आपल्याकडे अजूनही, पाश्चात्य संगीत म्हटले नाकं मुरडणारी बरीच सापडतात. किंबहुना, पाश्चात्य संगीत म्हणजे थिल्लरपणा, असा देखील एक समज पसरलेला आहे. याचे मुख्य कारणे, १] टीव्हीवर जे उत्तान संगीत दाखविले जाते, त्यामुळे असा समज लगेच दृढ होतो. २] अकारण, आपल्या संगीताचा अतिरेकी अभिमान बाळगायचा.आपले संगीत म्हणजे “देवाची पूजा” असा एक पक्का समज पसरलेला आहे. अर्थात, त्या समजात थोडे तथ्य देखील आहे पण, केवळ देवपूजा म्हणजेच आपले संगीत, हा विलक्षण कोत्या मनोवृत्तीचा परिपाक आहे. त्या पलीकडे आपले संगीत फार विशाल आहे. पण, जर का मोकळ्या मानाने, पाश्चात्य संगीताचा आस्वाद घेतला तर, ते संगीत देखील विलक्षण समृद्ध आहे, असे समजून येते. आपल्या प्रमाणे. पाश्चात्य संगीतात देखील वर्गीकरण आहे. म्हणजे, आपल्याकडे, १] राग संगीत, २] ठुमरी, गझल, होरी, चैती, बैठकीची लावणी असे उपशास्त्रीय संगीत प्रकार, आणि नंतर भावगीत, चित्रपट संगीत आणि असेच कितीतरी भावाविष्कार प्रचलित आहेत त्याप्रमाणे, पाश्चात्य संगीतात, १] सिम्फोनी, २] ऑपेरा संगीत, ३] जाझ संगीत, ४] रॉक संगीत इत्यादी. प्रत्येक वेळेस, या वर्गीकरणाच्या दृष्टीकोनातून, मग, आपले राग संगीत म्हणजे पाश्चात्यांचे सिम्फोनी संगीत असा जूळवाजुळवीचा प्रकार सुरु होतो. खरे पहिले तर, यात तसे थोडे सत्य असले तरी फरक फारच दृष्टीस पडतो.
असाच प्रकार, जाझ संगीताबाबत घडतो आणि तो प्रकार, आपल्या उपशास्त्रीय संगीताशी जुळवला जातो. वास्तविक जरा बारकाईने ऐकले तर, असेच लक्ष्यात येईल की, साम्यापेक्षा भिन्नताच अधिक आहे. फक्त, साम्य इथे दिसते की, आपले उपशास्त्रीय संगीत हे संथ लयीत सुरु होते आणि अखेर द्रुत लयीत त्याची सांगता होते, तसाच प्रकार, जाझ संगीतात बरेच वेळा घडतो आणि अखेर हा एका विलक्षण द्रुत ताल आणि लय, या संयोगाशी संपतो. अन्यथा, स्वर रचना आणि सादरीकरण यात बराच फरक पडतो. स्वर तेच असतात, म्हणजे सातच सूर दोन्हीकडे असतात पण, सूर कसे लावायचे या दृष्टीकोनात फरक पडतो. जसे व्हायोलीन वाद्याबाबत म्हणता येते. केवळ हातात धरण्याच्या पद्धतीत फरक पडल्याने, त्याच वाद्यातून निघणारे स्वर वेगळे होतात. आणि, मला वाटते, इथेच भारतीय लोकांचा मतभेद सुरु होतो.
आता, George Benson!! हा काळा गायक/वादक खरोखरच जाझ संगीतातील(चमत्कार वगैरे मी म्हणणार नाही!! कारण चमत्कार हे काळातून फक्त एखाद दोनदाच होतात!!) एक अलौकिक कलाकार होता. मुळात, काळ्या वर्णाच्या गायकांना, निसर्गत: खर्ज स्वराची देणगीच असते. त्या देणगीला, हा कलाकार अजिबात अपवाद नव्हता. त्याचे गाणे, इथे मी सुचवतो. Summertime हे जे त्याचे गाणे आहे, ते खर तर श्रवणेद्रीयाना अप्रतिम मेजवानी आहे. भावगीताप्रमाणेच अगदी हलक्या सुरात गाण्याची सुरवात होते, ड्रमचा तालदेखील अति संथ लयीत सुरु होते. पहिल्या अंतरयानंतर खरी कमाल आहे. या अंतऱ्यानंतर, गिटारचे सूर मध्य लयीत सुरु होतात आणि एका क्षणी, गिटार वाजतेय की याचा गळा गातोय, असा चक्क संभ्रम पडावा, असे सूर ऐकायला येतात आणि लगेच लय द्रुत मध्ये शिरते, ड्रमचा ताल देखील विलक्षण गतीत आवर्तने घेत राहतो आणि शेवटी, अति तार स्वरात गाणे संपायला येते पण संपत नाही!! गाणे संपते ते परत सुरवातीच्या संथ लयीत!! आता, जर विचार केला तार, आपल्या असेच लक्ष्यात येईल की, आपल्या गझल गायकीत असाच प्रकार चालतो की. पहिल्या किंवा दुसऱ्या अंतऱ्यात गायक, तालाच्या गतीत स्वरमाला सादर करीत असतो.
मला तर हे गाणे फार आवडते. गळ्याची तयारी दर्शविणारी एक अफलातून रचना असेच मी या गाण्याकडे बघतो. नंतर, असेच एक दुसरे गाणे मला इथे आठवले. I am coming नावाचे. आपल्या भैरवीच्या अंगाने हे गाणे सुरु होते आणि लयीचा खेळ इतका अवघड आहे की तो नेमक्या शब्दात मांडणे फार त्रासाचे आणि अशक्य आहे. संगीत हीं कलाच अशी आहे की, इथे शब्द नावाची वस्तूच कधीकधी फार अपुरी वाटते. म्हणूनच मला वाटते, Plato ने Mathematics आणि Music याला सर्व कलांमध्ये सर्वोच्च स्थान दिलेले आहे. आता, गणितात, माझी गती, मलाच अगतिक करणारी असल्याने, त्याबद्दल मी फार न बोलणेच श्रेयस्कर पण, संगीताबाबत, चार शब्द ठामपणे बोलू शकतो. राग संगीतात याचा अनुभव विलक्षणरित्या अनुभवायला मिळतो. स्वरांचे विविध रंग, आकार, भावना यांचे अप्रतिम दर्शन राग संगीतात होतात. इथे शब्दांची बऱ्याचवेळा जरुरीच नसते. तोच प्रकार, पाश्चात्य संगीतात, सिम्फोनी या माध्यमात येतो. खरतर, सिम्फोनी संगीत हे वाद्य संगीतातच वाजवले जाते. याच गाण्यात, एके ठिकाणी, George असामान्य ताकदीने अति खर्ज लावतो आणि आपण ऐकताना केवळ स्तिमित होतो.
खर्ज स्वर हा संगीतातील अति अवघड ध्वनी आहे. आपल्याला सामान्यपणे वाटते की, अति तार स्वर हा अति अवघड ध्वनी आहे, पण वस्तुत: खालच्या अंगाने येणारा स्वर हा अति कठीण मानला जातो आणि याला ध्वनिशास्त्र दुजोरा देते. मी, आजपर्यंततरी काळ्या गायकांचा जो खर्ज ऐकला आहे, त्याला फार थोडी तुलना सापडते. विशेषत: Paul Rabson या नावाचा जो गायक होऊन गेला, त्याच्या इतका अप्रतिम खर्ज, मी आतापर्यंततरी ऐकलेला नाही. त्याच्या खर्जाची प्रतवारी वेगळीच आहे. एखाद्या प्रचंड नगारयावर, टिपरीला कापसाचा बोळा लावून, देवळातील प्रचंड पसरलेल्या गाभाऱ्यात, हळूच त्या टिपरीने नगारयावर आघात केल्यावर जशास घुमारेदार ध्वनी ऐकायला येईल तशा प्रतीची जाणीव, Paul Robson चा खर्ज ऐकल्यावर होते. असामान्यच आवाजाची प्रत. तसा खर्ज, मी एकदा, पंडित जसराज यांच्या गळ्यातून ऐकला होता. एका मैफिलीत, त्यांच्या बरोबर, पंडित हरिप्रसाद चौरासिया होते. मोठ्या तब्येतीत राग जोग चालला होता. मध्यलयीत बंदिश शिरल्यावर, एकेठिकाणी, जसराजनी, इतक्या विलक्षण ताकदीने, खर्जातील “सा” लावला की तिथे बासरी स्तब्ध झाली!! असे फार थोडेच क्षण माझ्या संगीत श्रवणाच्या प्रवासात मला लाभले आहेत., की तिथे काय भावना व्यक्त करायची आणि दाद कशी द्यायची असाच प्रश्न पडतो. कधीतरी, मग डोळ्यांना नकळत वाचा फुटते आणि आस्वादाच्या दिशा मोकळ्या होतात. मग तिथे, लताची अति अवघड लय असते, वसंतराव देशपांड्यांची अति वक्र तान असते, अमिरखान खान साहेबांची अति ठाय लय असते, तर कधी त्यावर Paul Robson याचा हक्क पोहोचतो.
आपल्याकडे, जाझ संगीत हे साधारणपणे, सत्तरीच्या दशकात लोकप्रिय झाले. तेंव्हा मुंबईत जाझयात्रा नावाचा एक ग्रुप मुंबईत आला होता आणि त्या ग्रुपने, मुंबईत बरीच प्रसिद्धी मिळवली होती. त्यावेळी मी फारच लहान असल्याने, मला त्याचे काहीच वाटले नाही. नंतर, १९८३ मध्ये, मी मुंबईच्या IIT च्या Mood Indigo, या सांस्कृतिक महोत्सवात, मी खऱ्या अर्थाने जाझ ऐकला. त्यावेळी, स्वीडनहून Stevenson नावाचा Gitarist आला होता, तर आपल्याकडून ड्रमवर रणजीत बारोट आणि की बोर्डवर लुई बँक्स होता. आजही, मला तो कार्यक्रम व्यवस्थित आठवतोय. रात्री जवळपास चारच्या सुमारास तो कार्यक्रम संपला. अक्षरश: नुसती धमाल मेजवानी होती. गिटारवर असेदेखील स्वर काढता येऊ शकतात, याचा नवा अनुभव मला मिळाला तर, की बोर्डवर लुई बँक्स काय कमालीच्या तरबेजपणे बोटे फिरवतो, हे ऐकल्यावर तर मी थक्कच झालो. आजही, माझे हेच मत आहे की, भारतात, की बोर्डवर लुई बँक्स इतका असामान्य वादक झाला नाही. लोक, अदनान सामीचे कौतुक करतात. तो देखील चांगला आहे पण, लुई बँक्सचा दर्जाच काही वेगळा आहे. इथे मला, जाझची आवड निर्माण झाली. नंतर, साउथ आफ्रिकेत आल्यावर, मी प्रथम George Benson याला सीडी मध्ये भेटलो आणि मग त्याच्या खूपच सीडी विकत घेतल्या आणि अजूनतरी त्याने मला निराश केलेले नाही. जाझमधला, हा कलाकार “राजा” आहे. ज्या अफलातून तर्हेने याचा गळा फिरतो त्याच लयीत, हा गिटार वाजवतो. गाणीच सांगायची झाली तर कितीतरी सांगता येतील, संगीत हीं कला मुळात ऐकण्याची आहे, केवळ माहितीची जंत्री मांडून काहीच फारसे निष्पन्न होत नाही. फक्त, Computer प्रमाणे, माहिती सांगणे, यात केवळ तुमची दिखावू विद्वत्ताच दिसून येते. मला आजही ठामपणे वाटते की, संगीत हीं कला फक्त तुम्ही आणि ती कला इतक्याच प्रमाणात ऐकायची. खरतर, मैफिलीत, गाणे केवळ ऐकता येते, पण त्याचा खरा आनंद तुम्ही आणि तो कलाकार, याचे जेंव्हा द्वैत जमते, तेंव्हाच येतो. हा तुम्ही आणि तो कलाकार, यातला एक करार असतो. जसे, पुस्तक हे एकांतातच वाचायसे असते. तिथे ती कथा आणि तुम्ही यांचे एक नाते तयार होते, तसाच प्रकार संगीताबाबत घडतो. म्हणूनच, इथे साउथ आफ्रिकेत जेंव्हा गाणी ऐकतो, तेंव्हा तिथे केवळ मी एकटाच असतो आणि तेंव्हाच मला खऱ्या अर्थाने, George Benson भेटतो, मेहदी हसन साद घालतो, लताचा आवाज व्याकूळ करतो. आणखी काय आणि किती लिहिणार.
No comments:
Post a Comment