क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत असंख्य खेळाडू होऊन गेले आणि होत राहतील, परंतु खेळावर “हुकुमत” गाजवणारे खेळाडू तसे फारच थोडे होऊन गेले, त्यांच्यात व्हिव रिचर्डस याचे नाव अग्रमानाने घ्यावे लागेल. खेळात आकडेवारी किती निरर्थक असते, याची प्रचीती व्हिवच्या खेळावरून सिद्ध करता येईल. किंबहुना, आकडेवारी हि अत्यंत क्षुल्लक बाब ठरते.
एक उदाहरण देतो, ओल्डट्रेफर्ड इथला १९७९ सालचा इंग्लंड विरुद्धचा एक दिवसीय सामना!! वेस्टइंडीजचे ९ खेळाडू बाद होऊन परतलेले आणि संघाची धावसंख्या २०० देखील नव्हती. सामन्यावर तोपर्यंत संपूर्णपणे इंग्लंडचा ताबा होता. अशावेळेस, रिचर्डसने, ११वा खेळाडू होल्डिंगला हाताशी धरून १०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आणि त्यात याचा वाटा ९० धावांचा!! इतक्यावर संपले नसून, ही भागीदारी बॉल्सच्या सम प्रमाणात केलेली आणि इनिंग संपली तेंव्हा व्हिव नाबाद १८९ धावा!! इंग्लंडचे साफ खच्चीकरण झालेले!! पुढील काम, होल्डिंग, मार्शल वगैरे गोलंदाजांनी पूर्ण केले आणि इंग्लंडवर पराभवाचा “वरवंटा” फिरवला!! इथे केवळ शब्द काहीच व्यक्त करू शकत नाहीत. मी, ती खेळी टीव्हीवर प्रत्यक्ष पहिली होती आणि घरात टीव्ही आहे, याची धन्यता अनुभवली होती. आता, १८९ धावांचा रेकोर्ड कधीच पुसला गेला आहे पण तरीही ती इनिंग मनात कायमची “ठाण” मांडून बसली आहे. आपण, “बेमुर्वतखोर” हा शब्द फार स्वस्त करून टाकला आहे पण, तो अशाच खेळींना शोभतो. “तुम्ही अप्रतिम गोलंदाज असला पण मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे” हे आपल्या खेळणे बजावून सांगणारा आणि गोलंदाजांची “खांडोळी” करणारा, हा फलंदाज होता. लक्षात घ्या, सचिनची २०० ची खेळी आणि पुढे सेहवागने त्याच्या विक्रम मोडताना केलेली खेळी, याचे असामान्यत्व कमी लेखण्याची काहीही गरज नाही परंतु, रिचर्डसची ही खेळी, त्यावेळची परिस्थिती, इंग्लंडकडे असणारे गोलंदाज, खेळाचे थंड वातावरण ( सामना चालू असताना, वातावरणात धुके पसरलेले होते, ज्यायोगे “स्विंग” गोलंदाजी अधिक परिणामकारक होते!!) या बाबींचा विचार करता, रिचर्डसची इनिंग केंव्हाही असामान्यच ठरते.
दुसरे उदाहरण देतो, आता नक्की साल आठवत नाही पण, इंग्लंडशीच खेळताना, स्वत:च्या गावात टेस्ट सामना होता, दुसऱ्या इनिंगमध्ये भरभर धावा करून, चौथी इनिंग इंग्लंडला खेळायला लावायची, या उद्देशाने, वेस्टइंडीजने फलंदाजी सुरु केली. २ बळी गेल्यावर रिचर्डस मैदानात आला आणि पुढील केवळ ५६ चेंडूत शतक झळकवून, इंग्लंडची राखरांगोळी करून टाकली, सामना अर्थात वेस्टइंडीजने जिंकला, हे सांगायला नकोच. अजूनपर्यंत हा त्याच्या नावावर विक्रम आहे. प्रश्न आकडेवारीचा अजिबात नाही तर स्वत;च्या बळावर सामन्याचा रंग पालटून, होत्याचे नव्हते, करून टाकायची क्षमता याच्या अंगात होती. ही खेळी देखील, मी पहिली आहे.
याच्या खेळाचा डौल काही वेगळाच होता. मैदानावर यायचा, तो अशा आविर्भावात, ” आता मी खेळायला आलो आहे, तेंव्हा इथे माझेच राज्य चालू राहणार”!! केवळ घणाघाती खेळ, हे त्याचे वैशिष्ट्य नव्हते, तर त्याचे क्षेत्ररक्षण ही असामान्य कलाकृती होती. Outfield वर क्षेत्ररक्षण करताना बघणे, हा नयनरम्य सोहळा होता. हाताने चेंडू पकडून, तत्क्षणी चेंडू गरकन विकेटकीपरच्या ग्लोव्हजमध्ये फेकणे, ही हालचाल बघण्यासारखी होती. चेंडू फटकावलेला आहे पण, रिचर्डस क्षणात चेंडू अडवतो, अडवताना, पाठीला बाक देतो आणि त्या बाक दिलेल्या अबस्थेत चेंडू खांद्यातून मैदानाला समांतर असा विकेटकीपरकडे फेकतो!! सगळा एका क्षणाचा आविष्कार पण केवळ अफलातून!! खांद्यातून चेंडू फेकताना, त्याची नजर, चेंडूचा वेग आणिविकेटकीपरच्या ग्लोव्जमध्ये विसावलेला चेंडू!!
असाच एक सामना!! १९७९ मध्ये लॉर्डसवर रिचर्डस अशीच १४५ धावांची लाजवाब खेळी खेळला होता. Botham मैदानात चेंडू प्रचंड स्विंग करीत होता तर Willis चे चेंडू, फक्त विकेटकीपरच्या ग्लोव्जमध्ये विसावत होते. अशा वेळी रिचर्डसला स्फुरण चढते!! एका ओवरमध्ये, बोथमने Bouncer साठी चेंडू, खेळपट्टीच्या मध्यावर आपटला आणि पुढल्या क्षणी चेंडू सीमारेषेबाहेर!! बोथमचा बोलिंग रनअप देखील पूर्ण झाला नव्हता!! आणि रिचर्डस!! त्याच्या शरीराची हालचाल म्हणजे एक कलाकृती होती, उजवा पाय थोडा पुढे आणला, क्षणात bat फिरवली, ती Square Leg दिशेला म्हणजे ज्याला Hook म्हणतात तो फटका खेळला!! मुळात, वेगवान गोलंदाजाला पाय पुढे टाकून खेळणे, हेच खरेतर अति कौशल्याचे काम आणि इथे तर, गोलंदाजाचा रनअप संपायच्या आधीच चेंडू सीमापार!! बरे हा फटका एकदाच खेळला असे नसून, यापूर्वी आणि यानंतर अनंत वेळा रिचर्डस असा फटका खेळला आहे. चेंडू कुठे जाणार आहे, याची पूर्ण कल्पना त्याला असायची!! यात आणखी एक सौंदर्य दिसायचे. जेंव्हा तो हा फटका खेळायचा, तेंव्हा त्याची Bat आणि नजर, दोन्ही, शरीराबरोबर संतुलित असायचे आणि त्या फटक्यातून दिसायचा तो केवळ त्याचा “उद्दामपणा”!!
भारतातील जलदगती गोलंदाजाबाबत तर तो, कधी फारशी पायाची हालचाल करायचाच नाही, गरजच नसायची. एक उदाहरण देतो, १९८३ वर्ल्डकप फायनल!! रिचर्डस खेळत होता तोपर्यंत, कुणालाही भारताच्या विजयाची सुतराम आशा नव्हती, तेंव्हा त्याने फक्त ३८ धावांची खेळी केली. त्या खेळीत, त्याने मदनलालला एका षटकात २ चौकार मारले ते बघण्यासारखे आहेत. चेंडू खेळपट्टीच्या मध्यावर आपटलेला, रिचर्डस नेहमीप्रमाणे उजवा पाय पुढे टाकून आलेला, चेंडू थोडा लेगकडे जात आहे, हे लक्षात आल्यावर, त्याने त्याच अवस्थेत तो चेंडू, Square Leg ला फ्लिक केला आणि तो फटका व ती नजाकत, फक्त अनुभवण्यासारखीच आहे, शब्द दुबळे पडतात!! चेंडू जमिनीलगत सीमापार झाला आणि सगळे क्षेत्ररक्षक हतबल झाले होते!! गंमत म्हणजे, Square Leg आणि Long Leg इथे क्षेत्ररक्षक असताना देखील त्यांना चेंडू अडवण्याची देखील उसंत मिळाली नाही. मी हा सामना टीव्हीवर प्रत्यक्ष चालू असताना बघत होतो आणि हे दोन फटके पाहिल्यावर, माझ्या मनातल्या आशा तशाच विरून गेल्याचे अजूनही आठवते!! रिचर्डस बाद झाला आणि पुढे सामना भारताच्या बाजूने आला आणि भारताना इतिहास रचला!!
रिचर्डसला “दैवी” देणगी होती, असे म्हणणे म्हणजे त्या शब्दाचा अपमान आहे. दैवी देणगी संदीप पाटीलला देखील होती पण काय झाले!! अर्थात, एक बाजू मांडण्यासारखी आहे, जिथे विकेट स्पिनर्सना साथ देणारी असायची तिथे रिचर्डस थोडा कमी पडायचा!! नरेंद्र हिरवाणीने १६ बळी घेतले तो सामना आठवला की माझे म्हणणे पटू शकेल. कारणे देता येतील पण, जेंव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय सामने खेळता, तेंव्हा तिथे कुठलेही कारण नेहमीच कुचकामी ठरते. शेन वॉर्न किंवा मुरलीधरन समोर रिचर्डस कसा खेळला असता, हा विचार निश्चित मनोरंजक आहे.
दुसरा महत्वाचा विशेष इथे नोंदवावा लागेल. खेळात नेहमीच Offensive असणे शक्यच नसते आणि तिथे तुमचा डिफेन्स किती भक्कम आहे, हे महत्वाचे ठरते. वास्तविक, आपला सुनील गावस्कर या कलेत खऱ्याअर्थी “माहीर” म्हणावा लागेल. रिचर्डसचा डिफेन्स देखील असाच अनुभवावा, असाच होता. गोलंदाज, १५० च्या वेगाने चेंडू फेकत आहेत आणि प्रत्येक चेंडू, “आग” वाटावी असा अनुभव फलंदाजाला येत आहे, हे दृश्य क्रिकेटमध्ये नवीन नाही. रिचर्डसचा डिफेन्स बघा!! चेंडू बाउन्सर जरी नसला तरी खांद्याच्या उंचीवर आहे, अशा वेळेस, रिचर्डस, उजवा पाय मागे खेचतो, त्याचबरोबर शरीर चेंडूच्या रेषेत येते, येताना, हातातली Bat डाव्या हातात येते, उजवा हात फक्त आधारपुरता असतो आणि तो चेंडू फक्त पायाशी पडतो!! कुठे Bat ची कड घेतली आहे, चेंडू हवेत उडाला आहे, असे घडत नाही ( घडलेच नाही, हे चुकीचे, कारण रिचर्डस बाद देखील व्हायचा!!!) अशा पद्धतीने खेळणे, हे क्रिकेटच्या पुस्तकी नियमानुसार एकदम योग्य आणि ते रिचर्डसला अवगत होते, हे नक्की. समज, चेंडूची दिशा लेग स्टंप किंवा त्या दिशेला असली तर चेंडू सीमापार हे नक्की!! चेंडू जर ऑफस्टंपवर असेल तरच रिचर्डस डिफेन्स व्हायचा!! मधल्या स्टंपवरील चेंडू मिडविकेटपार सीमापार खेळायचा, हे फक्त सचिन वगळता, फारसे कुणाला जमले नाही!!
असेच एकदा, रिचर्डस ऑस्ट्रेलिया इथे मेलबर्न मैदानावर सामना खेळत होता, ऑस्ट्रेलियाचे लिली आणि पास्को खेळपट्टीवर “आग” ओकत होते. अशा वेळी, एका षटकात पास्कोच्या चेंडूचा अंदाज चुकला आणि रिचर्डस फसला, सुदैवाने Bat ची कड घेतली नसल्याने बचावला!! त्याक्षणी, पास्कोने त्याच्या गळ्यातील क्रॉसकडे निर्देश करून, रिचर्डसला तंबूत परतण्याची इच्छा व्यक्त केली!! रिचर्डसला तितकेच पुरेसे झाले आणि पुढील चारी चेंडू त्याने सीमापार फटकारले!! आणि ते अशा पद्धतीने “हाणले” की त्याची संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला दहशत बसली!! ही व्हिडियो देखील मी पहिली आहे!! जेंव्हा चौथा चौकार गेला, तेंव्हाचे रिचर्डसच्या चेहऱ्यावरील मग्रूर हास्य सगळी करामत दर्शवित होता. असा हा दहशतवादी फलंदाज होता. तो खेळत असताना, केवळ त्याचेच अस्तित्व मैदानावर असायचे आणि तोच मैदानाचा राजा असायचा!! उगीच नाही, त्याला “किंग रिचर्डस” म्हणतात!! खेळातील त्याच्या प्रत्येक हालचालीत डौल होता आणि त्याचे स्वामित्व होते. तो जे फटके खेळायचा, त्याच्यावर त्याच्या व्यक्तिमत्वाची “मुद्रा” होती. आमचे सुदैव असे, की हा खेळाडू आम्ही, त्याच्या पूर्ण भरात असताना पाहिला.
वास्तविक सचिन असामान्य खेळाडू नक्कीच आहे पण तरीही खेळाचा स्वत:चा असा डौल असतो, गोलंदाजावर दहशत बसवण्याची करामत करता येते, हे फक्त रिचर्डसलाच जमू शकले आणि त्याच्या काळातील वेगवान गोलंदाज बघता, त्याच्या कामगिरीला वेगळीच झळाळी मिळते. इथे सचिन कमी आणि रिचर्डस मोठा असला प्रकार अजिबात नाही परंतु खेळावर दीर्घकाळ परिणाम करणारा हा असामान्य कलावंत होता, हे कुणीही मान्यच करेल.
No comments:
Post a Comment