कुठलेही व्यक्तिमत्व हे कधीच एकरेषीय नसते. त्याला अनेक कंगोरे असतात आणि त्या कंगोऱ्यामधूनच त्या व्यक्तिमत्वाची ओळख आणि घडण बघायची असते.त्यातूनच त्या व्यक्तिमत्वाचे नावे पैलू दिसायला लागतात आणि खूपवेळा, आपल्या मनातील प्रतिमेला छेद जातो. हे नेहमीच आवश्यक आणि जरुरीचे असते. याच दृष्टीकोनातून, गोविंदराव तळवळकरांनी “सौरभ” ह्या पुस्तकात वेध घेतलेला आढळतो. बहुतेक व्यक्ती या त्यांच्या क्षेत्रात मानमरातब मिळवलेल्या आहेत आणि त्यामुळेच त्या व्यक्तीत्वांची काहीशी एकांगी ओळख आपल्या मनात ठसलेली असते. पुस्तक वाचल्यावर, आपण, ह्या व्यक्तीची माहिती गोळा करताना किंवा त्या व्यक्तींबद्दल मत बनवताना किती अर्धवट माहितीवर आधारित करीत असतो, याची ओळख होते.
पहिलाच लेख इंदिरा गांधींवर आहे. एक कठोर राजकारणी अशी ठाम ओळख असलेले व्यक्तिमत्व परंतु, त्यांचा वाचनाचा अपरिमित छंद नेहमीच दुर्लक्षित गेलेला, किंबहुना फारसे कुणालाच लक्षात येणार नाही, याची दक्षता घेतला गेलेला. सोनिया गांधींनी, त्यांचा आणि नेहरूंचा पत्रव्यवहार प्रसिध्द केला आणि इंदिरा गांधींची ही अप्रकाशित बाजू जगासमोर आली. नेहरूंचे ग्रंथप्रेम हे विख्यातच होते आणि तेच गुण, त्यांच्या कन्येत उतरले होते. इंग्रजी, फ्रेंच साहित्यात त्यांना अतिशय रुची होती आणि त्याबाबत, त्यांचे सतत वाचन चालत असे. हा सगळा तपशील, आपल्याला थोडासा अचंबित करतो. याचे मुख्य कारण, आपण, आपल्या मनात त्यांची जी प्रतिमा बनवली आहे, त्याला पूर्ण छेद देणारी ही बाब आहे. त्यानिमित्ताने, लेखकाने, हा पैलू लक्षणीयरीत्या लेखात मांडलेला आहे.
नंतरचा लेख आहे, गर्ट्रूड बेल या विलक्षण बाईबद्दल. समृध्द कुटुंबात जन्माला येऊन, पुढे दुर्दैवाने नियतीचे फटके सहन करायला लागल्याने, पुढील आयुष्य इराक सारख्या धुमसत्या देशात काढावे लागले. परंतु विपरीत परिस्थितीत देखील, आपली आवड आणि मनाचा कल ओळखून, बहुतेक सगळे आयुष्य त्या देशातील पुराण संस्कृतीचे उत्खनन करण्यात व्यतीत केले आणि त्याच संदर्भात सतत अभ्यासू वृत्ती जागी ठेऊन, त्या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण लिखाण करून जागतिक कीर्ती मिळविणे, हे सगळे वाचताना, आपणच चकित होतो. भारतीय लोकांना हिच्याबद्दल कितपत माहिती असेल, मला शंकाच आहे. या लेखाच्या निमित्ताने बगदाद शहर पूर्वी कसे होते, तिथली जुनी संस्कृती याची थोडक्यात पण रोचक प्रकारे ओळख, लेखक करून देतो.
साधारणपणे जगात अभिनय आणि बौद्धिक यातील नाते दुरावस्थेचेच असते. याला संपूर्णपणे वेगळी दृष्टी देणारा छोटेखानी लेख गिलगुड या असामान्य नटाबद्दलचा आहे. गिलगुड यांचा पिंड शेक्सपियर यांच्या नाटकांवर पोसलेला. तरीही, नव्या काळानुरूप सतत अभ्यासू वृत्ती जागी ठेऊन, प्रत्येक वेळी, काहीतरी नवीन शोधायचे, हाच या नटाचा ध्यास सतत वाचताना जाणवतो. या ध्यासाचीच छोटीशी आवृत्ती या लेखात वाचायला मिळते. कुठलीही कला ही सतत प्रवाहित असणे जरुरीचे असते अन्यथा त्यात साचलेपणा राहून सगळी कला गढूळ होण्याचा धोका असतो आणि याच विचाराचे प्रतिबिंब बघायला मिळते. मुख्यत: शेक्सपियर लिखित नाटकात काम करीत आल्याने, ऑथेल्लो, लियर इत्यादी भूमिकांचे, त्यांचे विचार आणि त्यानुरूप भूमिका साकारताना त्या भूमिकेची वैशिष्ट्ये, याचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. त्याचबरोबर, आपले सहाध्यायी, राल्फ रिचर्डसन, ओलीव्हीये, गिनेस या अभिनेत्यांबद्दलची मते, विशेष म्हणजे आपण कुठे कमी पडलो, याची कबुली, या सगळ्यामुळे, हा लेख अतिशय वाचनीय झाला आहे.
साधारणपणे जगात अभिनय आणि बौद्धिक यातील नाते दुरावस्थेचेच असते. याला संपूर्णपणे वेगळी दृष्टी देणारा छोटेखानी लेख गिलगुड या असामान्य नटाबद्दलचा आहे. गिलगुड यांचा पिंड शेक्सपियर यांच्या नाटकांवर पोसलेला. तरीही, नव्या काळानुरूप सतत अभ्यासू वृत्ती जागी ठेऊन, प्रत्येक वेळी, काहीतरी नवीन शोधायचे, हाच या नटाचा ध्यास सतत वाचताना जाणवतो. या ध्यासाचीच छोटीशी आवृत्ती या लेखात वाचायला मिळते. कुठलीही कला ही सतत प्रवाहित असणे जरुरीचे असते अन्यथा त्यात साचलेपणा राहून सगळी कला गढूळ होण्याचा धोका असतो आणि याच विचाराचे प्रतिबिंब बघायला मिळते. मुख्यत: शेक्सपियर लिखित नाटकात काम करीत आल्याने, ऑथेल्लो, लियर इत्यादी भूमिकांचे, त्यांचे विचार आणि त्यानुरूप भूमिका साकारताना त्या भूमिकेची वैशिष्ट्ये, याचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. त्याचबरोबर, आपले सहाध्यायी, राल्फ रिचर्डसन, ओलीव्हीये, गिनेस या अभिनेत्यांबद्दलची मते, विशेष म्हणजे आपण कुठे कमी पडलो, याची कबुली, या सगळ्यामुळे, हा लेख अतिशय वाचनीय झाला आहे.
डिकन्सची लोकप्रियता वादातीत आहे.आज इतकी वर्षे होऊन गेली तरी त्याच्या नावाची मोहिनी कमी होत नाही. तसेच जर्मनीच्या सांस्कृतिक जीवनातील गटेचे स्थान. दोन्ही व्यक्ती लेखक म्हणून कमालीचे प्रतिभाशाली. डिकन्सचे “पिकविक पेपर्स” तर कधीच जुने होणार नाही. त्यांच्या आयुष्याचा धांडोळा आणि त्यांची वैय्यक्तिक मते, या साक्षेपाने विचार या दोन्ही लेखात मांडलेला आहे. डिकन्स काय किंवा गटे काय, दोघांनी आपल्या समाजावर दीर्घकाळ गारुड केले होते. गटे तर नुसताच ललित लेखक नसून संगीत, तत्वज्ञान इत्यादी अनेक विषयात त्याची गती व्यासंगी होती आणि त्याचे पुरावे, त्याच्या संभाषणातून पडताळता येतात. गटेचे एक मत मात्र उल्लेखनीय आहे. त्याने शिलर या समकालीन लेखकाला इंग्रजी भाषा आत्मसात करायला सांगितली आणि त्यानिमित्ताने त्या भाषेतील साहित्याचा अभ्यास करण्याची सूचना केली होती.
ओमर खय्याम, मार्क ट्वेन,जॉर्ज ऑर्वेल,चेकोव्ह, हे सगळे अतिशय मान्यवर लेखक.प्रत्येकाची लिखाणाची शैली, विषयाची निवड, आशयाची अभिवृद्धी, सगळ्यांचे अतिशय सुंदर वर्णन त्यांच्यावरील लेखात वाचायला मिळते. खैय्यामवर असलेला सुफी संस्कृतीचा प्रभाव आणि त्यातून इतरांनी लादलेले आरोप,प्रत्यारोप, मार्क ट्वेनचे आयुष्य, ऑर्वेल याची विचारसरणी तर चेकोव्ह याच्याबद्दलची इतरांची मते, हे सगळे मुळातून वाचण्यासारखे आहे. त्याचबरोबर, या लेखकांच्या काळातील समाज, रीतीरिवाज, लोकांची विचारसरणी, सांस्कृतिक परिस्थिती या सगळ्याचे यथार्थ दर्शन घडते.
व्हासिली ग्रोसमन तर युद्धकाळातील लेखक, त्यामुळे त्याच्या आठवणी वाचनीय होतात, यात नवल ते काय!! रशियात १९१२ साली जन्माला आलेल्या लेखकाला दुसरे महायुद्धाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला पण आधी स्टालिनची राजवट संस्कारक्षम वयात अनुभवायला मिळाली. हा लेख वाचताना, मला आर्थर कोसलर यांची ” Darkness at Noon” ही असामान्य कादंबरी आठवली. तसेच छळवादी वातावरण, मानसिक घुसमट इत्यादी हिंसाचाराचे अतिशय थोडक्यात वर्णन वाचायला मिळते. आर्थर मिलर हे प्रामुख्याने अमेरिकेतील प्रख्यात नाटककार म्हणून ओळखले जातात आणि तसे ते नक्कीच आहेत. त्यांच्या “डेथ ऑफ ए सेल्समन” या नाटकाची पार्श्वभूमी वाचायला मिळते तसेच त्यांचा मर्लिन मन्रो बरोबरच गाजलेला विवाह. त्यानिमित्ताने, त्यांची, मर्लिन मन्रोबद्दलची मते वाचायला मजा वाटते आणि त्यांच्या तौलनिक विचारसरणीचा प्रभाव जाणवतो तसेच त्यांची उदार मतवादी प्रवृत्ती न्याहाळता येते.
Allan Bullock हे असेच युद्धकाळातील अतिशय गाजलेले लेखक. “हिटलर – ए स्टडी इन टिरनी” या जगप्रसिध्द ग्रंथाचे लेखक. हिटलर ही एक व्यक्ती नसून, एक प्रवृत्ती आहे, असे ठामपणे मांडणारा हा लेखक आहे. नंतर राजकारणात राहून देखील, आपली वाचन संस्कृती कशी टिकवता येते, नुसतीच टिकवता येते असे नसून वाढवता येते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा लेखक.
आपल्याकडे इतिहास म्हणजे बव्हंशी कीर्तन असते. ज्या काळाचा इतिहास आणि जी व्यक्ती त्यात असते, तिचे गुणसंकीर्तन याचेच बहुतांशी पाढे वाचायला मिळतात. परतू, इतिहास कसा तठस्थ वृत्तीने लिहायचा असतो, याचे अप्रतिम उदाहरण म्हणजे अमेरिकन लेखक केनान. विशेषत: सोव्हिएत रशिया आणि त्यांचे राजकारण, या विषयावर त्यांचा अधिकार खुद्द अमेरिकन मंत्रीमंडळात विचारात घेतला जात असे. उदार मनोवृत्तीचा आग्रहाने पुरस्कार करणारा आणि तसा होत नाही, म्हणून आयुष्यभर खंत करीत बसणारा सव्यसाची लेखक म्हणून कीर्ती दिगंत झाली. ते बराच काळ रशियात वावरले असल्याने, त्या राजवटीचा अभ्यास असणे, साहजिकच होते. त्या बाबतीत त्यांचे एक मार्मिक विधान वाचण्यासारखे आहे. “रशियन नेत्यांनी वैचारिक पवित्रा घेतला आहे परंतु, रशियनांचा मुळचा संशयी स्वभाव त्यामुळे लपलेला नाही!!” या एकाच वाक्याने स्टालिनच्या राजवटीचे संपूर्ण दर्शन व्हावे.
“अज्ञेयवाद्याचे मनोव्यापार” हा लेख मात्र प्रचलित लेखांपेक्षा थोडा वेगळा आहे. मानवाने विज्ञानाची कास धरल्यावर अनेक गोष्टी लयास जातील, धर्माचा प्रभाव कमी होईल अशी एक अटकळ बांधली गेली होती. परंतु, आधुनिक काळात या विचारसरणीचा किती दुरुपयोग केला गेला, याचे विवेचन वाचायला मिळते. धर्मनिष्ठांना संघटीत करून धर्मपीठांचा राजकारणासाठी उपयोग करण्याचे दिशेने अमेरिका आणि इतर देशांनी कसे पाऊल टाकले, याचे दर्शन घडते. त्यानिमित्ताने ज्या अंधश्रद्धा बलवत गेल्या, समाजाचे अधोगतीकरण कसे करण्यात आले आणि विज्ञानाने ज्या प्रवृत्ती वाढायला हव्या होत्या, त्याच्या नेमक्या विरुद्ध देशेने समाज व्यवस्था प्रस्थापित झाली, याचे फार विदारक चित्र वाचायला मिळते.
उदारमतवादी गालब्रेथ याच्यावरील लेख असाच सुंदर आहे. हल्लीच्या अति टोकाच्या विचारांच्या काळात, उदारमतवाद क्षीण झाला आहे, हे मान्य पण कधीनव्हे इतकी आजच्या काळात या वृत्तीचा गरज भासत आहे. भारतात, अमेरिकन सरकारचे राजदूत म्हणून आल्यावर नेहरूंशी झालेली जवळीक, त्यावेळचे राजकारण, आणि राजकारणाव्यतिरिक्त मानवी समाज, त्यांच्या मुलभूत गरजा याचा सम्यक विचार करणारे अभ्यासू व्यक्तिमत्व असेच गालब्रेथ यांच्याबद्दल म्हणता येईल. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे, त्यांनी अमेरिकन व्यवस्थेतील कमतरता नेमकेपणाने ओळखली होती. अर्थशास्त्र, साहित्य आणि संगीत अशा विविध विषयांवर त्यांचे तितकेच प्रभुत्व होते आणि विशेषत: सध्याचे सगळेच राजकारणी न्याहाळता, गालब्रेथ यांचे हे वैशिष्ट्य अधिक जाणवते.
शेवटचा लेख आहे तो आईनस्टीनवर. केवळ प्रतिभावंत शास्त्रज्ञ अशी ओळख करून न देता, बहुतेक सगळ्याच विषयात हा माणूस किती विचक्षणरीत्या विचार करायचा याचेच मर्म वाचायला मिळते. हिटलरच्या काळात कसे, जर्मनी सोडावे लागले, पुढे प्रथम जरी अमेरिकेने दखल घेतली नाही तरी नंतर कसा प्रतिसाद दिला, हे सगळेच वाचण्यासारखे आहे. अर्थात, त्यांची सगळीच मते स्वागतार्ह नाहीत, काही मते अत्याग्रही वाटतात तरी नजरेआड करावीत असे मात्र वाटत नाहीत.
तर अशी ही सगळी व्यक्तिमत्वे आहेत. वाचून झाल्यावर एकाच विचार मनात येतो, लेखकाने या सगळ्याच व्यक्तींवर दीर्घ लेखानात्मक निबंध लिहावेत. काही व्यक्तींना लेखक प्रत्यक्ष भेटला आहे, तेंव्हा त्या भेटीतून त्यांच्याकडे अधिक वाचनीय मजकूर, माहिती नक्कीच असणार. प्रस्तुत लेख हे ललित मासिकात “सदर” या स्वरुपात लिहिले गेले असल्याने, साहजिकच शब्दांची मर्यादा लेखकाला बाळगावी लागली असावी. अन्यथा काही लेख वाचताना, अचानक एखादा मुद्दा स्पष्ट होताना, कुठेतरी तसाच सोडला की काय, अशी शंका मनात येते. तरीही, या पुस्तकाच्या निमित्ताने, आपण सगळ्याच प्रथितयश व्यक्तींना आपल्याच चष्म्यातून बघत असतो आणि त्यानुरूप मते बनवीत असतो, पण ते किती चुकीचे असते, हेच पडताळून बघता येते. हेच या पुस्तकाचे लक्षणीय यश म्हणावे लागेल. लेखक मुलत: संपादक असल्याने, कुठेही अनावश्यक मजकूर नाही आणि त्यामुळे अल्पाक्षरी शैली अधिक सुंदररीत्या वाचायला मिळते.
No comments:
Post a Comment