एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापासून, विशेषत: महाराष्ट्रात बरेच विचार मन्वंतर सुरु झाले, ज्याची मुहूर्तमेढ न्यायमूर्ती रानडे यांनी केली.हा तसे पहिले गेल्यास इतिहास आहे आणि त्याच दृष्टीकोनातून,पण कसल्याही भावनाविवशतेच्या आहारी न जाता, अत्यंत तठस्थ वृत्तीने लिहिलेले हे पुस्तक आहे. मुळात, तळवलकर हे अत्यंत गाढे,व्यासंगी आणि निस्पृह वृत्तीचे संपादक असल्याने, पुस्तकात कुठेही अनावश्यक फापटपसारा नाही. अगदी नेमके शब्द आणि अचूक वाक्यरचना, या गुणांचा परिचय, हे पुस्तक वाचताना वारंवार येतो. त्यावेळेपासून, महाराष्ट्रात अनेक प्रवृत्ती उदयास आल्या, त्यातील काही प्रमुख म्हणजे, रानड्यांची विचारसरणी, नंतर आंबेडकरांची विचारसरणी वगैरे. या प्रत्येक विचारसरणीने, महाराष्ट्र त्या काळापुरता तरी ढवळून निघाला, भरला गेला. तसे पाहिले गेल्यास, कुठलीही विचारसरणी कधीच संपूर्णतया अचूक नसते पण कालानुरूप त्यात आवश्यक ते बदल करावे लागतात आणि त्या विचारांचा स्त्रोत पुढे न्यावा लागतो. आज, आपल्याकडे जी गोंधळाची परिस्थिती आहे, त्याचे मूळ बहुदा, याच विचारात आढळून येईल.
प्रस्तुत पुस्तकात, अशाच काही असामान्य व्यक्तिमत्वांची छाननी केलेली आहे.वाचताना, लेखकाचा वस्तुनिष्ठ दृष्टीकोन जागोजागी जाणवतो. कुठेही, व्यक्तीचे उदात्तीकरण केले गेले नाही, ही गोष्ट अधिकतर अधोरेखित होते आणि विशेषत: इतिहासासंबंधी लिहिताना तर, हा धोका वारंवार घडत असतो. पुस्तकाची सुरवातच मुळी, ब्रिटीश लोकांनी संपूर्णपणे भारत ताब्यात घेतल्यावर, राज्यावर आलेल्या “एल्फिन्स्टन” या गवर्नर पासून होते. त्यावेळची परिस्थिती, समज व्यवस्था, लोकांची मानसिकता आणि ती बदलण्यासाठी, एल्फिन्स्टनला घ्यावे लागलेले कष्ट इत्यादी सगळ्यांचा अतिशय रोचक भाषेत इतिहास मांडला आहे. जरी, इंग्लंडचे राज्य आले तरी, अनेक ठिकाणी संथानिक, त्यांची संस्थाने बाळगून होते(अगदी मांडलिकत्व स्वीकारून!!) त्यांच्याशी या माणसाने कशा पद्धतीने व्यवहार केला आणि हळूहळू, भावी बदलाची बीजे रोवली, हे, एक इतिहास म्हणून खरच वाचण्यासारखे आहे. समाज हा कधीच एका रात्रीत बदलला जात नसतो. त्यासाठी, राज्यकर्त्याला वेळेचे भान ठेवावेच लागते आणि याच भावनेची नेमकी ओढ, एल्फिन्स्टनला लागली होती.
या पुस्तकात, “रानडे”,”गोखले”,”आगरकर” आणि “टिळक” यांच्यातील साम्यस्थळांचा शोध घेतलेला आहे. आजपावेतो, रानडे ,गोखले, आगरकर एका बाजूला आणि टिळक एका बाजूला, अशी या नेत्यांची विभागणी केली गेली. मतेमतांतरे असूनदेखील, त्यांच्यात कितीतरी गोष्टी समान होत्या आणि त्यादृष्टीने फारसे कधीच लिहिले गेले नाही,हे लेखकाचे म्हणणे आपल्याला तात्काळ पटते. तसेच दिनशा वाच्छा आणि श्रीनिवास शास्त्री यासारख्या फारशा लोकप्रिय नसलेल्या तरीही स्वत:चा ठाम विचार असणाऱ्या नेत्यांबद्दल, अतिशय मनोज्ञतेने लिहिलेले आहे. विशेषत: दिनशा वाच्छा यांच्या कार्याबद्दल आज कुणालाच फारशी माहिती नाही. या माणसाने, मुंबई शहराच्या उभारणीच्या काळात, किती खस्ता खाल्ल्या, ढोर मेहनत घेतली आणि सतत, फिरोजशाह मेहता यांच्याच सावलीत वावरल्याने, प्रसिद्धीचा झोत अंगावर कधीही पडला नाही. असे असूनही आणि याची जाणीव असूनही, अंगावर घेतलेले काम तडीस न्यायचेच, याच विचाराने आयुष्यभर दगदग सोसली.प्रसंगी आर्थिक तोशीस देखील सहन केली. आपण नेहमीच प्रकाशात वावरणाऱ्या व्यक्तीबद्दल गोडवे गात असतो पण, ते व्यक्तिमत्व असूनदेखील, अशी कितीतरी व्यक्तिमत्वे मोठ्यांच्या समोर झाकोळून गेली तरी, आपला विचार तितक्याच ठामपणे मांडत राहिलेल्या काही व्यक्तींपैकी, दिनशा वाच्छा होते आणि याची साक्ष त्यांच्यावरील या पुस्तकातील लेखावरून पुरेपूर पटते.
तसेच काही प्रमाणात, श्रीनिवास शास्त्री यांच्या बाबत घडले. अत्यंत हलाखीतून शिक्षण घेऊन, उच्च विद्या प्राप्त केली आणि नंतर रानड्यांचे शिष्यत्व पत्करले. जोपर्यंत गोखले अग्रगामी होते, तोपर्यंत, “नेमस्त” पक्ष नेहमीच राजकारणात पुढे होता. दुर्दैवाने, नंतर, त्या पक्षाला त्या ताकदीचा नेता मिळाला नाही आणि हळूहळू, त्या पक्षाची विल्हेवाट लागली. गोखले यांना शास्त्रींनी गुरु मनोमन मानले होते आणि त्यानुरुपच त्यांनी आयुष्यभर आपली विचारसरणी ठेवली. कधीही आणि केंव्हाही “अतिरेकी” भूमिका ना घेता शांत चित्ताने समोर आलेल्या प्रश्नाचा विचार करायचा आणि त्याची उकल शोधायची, हाच त्यांच्या विचाराचा गाभा होता. या पद्धतीत, प्रश्नांची तड उशिरा लागत होती पण, जेंव्हा उत्तर मिळायचे, त्या उत्तराचा फार दूरगामी परिणाम होत असे.
दुदैवाने, गांधीच्या राजकारणात इतक्या वरच्या प्रतीच्या बुद्धिवादाला फारच क्षीण प्रतिसाद मिळाला आणि पुढेपुढे तर, या नेमस्त विचारांची हास्यास्पद हेटाळणी सुरु झाली. कुठल्याही प्रश्नांचा गुरुत्वमध्य शोधून, एकांगी निर्णय न घेता, प्रश्नाचा सर्वांगाने विचार करून, उत्तर शोधायचे, अशी थोडी वेळकाढू पण तितकीच टिकाऊ विचार पद्धत लोकांच्या फारशी पचनी पडली नाही.
महात्मा फुले आणि लोकहितवादी, हे नेते तर आता फारसे कुणालाच माहित नाहीत. फुले जरा तरी उच्चारले जातात, पण लोकहितवादी तर कधीच विस्मृतीच्या पडद्याआड गेले. एक गोष्ट, या लोकांच्या कथा वाचताना जाणवते आणि ती म्हणजे, या लोकांनी, कधीही केवळ स्वत:पुरता विचार न करता, नेहमीच समाज आणि राष्ट्र याच बाबींना प्राधान्य दिले. आजच्या राजकारणात, या बाबी जरी हास्यास्पद झाल्या असल्या तरी, त्या टाकाऊ कधीच नव्हत्या.
या पुस्तकात एक लेख मात्र फारच सुंदर आहे, आणि ती लेख – “शतकाची शल्ये”. जेंव्हा दुसरे महायुध्द संपले तेंव्हा, लोकांना असे वाटले की, या युद्धातील भयंकर संहाराने शहाणे बनून, समाज आता, शांततेच्या मार्गाने जीवन व्यतीत करील. पण, दुर्दैवाने, कुठलेच राष्ट्र या महायुद्धापासून कसलाच धडा नाघेता, हाती आलेल्या अति संहारिक शस्त्रांनी अधिकाधिक संहारात गुंतून गेला आणि झालेल्या नृशंस हत्येचाच पाढा पुढे चालविला. सावरकरांच्या ओळी इथे आठवतात.
“शेणात बांधती वाडे, नांदती शेणकिडे!!” या उक्तीची क्षणोक्षणी प्रचीती यावी अशा प्रकारे राजकारणी वावरत असतात आणि दिवसेंदिवस निर्लज्जपणाची नवीन उंची गाठतात. दुसरे महायुध्द त्यामानाने काहीच नाही, अशा प्रकारची हत्याकांडे घडत गेली आणि सामान्य माणूस गुमानपणे शरण होत गेला, हे विखारी शल्य किती दाहक आहे, याची हा लेख वाचल्यावर ओळख पटते.
तसेच, आज अति उग्र झालेला काश्मीर प्रश्न आणि त्याचे मूळ स्वरूप, याची सुंदरपणे छाननी केलेली आहे. मुळातच हा लेख वाचण्यासारखा आहे. म्हणजे काश्मीर प्रश्नाची उकल केलेली आहे, असे नन्हे पण निदानपक्षी तो प्रश्न मुळात कसा उद्भवला आणि त्याचे स्वरूप कसे विक्राळ होत गेले, हे सगळेच जरी चिंतनीय असले तरी समजून घेण्यासारखे आहे.
तसेच आंबेडकर आणि त्यांची विचारसरणी किती आणि कशी मूलगामी आहे आणि तसेच त्यात किती उणीवा आहेत, याचे सम्यक दर्शन त्यांच्यावरील लेखातून घडते. मी, मघाशी म्हटल्याप्रमाणे, कुठलीच विचारसरणी ही काळाच्या उरावर ठामपणे आपले पाय रोवून उभी राहू शकत नाही. त्या, त्या काळाच्या गरजेनुसार नवीन विचारसरणी उदयाला येत असते. काळ आपला मार्ग आक्रमित असतो आणि त्यानुरूप प्रश्नाचे स्वरूप बदलत असते. आपल्याकडे तितका लवचिकपणा कुणी नेत्यांनी अजूनपर्यंत दाखवलेला नसल्याने, आपले राजकारण, अर्थकारण अधोगतीला जात राहिले.
राजकारणासारख्या अत्यंत कुटील आणि रुक्ष विषयावर किती वाचनीय लेखन होऊ शकते, याचा हे पुस्तक एक सुरेख पुरावा आहे. मी, हे इतके लिहिले, तेंव्हा ही माझी समीक्षा नव्हे. तितका माझा अभ्यास देखील नाही. पण, पुस्तक वाचताना जे काही मला जाणवले, ते शब्दांत मांडण्याचा एक प्रयत्न.
No comments:
Post a Comment