची लकेर आहे (लकेर हा साहित्यिक शब्द!!) हि काही सेकंदापुरती आहे पण, चालीच्या सुरवातीचा जो सांगीतिक वाक्यांश आहे, त्याचाच विस्तारित पण परिपूर्ण जोड आहे, काही सेकंदच हे बासरीचे सूर वाजतात पण, ते सूर आधीची व्याकुळता अधिक परिणामकारक करतात.
पहिल्या कडव्याचे शब्द आहेत, “एक जले दीपक, एक मन मेरा; फिर भी ना जाये मेरे घर का अंधेरा,तरपत तरसत उमर गवाई” परत ध्रुवपदाकडे!! इथे, जेंव्हा पहिली ओळ परत गायला घेतली जाते, तेंव्हा छोटीशी हरकत आहे (आलापीयुक्त). सुगम संगीतात improvisation करायला फारसा वाव मिळत नाही, असा नेहमी आक्षेप घेतला जातो परंतु जर का गायक तयारीचा असेल तर अशाच लहानशा हरकतीतून, तो आपले अस्तित्व दाखवून देतो. ही हरकत तशी लहानच असते पण त्या लयीच्या अंगाने जाताना, घ्यायची असते. थोडक्यात, महारस्त्यावरून चालताना, मध्येच क्षणकाल बाजूच्या पायवाटेवर दोन पावले टाकून परत “मूळ” रस्त्यावर येण्यासारखे असते!! हे लिहायला फार सोपे आहे परंतु गळ्यातून काढणे अतिशय अवघड असते!!
“ना कही चंदा ना कही तारे, ज्योत के प्यासे मेरे नैन बेचारे; भोर भी आस की किरन ना लाये” या ओळीच्या आधी देखील मधल्या “भागात” परत बासरीचे सूर आहेत आणि प्रथमक्षणी ऐकताना, त्यात सारखेपणा आढळतो पण तसा तो नाही. सारखेपणा जाणवतो कारण, बासरीचा सुरवातीचा सूर ह्या त्याच लयीत घेतलेला आहे परंतु पुढील क्षणात, सुरांचे वळण वेगळे होते पण काय होते, सुरवातीचा सूर वरच्या पट्टीत असल्याने, लगेच ध्यानात आणि मनात बसतो आणि त्या ध्वनीच्या नादात पुढील सुरांकडे आपले लक्ष फारसे जात नाही आणि ते सुरांचे वैभव नजरेआड केले जाते. इथे आणखी एका वैशिष्ट्याकडे आपल्याला बघायला हवे आणि ते वैशिष्ट्य सुगम संगीताचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून मानता येईल.
जरी, स्वरविस्तार मर्यादित असला तरी, इथल्या प्रत्येक शब्दातील अक्षराला फार महत्व असते आणि जाणकार गायक, ते महत्व नेमकेपणाने जाणून असतो. शब्दातील शेवटचे अक्षर तुम्ही स्वरांतून कसे बाहेर काढता आणि त्या ओळीचा समारोप करता, इथे गायक म्हणून तुमची प्रतिभा किंवा विचार दिसतो, जो लता, आशा किंवा किशोर यांच्या बाबतीत ठामपणे दिसतो. मुळात, हि “शब्दप्रधान” गायकी त्यामुळे शब्द उच्चारताना, केवळ आशय ध्यानात घेणें इतकेच आवश्यक नसून, तो आशय स्वरांतून व्यक्त करणे महत्वाचे असते आणि इथे बरेचसे गायक दुर्लक्ष करतात. या गाण्यात, मन्नाडे यांनी तेच केले आहे. प्रत्येक ओळीचा शेवट करताना, “पुछो” शब्दाचे सूर ध्यानात ठेऊन, समारोप केलेला आहे आणि त्यामुळे रचना कुठेही विसविशीत न होता, समेच्या मात्रेकडे आपले लक्ष कायम राहील याची दक्षता घेते.
संगीतकार सचिन देव बर्मन यांची हि रचना!! काय अप्रतिम रचना आहे!! ऐकताना साधी, सरळ वाटते परंतु जरा बारकाईने ऐकली, तर चालीतील “खाचखळगे” स्पष्ट दिसतात. कुठेही, कुठलेही वाद्य जरादेखील प्रमाणाबाहेर वाजले जात नाही – एकदा का चालीचा आराखडा पहिल्या आवर्तनात सिद्ध झाला की पुढे तो आराखडा भरीव कसा करायचा, इथे सचिन देव बर्मन यांचे कौशल्य दिसते. वास्तविक ३ मिनिटांचे गाणे आहे, पण चालच अशी अद्भुत आहे की गाणे संपल्यानंतर बराच वेळ सूर कानात रेंगाळत राहतात आणि गाण्याचे सूर “अहिर भैरव” रागात आहे, असल्या तांत्रिक तपशिलाची गरजच भासत नाही. कानात राहते ती, मन्नाडेच्या स्वरांची अलौकिक व्याकुळता!! सुगम संगीताचे वेगळे लक्षण ते कुठले?
No comments:
Post a Comment