अरविंद गोखले हे नाव उच्चारले की लगेच “एक कथालेखक” अशी सर्वमान्य प्रतिमा आपल्या मनात उभी राहते आणि तसे पाहिले गेल्यास, त्यात काहीही चूक नाही. गोखल्यांनी आयुष्यभर सतत “कथा” हेच आपल्या अभिव्यक्तीचे साधन मानले आणि त्यांनी , आपल्या सगळ्या अनुभवांचे “कथा” याच माध्यमाचा आधार घेऊन साहित्य लिहिले. विशेषत: “कातरवेळ”, “मंजुळा” सारख्या केवळ “असामान्य म्हणाव्यात अशा अप्रतिम कथा त्यांनी मराठी साहित्याला दिल्या. “कातरवेळ”सारखी अत्यंत तरल आणि तितकीच बांधीव कथा, मराठीतील कथा साहित्यात एक मानदंड होऊन बसली आहे. जवळपास, पन्नास वर्षे, त्यांनी स्वत:साठी “कथा” हेच माध्यम वापरले. अगदी तशी तुलनाच करायची झाली तर, जी.ए.कुलकर्णी यांचा असामान्य अपवाद वगळता, कथेवर इतकी “अव्यभिचारी” निष्ठा कुणाही लेखकाने ठेवल्याचे, निदान मराठीत तरी आढळत नाही. अप्रतिम कथालेखक बरेच झाले, उदाहरणार्थ, गंगाधर गाडगीळ,व्यंकटेश माडगुळकर, दि.बा.मोकाशी आणि असेच काही लेखक, जरी मुलत: कथालेखक म्हणूनच ओळखले गेले तरी त्यांनी, प्रसंगपरत्वे इतर साहित्याचे प्रकार देखील हाताळले आहेत, असेच दिसून येते. यामुळेच असावे, पण, याच निष्ठेने त्यांनी, “अग्निहोत्र” नावाचे पुस्तक लिहिले आहे.
आपल्या मराठीत, अशा प्रकारचे पुस्तक लिहिले असेल, असे निदान माझ्या तरी वाचनात आलेले नाही. आपल्याकडे, असामान्य लेखक झाले आहेत पण कधीही त्यांनी, आपल्याच लेखनाचा “माग” घेऊन, त्या अनुभवावर काही लिहिल्याचे आढळत नाही. लेखन हे नेहमीच एका उन्मादक्षणी निर्मिलेली कला असते, हे मान्य पण म्हणून तो जाणवलेला क्षण आणि त्या मागे साठलेले अनुभवाचे संचित, या व्यवहाराबद्दल कुणीही फारशी सजगता दाखवत नाही. एक लेखक म्हणून समाजात वावरताना, आपल्याला अनेक अनुभवांना तोंड द्यावे लागते, त्या अनुभवांचा बरा – वाईट परिणाम आपल्या मनावर घडत असतो आणि कधीतरी त्याच अनुभवाने त्रस्त होऊन(चांगल्या अर्थाने!!) मग लेखक लिहायला घेतो, अशी एक सर्वसाधारण लेखन प्रक्रिया असे शकते. अर्थात, हा एक अत्यंत ढोबळ निष्कर्ष झाला. गोखल्यांनी, याच जाणीवेचा “माग” काढण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेला आहे. वास्तविक, प्रतिभेचे गारुड हे नेहमीच वाचकाला आणि खुद्द लेखकाला सुद्धा चकवा देणारे असते आणि याच विषयाचा थेट वेध घेण्याचा लेखकाने या पुस्तकात प्रयत्न केलेला आहे.
या पुस्तकाची सुरवातच मुळी, “क” कथेतला, या प्रकरणाने होते आणि इथेच लेखकाची कथा या विषयावरील निष्ठा ध्यानात येते. अर्थात, कथा हे माध्यम किती परिपूर्ण आहे, कवितेपेक्षा अधिक अंतर्मुख करणारे आहे( हा मुद्दा जरी विवादास्पद असला तरी गोखल्यांचे त्यावरील विवेचन अतिशय समर्पक-त्यांच्या दृष्टीने आहे!!) याच अनुरोधाने, कादंबरी बऱ्याचवेळा अति पसरत, फापटपसारा मांडणारी होते, नाटक कसे अति “बहिर्मुख” असते, असे सुंदर विवेचन केले आहे आणि हे शांतपणे वाचल्यावर, मग आपल्यालाच प्रश्न पडतो की, जर का, कथा माध्यम इतके सशक्त आणि परिणामकारक असेल तर,मग जागतिक साहित्यात कथेला मानाचे स्थान का मिळत नाही? जेंव्हा केंव्हा जागतिक दर्जाचे साहित्य विचारात घेतले जाते, तेंव्हा बहुतांशी कादंबरी,कविता आणि काही प्रमाणात नाटक, यांनाच स्थान मिळते!! पण गोखल्यांना असा प्रश्न पडत नाही.(स्वत:हून खालचे स्थान कोण स्वीकारील म्हणा!!)
याच पुस्तकात, त्यांनी, कथांची पुस्तके खपवताना, विक्रेत्याला किती यातायात करावी लागते, याचे नमुनेदार उदाहरण दिले आहे. कथासंग्रह (अपवाद वगळता!!) हा व्यवहार बराचसा आतबट्याचा ठरतो, याची त्यांनी अनेक उदाहरणे दिली आहेत. खरतर, “कथासंग्रह – एक कोडगा प्रकार” या नावाने त्यांनी एक प्रकरण लिहिले आहे आणि कथालेखक म्हणून लेखक आयुष्यात जगू शकत नाही, याची स्पष्ट कबुली दिली आहे.
सर्वात सुंदर भाग आहे तो, कथांच्या जन्मकथा!! गोखल्यांनी, आपल्याला कथा कशा सुचल्या, त्यावर त्यांनी कसे चिंतन केले आणि नंतर जेंव्हा अगदी राहवले नाही, तेंव्हाच कथा लिहायला घेतल्या. माझ्या मते, हाच भाग अतिशय मनोरंजक आहे आणि इथेच या पुस्तकाचे वेगळे वैशिष्ठ्य ध्यानात येते. आपल्याला एक सुंदर कल्पना सुचते, ती आपण मनात काही दिवस घोळवत राहतो, त्यावरचा साहित्यिक परिणाम मनात आकाराला घेत असताना, लिहायला सुरवात करतो, हे सगळेच फार विलक्षण वाटते. अर्थात, प्रत्येक वेळेस हीच पद्धत अनुसरली जाते, असे नव्हे आणि हे खुद्द लेखकच कबूल करतो. या दृष्टीने,’वाढदिवस”, “मुसळधार” या कथांचा “जन्म” मनात कसा अंकुरला गेला, हे वाचण्यासारखेच आहे.
नंतरच्या भागात, त्यांनी कथेच्या संदर्भात काही वेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न कसा केला आणि कधी कधी तो प्रयत्न कसा फसला, याचे सुद्धा सुंदर वर्णन आहे. इथे बरेचसे लेखन हे “आत्मगत” या स्वरूपाचे होते. कधी दीर्घ कथा तर कधी अल्पाक्षरी कथा तर कधी आपल्या मित्रांच्या समवेत बसले असताना, सगळ्यांना एक विषय देऊन, त्यावर प्रत्येकाने कथा लिहायची, अशी वेगळी कल्पना कशी लढवली आणि त्यानुरूप प्रत्येक लेखक त्याच्या पिंडानुसार कशी कथा लिहील याची कल्पना करायची, हे सगळेच मुळातून वाचण्यासारखे आहे आणि त्या निमित्ताने, लेखक म्हणून आपला पिंड कसा घडत गेला याचे देखील सुरेख विवेचन आहे.
आपण एक सिध्दहस्त लेखक आहोत आणि याच वृत्तीने, आपल्याला समाजात कसे जगावे लागते, आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक अनुभव हा “कथेच्याच” अंगाने कसा भावत राहतो, याचे फायदे आणि तोटेदेखील विशद केलेले आहेत. एखादा अनिभाव आला की, आपल्या मनात तो अनुभव कसा आकाराला येतो, त्यावेळी किती मानसिक ताण सहन करावे लागतात, त्या अनुभवाच्या अनुषंगाने, कथेचा विस्तार कसा केला जातो आणि शेवटी कागदावर तो अनुभव कितपत गोटीबंद अवस्थेत उतरवला जातो, याचा लेखाजोगा गोखल्यांनी अगदी शास्त्रोक्त पद्धतीने घेतलेला आहे. त्याच मुद्द्यावर लिहिताना, त्यांनी “प्रतिभा” आणि “प्रतिभेचे गारुड” या विषयावर अप्रतिम चिंतन केलेले आहे. लाखेक स्वत:च शास्त्राचा विद्यार्थी असल्याने, प्रत्येक मुद्दा कुठेही न रेंगाळता, मांडला गेला आहे आणि शास्त्र कितीही प्रगत झाले तरी, “प्रतिभा” ही नेहमीच अनाकलनीय असणार, याचा पडताळा दिला आहे.
एक लेखक आणि त्याचा साहित्यिक मनोव्यापाराचा प्रवास कसा असू शकतो, याबद्दलचे सर्वसामान्य वाचकाला नेहमीच कुतूहल असते आणि ते कुतूहल, अरविंद गोखल्यांनी बऱ्याच प्रमाणात, अत्यंत तठस्थ वृत्तीने आणि शक्य तिथे शास्त्रोक्त दृष्टीकोन अंगीकारून लिहिले आहे आणि हाच तो त्यांचा “अग्निहोत्र” जो त्यांच्या आयुष्यात सतत चाललेला होता. एखाद्या माध्यमावर किती अव्याभिचारी आणि अत्यंत डोळस नजर ठेवल्यावर कशा प्रकारचे अनुभव येतात, याचे प्रस्तुत पुस्तकात प्रत्येक पानावर दर्शन होते. लेखक म्हणून, आयुष्यात किती तडजोडी कराव्या लागतात, कितीही शोधक नजर ठेवली तरी, कथा लिहिताना किती मनातल्या मनातच बऱ्याचशा कल्पना लपून राहतात, आणि ती कथा लिहून पूर्ण झाल्यावर परत वाचताना, येणारा हताशतेचा संत्रस्त अनुभव, याचा मनोज्ञ वाचिक अविष्कार घेण्यासाठी, हे पुस्तक वाचणे ही आपली मानसिक गरज ठरू शकते.
arvinda gokhale hyanchi maher hi kadambari kuthe vikat milel. far varsha zhale shodtoy.
ReplyDelete9833864129
ReplyDelete