Wednesday, 18 June 2014

बैय्या ना धरो – मदन मोहन




मी बरेच सिने संगीताचे रसिक बघितलेत, जे शक्यतो १९५० ते ६०, या दशकातील गाण्यांचे भोक्ते असतात!! भक्त असण्याबद्दल काही म्हणणे नाही परंतु त्यामुळे, जी गाणी त्यानंतरच्या काळात तयार झाली, त्या गाण्यांवर उगाचच नकारात्मक शेरा मारला जातो!! खरे तर गाण्याला असा कुठलाही काळ नसतो, चांगले गाणे आजच्या काळात देखील तितकेच सुंदर असते जितके वर निर्देशिलेल्या काळात असते. असेच प्रस्तुत गाणे आहे. साधारणपणे, १९७० साली “दस्तक” नावाचा नितांत रमणीय चित्रपट आणि त्या चित्रपटातील एक अविस्मरणीय गाणे.
वास्तविक, मदन मोहन हा खरोखर असामान्य ताकदीचा संगीतकार होता परंतु त्याला कधीही व्यावसायिक यश मिळाले नाही आणि तदनुषंगाने ! प्रसिद्धी!चित्रपटात केवळ सुंदर गाणी करून भागत नसते, त्याच्याबरोबर इतर व्यावसायिक आडाखे जुळवणे जरुरीचे असते आणि तिथे मदन मोहन कमी पडला!! त्यामुळे हिंदी चित्रपट संगीतातील असे काही असामान्य संगीतकार नेहमीच उपेक्षित राहिले, जसे सज्जाद (काही प्रमाणात याची वागणूक जबाबदार होती!!) जयदेव, खैय्याम(उमराव जान वगळता!!) इत्यादी.
हे गाणे तसे एखाद्या बंदिशिप्रमाणे बांधलेले आहे म्हणजे प्रत्येक ओळी मागोमाग काही हरकती, कुठे तुटक तान, मध्येच स्वर थांबवून लय थोडी लांबवायची, अशा “गायकी” अंगाच्या अलंकारांनी हे गाणे सजले आणि त्यामुळेच गायला फार अवघड झाले आहे.
“बैय्या ना धरो, ओ बलमा” या ओळीने गाणे सुरु होते. सुरवातीच्या स्वरमंडळाच्या सुरातून रचनेला सुरवात होते आणि पहिल्या ओळीतच “ना” हा शब्द गाताना ज्याला “पत्ती” म्हणतात (बेगम अख्तर या अलंकारात मशहूर होती) तसा किंचितसा “फाटलेला” स्वर लावलेला आहे (क्षणभरच आहे) आणि लगेच सतारीचा टणत्कार सुरु होतो (मदन मोहन “मुद्रा” असलेली सतार) आणि परत “ओ बलमा” परत घेतले जातात. इथे “ओ” हा शब्द हलक्या स्वरात “आकार घेऊन येतो!! परत हीच ओळ सुरु होते आणि तबल्याच्या ठेक्याला सुरवात होते. मघाशी मी म्हटले तसे, या गाण्यात, प्रत्येक ओळ हि लयीच्या वेगवेगळ्या अंगाने घेतली जाते ती ह्याप्रकाराने!!
पुढील ओळ आहे, “ना करो मोसे रा…” इथे लताबाईंचा आवाज कसा “वळला” आहे, तू ते ऐकण्यासारखे आहे. वास्तविक हे धृवपद आहे, म्हणजे दोनच ओळी परंतु प्रणयी गीत आहे, त्यामुळे स्वर आणि लय, यांचा अत्यंत अप्रतिम “खेळ” ऐकायला मिळतो. ही खासियत संगीतकार म्हणून मदन मोहन यांची आणि गायिका म्हणून लताबाईंची!!
गाण्यात फारशी वाद्येच नाहीत, सतार प्रमुख पण सतारीचे किती विलोभनीय अंग ऐकायला मिळते!! त्यामुळेच म्हणावेसे वाटते, चित्रपट संगीतात, सतारीचा वापर पूर्वापार चालत आलेला आहे परंतु मदन मोहनच्या गाण्यात जशी सतार ऐकायला मिळते, तशी इतर संगीतकारांच्या गाण्यात मिळत नाही. असे देखील असेल, मदन मोहनच्या गाण्यांना बहुतेकवेळा उस्ताद रइस खान यांची सतार असायची परंतु अखेर रचना तयार होते ती संगीतकाराच्या डोक्यातून आणि त्यानुरूप वाद्यमेळ सजवला जातो. कुठले वाद्य कशाप्रकारे वाजले पाहिजे, यावर शेवटचा अधिकार संगीतकाराचा!! त्यामुळे केवळ याच गाण्यात नाही पण, मदन मोहनच्या बहुतेक सगळ्या गाण्यात सतार हा अवश्यमेव घटक असतो आणि माझ्या माहितीप्रमाणे तिथे रइस खान यांचीच सतार वाजलेली आहे. कसदार वादक, वाद्यातून कशाप्रकारे स्वर काढू शकतो आणि त्यामुळे गाण्याला कशाप्रकारे “उंची” मिळते, हे जर ऐकायचे असेल तर मदन मोहन यांची काही गाणी निश्चित अभ्यासावीत!!
पहिले कडवे सुरु होते, “ढलेगी चुनरिया तन से”. ही ओळ जरा बारकाईने ऐकावे. ही ओळ दोनदा घेतली आहे परंतु दुसऱ्यांदा गाताना, “तन से” हे शब्द थोड्या खंडित लयीत परंतु तरीही संपूर्ण लयीचा अविष्कार दाखवला जातो!! फार मुश्किल गायकी आहे. “तन से” ३ वेळा गायला गेला आहे पण तरीही तिन्ही तऱ्हा वेगळ्या!! तसेच हे शब्द गायल्यानंतर छोटासा जीवघेणा आलाप आहे तो केवळ लताबाईच घेऊ शकतात!! तिथे दुसरा गळा पोहोचणेच अवघड आहे कारण हा आलाप आणि त्याआधीची “तन” शब्दावरील लय, ही शब्दाच्या पलीकडील भाव व्यक्त करणारी आहे आणि तिथे “श्रुती” म्हणजे काय, याचा थोडा अंदाज घेत येतो!! पुढील ओळ आहे, “हसेगी ये चुडिया छन से”. इथे देखील अप्रतिम संगीत वाक्यांश आहे. खरेतर या गाण्यात इतके सांगीतिक वाक्यांश आहेत, की ते ऐकताना, आपण अवाक होतो!! ही ओळ दुसऱ्यांदा गाताना, “छन” इथे गाणे क्षणभर थांबले आहे आणि ती शांतता देखील विलक्षण भारलेली आहे. क्षणभर इथे थांबून, लय परत मूळ पदावर येते. हे ऐकताना, आपल्यालाच कळून चुकते, इथे शब्द उपरे आहेत आणि आपल्या रसिकत्वाला फार मर्यादा आहेत!! “मचेगी झनकार” या शब्दाने पहिले कडवे संपते पण तरीही इथे “झनकार” शब्द गाताना “झन” आणि “कार” असा शब्द फोड घेतलेला आहे पण तो किती छोटा आहे म्हणजे मध्ये असा “आकार” आलापित घेतलेला आहे की लय म्हणजे काय, याचे प्रत्यंतर यावे.
“मोहे छोडो हाये सजना” हि दुसऱ्या कडव्याची पहिली ओळ!! इथे देखील अशीच अवघड गायकी ऐकायला मिळते. सगळे गाणे कसे संथ आलापित चाललेले आहे पण तरीही लय संतत धारेसारखी स्वरांतून वाहात आहे!! “मोहे छोडो” गाताना, प्रणयी छेडछाड तर दृग्गोचर होतेच परंतु “मोहे” ह्या शब्दामागील “खटका” (हा जाणवत देखील नाही इतका मृदू आहे) ऐकण्यासारखा आहे. इथे लय किंचित बदलते पण तरीही क्षणात “मूळ” पदावर येते!! केवळ अप्रतिम!! याच लयीत “जिया सीच उठाये सजना” लडिवाळपणे ऐकायला येते. पुढे, “राह मोहे निहार” म्हणताना, स्वर वरच्या सप्तकात जातो, पण ते स्वरांचे “जाणे” इतके सहज असते की सहज ऐकताना जाणवत देखील नाही की इथे रचना “कठीण झाली आहे!! मदन मोहनची गायकी अंगाची रचना इथे आणि अशाप्रकारे सिद्ध होते.
“मै तो आप बहेकी, चलू मै जैसे महेकी” इथे तोच लयीचा विक्षण खेळ आहे, “बहेकी” या शब्दावरची स्वरांची कलाकुसर ऐकताना, मला तर नेहमी भरजरी पैठणीच्या पदरावरील अप्रतिम कशिदाकाम आठवते!! इथे प्रत्येक स्वराला “किंमत” आहे आणि प्रत्येक सुरातून पुढील स्वराची “लड” ओघळली जाते!! कवितेतून मांडलेला संयत प्रणयाचा आशय स्वरांतून अधिक अंतर्मुख करतो. “महेकी’ शब्द स्वरांकित करताना, जणू त्या शब्दाची “महेक” आपल्याला यथार्थपणे जाणवेल, अशा प्रकारे गायली गेली आहे. सुगम संगीतात नेहमीच कवितेतील शब्द प्रथम, नंतर स्वरांची रचना आणि शेवटी गायन, असा क्रम असतो (कधीकधी स्वररचना आधी आणि त्यावर शब्दांचे कलम असा देखील प्रकार घडतो. परंतु घटक तेच असतात, फक्त क्रमवारी बदलते) “चमेलीयो के दार, बैय्या ना धरो” ह्या ओळीवर हे गाणे संपते!!
एखादी घट्ट विणीची बंदिश ऐकावी त्याप्रमाणे हे गाणे बांधले आहे. चारुकेशी रागाचे स्वर आहेत पण, राग इथे केवळ आधाराला आहे, रागदर्शन अजिबात अभिप्रेत नाही. हे गाणे, मी ऐकून आज जवळपास ४० वर्षे तरी नक्कीच झाली असतील. चित्रपट फार उशिराने बघितला परंतु आजही माझ्या मनावरून ह्या गाण्याची “गुंगी” काही उतरलेली नाही.

No comments:

Post a Comment