हे लेख लिहायला सुरवात झाली आणि, माझे मलाच असे वाटायला लागले की, आपण आपल्या वागण्याचे उदात्तीकरण तर करत नाही ना? प्रश्न मोठा अवघडच आहे. कारण, कसेही वर्णन केले तरी, कुठे तरी आपल्या वागण्याचे/ बोलण्याचे समर्थन होतच असते. त्यातून, आपल्यावर कितीही टीका केली तरी, अखेर आपला हात, आपल्याला लागत नाही, हेच खरे वास्तव आहे. हेमराजवाडी, हे माझे बालपण खरे आणि अजूनही मी तिथेच राहत असल्याने, त्या जागेबद्दल एक हळवा कोपरा माझ्या मनात व्यापलेला आहे, हे देखील तितकेच सत्य आहे. त्यामुळे, कधी कधी अशी भीती वाटते की, आपण अकारण आपल्याला आवडणाऱ्या जागेबद्दल उगाच मोठेपण देत आहोत. आज, अजूनही, गिरगावात, बहुतेक सगळ्या वाड्या तशाच आहेत, जरी काही ठिकाणी उंच इमारती उभ्या राहिल्या असल्या तरीही!! अजूनही, थोड्याफार प्रमाणात चाळ संस्कृती टिकून आहे. मला तर अजूनही फार वाटते की, आपण चाळ संस्कृतीचा उगीच कारण नसताना दुस्वास केला. प्रत्येकाला, प्रायव्हसी हवी, हे तर खरेच आहे आणि चाळ संस्कृतीत ते तसे शक्य नसते, पण म्हणून, ती संस्कृती एकदम टाकाऊ ठरविणे, जरा अतिरेकीपणाचे लक्षण वाटते. वास्तविक, माझे घर चाळ, या संकल्पनेत बसत नाही. तरी, आजही, माझ्या मनात या संस्कृतीबद्दल कुठेतरी नाजूक भावना निश्चितपणे आहेत. माझे घर तसे, चांगले ऐसपैस आहे.
मला अजूनही आठवते की, आम्ही जेंव्हा शाळेत जात होतो, तेंव्हा आम्ही क्रिकेटखेरीज, इतरही खेळ खेळत असू. उदाहरणच द्यायचे झाल्यास, माझ्या घरात त्यावेळी, एक मोठे जेवणाचे टेबल होते, म्हणजे अजूनही ते तसेच आहे, पण त्यावेळी, आम्ही त्या टेबलाचा टेबल टेनिस खेळण्यासाठी उपयोग करीत असू. तेंव्हा, स्पेशल नेट वगैरे चैन परवडण्यासारखी नव्हती. आम्ही टेबलाच्या दोन्ही कडेला स्टीलची दोन भांडी ठेवायचो आणि त्यावर, धुतलेले कपडे वाळत घालण्याची काठी आडवी ठेवत असू, की झाले आमचे नेट. त्यावेळी, मी, सुरेश, नंदू, प्रदीप, प्रशांत आणि माझे भाऊ, असे कित्येक तस खेळत असायचो. त्यावेळी, माझी आई, पोलीस कमिशनरच्या ऑफिसमध्ये नोकरी करीत असे आणि माझे नाना,समोरच्या इमारतीतील तळ मजल्याला, आपला व्यवसाय करीत असत. त्यामुळे, दिवसाचा बराच वेळ, आमचे घर तसे हुंदडायला मोकळेच असायचे. तिथे तर इतक्या धमाल गमती जमाती केल्या आहेत, त्याची नेमकेपणाने सविस्तर नोंद करणे फार अवघड आहे. आम्ही तिथेदेखील क्रिकेट खेळत असू आणि घराच्या खिडकीच्या काचा फोडत असू!! त्यावेळी, आमच्या घरात, बरीच कपाटे होती आणि त्यातली काही रिकामी होती. तेंव्हाची एक गंमत!!
एकदा दुपारी, आमचा सगळा ग्रुप माझ्या घरी जमला होता आणि परत लपाछपीचा खेळ सुरु झाला. घरात लपण्यासारख्या त्या मानाने खूपच जागा होत्या. अशाच वेळेस, एकदा प्रदीप एकेठिकाणी लपून बसला. जाम कुणाला सापडेना!! शेवटी असे वाटले की, प्रदीप घर सोडून बाहेरच कुठे लपला बहुतेक, म्हणू त्याला खिडकीतून हाका मारायला सुरवात केली आणि प्रदीप महाशय, एका कपाटातून बाहेर आले!! ते कपाट म्हणजे एक रिकामा खण असावा इतपतच छोटे कपाट होते. त्यावेळी, आमची सगळ्यांचीच उंची तशी बुटकी असल्याने, प्रदीप त्या कपाटात लपू शकला. बहुदा, आत जरा घुसमट झाली असावी आणि नंतर, आमच्या हाकांनी, तो बाहेर आला. पण, प्रदीप पहिल्यापासून असाच काहीतरी अचाट कल्पना लढवत बसायचा. कधी, हे पोरगं स्वस्थ बसले आहे, असे फारसे झालेच नाही. सदा काहीना काही चळवळ करीत राहणार. आमच्या घरात तर आम्ही अक्षरश: कित्येक तास टेबल टेनिस खेळत दिवस काढले आहेत. अर्थात, भांडणे हा त्यातला एक अविभाज्य भागच असायचा. खरतर, भांडणाशिवाय आमचा कुठलाच खेळ कधीही रंगला नाही. कधी कधी, बाजूच्या पाच मैदानावर आम्ही क्रिकेट खेळायला जात असू. तिथले क्रिकेट मात्र दमछाक करणारे असायचे. त्यावेळी, मैदानावर क्रिकेट खेळणे, तसे फार प्रचलित नव्हते. तेंव्हा, वाडीतूनच क्रिकेटचे सामने व्हायचे आणि त्याची धुंदी मात्र केवळ अफलातून!! हेमराजवाडी, अतिशय अरुंद पण सरळसोट वाडी. त्यामुळे, क्रिकेटमधील, cover drive, leg glance, hook, late cut असले दिमाखदार फटाके परवडण्यासारखे नसायचे. तेंव्हा, बॉल पहिल्या मजल्यावर अडकला की, एक धाव, दुसऱ्या मजल्यावर दोन धावा आणि तिसरा व चौथा मजला गाठला की सरळ फोर, असले त्या जागेचे कोष्टक होते. तेंव्हाचे काही खेळाडू अजूनही डोळ्यासमोर आहेत. राजू पार्सेकर नावाचा मुलगा, तेंव्हा अगदी विचित्र पद्धतीने बोलिंग करायचा. तसा तो थोडाफार वेगाने बोल टाकायचा पण, त्याची शैली वेगळीच होती. धावत येताना, तो स्वत:चा उजवा हात, सतत खांदा घुसळत, गोल फिरवीत धावत यायचा आणि बॉल टाकायचा. बहुदा त्याच्या या शैलीनेच त्याला काही विकेट्स मिळत असत, अन्यथा त्याच्या बोलिंगमध्ये फार काही अफलातून नव्हते. तसेच, अनिल पंडित म्हणून एक खेळाडू, बोल टाकताना, आपला उजवा हात नेहमी सरळ उंचपणे ठेवत असे आणि अगदी शेवटच्या क्षणी तो हात खाली आणून बॉल सोडत असे. या सगळ्यात, माझ्या लक्षात राहिलेला खेळाडू म्हणजे, करंबे!! रमेश आणि शाम यांच्या वर्गातील, म्हणजेच आर्यन शाळेतील. अतिशय सहज आणि अगदी थोड्या पावलांचा स्टार्ट घेऊन, तो खांद्याला जोराचा झटका देत असे. त्यामुळे, बॉल अति शीघ्र गतीने येत असे. मला, वाटत, पुढे, तो गिरगावच्या संघातून देखील खेळला होता. मला तेंव्हा नेहमी वाटायचे की हा खेळाडू पुढे येणार पण पुढे काय झाले, काहीच समजले. एकतर, तो वाडीच्या एका टोकाला राहत असे,यामुळे तसा आमचा त्याच्याशी कधीच संबंध आला नाही. तो शाळेचा कप्तान होता, हे नंतर, एकदा शामने मला सांगितले होते. पण, त्यावेळेस, असेच कितीतरी गुणी खेळाडू असेच काळाच्या ओघात मागे पडले. माझ्या, करेल वाडीतील असाच, सुनील पाटकर, असाच चांगला बोलर, पण करंबेप्रमाणेच मागे राहिला.
मला अजूनही, चांगले आठवत, आहे त्याकाळी, आंतर वाड्या असे खूपच सामने व्हायचे, विशेषत: रविवार दुपार, म्हणजे हमखास सामन्याचा वार!! सबंध वाडी नुसती आरडाओरड्याने गजबजून जायची. त्यावेळेस, पन्नास धावा म्हणजे डोक्यावरून पाणी!! हमखास जिंकायची संधी!! बॉल हा फक्त वरूनच मारणे, इतकेच फलंदाजाच्या हाती असायचे त्यामुळे आपसूकच धावा काढण्यावर मर्यादा पडायच्या. प्रत्यक्ष धावणे, असे फारच थोड्या वेळा घडायचे, बहुदा, उंच वरच्या मजल्यावर मारलेला बॉल खाली यायच्या आधी ज्या काही धावा धावता येतील, तेव्हढीच धावण्याची शक्यता. त्यावेळी, आम्ही शेजारच्या पाच मैदानावर क्रिकेट सामने बघायला मात्र, नेहमी जात असू. तो काळ, सोलकर, वाडेकर, सरदेसाई, दुराणी यांचा होता. तेंव्हा गावस्कर नुकताच उदयाला येत होता. त्यावेळचा असाच एक अतिशय प्रसिद्ध खेळाडू मला आठवतोय, तो म्हणजे सुरेश देवभक्त!! तो खेळायला आला की, आता जशी तेंडूलकरसाठी गर्दी जमते, तशी गर्दी जमायची आणि तो “भीमटोले” हाणण्यात भलताच वाकबगार होता. तसाच रामनाथ पारकर!! बुटकेलासा खेळाडू पण, फिल्डिंग मात्र विजेच्या गतीने करायचा!! असे कितीतरी अति गुणी खेळाडू काळाच्या ओघात लुप्त झाले.
त्यावेळी, टीव्ही संस्कृती अजिबात नव्हती. टीव्ही मुंबईत १९७३ साली आला. तोपर्यंत, रेडियो हेच मनोरंजनाचे प्रमुख साधन!! त्यावेळी, आम्हाला क्रिकेटचे भलतेच वेड होते. अगदी, शाळेतदेखील तास चालू असताना, आमचे लक्ष्य क्रिकेटकडे!!त्यावेळी, गिरगावात, बहुतेक प्रत्येक वाडीच्या नाक्यावर, कुणीतरी काळ्या फळ्यावर, सतत सामन्याचा स्कोअर लिहित असे आणि त्या फळ्यांना चिकटून, कितीतरी माणसे, रस्त्यातच उन्हातान्हात उभी राहिलेली, कितीतरी वेळा दिसायची. अर्थात, आमचा ग्रुपदेखील अजिबात अपवाद नसायचा, सामन्याचा स्कोअर पाहण्यासाठी, आम्ही अगदी गिरगावचे कितीतरी फेरे घालत असू. प्रसंगी, अगदी भुलेश्वर, हरकिसन दास हॉस्पिटल देखील सुटायचे नाही. त्याच्यावरून देखील आमच्यात वादावादी व्हायची. म्हणजे खेळणारे राहिले बाजूला आणि आम्ही मात्र इथे वितंडवाद घालत असू. असे वाद तर इतके झाले आहेत, त्या वादांवर खर तर, एक पुस्तक तयार होईल.
त्याच सुमारास मला संगीताचा किडा चावला होता. अर्थात, अजूनही त्याची धुंदी उतरलेली नाही म्हणा. पण तेंव्हा नवीनच छंद मला लागला होता आणि जुनी गाणी, म्हणजे १९५०/६० सालातली गाणी ऐकणे आणि जमविणे, याचेच वेड मला लागले होते. त्यावेळी, विशेषत: प्रदीपने माझी जी काय फिरकी घेतली आहे, त्याला तोड नाही. मला, सी. रामचंद्र, सुधीर फडके, वसंत देसाई फार प्रिय, इतके की मला ते माझ्या जीवाभावाचेच वाटायचे. अर्थात, आजही त्यात फारसा बदल नाही. उलट काळाच्या ओघात,माझ्याकडे बरीच नवीन माहिती गोळा झाली. नंतर, जेंव्हा मी या आणि इतर संगीतकारांना प्रत्यक्ष भेटून, माझी मते ठाम केली. पण, हा भाग नंतरचा. जेंव्हा, मी सुरवात केली, त्यावेळची माझी उडवलेली टर, माझ्या आजही लक्ष्यात आहे. प्रदीप तर मला,माझ्या गाणी टेप करण्याच्या वेडाला, “मंगेश देसाई” असेच म्हणायचं आणि तशीच मला नेहमी अगदी जोरात हाकदेखील मारायचा. त्यावरून, जी आमच्यात काय वादावादी व्हायची, सगळाच पोरखेळ खरा, पण ज्या हिमतीने भांडणे व्हायची, ती आता पुढील भागात लिहितो.
No comments:
Post a Comment