आपल्याकडे एक सवय फार जुन्या काळापासून चालत आली आहे आणि ती म्हणजे, कुठल्याही कलाकृतीचे मूल्यमापन हे भावनिक पातळीवर आणि वैय्यक्तिक दृष्टीकोनातून करायचे, त्यातून वेगळा पंथ हा अति क्लिष्ट भाषेत लिहिण्याचा झाला. त्यामुळे, सामान्य रसिक,कुठलीही कलाकृती कधीही फार खोलात न जाता, आस्वादू लागली. कलाकृती ही मनोरंजक असली तरी चालेल, कशाला उगाच अधिक खोलात जाऊन, चिकित्सा वगैरे जडजम्बाल गोष्टीत लक्ष घाला आणि याच वृत्तीने बऱ्याच वेळा खऱ्या उत्तम कलाकृतीकडे एकतर संपूर्ण दुर्लक्ष झाले किंवा अकारण सामान्य दर्जाच्या कलाकृती अति लोकप्रियतेच्या लाटेवर राहिल्या.
कलाकृती प्राथमिक स्तरावर मनोरंजक असणे आवश्यक असावेच पण तोच केवळ प्राथमिक निकष नसावा. त्यातूनच अकारण, परंपरेचे ओझे गाठीशी बांधून घ्यावे, असा विचार आंधळेपणाने स्वीकारला जातो. पण, यात एक बाब नेहमीच अंधारात ठेवली गेली आणि ती म्हणजे, कुठल्याही कलेला शास्त्राधार नसेल तर तिचे योग्य मूल्यमापन जमणे कठीण असते. हीच बाब, या प्रस्तुत पुस्तकात आस्वादाच्या अंगाने गाडगीळांनी, सविस्तर मंडळी आहे. सुरवातीच्याच प्रकरणात, त्यांनी परंपरेने चालत आलेली संकृत “रसव्यवस्था” कशी निकामी आणि टाकाऊ आहे, याचे नेमके दर्शन घडविले आहे. परंपरा आवश्यक असते आणि त्याच अनुरोधाने निरनिराळे प्रयोग आकारास येत असतात.पण म्हणून त्याचा काळाच्या ओघात किती अवलंब करावा आणि त्यातील त्रुटी निदर्शनास आणणे हे केंव्हाही योग्यच असते. गाडगीळांनी हेच उद्दिष्ट ठेऊन “रस आणि अनुभव” हे प्रकरण लिहिले आहे. कुठलेही नियम हे काळाच्या ओघात कितपत टिकतात आणि किती व्यवहार्य ठरतात, याची छाननी होणे नेहमीच गरजेचे असते. संस्कृती ही नेहमीच कालौघात बदलत असते आणि त्यानुसार निकष देखील बदलत असतात. फक्त, बदलायला अवघड असते ती आपली मानसिक वृत्ती. गाडगीळांनी याच दृष्टीकोनातून, पूर्वीची “रसव्यवस्था” आताच्या परिस्थितीत किती “टाकाऊ” झाली आहे, हेच निदर्शनास आणले आहे. बहुतेकांना, हे पहिलेच प्रकरण मान्य होणे अवघास जाईल पण जर का जरा मोकळ्या मनाने आणि पूर्वग्रह बाजूला सारून जर हे प्रकरण वाचले तर, लेखकाचे विवेचन नक्की पटण्यासारखे आहे.
“भाषा आणि साहित्य” या लेखात, लेखकाने, अत्यंत मुलभूत आशा विषयावर चितन केलेले आहे. “भाषा” म्हणजे काय, त्यातून व्यक्त होणारा आशय कसा व्यक्त होतो आणि आशयातून भावव्यक्ती किती गहिरी आणि वेगवेगळी असू शकते, याचा विचार केलेले आहे. भाषेला नाद असतो व त्याचा आपल्या मनावर परिणाम घडत असतो, तरीदेखील भाषा ही अक्षरांच्या समुच्चायाने बनत असते आणि त्या अक्षरांच्या मांडणीतून भाषेचे वैभव दृष्टीला पडत असते, हाच विचार या लेखात सतत जाणवत आहे. मग, त्या आशयातून निर्माण होणारी लय, त्या लयीच्या आधाराने रचनेचे वेगवेगळे प्रयोग आणि छंद, असे विषय या लेखात हाताळलेले आहेत.
नंतरचे प्रकरण म्हणजे स्वत:च्या विचारांची केलेली छाननी. एका भाषणाच्या अनुरोधाने, केलेले मनोगत, आपल्यालाच अंतर्मुख करू शकेल आणि आपल्याच मनात विचारांची आवर्तने निर्माण होऊ शकतील.
साहित्यात असलेले विचारांचे स्थान, उत्कटता आणि मूल्यमापन या विषयाचा धांडोळा पुढील ३ प्रकरणात आहे. मुळात, कुठलेही साहित्य हे, एक विविक्षित विचाराच्याच अनुषंगाने जन्माला येत असते, हे जर आपण मान्य केले तर मग पुढील बऱ्याच गोष्टी समजायला सुकर होतील. त्याच अनुरोधाने बोलायचे झाल्यास, विचार आणि त्यामागाने येणारी अनुभवाची समृद्धता ही जरी बरीचशी मानसिक घडणीवर अवलंबून असली तरी, त्यातून व्यक्त होणारे विचार हे नेहमीच त्या लेखकाचे वैचारिक जग किती समृद्ध आहे, तसेच किती प्रकारे विचार समृद्ध होऊ शकतो, याचे फार सुरेख विवेचन वाचायला मिळते, थोडक्यात, विचार प्रगल्भ झाले की भावनांना तोल मिळतो आणि बांधीवपणा साधता येतो.
बऱ्याच वेळा, असा विचार केला जातो की, नीतिमूल्ये कितपत ठाम असतात आणि काळाच्या ओघात नीतिमूल्ये टिकतात की वाहून जातात? अर्थात, जी मुलभूत नीतिमूल्ये आहेत, ती कधीच लयास जात नाहीत. बदलत असतात, अनुषंगिक आणि तात्कालिक मुल्ये पण गंमत अशी आहे की, मुलभूत कुठली आणि तात्कालिक कुठली, याचा योग्य समन्वय घातला जात नाही.या संदर्भात, गाडगीळ, “Aristotal”, “Plato” आणि “Richards” यांच्या विवेचनाचे उतारे देतात आणि आपला मुद्दा ठामपणे मांडतात. एक गोष्ट इथे मान्य करायलाच लागेल आणि ती म्हणजे, आपल्याकडील बहुतांशी वैचारिक साहित्य हे पाश्चात्य विचारवंतांकडून आलेले आहे.
याच विचाराचा परिपाक म्हणजे “साहित्य आणि अश्लीलता” हे प्रकरण. अजूनही, आपल्याकडे अश्लीलता ही सोवळ्यातूनच मांडली जाते. एक बाजूने अश्लीलता ही जीवनाचे अविभाज्य अंग मानले जाते पण त्याबद्दलचा विचार मात्र उघडपणे करायला समाजाची मान्यता नाही, अशी ही द्विधावस्था आहे. साहित्य हे भावनात्मक अनुभवांची सौंदर्यपूर्ण रचना करते अगर अनुभवांचे आकार शोधण्याचा प्रयत्न करते, ही भूमिका आता मान्य झाली आहे पण तरीही अश्लीलता हीदेखील त्याच अनुषंगाने येणारी भावनाच आहे, असे उघडपणे मान्य केले जात नाही आणि समाजावर अश्लीलतेने अनिष्ट कामोत्तेजक परिणाम होतात, ही भूमिका अर्धवट आहे.
त्यानंतर, गाडगीळ, लघुकथा, नवकथा अशा त्यांच्या प्रांगणातील विषयाकडे वळतात. आता, लघुकथा आणि नवकथा, या विषयातील त्यांचा अधिकात तर सर्वमान्य आहेच पण तरीही त्या विषयाची सैद्धांतिक मांडणी आणि त्या काळापर्यंत लिहिल्या गेलेल्या कथांचे सुंदर विश्लेषण केलेले आहे. नवकथा कुठे आणि कशी पूर्वीच्या कथांपेक्षा वेगळी आणि प्रगल्भ होत गेली, तसेच त्या कथेने आणखी कुठले वळण घेणे आवश्यक होते आणि ते घेण्यात नवकथा तोकडी पडली, याचे फारच सुरेख निर्देशन गाडगीळ यांनी केलेले आहे.
ग्रंथातील सर्वात विशेष रोचक भाग आहे तो, मर्ढेकर, इंदिरा संत आणि पु,शि.रेगे यांच्या साहित्याचे रसग्रहण. तसेच, समकालीन व्यंकटेश माडगुळकर यांच्या कथालेखानावरील २ दीर्घ लेख. हे सगळे लेख मुळातून वाचावे, इतके सुंदर लिहिले गेले आहेत. मर्ढेकरांच्या कविता कुठे आणि कशा प्रकारे युगप्रवर्तक ठरतात, तसेच इंदिरा संत आणि रेगे यांच्या कवितेतील असामान्य वेगळेपण दाखवून देतात. याच संदर्भात, मला, कै. माधव आचवल यांनी, त्यांच्या “जास्वंद” या समीक्षणात्मक पुस्तकात याच २ कवींवर लिहिलेले लेख आठवले. गाडगीळ काय किंवा आचवल काय, दोघेही आस्वादक भूमिकेचे पुरस्कर्ते तरीही दोन्ही लेखकांच्या पद्धतीत आणि विचारात किती फरक पडतो, हे खरोखरच वाचण्यासारखे आहे.
वास्तविक, व्यंकटेश माडगुळकर हे त्यांच्याच समकालीन लिहिणारे लेखक तरीही गाडगीळांनी यथायोग्यपणे साहित्याचा वेध घेऊन, नेमकी कुठे माडगुळकरांची कथा श्रेष्ठ ठरते आणि त्या कथा कुठे घसरतात, याचे सुंदर विवरण आहे. त्याचबरोबर श्री.ना.पेंडसे आणि काणेकर यांच्या साहित्यावर असाच सुरेख दृष्टीक्षेप टाकलेला आहे. कुठलाही लेखक कितीही उत्तुंग असला तरी तो लेखक कधीच सतत “उत्कृष्ट” दर्जाचे साहित्य कधीही लिहू शकत नाही आणि हीच दृष्टी गाडगीळांच्या लेखनात सतत दिसून येते. जेंव्हा पेंडश्यांच्या कथेवर प्रादेशिकतेचा आरोप झाला, तो आरोप किती बाष्कळ आहे, हे गाडगीळांनी सिद्ध करून दाखविले आहे. तसेच काणेकरांचे लघुनिबंध साहित्याच्याच निकषांवर किती श्रेष्ठ ठरतात, असे सोदाहरण पटवून दिले आहे.
शेवटचे प्रकरण, बंगाली लेखक शरदबाबू यांच्यावर आहे. शरदबाबू यांच्याबाबतीत २ बाबी प्रकर्षाने दिसून येत, एकतर, त्यांना कमालीचे आत्यंतिक चाहते मिळाले किंवा टोकाची भूमिका स्वीकारून, जहाल टीकाकार लाभले. त्यांच्यावर देखील प्रादेशिकतेचा ठसा मारण्यात आला आहे आणि तो किती अर्धवट ज्ञानावर आधारलेला आहे, हे गाडगीळांनी आपल्या विचाराने सिद्ध केले आहे. असो, यातील प्रत्येक विषयावर सखोल आणि दीर्घ लिहावे अशा ताकदीचा अभ्यास करणे जरुरीचे आहे, असेच मत मांडून गाडगीळांनी हा ग्रंथ संपविला आहे.
खरतर साहित्यातील कुठलाच विषय हा कधीही थोडक्यात आटोपता येत नाही. प्रत्येक विषयाला निरनिराळे विचारांचे घुमारे फुटत असतात, कालौघात, जुने विचार त्याज्य ठरत असतात, पण त्यातूनच नव्या विचारांची पालवी फुटते आणि तोच विषय वेगळ्या नजरेतून अधिक प्रगल्भ होत असलेला दिसतो. साहित्याच्या वैचारिक दृष्टीला नावे खाद्य पुरवणारा हा एक सुरेख ग्रंथ आहे. त्यांची सगळीच मते आपल्याला मान्य होतात असे घडत नाही पण निदान अस्तित्वात असलेल्या प्रश्नांना नवीन दिशा दाखविण्याचे काम नक्कीच हा ग्रंथ करून देतो. आज हा ग्रंथ प्रसिद्ध होऊन, ५० वर्षे होऊन गेली, काळानुरूप नवनवीन विचार साहित्यात प्रस्थापित होत गेले. ही प्रक्रिया कधीच न थांबणारी आहे आणि हेच गाडगीळ यांना सुचवायचे आहे.
No comments:
Post a Comment