Thursday, 19 June 2014

युद्धनेतृत्व – दि.वि.गोखले



मराठीत तशी युध्द आणि युद्धशास्त्र या विषयावर फारच तुरळक पुस्तके आहेत.एकूणच, मराठी मन आणि माणूस,”युध्द” म्हटले की जरा बुजलेलाच असतो.त्यामुळेच आजही, आपल्या राष्ट्रीय सैनिकी व्यवस्थेत मराठी लोकांचा भरणा कमीच असतो आणि हे जरी कटू असले तरी वास्तव आहे. या वृत्तीचाच परिपाक असेल कदाचित, पण मराठीमध्ये “युध्द” या विषयावर काही ठराविक लेखक सोडले तर, फारसे साहित्यच लिहिले गेले नाही. त्यामानाने इंग्रजीत इतकी पुस्तके उपलब्ध आहेत की, कधीकधी कुठले हातात घ्यावे, याचा संभ्रम पडावा. आता थोडक्यात माझे म्हणणे मांडायचे झाल्यास, गेली अनेक वर्षे भारताच्या सीमा असुरक्षित झालेल्या आहेत, प्रसंगी प्रचंड रक्तसंहार झाला आहे, पण आजही,”पंजाब”,”आसाम”,”काश्मीर” किंवा “तामिळनाडू” या राज्यांच्या सीमाप्रश्नाबाबत आणि तदनुषंगाने तयार झालेल्या युद्धसदृश परिस्थितीवर, काही अपवाद वगळता, फारसे वाचायला काहीच मिळत नाही.
अशा, काहीशा उदासवाण्या परिस्थितीत, कै.दि.वि.गोखले यांचे “युद्धनेतृत्व” हा अतिशय सुंदर अपवाद ठरवा, इतका सुंदर ग्रंथ आहे. वास्तविक, दुसऱ्या महायुद्धाची भारताला काहीच झळ सोसावी लागली नाही, त्यामुळे, भारताला “युध्द” या प्रसंगाचा समग्र अनुभव फारसा कधीच आला नाही. चीनशी झालेले पहिले युध्द, नंतर, पाकिस्तानशी झालेले दोन रणसंग्राम आणि कारगिल इतपतच आपला युद्धाचा अनुभव आणि तो देखील अधिककरून, उत्तर भारतात आलेला. आता विचार केला तर असे वाटते की, जरी ही ४ युद्धे एकत्रित केली तरी, दुसऱ्या महायुद्धाच्या पासंगाला देखील पुरणार नाही, इतपतच लहान अनुभव आहे. त्यामुळे, कितीतरी दिवस,”युद्धाबाबत” आपल्या कल्पना बऱ्याचशा अवास्तव होत्या. अशा पार्श्वभूमीवर, हे प्रस्तुत पुस्तक म्हणजे डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरावे.
जागतिक इतिहासाच्या पटावर, दुसरे महायुध्द आणि त्याचे घडलेले दूरगामी परिणाम, हे विषय कायमच लेखकांना आवाहन करणारे ठरले आहेत. आजही, या युद्धाबाबत सतत काहीना काहीतरी नवीन माहिती उपलब्ध होते आणि लिहिलेला इतिहास काहीसा एकांगी तर लिहिला गेला नाही ना, अशी शंका देखील मनात येते. कदाचित आता, हे युध्द पार पडून पुरी ६६ वर्षे झालेली असल्याने, काही विषयाबाबतीतील मतांत थोडा फार बदल पडला आहे.
हिटलर काय किंवा स्टालिन काय, यांना कुठल्याच तराजूत “सहृदयी” म्हणून तोलता येणार नाही, पण युध्द संपल्यावर स्टालिनचा ज्या प्रकारे उदोउदो होत होता, त्यातील फोलपणा आता सगळ्यांच्या लक्षात आला आहे. हिटलर तर, कधीच नाव घेण्याच्या लायकीचा ठरू नये, अशीच तजवीज, पाश्चात्य लेखकांनी नेहमी घेतली. आता, या युद्धानंतर इतकी वर्षे गेल्यानंतर, त्या छळाची तीव्रता थोडी कमी झाल्यावर, त्याच हिटलरबद्दल अनेक गोष्टी नव्याने प्रकाशित झाल्या आणि त्यामुळे, त्याने मांडलेल्या नृशंस नरसंहाराची धार थोडीशी बोथट होते. तसे पहिले गेल्यास, कुठल्याही युद्धात, अंतिमत:”विजय” याच गोष्टीला नेहमी प्राधान्य दिले गेले. तो विजय कसा मिळवला, त्यासाठी काय किंमत मोजली गेली, याचा सारासार विचार फारसा केला जात नाही आणि त्याच वृत्तीतून स्टालिन जगात युगपुरुष ठरला होता. अगदी, चर्चिलने देखील काही अक्षम्य चुका करून, ब्रिटीशांच्या नाकातोंडात पाणी आणले होते.
याच गोष्टीना प्राधान्य देऊन, या लेखकाने हे पुस्तक लिहिले आहे. एक गोष्ट नेहमीच मान्य केली पाहिजे आणि ती म्हणजे, लेखकाने कितीही तटस्थतेचा आव आणला तरी, कुठेतरी थोडाफार पक्षपात होतच असतो. जेंव्हा, या महायुद्धातील चार प्रमुख नेत्यांबद्दल लिहिताना, लेखकाची अशी अवस्था झाली असावी, अशी कधीकधी मनात शंका येते. या पुस्तकात, लेखकाने, “चर्चिल”,”हिटलर”,”स्टालिन”, आणि “रूझवेल्ट” या चार नेत्यांच्या कौशल्याची राष्ट्रवादाच्या दृष्टीकोनातून केलेली अप्रतिम छाननी आहे. यातील वस्तुत: हिटलर वगळल्यास बाकीचे नेते, जरी प्रत्यक्ष युद्धात वावरले नसले तरी, युद्धमान परिस्थितीत त्यांनी ज्या प्रकारे, देशाचे सुकाणू हाकले, त्याच गोष्टीचा आढावा घेतलेला आहे.
आधुनिक युद्धे ही केवळ समरांगणावर खेळली जात नसून, त्यात आर्थिक,सामाजिक आणि राजकीय प्रश्न देखील तितकेच महत्वाचे ठरत असतात आणि याच दृष्टीने, गोखल्यांनी या चार नेत्यांचे वर्णन केलेले आहे. ज्या प्रकाराने, या चार नेत्यांनी, जगाचे राजकारण,युध्दकारण, ढवळून काढले, तसेच संघटनाचातुर्य,दूरदृष्टी आणि अत्यंत कणखर मनोवृत्ती या विशेषांचे अत्यंत सुंदर चित्र रेखाटलेले आहे. या गुणांत क्रमांक लावणे खरोखरच अवघड आहे, याची हे पुस्तक वाचल्यावर खात्री होते. तसे पहिले गेल्यास, या प्रत्येक नेत्यावर, फक्त महायुद्धाचाच काळ ध्यानात घेऊन, स्वतंत्र पुस्तक व्हावे, अशी कामगिरी केलेली आहे.
ऑस्वीच काय किंवा डाका काय, इथल्या यातनाघरांचे कुणीच कधीही समर्थन करणार नाही पण त्याआधीची हिटलर आणि स्टालिन यांची कामगिरी नेहमीच वेगळे चित्र दाखवते. आणि, अगदी चर्चिलने देखील अति उत्साहाच्या भरात कितीतरी चुका केलेल्या आहेत, याची लक्ख जाणीव होते. रूझवेल्ट यांच्यातील दूरदृष्टीचा अभाव वाचायला मिळतो पण त्याच बरोबर, ज्या प्रकारे त्यांनी अमेरिकेला झोपेतून जागे करून, जगातील सर्वश्रेष्ठ युद्धमान राष्ट्र बनविले याची रोमहर्षक कहाणी वाचायला मिळते. वास्तविक लाहाता, कुठलाही राजकारणी नेता हा कधीच संपूर्णतया स्वच्ह, नीतिमान राहूच शकत, हा राजकारण या कलेचाच नियम आहे!! आणि याच नियमानुसार गोखल्यांनी या चतुष्टयांचे वर्णन केले आहे. इथे अत्यंत कुटील कुटनीती आहे, आत्यंतिक राष्ट्रप्रेम आहे, युद्धाची प्रचंड खुमखुमी आहे.राजकारणातील सगळ्या दुर्गुणांचे यथेछ दर्शन आहे.
हे पुस्तक वाचल्यावर, “युध्द” म्हणजे काय आणि त्याचे किती दूरगामी परिणाम होत असतात, याची आपल्याला कल्पना येते. त्यातून, दुसरे महायुध्द म्हणजे, एकूणच युध्द या कल्पनेचा संपूर्ण तळ ढवळून काढणारे! कारण या युद्धानंतर, सगळ्या युद्धाचे परिमाणच बदलून गेले, इतका दूरगामी परिणाम, यापूर्वीच्या कुठल्याच युद्धाने घडवला नव्हता. जगाच्या नकाशाचे रंग इतक्या पटापट कधीच बदलले नव्हते. सर्वांनी आवर्जून वाचावे, असे धाटणीचे अप्रतिम पुस्तक आहे.

1 comment:

  1. मला हे पुस्तक हवे आहे. मी पुस्तक वाचले आहे पणं परत एकदा वाचायचे आहे.
    माझा संपर्क क्रमांक
    8788059150

    ReplyDelete