मागील भागात, आपण, ‘गीत” या विषयावर थोडे विचार मांडले होते. याच संदर्भात, थोडे आणखी लिहून, मी, पुढील घटकाकडे वळणार आहे. गाण्यातील, शब्दांचे अविभाज्य स्थान आपण बघितले. साधारणपणे, असा सूर ऐकायला मिळतो की, गाण्यातील शब्द हे नेहमी, एका लयीत(खर तर, कुठलीही कविता हीं लयबद्धच असते!!) ज्याला, सांगितिक भाषेत,”गेयता” असे म्हणतात, असावी, त्यातील “व्यंजने” देखील मृदू वाटावीत, दोन शब्दांमधील जागा किंवा खटके देखील अति दीर्घ वा लयीच्याच आकारात बसावेत, अशी सर्वसामान्य कल्पना असते. अर्थात, या कल्पनेत काहीच चूक नाही. पण, म्हणून तीच कल्पना अति ताणून धरण्यात देखील फारसे हशील नाही. मागील लेखात, मी काही, ज्याला “कविता” असे म्हणता येईल, अशा गाण्यांचा उल्लेख केला होता. इथे, संगीतकाराच्या काव्याच्या व्यासंगाचा भाग अंतर्भूत होतो. संगीतकाराला, काव्याची नेमकी जण असस्वी, हे तर क्रमप्राप्तच आहे. पण, समजा, संगीतकाराला, कवितेच्या वेगवेगळ्या घाटांची समज असेल, तर मग, कुठलीही कविता हीं गाण्याच्या योग्य असू शकते. इथे मी, “असू शकते”, हे शब्द जाणीवपूर्वक वापरले आहेत. आधुनिक काळात, बऱ्याचवेळा मुक्तछंदात, अति जटिल, गूढ आणि दुर्बोध कविता आकाराला आल्या आहेत, की ज्या मुलत:च सुरांपासून दूर असतात, त्या कवितांना, सुरांचा भार अजिबात सहन होण्यासारखा नसतो. उदाहरणार्थ, कै. सदानंद रेगे, वसंत आबाजी डहाके यांच्या कविता. यांच्या कविता वाचताना, प्रथम लय शोधणे, हेच जरा अवघड असते, विशेषत: सदानंद रेग्यांच्या कवितेत, अशी वेळ खूप वेळा जाणवते. अशा कविता जाणूनबुजून सुरांपासून फटकूनच राहतात. आता, अशा कविता जर का उद्या संगीतबद्ध करायला घेतल्या तर, १] शब्दांवर अन्याय होण्याचा बराच धोका असतो, २] गाणे लोकांना समजणे(काव्याच्या अंगाने!!) जवळपास अशक्यप्राय ठरावे.
आधुनिक काळात, कविता गद्यप्राय अधिक झाली, असा एक टीकेचा सूर ऐकायला मिळतो, पण त्यात तसा काही अर्थ नाही. उलट, यमक, प्रासादिकांच्या नियमात जिथे कविता गुदमरत होती, त्या कवितेला मोकळा श्वास घ्यायला वेळ मिळाला!! इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे व ती म्हणजे, जेंव्हा गद्यप्राय कविता असा एक थोडासा हेटाळणीचा आवाज ऐकायला मिळतो, तिथे वाचकाला सगळे अति सोपे, सुबोध असेच वाचायला आवडत असते. किंबहुना, मुक्तछंद हीं कवितेला मिळालेली अलौकिक देणगी आहे, कविता अधिक अंतर्मुख, अधिक घाटदार, आणि अधिक आशयसंपन्न झाली. जाणिवांच्या कक्षेचा परीघ आधी विस्तारला गेला.
या बाबतीत, आणखी एक वादाचा मुद्दा नेहमी चघळला जातो. गीतकार हा कवी असतो की नाही? वास्तविक हा मुद्दाच चुकीचा आहे. याच आततायी विचाराने, कै. ग.दि. माडगुळकर, काही प्रमाणात, मंगेश पाडगावकर, किंवा हिंदीत साहीर, सारख्या गीतकारांवर नेहमीच कुचेष्टेची सावली पडली. आता आपण, एक विचार करूया, या गीतकारांच्या काही प्रसिद्ध रचना बघूया आणि त्या बघताना, त्यावरील सुरांचे आवरण झुगारून देऊया. माडगुळकर यांचे एक गाणे बघूया.
“दवबिंदुंचे मोती झाले, पर्णांच्या तबकात, आता जागे व्हा यदुनाथ” आता, इतकी सुरेख आणि चित्रदर्शी कल्पना ज्या गाण्यात आहे, त्या शब्दरचनेला कविता का म्हणू नये. इतकी तरल कल्पना, किती “कविता” म्हणून समजल्या जाणाऱ्या रचनेत दाखविता येईल. किंवा, साहिरची एक रचना बघूया,
“जाने क्या ढूढती रहेती हैं ये आंखे मुझमे, राख के ढेर में शोला हैं ना चिंगारी हैं” थोड्याशा मुक्तछंदाकडे वळणारी हीं रचना, “कविता” म्हणू कितीतरी श्रेष्ठ आहे. आपल्याकडे, जे काही विचित्र मानदंड तयार झाले आहेत, त्यातील हा एक प्रमुख. आपल्याकडे, कविता संग्रह आवर्जून निघतात, पण त्याला, “गीत” म्हणतात, त्या कवितांचे संग्रह फारसे निघत नाहीत. मराठीत एकच अपवाद, म्हणजे, मंगेश पाडगावकरांचा, “तुझे गीत गाण्यासाठी”. पाडगावकरांची कितीतरी गाणी हीं अप्रतिम कविता या सदरात मांडता येतील. खर तर, गीतकार आणि कवी, हे फक्त आपणच निर्माण केलेले शब्द आहेत, त्यात अर्थाच्या अनुषंगाने काहीही फरक नाही. याच विचाराने, हिंदीतील गुलजार या कवीकडे थोडेसे दुर्लक्षच झाले आहे.
असो, आता आपण, “गाणे” या प्रक्रियेतील, सर्वात महत्वाच्या घटकाकडे वळूया. संगीतकार, हा या सगळ्या आविष्काराचा कप्तान!! संगीतकार कवितेची निवड करतो(कधी कधी उलट प्रकार देखील होतो, म्हणजे आधी धून तयार होते आणि त्याबरहुकुम शब्द रचले जाता!!). अर्थात, संगीतकाराला काव्याची आवड असणे, हा भाग अंतर्भूत आहेच म्हणा. जितकी काव्याची आवड अधिक, तितकी त्याची संगीत रचना अधिक गहिरी आणि अर्थपूर्ण होते. अर्थात, हा काही ठाम नियम होऊ शकत नाही. पण, निदानपक्षी, संगीतकाराला शब्दांची योग्य जाण असणे, अतिशय निकडीचे ठरते. खरतर, सुगम संगीतात, असे काही ठोक नियम बांधता येत नाहीत पण, त्यामुळेच सावळा गोंधळ अधिक प्रमाणात पसरतो. मी म्हणेन ती पूर्व दिशा, अशी विचित्र त्रांगडी अवस्था खूप वेळा बघायला मिळते.
खरतर, आपल्यासारख्या रसिकांच्या दृष्टीने, आपल्यासमोर जे गाणे येते, तेच महत्वाचे, मग “आधी चाल, मग शब्द” काय किंवा “आधी शब्द, मग चाल” यापैकी कुठल्याही प्रकारे गाणे आकारले गेले असले तर काय बिघडते. बऱ्याचवेळा संगीतकाराला चालीचा आकृतिबंध आधीच सुचू शकतो आणि त्यानुरूप तो कवीला(गीतकाराला!!) गाणे लिहायला प्रवृत्त करू शकतो. इथे याबाबत एक सुंदर उदाहरण देता येईल. अशा भोसले यांचे “जिवलगा, राहिले दूर घर माझे” या अप्रतिम गीताची चाल आधी, हृदयनाथ मंगेशकराना सुचली, नव्हे त्यांच्या वडिलांच्या एका बंदिशीवरून कल्पना सुचली आणि मग ती बंदिश त्यांनी शांता शेळके यांना ऐकविली. त्या चालीच्या प्रेमात पडून, मग त्यांनी प्रस्तुत गाणे लिहिले. आता बघा, यात जरी उलट्या क्रमाने गाणे सिद्ध झाले तरी अखेरचा परिणाम किती समृद्ध करणारा ठरला. अशी बरीच गाणी वानगीदाखल सांगता येतील. मुद्दा संख्येचा नसून, प्रत्येक कलाकाराच्या वकुबाचा आहे. हिंदी चित्रपटात तर, अशी असंख्य उदाहरणे देता येतील. अर्थात, जर का संगीतकाराच्या हातात,चालीआधीच कविता पडली असेल तर, त्याला शब्दांचे नेमके वजन समजून घेता येते आणि त्यानुरूप चाल बांधता येते, हा भाग वेगळा. तरी देखील, कधी कधी शब्दानुरूप चाल करताना, चालीला मुरड देणे आवश्यक ठरू शकते आणि मग त्यानुसार, शब्दांची अदलाबदल सुद्धा आवश्यक ठरते, म्हणजे, जरी चालीआधी कविता हातात आली तरी, चाल तितकीच समर्पक बनू शकते, असे म्हणणे धार्ष्ट्याचे ठरू शकते. आता या संदर्भात थोडे आणखी बोलायचे झाल्यास, वरील गाण्याच्या संदर्भात, सांगायचे झाल्यास, असे माझ्या वाचनात आले की, प्रत्यक्ष गाणे तयार होताना, शांता शेळके यांना, कमीतकमी ३ ते ४ वेळा तरी शब्दात फेरफार करावी लागली. त्याच संदर्भात, त्याच हृदयनाथ मंगेशकरानी, त्या आधी आणि नंतरदेखील, “आधी शब्द, मग चाल” या राजमान्य रीतीने गाणी केलीच आहेत की. सुरेश भट, खानोलकर यांच्या कवितांना चाल लावताना, त्यांनी नेहमीचाच मार्ग धरलेला दिसतो.
No comments:
Post a Comment