Thursday, 19 June 2014

जगजीत सिंग – संयत गायकीचा मनोज्ञ अविष्कार!!



वास्तविक पहाता, जगजीत सिंग यांना जाऊन एक(च) दिवस झाला आहे.तेंव्हा त्यांची गायकी, संगीत रचना, इत्यादी बाबींबद्दल सखोल चर्चा जरा अवघडच होते. हा गायक असा होता की ज्याची “गझल” या विषयावर अत्यंत अव्यभिचारी निष्ठा होती.आयुष्यभर सतत “गझल” हेच अविष्काराचे माध्यम ठेवले. मध्यंतरी जगजीत सिंगने भजनाचा एक “अल्बम” काढला होता-साई भजनांचा पण तरीही हा गायक प्रामुख्याने ओळखला गेला तो गझल गायक म्हणूनच. वास्तविक, भारतात, गझल जर कुणी समर्थपणे रुजवली असेल तर ती बेगम अख्तर यांनी. त्या जेंव्हा मैफिलीत गायच्या, तेंव्हा मी वयाने फारच लहान होतो आणि त्यामुळे प्रत्यक्ष “मैफिल” काही ऐकणे झाले नाही.नंतर, तलत मेहमूदचे नाव प्रकर्षाने पुढे येते. पण, गझल खऱ्या अर्थाने लोकात प्रसिध्द झाली ती, मेहदी हसन भारतात आल्यावर. बेगम अख्तरच्या गायकीचा पाया हा “ख्याल” गायकीवर आधारलेला होता आणि आज जी त्यांची गाणी ऐकायला मिळतात, त्यावरून त्यांच्या आवाजाची कल्पना करता येते. तलत मेहमूदचा आवाज हा अति मृदू(जो उर्दू शब्दांची “अदब” व्यवस्थित राखतो) आणि हळुवार जातीचा होता. त्यानंतर, आला तो मेहदी हसन. शास्त्रीय संगीताचा व्यापक व्यासंग आणि, मुलायम हरकती, यामुळे त्यांची गझल लोकात लगेच प्रसिध्द झाली, तरीदेखील एकूणच गझलचे श्रोते हे बहुतांशी “वरच्या” वर्गातील अधिक होते. जगजीत सिंग आला आणि त्याने गझल सामान्य रसिकांच्या आवाक्यात आणून ठेवली.
अत्यंत मुलायम आवाज आणि तरीही सुरांशी कुठेही फारकत नाही, ताना अगदी हलक्या जातीच्या पण तरीही गळ्याचे नेमके “वजन” दर्शवून देणाऱ्या, अशा प्रकारे या गायकाच्या गायकीचे वर्णन करता येईल. वास्तविक पहाता, जगजीत सिंग यांनी, शास्त्रीय संगीताचे पद्धतशीर शिक्षण घेतले होते आणि तसे ते शास्त्रीय अंगाने गाऊ शकत(फारच कमी वेळा असा अनुभव मिळाला!!) पण तरीही शास्त्रीय गायकी, आपल्याला सामान्य लोकांपासून दूर ठेवील, कदाचित याच भावनेने असावे, पण त्यांनी आपली गायकी ही सामान्य रसिकाला समजेल आणि आनंद मिळू शकेल, अशाच धर्तीवर ठेवली होती. पण, त्यामुळे, त्यांच्या गायकीत नंतर नंतर, बराच “स्टायलाईज” झाला. नंतरच्या बऱ्याच रचना, ठराविक अंगानेच गेलेल्या आढळतात. गाण्याची चाल म्हणून बरेच वैविध्य आढळते पण गायकीचा अंगाने विचार केल्यास, काहीवेळा तोचतोचपणा जाणवायला लागला आणि याचे मूळ, हे त्यांच्या विचारात आढळते. त्यांना, त्यांची गायकी ही कधीच सामान्य रसिकांना अवघड वाटेल, अशी ठेवायची नव्हती आणि त्यातूनच “लोकानुनय” वाढला. हा त्यांच्या वरील “आरोप” त्यांनी कधीच खोडायचा प्रयत्न देखील केला नाही.
एक मात्र खरे, त्यांच्या चालीत कमालीचे वैविध्य होते. ऐकताना, चालीत सारखेपणा वाटायचा पण जरा बारकाईने ऐकले की, चालीतील मजा लक्षात यायची. बहुतेक रचना या रागदारीवरच असायच्या पण तरीही कुठेही रागाचे प्रदर्शन नसायचे. क्वचित कधीतरी, फार वेगळ्या धर्तीवरची चाल बांधलेली आढळायची. बहुतेक राग हे प्रचालीतच असायचे. उदाहरणार्थ, ललत रागावरील,”कोई पास आया सवेरे सवेरे”, किंवा बागेश्री रागातील “हजारो ख्वाइशे ऐसी” सारखी गझल ऐकावी. दुसरे, मला अतिशय आवडलेले वैशिष्ठ्य म्हणजे, एखादी गझल जर का दुसऱ्या गायक/गायिकेने गायली असली तरी देखील, स्वत:चे वैशिष्ठ्य म्हणून, त्याच प्रसिध्द गझलेला वेगळी चाल द्यायची. गुलजारबरोबर, “गालिब” ही सिरीयल करताना, गालिबच्या रचना घेणे अवश्यमेव ठरते. वास्तविक त्यातील काही रचना, पूर्वीच लता मंगेशकरांनी अजरामर केलेल्या असताना देखील, जगजीत सिंगने ते आव्हान अतिशय समर्थपणे पेलले. उदाहरणच द्यायचे झाल्यास, वर उल्लेखलेली “हजारो ख्वाइशे ऐसी” किंवा यमन रागातील “हर एक बात पे” सारखी अविस्मरणीय गझल, जगजीत सिंगने त्या गझलेचा संपूर्ण आकृतिबंध तसाच ठेऊन, स्वत:ची अशी वेगळी चाल तयार केली, की ज्यातून त्याच कवितेचा वेगळा अर्थ प्रतीत व्हावा!! या दोन्ही गझला खास करून पाठोपाठ ऐकाव्यात, म्हणजे मला काय म्हणायचे ते नेमके ध्यानात यावे. चाली संपूर्ण वेगळ्या धर्तीवर आहेत पण, कवितेच्या आशयाला कुठेही “धक्का” न पोहोचता, तीच गझल तितक्याच समर्थपणे रसिकांसमोर सादर करायची, ही बाब वाटते तितकी सोपी नक्कीच नाही. तसाच प्रकार, गुलाम अलीने त्याच्या अवघड शैलीत प्रसिध्द केलेली गझल,”कल चौदवी की रात थी”, ही गझल ऐकावी. याच गझलेच्या संदर्भात आणखी एक मुद्दा इथे मांडता येईल. ही गझल जरा शांतपणे ऐकावी. यात, दुसरा अंतरा जिथे येतो, तिथे,”कुचे पे तेरे छोडकर हम, जोगी बन जायेंगे हम” या ओळीवर, विशेषत: “जोगी” या शब्दावर जगजीत सिंग यांनी जी स्वरांची असामान्य “कामगत” केली आहे, ती खास करून ऐकावी. लय तशीच कायम ठेऊन, स्वर एकेक पायरी खाली आणत, अति खर्ज स्वरावर जेंव्हा “ठेहराव” घेतो, तो सूर, त्यांच्या गळ्याच्या ताकदीची साक्ष देण्यास पुरेसा आहे. इतका असामान्य “खर्ज” फार कमी वेळा ऐकायला मिळतो. असाच एकदा,एक मैफिलीत पंडित जसराज यांनी, “जोगकंस” गाताना लावल्याची आठवण आली. वास्तविक, आपल्याकडे एक गैरसमज फार प्रसिध्द आहे आणि तो म्हणजे, “आवाज” वरच्या पट्टीत लावणे, “भूषणास्पद” मानले जाते!! जितका पाचव्या सप्तकातील शेवटचा “सा” तीव्र लावला जाईल, असे गायचे असा, बहुतेक गायकांचा अट्टाहास असतो.वास्तविक, ध्वनिशास्त्र असेच सांगते की, जर का तुम्ही अति खालच्या पट्टीत जितका “समर्थ” खर्ज लावाल, तितका वरच्या पट्टीत आवाज लावणे अधिक सुलभ होईल. असे असताना, आजही आपल्याकडे,(बहुतेकवेळा, अकारण!!) वरच्या पट्टीत आवाज लावणे हे भूषण समजले जाते!! लोक देखील अशा स्वरांच्या कामगतीला कडाडून टाळ्या देतात. म्हणजे असे नव्हे की उच्चारवातील स्वराला काहीच “किंमत” नाही. ते तर भूषणास्पद नक्कीच आहे पण ते एकमेवाद्वितीयम नव्हे!! खर्जातील स्वर लावणे, ही गायकाच्या गळ्याची खरी परीक्षा बघणारे असते, ज्याला शास्त्रीय परिभाषेत,”मुर्घ्निस्वर” म्हणतात.
जगजीत सिंग यांच्या गायकीचे आणखी खास वैशिष्ठ्य सांगायचे झाल्यास, “शायरीला” नेहमी प्राधान्य. गझल गायन हे बरेचसे उपशास्त्रीय संगीताच्या वर्गात येते आणि त्यामुळे, बहुतेक गायकांना, गझल गायन म्हणजे स्वत:च्या गळ्याची “फिरत” आणि “ताकद” दाखवण्याचे साधन वाटते आणि या मोहाला बरेचसे प्रसिध्द गायक बळी पडलेले दिसतात. कधीतरी सरगम, मूर्च्छना आणि हरकती हे अलंकार मिरवायला ठीक आहे पण ते अलंकार आहेत, याचेच भान खूपवेळा विसरले जाते. वास्तविक, सरगम ही, पुढील तान कशी असेल, याची पूर्वकल्पना असते, निदान असावी आणि पुढील तान ही, त्या कवितेतील आशयाला अधिक विस्तारित करणारी हवी, याचेच भान विसरले जाते. कितीही झाले तरी आपण जी गायकी सादर करीत आहोत, ते उपशास्त्रीय संगीत आहे आणि रागदारी संगीत नव्हे, हाच विचार जगजीत सिंग यांच्या गायकीत नेहमी दिसून येतो. बहुतेकवेळा “अर्धी(च)” तान घ्यायची, इथे उस्ताद विलायत खान साहेबांचा विचार दिसतो. पण, ती तान, त्या शायरीतील आशयाला वेगळे परिमाण देणारी असावी, हाच विचार प्रामुख्याने दिसून येतो. त्यामुळे, सामान्य या गायकाचे गाणे रसिकांना “आपण” गाऊ शकतो, असा भास होतो आणि त्या मुळेच जगजीत सिंग हे प्रसिद्धीच्या लाटेवर आरूढ झाले. प्रत्यक्षात, त्यांची गायकी अतिशय अवघड आहे, त्या साठी शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास आवश्यक आहे, हेच ती गायकी आपण गाताना जाणवायला लागते.
दुसरे वैशिष्ठ्य मांडायचे झाल्यास, काळाबरोबर सुसंगत रहात, आपल्या रचना तयार करताना, पाश्चात्य वाद्यांचा समर्पक वापर. वास्तविक फार पूर्वीपासून गझल गायन म्हटले की, साथीला फक्त, तबला, हार्मोनियम, आणि फार तर सारंगी इतकीच वाद्ये ठेवायची असा प्रघात होता. जसजसे लोकमान्यता मिळायला लागली तशी जगजीत सिंग यांनी, पाश्चात्य वाद्यांचा वापर करायला सुरवात केली, पण ती वाद्ये देखील मेलडीच्याच अनुषंगाने ठेवली गेली. प्रसंगी “गिटार” किंवा “मेंडोलीन”,” पियानो” सारख्या वाद्यातून रागदारीची लय समर्थपणे आविष्कृत केली गेली आणि त्यामुळे, एकूणच गायनाला फार मोठे विस्तारित स्वरूप मिळत गेले. इथे, “पाश्चात्य” वाद्ये कशाला, असला बुरसटलेला प्रश्नच उद्भवत नाही, कारण आता तर, पाश्चात्य संगीतात देखील आपली वाद्ये सर्रास वापरली जातात. अगदी उदाहरणच द्यायचे झाल्यास, वर उल्लेखिलेल्या, “कोई पास आया, सवेरे सवेरे” या ललत रागावरील गाण्याची सुरवात ही चक्क “गिटार” आणि “मेंडोलीन” याच दोन वाद्यांनी होते, नीट ऐकले की आपल्या हेच लक्षात येईल. तोच रागातील “षड्ज-पंचम” भाव तितक्याच अप्रतिमपणे ऐकायला मिळतो.
असा हा प्रतिभासंपन्न गायक, आता आपल्यात नाही, ही जाणीव तर विषण्ण करणारी नक्कीच आहे पण, अशाच ऐका आर्त संध्याकाळी, कानावर गिटारचे परिचित सूर पडतात आणि, पुढे लगेच गुलजारचे असामान्य काव्य ऐकायला येते,”शाम से आंख मे नमी थी” आणि आपण नेहमीप्रमाणे स्वत:ला विसरून जातो.हेच जगजीत सिंग यांच्या गायकीचे आणि रचनेचे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल.

No comments:

Post a Comment