Wednesday, 18 June 2014

मनात – अप्रतिम मानसिक प्रवास!!




आजही आपण विचार केला तर असे आढळेल की, अजूनही शास्त्र कितीही पुढारले गेले असा दावा करीत असलो तरी “मन” या गोष्टीचा नेमका थांग लागलेला नाही आणि ही वस्तुस्थिती आहे. जसजसा आपण “मन” या शब्दाचा विचार करायला लागतो तसे आपण, स्वत:लाच अधिक कोड्यात आणि गोंधळात टाकत जातो. “मन” म्हणजे नेमके काय, ते कुठे असते – म्हणजे आपल्या शरीरात त्याचा कुठे ठावाठीकाणा सापडतो का? असे आणि याप्रकारचे कितीतरी प्रश्नाचे मोहोळ उठते. अजूनही “मन” याचे स्थान जरी मेंदूत कुठेतरी आहे तरी त्याची व्याप्ती कोड्यात टाकते. साधारणपणे विचार आणि विचारशक्ती असा विचार मन या शब्दाभोवती फिरत असतो. असे म्हटले जाते की, मनाच्या महत्वाच्या अशा दोन पातळी आहेत. १] अंतर्मन , २] बहिर्मन परंतु अशी विभागणी आपण, जागृतावस्थेत करतो. परंतु सुप्तावस्थेत देखील आपल्याला, मनाची जाणीव होत असते!! फक्त आपण ती जाणीवेतून जाणवू देत नाही. अशा अत्यंत गूढ विषयाचे अतिशय रोचक तरीही शास्त्राला धरून असे विवेचन, अच्युत गोडबोले लिखित “मनात” या ग्रंथात वाचायला मिळते.
मन या शब्दाची व्याप्ती अति गूढ, प्रचंड आवाक्याची आहे, हे तर खरेच आणि त्यातून आजही ज्या मेंदूतून मनाची व्याप्ती जाणण्याचा प्रयत्न होतो, त्या मेंदू विषयक, आजही शास्त्र बऱ्याच प्रमाणात चाचपडत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आपलेच शरीर आणि त्यातील मेंदू मानक एक अवयव, असे असून देखील मेंदूचे कार्य, हा विषय अति जटिल, गुंतागुंतीचा आहे, हे कुणालाही मान्य व्हावे. मुळात अशा विषयाला “हात” घालावा, हेच मोठे धाडस आहे. प्रस्तुत पुस्तक म्हणजे, थोडक्यात लिहायचे झाल्यास, मन आणि मेंदू या विषयाचा मनोरंजक इतिहास तसेच अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती, असेच म्हणावे लागेल. मुळात मन म्हणजे काय आहे, ह्या मुलभूत विचाराने या ग्रंथाची सुरवात होते.मानवाच्या प्राचीन इतिहासात डोकावल्यास, भारतीय, इजिप्त,ग्रीस या प्राचीन संस्कृतीत मनाचा उल्लेख आढळतो. त्यानिमित्ताने अनेक विचारवंतांनी आपली मते मांडली आहेत आणि त्यानुसार मनाची व्याख्या करण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला आहे. अर्थात पुढे जसे शास्त्र प्रगत होत गेले तशी, या मतांमधील त्रुटी दिसायला लागल्या. परंतु, सगळ्याच शास्त्राची सुरवात ही अंधारातच होत असते. हळूहळू, त्यावर संशोधन होत,विचार विनिमय, वाद, मतांतरे यातूनच शास्त्र प्रगत होत असते आणि ह्याच अनुरोधाने, पहिल्या भागात ख्रिस्तपूर्व काळातील मनाच्या शोधाचा वैचारिक प्रवास रेखाटलेला आहे. त्याकाळी उपलब्ध साधनानुसार आणि प्रचलित समजुतीनुसार मांडली गेलेली मते, आज जरी कालबाह्य वाटत असली, क्वचित हास्यास्पद होत असली तरी, त्यावेळचा समाज, संस्कार, प्रचलित चाली-रीती यानुसारच मते तयार होत गेली, हे लक्षात ठेवणे जरुरीचे आहे. पुढे मानवाची उत्कंठा वाढत गेली, काळानुरूप नवी साधणे हाती आली आणि जुन्या मतांमधील फोलपणा ध्यानात यायला लागला.
दुसरा भाग, त्यादृष्टीने अधिक महत्वाचा आहे. मेंदू: शोध आणि रचना – या भागात, मेंदू या अवयवाची सखोल चर्चा केली आहे. मुळात, मेंदूची रचना कशी आहे, पूर्वी काय समज-अपसमज प्रसिद्ध होते, त्यानुसार कशा “कृती” आणि वि”कृती” समाजात पसरल्या होत्या, त्यात पुढे कसा फरक पडत गेला, यासगळ्याचा मनोरंजक इतिहास तर आहेच परंतु “मेंदू” या अवयवाबद्दल फार वेगळी आणि शास्त्रशुद्ध माहिती मिळते. फ्रेनोलॉजी  म्हणजे काय, त्यातील पुढे सिद्ध होत गेलेला फोलपणा, मेंदू कशापासून मानला आहे याची शास्त्रशुध्द माहिती मिळते. तसेच, त्यानिमित्ताने, त्यातील पेशी, न्युरोन्स ,न्युरोट्रान्समीटर्स तसेच या अवयवाला जोडलेल्या नळ्या इत्यादीची अतिशय विस्तृत आणि पद्धतशीर माहिती मिळते. आपल्या शरीरातील मेंदू म्हणजे काय प्रकारचा अवयव आहे, त्याचे कार्य कसे चालते, आणि “मनाचा” उगम तिथे होत असतो म्हणजे नेमके काय घडत असते, ही सगळी माहिती मुळातून वाचण्यात खरी  मजा आहे. त्यातच पुढे मेंदूचे आधुनिक शास्त्रानुसार कसे चित्रीकरण होत गेले याचा इतिहास आणि तरीही अजूनही मेंदू याबाबत आपण किती अंधारात आहोत, याचीच नेमकी जाणीव होते.
मानसिक शास्त्राच्या इतिहासात Freud याचे नाव निश्चितच वरच्या श्रेणीत घेतले जाते. किंबहुना, मानवी इतिहासात याचे नाव मोठ्या गौरवाने घेतले जाते. तशी त्याच्या मतांवर टीका त्यावेळी झाली आणि नंतर त्यातील फोलपणा सिद्ध केला गेला तरी त्याने मन या विषयात, वर जे मुलभूत विचार मांडले, ते आजही ग्राह्य मानले जातात!! अर्थात, Freud काही मानसशास्त्रातील पहिला विचारवंत नव्हे परंतु, त्याने या शास्त्रावर मोठा प्रभाव टाकला.या दृष्टीने, मानस शास्त्राचा इतिहास लिहिताना, याची ओळख विस्ताराने येणे क्रमप्राप्तच आहे. हिप्नोटिझम, हिस्टेरिया या विषयांच्या वाटचालीत, पूर्वीपासून गूढता पसरलेली आहे. त्यातून “स्वप्न” या अबोध मनातील गुंतागुंतीचा आढावा घेताना, आणि पुढे या विषयात Freud ने किती नव्या उत्पत्या निर्माण केल्या, त्याचा या शास्त्रावर कसा प्रभाव पडला इत्यादी बाबींचे सुरेख वर्णन वाचायला मिळते. वास्तविक, हा विषय समजायला अतिशय कठीण खरा परंतु, लेखकाची खासियत अशी की, इतक्या अवघड वाटणाऱ्या विषयात देखील सोप्या भाषेत विवरण करणे, शक्य आहे, हे दाखवून दिले आहे. केवळ इथेच नसून, पुढील सगळ्या प्रकरणात हाच दृष्टीकोन आहे. Freud आणि त्याच्या जोडीने, युंग व इतर शास्त्रज्ञांची माहिती वाचायला मिळते. या शास्त्रज्ञांवर लेखकाने बरीच सविस्तर माहिती लिहिली आहे,याचे मुख्य कारण असे संभवते की, या विषयात या माणसाने किती मूलगामी संशोधन केले आहे आणि त्या सगळ्याचा एकूणच “स्वप्न” या संदर्भात किती मोठा प्रभाव पडलेला आहे, हे दर्शविण्यासाठी जवळपास ७० पाने लिहिली आहेत.
स्वप्नांच्या अनुरोधाने पुढे जाताना, मग Experimental Psychology, Behaviorism, Gestalt Psychology  आणि Development Psychology इत्यादी मानसशास्त्रातील शाखांवर, त्या विषयाच्या इतिहासाच्या अनुरोधाने, अनेक शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांच्या चरित्रांचा त्रोटक परंतु संदर्भयुक्त असे लिहिलेले आहे. या लेखांची मजा अशी की, यातील बहुतेक व्यक्ती आपल्या विस्मरणात आहेत तरीही त्यांच्याबद्दल लिहिताना, त्या व्यक्तींची “घडण” कशी झाली आणि अखेर या विषयांबाबत त्यांचे विचार किती परिणामकारक ठरले याची सगळी माहिती मिळते. त्यावरून, त्या व्यक्तींचा आवाका तर ध्यानात येतोच परंतु त्यासोबत त्यांच्या विशेष कार्याबद्दल बरीचशी माहिती समजते. Pavlov, Watson, Tollman, Skinner इत्यादी अनेक नावे या संदर्भात वाचायला मिळतात, सगळ्यांच्या कार्याचे यथायोग्य मूल्यमापन केलेले आहे. सगळ्यांचा उल्लेख इथे शक्य नाही. 
पुढे, Developmental Psychology, Social Psychology आणि Human Psychology हे विषय येतात. मन आणि त्याचा मानसिक प्रवास, या संदर्भात हे विषय म्हणजे, त्या विषयाची व्याप्ती अधिक रुंद करणारी, खोली दर्शवणारी, असे आहेत. यातील प्रत्येक विषय खरेतर अति अवघड आणि गुंतागुंतीचा आहे. शास्त्रीय दृष्टीकोन स्वीकारला तर समजायला कंटाळवाणा होऊ शकेल, आणि इथेच लेखकाचे कौशल्य दिसून येते. वास्तविक, बुद्धीचा “कस” पाहणारे विषय असताना देखील, त्यातील जटिलपणा बाजूला सारून, अत्यंत रसाळपणे विषयाची मांडणी करणे, हे तर शिवधनुष्यच आहे!! या सर्व प्रकरणात, एक गोष्ट ठळकपणे जाणवते. सगळ्या Psychology क्षेत्रात ज्यांनी आपले योगदान दिले आहे, त्या व्यक्तींचे बालपण, त्या विषयाशी फारसे संबंधित नव्हते. इतकेच नव्हे तर, प्रचलित समाजव्यवस्थेमुळे किंवा दुभंगलेल्या कुटुंबव्यवस्थेमुळे त्यांची मने देखील द्विधावस्थेत वाढली आणि तरीही एक विविक्षित क्षणी, त्यांना आपला मार्ग सापडला!! सगळी चरित्रे छोटेखानी आहेत परंतु त्या विषयाच्या संबंधितच आहेत. बालपणी भोगलेल्या हालांचे अति भावविवश वर्णन नाही!! विशेष म्हणजे, एकदा एखादा विचार शास्त्र म्हणून स्वीकारायचे ठरविल्यावर त्या शास्त्राची काटेकोर बांधणी आवश्यक असते, त्यादृष्टीने या शास्त्रज्ञांनी किती आणि कसे प्रयत्न केले, याचे रसाळ वर्णन वाचायला मिळते.
हे सगळे मला लिहायला फार सोपे आहे. आता, ‘बुद्धी” हा भाग बघा. आपल्या रोजच्या व्यवहारात आपण “बुद्धी” वापरत असतो, अगदी अजाणतेपणी देखील! बुद्धी म्हणजे काय?त्याचा जन्म कुठे होतो? त्याचे देखील मोजमापन करता येते आणि त्याची स्वत:ची अशी विशिष्ट पद्धत आहे, ह्या सगळ्याची जाणीव, या प्रकरणात वाचायला मिळते. Galton, Bine,Goddard, Thurman आणि अखेर Einstein या सगळ्या व्यक्तींच्या कार्याचा परामर्श घेतलेला आहे. त्या निमित्ताने, जे समाज-गैरसमज होते आणि आजही अस्तित्वात आहेत, त्याची वैचारिक छाननी केलेली आहे. यात आपले जगप्रसिध्द गणिततज्ञ  रामानुजम यांची देखील सुरेख माहिती मिळते. विशेष म्हणजे, बुद्ध्यांक मोजताना गणिताचा तितकाच समर्पक वापर केला जातो, हे वाचून थोडे आश्चर्यच वाटते. याचाच पुढला भाग म्हणजे, व्यक्तिमत्व, त्याचे प्रकार, ते तपासण्याच्या चाचण्या ह्या बाबी आपल्या समोर येतात. वास्तविक कुठलेही व्यक्तिमत्व हे नेहमीच अगम्य असते आणि बहुतेकवेळा आपण फारसा विचार न करता एकांगी मते बनवीत असतो. परंतु, याचा देखील शास्त्रशुद्ध विचार करून, गणिती मापनाने दर्जा ठरविता येतो, किमानपक्षी त्यादृष्टीने वाटचाल करता येते, हेच लेखकाने सिध्द करून दाखविले आहे.
या विषयाला अनुषंगून, मग भावना-प्रेरणा, मनोविकार आणि मानसोपचार अशी प्रकरणे लिहिली आहेत. भावनेचा उगम कुठे आणि कसा होतो, त्याबाबत कुठेल्या कसोट्या उपलब्ध आहेत, त्या शास्त्राचा विकास कसा झाला आणि त्याची मोजमापे कशी ठरविली गेली, हे मुळातून वाचायला हवे. मनोविकार हे दुखणे तसे आधुनिक काळात लक्षात आले असले तरी ह्या दुखण्याला प्राचीन काळापासून इतिहास आहे. खरेतर, मन, मेंदू, आणि तत्सम विषय हे कधीही असे अचानक उद्भवलेले विषय नसून प्रत्येक शाखेचा विचार,प्रभाव आणि अंतिम तयार झालेले शास्त्र यामागे फार मोठी परंपरा आहे, हे आपल्या लगेच लक्षात येईल. ऑटिझम, स्किझोफ्रेनिया, सारखे असाध्य विकार, हे मानसशास्त्राधारेच ओळखता येतात. अर्थात अजूनही या गोष्टींवर पूर्ण उपचार पद्धत विकसित झालेली नाही, हे कबूल परंतु ह्या गोष्टीच्या प्राथमिक चाचण्या अस्तित्वात आहेत, हा मानसशास्त्राचा विकास मानता यावा. भयगंड, निराशा, चिंता आणि मनोरुग्ण ही याच वैफल्यतेची छोटेखानी रूपे आहेत. अजूनही आपण, या बाबींवर म्हणावा तसा काबू मिळवलेला नाही. परंतु भविष्यात कदाचित असे घडू शकेलही!! आज, मानसशास्त्र ज्या स्वरुपात अस्तित्वात आहे, ती अवस्था पूर्वी स्वप्नावस्था देखील नव्हती, हे ध्यानात घेतले तर, या वाक्याचा अर्थ समजू शकेल.
माझ्या अंदाजाने, अशा प्रकारे मराठीत लिहिले गेलेले हे पहिले पुस्तक. शास्त्र म्हणून या विषयावर अनेक ग्रंथ आहेत आणि यापुढेही लिहिले जटिल. परंतु एका अत्यंत जटिल शास्त्राचा मनोरंजक पद्धतीने परिचय करून देण्याचा हा पहिला प्रयत्न असावा. पुस्तक वाचताना, प्रत्येक ठिकाणी, लेखकाच्या वाचनाचा, व्यासंगाचा आणि नेमक्या शब्दात मांडण्याचा प्रत्यय येतो. गोडबोल्यांनी कुठेही, आपण या विषयात तज्ञ आहोत, अशी भूमिका घेतलेली नाही. या विषयाच्या संदर्भात जे आपण वाचले, अनुभवले, त्याचा पडताळा, मराठी वाचकांना करून द्यायचा, अशीच भूमिका आहे. अर्थात, हे सगळे इतके सहज, सोपे नाही, हे तर उघड आहे. मुळात इतका मोठा ग्रंथ लिहायचा म्हणजे लेखकाने किती वाचन केले असेल, किती “नोटस” काढल्या असतील, आणि मुख्य म्हणजे विषय समजण्याच्या दृष्टीने जी चिकाटी दाखवली आहे, ती खरोखरच प्रशंसनीय आहे. यात कितीतरी शास्त्रज्ञांचे उल्लेख आहेत, कुठे छोटीशी चरित्रे आहेत परंतु असे संक्षिप्त लिहायचे असेल तर त्या व्यक्तीची पूर्ण माहिती करून, त्याचे नेमके आकलन करून, त्याचा गोषवारा मांडायचा, हे काही सहज साध्य नव्हे. प्रचंड मेहनत तर प्रत्येक पानावर दिसते परंतु या विषयाचे जे आकर्षण, लेखकाला आहे, त्याचेही दर्शन प्रत्येक पानावर दिसते. ग्रंथ वाचून झाल्यावर, काही क्षण आपण देखील सुन्न होतो. मन, मानसिक प्रक्रिया, त्याचे चलन-वळण, त्यामागील घटना, त्याचा अन्वयार्थ ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हतबुद्ध करतात, हे मात्र नक्की.

No comments:

Post a Comment