Wednesday, 18 June 2014

गुलजार – प्रतिभासंपन्न कवी!!




हिंदी चित्रपट गीतांत सरळ, सरळ दोन भाग पडतात. १] गाण्यात काव्य असण्याची गरज नाही. गेयता पुरेशी आहे. २] गीतात काव्य आले तर काय बिघडले? अर्थात, दोन्ही वादांत तथ्य जरूर आहे पण फक्त गेयता ठेवण्याच्या नादात, गीताचा दर्जा घसरलेला कितीतरी वेळा दिसून आलेला आहे. गीतात गेयता असणे, अनिवार्य असते आणि अगदी, गीतात काव्य आणले तरी गेयता असावीच लागते. बरेच कवी असे म्हणतात, मुळात चित्रपट हे दृश्य माध्यम असल्याने, गीतात काव्य आणले तरी काही उपयोगाचे नाही, कारण गीतातील काव्य फारसे कुणी बघत नाही. या वाक्यात तथ्य जरूर आहे परंतु काही विचारवंत संगीतकार, नेहमी उत्तम कवितेची अपेक्षा ठेवतात, ज्यामुळे त्यांना चाल बांधण्यासाठी हुरूप येतो. अखेर हा प्रत्येकाच्या पिंडाचा भाग झाला. रसिकांचा विचार केल्यास, प्रथम गाणे, नंतर कविता वगैरे गोष्टी येतात. माझ्यापुरते म्हणायचे झाल्यास, मला गीतात कविता असणे, अधिक भावते. प्रसिद्ध कवी, गुलजार या दृष्टीने कवी, हिंदी चित्रपट गीतांत फार मोठे नाव मिळवून आहेत. आतापर्यंत त्यांनी असंख्य चित्रपट गीते लिहिली, सगळीच एकाच मापाने मोजण्याची गरज नाही परंतु हाताच्या बोटावर मोजता येतील अशी गीते, त्यांनी निर्मिलेल्या दर्जाच्या पासंगाला देखील येऊ शकणार नाहीत!! आज जवळपास ६० वर्षे ते चित्रपट गीते लिहित आहेत (खाजगी कविता इथे धरलेल्या नाहीत) आणि हा काल विचारात घेता, त्यांनी दाखवलेला दर्जा, निश्चित प्रशंसनीय आहे.
इथे मी त्यांची एकच कविता लक्षात घेणार आहे, त्यामुळे कवीची कवितेबद्दलची भूमिका,रचना, इत्यादी बाबी ध्यानात घेता येतील. चित्रपटातील गाणे, हे प्रथम “काव्य” असते, ही माझी प्राथमिक भूमिका आहे. तेंव्हा कवितेबाबत जे काही निकष अस्तित्वात आहेत, त्याचा दृष्टीने मी विचार करणार आहे. गुलजार यांच्या कविता वाचताना, आपल्या मनावर नेहमी परिणाम होतो, तो अत्यंत अनुरूप अशा शब्दांचा, शब्दांच्या योजनेचा, अभिव्यक्तीतील घडणीचा, बांधणीचा. कविता ही नेहमीच शब्दांच्या आधारानेच अस्तित्व घेते, वाढते आणि शेवटचा ठसा उमटविते, तो देखील शब्दरुपांचाच!! इथे मला आशय-अभिव्यक्तीतील एक समस्या विशेष जाणवते. चांगल्या अभिव्यक्तीचा एक गुणविशेष नेहमी सांगितला जातो, तिचे अस्तित्व भासूच नये. तिने आशयात पूर्ण विलीन व्हावे. यात खरा नसलेला एक भाग आहे,, हे म्हणताना साधनाच्या विशिष्ट अशा व्यक्तिमत्वाचा त्यात अनादर केला जातो. एखादा आशय अनेक साधनांतून व्यक्त होऊ शकतो. चित्रपट गीते अभ्यासताना, हा विचार नेहमी ध्यानात घेणे अत्यंत जरुरीचे आहे.
“हमने देखी है उन आंखो की महकती खुशबू, हाथ से छुके इसे रिश्तो का इल्जाम ना दो;
सिर्फ एहसास है ये रूह से महसूस करो, प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम ना दो”.
एकदा प्रसिद्ध कवी, पु.शि. रेग्यांनी म्हटले होते, ” शब्द हा आपली सगळी सृष्टी घेऊन, पुन: आपले शब्दत्व टिकवून ठाम असतो”. इथे जरा नीट बघितले तर असेच दिसेल, शब्द आणि शब्दरूपाचा शोध चाललेला आहे. अत्यंत तरल कल्पना, “आंखो की महक” अलवारपणे दिसणे आणि त्या दिसण्याला दुसरा कुठलाच स्पर्श होऊ नये,इतकी काव्यात्मक इच्छा!! पुढे म्हटले आहे, “सिर्फ एहसास है” पण तरीही “महसूस करो” म्हणजे परत जाणीवेच्या पातळीवरच तो स्पर्श, त्या भावना आणि त्या भावनांतील आशय, याचा आस्वाद घ्यावा!!
इथेच, कवितेचा आस्वाद म्हणजे एकलक्ष्यीपणाने, एकाग्रतेने सतत आणि अत्यंत समरसतेने घेतलेला रमणीय आशय, असेच म्हणावेसे वाटते. आस्वाद हा कवितेचा, मग “शब्दरूप” म्हणजे काय? असा प्रश्न इथे उद्भवू शकतो. कविता ही निर्मिती आहे आणि तिचे स्वरूप घडते ते भावात्मक आशय आणि भाषा यांच्या एकमेकांत मिसळून एकरूप होण्याच्या क्रियेतून. एखाद्या आरशात प्रतिबिंब बघावे, तशा या ओळी आपल्या समोर भावाशय आणून ठेवतात.
“प्यार कोई बोल नही प्यार आवाज नही, एक खामोशी है सुनती है कहा करती है;
न ये बुझती है न रुकती है न ठहरी है कही, नूर की बूंद है सदियो से बहा करती है.”
प्रत्येक कवीच्या स्वत:चे असे खास आवडीचे शब्द असतात, जसे सुरेश भटांच्या कवितेत,”टपटपणे” सारखा शब्द किंवा आरतीप्रभूंच्या कवितेत “हळदीवा” हा शब्द अनेक कवितेत वेगवेगळ्या अनुभूतीने आपल्याला भेटतो. गुलजार यांच्या कविता वाचताना, “खामोशी” तसेच “चांद” हे शब्द असेच सारखे भेटत असतात. मुळातली ही भावकविता, इथे अधिक अंतर्मुख होताना दिसते. चांगल्या कवितेचे हे एक वैशिष्ट्य मानावे लागेल, वाचताना मनात कुठेतरी “कळ” उमटविण्याची ताकद त्या रचनेत असावीच लागते. शब्द नेहमीच्या परिचयाचे असतात परंतु रचना करताना, त्याच शब्दांचा पारंपारिक अर्थ बदलून, त्या शब्दाला नवी “झिलई” देण्याची करामत कवीने करणे जरुरीचे होते. या ओळीत, संवेदनांच्या अनेक छटा उभ्या राहतात पण त्या कशा? त्या अनुभवाची असण्याची स्थिती न दर्शविता, ती घडण्याची क्रिया तदतर्भूत अशा सर्व ताणांसह , लयीसह साक्षात घडत आहेत, अशी अनुभूती देतात. ही सगळीच कविता विशेषणं आणि क्रियाविशेषणं यातून रूप घेते. जणू फिरत्या गतीबरोबर रेषादेखील कोन बदलून त्यांनी निरनिराळे व्हावे!!
एकदा “प्यार कोई बोल नही” हे झाल्यावर पुढील संवाद साधण्यासाठी अवकाशात असलेली “खामोशी” बोलणे क्रमप्राप्त होते. उर्दू आणि हिंदी शब्दांची जडणघडण किती वेगवेगळ्या पातळीवर वावरत आहे, हे बघण्यासारखे आहे. “नूर” आणि “सदियो” हे वास्तविक उर्दू शब्द पण तरीही “न रुकती है, न ठहरी है” या हिंदी शब्दांबरोबर जोड लावल्याने वेगळाच भाषिक अलंकार दृष्टीस पडतो.
“मुस्कुराहट सी खिली रहति है आंखो मी कहीं, और पलको के उजाले से झुके रहते है;
होठ कुछ कहेते नहीं कापते होठो पे मगर,कितने खामोश से अफसाने रुके रहते है.”
मघाशी मी “खामोश” या शब्दाबद्दल जे लिहिले त्याचेच प्रत्यंतर इथल्या ओळींत दिसून येते. म्हणजे अर्थ एकच परंतु रचनेत त्या शब्दाचे “ठेवणे” किती विलोभनीय!! कवितेची ही खास वैशिष्ट्ये, ज्यातून भाषेचे वैभव दृग्गोचर होते, ते अवलोकणे नेहमीच मनोरंजक असते. प्रत्येक भाषेत काहीकाही शब्दांची “जोड” ही नेहमीच अप्रतिम सौंदर्याची अनुभूती देत असते. जसे इथे “खामोश – अफसाने” हे शब्द आहेत. इथे हेच शब्द आवश्यक असतात. आणखी एक उदाहरण मला इथे आठवले. “महक – गेसू” ही शब्दजोड. वास्तविक, “गेसू” च्या जागी “बाल” किंवा “झुल्फ” हे शब्द बसू शकतात परंतु “महक” येण्यासाठी “गेसू” हाच शब्द अप्रतिम. अशा शब्दांचे व्याकरणिक पृथक्करण करणे अति अवघड आहे किंवा अति शब्दछल करण्यासारखे होईल.
गुलजार यांची कविता म्हणजे एक “रिच्युअल” असते, तो एक विधी असतो. आणि एकदा विधी असतो, असे म्हटल्यावर त्या विधीचे सगळे साग्रसंगीत करणे, हेच आपले प्राक्तन ठरते. इथे उद्दिष्ट आणि रूप, याचे सरळ सरळ नाते नसते. शब्द हे केवळ निमित्त. या शब्दांच्या कृतीत जे घडते, ते तसेच घडणे, हा आशय असतो. हेच नेमके कळण्यासाठी आधीच्या ओळींत नुसते सूचन असते. त्यामुळे उद्दिष्ट आणि रूपं यांचे मनात मनात जे एक नाते असते, त्याला धक्का दिला जातो. तिच्याशी निगडीत असलेले इतर कृतींचे संदर्भ निश्चित झालेले असतात आणि तेच नेमके इथे ढासळते, पण ते ढासळताना, संपूर्ण आकृती अत्यंत संपृक्त पद्धतीने बांधीव होते आणि हेच गुलजार यांच्या कवितेचे खास वैशिष्ट्य मानावे लागेल.

No comments:

Post a Comment