Wednesday, 18 June 2014

साउथ आफ्रिका – सुरक्षितता आणि मनोरंजन!!




साउथ आफ्रिका हा तसा 1st दर्जाचा देश मानला जातो. त्यामुळे, इथल्या सुविधा ह्या बहुतांशी उत्तम दर्जाच्या किंवा त्याच्या आसपास असतात. आता तुलना करायची झाल्यास, कमतरता नक्कीच आहे, जसे रविवार संध्याकाळी बाहेर जेवायला जायचे म्हणजे कर्मकठीण!! त्यामानाने आपली मुंबई कशी दिवसाचे २४ तास खिलवायला तयार असते!! मुंबईत रात्री-बेरात्री बाहेर रस्त्यावर पायी हिंडायला काहीच वाटत नाही पण, साउथ आफ्रिकेत असे पायी चालण्याचे नावदेखील काढायची सोय नाही. कधीकधी “कोंडवाडा” वाटावा, इतका एकांत असतो. मी, सेंच्युरीयन इथे राहात असताना, Eco Park या समृद्ध आणि प्रचंड Residential Complex मध्ये राहात होतो. तिथे भौतिक सुखासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. उत्तम हॉटेल्स, उंची मॉल्स, अत्याधुनिक व्यायामशाळा आणि त्यातील अप्रतिम पोहण्याचा तलाव, सुंदर वाचनालय, टेनिस तसेच इतर खेळ खेळण्यासाठी क्लब हाउस अशा सुविधांनी नटलेला परिसर पण, गप्पा मारायला शेजारचा माणूसदेखील उपलबद्ध नाही!! अर्थात, सोमवार ते शुक्रवार, सगळेच कामात बुडालेले असल्याने, तसे काहीच वाटत नाही. तसेच शनिवार आणि रविवार नेहमीच आपापल्या ग्रुपमध्ये व्यस्त असल्याने, तसा एकांत फारसा अंगावर येत नाही. पण, कधीतरी मुंबईची आठवण मनात उफाळून यायची. विशेषत: रात्रीचे जेवण झाले की मी, Complex मध्येच पायी हिंडत असे( याचे बऱ्याच गोऱ्या लोकांना विशेष वाटायचे पण ही माहिती काही महिन्यानंतर मला समजली!!) पण शेजारी हिंडताना, गप्पा मारायला कुणी नाही. मग, मनाशीच संवाद साधायची सवय लागली. तशी भारतातून बरीच पुस्तके आणली असायची, तसेच ऐकायला बरीच गाणी होती, घरातील टीव्हीवर काही भारतीय Channels बघायला मिळायची ( बहुतेक Channels वर आपल्या “सुप्रसिद्ध” हिंदी सिरियल्स असतात!!) पण तरीही रात्रीचा फेरफटका मला खूप आवडायचा. Complex मोठा असल्याने दोन, तीन फेऱ्या मारल्या की त्यात तासभर सहज निघून जायचा. इथेच मी राहात असताना, भारताने प्रथमच जिंकलेला T20 विश्वकप विजयाची धुंदी अनुभवली. माझ्या ग्रुपमध्ये मकरंद फडके म्हणून मित्र होता. मुंबईत त्याचा भाऊ, अविनाश फडके याची क्रिकेट क्षेत्रात बरीच ओळख असल्याने, त्याच्या ओळखीने, प्रथम डर्बन इथल्या, भारत आणि ऑस्ट्रेलिया यातील उपांत्य फेरीच्या सामन्याचे पासेस मिळाले होते. मी, मकरंद, आणि वैभव पोरे असे शनिवारी विमानानेच जोहानसबर्ग इथून डर्बनला दुपारी गेलो. आमच्या ग्रुपमधील बंटी (समर्थ शाह) आधीच डर्बन इथे कामानिमित्ताने असल्याने, त्याने आधीच पासेस मिळवले होते. डर्बनला पोहोचल्यावर, प्रथम जबरदस्त खाणे उरकून घेतले आणि नंतर स्टेडीयममध्ये गेलो. स्टेडीयम खचाखच भरलेले होते. सुदैवाने, युवराज सिंग प्रथम,नंतर धोनीने जो काही धुवांधार खेळ केला, त्याने आम्ही चौघे जाम खुश. सामना बघत असताना बियरचा आस्वाद घेणे, हा शब्दात न मांडता येणारा अनुभव आहे. त्या सामन्यात शेवटी भारत जिंकला आणि जो काही मैदानात आरडा-ओरडा सुरु झाला, त्या तोड नाही, अर्थात, दोन दिवसाने, अंतिम फेरीतील धुंदी काही वेगळीच!! वास्तविक वैभव दुसऱ्या दिवशी भारतात परतणार होता पण जसे भारत अंतिम फेरीत आला, हे नक्की झाल्यावर त्याने जाण्याचे पुढे ढकलले. सामना रात्री आठच्या सुमारास संपला आणि आमचे रात्री जोहानसबर्ग इथे निघायचे ठरले. मला तर बंटीची कमाल वाटली. अक्षरश: रात्रभर गाडी चालवली आणि आम्ही पहाटे चार वाजता मकरंदच्या Complex मध्ये आलो. तिथेच आम्ही आमच्या गाड्या ठेवल्या होत्या. वास्तविक शहरात मी बरेच वेळा रात्रीची गाडी चालवली होती परंतु  रात्रभरचे जागरण अंगावर घेऊन, गाडी चालवण्याचा पहिलाच प्रसंग!! तरीही आपला भारत जिंकला, याच धुंदीत गाडी हाणली (मकरंदच्या घरापासून माझे घर जवळपास ५० किलोमीटर्स दूर होते!!) आणि पहाटे घरात शिरलो आणि सरळ पलंग गाठला.
दुसऱ्या दिवशी दुपारी उठलो. लगेच मकरंदला फोन लावला आणि सोमवारच्या सामन्याचे कन्फर्म केले. एव्हाना, माझ्या इतर मित्रांना, आमच्या ग्रुपच्या हालचालीची माहिती कळली होती. अंतिम सामना, भारत आणि पाकिस्तान!! यापेक्षा वेगळी जाहिरात करायची गरजच नाही!! सोमवारी, इथे सार्जनिक सुटी असल्याने, शहरात प्रचंड उत्सुकता पसरली होती. दुपारी लवकरच जेऊन,  मकरंदच्या घरी आम्ही सगळे जमलो.तिथून स्टेडीयममध्ये गेलो. स्टेडीयम खऱ्याअर्थी खचाखच भरले होते, जिथे पाहावे तिथे भारतीय किंवा पाकिस्तानी!! तेंव्हा समजले की जोहानसबर्ग – प्रिटोरिया इथे किती आशियायी लोक राहतात!! सबंध सामनाभर नुसता आरडा-ओरडा चालू होता, त्यादिवशी मी जितका ओरडलो असेन इतका त्याआधी आणि नंतर कधीच नाही!! शेवटी आपण विश्वकप जिंकल्यावर तर धमाल करायला नुसते “उधाण” आले होते. भारत विश्वकप सामन्यात अंतिम फेरीत असावा आणि त्या सामन्यात जिंकावे आणि आपण साक्षी असावे, या आनंदाला दुसरी तुलना नाही. वास्तविक सामना संध्याकाळी उशिराने संपला पण आमचे “सेलिब्रेशन” रात्री उशिरापर्यंत चालू होते. त्या दिवशी बियरला जी “चव” आली त्याला दुसरी तोड नाही!! साउथ आफ्रिकेच्या वास्तव्यात ज्या आठवणी कायमच्या मनात राहिलेल्या आहेत, त्यातील विश्वकप विजयाची आठवण सर्वात पाहिली.
पण असे प्रसंग साउथ आफ्रिकेत तुरळक अनुभवायला मिळाले. नंतर, मी इथल्या मराठी मंडळात सामील झालो आणि त्यानिमित्ताने बरीच मराठी माणसे भेटायला लागली आणि निदानपक्षी मराठी बोलायची हौस भागवता येऊ लागली. इथे तसे मराठी फार भेटत नाहीत. २००० नंतर, इथे बरीच मराठी माणसे यायला लागली. अजूनही संख्या फार तर २०० ते २५० कुटुंबे राहात आहेत. अर्थात त्यामुळे, इथे कार्यक्रम फारसे होत नाहीत, जसे अमेरिका, युरप किंवा दुबई, सिंगापोर इथे होतात. खरतर इथली मराठी माणसे, हा वेगळ्या निबंधाचा विषय आहे. हली, इथे आपल्या हिंदी चित्रपटातील बरेच कलाकार येत असतात, शुटींगच्या निमित्ताने किंवा गाण्यांच्या निमित्ताने. गेल्या काही वर्षात सोनू निगमचे इथे बरेच कार्यक्रम झाले आहेत. मी देखील दोनदा हा कार्यक्रम पहिला होता. माझे जे पूर्वी मत होते, ते या निमित्ताने पक्के झाले. इथे लोकांना फक्त “तालाची” आवड आहे आणि तशीच आवड जपली आहे. “सूर” कसे आहेत, रचना कशी आहे, याकडे कुणाचेच लक्ष नसते. त्यामुळे, कितीतरी गाणी केवळ लयीच्या अंगाने ऐकण्यासारखी असतात, त्या गाण्यात देखील तालाचा भरमार उपयोग केला जातो आणि गाण्यांचा विचका!! अन्यथा इथे मनोरंजन म्हणजे मॉल्समध्ये भेटणे, तिथे गप्पा मारणे, कधीतरी सिनेमाला जाणे इतपतच असतो.
इथला सर्वात गंभीर प्रश्न आहे कायदा आणि सुरक्षा!! मला आजही आठवत आहे, १९९४ साली जेंव्हा साउथ आफ्रिका इथे आलो तेंव्हा, कितीतरी वेळा, मी मित्रांसह रात्रीचे बाहेर फिरायला जात होतो आणि तेंव्हा आमच्या मनाला कधीच सुरक्षिततेचा प्रश्न शिवला नव्हता. इथे १९९७ नंतर कायद्याचा प्रश्न अति उग्र स्वरूप धारण करायला लागला आणि अत्यंत अल्प काळात, कॅन्सरप्रमाणे सगळ्या देशाला विळखा घालून बसला. तरीही सुरवातीला, Robbing, Mugging इतपतच गुन्ह्याचे स्वरूप होते पण, इतक्या लगेच खुनांपर्यंत पोहोचले की जोहानसबर्ग, प्रिटोरिया तर सोडूनच द्या, पण डर्बन, केप टाऊन सारख्या शांत शहरात देखील त्याचा प्रादुर्भाव झपाट्याने झाला. संध्याकाळी उशिरापर्यंत समुद्र किनारी फिरणे जवळपास संपल्यातच जमा झाले!! अगदी मॉल्समध्ये देखील दरोडे, काही देखण्या मुलींवर बलात्कार अशा घटना नित्यनेमाने घडायला लागल्या. मुळातच समाजात स्वैर वागणूक पहिल्यापासूनच अस्तित्वात होती, आता त्या वृत्तीला वेगळेच खतपाणी मिळायला लागले.
इतके दिवस, मी रोजच्या वर्तमानपत्रात नेमाने बातम्या वाचीत होतो, तसा एक प्रसंग खुद्द माझ्यावर गुदरला होता. २०११ साली, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील शुक्रवारी, सकाळी, मी, माझ्या ऑफीसमधील एक सहाध्यायाला बस स्टेशनवर ०८.०० सुमारास सोडायला गेलो होतो. त्याला मी सोडले, आणि परत गाडीत येऊन बसलो आणि कुणीतरी माझ्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. त्या आघातात, माझा डावा  पाय, गाडीच्या ब्रेकवर आपटला आणि ते हाड माझे कायमचे दुखावले गेले. जसा डोक्यावर प्रहार झाला, त्याक्षणी माझ्यावर हल्ला झाला, याची जाणीव झाली. त्याक्षणी, मी प्रसंगावधान राखून, मी ऑफीसमध्ये फोन करून हल्ल्याची बातमी कळवली आणि पुढील क्षणी माझी शुद्ध हरपली. त्यानंतर मला जाग आली ती, चार तासाने!! माझ्या ऑफीसमधील मित्रांनी मला अक्षरश: उचलून गाडीत घातले आणि आणले. मला, हा प्रचंड मानसिक धक्का होता. इतकी वर्षे, काही लोकांकडून, वृत्तपत्रातून बातम्या कळत होत्या पण आज, प्रत्यक्ष माझ्यावर असा जीवघेणा प्रसंग ओढवला होता. त्याही परिस्थितीत , संध्याकाळी, मी गाडी चालवत घरी आलो. घरी आल्यावर पायातील बूट काढले आणि अक्षरश: ब्रह्मांड आठवले!! तळपाय बटाटेवड्याप्रमाणे सुजला होता. पाय जमिनीवर टेकवत नव्हता. तशाच अवस्थेत, मी शेजारील एक भारतीय वंशाचा मित्र राहात होता, त्याला घरी बोलावले आणि सगळा प्रसंग सांगितला. तेव्हड्यात, त्याने. डोक्यातून मानेपर्यंत ओघळलेले आणि तोपर्यंत सुकलेले रक्ताचे ओघळ दाखविले  आणि माझ्या मनात थोडेसे चरकलेच. त्या संध्याकाळी, लगेच त्याने त्याच्या शेजारील एक काळ्या माणसाला बोलावले आणि तळपाय Pain Killer Lotion लावून, बँडेजमध्ये बांधला!! रात्रीचे जेवण अर्थात, मित्रांच्या मदतीवर!! शनिवारी सकाळी, तसाच लंगडत, अंघोळ केली आणि त्याचा मित्रांबरोबर हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे, X-Ray काढला आणि झालेली जखम ही फक्त खरचटलेले आहे, यावर समाधान मानून परतलो.एव्हाना, घरी कळवायला लागले, कारण या मारहाणीत, हल्लेखोरांनी, माझ्या अंगावरून पाकीट पळविले होते. त्यात, भारतातील बँकेचे ATM Card, PAN Card होते. भारतीय रुपये देखील होते. एकूणच, हा सगळा मला जबरदस्त मानसिक धक्का होता आणि त्यातून सावरणे जरा अवघडच गेले.
तशातच पुढे, एप्रिल महिन्यात, अशाच एक शनिवारी,मित्राची वाट पहाट असता, माझ्याच Complex बाहेर दुपारी, तीन काळ्यांनी मला घेरले!! प्रसंग मी लगेच ओळखला. “Don’t hit me or kill me!! Take whatever you want”, इतकेच बोललो आणि अक्षरश: तीन मिनिटांत, त्यांनी कार्यभाग साधला. परत एकदा, माझे पैशाचे पाकीट गेले!! तेंव्हा मात्र, मी मनानेच थोडासा खचलो!! लगोलग दोन महिन्यात, माझ्याच बाबतीत असे प्रसंग घडावेत, याचे संय्युक्तिक कारण सापडेना आणि मी भारतात परतायचा निर्णय घेतला. आता, हे सगळे माझ्याच बाबतीत घडावे, हा योगायोग!! Perhaps, I am the unfortunate victim!! असे सगळ्यांच्या बाबतीत घडते असे नाही. आता, माझाच मित्र मकरंद फडके, तिथे १९९२ पासून आजतागायत राहात आहे पण सुदैवाने त्याच्यावर असा अनुभव कधीच गुदरला नाही.
माझ्या मते, आपण भारतीय जरा “दिखाऊ” पद्धतीने वावरत असतो आणि ते सगळे तिथल्या काळ्यांच्या डोळ्यात येते. म्हणजे, मी असा दिखाऊपणा कधीच केला नव्हता पण असे जे प्रसंग इतरांवर गुदरतात, त्यामागे त्यांचा दिखाऊपणा, हे एक प्रमुख कारण असते. आपण जर का आपली राहणीमान मर्यादित स्वरुपात ठेवले आणि उगाचच सतत पार्ट्या, वगैरे प्रसंग साजरे केले नाही तर, शांतपणे आयुष्य काढता येते. अर्थात, माझ्यावर असे प्रसंग ओढवले म्हणून, साउथ आफ्रिकेला संपूर्ण दोष देणे चुकीचे ठरेल. असे प्रसंग मुंबईत घडत नाहीत का? मग इथे मी कशी कारणमीमांसा करेन? साउथ आफ्रिका, देश म्हणून खरेच अतिशय सुंदर, अप्रतिम आहे. भारतात ज्या सुखांना आपण वंचित असतो, तो सुखे तिथे सहज उपलब्ध होतात. भारताच्या मानाने, अधिक उंच स्तरावरील आयुष्य जगण्याची संधी विपुल प्रमाणात लाभते. आज इतकी वर्षे त्या देशात काढल्यानंतर, जर का माझ्या मनात हेच प्रसंग राहात असतील तर तो माझा कृतघ्नपणा ठरेल. त्या देशाने मला, आयुष्य कशाप्रकारे जगावे, हे नक्कीच शिकवले. आपले रोजचे जीवन हे सतत ताणतणावाचेच असते परंतू आठवड्याची अखेर ही कशा आनंदी प्रकारे करायची, हे मला साउथ आफ्रिकेने शिकवले. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे, वयाच्या ३५ वर्षांपर्यंत मी कधीच स्वयंपाक खोलीत पाऊल टाकले नव्हते पण, या देशात आल्यावर, आपले खाणे-पिणे हे आपल्यालाच करायला लागणार, तेंव्हा जेवण बनविणे, हे मला शिकावेच लागले. सुरवातीला बऱ्याच गमती-जमती झाल्या पण लवकरच सगळे अंगवळणी पडले. तसेच घरातील खर्चाचे नियोजन, हा भाग शिकायला मिळाला. जेवण बनविणे, सुरवातीला फारच त्रासदायक पण नंतर खूपच आनंददायी वाटायला लागले. इतके की नंतर तर मी बिर्याणी सारखे खास पदार्थ आवडीने करण्याइतके प्राविण्य मिळविले.
तिथे एकटाच राहात असल्याने, वाचनाची आवड संपूर्णपणे भागवता आली आणि संगीताचा छंद बराच वाढविता आला. आता उदाहरणच द्यायचे झाल्यास, आपल्या शास्त्रीय संगीतात, प्रत्येक रागाचा समय दिलेला आहे पण त्याचा नेमका प्रत्यय घ्यायचा, या उद्देशाने, मी सकाळचे राग संध्याकाळी तर रात्रीचे राग दुपारी ऐकायचे,असे प्रकार करायला लागलो, त्यातूनच माझी सांगितिक दृष्टी विस्तारित झाली. तसेच काही गोऱ्या लोकांच्या संगतीने, पाश्चात्य संगीताबद्दल बरेच शिकायला मिळाले, विशेषत: Jazz, Symphony हे संगीत कसे ऐकायचे, त्यातील नेमका उत्तम भाग कुठला, याची जाणीव झाली. एकदा डर्बन तर त्या आधी प्रिटोरिया इथे चक्क Philharmonic Orchestra हे कार्यक्रम प्रत्यक्ष बघितले. काही उत्तम इंग्रजी कादंबऱ्या मिळाल्या. ह्या गोष्टी मला भारतात राहून नक्कीच जमल्या नसत्या. मुळात, संपूर्ण वेगळ्या समाजाशी ओळखी झाल्या आणि सुदैवाने अजूनही मी त्यांच्याशी फेसबुकवर संपर्कात आहे. त्यामुळे, व्यक्तित्व विकास सारखे जडजम्बाल शब्द न वापरता, माझी विचार करण्याची वृत्ती अधिक विस्तारली. हे सगळे साउथ आफ्रिकेने मला शिकवले आणि तेही कुणाशी न मागता!! ही माझ्या आयुष्यातील फार मोठी जमेची बाजू आहे. अर्थात, त्याबद्दलची मोजावी लागणारी किंमत बरीच होती, पण ते इथे नको!!

No comments:

Post a Comment