Thursday, 19 June 2014

कै.अशोक रानडे – प्रकांड पंडित!!



मनापासून लिहायचे झाल्यास, अशोक रानडे यांच्यावर माझ्यासारख्याने काही लिहावे, इतकी माझी पात्रता तर अजिबात नाही आणि तितकी जवळीक देखील नव्हती. दोनच आठवड्यांपूर्वी, एका मित्राच्या ओळखीने, त्यांच्याशी संपर्क साधून लगेच भेट मिळवली होती आणि त्यांनी फोनवर लगेच आणि आनंदाने भेटायला बोलावले. त्यानुसार, मी त्यांना तासभर भेटायला गेलो होतो. मनात बरीच धाकधूक होती. तशी मनात मी,माझ्या वकुबानुसार प्रश्नावली तयार केली होती. पण ,प्रत्यक्ष भेटीत, त्यातील फारच थोडे, अगदी अचूक सांगायचे झाल्यास, फक्त सहा(च) प्रश्न माझ्या कडून विचारले गेले.याचे मुख्य कारण म्हणजे, प्रत्येक प्रश्नावर त्यांनी केलेले विस्तृत विवरण!! आता, आठवणीला ताण दिल्यावर, साधारणपणे, १९८९/९० मध्ये, मी त्यांना, एन.सी.पी.ए. मध्यर भेटायला गेलो होतो. त्यावेळी, नुकताच त्यांनी आणि पु.लं.नी तिथे काही दिवसांपूर्वी, “बैठकीची लावणी” सारखा, केवळ अप्रतिम म्हणावा लागेल, असा कार्यक्रम केला होता. आदर्श आणि अभ्यासपूर्ण विवेचनाचा असामान्य धडाच जणू त्यांनी, आपल्या बोलण्यातून घालून दिला होता. त्या कार्यक्रमात, त्यांचे एक वाक्य माझ्या लक्षात राहिले होते.”बैठकीची लावणी, हे महाराष्ट्राने उत्तर भारतीय संगीतातील ठुमरीला दिलेले उत्तर आहे” तो पर्यंत, मी बैठकीच्या लावण्या कितीतरी वेळा ऐकल्या होत्या पण, आता ही जी नवीन ओळख त्यांनी घालून दिली, त्यामुळे, माझा “बैठकीची लावणी” या गाण्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला. त्यावेळी, त्यांनी सादर केलेली एक सुंदर बैठकीची लावणी,(ठुमरी अंगाने) ऐकल्यावर, हा गृहस्थ नुसताच शास्त्र पंडित नसून, चांगल्या तयारीचा गायक देखील आहे, ही मला ओळख झाली. त्याच कार्यक्रमात, एके ठिकाणी, स्वरांचे महत्व सांगताना, “आपल्या सप्तकात “मध्यम” हा स्वर “मधला” आहे म्हणून, त्या स्वराचे नाव “म” आहे आणि तशीच संगती,”पंचम” या स्वराची लावली. अशा प्रकारे, शाब्दिक कोटी करताना, त्यांच्या व्यासंगाची नव्याने जाणीव झाली. आणि, या संदर्भात, मी त्यांना, त्यांच्या एन.सी.पी.ए.तील कार्यालयात गेलो. प्रथमच, मी माझ्याबद्दल स्पष्ट मीहिती आणि कबुली दिली आणि ती अशी की, “मी केवळ रसिक या नात्याने भेटायला आलो आहे. संगीताचा शास्त्रशुध्द विद्यार्थी म्हणून नव्हे!!” अर्थात, त्यांच्या समोर मी कसले पांडित्याचे प्रदर्शन करणार म्हणा!! तेंव्हा देखील, नुकत्याच झालेल्या कार्यक्रमाच्या संदर्भातील माझ्या प्रश्नांना अतिशय सुंदर उत्तरे दिली आणि एकूणच संगीत-एक शास्त्र या विषयावर मला, पं.आचरेकर लिखित,”भारतीय संगीत आणि संगीत शास्त्र” हा ग्रंथ “अभ्यासायला” संगीताला. त्यानुसार, मी तो ग्रंथ विकत घेतला पण आजपावेतो, तो ग्रंथ काही संपूर्णपणे आकलनात आलेला नाही!! असो, पण त्या ग्रंथाने माझ्या माहितीत कितीतरी अनमोल भर पडली, हे नक्की.त्यावेळीच, मी त्यांचे”संगीताचे सौंदर्यशास्त्र” हा ग्रंथ देखील वाचला होता, पण त्याच सुमारास मी परदेशी गेलो आणि त्या ग्रंथावर त्यांच्याशी बोलण्याची संधी हुकली. आता तर तो ग्रंथ देखील बाजारात कुठेही उपलब्ध नाही!!
कुणालाही, संगीत या विषयाचा सांगोपांग अभ्यास करायचा असेल तर, अशोक रानडे यांचा हा ग्रंथ प्रमाणभूत मनाला जावा. या ग्रंथात, फक्त सात स्वर, याच गोष्टीचा इतका बारकाईने अभ्यास केला आहे की वाचताना आपण थक्क होऊन जातो. वास्तविक, सप्त सुरांच्या अंतर्गत, देखील स्वर असतात आणि त्यांना “श्रुती” असे म्हणतात, पण “श्रुती” हा विषय अति किचकट आणि गुंतागुंतीचा असल्याने, या ग्रंथात, उगीच थोडक्यात “श्रुती” विषयावर लिहिण्याचे टाळले,याचा अर्थ, “श्रुती” विषय त्यांना माहित नव्हता असे नव्हे!! खर तर, जागतिक संगीतातील, कुठल्याही संगीतावर सांगोपांग आणि शास्त्रशुध्द अभ्यास त्यांचा होता.
आता, नुकताच दोन आठवड्यांपूर्वी, मी त्यांना भेटलो असता, त्यांनी बोलता, बोलता, जपानी संगीतावर इतके सुंदर विवरण केले की ऐकताना, मला असेच जाणवत होते की, मी एक गद्यात्मक गीत ऐकत आहे!! थोडासा खर्जातील आवाज, बोलण्यातील आत्मविश्वास आणि प्रत्येक वाक्य हे शास्त्राधारीतच करायचे, याच उद्देशाने बोलायचे. उगाच भावनेला हात घालायचा, असला विसविशीतपणा त्यांच्या बोलण्यात चुकूनही आढळला नाही. प्रत्येक वाक्याला बुद्धीची लखलखीत धार असायची. तसेच, मी जेंव्हा सुगम संगीतावर सुरवात केली तेंव्हा तर, त्यांनी बसल्या जागी, ३, ४ संगीतकारांबद्दल इतके सुंदर विश्लेषण केले की, मी त्यांचे बोलणे रेकॉर्ड केले नाही, याची हळहळ वाटली. सुगम संगीतावर त्यांनी इतके सुंदर भाष्य केले(अगदी रिमिक्स संगीत देखील त्यात आले!!) की, माझी मलाच लाज वाटायला लागली आणि आपण किती वरवरचे भाष्य करतो, याची लक्ख जाणीव झाली. सुगम संगीतात, कुठे आणि कशाप्रकारे प्रयोग व्हायला हवेत, चाल कशी पारखून घ्यायची, गायनात, कुठे आणि कशी विचक्षण दृष्टी ठेवायची, याचा मला सुंदर वस्तुपाठ मिळाला.
परत, प्रकृती सुधारल्यावर, परत भेटण्याचे वाचन घेऊन, मी त्यांचे घर सोडले. विशेषत:, त्यांचे “संगीताचे सौंदर्यशास्त्र” हे पुस्तक मिळवायचे होते. ते आजारी आहेत, सारखे बिछान्यावरच पडून राहावे लागते, हे समजले होते पण, इतक्या लगोलग आढयाचे पाणी वळचणीला जाईल, याची मला सुतराम कल्पना आली नाही. आता तर, सगळेच बेत, मनातच राहिले!!

No comments:

Post a Comment