Thursday, 19 June 2014

सुगम संगीत – एक तौलनिक विचार – भाग १०



आता आपण, सुगम संगीतातील शेवटच्या घटकाकडे वळूया. गायक/गायिका ही नेहमीच, संगीतकार आणि रसिक यांच्यातील दुवा!! संगीतकाराने कितीही अप्रतिम रचना केली, कवीने जरी आशयगर्भ गाणे लिहिले, तरीही शेवटी टे सगळे आपल्यापर्यंत पोहोचते, ते गायकाकडूनच!! तेंव्हा, हा घटक जरी शेवटचा असला तरी आपल्या रसिकांच्या दृष्टीने सगळ्यात पहिला घटक!! आपण, गाणे हे नेहमी गायकाच्या मुखातून ऐकत असतो. ते ऐकता, ऐकता आपण इतर घटकांकडे वळतो. तेंव्हा जर का सादरीकरण अप्रतिम नसेल तर, या माध्यमाचा सगळाच डोलारा कोसळला असे म्हणायला हवे. अशी काही गाणी आहेत की जी, दुसऱ्या गायकाने किंवा गायिकेने गायली असती तर अधिक खुलली असती, असे आपल्याला ऐकताना नेहमी वाटत असते. या संदर्भात काही उदाहरणे आपण या चर्चेच्या ओघात बघूया. एक उदाहरण देतो. हिंदी चित्रपट संगीतात, ओ.पी.नैय्यर आणि सी.रामचंद्र यांची नावे या संदर्भात बघता येतील. ओ.पी.नैय्यरचे आशा भोसले यांच्याशी संबंध बिघडल्यावर, त्यांनी, कृष्णा कल्ले, पुष्पा पागधरे या गायिकांना हाताशी धरून काही गाणी केली आणि “आपले आशा भोसलेवाचून काहीही अडत नाही!!”, अशा एकेकाळी गर्जना केल्या होत्या पण वास्तव असे होते की, त्यांनी जी पूर्वी गाणी केली होती, त्याच्या शतांशाने देखील या गायीकांबरोबरची गाणी जमलेली नाहीत!! हे कसे? अगदी, सी.रामचंद्र यांनी अशी काही वल्गना केली नसली तरी, लतापासून वेगळे झाल्यावर, काही गाणी वगळता, हा संगीतकार निष्प्रभ झाला, हे सत्य आहे. आपल्याला यामागची कारणे शोधायची नसून, गायक किंवा गायिका हा घटक किती महत्वाचा असू शकतो, हे या निमित्ताने निदर्शनास आणायचे आहे. कवी आणि संगीतकार यांची समसमासंयोग नेहमी गायक घडवून आणत असतो.
इथे आपण, गायकाचे/गायिकेचे स्थान कसे मोठे असते आणि त्यासाठीचे काय सर्वसाधारण निकष आहेत, याचाच विचार करणार आहोत. खरतर, निकष म्हणावे तर, अजूनही सुगम संगीत – एक शास्त्र म्हणून फारसा कधीही विचार आजतागायत झालेला नाही.का नाही, याची बरीच कारणे आहेत पण त्यामुळे इथे दोष असा निर्माण झाला की, कुठलेही गाणे – मला आवडते, हाच एक सर्वमान्य निकष उदयाला आला आणि मग त्यातून अतिशय भोंगळ विधाने आकारास आली आणि तर्कशुद्धता नावाला देखील उरली नाही. सुगम संगीत हे साधारणपणे असे मानले जाते की, जे संगीत सु-गम आहे म्हणजे, सर्वसामान्यांना समजू शकेल, रंजवू शकेल असे संगीत. यामुळेच इथे वैय्यक्तिक आवड-निवड शिरली आणि बराचसा सावळा गोंधळ निर्माण झाला. संगीतात वैय्यक्तिक आवड निवड याला स्थान नक्कीच आहे पण तो एकमेव निकष नव्हे. या दृष्टीकोनातून बघितले तर, बरेच वेळा, काव्य या दृष्टीने अतिशय हिणकस अशी रचना लोकांच्या डोक्यावर मारली जाते, तोच प्रकार संगीत रचनेबाबत होतो आणि हाच दृष्टीकोन, गायक/गायिकेच्या तयारीबाबत मांडला आजतो. जणू काही, गाणे गाण्यासाठी, शास्त्रीय संगीताची अजिबात आवश्यकता नसते, इथपर्यंत विचाराची मजल गेली. इथे मी फक्त भारतीय सुगम संगीताचाच विचार करीत आहे. सर्व साधारणपणे, आपले संगीत हे दोन भागात विभागले गेले आहे. १] शास्त्रोक्त संगीत आणि २] लोकसंगीत. लोकसंगीताचा उगम हा फार दुरापास्त आहे. वर्षानुवर्षे काळाच्या ओघात टिकून राहिलेले संगीत, इतपतच विधान करता येईल. लोकसंगीत म्हणजे, लोकांनी निसर्गाच्या सान्निध्यात राहून उस्फुर्तपणे निर्माण केलेले संगीत, असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल. त्यामुळे, लोकसंगीताचे, शास्त्रीय संगीतासारखे विकसित शास्त्र तयार झाले नाही आणि एकूणच इतिहास सगळा विस्कळीत स्वरुपात मांडला गेला. म्हणजे असे नव्हे की,लोकसंगीताचा इतिहास नाही!! इतिहास एका विविक्षित काळाच्या संदर्भापुरताच उपलब्ध आहे. उस्फूर्तता हाच एकमेव गुण मानल्यामुळे, कुणीही उठावे आणि लोकसंगीत सादर करावे, असला प्रकार इथे फार दृष्टीस पडतो. त्यातून, मग improvisation या नावाखाली, काहीही खपवले जाऊ लागले. जरी सुगम संगीत हे बहुश: सामान्य लोकांसाठी असले( हा विचार चुकीचा आहे, हे मान्य करून देखील!!) तरी त्याला शास्त्रशुध्द बैठक आवश्यक असते. बऱ्याचवेळा हिंदीतील एक उदाहरण दिले जाते. प्रसिध्द गायक किशोर कुमार याचा शास्त्रीय संगीताचा अजिबात अभ्यास नव्हता आणि त्यामुळे त्याचे गाणे कुठे उणे पडले!! ही गोष्ट खरी आहे पण हा गायक निसर्गत:च अशी देणगी घेऊन आला होता की, त्याच्या गळ्यातच चमत्कार म्हणावा, असे स्वरयंत्र होते!! अखेर किशोर कुमार सारखा एखादाच गायक निर्माण होतो पण म्हणून हा काही नियम नव्हे!! हेच ध्यानात घेतले जात नाही. तरीही जर त्याच्या आवाजातील उणेपण काढायचे झाल्यास, जेंव्हा केंव्हा त्याला रागदारीवर आधारित गाणी मिळाली, तिथे त्याचा आवाजाची मर्यादा दिसून आली. उदाहरणार्थ, “पायलवाली देखना” हे रागदारीवरील गाणे ऐकले, की माझे म्हणणे पटेल.
असो, तो मुद्दा वेगळा. मुळात इथे दुसरा प्रश्न उभा राहतो. एकदा का सुगम संगीतासाठी शास्त्रीय संगीताचा अभ्यास फायदेशीर ठरतो, हे मान्य केले तर, किती अभ्यास असावा? एकतर, रागदारी संगीत  आणि सुगम संगीत यात एक मुलभूत फरक आहे. रागदारी संगीत हे स्वरप्रधान संगीत तर सुगम संगीत हे शब्दप्रधान संगीत असा आहे. त्यामुळे, सुगम संगीत गाताना, ताना, गमक, मूर्च्छना, हरकती इत्यादी अलंकार जे शास्त्रीय संगीताचे अंगभूत अंग आहे, त्याचा थोडाफार वापर सुगम संगीतात वापर होणे, हे अटळ असते. सुगम संगीतात, भरमसाट ताना, अति खर्ज किंवा अति तार स्वर याची सर्वसाधारणपणे गरज नसते!! इथे शब्दांना अनुषंगून स्वर योजना आवश्यक असते. रागदारी संगीताचा अभ्यास आवश्यक आहे पण वर जे रागदारी संगीतातील अलंकार मांडले आहेत, त्याचा शाब्दिक अंगाने अभ्यास व्हावा. एखाद्या शब्दातील दडलेला आशय, स्वराने अधिक खुलवून मांडण्याइतपतच या अलंकाराचा उपयोग व्हावा. सुगम संगीतात, कारण नसताना स्वरांचे प्रदर्शन मांडणे, हे नेहमीच अनावश्यक आणि हास्यास्पद असते. रागदारी संगीताचा अधिक रियाझ हा, सुगम संगीताला हानिकारक होतो. रागदारी संगीत, प्राधान्याने स्वरप्रधान असल्याने, शब्दांकडे दुर्लक्ष होणे क्रमप्राप्तच ठरते, जरी अनावश्यक असले तर!! स्वरांचा अधिक रियाझ गळ्याला “जड” बनवतो आणि जिथे हलक्या, मंजुळ हरकती आवश्यक असतात, तिथे शब्दांचे उच्चार सदोष होतात आणि एकूणच सगळे गाणे, जाती रचनेच्या दृष्टीने अप्रतिम असले तरी डागाळलेले होते!! रागदारी संगीताच्या मुलभूत रियाझाने, गायकाला “लय”, “ताल” आणि गळ्याला आवश्यक तितकेच “वळण” मिळू शकते आणि स्वरांच्या निरनिराळ्या हरकती, गाण्याचे सौंदर्य वाढवू शकतात. शब्दातील आशयाची व्याप्ती अधिक खोलवर दाखवू शकतात. अर्थात किती अभ्यास हवा, हे त्या गायकावर अवलंबून असते.गायकाकडे गाताना, दोन गोष्टीचे सतत भान ठेवायचे असते. १] कवीने दिलेले शब्द जाणून घेऊन त्याचा अर्थ रसिकांपर्यंत समर्थपणे पाहोचवायचा असतो, आणि २] त्या शब्दाला संगीतकाराने लावलेली चाल गळ्यावर तोलून घ्यायची असते आणि ते करताना, कुठेही शब्दांचा अर्थ हरवता कामा नये!! इथेच मला, प्रसिध्द संगीतकार यशवंत देवांचे एक वाक्य आठवते. ते म्हणतात, “चाल ही शब्दातच दडलेली असते. संगीतकार फक्त ती शोधून काढतो!!” या वाक्यातच सुगम संगीताचे खरे मर्म दडलेले आहे.
इथे मला काही मते मांडायची आहेत आणि ती मांडताना, त्या गायकांविषयी पूर्ण आदर व्यक्त करून मांडत आहे. वरती लिहिताना, मी असे म्हटले आहे की, रागदारी संगीताचा अभ्यास आवश्यक आहे आणि याच दृष्टीने हा मुद्दा मी पुढे वाढवीत आहे. सुगम संगीतात, कितीतरी गाणी, जे शास्त्रीय संगीतातील दिग्गज आहेत, त्यांनी गायलेली आहेत आणि त्याच अनुरोधाने, मी मुद्दा मांडत आहे. पंडित वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी आणि किशोरी अमोणकर ही नावे या संदर्भात लिहित आहे. आता, यांचा संगीताचा अभ्यास केवळ “प्रकांड” म्हणावा असा आहे, पण तरीही सुगम संगीत गाताना, त्यांचा रागदारी संगीताचा अभ्यास आणि रियाझ, याचाच प्रभाव पडलेला दिसतो. आपण, काही उदाहरणे बघूया. वसंतरावांचे “बगळ्यांची माळफुले”, कुमार गंधर्वांचे “आज अचानक गाठ पडे” , जितेंद्र अभिषेकी यांचे “शब्दावाचून कळले सारे” आणि किशोरी आमोणकर  यांचे “जाईन विचारीत रानफुला रे”. आता आपण प्रत्येक गाण्याचा सुटा विचार करूया. “बगळ्यांची माळफुले” हे गाणे ऐकताना, सतत वसंतरावांची, स्वरांवर असलेली पकड ऐकायला मिळते, स्वरांवर आपला किती असामान्य ताबा आहे, आपला आवाज कसा एकदम काळी चार पट्टीतून पांढरी तीन ओर्यंत कसा लीलया फिरत राहतो, हेच ऐकायला मिळते. वा.रा.कान्तांची कविता बाजूलाच राहते. त्यापेक्षा, याच गायकाचे “ही कुणी छेडिली तार” हे आशा भोसल्यांबरोबर गायलेले युगुलगीत ऐकावे, जरी प्रस्तुत गाण्यात काही वेळा वसंतरावांचा आवाज जरा “ढाला” लागलेला असला तरी!! तोच प्रकार, कुमारांचे “आज अचानक गाठ पडे” हे ऐकताना होतो. कवी अनिलांनी कवितेत ज्या “अचानक” पणे गाठ पडण्याची गंमत दर्शविली आहे, त्याचा मागमूसही हे गाणे ऐकताना येत नाही. सतत, आपण एखादी बंदिश ऐकत आहोत, असाच भास होतो. काही ठिकाणी तर, शब्दाचा आशयदेखील गायब होतो.
जितेंद्र अभिषेकींचे “शब्दावाचून कळले सारे” हे गाणे ऐकताना, गायकाची एक सवय प्रामुख्याने ध्यानात येते आणि ती, गाताना अकारण शब्दावर जोर देण्याच्या सवयीची.वास्तविक जर का पाडगावकरांची कविता वाचली तर, अतिशय मोहक असे प्रणयी गीत आहे पण गायन ऐकताना त्या प्रणयाची झलक अपवादानेच ऐकायला मिळते. तोच प्रकार, किशोरी आमोणकर यांचे “जाईन विचारीत रानफुला रे” हे गाणे ऐकताना अनुभवायला मिळते. या गाण्यात, दिसते ती किशारी आमोणकरांची असामान्य गायकी आणि तानांवरील प्रभुत्व. पण, त्यासाठी सुगम संगीत ही जागा नाही. त्यापेक्षा, याच किशोरी आमोणकरांचे “हे शामसुंदरा” हे गाणे ऐकावे. किती अप्रतिम रचना आणि गायन आहे. कवियत्री शांता शेळक्यांची अनुभूती नेमकेपणे ऐकायला मिळते.आता नेमकेपणाने लिहायचे झाल्यास, या सगळ्या गायकांचा संगीताचा अभ्यास तर असामान्य आहे पण आयुष्यभर सतत रागदारी संगीताचाच अभ्यास केल्याने, त्यांच्या गळ्याला “जडत्व” प्राप्त झाले, एक विशिष्ट सांगितिक दृष्टी तयार झाली आणि जेंव्हा सुगम संगीत गायची वेळ आली, तेंव्हा तीच सवय दूर सारणे अवघड झाले.

No comments:

Post a Comment