Thursday, 19 June 2014

साउथ आफ्रिका – भाग १



खरतर, साउथ आफ्रिकेसंबंधी लिहायचे म्हणजे थोडक्यात माझेच वर्णन करायचे, असा थोडाफार प्रकार होण्याची शक्यता आहे. अर्थात, मी थोडीफार तठस्थ वृत्ती ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे पण, काही ठिकाणी, माझा आणि माझ्या मतांचा उल्लेख अनिवार्य ठरावा. तेंव्हा, तेव्हढी सवलत,तुमच्याकडून  अपेक्षित आहे.
१९९४ च्या मध्यापर्यंततरी, माझा या देशात जाण्याचा संबंधच नव्हता कारण, मी नुकताच नायजेरिया मधून परत आलो होतो आणि दुसरीकडे नोकरीचे प्रयत्न चालूच होते. साउथ आफ्रिकेची संधी तशी मला फार अचानकच मिळाली. तेंव्हा, एक संधी, इतपतच या गोष्टीकडे महत्व होते पण, एकदम, मुलाखतीचे बोलावणे आले आणि मी चक्क निवडला गेलो!! मग, visa, तिकीट,सामानाची बांधाबांध वगैरेची नेहमीची धावपळ सुरु झाली आणि अक्षरश: धडपड करीतच विमानात बसलो-एयर इंडिया पकडून, डर्बनला निघालो. साउथ आफ्रिका पोहोचेपर्यंत, हा देश कसा आहे, याची अंधुकशी देखील कल्पना नव्हती!! फक्त, माझ्या मित्राचा भाऊ, मकरंद फडके, याचा फोन नंबर जवळ होता आणि तो जोहानसबर्ग येथे राहतो, एव्हढीच माहिती, माझ्याकडे होती. किंबहुना, मी ज्या शहरात राहणार आहे-पीटरमेरीत्झबर्ग या शहराचे नाव  मी प्रथमच ऐकत होतो. जोहानसबर्ग, डर्बन, केप टाऊन आणि पोर्ट एलिझाबेथ या शहरांची नावे वगळता, काही माहिती नव्हती. डर्बन विमानतळावर उतरल्यावर, देशाची थोडी फार कल्पना यायला लागली. डर्बनपासून जवळपास ९० किलोमीटर अंतरावर, पीटरमेरीत्झबर्ग शहर आहे आणि हरूनच्या (माझा बॉस!!) गाडीतून या शहरात येताना, जे अप्रतिम दर्शन या देशाचे झाले, ते आजतागायत कायम आहे. प्रचंड हमरस्ते, हवा थंडगार, सगळीकडे स्वच्छता आणि अति शांतता. सबंध प्रवासात, कुठे हॉर्नचा आवाज नाही की माणसांची वर्दळ नाही!! आजही, माझ्या मनात, या देशाचे हेच चित्र ठसलेले आहे. वास्तविक, सरत्या थंडीचे दिवस होते, तरीही हवा चांगल्यापैकी थंड होती.
पीटरमेरीत्झबर्ग शहर हे टेकड्यांवर वसलेले आहे. आपल्या पुण्यासारखेच शहर आहे-निवृत्त लोकांसाठी अप्रतिम!! एकूणच सुरवातीचे दिवस जरा अवघडच गेले कारण, लोकांचे इंग्लिश!! मी, नायजेरियात राहून आलेलो, तिथले इंग्लिश तर, खुद्द शेक्सपियरने नव्याने शिकावे!! तर, इथले इंग्लिश सगळे तोंडातल्या तोंडात पुटपुटणारे!! त्यामुळे, सुरवातीचे दिवस फारच अवघड गेले. काय बोलताहेत, याचे नेमका अर्थच लागायचा नाही. मग, मी एक शक्कल लढवली, तेंव्हा मी स्मोकिंग करायचो, व त्याचा आधार घेऊन, मग बोलणाऱ्याला, परत बोलायला लावायचे आणि अर्थ मनाशी जुळवायचा!! विशेषत; गोरे लोक बोलायला लागले तर माझी भंबेरी उडवायचे! अर्थात, महिन्या-दोन महिन्यात सगळा अंदाज यायला लागला. आता तर, मी त्यांचे “पाणी” व्यवस्थित जोखलेले आहे आणि आता प्रत्येकाला व्यवस्थित हाताळतो!!
ऑफिसमध्ये बऱ्याच मुली होत्या. काही, लोकल भारतीय(यात, मुसलमान, हिंदू, तामिळ, गुजराती असे सगळे येतात!!), एक कलर्ड आणि दोन व्हाईट तर, बरेचसे, पुरुष हे भारतीय वंशाचे होते. त्यामुळे, पहिल्या नोकरीतच इथल्या समाजाची फार जवळून ओळख झाली. आता, इथे मी लिहिताना, प्रथम सामाजिक परीस्थितीवर प्रथम लिहीन. आज जवळपास, पंधराहून अधिक वर्षे, या देशात मी काढली, तरीही माझ्या सुरवातीच्या मतांमध्ये फारसा फरक पडला नाही.
तेंव्हा, अर्थात, प्रथम, भारतीय वंशाचे लोक!! अगदी, स्पष्टपणे मत मांडायचे झाल्यास, इथले भारतीय वंशाच्या लोकांची मानसिक स्थिती पूर्णपणे दुभंगलेली आहे. ना धड भारतीय ना धड पाश्चात्य!! अशा त्रिशंकू मनोवस्थेत इथले भारतीय वंशाचे लोक राहत आहेत. पुढे मी अशी बरीच उदाहरणे देईन की ती माझ्या या मताला बळकटी मिळेल. तेंव्हा, पहिला भाग मी इथेच संपवितो.

No comments:

Post a Comment