Thursday, 19 June 2014

सुगम संगीत-तौलनिक विचार-भाग ५‏



“रिमिक्स” हीं कल्पना मुळात चांगलीच आहे, फक्त त्या संकल्पनेचा अति विपर्यास केला गेला. एखादे गाणे घ्यायचे आणि त्यावर आधुनिक पद्धतीने साज चढवायचा, हीं एक सुंदर कल्पना आहे, त्यायोगे, काळाच्या ओघात जी गाणी विस्मृतीत गेली आहेत, त्यांचे एक प्रकारे पुनरुज्जीवन करायचे. या प्रकारात सर्जनशीलता(मर्यादित अर्थाने!!) दिसून येते. जुन्या गाण्यांना नवीन जन्म देण्यासारखा हा संगीत प्रकार आहे, पण इथेच सगळा घोळ निर्माण झाला आहे. जुनी गाणी निवडणे, त्यातील कुठल्या भागावर पुन्हा संगीताचा नवीन साज चढविणे, आणि त्यासाठी कशा प्रकारे वाद्यमेळ जमविणे, इथेच वादग्रस्तता निर्माण होते.
केवळ नाविन्याचा हव्यास आणि काहीतरी नवीन केल्याचा आव आणणे, इतपतच “रिमिक्स” मर्यादित राहिले. जुनी गाणी काय, कधीही उपलब्ध असतात. त्यावेळी जी गाणी तयार केली, त्यावेळी, बहुतेकवेळा शब्दांचा नेमका आशय लक्षात घेऊन चाली तयार केल्या गेल्या की ज्या चित्रपटाला सुयोग्य होत्या. चालीनुरूपच वाद्यमेळ आणि त्याची रचना तयार केली होती. मुलत: सुगम संगीतातदेखील “इम्प्रोवायझेषन” करता येते. अगदी, हॉटेलमधील नृत्य गीत जरी घेतले तरी त्यात नेहमी वेगळी सांगितिक भर टाकता येत असते. प्रश्न असतो तो जाणकारीचा
आणि व्यासंगाचा. तिथेच बहुतेकवेळा, ‘रिमिक्स’ तोकडे पडते(इथे मी बहुसंख्य रिमिक्स गाणी जी बाजारात आली आहेत त्याबद्दलच लिहित आहे!! नियमाला “अपवाद” हे नेहमीच असतात) आधुनिकतेच्या नावाखाली, मुळातील गाण्यावर अत्याचारच केले जातात. गाण्याचे शब्द काय आहेत, याचा मुलाहिजा न ठेवता, अकारण ताल बदलला जातो, मध्येच (उगाचच!!) आफ्रिकन साऊंड टाकला जातो, काही वेळा तर, चक्क आफ्रिकन शब्द देखील टाकले जातात. कशासाठी?? आधुनिकता काय अशाच मार्गाने सिध्द होते का? जसे मी मघाशी म्हटले त्याप्रमाणे, कुठल्याही गाण्यात बदल केला जाऊ शकतो, पण जी “मूळ” संगीताकृती आहे, त्याला धक्का न लावता!! पण असे फारसे घडत नाही. याचा परिणाम असा होतो की, जुनी गाणी ओळखीची होतात पण, नव्या “ऑर्केस्ट्रायझेषन” मध्ये!! मुळातल्या गाण्यातील खुमारी शतांशाने देखील जाणवत नाही. त्यातून, एखादे गाणे लोकसंगीतावर आधारित असेल आणि त्याचे “रिमिक्स” अशा पद्धतीने केले असले, तर तो सगळाच संगीताचा विपर्यास होतो.
लोकसंगीताला त्या मातीचा, संस्कृतीचा खास रंग, गंध असतो आणि त्याची मस्ती काही वेगळीच असते,की जी अशा प्रकारच्या “रिमिक्स” मध्ये पार भरकटत जाते. तुम्हाला अशा प्रकारचे संगीत करायचे आहे असेल तर, मग चालीचा आराखडा तसाच ठेऊन, ते गाणे संपूर्णपणे आधुनिक शब्दकळेने सिध्द करा आणि मग त्यानुरूप पाश्चिमात्य ताल आणि साऊंड वापरा. कधी कधी तर, रागावर आधारित असलेल्या गाण्यांचे देखील धिंडवडे काढले आहेत!! आत्ता, या बाबतीत मी एक उदाहरण देतो. जगजितसिंग हा गायक, आपल्या जाहीर कार्यक्रमात असे प्रयोग करतो. त्याची, चित्रपटातील एक गझल,”होशवालो को” मी जाहीर कार्यक्रमात ३ वेळा ऐकली आहे. त्याने, एकतर काहीच वाद्ये(फक्त व्हायोलीन,गिटार,सिंथेसायझर इतकीच वाद्ये, साथीला तबला!!) घेऊन, गाण्यात कितीतरी वेगळ्या हरकती घेतलेल्या आहेत. काहीवेळा तर, सरगमची मदत घेऊन, गाणे वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवले. कधी कधी तर, सम अशा पद्धतीने घेतली की जी मूळ गाण्यात फार वेगळी आहे. अशा प्रकारचे प्रयोग ‘रिमिक्स’ या संदर्भात अपेक्षित असतात. दुसरे उदाहरण, शंकर महादेवनचे, “ब्रेथलेस” हे गाणे, वास्तविक या गाण्याला, पौर्वात्य “जाझ” म्हणायला हरकत नाही, अशा प्रकारे सजवले आहे. तरीही, शंकर कितीतरी वेगळ्या जागा घेतो, सुरवातीला सुंदर सरगम घेऊन, चालीचा आराखडाच तुमच्या समोर मांडतो. कितीतरी ताना वेगळ्या ढंगाने सादर करतो. “रिमिक्स” मध्ये असे प्रयोग करायला भरपूर संधी असते. “सुरेश वाडकर”, “हृदयनाथ मंगेशकर” हे त्यांच्या जाहीर कार्यक्रमात कितीतरी विविधता आणतात, की ज्या योगे, तेच जुने गाणे पार नव्याने आपल्या पुढे सादर केले जाते.
पण, ज्या भ्रष्ट पद्धतीने, रिमिक्स केले जाते, त्याचा विपर्यास कसा होतो, याचे एक उदाहरण देतो. मी, नोकरीच्या निमित्ताने, साउथ आफ्रिकेत बरीच वर्षे नोकरी केली. त्यामुळे, तिथल्या भारतीय वंशाच्या समाजात, अगदी जवळून राहण्याचा भरपूर अनुभव घेतला. तिथे, रेडियो काय किंवा टीव्ही काय, नेहमीच अशी भ्रष्ट गाण्यांनी तिथले कार्यक्रम सजलेले असतात. याचा परिणाम असा झाला की, तिथल्या लोकांना, मूळ गाणी माहितीच नसतात. माझी थोडी ओळख झाल्यावर, त्यांना, मी माझ्याकडील काही “ओरिजिनल” गाणी ऐकवली आणि ते लोक थक्क झाले. अर्थात, तरीही परिणाम शून्य, याचे कारण, त्यांना गाणी आवडायची ती केवळ ठेक्याच्या अंगाने, भाषेच्या नावाने सगळाच आनंद!! तरीही, रिमिक्स म्हणून जी गाणी ऐकवली जातात, तीच त्यांची आवड होते. त्यावर आणखी भयाण प्रकार म्हणजे, अशा रिमिक्स वर, तिथे आणखी रिमिक्स केले जाते आणि त्याला ‘चटनी साँग’ म्हटले जाते. तो भाग आणखी वेगळा!!
तसाच प्रकार,”फ्युजन” बाबतीत घडत आहे. वास्तविक, फ्युजन हीं संकल्पना देखील अशीच सुंदर आहे. रागदारी संगीत हे सुरवातीला पचायला नक्कीच जड जाते. त्यातून, हल्ली जे “ग्लोबलायझेशन”चे वारे सुरु आहेत, त्यातून हीं कल्पना उदयास आली. तसे पहिले गेल्यास, “बीटल्स”मध्ये आता तबला, सतार हीं भारतीय वाद्ये सर्रास वापरली जातात तसेच पाश्चात्य वाद्ये आपल्याकडे वापरली जातात, त्यातून या दोन संगीत प्रकारांचे एकत्रीकरण उदयास आले. अगदी थोड्या वेळात, लोकांना आकर्षित करण्यासाठी, आणि दोन्ही संगीत पद्धती लोकप्रिय करण्यासाठी, फ्युजन खरोखरच चांगले आहे. पण तिथेही आंधळेपणा अधिक दिसतो. वास्तविक भारतीय काय किंवा पाश्चात्य काय, मूळ स्वर हे सातच आहेत. फरक पडतो तो तेच स्वर तुम्ही कसे उच्चारता आणि सादर करता, यावर.
इथे आणखी एक मुद्दा विशेषत्वाने मांडायला हवा. बऱ्याचवेळा, असा एक सूर ऐकायला येतो आणि तो म्हणजे, फ्युजन हे रागदारी संगीताचे आधुनिक रूप आहे. आता आपण जरा वेगळ्या बाजूने विचार करूया. पाश्चात्य संगीतात, सिम्फोनी संगीत हे अभिजात संगीत मानले जाते, जसे आपल्याकडे रागदारी संगीत आहे. पण, पाश्चात्य लोकात आजही, असा विचार देखील मनात येत नाही की, “बीथोवन”,”मोझार्ट” बाख” इत्यादी असामान्य संगीतकारांनी ज्या वेगवेगळ्या सिम्फनी तयार केलेल्या आहेत, त्याच्या आराखाड्यात एकही विसंगती अथवा बेसूर खपत नाही आणि जे रसिक आहेत, ते देखील तितक्याच रसिकतेने सिम्फनी संगीताचा आस्वाद घेतात. तिथे असला विचार देखील खपवून घेतला जात नाही. सिम्फनी संगीत हे जसे आहे, तसेच ठेवण्याकडे त्यांची कसोशी असते. असे असताना, आपले जे हजारो वर्षे रागसंगीत चालत आले आहे, त्याबाबतीत हलगर्जी विचार का केला जातो? रागदारी संगीत आणि त्याचे शास्त्र हा वेगळ्या निबंधाचा विषय आहे. फ्युजन म्हणजे थोडक्यात, दोन्ही संगीत पद्धतींचा एकत्रित संकरीत अविष्कार असे म्हणता येईल. मागे एकदा, प. हरिप्रसाद चौरासिया, लुई बँक्स, शंकर महादेवन, शिव मणी आणि साबीर शेख यांनी एकत्र येऊन, राग यमन सादर केला होता. प.हरिप्रसाद चौरासिया यांनी पारंपारिक पद्धतीने तर तेच सूर लुई बँक्स याने, सिम्फनी पद्धतीने आणि शंकर महादेवन याने दाक्षिणात्य पद्धतीने ते सूर आळवले होते आणि तो सगळाच अविष्कार इतका समृद्ध होता की, आजही त्याची सीडी ऐकताना मंत्रमुग्ध व्हायला होते. खर तर, अशाच प्रयोगांची जरुरी की जी फ्युजन संगीत श्रीमंत करू शकेल. त्यातून हल्ली जो फ्युजन या नावाचा उदोउदो केला जातो, तो प्रकार, हिंदी चित्रपट संगीतात, फार पूर्वी तो शब्द देखील अस्तित्वात नसताना, एस.डी.बर्मन, मदन मोहन या संगीतकारांनी सादर केला होता. उदाहरणच द्यायचे झाल्यास, “हस्ते जख्म” या चित्रपटात, “तुम जो मिल गये हो” हे गाणे ऐकावे. त्या गाण्याचा वाद्यमेळ, आजच्या फ्युजनच्या कल्पनेशी तंतोतंत जुळणारा आहे आणि हे गाणे मदन मोहनने १९७० च्या सुमारास तयार केले होते. तसेच, “ज्वेल थीफ” या चित्रपटातील, “होटो पे ऐसी बात” हे गाणे अशाच प्रकारे, नेपाळी लोकसंगीतातून तयार केलेले गाणे, १९६४/६५ च्या सुमाराला, एस.डी.बर्मन यांनी तयार केले होते. दुर्दैवाने, या अप्रतिम गाण्याचे रिमिक्स, मी नुकतेच साउथ अक्रिकेत, एका टीव्ही कार्यक्रमात इतक्या गचाळ पद्धतीने सादर केले होते की काही लिहायची सोय नाही!!

No comments:

Post a Comment